तिचा वेष त्याचा वेष

Submitted by नीधप on 3 July, 2020 - 03:15

“त्या बिचाऱ्या दिपिकेला आपले कपडे कुलुपात ठेवावे लागत असतील नै? कधी रणवीर डल्ला मारेल काय सांगता येतंय काय? ” रणवीर सिंगचे नवीन फोटो आले की व्हॉटसॅपवर किमान पंचवीसवेळातरी हा डबडा विनोद येतो.
आपल्या मनाजोगी धडाडी न दाखवणाऱ्या पुरूषाला "बांगड्या भरा!" असा टोला मारणारे पैशाला पासरीभर असतात आणि त्यात काही चुकीचे आहे हे ही समजत नसते त्यांना. मुलीबायकांनी जीन्स घालणे यावर काही सांस्कृतिक गड्डे "आईचा पदर आणि जीन्स घातलेल्या मम्मीला पदर नसतो म्हणून मातृत्वाचा जिव्हाळा नसतो" वगैरे मंद टिप्पण्या करताना अजूनही दिसतात.
घागर्‍यामधे रणवीर
1 Ranveer wearing ghagra.jpeg

एकूणात काय जगात प्रत्येकाने चौकटीत ठरवून दिल्याप्रमाणेच स्त्री वा पुरूष व्हायचे असते आणि त्या कप्प्यातच बसायचे असते असे स्थितीवादी समाजाचे पक्के ठरलेले असते.

कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला मुलगी हे आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे. नीट विचार केला तर लक्षात येईल की हि लिंगनिश्चिती केवळ राहणी, घातलेले कपडे यांच्यावरूनच आहे. मानवजातीच्या प्रवासात खूप पूर्वी कधीतरी लिंगनिश्चिती आणि कपडे यांचा संबंध जोडला गेला आणि मग तो नियमही झाला. त्यामुळे इथे कपडे हे चक्क स्त्री वा पुरुष असण्याचे चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात.

हे कुठून सुरू होतं? जगातल्या बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये मूल चालायला लागेतो, त्याच्या आठवणी सुरू होईतो बाळ मुलगी आहे की मुलगा हे स्पष्ट करणारे कपडे शक्यतो वापरले जात नाहीत. तान्ह्या बाळांना सारखीच झबली टोपडी घातली जातात. मग बाळ मुलगा असो वा मुलगी. तान्हे बाळ हे बाळ असते. स्त्री वा पुरूष असण्याआधी माणसाचे बाळ असते. मानवजन्म आधी मग लिंगभाव हे जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृतींना मान्य होते असे म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडे झबल्याटोपड्याबरोबरच कुंच्या, वाळे, मनगट्या वगैरे बाळलेणी ही सर्वांना सारखीच घातली जातात. मूल चालूपळू लागले की मग मुलाचे वा मुलीचे कपडे दिले जातात. तिसरे वर्ष लागताना आपल्याकडे आत्याने भाचीला खण, बांगड्या घ्यायची पद्धत आहे. ही पद्धतही कदाचित तान्हेपणा संपला आणि नुसता मानवजन्म असण्याऐवजी त्याचे पुढचे कप्पे पडायला सुरू झाले हे सांगणारीच असावी. मग पुढे मुलीला गाठीची चोळी + बिनपदराची साडी, नंतर ती न्हातीधुती झाली की साडीला पदर हे सगळे टप्पे असत. मुलीला पदर आला हा वाक्प्रचार यातूनच आला.

प्रबोधनकाळादरम्यान युरोपात मुलग्यांना झगा वा झबलेसदृश कपडेच घातले जात. पाचसहा वर्षाच्या आसपास ते कपडे जाऊन ब्रीचेस म्हणजे गुडघ्यापर्यंतच्या पॅन्टस घातल्या जात. अमीरउमरावांच्या घरांमध्ये मुलाला पहिल्या ब्रीचेस देण्याचा सोहळा केला जाई. त्याला ब्रीचिंग असे म्हणतात.
ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे
2 ब्रीचिंग होण्याआधी मुलग्यांचे कपडे.jpg

ही झाली बरीच पुढची गोष्ट. कपड्यांच्या इतिहासाच्या मुळाशी गेले तर जगभरात मानवी संस्कृती सुरवातीची पावले टाकत होत्या तेव्हा वेशभूषेच्या उत्क्रांतीच्या त्या टप्प्यात कपड्यांमधून लिंगनिश्चिती हा उद्देश महत्वाचा नव्हता. प्राचीन ग्रीक काळात याची सुरूवात दिसते परंतू हे समाजाच्या काही घटकांपुरतेच अपेक्षित होते. रोमन कालखंडात कपड्यांचा व लिंगनिश्चितीचा परस्पर संबंध जास्त गडद झालेला दिसतो. रोमन वा ग्रीकांच्या आधी इजिप्त, बॅबिलोनियन, सुमेरियन वगैरे संस्कृती जिथे ग्रॅविटेशनल म्हणजे नेसायच्या कपड्यांवर भर असलेली वेशभूषा आहे तिथे कपड्यांचे लिंगाधारीत ध्रुवीकरण हे केवळ वरवरच्या सजावटीच्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. मात्र मूळ कपडे बरेचसे सारखेच आहेत.

आपल्याकडेही वैदीकपूर्व, वैदीक ते पार मौर्यन कालखंडाच्या सुरूवातीपर्यंत हेच दिसते. मौर्यन काळात स्त्रिया व पुरूष दोघांच्याही कपड्यांमधे अंतरीय, उत्तरीय आणि शिरोभूषण (उष्णीष) आहे. स्त्रियांनी छाती झाकणे हे ही नव्हते. पुढे गुप्त काळात कपड्यांचा हेतू लिंगनिश्चितीकडे जास्त झुकल्याचे लक्षात येते. शिरोभूषणे पुरूषांपुरतीच उरणे, स्त्रियांनी चोळ्या वा कंचुकीने छाती झाकणे, स्त्रियांनी शिरोभूषणांऐवजी विविध केशरचना करून त्या सजवणे असे काही महत्वाचे लिंगाधारित फरक दिसतात.

पुढे मुघलांच्या काळात आणि नंतर ब्रिटिश काळात बघितले तर पुरूषांचे कपडे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन झाले आणि स्त्रियांच्या मूळ असलेल्या कपड्यांमधे मुघल आणि नंतर ब्रिटीश/ युरोपियन प्रभाव असलेले बदल झाले. फ्युजन व्हावे तसे. हे ही गमतीशीर आहे. त्यामुळे कपड्यांवरून माणूस वाचायचा तर पहिला मुद्दा लिंगनिश्चिती आणि मग सामाजिक दर्जा आणि इतर हेतू असे आपसूकच झाले.
यालाच समांतर कालखंडात मध्यपूर्व व युरोपियन संस्कृतींमधे मध्ययुगीन काळापासून पुढे कपड्यांमधे लिंगाधारीत फरक असणे आणि असे फरक अनिवार्य होत जाणे हे दिसते. भारतीय उपखंडात आणि पाश्चिमात्य जगातही पितृसत्ताक संस्कृती घट्ट होत जाणे, माणसाचे समाजातले स्थान व भूमिका हे त्याच्या स्त्री वा पुरूष असण्यावरून ठरणे हे ही या काळात पक्के होत गेलेले दिसते.

नागर संस्कृतीमधे स्त्रियांची भूमिका सांपत्तिक आणि सामाजिक स्थानानुसार वेगवेगळी पण घरकाम, मुले, घरगुती गोष्टी, शोभेची बाहुली, संपत्तीचे प्रदर्शन याच वर्तुळात फिरत राह्यली. अमीरउमरावांच्या घरातल्या शोभेच्या बाहुल्यांनी आपापल्या घराण्याच्या संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी ज्या ज्या वस्तू परिधान करणे अनिवार्य होत गेले त्या सगळ्या वस्तू घोळदार, परिधान करण्यात वेळखाऊ होत्या. ठराविक प्रकारे बसणे, उठणे, चालणे सोडल्यास बाकी काही हालचाली करणे त्यात निव्वळ अशक्य होते. प्रबोधनकाळापासून बघितल्यास भरभक्कम गाऊन्स, कॉर्सेटस, आतमधले पेटिकोटसचे थर या गोष्टींचा अधिकाधिक किचकट आणि जडपणाकडे होत गेलेला प्रवास याची साक्ष देईल.
रोमॅन्टिक कालखंडातील स्त्री वेष
3 romantic era.jpg

स्त्रियांनी आपल्याला बंधनात टाकणार्‍या वेशभूषेत बदल करून पुरूषी किंवा सोपी वेशभूषा (जी पुरूषी दिसत असे अशी) करणे हे साधारण रोमॅन्टिक कालखंडात युरोपात घडायला सुरू झाले. १८४० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेतील तेव्हाच्या स्त्रीवादी चळवळीतील एलिझाबेथ स्मिथ मिलर, सुझन बी अँथनी, एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, मिसेस स्टोन आणि अमेलिया ब्लूमर एक वेगळ्या प्रकारचा वेष घालायला सुरूवात केली. हा वेष रोमॅन्टिक कालखंडातल्या स्त्रियांच्या कपड्यांपेक्षा सुटसुटीत होता. पाश्चिमात्य जगामधे अश्या आकृतीचे काही आधी स्त्रियांच्या वेशभूषेत आले नव्हते. ढगळी आणि पायाशी चुण्या असलेली तुम्मान आणि वरती गुडघ्यापर्यंत येणारा घोळदार गाऊन असे साधारण या वेषाचे स्वरूप होते. अमेलिया ब्लूमरने ती संपादन करत असलेल्या ‘द लिली’ या स्त्रियांच्या नियतकालिकामधे या वेषाबद्दल प्रशंसापूर्वक लिहिले. तेव्हापासून या वेषाला ब्लूमर कॉश्च्युम असे नाव मिळाले. चळवळीच्या बाहेर हा वेश फारसा प्रचलित झाला नाही. टिकेची झोडही अर्थातच बरीच उठली. चळवळीचे उद्दीष्ट झाकोळायला नको या कारणाने काही काळाने या सर्वांनीच इतर सर्व स्त्रियांप्रमाणेच वेश पत्करला. परंतू तुम्मानला पाश्चिमात्य वेशभूषेत ब्लूमर्स असे नाव मिळाले. कालांतराने या तुम्मानची उंची कमी होत ती अंतर्वस्त्रात जाऊन बसली. लहान मुलींच्या कापडी, फुग्याच्या चड्ड्यांना आता जगभरात ब्लूमर्स म्हणले जाते.
ब्लूमर कॉश्च्युम
4 Bloomer costume.jpg

यानंतर पहिल्या महायुद्धाने बरेच काही बदल घडवले. सैन्यात भरती होणे पुरूषांना अनिवार्य ठरल्यामुळे अनेक कार्यालयांमधे स्त्रिया काम करू लागल्या. अर्थातच याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या कपड्यांमधे पडले. स्त्रियांच्या कपड्यांच्या आकृतीमधे जास्त सरळ रेषांचा अंतर्भाव होओ लागला. एस आकारातले एडवर्डियन कपडे कालबाह्य होत गेले. स्त्रियांसाठी कार्यलयीन काम करताना वापरण्यायोग्य कोट बनू लागले. हे अर्थातच पुरूषांच्या कोटापेक्षा वेगळे होते पण पुरूषांच्या कोटांमधले अनेक फिचर्स अस्तित्वात होते.
१९१० मधील स्त्रियांचा ऑफिस लुक
5 office look 1910.jpg

पहिले महायुद्ध संपून सगळे स्थिर होईतो स्त्रियांच्या कपड्यांच्या बाह्याकृतीमधे सरळसोटपणा आला. अगदी लहान कापलेले केस आणि शरीराचे आकार सहजगत्या न दिसू देणारी बाह्याकृती याला बॉयिश लुक असे म्हणले जाई.
बॉयिश लुक
6 boyish look.jpg

यानंतर दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जेण्डर या गोष्टीचा विचारच वेगळ्या प्रकारे सुरू झाला युरोपात आणि त्यातून १९३० च्या दशकात मार्लिन डिट्रीचने या अभिनेत्रीने ट्राऊझर्स आपल्याश्या केल्या. या गोष्टींना स्टायलिश आणि फॆशनेबल स्थान दिले. याची चर्चा अर्थातच झाली. टिकेची झोड उठलीच. दिपिका रणवीरपासून आपले कपडे लपवून ठेवत असेल अश्या प्रकारचे विनोद तिच्यावरही झाले. फॅशन आणि लिंगभाव या विषयातल्या चर्चा आणि अभ्यासाला तिने जन्म दिला. टिकेची झोड उठल्यामुळे लगेचच संपून गेलेल्या ब्लूमर ड्रेस प्रमाणे हा नवीन प्रवाह मात्र अल्पायुषी ठरला नाही. स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारे पॅण्टस आपल्याश्या केल्या. मग ते लोण हळूहळू जगभर पसरले.
मार्लीन डीट्रिच
7 Marlene Dietrich.jpg

याला इतका काळ लोटलाय आणि पॅण्ट्स आणि जीन्स वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या इतकी झाली आहे की पूर्वी पुरूषांचे मानले गेलेले कपडे आता स्त्रियांच्या शरीराप्रमाणे वेगळ्या प्रकारे बेतले जातात. विमेन्स ट्राऊझर्स, विमेन्स शर्टस वगैरे. आता स्त्रियांनी पुरूषांचे कपडे घालायचे म्हणले तर एक्स्च्लुझिव असे फारसे उरलेले नाही.

युनिसेक्स म्हणजे कुठलेही जेण्डर न दर्शवणारे कपडेही मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. पण ते बहुतेक सगळे मुळातले पुरूषी या कप्प्यात असलेले कपडे आहेत. मेट्रोसेक्श्युअल पुरूषाने स्त्रियांचे म्हणावे असे कपडे क्वचित स्कार्फ आणि स्टोल वगळता आपलेसे केलेले नाहीत. याच्यामागे लिंगाधारित प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचा हातभार मोठा आहे. जगभराच्या पितृसत्ताक संस्कृतींमधे पुरूषाला एका उच्चासनावर ठेवून मुळातून खूप कमकुवत आणि अहंकारी बनवून ठेवले आहे. स्त्रियांचे कपडे वापरणे याचा अर्थ आपल्या पुरूषत्वात कमतरता असा घेतला जाईल, स्त्रियांच्यासारखे कमी समजले जाईल की काय ही सुप्त भिती नक्की आहे. त्यामुळे रणवीर सिंग जेव्हा साडी, घागरा वगैरे कपडे घालून मिरवतो तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाला आणि पुरूषी अहंकारावर मात करण्याला आपसूकच दाद दिली जाते.
8 bangalore.jpg

परंतू स्त्रियांनी जश्या पॅण्ट्स आपल्याश्या केल्या तसे पुरूषांनी साड्या, स्कर्टस आपलेसे करणे घडेल याची शक्यता मात्र कमी दिसते. लिंगाधारित अहंकार वगैरे लोप पावेल असे धरले तरीही ही शक्यता कमी दिसते. हे विसरता येणार नाही की आजघडीला स्त्रियांचे कपडे म्हणून जे कपडे आहेत ते उदयाला आले तेव्हा समाजातले स्त्रियांचे स्थान, करायची कामे हे सगळे पक्के ठरलेले होते. माजघर ते शोभेची बाहुली हा परीघ होता. आणि त्यामुळे कपड्यांमधे वावरायची, बसाउठायची सोय, सुटसुटीतपणा कमी आणि नखरा जास्त हा प्रकार नक्कीच होता. आजच्या स्त्रियांच्या म्हणल्या गेलेल्या कपड्यांमधे या गोष्टी दिसतातच. त्यामुळे सोय, सुटसुटीतपणा या मुद्द्यावर पुरूषांनी हे कपडे आपलेसे करणे फारसे शक्य दिसत नाही.

इतका वेळ आपण स्त्री व पुरूष या दोनच जेण्डर्सविषयी बोललो. तृतीयपंथी, शरीर एका जेण्डरचे व मन दुसऱ्या जेण्डरचे, लिंगबदल केलेले, ठराविक जेण्डरच्या कप्प्यात स्वत:ला बसवू न इच्छिणारे वगैरे अनेक लोक जगतात आहेत. ही सगळी वेगवेगळी जेण्डर्स मानली जाउन त्या त्या जेण्डरप्रमाणे कपडे असा बदल पुढच्या काळात दिसेल की सगळेच कप्पे बरखास्त होऊन कपड्यांमधे जेण्डरचा संदर्भच राहणार नाही या दिशेने कपड्यांची कहाणी पुढे जाईल हे सांगणे आत्ता तरी अशक्य आहे. परंतू सगळ्यांना मानवी समानतेवर वागवता येणे हे मात्र महत्वाचे आहे आणि कपडे व त्याला लागून येणारे लिंगाधारित पूर्वग्रह टाकून देणे हे त्यादिशेने पहिले पाऊल ठरेल.

- नी
(पुन्हा स्त्री उवाच या डिजिटल अंकात ८ मार्च २०२० रोजी प्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक आणि मस्त माहिती!
सध्याच्या स्त्रियांच्या फॉर्मल वेअरमधे तरी सुटसुटीतपणा हा निकष असतो का?

छानच लेख ! आणि माहितीही छान !

रणवीर सिंग बाकी या बाबतीत कमाल आहे. पण त्याचसोबत दिपिकाचेही कौतुक ! कारण नवरयाने असे कपडे घातलेले वा अशी स्टाईल स्टेटमेंट बनवलेले बायकोल आवडेलच असे नाही. कपड्यांसोबत पुरुषार्थाच्या कल्पना चिकटल्या असतात. आणि स्त्रियांनाही आपल्या जोडीदाराने पुरुषीच दिसावे असे वाटत असेल.

आमच्यकडे मला बायकोचे कपडे घालून घरात फिरायची सवय आहे. कारण मुलीला माझे तसे रुप आवडते. नाचायचा मूड झाला की आमचा हाच पोशाख असतो. आणि खोटे का बोला, नाचून झाल्यावरही घरात बराच वेळ मी नकळत त्याच कपड्यात वावरतो कारण ते कम्फर्टेबल वाटते. हल्ली तर लॉकडाऊनने वाढलेल्या केसांमुळे जोडीला हेअरबॅंडही असतो त्यामुळे तर आणखी कमाल दिसते Happy

मागे मी एका धाग्यात लिहिलेले की फेसबूकवर जसे एकेक फोटो चॅलेंज चालतात त्यात एक असे चॅलेंज यायला पाहिजे ज्यात नवरा बायको एकमेकांचे कपडे घालून फोटो टाकणार. कोण कोण हे करतात बघायला मजा येईल Happy

सध्याच्या स्त्रियांच्या फॉर्मल वेअरमधे तरी सुटसुटीतपणा हा निकष असतो का? << याचे उत्तर वेगवेगळ्या देशात, प्रांतात, हपिसात वेगवेगळे असणार आहे.
पण मुळात स्त्रियांचे फॉर्मल वेअर हे सुटसुटीत कपडे घालून कामे करण्यासाठी नसतेच ना. किंवा कामे करता यावीत(वाटेल तसे बसता उठता यावे, हवी तशी हालचाल करता यावी वगैरे) असा सुटसुटीतपणा फॉर्मल वेअरमधे अपेक्षितही नसतो. फॉर्मल वेअर जिथे घालायचे तिथे (ऑफिस आणि ऑकेजन असे दोन भाग करावे लागतील परत) अश्या बहुविध हालचाली अपेक्षितही नसतात.

मस्त माहितीपूर्ण लेख!
स्कॉटलंड मध्ये पुरूष स्कर्ट Kilt वापरतात. फिजितही वापरतात. आता तिथे पूर्वी महिला स्कर्ट न वापरता गाऊन सारखे प्रकार घालायच्या म्हणून पुरूषी स्कर्टला पुरूषी वस्त्रच म्हणायचे... की काळानुरूप स्त्री वेष म्हणायचे हा प्रश्न आहेच.

माहिती पुर्ण लेख. या वरून मला एक आठवण सांगावीशी वाटते. माझ्या नवर्‍याच्या मित्राच्या मुलीला आम्ही पैजण भेट म्हनून दिले. अर्थात त्यांना ती किति आवडेल माहिती न्हवते कारण ती हंगेरियन फॅमिली होती. पैजण दिल्यावर ते कसे घालायचे आणि ते कसे दिसते या साठी माझ्या पायातील पैजण मी दाखवले. नंतर त्या मित्राने मुलिला ते पैजण घातले आणि ती रांगायला लागली की छान वाजते हे त्याला खुप आवडले हेही सांगितले. त्यामुळे त्यालाही पैजण घालावेशे वाटत आहेत असे तो नवर्‍यासमोर बोलला , तसे नवरा त्याला म्हणाला की हे फक्त बायकाच वापरतात. त्यावर त्याने उत्तर दिले की परदेशात ते चालुन जाइल. इथे कोणी असा विचार करत नाही. ज्याला जसे आवडेल तसे ते राह्तात.
मला पहिले फार नवल वाटले हे ऐकुन.
पण खरच आहे काही पायंडे बदलायला हवेत. लहान बाळाच्या पायत मग तो मुलगा असो की मुलगी वाजणारे पैजण घातले जातात. मग ते पुढेही तसेच घालत राहिले तर काय हरकत आहे?

छान लेख. वरच्या काही कपडेपटावरून मला मोलिएरच्या तारत्युफच्या प्रयोगाची आठवण आली. साधारण 2001/2002 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीच्या नामदेव सभागृहात (बहुदा) ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी तारत्युफचा केलेला प्रयोग पाहिला होता. नेपथ्य आणि भारी कपडेपटामुळे तो आजही लक्षात आहे. 1670 चा कालखंड आहे नाटकाचा.

नी, नेहमीप्रमाणे अभ्यासु आणि माहितीपूर्ण लेख. आवडला. काही डिटेल्स नव्याने माहीत झाले.

या लेखाच्या निमित्ताने तुझ्या जुन्या वाचनीय लेखांची आठवण झाली. काही परत वाचावेसे वाटताहेत. या वीकेंडला शोधाशोध करणार.

छान माहिती पूर्ण लेख. रोमॅन्टिक कालखंड म्हणजे काय ते कळलं नाही. हा शब्द कुठल्या अर्थाने वापरला आहे?

सर्वांना धन्यवाद.
रोमॅन्टिक कालखंड यातल्या रोमँटिकचा आज आपण ज्याला रोमान्स म्हणतो त्याच्याशी काहीही संबंध नाही (शब्दाचे मूळ एक असले तरी).
रोमॅन्टिसिझम हा कलाप्रवाहामधला एक इझम किंवा वाद म्हणला जातो. हा साहित्यातून इतर कलाप्रकार आणि मग राहणीमधे शिरलेला इझम होता.
कपड्यांच्या इतिहासात साधारण १८१८ ते १८४०/४५ असा हा कालखंड आहे. साहित्यात हा कालखंड बराच नंतरपर्यंत टिकला.

लॉर्ड ऑफ दी रिंग्ज मूवी पाहिला तेव्हा त्यातील त्या स्त्री पात्रांचे कपडे पाहून प्रश्ण पडलेला, काय किचकट वेषभुषा असेल त्या काळी.. नैसर्गिक प्रश्ण कसे निभावत असतील त्या काळी स्त्रीया.. वगैरे चिंता झालेली. (भले , लेखकाने लिहलेल्या पुस्तकात, कथा पौराणिक/दंतकथा टाईपच होती)

मला तर अजून , नववारी नेसणार्‍यांची कमाल वाटते, किती किचकट असे आपले वाटते.. माझी आजी, नेसून बघ एक पुर्ण दिवस असं उगाच चँलेज द्यायची, मी कधीच तिच्या पारंपारीक पद्धतीची नेसली नाही. आपली रेडीमेड नववारी बरी पँटसारखी..

सुरुवातीच्या परिच्छेदातला तो विनोद अजिबात डबडा नाही किंवा त्या व्हॉट्सपीय टिप्पण्ण्याही मंद नाहीत.

{{{ त्यामुळे रणवीर सिंग जेव्हा साडी, घागरा वगैरे कपडे घालून मिरवतो तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाला आणि पुरूषी अहंकारावर मात करण्याला आपसूकच दाद दिली जाते. }}}

हे असलं काहीतरी वाटणं हेच मंदबुद्धी / भाबडेपणा / फॅशन डिझायनरचा व्यापारी धूर्तपणा यापैकी काहीतरी किंवा या सर्वांचं मिश्रण आहे. रणवीर साडी / घागरा घालून फोटोसेशन करतो ते काही पुरुषी अहंकारावर मात वगैरेसारख्या उदात्त हेतूने नव्हे तर प्रसिद्धीतंत्राचा एक भाग म्हणून. हजार रुपयांत घेतलेला एक पोशाख एक सामान्य व्यक्ति किमान शंभर वेळा परिधान करतो आणि मगच टाकून देतो किंवा बोहारणीला देतो किंवा मग त्याचे किचन ओटा पुसण्यापासून ते बूट पुसण्यापर्यंत जे काही पुनर्वापर करतो त्यावरही शेकडो विनोद निघाले आहेत. हे सेलिब्रिटी लाखोंचा पोशाख करुन फक्त काही तासांकरिता परिधान करतात त्यामागचे अर्थकारण समजून घ्यायला हवे आधी. इन्स्टाग्रामवर यांना असल्या माकडछाप पोशाखात फोटो टाकल्यावर किती लाख मिळतात? यांनी काही तास वापरुन टाकलेल्या पोशाखाला लिलावात किती कोटी मिळतात? ही माहिती मिळाल्यावर या क्रॉस ड्रेसिंगमागचा तात्त्विक मुलामा किती बेगडी आहे हे सहज कळून येईल.

त्याच्याप्रमाणे पुरुषी अहंकाराला छेद देण्याच्या कथित दाव्यानुसार सर्वच पुरुषांनी घागरा साडी परिधान केले तर ते पुरुषांचे सार्वजनिक युरिनल्सचा वापर कसा करणार इत्यादी प्रश्न आहेतच.

कोरोनातलं सोशल डिस्टंसिंग सोडलं तरी इन जनरल जेव्हा लोक समाजात वावरतात तेव्हा पुरुष व स्त्रियांचे समूह अनेकदा वेगवेगळे बसविले जातात. तेव्हा स्त्रिया व पुरुष दुरुनच वेगवेगळे ओळखू यावेत या कारणाने त्यांच्या वेषात हेतूपुरस्सर फरक करण्यात आलेला आहे पूर्वीपासूनच.

अमुक ढमुक लाख मिळूनही बाकीचे पुरूष कलाकार स्त्रीचे म्हणवले जाणारे कपडे घालत नाहीत ह्यावरून हा तात्त्विक मुलामा बेगडी नाही हे लक्षात येईल का? 'लाल गघरा' गाण्यात आणि पीके मध्ये एका सीनपुरता अक्षयकुमार आणि आमिरखान (अनुक्रमे) घागरा घातला पण कधी तो "मिरवला" नाही. हे मिरवण्याच्या रणवीरच्या कसबाला लाख काय कोटी रूपये दिले तरी कमी आहेत.
पाकिट कुठे ठेवायचे ते बाईकवर कसा बसणार असे अनेक प्रश्न रणवीरलाही पडले असतील. पण काही पुरूष सोल्युशन फोकस्ड असतात काही प्रॉब्लेम फोकस्ड. काढतात मार्ग. पुरूषी अहंकारावर मात ह्यात उदात्त काही नाही पण केली तर स्वतःचच आयुष्य बरं जाईल ही जाणीव रणवीरच्या निमित्ताने इतर चारजणांना झाली तर बरंच आहे.

बिपीनचंद्र आणि सिमंतिनी दोघांचे मुद्दे आपल्या जागी बरोबर आहेत खरे तर..
रणबीर सो कॉलड पुरुषी अहंकाराला फाट्यावर मारू शकतो म्हणून त्याला हे मिरवणे जमते.
आणि आपल्यातील या गुणाचा फायदा ऊचलत तो पैसेही छापतोय. त्याचसोबत त्याच्या या गुणाचा फायदा उचलत ते कपडे विकणारेही पैसे छापत आहेत. आपल्या ब्रांडची पब्लिसिटी करत आहेत.
अवांतर - त्याला पार्टनरही अशीच मिळालीय. दिपिकानेही कधी कोणत्या पुरुषी अहंकाराला एण्टरटेन केले नाही. माझा तिच्या या गुणांवर एक धागाही होता. माय चॉईस दिपिका नावाचा.
.

तर ते पुरुषांचे सार्वजनिक युरिनल्सचा वापर कसा करणार
>>>
थोडे मॉडीफिकेशन थोडा आणखी खर्चा करून चैन बसवून घ्यायची Happy

..
अमुक ढमुक लाख मिळूनही बाकीचे पुरूष कलाकार स्त्रीचे म्हणवले जाणारे कपडे घालत नाहीत....
>>>>>
शाहरूखने घातले आहेत स्टेजवर. मिरवलेही आहेत.
लिंक - शोधून नंतर देतो
रणबीरनेही त्याच्यासारखेच बरोबर या जनरेशनची नस पकडली आहे.

Happy आहेस खरा सोल्युशन फोकस्ड असं मी म्हणणार तेवढ्यात आलाच 'शाहरूख' Happy थोडं विषयांतर बद्दल क्षमस्व- पूर्वी आवडायचा. हल्ली आचरट आणि अनप्रोफेशनल वाटतो. जेफ बेझोसची मुलाखत त्याने झोया अख्तर बरोबर घेतली होती. नाही आवडली. सबब स्त्रीवेष शाहरूख लिंक जरूर देणे. जुने शाहरूख व्हिडीयोज बरे असतात.

मलाही प्रबोधनकाल आणि रोमँटिक काळ कुठला ते कळलं नाही
रेझोनन्स काळ का?

बाकी लेख उत्तम आणि वाचनीय

आपल्याकडेही पंजाबी किंवा अफगाणी कुर्ता शेरवानी युनिसेक्स म्हणता येईल का?

Submitted by आशुचँप on 7 July, 2020 - 21:34>>
तुम्हाला रेनेसां म्हणायचंय बहुतेक.
रेझोनन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी जुळणं.
रोमँटिसिझमला मराठीत उन्मेषवादी की असाच काही तरी शब्द असावा.

हो तेच म्हणायच होत, बंडखोरी चा काळ ना
कलाकार, चित्रकार यांच्या प्रतिभेचा
इतिहासात होतं ते अंधुक अंधुक आठवतंय

हा धागा शेअर करू शकते का? Direct link आहे का? शेअर केलेला उघडला की होम पेज वर जातोय... लेखा इतक्याच मला त्यावरील कमेंट्स पण आवडल्या म्हणून शेअर करायचाय

Pages