तो...नाही आता

Submitted by रोहितकुलकर्णी on 24 July, 2020 - 12:27

तो उदासीनता लपवत नाही आता
तो कोणालाही दुखवत नाही आता

मदतीस कुणी आले ना त्याच्या वेळी
तो वेळ कुणाला कळवत नाही आता

स्वप्नांना हसले सगळे एकदिलाने
तो स्वप्नांमध्ये हरवत नाही आता

भरतीने लुटले वाळूचे घर त्याचे
तो शंख-शिंपले जमवत नाही आता

तो विरोध सोसून पोहून दमला इतका
तो प्रवाह कुठला वळवत नाही आता

घोड्यांची शर्यत नशिबी आलीच नाही
तो काळीज त्याचे दमवत नाही आता

प्रत्येकाच्या मर्जीने झुकला तो ही
तो गुडघे त्याचे मळवत नाही आता

ठेविले अनंते जगतो आहे सध्या
तो काही केल्या उसवत नाही आता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर
एका मोठ्या वृक्षाच्या छायेखाली बसल्याचा फील दिलाय
!!! अप्रतिम !!!