श्रावणधारा - भाग १

Submitted by 'सिद्धि' on 12 July, 2020 - 06:40

('हातात आल्याचा गरमागरम चहा...खिडकीबाहेर यथेच्छ भुरभुरणारा अल्लड पाऊस... आणि माझी ही, एकूण चार भागांची प्रेमकथा, 'श्रावणधारा' तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.')

यार तिला बघून माझे फ्रेंड्स काय म्हणतील? अगदी टिपिकल...केवढी आऊटडेटेड आहे. शीट्टsss, शॉनला सांगत होतो एकटाच गाडी घेऊन ये. त्या निक्याला घेऊन येऊ नकोस, तर सोबत अजून पॅम. सो ऑकवर्ड. सगळ्यांसमोर हसे होणार? राघवच्या मनात एक ना हजार प्रश्न उभे होते. अखेर ईन्टरनॅशनल एअरपोर्ट सेकंड गेटने मीरा बाहेर पडली. आपली बॅग सावरत तिने दुरुनच हात दाखवला, इकडे पट्ठ्या पाच मिनिटे फुल टू कन्फ्युज.
‘हिच का ती? काय वेडसर दिसत होती लग्नात… हिरवागार चमकीचा चापुन-चोपून नेसलेला शालू... ती आजी-पणजीच्या काळातली नाकापेक्षा जड भली-थोरली नथ... डोक्यात उजवीकडे खोचलेली ढिगभर गुलाब-मोगर्याची फुल. पण तरीही मला ती आव???’

"रघु! तिचं का रे मीरा?" निक्याच्या प्रश्नाने राघव भानावर आला आणि त्याच्या मनातलं अर्धवट वाक्य मनातच विरून गेलं.

"ह... हो!" मिनिटभर तो तिच्याकडे टक लावून उभा होता, आणि तोपर्यंत ती अगदी त्याच्या समोर येऊन उभी. पिचक्रिम निलेन्थ कोट. केसाचा मस्त हायबन. कानात व्हाईट स्टोनचे रिंग, चेहर्‍यावर मात्र नेहमीचीच अतीव शांतता. पॅम, आणि निक्याच आत्तापर्यन्त शेकहॅन्ड देखिल करुन झाल होत. राघव मात्र अजूनही थोडा साशंक.

"निघायच का?" त्याच्याकडेच बघत मीराने विचारले, आणि हाय-हॉलो अशी जुजबी फॉर्मालिटी करुन ते निघाले.

'लग्नामध्ये… त्याआधी दोनदा पाहिलेली आणि आपण आत्ता पाहतोय ती मिरा, केवढा तरी फरक आहे.' घरी येईपर्यंत हाच विचार त्याच्या मनात ठाणं मांडून होता.
*****

क वन बिएचके, पण अगदी आलिशान फ्लॉट. बर्‍यापैकी स्वच्छता होती. मोजकेच साहित्य, निटनेटकी ठेवलेली एक-एक गोष्ट मीरा निरखून पहात होती. पहिल्यादा इथे आली होती. तिच्यासाठी हे सारं काही नविन.

"गुडमॉर्निग! कॉफी?" एक कॉफीमग समोरच्या टेबलावर ठेवत राघव खुर्चीवर येऊन बसला.

"हो. आले." ओल्या केसांवरचा टॉवेल तिथेच बाजूच्या खुर्चीवर टाकत मीराने कॉफीमग हातात घेतला.

"काल इथे पोहोचेपर्यंत फारच रात्र झाली होती, म्हणुन काही विचारता आल नाही. कसा झाला प्रवास? " राघवने तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात विचारले.

"हं... छान. कॉफी छान आहे." बाजूच्या खुर्चीवर बसत मीरा उत्तरली.

"थॅक्स. ब्रेकफस्टसाठी काय ऑर्डर करु. ऑक्चुअली मिसेस फेलीस चार दिवस येणार नाही आणि मला फारस काही जमत नाही, इथे तेवढा वेळ सुद्धा नसतो म्हणा. सो बाहेरुन मागवतो. वेज या नॉनवेज, केक्स मफिन्स वगैरे काही? "

"वेज काहीही चालेल. घरी कुकीज किवा बिस्किटस असेल तर ते ही चालेल... म्हणजे ऑर्डर करण्याची गरज नाही." हातातल्या कपच्या काठावर बोट फिरवत मीरा वरती न बघताच म्हणाली.

'काय फॉरमल डिस्कशन चाललय... नॉनसेन्स, आणि ही तर एक-एक शब्द एवढा विचार करुन बोलते की बास रे बास! बोर होणार घरी आज, त्यापेक्षा ऑफिसमध्ये गेलो असतो. ' राघवच्या मनात अनेक विचार येऊन गेले आणि ते क्षणार्धात कुठल्या कुठे वीरूनही गेले. कारण तोपर्यंत मीराने बॅगमधून काढलेला जाडजूड पेपर्सचा एक बंच त्याच्यासमोर ठेवला होता.

"हे बाबांनी दिलेले सगळे लिगल डॉक्युमेन्टस, आणि बाबांनी जाण्याआधीच काही दिवस हे लेटर माझ्याकडे दिल होत. तुम्हाला द्यायला."
एक पॅकबंद खाकी लेटर त्याच्याकडे करत ती परत येऊन खुर्चीवर बसली. लेटर हातात घेतल्या क्षणी राघवच्या डोळ्यात जमा झालेले पाणी तिच्या नजरेतून सुटले न्हवते. खरं तर तिची ही अवस्था वेगळी नव्हती, पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरण्याचं तंत्र तिला चांगल अवगत होत.

"त्यादिवशी मला अचानकच त्यांचे आवडते उकडीचे मोदक आणि लाप्शीची खीर करायला सांगितली... पोटभर खाऊन ही झाल, आणि…आणि अचानक हसत खेळत त्यांनी निरोप घेतला... कायमचाच. अगदी अनपेक्षित. आयुष्य असावं तर असं. कोणी म्हणणार सुद्धा नाही, की त्याना कधी पॉरालिसिस होता. फक्त सारखी तुमची आठवण काढायचे. तरिही अजिबात अट्टाहास नाही की तुम्ही त्यांना पहायला यावंच."
ती मिनिटभरात सार काही बोलून गेली होती, जे ऐकण्यासाठी राघव अगदी आतुर होता.

"मी खुप प्रयत्न केले, पण या ऑफिसच्या फॉरमेलीटीज काही केल्या संपेनात. हे लोक सोडायला तयार न्हवते. इकडे सगळचं प्रॉक्टीकली... इमोशन्सना काहीच जागा नसते. त्यामुळे मी शेवटच्या क्षणी सुद्धा पोहोचू शकलो नाही." बोलता-बोलता राघवचे डोळे भरले.

"इट्स ओके. जवळचे सगळेच नातेवाईक आले होते, त्यामुळे सगळ्यांचा आधार मिळाला, सार काही व्यवस्थित पार पडल आणि तुमचा सुद्धा नाईलाज होता म्हणा. काही गोष्टी अटळ असतात हेच खरं. "
तिच्या नकळत तिने राघवच्या हातावर आपल्या उजव्या हाताने थोपटले, आणि तोच हात हातात घेऊन तो ही मनसोक्त रडला. पुरुषासारखा पुरुष असं ओक्साबोक्सी रडताना पाहून मीराला गहिवरुन आलं होत.

"मीरा थ्यॅक्स. अ‍ॅटलिस्ट तू तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत होतीस. " तो थोड स्थिर होत कसबस बोलला.

"माय प्लेजर." बोलत मीरा त्याच्या हातातील आपला हात अलगद सोडवून तिथून उठली, रिकामे कॉफीमग हातात घेऊन किचनकडे जायला वळली. दोन क्षण तिने आपल्या हाताकडे पाहीले. दुखर्‍या नसेवर कोणी बाम लावावा, आणि तिथे एक असह्य्य कळ उठावी तशी तिची अवस्था झाली होती. अश्या वेळी बरही वाटत असत आणि त्याबरोबर होणारा तो दाह सहनही होत नाही.

इकडे ते पेपर्सच बंडल हातात घेऊन कितीतरी वेळ राघव बाबांच्या आठवणी आळवत बसला होता. लहानपणी पासून ते अगदी इथे येई पर्यंत... शेवटची भेट झाली त्याला जेमतेम एक वर्ष सरत आले होते. त्यानंतर भारतात जाणे झालेच नाही. मीराने नकळत त्याच्या आत दाबलेल्या मुक अश्रूंना वाट करुन दिली होती. एवढं मनसोक्त रडायला सुद्धा त्याला कधी मिळाल नाही.

"अरे हो मीरासाठी ब्रेकफस्ट ऑर्डर करत होतो ना. विसरलोच." म्हणत राघव उठला आणि तो ही किचनकडे वळला.

"सॉरी मीरा थोड लेट होईल, ते ऑर्डर करायच राहुन गेल. लगेच कर..." पण वाक्य पुर्ण करायची देखिल गरज उरली नाही. मसाला नुडल्सचा दरवळ किचनमध्ये पसरला होता. आणि मीरा खिडकीतल्या पावसाकडे एकटक लावून उभी होती. राघव जवळ येऊन तिच्याशी काहीतरी बोलतोय याचे देखिल तिला भान न्हवते. उतू जाऊ पाहणाऱ्या कॉफीचा गॅस बंद करुन राघव बाजूला शांत उभा होता. जणू बाहेरचा पाऊस मोजणारी मीरा आणि तोच पाऊस तिच्या डोळ्यात मोजणारा राघव दोघे कितीतरी वेळ तसेच उभे होते. दोन मिनिटे...पाच मिनिटे... दहा मिनिटे झाली असतील.

"मीरा!" गॅसकडे आणि तिच्याकडे आळीपाळीने पाहत त्याने पुन्हा आवाज दिला.

"ह. हो. विसरलेच." म्हणत तिने गॅस बंद करत, लगोलग दोन नुडल्स डिश आणि सोबत कॉफीचे मग भरायला सुरुवात केली.

"ते मघाशी ऑर्डर करायच राहून गेल." कॉफीमग हातात घेत तो ही तिच्यामागून टेबलकडे वळला.

"हो ते माझ्या लक्षात आल होत. मी देखील लगेचच बाबांचा विषय काढायला नको होता. मग हे नुडल्स पॅकेटस फ्रिजमध्ये पाहीले, आणि करायला घेतले. चालेल ना? " मीरा एक डिश त्याच्याकडे सरकवत म्हणाली.

"हो. अ‍ॅक्चुअली पळेल." म्हणत तोही समोर बसला.

"बाय द वे, यु आर सो मच चेंज्ड, आय मीन, या आधी पाहिलं ते फक्त साडी वगैरे मध्ये, तेव्हा तू खूप वेगळी दिसत होती."

"आधी म्हणजे फक्त हळद, साखरपुडा आणि लग्नात...अश्या प्रसंगी अजून तरी आपल्याकडे साडीच घालतात हं. सगळं पारंपरिक असत ना. संस्कृतीला प्राधान्य दिल जात अश्या वेळी. त्याआधी आणि त्यानंतर आपण परत केव्हा भेटलोच नाही."

"होय. ते आहेच." राघव आपला चेहेरा अगदीच गंभीर करत म्हणाला.

"तेव्हा कुठे असं वनपीस आणि शॉर्टड्रेसेस घालणार? लोकं हसले असते ना." म्हणत मीराने ती गोष्ट हसण्यावर घेतली. त्यामुळे निर्माण झालेले गंभीर वातावरण देखील खेळीमेळीत परिवर्तित झाले होते.
त्यापुढे मात्र राघवला कोणताही विषय वाढवण्याची इच्छा होईना, आणि मीराही कॉफी एन्जॉय करत शांतपणे तिच्या रिकाम्या आणि पोकळ भूतकाळात गढून गेली. नुकताच पडून गेलेल्या पावसाने एक छानसा उल्हास आणि किंचितसा गारवा हवेत पसरला होता.

' तिच्या केव्हाच न पाहिलेल्या नानाविध रंगछटा अगदी जवळून पाहताना तिच्या त्या ओल्या केसात गुंतलेली त्याची नजर...आणि याला एवढ्या जवळून केव्हा पाहीलेलच नाही, खरंतर कधी हिम्मतही झाली नाही, म्हणून उगाच काहीतरी शोधण्यात कॉफीवर झुकलेली तिची नजर... एक अव्यक्त, जुनीच कहानी घेऊन आली होती... पण पुन्हा नव्याने.'

क्रमश

©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन.
{https://siddhic.blogspot.com}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या प्रतिसादासाठी थैंक्स पाथफाईंडर.
कथा पुर्णपणे लिहून तयार आहे. फक्त सरमिसळ व्हायला नको म्हणून रोज एकेक भाग पोस्ट करेन.

पहिल्या प्रतिसादासाठी थैंक्स पाथफाईंडर.
कथा पुर्णपणे लिहून तयार आहे. फक्त सरमिसळ व्हायला नको म्हणून रोज एकेक भाग पोस्ट करेन.>>>> आई ग्गं.. एवढं बरं वाटलं ऐकून(वाचून). अशा छान छान कथा लिंकमधे वाचण्यातच मजा आहे. सुरुवात खूप छान आहे. नक्की टाका हं रोज नवीन भाग.

प्रि तम, Urmila Mhatre, अनघा अ कुलकर्णी - थॅन्क्स.

पुढचा भाग पोस्ट केला आहे आणि अनघा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील त्यामध्ये आहे.
https://www.maayboli.com/node/75524