पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३७. आनंद (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 28 June, 2020 - 12:16

Anand1.jpg

लॉकडाऊन सुरु झाला आणि आमच्या सेटटॉप बॉक्सने राम म्हटला. मनात म्हटलं इष्टापत्तीच आहे. कित्येक दिवसांचा चित्रपट बघायचा बॅकलॉग भरून काढता येईल. पण का कोणास ठाऊक एखादा चित्रपट बघावा असं मनातून वाटतंच नव्हतं. ऑगस्टपासून ह्या लेखमालिकेत जी गॅप पडली होती ती तशीच राहील की काय अशी भीती वाटायला लागली होती. लॉकडाऊन शिथील करायला सुरुवात झाली आणि इतके दिवस पेपर येत नव्हता तेच बरं होतं असं वाटायला लावतील अश्या आत्महत्यांच्या बातम्या छापून यायला लागल्या. कटकटी, अडचणी काय हो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण म्हणून हे आयुष्यच संपवून टाकावं अश्या टोकाच्या निर्णयापर्यंत लोक येतात आणि तो तडीस नेतात हे भीतीदायक होतं. घाबरवणारं होतं. मुळापासून हादरवणारं होतं. आयुष्यात सगळं सुंदर आहे अश्यातला भाग नाही. पण सगळंच वाईट आहे असंही नाही. जगात राहावंसं वाटू नये असं वाटायला लावणार्या गोष्टी जरूर आहेत पण जे आयुष्य मिळालंय ते पुरेपुर जगून घ्यावं असं वाटायला लावणार्या गोष्टीही आहेतच की. पटत होतं पण ह्या सगळ्या घटनांनी मनावर एक मळभ दाटलं होतं. कान टोचणारा डॉक्टर हवा होता कोणीतरी.

आणि मग मला आनंद आठवला. खूप वर्षांपूर्वी भेटलेला. पुन्हा भेटायची इच्छा होती पण मुहूर्त लागत नव्हता. करोनाच्या निमित्ताने तो लागला. आणि आज दुपारी आनंदला पुन्हा भेटले. खरं तर मी त्याच्याबद्दल लिहिणार नव्हते कारण चित्रपट पाहून त्याच्यावर लेख लिहायचा म्हटलं की नाही म्हटलं तरी तो पहाताना थोड्या नोंदी ठेवायला लागतात. त्यामुळे चित्रपट पहाताना थोडा व्यत्यय येतो. आणि मला आनंद फक्त स्वतःसाठी हवा होता. पण चित्रपट पाहाताना लक्षात आलं की आपल्यापैकी बहुतेकजण जरी त्याला आधी भेटलेले असले तरी कदाचित आत्ताच्या दिवसांत त्याला भेटायची पुन्हा गरज आहे. म्हणून त्याला सोबत घेऊन आलेय आज. येताय ना भेटायला?

चित्रपट सुरू होतो तेव्हा 'सरस्वती पुरस्कार' अशी पाटी दिसते. दरवर्षी साहित्यातल्या एका महान कलाकृतीला दिला जाणारा हा पुरस्कार ह्या वर्षी मिळालेला असतो डॉक्टर भास्कर बॅनर्जी ह्या एमडीच्या 'आनंद' ह्या उपन्यासाला. त्याहून विशेष बाब ही की ही ह्या डॉक्टर बॅनर्जीची पहिलीच कादंबरी असते. पेशाने cancer specialist असलेल्या डॉक्टर भास्करला ही कादंबरीची कल्पना सुचली कशी ह्याबद्दल सर्वांना कुतूहल असतं. म्हणून पुरस्कार देण्याआधी त्याला ह्याबद्दल दोन शब्द बोलण्याची विनंती केली जाते. डॉक्टर भास्कर सुरुवातीलाच स्वच्छ सांगून टाकतो की मी कोणी लेखक वगैरे नाही. ही कादंबरी काल्पनिक नाही तर ती आनंद ह्या एका व्यक्तीबद्दल माझ्या डायरीत असलेल्या उल्लेखांचा आधार घेऊन लिहिलेली आहे. ह्या आनंदला एक व्यसन होतं - मित्र जमवण्याचं. आणि त्याची दोस्ती सार्‍या जगाशी व्हावी ह्या हेतूने मी ही कादंबरी लिहिली. मग डॉक्टर भास्करच्या शब्दांतून चित्रपट आपल्याला आनंदची कथा सांगतो.

डॉक्टर भास्करने वडिलांप्रमाणेच डॉक्टरी पेशा स्वीकारलेला असतो. वडिलांनी बरीच संपत्ती मागे ठेवलेली असल्यामुळे पैश्यासाठी काम करायची त्याला गरज नसते. आणि ते त्याचं ध्येयही नसतं. त्यामुळेच असेल कदाचित पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला नैराश्य जाणवू लागलेलं असतं. ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीत अश्या लोकांना व्हिटॅमिनच्या गोळ्या कश्या लिहून द्यायच्या, ज्यांच्याकडे मीठ विकत घ्यायची ऐपत नाही ते औषधं कशी घेऊ शकणार, मग त्यांना बरं तरी कसं करायचं, रोगाशी/आजाराशी लढता येईल पण भूक आणि गरिबीशी कसं लढायचं असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात. उत्तरं सापडत नसतात. आपल्या पेश्यावरचा विश्वास उडत चाललेला असतो. आपण पेशंटसना मृत्यूच्या दाढेतून वाचवत नाही आहोत तर मृत्यूला जिवंत ठेवायचा रोज प्रयत्न करतोय असं वाटायला लागलेलं असतं. खायला पैसे नाहीत तरी नातवाचा जन्म झाला म्हणून मिठाई वाटणारे गरीब पाहून त्याला एक प्रकारची असहाय्यता जाणवायला लागलेली असते. तर दुसरीकडे सुख बोचणार्‍या, काल्पनिक दुखणी काढून त्यावर औषध द्या म्हणून डॉक्टरांकडे येणार्या सेठ चंद्रनाथसारख्या श्रीमंत पेशंटसबाबत एक आत्यंतिक चीड त्याच्या मनात असते. 'तुम्हाला औषधं खायचा रोग आहे' असं सडेतोड बोलून तो त्यांना वाटेला लावत असतो.

भास्करच्या विरुध्द मत असतं त्याचा मित्र डॉ. प्रकाश कुलकर्णीचं. नुसतं 'अस्वस्थ वाटतंय' असं म्हणणार्‍या श्रीमंत बाईला 'कोलेस्टरॉलची टेस्ट करून घ्या' असं म्हणून तिच्याकडून ५०० रुपये उकळायला डॉ. प्रकाश मागेपुढे पहात नाही. त्याचं म्हणणं असं की ह्या लोकांकडे पैसे खर्चं करायची ऐपत आहे तर करू देत त्यांना खर्च. त्यांना औषध खायची आहेत तर खाऊ देत. त्यांनी दिलेल्या पैश्यातून ज्यांच्याकडे पैसे नाहीत अश्या लोकांचा आपण फुकट इलाज करू शकतो. तेही खुश आणि आपणही खुश. अर्थात हा युक्तिवाद भास्करला मान्य होत नसतोच.

एके दिवशी भास्कर प्रकाशच्या नर्सिंग होममध्ये त्याला भेटायला गेलेला असतो तेव्हा तो भास्करला सांगतो की त्यांचा दिल्लीचा गायनॅकॉलॉजिस्ट मित्र डॉ. त्रिवेदीने एक पत्र पाठवलंय. त्यात त्याने आनंद सहगल म्हणून एका रुग्णाचा उल्लेख केलाय. त्याची केस हिस्टरी पाठवली आहे. तो भास्करला त्याचे एक्सरेज दाखवतो. आनंदला lymphosarcoma of the intestine हा आजार झालेला असतो. तो दुसर्‍या दिवशी मुंबईत येणार असतो. भास्कर म्हणतो की ह्यावर काही इलाज नाहिये मग तो मुंबईला येऊन काय करणार. प्रकाश म्हणतो की मी त्याला ४-५ वर्षांपूर्वी दिल्लीत भेटलोय. आमची छान मैत्रीही झाली होती. अजून त्याच्या हातात ५-६ महिने आहेत. तो हिंडू फिरू शकतो म्हणून आपल्याला भेटायला येतोय. त्या निमित्ताने मुंबईसुध्दा फिरून होईल त्याची. प्रकाशने हॉस्पीटलच्या स्पेशल केबिनमध्ये त्याची रहायची सोय केलेली असते. ते दोघे बोलत असतात तेव्हढ्यात एक नर्स येऊन प्रकाशला सांगते की दिल्लीहून कोणी आनंद सहगल आलाय. प्रकाशला आश्चर्य वाटतं की उद्या यायच्या ऐवजी हा आजच कसा आला.

पण त्यांना पुढे काही बोलायची संधीच मिळत नाही कारण तोवर आनंद आत येतो. प्रकाशला तर तो आधीच ओळखत असतो. पण त्याने भास्करची ओळख करून देताच तो भास्करला थेट 'बाबूमोशाय' अशी हाक मारून कॉलेजात त्याच्यावर मुली कश्या मरत होत्या वगैरे डॉ. त्रिवेदीकडून ऐकलेल्या गोष्टी त्यालाच ऐकवून साता जन्मांची ओळख असल्यासारखा वागायला लागतो. भास्कर आधीच कावलेला असतो तो ह्या सलगीने पुरा वैतागतो. 'तुला काय झालंय ते तरी तुला माहित आहे का?' असं तो उखडून आनंदला विचारतो. त्यावर आनंद अगदी matter-of-fact स्वरांत 'मला पोटात कॅन्सर झालाय आणि फार तर सहा महिन्यांचा वेळ माझ्याकडे आहे' असं उत्तर देतो. ते ऐकून भास्कर अगदी सर्दच होतो. मग आनंदच त्याला समजावतो की माझ्या आजारावर इलाज नाही म्हणून तो निराश झाला आहेस पण ७० वर्षांचं आयुष्य आणि ६ महिन्यांचं आयुष्य ह्यात तसं पाहिलं तर काहीच फरक नाही. जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही. भास्कर वरमतो. आनंदला त्याच्या केबिनमध्ये रवाना केल्यावर प्रकाश भास्करला काही उपचार शक्य आहेत का असं विचारतो पण ह्यावर 'नाही' हे एकच उत्तर भास्करकडे असतं.

Anand3.jpg

त्या रात्री आनंद अचानक भास्करच्या घरी येतो. त्याला हॉस्पीटलमध्ये अजिबात चैन पडत नसतं. भास्कर त्याचा नोकर रघुकाकासोबत एकटाच रहात असतो. तेव्हा ५-६ महिने आपल्याला इथेच राहू द्यावं अशी विनंती तो भास्करला करतो. आणि भास्कर ती मान्यही करतो. आनंद नावाचं हे वादळ आता त्याच्या आयुष्यात आलेलं असतं. त्याला 'आयुष्य' शब्दाचा खरा अर्थ समजावून सांगूनच ते शांत होणार असतं.

असेच काही दिवस उलटतात. एव्हाना आनंदची ओळख प्रकाशच्या पत्नीशी, सुमनशी, झालेली असते. सुमन तर त्याला आपला भाऊ मानून टाकते. अर्थात आनंदला नक्की कोणता आजार झालाय ही बाब तिच्यापासून लपवून ठेवण्यात आलेली असते. सुमनच काय तर प्रकाशच्या हॉस्पिटलमधल्या स्वभावाने अतिशय कडक मेट्रनला, मिसेस डिसालासुध्दा आनंदने जीव लावलेला असतो. तिला मात्र आनंदच्या असाध्य रोगाबद्द्ल माहित असतं. भास्करला सतत जाणवत असतं की आनंदला काहीतरी दु:ख आहे जे त्याने सगळ्या जगापासून लपवलंय. पण कदाचित हे दु:खच त्याला जगायची शक्ती देत असेल म्हणून तर त्याचा आजार बळावत चाललेला असतानाही त्याचं मन मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक कणखर होत चाललेलं असतं. म्हणून भास्कर त्याला काही विचारत नाही.

आनंदला मात्र एक दिवस रघुकाकाकडून कळतं की रेणू नावाची एक शाळेतली शिक्षिका न्युमोनियावर उपचार करून घ्यायला भास्करकडे आली होती. ती भास्करच्या प्रेमात पडली होती आणि भास्कर तिच्या. पण दोघांनीही एकमेकांना काही सांगितलं नाही. आनंद भास्करकडून ह्याची खात्री करून घेतो आणि एक दिवस रेणू भास्करला भेटायला त्याच्या घरी येते तेव्हा भास्करच्या धाकाला न जुमानता त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे बेधडकपणे तिला सांगून टाकतो.

माणसांच्या प्रेमात असलेल्या आनंदला अशी प्रेमाची माणसं मिळत असताना मृत्यू मात्र चोरट्या पावलांनी त्याच्याजवळ सरकत असतो. एक दिवस भास्कर प्रकाशला सांगतो की आपल्याला त्रिवेदीला कळवायला हवं. आनंदचं हिंडणंफिरणं लवकरच बंद होईल हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. यावर प्रकाश त्याला सांगतो की आनंदने आधीच पत्र टाकून त्रिवेदीला सांगितलंय की भास्करचं लग्न झाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. आनंदच्या मृत्यूच्या नुसत्या कल्पनेने व्याकूळ झालेला भास्कर प्रकाशला विचारतो की त्याचे कोणी नातेवाईक नाहीत का. तेव्हा प्रकाश सांगतो की फाळणीच्या वेळी आनंद भारतात आला तेव्हाच तो अनाथ होता. ज्या नातेवाईकांकडे रहात होता तिथेही तो भारच होता त्यामुळे स्वतःच्या पायांवर उभा राहताच तो तिथून बाहेर पडला. हे सगळं बोलणं सुमन ऐकते. आनंदला दुर्धर आजार झालाय हे ऐकताच तिच्या पायांखालची जमिन सरकते.

आपल्या हातात फार कमी दिवस आहेत ते लक्षात येताच आनंद रेणूच्या आईकडे तिच्या आणि भास्करच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. हे लग्न लवकरात लवकर व्हावं अशी त्याची इच्छा असते. पण रेणूच्या वडिलांना जाऊन ९ महिनेच झाले असल्याने पुढले ३ महिने तरी लग्न होऊ शकणार नसतं. आपण हे लग्न बघू शकणार नाही हे आनंदला कळून चुकतं. तरी आपल्यासमोर त्या दोघांनी निदान एकमेकांना अंगठी तरी घालावी म्हणून तो २ अंगठ्याही घेऊन येतो. पण त्याने एव्हढंही पहाणं दैवाला मंजूर नसतं की काय कोणास ठाउक. आनंदची तब्येत अधिक ढासळते. त्याचं घराबाहेर पडणं बंद होतं. त्याच्या मृत्यूच्या चाहुलीने भास्कर, रेणू, प्रकाश, सुमन, रघुकाका, मिसेस डिसा अशी त्याने जीव लावलेली सगळी माणसं भयाकुल होतात........

Anand2_0.jpg

आनंदची गोष्ट जवळपास सर्वांनाच माहित आहे. मग हा चित्रपट पाहिलेला असो वा नसो. त्यामुळे शेवटी काय होईल ही उत्सुकता इथे नाही. इतकंच सांगेन की अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर आवर्जून पहा. आणि पाहिला असेल तरी पुन्हा एकदा पहा. आजूबाजूला नकारात्मक असं बरंच काही ऐकायला येत असताना हा चित्रपट जीवनाविषयी खूप काही महत्त्वाचं शिकवून जातो. उदा. आनंदचं एक म्हणणं असतं की ज्या माणसाला भेटावंसं वाटेल, त्याच्याशी बोलावंसं वाटेल त्याला नक्की भेटावं, त्याच्याशी बोलावं. मग भले त्यासाठी एखाद्या इसाभाई नावाच्या मुसलमान माणसाला चक्क 'मुरारीलाल' म्हणून हाक मारावी लागली तरी चालेल. त्याच्या काळजीपोटी सुमन त्याला आपल्या मौनव्रत धारण केलेल्या गुरुकडे घेउन जाते तेव्हा आपल्या नाशवंत शरीरासाठी काही मागण्याऐवजी आनंद म्हणतो मला आशिर्वाद द्या की मी शेवटच्या क्षणांपर्यंत बोलत राहीन पण नेहमी चांगलं बोलेन, कधीच कोणाविषयी काही वाईट माझ्या तोंडून निघणार नाही. आपल्या मृत्यूचं भय भास्करच्या डोळ्यात क्षणोक्षणी दिसताना पाहून आनंद त्याला म्हणतो की आपला सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की आपण उद्याच्या अडचणी ओढूनताणून आत्ताच्या क्षणांत आणतो आणि आज जो आनंद मिळू शकतो तोही गमावून बसतो. देवावर विश्वास नसणारा बाबूमोशाय आनंद बरा होणार असेल तर मी देवावर विश्वास ठेवायला तयार आहे असं म्हणतो, कुठल्याश्या देवळातल्या देवाला नवस केला तर कॅन्सरसुद्धा बरा होतो असं म्हणणार्या रघूकाकाला लगेच तिथे जा म्हणतो, आनंदचा मृत्यू समोर दिसत असतानाही कुठल्यातरी होमियोपॅथीक औषधाने गुण येतो म्हणून ते आणायला धावतो, काही दिवसांपूर्वीच ओळख झालेला ईसाभाई आनंदला कॅन्सर आहे हे कळताच लहान मुलासारखा धाय मोकलून रडतो ह्यातच आनंदच्या आयुष्याचं सार आहे. थोडक्यात आनंद 'सांगा कसं जगायचं' ह्या प्रश्नाचं थिअरी + practical सकट उत्तर देतो. ह्या ट्यूशनची आताच्या काळात फार गरज आहे. रूढार्थाने हा चित्रपट tragedy असेलही पण शेवटच्या क्षणांपर्यंत जगण्याचा पुरेपुर आस्वाद घेणारा आनंद माझ्या मते तरी एका सुखांतिकेचा हिरो आहे.

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ह्या चित्रपटाचं विकी पेज पाहिलं तेव्हा अशी माहिती मिळाली की आधी ह्यात किशोरकुमार आणि महमूद ह्यांना कास्ट करणार होते. भास्करची भूमिका महमूद करणार होता. पण ऋषिकेष मुकर्जी जेव्हा ह्या भूमिकेबाबत चर्चा करायला किशोरच्या बंगल्यावर गेले तेव्हा तिथल्या दारवानाने त्यांना आत जाऊ दिलं नाही. किशोरचा कुठल्याश्या कार्यक्रमाच्या मानधनाबाबत एका बंगाली व्यक्तीशी वाद चालू होता. आणि 'त्या बंगाल्याला आत येऊ देऊ नकोस' अशी ताकीद किशोरने आपल्या दारवानाला दिली होती. ऋषीदांना पाहून हाच तो बंगाली अशी त्या दारवानाची समजूत झाली. हा अपमान ऋषीदांना लागला आणि किशोरच्या हातून ही भूमिका निसटली. अर्थात त्यामुळे महमूदचाही पत्ता कट झाला. राज आणि शशी कपूर ह्या दोघांनी आनंद्ची भूमिका नाकारली असाही उल्लेख विकीवर आहे. कारण काहीही असो पण शेवटी ती राजेश खन्नाला मिळाली आणि त्याने तिचं अक्षरशः सोनं केलं. खरं तर पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला होता तेव्हा मला ही भूमिका आधी अनेकांनी नाकारली होती ह्यावर विश्वासच बसेना एव्हढी ती राजेशसाठी tailor-made वाटते. बडबड्या, निरागस, खूप टक्केटोणपे खाऊनही 'हे सगळं माझ्याच बाबतीत का?' असा उत्तर नसलेला प्रश्न विचारत न बसता आहे ते आयुष्य १००% जगण्याचा जणू विडा उचललेला, नावाला सार्थ करत आनंद सगळ्या जगाला वाटून दु:ख मात्र स्वतःकडे ठेवणार्या आनंदची व्यक्तिरेखा फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच लिहिली गेली असावी असं वाटतं एव्हढं म्हटलं तरी पुरे.

आनंदचा जवळजवळ anti-thesis वाटावा असा बाबूमोशाय उभा केलाय अमिताभ बच्चनने. डॉक्टरी पेशात हताश झालेला, आनंदला वाचवायला वैद्यकशास्त्र असमर्थ आहे हे जाणवून चिडलेला, अबोल पण प्रेमळ, सडेतोड, आपल्या मूल्यांशी तडजोड न करणारा असा थोडासा अवघडलेला वाटणारा डॉ. भास्कर अमिताभने चांगला उभा केलाय. पण ह्यात त्याच्या अभिनयकौशल्याचा भाग किती आणि त्याच्या चित्रपटसृष्टीत नवखं असल्याचा हात किती ह्याबाबत मी थोडी साशंक आहे. कारण ह्या चित्रपटाच्या वेळी त्याला चित्रपटसृष्टीत येऊन जेमतेम २ वर्षंच झाली असणार. डॉक्टर प्रकाश आणि सुमन ह्या भूमिकांत आपले रमेश आणि सीमा देव आहेत. तर रेणूची भूमिका सुमिता सन्यालने निभावली आहे. मेट्रन डिसाच्या भूमिकेतल्या ललिताबाई 'लेडी केलेवाली' ची आठवण करून देतात. इतर भूमिकांत दुर्गा खोटे (रेणूची आई), जॉनी वॉकर (ईसाभाई), दारा सिंग (पहिलवान पापाजी), असित सेन (सेठ चंद्रनाथ), देव किशन (रघूकाका) आणि ब्रह्म भारद्वाज (मौनीबाबा) आहेत.

ह्या चित्रपटातली सगळी गाणी कित्येक भारतीयांच्या मर्मबंधातली ठेव असणार. कही दूर जब दिन ढल जाये, मैने तेरे लिये, ना जिया लागे ना. आणि अर्थात pièce de résistance जिंदगी कैसी है पहेली हाये. अक्षरशः जीव ओवाळून टाकावं असं हे गाणं. गाण्याच्या सुरुवातीला फुग्यांचा गुच्छ दोर तुटून आकाशात उडून जातो तेव्हा हृदयात विलक्षण कालवाकालव होते. पण जीवनाचा खेळ हा असा आहे हे सांगणारं हे गाणं मला तरी कधीही उदासवाणं वाटलेलं नाही. मग ती मन्नाडेंच्या सूरांची जादू असेल, सलील चौधरीच्या संगीताचा प्रभाव असेल किंवा गीतकाराच्या (योगेश) शब्दांची किमया असेल. पण मनावर दाटून आलेलं सावट दूर करायचं अजब सामर्थ्य ह्या गाण्यात आहे हे मात्र नक्की. आणि हो, चित्रपटाच्या शेवटी १९७१ सालीच आलेल्या 'मेरे अपने' तल्या 'कोई होता जिसको अपना' ह्या गाण्याची सुरावट वाजते.

चित्रपटात काही गोष्टींचा उलगडा होत नाही. उदा. आनंदला कॅन्सर झालाय म्हणून त्याची प्रेयसी त्याला सोडून जाते का हा स्वतःच तिला दूर लोटतो का ती दुसर्‍याच काही कारणामुळे लग्न करून जाते हे स्पष्ट होत नाही. आँकोलॉजिस्ट असलेला भास्कर न्युमोनियाचा इलाज का करत असतो? भास्कर आणि रेणू आनंदसमोर एकमेकांना अंगठी घालतात का?फक्त ५-६ महिनेच हातात असलेला आनंद एव्हढा तंदुरुस्त कसा दिसतो? अर्थात चित्रपटाचा उद्देश वेगळा असल्याने ह्या त्रुटींकडे फारसं लक्ष जात नाही. मुसलमान ईसाभाई आणि ख्रिश्र्चन मिसेस डिसा सर्वधर्मभावाची शिकवण म्हणून चित्रपटात आहेत की काय असंही वाटतं Happy

सुरुवातीला चित्रपटाची श्रेयनामावली दिसते तेव्हा ७०च्या दशकातल्या मुंबईचं लोभसवाणं दर्शन होतं. हा चित्रपट मुंबई (तेव्हा बाँबे) शहरासोबत राज कपूरलाही समर्पित आहे ते का ह्याचा उलगडा विकी वाचल्यावर झाला. आनंदची व्यक्तिरेखा म्हणे राज कपूरवर बेतली आहे. तो ऋषीदांना 'बाबुमोशाय' म्हणायचा. राज कपूर एकदा अतिशय आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू होऊ शकतो असं वाटत होतं त्या काळात ऋषीदांनी ह्या चित्रपटाची कथा लिहिली होती.

काही दिवसांपूर्वी Mary Elizabeth Frye ची एक अतिशय सुंदर कविता वाचनात आली. तिचे शब्द इथे देण्याचा मोह आवरत नाही.

Do not stand at my grave and weep
I am not there. I do not sleep.
I am a thousand winds that blow.
I am the diamond glints on snow.
I am the sunlight on ripened grain.
I am the gentle autumn rain.
When you awaken in the morning's hush
I am the swift uplifting rush
Of quiet birds in circled flight.
I am the soft stars that shine at night.
Do not stand at my grave and cry;
I am not there. I did not die.

'आनंद मरा नही, आनंद मरते नही' हे शब्द हेच तर सांगतात. असं म्हणतात की ह्या जगात अशी काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे हे जग अजून टिकून आहे. ही माणसं असलीच तर आनंदसारखीच असणार. आणि जगाची सध्याची स्थिती पाहता अशी माणसं जितकी जास्त असतील तितकं बरं.

May Anand's Tribe Increase!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर चित्रपटवरील अत्यन्त सुंदर लेख, मी जेव्हाही हा चित्रपट बघतो तेव्हा रडू येतेच climax ला

खरं तर खूप गाजलेला आणि जुना चित्रपट . मी सुद्धा मागच्या 1, 2 वर्षातच पाहिला. एका सुंदर चित्रपटावर छान लिहिलंय.
थोडक्यात आनंद 'सांगा कसं जगायचं' ह्या प्रश्नाचं थिअरी + practical सकट उत्तर देतो. ~~~~ अगदी अगदी.

छान लिहिलं आहेस स्वप्ना. यातली गाणी अत्यंत आवडीची. सिनेमा लहानपणी बघितला होता पण परत बघावसा वाटला नाही . Trajedi सिनेमे माझ्याच्याने बघवत नाहीत.

छान लिहीले आहे या चित्रपटावर...

सगळ्यांचेच काम मस्त झाले आहे. जॉनी वॉकरचा छोटाच रोल आहे पण त्याने पहिल्यांदा सिरीयस रोल केला आहे. "क्यु मिया, हमसे पहले एक्झीट ले रहे हो?" असे तो राजेश खन्नाला विचारतो त्यावेळचा त्याचा व राजेश खन्नाचा अभिनय खूप छान... वाटतच नाही की हे दोघे अभिनय करत आहेत म्हणून...

छान लिहिलंयस.
कविता आणि शेवटचं वाक्य आवडलं. Happy

खूप दिवसांनी दिसलीस माबोवर.

मला हा सिनेमा कधीच बघवासा वाटत नाही .
आनंदचा अप्रोच आनंदी असला तरी पूर्ण चित्रपटात एक उदासीची भावना येते.

हा सिनेमा अगदी खासच आहे... सर्वार्थाने सुंदर...

तुझा लेखही अतिशय जमलेला, सिनेमाचे विविध पैलू सुरेख पद्धतीने उलगडून दाखवणारा... अतिशय आवडला...

मला नेहमीच वाटायचं आनंदची भूमिका राजेश खन्नापेक्षा अधिक उत्तम रीत्या कोण करु शकत असेल तर तो एकच जण - अर्थातच अमिताभ बच्चन. १०२ नॉट आऊट पाहिल्यावर माझा अंदाज बरोबर होता याची खात्रीच पटली.

सुंदर लिहिलं आहे. चित्रपटाचा इसेन्स नेमक्या शब्दांत मांडलाय.
हा चित्रपट अतिशय आवडता आहे . पाठ आहे म्हणायला हरकत नाही.

लेख वाचताना आठवलं - राज कपूर - हृषिकेश मुखर्जीच्या अनाडीमध्ये ललिता पवारचं नाव मिसेस डिसा होतं आणि खामोशी मध्ये ती मेट्रन होती.

प्रश्नांत एक भर - दिल्लीतला डॉक्टर गायनॅक का ?

मिसेस डीसा चा रोल उत्तमच होता
प्रचंड खडूस वाटणारी, सतत ओरडणारी, पण हिरो अडचणीत आहे दिसल्यावर तितक्याच हक्काने ओरडून मदत करणारी घर मालकीण.
त्यातले काही इलेमेंट आनंद च्या मेट्रन रोल मध्ये वापरले असावेत.

Sadha manus, mi_anu , कुसुमावती, बब्बन,ननि , वावे , चैत्रगंधा , योगी९०० , ललिता-प्रीति ,स्वस्ति ,पुरंदरे शशांक , बिपीन चन्द्र हर... ,भरत मनापासून आभार Happy

>>मी जेव्हाही हा चित्रपट बघतो तेव्हा रडू येतेच climax ला

हो मी पण रडले शेवटी.

>> "क्यु मिया, हमसे पहले एक्झीट ले रहे हो?" असे तो राजेश खन्नाला विचारतो त्यावेळचा त्याचा व राजेश खन्नाचा अभिनय खूप छान... वाटतच नाही की हे दोघे अभिनय करत आहेत म्हणून...

अगदी अगदी. तो 'इतनी जल्दी पर्दा नही गिरने दुंगा' असं स्थिर स्वरांत म्हणतो आणि बाहेर गेल्यावर त्याच्या अश्रूंचा बांध फुटतो.

>>कविता आणि शेवटचं वाक्य आवडलं. खूप दिवसांनी दिसलीस माबोवर

अरे बापरे! ती दोन्ही माझी नाहीत. बाकीचं काहीच आवडलं नाही का? Wink मी मधे मधे येते इथे. पण पूर्वीसारखं नाही जमत.

>>प्रश्नांत एक भर - दिल्लीतला डॉक्टर गायनॅक का ?

मलाही वाटलं होतं. पण मला वाटतं तो आनंदचा मित्र असतो. आधी आपण ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि मग त्यांच्या रेफरन्सने बाकीच्या डॉक्टर्सकडे जातो तश्यातला भाग असावा. त्रिवेदी भास्करला ओळखत असल्याने केस हिस्टरी तोच पाठवत असेल.

बाकी महमूद, किशोर ह्या मूळ कास्टिंगबद्दल काय वाटतं ते कोणीच लिहिलेलं नाही.

>>कही दूर आणि जिंदगी कैसी हे पहेलीचे गीतकार योगेश आहेत.
>>गाणी योगेश ची आहेत , गुल्जार नाही

हो धन्यवाद, बदल केला आहे.

आणि जगाची सध्याची स्थिती पाहता अशी माणसं जितकी जास्त असतील तितकं बरं.
May Anand's Tribe Increase!
>>>

तथास्तु

लिखाण आवडलं
पण तुझे लॉक डाऊन स्पेशल पन्ने हवेत वाचायला वाट बघतोय

सुरेख चित्रपटाविषयी तितकेच सुरेख लिखाण!

घुंघट, देवर, अनोखी रात या चित्रपटांवर लिहा जमेल तर. या निमित्ताने या फारशा परिचित नसलेल्या चित्रपटांचीही लोकांना माहिती होते.

छान लिहीले आहेस स्वप्ना. पाहून खूप वर्षे झाली आता. इतके डीटेल्स लक्षात नव्हते. मला सर्वात लक्षात राहिलेला सीन म्हणजे शेवटी आनंदचेच रेकॉर्डिंग परत वाजते तो.

गाण्यांबद्दल वरती कुसुमावती यांनी बरोबर लिहीले आहे. ती दोन गाणी योगेशची व मैने तेरे लिए गुलजारचे आहे.

खालची इंग्लिश कविता खूप आवडली. "रहे ना रहे हम" गाणे व विशेषतः या लाइन्स आठवल्या एकदम
जब हम न होंगे, जब हमारी खाक पे तुम रूकोगे, चलते चलते
अश्कोंसी भीगी चाँदनी मे, एक सदा सी सुनोगे, चलते चलते
वही पे कहीं - वही पे कहीं हम, तुमसे मिलेंगे, बन के कली, बन के सबा, बाग ए वफा में

परीक्षण छानच लिहीले आहे.

चित्रपट अतिशय सुंदर. गाणी कथा अ‍ॅक्टिंग उत्तम प्रतीचे आहे. त्यात अमिताभ सिनिकल आणि राजेश ऑप्टिमिस्टिक पण अल्पायुषी. सीमा, रमेश देव जोडपे अगदी मलई सँडविच मधल्या मलई सारखे. हा चित्रपट मी गरवारे शाळेत गणपती का दिवाळी सुट्टीत तो पटांगणात मोठा पडदा लावतात त्यावर बघितलेला. पुढे टीव्ही वर बघितला व दर वेळी टिपे गाळली आहेत. ह्यात मला फक्त त्या अमिताभ च्या प्रेयसीचे पात्र उगीच वाट्ते. दिल चाहता है च्या पहिले आलेला हा एक ब्रोमान्सच होता. आपण गेल्यावर त्याला सावरायला हवे कोनीतरी म्हणून राजेश तिची नियुक्ती करतो.

जॉनि वॉकर काम बेस्ट. उत्तम चित्रपट ओव्हर ऑल. इतके साधे घर, साधे रोजचे कपडे घालणारे नायक कधी व कुठे अस्तंगत झाले कोण जाणे.
दिल्ली येथील हौज खास मार्केट मधून एका दुकानातून मी आनंदचे ओरिजिनल पोस्टर पण विकत घेतले आहे पण फ्रेम करून लावायचे डेअरिन्ग झालेले नाही.

तेव्हा कॅन्सर ने मरणे ह्याला एक वलय प्राप्त झाले होते व कॅन्सर झालेला असला तरी ती बातमी लपवत ठेवायची हे देखिल हा सिनेमा बघितलेल्या जनरेशनच्या डोक्यात कायम असे. ह्या सिनेमाचा फिमेल काउं टर पार्ट मिली हा आहे जिथे जया ला कॅन्स र झालेला आहे व ती देखील रोग बळावायच्या आधी एकदम चुलबुली व ऑप्टिमिस्टिक दाखवली आहे. इथे ही अमिताभ सिनिकलच आहे एका वेगळ्या कारणाने.

त्याच प्रकारचे वलय फॉल्ट इन अवर स्टारस कथेतील नायक नायिके भोवती आहे. कमी वयात असाध्य रोगाने जाणे. ह्या परते सॅड व रोमेंटि क काय असू शकते. पण अश्या कलाकृती संवेदन क्षम वयात बघितल्या म्हणजे व्यक्तीची जिजीविषा झाकोळते व जीवनातील त्रास, अडचणी, मेजर प्रॉब्लेम्स ह्यांच्याशी लढा द्यायची मानसिकता नाहिशीच होते. अश्या कथा एक सुरेख कथा म्हणून बघाव्या पण त्यामुळे मानसिकतेवर तर परिणाम होत नाही ना ते ही तपासावे.

मी पण राजेश खन्ना फॅनच पण माझी यात्रा हाथी मेरेसाथी, दुशमन बावर्ची, अनुराग, आप की कसम ह्यांपासून सुरू होते. दाग मी आत्ता आत्ता पाहिला. व पटला नाही. आनंद आराधना मला कळायला लागायच्या आधीचे सिनेमे. त्यामुळे राजे श चा दुश्मन मधला वादा तेरा वादा म्हणोन झूमणारा व दारूच्या नशेत अपघात करणारा व नंतर त्याचे प्रायस्चित्त भोगणारा राजेश जास्त जवळ चा वाट्तो. रिलेट करता येते.

आनंद मधला " एक मरा नही और एक और पैदा हुवा मरने के लिये" हा अमिताभचा संवाद मला मुंबईत रोज प्रत्ययास येतो. आणि आनंद मरते है. हे वास्तव पण .

स्वप्ना, आनंद मी दूरदर्शन वर पाहीला होता. अप्रतीम पिक्चर ! पण खरे सांगायचे तर तुझ्या प्रत्येक नवीन परीक्षणाची आम्ही वाट बघत असतो. वेळ मिळाला की लिहीत जा.

आनंद ही एक स्टेज आहे.आपण मरणार हे कळल्यावर 'आज जगून घेऊ' या थीम वर बरेच पिक्चर आले आहेत.
इतक्या ग्रेसफुली हसत मरणारे पेशंट सर्वाना चटका लावून जातातच.पण लोकसंख्येचा एक भाग दुर्धर आजार झाल्यावर चिडचिडे होणारे, भावनिक ब्लॅकमेल करणारे आणि आपल्या मनाप्रमाणे करून घेण्याची वृत्ती हाही असू शकेल.पेशंट ने नेहमीच आनंदी, थोर, ग्रेसफुल संत असण्याची गरज नाही.(अर्थात हे अवांतर विचार.आनंद खूप आवडता पिक्चर आहेच.)

हर्पेन , चीकू ,फारएण्ड ,अमा, रश्मी.. , mi_anu,वावे,आसा. मंडळ आभारी आहे Happy

>>पण तुझे लॉक डाऊन स्पेशल पन्ने हवेत वाचायला वाट बघतोय

नक्की लिहिते.

>>घुंघट, देवर, अनोखी रात या चित्रपटांवर लिहा जमेल तर.

हो, तुम्ही आधीही सुचवले आहेत हे चित्रपट बर्‍याच वेळा.

>>अमा छान प्रतिसाद!

+१. मस्त वाटतं असे प्रतिसाद वाचून.

>>पेशंट ने नेहमीच आनंदी, थोर, ग्रेसफुल संत असण्याची गरज नाही.
बरोबर, आणि तसं राहणं कठिणच आहे. सहजासहजी जमणारं नाही ते. म्हणूनच तर आनंद वेगळा ठरतो ना.

या चित्रपटात एकापेक्षा एक मस्त गाणी आहेत. बाकी पुर्वीच्या चित्रपटात डॉक्टरी व्यवसायाबद्दल (म्हणजे कोण नक्की काय काय करतो) याला फारसे महत्व देत नसावेत..

सिनेमा उत्तम आहे ह्यात शंकाच नाही. सगळ्यांनी जीव ओतून कामे केली आहेत. रमेश देव आणि सीमा आपापसात मराठीत बोलतात ते अगदी सहज वाटते.
जिंदगी कैसी है पहेली हे गाणे खरे तर राजेश खन्नाच्या तोंडी नव्हतेच. त्याला दिलेली बाकी गाणी मुकेशच्या आवाजात आहेत. मन्ना डे चे हे गाणे खरेतर सुरवातीला वाजणार होते. पडद्यावर कुणी गाणारा नव्हता असे ठरले होते आणि तेच जास्त चांगले दिसले असते. पण राजेश खन्नाने हे गाणे ऐकले आणि त्याने हृषिकेश मुखर्जींंकडे हट्टच केला की हे गाणे माझ्या तोंडी दाखवा. आणि शेवटी त्यांनी तो हट्ट मानला. माझ्या मते ह्या गाण्याची सिचुएशन अत्यंत ओढून ताणून निर्माण केली आहे. इतके सुंदर गाणे ठरलेल्या सिचुएशनला जास्त योग्य ठरले असते.
कदाचित राजेश खन्ना सुपरस्टार बनणे सुरू झाले असल्यामुळे असले हट्ट पूर्ण केले जात असतील.

बाकी पुर्वीच्या चित्रपटात डॉक्टरी व्यवसायाबद्दल (म्हणजे कोण नक्की काय काय करतो) याला फारसे महत्व देत नसावेत..>> पण अमिताभ प्रॅक्टिस करताना दाखविला आहे. त्याची ती लाडाने बोल्णारी पेशंट. झोपड प ट्टीतले गरीब लोक. रमेश देव पण डॉक्टर.

इतके सुंदर गाणे ठरलेल्या सिचुएशनला जास्त योग्य ठरले असते.>> +१

Pages