संततधार - भाग १४ - शेवटची पार्टी ! (समाप्त)

Submitted by अज्ञातवासी on 26 June, 2020 - 10:25

काही सत्य घटनांवर आधारित:

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

मनोगत -

ही कथा पूर्ण करताना आनंदही होतोय, आणि दुःखही. आनंद यासाठी, की एक स्टोरी पूर्ण झाल्याचं समाधान आहे. दुःख यासाठी की पुन्हा पर्वणी, स्नेहल, मनू हे भेटणार नाहीत.
एक सुंदर वाक्य आहे, जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, त्याबरोबर तुमच्यातलाही अंश तुम्हाला सोडून जातो. या कथेबरोबर माझ्यातल्या लेखकातीलही काहीतरी गेल्यासारख वाटतय.
ही कथा पूर्ण झालीये, पण सुखांत, दुःखांत की अजून काही, याचा विचार वाचकांना करायचा आहे...
आता आजपासून चार महिन्यांची प्रदीर्घ रजा घेतोय, मायबोलीवरून, सोशल साईट्स वरून, बऱ्याच ठिकाणाहून. परत येईल, तेव्हा मी अज्ञातवासातून बाहेर आलेला असेन अशीच इच्छा.
या मायबोलीवर मला अनेक सुंदर व्यक्ती भेटल्या, काहींना मी ओळखत नाही, त्यांचं नाव ही मला माहिती नाही, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं... असाच लोभ कायम असू द्या...
धन्यवाद!
अज्ञातवासी!

भाग १३ - https://www.maayboli.com/node/75252

दीड वर्षानी...
आज त्या कंपनीत भरपूर धावपळ चालू होती.
कंपनीची जागा छोटीच होती. लोक कमी होते, पण अतिशय सुंदररित्या सजवली होती. बघणाऱ्याला प्रसन्न वाटेल अशी.
सकाळीच एम डी मॅडमचा सगळ्यांना मेसेज गेल्यामुळे दहा वाजता लोक स्टँडिंग मीटिंगसाठी जमले होते.
दहा वाजता एक गाडी कंपनीसमोर येऊन थांबली.
ती त्या गाडीतून बाहेर पडली, आणि पायऱ्या चढून कंपनीत आली.
तिला बघून सगळे उभे राहिले.
"अरे वा, जमलेत सगळे? ग्रेट." तिने बोलायला सुरुवात केली.
"गेल्या वर्षभरापासून आपण एकत्र काम करतोय. एमडी पद मीच सांभाळतेय... पण...
मी कधीही सीईओ पद भरलं नाही, किंवा कुणाला अपॉइंट केलं नाही.
कारण मी जगातल्या सगळ्यात बेस्ट सीईओबरोबर काम केलंय. आणि बिलीव मी, तो जर परत आला नसता...तर हे पद कायम रिकामं राहिलं असतं.
सो प्लिज वेलकम, माय बेस्ट फ्रेंड... माय बेस्ट बॉस... मनू...."
...स्नेहल अत्यानंदाने म्हणाली!
एक कृश आकृती हळूहळू चालत आली. उन्हाने चेहरा रापलेला होता. कृशपणामुळे तो अजून उंच भासत होती. पण काळेभोर डोळे अजून तसेच होते...
त्याला बघताच, काही जणांना प्रचंड मोठा धक्का बसला...
आणि त्यानंतर त्यांनी एकच जल्लोष केला.
मनू इज बॅक!!!!
एवढंच त्यांना माहिती होतं.
बाकीजण गोंधळून गेले, आणि नंतर त्यांच्या जल्लोषात सामील झाले.
जल्लोष थांबला.
मनूने स्मितहास्य केलं.
त्याने आपल्या बाह्या वर केल्या...
"गाईज, लेट्स गेट बॅक टू वर्क..." तो कणखरपणे म्हणाला.
आणि सगळे लगेच कामाला लागले.
◆◆◆◆◆
स्नेहलने एक खास केबिन राखून ठेवली होती. मनू त्या केबिनमध्ये खुर्चीत बसला.
स्नेहल त्याच्या समोर होती...
"मी तुझी वाट बघितली मनू."
"थँक्स स्नेहल... आणि आता तू माझी बॉस आहेस, हे बघून अजून आनंद होतोय."
"मी तुझ्यासारखी बॉस बनण्याचा प्रयत्न करेन."
मनू हसला.
"जस्ट बी स्नेहल. सगळं नीट होईल."
"मनू. तू पुन्हा भेटशील असं वाटलं नव्हतं."
"मलाही वाटलं नव्हत."
"परत आला आहेस. हळूहळू जबाबदारी घे. जास्त स्वतःला पुश करू नकोस."
"स्नेहल... माझी जबाबदारी मी पार पाडेनच. पण..."
मनूने खिशातून दोन वस्तू बाहेर काढल्या.
"हे शिवलिंग. नर्मदेच्या काठावरून आणलं. आणि हे कार्ड..."
स्नेहलने नमस्कार केला, आणि कार्ड हातात घेतल.
"आपण थिंकलॅबचे कस्टमर कधीही आपल्याकडे वळवू शकणार नाही, पण...
बहुतेक हा एकच माणूस आपल्याला पुढे नेऊन सोडेल. कारण ही प्रॉमिस्ड मी, तो नेहमी माझ्या पाठीशी उभा राहील."
"मनू, यु आर स्टार... अँड द स्टार इज बॅक..." स्नेहल उत्साहाने कार्डवरचं नाव बघून म्हणाली.
कार्डवर नाव होतं...
".... मोहन पाटील, चेयरमन, पाटील स्टील इंडिया..."
◆◆◆◆◆
त्या पारावर दुपारी एका झाडाखाली तो झोपला होता...
नर्मदा परिक्रमा...
अनेक वर्षांपूर्वी त्याने बघितलेलं स्वप्न तो या अनोळखी प्रदेशात पूर्ण करत चालला होता.
त्याला फिरायचं होतं, संपूर्ण फकीर होऊन. त्याला स्वतःला शोधायचं होतं.
त्याला गाढ झोप लागली होती.
तेवढ्यात दोन माणसांनी त्याला उठवले.
"भैयाजी, वो आपका बिजनेसवाला संत प्रोग्रॅम का इंटरवियु देखके ये मॅडम आपको खोजते हुये आई है."
मनूने डोळे उघडले.
"टायर्ड हं?" त्याला आवाज ओळखीचा वाटला.
त्याने डोळे किलकिले केले.
समोर स्नेहल हसत उभी होती.
◆◆◆◆◆
पर्वणी मान खाली घालून काम करत बसली होती.
तेवढ्यात तिच्या केबिनचा दरवाजा उघडला गेला.
"विराज, नॉक करत जा." ती शांतपणे म्हणाली.
"आपल्याला नॉक आउट व्हायची वेळ आलीये. मनू इज बॅक पर्वणी, मनू इज बॅक. तोही आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीचा सीईओ म्हणून."
"मला माहितीये ते. आफ्टर ऑल, मनू परत येणं ही मार्केट मध्ये मोठी न्यूज आहे."
"तरीही तू शांत आहेस?"
"हो कारण आपली कंपनी मनू आणि मी बनवली आहे. आपली कंपनी चालतेय त्याच्या फाईव इयर प्लॅनवर, आणि तो आपले क्लाइन्ट वळवेल, आपले ट्रेड सिक्रेट फोडेल, इतक्या कोत्या मनाचा नाही."
पण एक सांगते. आजपासून, आतापासून स्नेहलची कंपनी न्यू क्लाइन्ट गेनिंग मध्ये आपली सगळ्यात बिगेस्ट कॉम्पिटीटर असेल. म्हणून आता तू सीईओ म्हणून या गोष्टींचा विचार करायला सुरुवात कर. कारण माझ्या एक्स हजबंडच्या समोर माझा फ्युचर हजबंड हरलेला मला आवडणार नाही."
"येस." त्याने आत्मविश्वासाने हसून मान हलवली. "बाय द वे, आज रात्री डिनर, बोलेवॉर्ड?"
"डन." पर्वणी हसून म्हणाली.
तो बाहेर गेला.
पर्वणीने मोबाईल बाहेर काढला.
आणि अनेक वर्षानंतर तिने त्या नंबरला मेसेज टाकला.
'वेलकम बॅक!'
◆◆◆◆◆
मनू दिवसभर सगळ्या गोष्टी समजून घेत होत्या.
संध्याकाळ झाली तरी तो काम करत होता.
"मनू. बस आजसाठी. बाकी उद्या बघ. आता घरी जाऊयात."
"स्नेहल मी फ्लॅट बघू का. आता मी सीइओ झालोय, तर थोडा पगार तू मला देशीलच."
"काहीही गरज नाहीये. राहतोय ना तू माझ्यासोबत? राहा. मला जगाची फिकीर नाही, की जग काय बोलेल. तसही आता मला कुठल्याही नात्यात बांधलं जाण्याअगोदर वेळ घ्यायचाय. मला कमीत कमी दोन वर्ष सोबत घालवायचीत तुझ्या. तुला पूर्ण जाणून घेतल्याशिवाय मी पुढे जाण्याचा विचार नाही करणार."
"जसं तू म्हणशील तसं. बादवे, त्यादिवशी मी थांबलो ते चांगलंच केलं ना." मनू खट्याळ हसत म्हणाला.
"डोन्ट वरी, मला स्पर्श झाला असता ना, मी त्याक्षणी भानावर येऊन तुला दूर लोटलं असतं." स्नेहलही हसत म्हणाली.
चल निघुयात. मनू म्हणाला.
"अरे काय निघुयात. मी सीईओ झाल्याची पार्टी दिली होती, त्याची परतफेड तर कर."
"स्नेहल, अजून मला पगार दिलेला नाहीये तू."
"आज मी पे करते. नंतर तू मला दे. लेट्स एन्जॉय द नाईट. बोलेवॉर्ड?"
"ओके." मनू हसत म्हणाला.
◆◆◆◆◆
रात्री आठ वाजता, दोन गाड्या बोलेवॉर्डजवळ थांबल्या.
"मी चांगली दिसतेय ना मनू?" स्नेहलने आत जाता जाता विचारले.
"खूप सुंदर दिसतेय. सगळे तुझ्याकडेच बघताहेत बघ."
"पुरे..."
आता जाताच स्नेहलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आणि मनू तर भांबावलाच.
आणि सेम स्थिती पर्वणी आणि विराजची झाली.
मनू, आणि पर्वणी, एकमेकांकडे बघतच राहिले...
"वेल, व्हॉट अ सरप्राईज." स्नेहलने शांततेचा भंग केला, आणि त्याचबरोबर मनूचा हात घट्ट पकडला...
"येस." पर्वणी म्हणाली.
ते चौघेही जवळ आले.
"विराज, स्नेहल अँड मनू..." पर्वणीने ओळख करून दिली.
"हाय. विराज." विराजने मनू आणि स्नेहलही हात मिळवला.
"एक्स्क्यूज मी, पण तुमचा टेबल नंबर कोणता आहे?" मनूने विचारले.
"सात." विराज म्हणाला.
"आमचा आठ." स्नेहल आश्चर्यचकित होऊन म्हणाली.
"एक मिनिट." मनू म्हणाला, आणि तो मॅनेजरजवळ गेला.
थोड्या वेळाने तो परत आला.
"स्नेहल आपला चौदा आहे. चुकलो आपण."
"ओके. सी या" स्नेहल म्हणाली.
"तू टेबल चेंज करून घेतलास ना?" तिने टेबलकडे जाता जाता विचारले.
"होय." मनू हसत म्हणाला.
◆◆◆◆◆
"तू त्याच्याकडेच बघत बसणार आहेस की जेवणारही आहेस." पर्वणीने विराजला विचारले.
"नो, नो, तो खूप वेगळा दिसतोय, त्याच्या फोटोज पेक्षा."
"आयुष्याचा अनुभव आल्यावर माणसं वेगळीच दिसतात. जेवण कर." पर्वणी शांतपणे जेवू लागली.
"स्नेहल..."
"काय?"
तुझा मूड का ऑफ आहे?
ऑफ? बिलकुल नाही.
"मग तुझी बडबड का थांबलीये. एरवी तर तू मला एक शब्दही बोलू देत नाहीस."
"आज तू बोल." स्नेहल हसली.
"नाही, मला तुला ऐकायला जास्त आवडेल.
काय बोलू?"
"काहीही बोल. पण बोलत राहा." मनू हसला.
◆◆◆◆◆
जेवण करून मनू आणि स्नेहल बाहेर निघाले.
"वेट, मी पार्किंगमधून गाडी घेऊन येते."
मनू हॉटेलच्या बाहेरच थांबला.
"सो, हाऊज लाईफ."
"हं?" मनूने मागे वळून बघितले.
मागे पर्वणी उभी होती...
"इट्स... गुड... तू कशी आहेस."
"आय एम ओके."
दोघेही क्षणभर काहीही बोलले नाहीत.
"ही इज नाईस गाय." मनू तिच्याकडे बघत म्हणाला.
"येस. अँड शी इज अल्सो या नाईस वूमन."
"येस." मनू हसला. "सगळं ठीक आहे ना परु?"
"हो रे."
"ग्रेट. आणि फक्त भाजी चिरताना लक्ष ठेवून चिरत जा, नाहीतर चिरण्याचं काम अनुराधाला दे..."
पुढच्याच क्षणी पर्वणीचं तिच्या बँडेड बांधलेल्या बोटाकडे लक्ष गेलं...
तिच्या चेहऱ्यावर एक विषण्ण हसू पसरलं. क्षणभर एक संपूर्ण भूतकाळ तिच्या नजरेसमोरून तराळून गेला.
"पिप... "हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली.
"बाय मनू."ती गाडीत बसली.
"बाय."
स्नेहलचीही गाडी मागोमागच आली.
मनूही गाडीत बसला.
दोन्हीही गाड्या रस्त्यांवर निघाल्या.
समांतर रस्त्यांवर...
विरुद्ध दिशेला....

समाप्त!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडली. तुम्हाला खूप शुभेच्छा.
अनपेक्षित शेवट अपेक्षित होता आणि अपेक्षा पूर्ण झाली. Happy
आभार.

शेवट छान केला आहे... पण तुम्ही तुमच्या रसिक वाचकांवर अन्याय का करत आहात... तुमच्या सारख्या लेखकांचं लिखाण वाचून मायबोलीशी नातं जोडलयं. कृपा करून कुठेही जाऊ नका... तुमच्या मधल्या लेखकाचं काही गेलं नाही आहे... उलट तुमच्या मधला लेखक खूप प्रगल्भ झालायं.. वाट बघायला लावून नका जास्त .. नविन कथेला सुरुवात करा... लोभ तर कायमचं राहिल... आणि आता चेहर्‍यावर गोड हसू येऊ द्या...

अप्रतिम.... शेवटी दोघांनाही योग्य मार्ग सापडला..... संपूर्ण कथा व्यवस्थित गुंफून सादर केली त्याबद्दल आपले अभिनंदन... लवकरच एखादा नवा विषय घेऊन आपण पुन्हा भेटाल ही अपेक्षा

काय बोलावं नाहीये सुचत.
शेवट वाचून असं वाटलं की यापेक्षा सुंदर शेवट असूच शकत नाही.
शेवट रिक्त करून गेला आणि समाधानी सुद्धा.
अज्ञातवासी! हॅट्स ऑफ!!!! ही कथा इतकी सुंदर होत जाईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आता कित्येक दिवस मनू, पर्वणी, स्नेहल आठवत राहतील.
आणि हो, आय विल मिस यू ऑन मायबोली... Happy थँक्स फॉर सच ब्युटीफुल मोमेंट्स.
अवांतर : चार महिन्यानंतर मोहन पाटील यांना परत भेटायला आवडेल. Happy
मनू आणि मोहनची भेट होणार असेल, तर खूप खूप उत्सुक आहे...

पर्वणी ने खरंच दुसरा शोधला... हे अनपेक्षित होते... बाकी सगळे अपेक्षित...
Have अ गुड ब्रेक !!!

बादवे - कटप्पा आणि तुम्ही जवळजवळ एकत्रच ब्रेक घेताय...

बादवे - नर्मदा प्रदक्षिणा प्लॅन तर नाही Happy

तुम्ही चार महिन्यानंतर आल्यानंतर प्रतिसाद देणार माहित आहे तरी विचारतोय....

एच आर डी एम् च्या दिपु काजल नंतर सर्वात आवडलेल्या ह्या २ व्यक्तिरेखा - मनु आणि स्नेहल !
एच आर डी एम् तर माझी ऑल टाइम फेवरेट कादंबरी आणि आता २ नंबरला असेल ही संततधार...

एच आर डी एम् च्या दिपु काजल नंतर सर्वात आवडलेल्या ह्या २ व्यक्तिरेखा - मनु आणि स्नेहल !
एच आर डी एम् तर माझी ऑल टाइम फेवरेट कादंबरी आणि आता २ नंबरला असेल ही संततधार...
Same here..

कथेचा Practical end! आवडला..
मनाचा गुंता या कथेसारखाच अलगद सोडवता यायला हवा होता.. अस वाटल.. असो. Happy पुलेशु!

धन्यवाद अशी खिळवून ठेवणारी कथा प्रकाशित केल्याबद्दल . पुढील कथेची वाट बघेन. लवकरच पुनरागमन कराल ही अपेक्षा आणि शुभेच्छा.

कादम्बरी अतिशय आवडली! चार महिने ब्रेकवर जाताय - जे काही करायचे ठरवले असेल ते नीटपणे पार पडो ही शुभेच्छा! परतल्यावर मायबोलीवर छान लेखन घेऊन याल ही अपेक्षा नक्कीच आहे आपल्यासारख्या लेखकाकडून!

सुंदर आणि सुरेख शेवट पण मला काही गोष्टी खटकल्या जसे कि पर्वणी वर प्रेम करणारा मनू, स्वतःची कंपनी आणि पर्वणी ला सोडून स्नेहल च्या सुरु केलेल्या कंपनीत जॉईन झाला आणि तिच्या सोबत राहू लागला आणि पर्वणीनीने दुसरा साथीदार शोधला.
असो आपण लेखक आहेत शेवटी आपला निर्णय आम्हाला मान्य आहे, लिहीत राहा

छान खिळवून ठेवणारी आहे कथा... फक्त शेवट जर पर्वणीला हेमलचं सत्य कळतं तिथेच केला असता तर अजून छान आणि practical वाटली असती... मध्येच विराज आला ते पटलं नाही..