चीज शेजवान आप्पे

Submitted by अगो on 7 July, 2020 - 08:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवडीप्रमाणे भाज्या : कोबी, कांदा, भोपळी मिरची, गाजर, कमी तिखट मिरची, लसूण
साधा रवा
भाजलेले तीळ आवडीप्रमाणे
२ चमचे दही ऑप्शनल
चिंग शेजवान चटणी / शेजवान सॉस
कुठलेही आवडीचे चीज क्यूब्ज
मीठ-मिरपूड
एक चमचा इनो

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका भांड्यात आवडेल त्या प्रमाणात कोबी, कांदा, भोपळी मिरची, गाजर, कमी तिखट मिरची आणि भरपूर लसूण पाकळ्या हे बाsssरीक चिरुन घ्यावे. ह्यासाठी मी दोरी ओढायचा चॉपर वापरते ( माझ्याकडे हे मॉडेल आहे म्हणून ही लिंक दिली. तुम्ही कुठलाही वापरु शकता )
मी साधारण दोन कप चिरलेल्या कोबीला दोन मध्यम कांदे, दोन मध्यम भोपळी मिरच्या, एखादे मोठे गाजर, किमान दहा-बारा लसूण पाकळ्या आणि एखादी पोपटी मिरची घेते.
मग त्यात घट्ट बॅटर होईल अशा अंदाजाने साधा रवा, दोन चमचे दही ( ऑप्शनल ), मीठ- मिरपूड,भाजलेले तीळ, आवडीप्रमाणे शेजवान सॉस आणि लागेल तसे थोडेसेच पाणी घालून कालवून घ्यावे.
आप्पे घालायच्या आधी एक चमचा इनो घालून बॅटर परत एकदा कालवून घ्यावे.

एका चीजक्यूबचे आवडीप्रमाणे सहा वा नऊ असे तुकडे करुन काही चीजक्यूब्ज तयार ठेवावे.

आप्पेपात्रात तेल घालावे.
थोडे मिश्रण घालून प्रत्येक आप्प्यावर चीजचा तुकडा ठेवून वरुन परत क्यूब झाकला जाईल इतके मिश्रण घालावे.
झाकण ठेवून एक बाजू शिजवावी.
सोनेरी झाले की बाजू उलटून घ्यावी आणि झाकण न ठेवता दुसरी बाजू सोनेरी होऊ द्यावी.
नुसतेच खावे वा शेजवान सॉसबरोबर सर्व्ह करावे.

आप्पे मिश्रण :
Schezwan appe resized 1.jpg

आप्पेपात्रात घालताना. एक बंद केलाय.
Schezwan appe resized 2.jpg

आप्पे :
Schezwan appe resized 3.jpg

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक प्लेट खाताय की अनलिमिटेड ह्यावर अवलंबून !
अधिक टिपा: 

-बॅटरला नंतर थोडेथोडे पाणी सुटते ह्या हिशोबाने रवा मिसळा. बॅटर घट्टच राहिले पाहिजे. ह्यात भाज्या खूप असल्याने पिठाच्या बॅटरसारखे घट्ट बॅटरचे आप्पे दडस होत नाहीत. बॅटर पुरेसे घट्ट नसेल तर हवे तसे कुरकुरीत होणार नाहीत.

-चीज बर्स्टमुळे मुलांना फार आवडतात. डब्यात द्यायलाही मस्त ! डबा देताना आदल्या रात्री बॅटर तयार करुन फ्रीजमध्ये ठेवू शकता. इनो मात्र आयत्यावेळी घाला.

-तिळांमुळे खूप मस्त क्रंच आणि चव येते. ते शक्यतो वगळू नका. छान दिसण्यासाठी तीळ वरुन पेरु शकता पण मी मिश्रणातच ढकलते.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना Happy
रवा जाड का अगदी बारीक कुठला घेतलास? >>> जाड रवा घेतला. वेगवेगळ्या दुकानांत तो मध्यम ते जाड अशा वेगवेगळ्या प्रतीचा मिळतो. बारीक रव्याचेही होतील. कल्पना नाही पण माझ्याकडे बारीक रवा क्वचितच असतो. साधा रवाच वापरते सगळ्या पदार्थांत.

एकच कांदा किंवा एकच टोमॅटो बारीक चिरून होतो का? >> होतो. पण अगदी एका कांदा टोमॅटोसाठी वापरत नाही शक्यतो. तसा हा चॉपर धुवायला फार सोपा आहे पण तीन पार्ट्स धुण्यापेक्षा एक सुरी धुणे सोपे वाटते म्हणून.