विठ्ठल विठ्ठल

Submitted by nimita on 1 July, 2020 - 11:38

आज पहाटेपासूनच फुलमंडी मधे खूप गर्दी जमली होती. तशी रोजच पहाटेपासून विक्रेत्यांची आणि गिऱ्हाईकांची गर्दी असायची तिथे.... फुलांचं होलसेल मार्केट असल्यामुळे ऊन चढायच्या आत सगळी खरेदी उरकायची घाई असायची गिऱ्हाईकांची... कारण एकदा का सूर्य माथ्यावर आला की ती ताजी टवटवीत फुलं हळूहळू माना टाकायला लागायची.

पण आजच्या या गर्दीला कारणही तसंच खास होतं - आज आषाढी एकादशी होती ! गावातल्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आपल्या आठ दहा वर्षांच्या मुलीला -अवंती ला - घेऊन मंडईत आले होते. अवंती एरवी इतक्या पहाटे उठायला कधीच तयार झाली नसती. पण तिला हे असं आपल्या बाबांबरोबर फुलमंडईत यायला खूप आवडायचं. कारण मुळात तिला फुलं खूप आवडायची. त्यामुळे अवंती दर वर्षी एकादशी च्या दिवसाची वाट बघत बसायची.

आजही मंडईत जागोजागी लागलेल्या फुलांच्या राशी बघून अवंती खूप खुश झाली - "लाल चुटुक गुलाब, पिवळा धमक झेंडू, पांढरी शुभ्र शेवंती..." एकीकडे रंगांच्या विशेषणांची उजळणी करत ती बाबांच्या मागे मागे चालली होती. "बाबा, आपण ती गुलाबाची फुलं घेऊ या ..." अवंतीनी कोपऱ्यात पडलेल्या विदेशी गुलाबाच्या गुच्छांकडे बोट दाखवत म्हटलं ," किती छान, टपोरी फुलं आहेत ती."

तिचे ते शब्द ऐकताच त्या लाल, पिवळ्या विदेशी गुलाबांच्या गुच्छांमधली एक नाजूकशी गुलाबी कळी हलकेच थरारली... इतका वेळ असं कोपऱ्यात दुर्लक्षित होऊन पडून राहिल्यामुळे तिला खूपच एकटं पडल्यासारखं वाटत होतं. आपल्या एक दोन पाकळ्या हळूच उघडत तिनी आवाजाच्या दिशेनी बघितलं. त्यावर तिच्या शेजारी असलेल्या मोठ्या उमललेल्या गुलाबानी तिला समजावत म्हटलं ," उगीच दिवास्वप्नं नको बघू...आज आपल्याला कोणी नाही विचारणार. Valentine day, Propose day, Friendship day वगैरे सगळे सण येऊन गेले. आता आपली नाही तर देशी गुलाबांची मागणी वाढणार." त्या कळीच्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून गुलाब म्हणाला," अगं बाळा, आता चातुर्मास सुरू होणार ना ! वेगवेगळे सण, उत्सव येतील आता... घराघरांत छोट्या मोठ्या पूजा, व्रत वैकल्य सुरू होतील. अशा वेळी देशी गुलाबांना जास्त मागणी असते.... त्यांच्या पाकळ्या तोडून देवाला वाहायच्या असतात ना लोकांना... आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे... देशी गुलाब स्वस्त असतो.. या माणसांचं खरंच काही कळत नाही बघ मला .... आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीची प्रणयाराधना करायची वेळ येते तेव्हा यांना आपल्यासारखा विदेशी, महागातला महाग गुलाब पण परवडतो.. त्यावेळी आपले भले मोठे गुच्छ अगदी हसत हसत घेऊन जातात हे लोक! पण जेव्हा त्या सर्वशक्तिमान देवाची आराधना करायची वेळ येते तेव्हा यांना लगेच पैसे, महागाई या सगळ्या गोष्टी आठवतात." एक भलामोठा सुस्कारा टाकत त्या मोठ्या गुलाबानी त्या हिरमुसलेल्या कळीला जवळ घेतलं. पण त्या निरागस कळीला हे म्हणणं काही फारसं पटलं नव्हतं. तिच्या दिशेनी येणाऱ्या अवंतीकडे ती खूप आशेनी बघत होती. पण तेवढ्यात अवंतीच्या बाबांनी तिला काहीतरी समजावलं आणि त्या दोघांनी दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या देशी गुलाब आणि झेंडूच्या दिशेनी जायला सुरुवात केली.

पण अवंती मात्र वळून वळून त्या टपोऱ्या गुलाबांकडे बघत होती. थोड्याच वेळात तिच्या बाबांची खरेदी झाली आणि ते परत जायला वळले. त्यांचा हात ओढत अवंती म्हणाली," बाबा, मला त्या तिकडच्या गुलाबांमधलं एक तरी फूल घेऊन द्या ना ! प्लीज!!" त्या बालहट्टा समोर हतबल होत तिचे बाबा म्हणाले,"ठीक आहे; घे त्यातलं तुला आवडलेलं एक फूल." बराच वेळ सगळ्या फुलांचं निरीक्षण केल्यावर अवंतीनी ती नाजूक गुलाबी कळी उचलली. त्या कळीच्या चेहेऱ्यावर खूप मोठ्ठं हसू पसरलं.... अवंतीच्या बाबांनी ती नाजूकशी कळी अवंतीच्या केसांत खोवली. अचानक मिळालेल्या या अढळपदामुळे कळी ची 'कळी खुलली'...मोठ्या दिमाखात ती अवंती बरोबर जायला निघाली.

घरी पोचल्यावर दर वर्षीप्रमाणे अवंती तिच्या आई बाबांना मदत करायला लागली.... खूप कामं होती... आणलेली झेंडूची फुलं त्यांच्या छोट्या मोठ्या आकाराप्रमाणे निवडून घ्यायची... मग त्यांच्या लहान मोठ्या माळा बनवायच्या....गुलाबाच्या आणि शेवंतीच्या फुलांच्या पाकळ्या अगदी अलगदपणे वेगळ्या करून ठेवायच्या ... आणि नंतर या सगळ्या माळा आणि फुलांनी विठ्ठल रखुमाई च्या मूर्तींची आरास करायची ; गाभारा आणि सगळं देऊळ सजवायचं...

तोंडानी विठ्ठल नामाचा गजर करत सगळ्यांची कामं चालू होती. ती गुलाबी कळी आपल्या अढळ स्थानावरून सगळं काही बघत होती ,ऐकत होती.

अवंतीनी जेव्हा झेंडूच्या फुलांच्या माळा करायला घेतल्या तेव्हा अचानक त्या कळीला कोणाच्यातरी विव्हळण्याचा आवाज आला. तिनी नीट बघितलं तर काय... अवंती चक्क चक्क त्या झेंडूच्या नाजूक फुलांमधून टोकीदार सुई खुपसत होती. ते बघून कळीच्या काळजातही कळ उठली. तिनी त्या जखमी फुलाला विचारलं," खूप दुखतंय का तुला? किती दुष्ट आहेत ही माणसं... त्यांच्या देवळाची शोभा वाढवण्यासाठी तुम्हांला इतक्या वेदना सहन करायला लागतायत.नुसती फुलं ठेवून सजवा म्हणावं मंदिर....त्यासाठी माळाच केल्या पाहिजेत असं कुठे लिहिलंय का ?" कळीला होणारा मनस्ताप बघून त्या झेंडूच्या फुलाला खूप गंमत वाटली. तिची समजूत काढत झेंडू म्हणाला," अगं, पण आम्हांला या वेदनांचा अभिमान च वाटतो. खरं सांगायचं तर आमच्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं की - अशा प्रकारे या माळांमधे स्वतःला गुंफून घ्यावं आणि विठ्ठल रखुमाईच्या गळ्यात स्वतःला झोकून द्यावं. आपलं आयुष्य सार्थकी लागावं." त्याच्या या वक्तव्यावर बाकी सगळ्या फुलांनी पण त्यांची संमती दर्शवली.

ते बघून कळी अजूनच गोंधळात पडली. तेव्हा एक मोठं झेंडूचं फूल थोडं पुढे होत म्हणालं," त्यात इतकं विचार करण्यासारखं काहीच नाहीये... हा तर जगाचा नियमच आहे...अगं, ज्या विठोबा आणि रखुमाई च्या मूर्तीचं दर्शन घ्यायला दूरदूरच्या गावांतून श्रद्धाळू येतात त्या मूर्ती सुद्धा आधी दगड च तर होत्या.... पण त्यांनी आपल्या सर्वांगावर टाकीचे घाव सोसले आणि म्हणूनच तर त्या निराकार दगडातून इतक्या सुंदर मूर्ती तयार झाल्या...."

कळीला आपला मुद्दा पटवून देण्यासाठी झेंडू पुढे म्हणाला," तुला एक गंमत सांगू का ? या देवळाच्या पायऱ्या पण दगडाच्याच आहेत... पण त्या दगडाच्या नशीबात टाकीचे घाव नव्हते.... त्यामुळे त्याला गाभाऱ्यात स्थान नाही मिळालं ... लोकांच्या पायाखाली झिजत पडणं हेच त्या पायरीच्या दगडाचं नशीब ! आमची सगळ्यांची परिस्थिती पण तीच आहे. कोणाच्या नशिबात काय आहे ते त्या विठू माऊलीलाच माहीत ! आमच्या पैकी काही फुलं गाभाऱ्यात जातील, तर काही बाहेर देवळातल्या खांबांची शोभा वाढवतील..... काही फुलं भक्तगण देवाला वाहतील तर काही फुलांच्या पाकळ्या लोकांच्या पायदळी चिरडल्या जातील.... पण आम्हांला सगळ्यांना एका गोष्टीची अगदी पक्की खात्री आहे.... आम्ही कुठेही असलो तरी शेवटी आमचं निर्माल्य च होणार आहे ! त्यामुळे देवाच्या गळ्यातली फुलं कधी गर्व करत नाहीत आणि पायदळी पडलेली फुलं कधी दुःखी होत नाहीत...नाहीतरी तुकारामांनी म्हटलंच आहे...

ठेविले अनंते तैसेचि रहावे

चित्ती असो द्यावे समाधान !!"

एकीकडे त्यांचं हे संभाषण चालू असताना अवंतीची आई तिथे आली आणि तिला म्हणाली," अवंती, त्या छोट्या फुलांच्या माळा बाबांना गाभाऱ्यात नेऊन दे...'मोठ्या फुलांमुळे मूर्ती झाकली जाते' असं म्हणत होते ते . त्यामुळे त्या मोठ्या फुलांच्या माळा आपण बाहेर सजवू. बाकी उरलेल्या फुलांची रांगोळी काढू ."

हे शब्द कानी पडताच गुलाबाच्या कळीनी त्या सगळ्या झेंडूच्या फुलांकडे बघितलं..... सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एकसारखंच समाधान आणि मुखी एकच नाव....

"विठ्ठल .... विठ्ठल.... विठ्ठल.....विठ्ठल ......."

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कल्पनाविलास लिहिता तुम्ही,
तुमची कुलवधू पण छान आहे, पण तिथलं महाभारत वाचून प्रतिक्रिया देणं टाळलं.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा