एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग १

Submitted by नानाकळा on 8 February, 2016 - 14:17

(सर्वच नावे बदलली आहेत.)

"साहेब, पैशाची काही अडचण आहे का तुम्हाला?"
"कोणाला नसते?"
"तुम्हाला आहे काय ते सांगा हो."
"हो, आहेना. पैसा टिकत नाही, कितीही मेहनत करा, काम झाल्यावर क्लायंट्लोग पैसे देत नाहीत, दिले तर कमी देतात, सगळे दिले तर उशिरा देतात. पैसे यायच्या आधी जायचे मार्ग तोंड वासून तयार असतात."
"तुम्हाला दहा लाख मिळाले तर हवे आहेत काय?"
"कुणाला नको असतील, हवेच आहेत. बोला काय करायचंय?"
"ती मुद्रा लोन स्किम आली आहे. दहा लाखांचं लोन मिळतंय त्यात. प्रोजेक्ट रिपोर्ट करा तयार."
"मला माहित आहे ती"
"आपला एक कॉन्टॅक्ट आहे सुरत ला. लोन पास करून देतो. पण दहा हजार लागतील. ते तयार असतील तर चला आमच्याबरोबर. आम्ही आज रात्री निघतोय, गुजरातला."

तर मंडळी, ह्या वाक्यावर तुमच्या मनात जेवढे प्रश्न आले असतील तेव्हढेच किंबहुना जरा जास्तच माझ्या मनात आले. जास्तच कारण ही जी दुसरी व्यक्ति बोलत होती तीला मी 'चांगलाच' ओळखून होतो. ही व्यक्ती आहे प्रविण रेडकर. एक पार पोचलेला माणूस आहे. शेतीउत्पादनासंबंधी सरकारी कार्यवाही सुरु झाल्यावर चोविस तासात केंद्रिय मंत्र्याला भेटून आवळलेला सरकारी फास ताबडतोब सैल करण्याइतका पोचलेला. प्रचंड हुशार, वेगवान, व्यवसायातली व हितचिंतकांपासून हितशत्रूंपर्यंतची इत्थंभूत खबर ठेवणारा, पाताळयंत्री, टोप्या घालण्यात वस्ताद, माणसांची पारख उत्तम असणारा पण हाताच्या खालच्या माणसांची काळजी घेणारा, माणसे जपण्याचे स्पेश्यल स्किल ठेवणारा. असा हा विविधांगी माणूस. ह्याच्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि कोणत्या ठेवू नये याचा मला अजूनही अंदाज आलेला नाही. कारण ह्याने आजवर मला कोणतीही गोष्ट करतांना शेवटपर्यंत काहीच सांगितलेलं नाही. अगदी साधे प्रॉडक्ट डीझाईन करतांनाही. तर मंडळी लक्षात आले असेलच, हा माझा एक क्लायंट, दिड-दोन वर्षांपासूनचा. त्याचे असं वागण्याचे कारण व्यवसायातली तीव्र स्पर्धा आहे. पण आता त्याचा तो स्वभाव झालाय. चार-पाच कोटींचं टर्न-ओवर असेल ह्याच्या दोन-तीन कंपन्यांचं. बघा, खरंच ह्याच्याबद्दल मला काहीच फिक्स माहित नाही.

असा माणूस मला असं काही सांगतोय तर ते तितकं 'सरळ' नाही हे तर सरळंच आहे.

"काय साहेब, अहो काय विचार करत आहात, फटाफट बोला. आहेत का दहा हजार. आजच निघायचं आहे. सहा वाजता."
"नाही, पण कोण आहे, काय आहे. डिटेल सांगा जरा "
"तुम्ही फक्त दहा हजार देणार की नाहि तेवढं सांगा, काम होईल ह्याची मी खात्री देतो"

समोरचा व्यक्ती पाहून मी काहिच बोलू शकत नाही. पण हे जरा चमत्कारिक होत चालले आहे हे मात्र खरे. मी पण म्हटलं बघूया काय गंमत आहे. मी म्हटलं "ओके." तो म्हणाला "ठिक आहे, तुम्ही सात वाजता परत ऑफिसला या आपण इथून सोबतच निघू." मी म्हटलं "ठिक आहे."

"तिकडे आणखी एका देवस्थानीही जायचंय, लाखो लोक येतात दर महिन्याला. चार किलोमीटर लांब लाईन असते लोकांची. तुम्ही चला आमच्या बरोबर, तुम्हालाही प्रचिती येईल. याल ना?"
"अच्छा. हे काय आता नविन?"
"तुम्ही चला हो, तिकडे गेल्यावर कळेल तुम्हाला, सगळे प्रश्न सुटून जातील तुमचे, जे काही फायनान्शियल आहेत ते, सुख-समृद्धी येईल भरभरून, मी तुमच्याशी कशाला खोटं बोलेन. तिकडे गेल्यावर मी सांगतो तेवढी गर्दी नसेल तर मग मला म्हणा की मी खोटं बोलतो... कोणालाही असं तिकडे जायला मिळत नाही. नशिबवान आहात म्हणून आज तुम्हाला आमच्यासोबत यायला मिळतंय. नाहीतर माझ्यासोबत तिकडे यायला खूप लोकं तयार आहेत. पण मला त्या लोकांना घेऊन जायचं नाही. तुम्ही चला..."

"ओके..."

"मी सांगतो तसं करा. घरून निघतांना सोबत एक जुना ड्रेस, घ्या. तिकडे सोडायला लागतो, वर तुम्हाला जे काय जुनं-पुरानं आणायचं असेल ते, दारिद्र्य थांबून राह्यलंय असं वाटणारं काहीही..."
"........"
"अजून एक, घरून निघतांना सगळ्यांच्या पाया पडा, अगदी बायको-मुलांच्याही. वैनींना सांगा की तुम्ही गेल्यावर सगळा केर काढ घरातला. परत आल्यावर जाळून टाकायचा."

हे अजून अजून विण्टरेस्टींग होत चाललंय... कोणतं मंदिर आहे जे इतकं फेमस आहे आणि सालं आपल्याला माहित नाही. म्हटलं जौच या राव. ह्या निमित्ताने ह्या लोकांमधे जरा मिसळायला मिळेल, यांचे अंतरंग कळतील. आपला जो छंद आहे 'माणसे निरखण्याचा' तोही होऊन जाईल. नवीन ठिकाण बघायला मिळेल, जरा भटकंती होइल. काय २४ तास सालं लॅपटॉपसमोर बसायचं....

मी म्हटलं "ठिक आहे, येतो मग मी सात पर्यंत इकडे"
"इकडे परत ऑफिसवर नका येऊ. असं करा, तुम्ही घरी पोचा. मी इकडून निघतो, कारण तुम्ही तयार होऊन येणार, त्यानंतर आपण निघणार, मग मी तयार होणार, बाकीचे मंडळी घेत घेत आपल्याला खूप उशिर होइल. त्यापेक्षा तुम्ही तुमची कार घेऊन लोखंडेच्या घरी जा, ती तिथे पार्क करा. लोखंडे त्याची वॅगन-आर घेऊन तुम्हाला माझ्या घरी घेऊन येईल. मग आपण सगळे एकत्र निघू."

मी म्हटलं "ओके.... अ‍ॅज यु से सर..."

माझं घर लोखंडेच्या घरापासून दहा किमीवर आहे, तिथून रेडकरचं घर पंचवीस किलोमीटरवर आहे. मला माझ्या घरी पोचून माझं आवरून लवकरात लवकर लोखंडेच्या घरी पोचायचे होते. आणि ऑफिसातच सहा वाजले होते. घरी पोचून तासभर जाणारच होता. रेडकरने मला सातला त्याच्या घरी पोचायला सांगितले होते. घड्याळ ह्याच्या तालावर चालतं म्हणून....

मी घरी पोचलो, आधी लोखंडेला फोन लावला. हा लोखंडे ह्या कंपनीतला एक हुशार सेल्समन आहे. प्रॉडक्ट नॉलेज आणि प्लेसमेंटमधे चतुर. पण दुर्दैवाने अजून फारशी प्रगती नाही. ह्याच्या अधून-मधून स्वतःची कंपनी काढण्याच्या कल्पना उसळी मारत असतात. मग तो मला रात्री चार-पाच बीअर झाल्यावर फोन लावतो.

"साहेब, आपल्याला एक झकास लोगो बनवून द्या."
"बरं..."
"बरं नाही. उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत फायनल करायचा आहे. उद्याच कंपनी रजिस्ट्रेशनला टाकतो."
"बरं... मिळाला का फायनान्सर?"
"तुम्ही ते सोडा हो, तुम्ही फक्त एक इंटरनॅशनल लोगो बनवा, तुमच्या स्टाइलने, तुमचं पेमेंट उद्याच कॅशमधे करून टाकतो..."
"बरं..."

हे साहेब आमच्याच भागातले. ह्या साहेबांच्या न उगवलेल्या कंपनीचा एक लोगो बनवून तयार आहे. रजिस्ट्रेशन ऑफिसपर्यंत पोचू शकली नाही कंपनी अजून...

त्याचे इतरही अनेक जणांशी, कंपन्यांशी संधान बांधण्याचे प्रयत्न सुरु असतात. मला त्यांचे डिझाइन व प्रिटींगचे काम त्याला द्यायचे असते. त्यातल्याच एका पार्टीशी आम्ही दोघे आज रात्री भेटणार होतो. तो हे सगळे रेडकरपासून लपून करतो हे सांगणे न लगे. मी सुद्धा व्यवसाय-नीती पाळून इकडच्या खबरा तिकडे जाऊ देत नाही. तरी रेडकरचे नेटवर्क स्ट्राँग असल्याने त्याच्यापर्यंत बातम्या पोचतात. माझ्या-त्याच्या एका दुसर्‍या कंपनीशी झालेल्या अशाच एका व्यवहाराची बातमी व्यवहार व्हायच्या आत रेडकरपर्यंत पोचली होती. मला काही इशू नव्हता पण लोखंडे कंपनीचा नोकर असल्याने जाम लटकला होता. तेव्हापासून आम्ही जपूनच पावले उचलत होतो.

तर, त्याला आता फोन लावला, "काय लोखंडे, काय करायचं आजच्या मीटींगचं..?"

"अहो, आज मीटींग होणार नाही. मला रेडकरने गुजरातला जाण्यासाठी बोलावलंय.. आपण नंतर बघू... "

मी काही बोलण्याच्या आत फोन कट झाला. म्हणजे ह्याला मी येणार हे माहित नव्हते तर...

पाच मिनिटात त्याचाच फोन परत आला.

"अहो, आताच साहेबांचा फोन आला, ते म्हणाले तुम्हीपण येणार आहे... मला माहितच नव्हतं. मी आपला तुम्हाला फोन करून 'मी चाललो' म्हणून सांगणार होतो. तर तुम्हीही.... वा वा! पण मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही भेटा मग बोलू..."

"ओके... तुमच्याकडे पोचतो साडेसातपर्यंत..."

__________________________________________________

"साहेब, कुठे पोचले...?" रेडकरांचा फोन.
"अहो अजून घरातच आहे.."
"का बरं...?"
"आल्यावर सांगतो"
"लवकर या. त्या लोखंडेला एक काम सांगीतलंय येता येता करायला. त्यालाही वेळ लागेल, तुम्ही लवकर निघा म्हणजे वेळ वाचेल सगळ्यांचा..."
"ओके."

लोखंडेचा फोन लगेच,
"का हो निघाले का...?"
"बस कपडेच घालत आहे"
"म्हंजे अजून घरातच काय... काय बावा, थे रेडकरने पेट्या घ्याले सांगीत्ल्या हायेत, आता अथून च्यामारी थ्या गोडाऊनले जा, तथून पेट्या घ्या, थ्या तिकडे लोहनेरेले द्या. अकाद हाय मायबहिन... किती वाजन आपल्याले निंघ्यालेच..."
"तुम्ही फोन ठेवाल तर मला जरा लवकर निघता येईल.. नै का?"
"......."

---------------------------------------------

मी आज दिवसभर जेवलोच नाही हे कळताच बायकोने बळजबरी ताटावर बसवले होते. आधीच वेळ झालेला त्यात गरमागरम जेवण समोर. द्विधा मनस्थिती ओळखून बायकोने दटावलेच. "आधी जेवण करा मग पुढे कुठे जायचे ते जा... उपाशीपोटी घराबाहेर पडायचे नाही"

मनसोक्त जेवलो. पटापट आवरले. जुने कपडे घातले, सोडून देण्यासारख्या दोन चप्पल होत्या. नेमकं ठरत नव्हतं कोणती सोडायची ते. एक घातली, एक परतीसाठी सोबत पॅक करून घेतली. सगळ्यांच्या पाया पडलो, सूचना दिल्या आणि बाहेर पडतांना लोखंडेचा परत फोन...
"अरे देवा... निघालो ना बाप्पा."
"ठिक आहे, मले जत्रा हटेलजोळ भेटजा. तथी आले की कॉल करा. मी येतोच."

-------

घड्याळात ७ वाजून ४८ मिनिटे झाली होती जेव्हा मी कार सुरु केली. ७ वाजून ५३ मिनिटाला रेडकराचा फोन.

"कुठे पोचले..."
"द्वारका होटेल.."
"लवकर जरा... तो लोखंडे वाट पाहतोय."
"अहो पाच मिनिटात तिथे पोचतो..."
"बरं.... या लवकर."

---------

दहा किलोमीटरचे अंतर भर आठ वाजताच्या रहदारीतून शहराच्या मध्यभागातून पार करायला किती वेळ लागावा...?

फक्त दहा मिनिट. हे नाशिक आहे भाऊ... इथे तुम्ही कोणालाही 'ट्रॅफिकमधे फसलोय' हे कारण देऊ शकत नाही. तर मी जत्राला दहाव्या मिनिटाला हजर होतो. लोखंडेला कॉल लावला. साहेब म्हणाले बस दोन मिनिटात आलोच. दोन मिनिटाचे पंधरा मिनिट करून साहेब उगवले. मग त्यांच्या मागे मागे त्यांच्या घरी गेलो. कार पार्क केली. घरच्यांशी ओळखपाळख वैगेरे सोपस्कार आटोपून आम्ही लोखंडेच्या वॅगनार मध्ये घुसलो. आणि अचानक मला कुठल्यातरी भंगार थेटरमधे आल्यासारखे वाटले. तंबाखू, दारू आणि इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुवास हे शिनुमा थेटरचेच म्हणून ओळखले जातात ते मी त्या नव्या कोर्‍या वॅगनार मध्ये भोगत होतो... अजून ह्या वासात किती काळ घालावायाचा कुणास ठावूक.

दोन वळणे घेऊन आम्ही आता हायवेला लागणार तोच लोखंडे बोलला, "साहेब, बीअर घेणार काय?"
"नको हो, आता अजून आपण निघालोही नाही व्यवस्थित. मुक्कामास पोचून करण्याच्या गोष्टी सुरुवातीसच....?"
"काही होत नाही. आपण रात्री बाराशिवाय काही गुजरातच्या रस्त्याला लागणार नाही, लिहून घ्या. दोन बीअर मारल्याशिवाय मला जमायचे नाही."
"तुम्ही घ्या, मला नको."

त्याने कडेलाच थांबवून दोन बीअर घेतल्या. गाडी चालवता चालवता रिचवायला सुरुवात केली.

(वाचकांना नम्र सूचना: येथून पुढे नियमबाह्य, कायदाबाह्य, घटनाबाह्य, नैतिकताबाह्य बरंच वाचायला लागणार असल्याने थोडावेळ आदर्शवाद बाजूला ठेवणे Wink )

"पण मला एक प्रश्न पडलाय, साहेब, कि हा तुम्हाला का सोबत घेऊन चालला आहे. असा तसा तर काय कोणालाही सोबत घेत नाही. तुम्ही जरा विचार करा. पण धंद्याचं गणित रेडकरले जेवळं माहित हाय तेवळं कोनालेच मालूम नायी. त्याच्या बरोबर काम कराची एक अल्लगच मजा आहे. रेडकरसोबत आपली नाळ जुळेल आहे, बाकी कोणासोबत जमतंच नै. माणसाने हुशाराचा गुलाम व्हाव पण बेकूफाचा मालक हो नौय.

पण सालं तुमाले काऊन संग घेतलं हे काय माल्या डॉक्यात नाय येऊन रायलं बॉ."

"अहो, तुम्ही इतके वर्ष त्यांच्या सोबत आहात, तुम्हालाच जास्त कळत असेल, नाही का...? तुम्हीच सांगा काय झोल आहे ते" इति मी.

"आपलं तर काय दिमाग काम करून नै रायला बावा."

आम्ही गोडाऊनसाठीच्या रस्त्याकडे वळलो. आता हायवे सुटला. निर्जन, शांत रस्ता. अमावस्या होती. गाडी गोडाऊनच्या दिशेने घातली. तिकडे कुणीही काळं कुत्रं नव्हतं. असतं तरी दिसलं नसतं म्हणा कारण अंधारच इतका होता तिथे. गोडाऊनवरून माल घ्यायचा, पण इथे कोणीच नाही. कुणीतरी फिरकी घेतल्यासारखे वाटले.

ह्याने दोन-तीन फोन लावले. तसे एका स्टोअरचे शटर उचलले गेले. लाईट लागला.. दोन-तीन टपोरी-छाप दिसणारी पोरं बाहेर आली. त्यांना सूचना दिल्या गेल्या. पटापट बॉक्सेस वॅगनारच्या मागच्या सीट्सवर ठेवल्या जाऊ लागले.

मी खाली उतरलो. वर आकाश निरभ्र. चांदण्या तर इतक्या खाली आल्या होत्या जणू हाताने खुडून घ्याव्या... पण हात भाजेल म्हणून तो विचार सोडून दिला. कोण म्हणतं अमावस्येला चंद्र नसतो, हे काळभोर अवाढव्य आभाळच तर अमावस्येचा चंद्र आहे, इतकं भव्य, आणि सुंदर. त्या काळ्यातही किती लाख छटा. नुसता त्या काळाभोर आभाळाकडे पाहत राहिलो. आपलं क्षुद्रपण जाणवायला लागतं मग. त्या चांदण्याही छोट्या वाटत नाहीत मग. ते तारे भले इवलेशे, पिटूकले दिसू देत, पण तेवढ्याशा प्रकाशाच्या किरणांतूनही आपली लाखो किलोमीटरचा परिघ असलेली भव्यता ते आपल्यापर्यंत पोचवत असतात.

वॅगनारमधे बसलो, बारावा बॉक्स बसत नव्हता. माझी सीट पुढे करायला लागली, सर्व पंधरा बॉक्सेस नीट बसले आणि मी मात्र सोळावा बॉक्स असल्यासारखा त्या उपलब्ध जागेत अॅडजस्ट झालो. फार दूर नव्हते जायचे, फक्त अजून दहा मिनिटे बस...

निघालो, कुठल्यातरी बॉक्समधून लिकेज होत असल्याची शंका लोखंडेने बोलून दाखवली. एवढ्या भयंकर वासात त्याला क्षुद्र केमिकलचा वास आला ह्याबद्दल मला आश्चर्य वाटत होते.

परत हायवेला टच झाल्या झाल्या रेडकरचा लोखंडे ला फोन..
"हेल्लो, हां, बोला साहेब.."
"----------"
"ठिक आहे, बरं बरं, बघतो."

त्यांच्या संभाषणात कुठल्यातरी बेकरीचा पत्ता, ब्राऊन ब्रेड, हिरवी चटणी असे काय काय उल्लेख होत होते. संभाषण संपले.

"सांगा आता काय करू. आता ते ओझरले जायचे, ते कोणती बेकरी होय ते शोधाची, तिथून ते ब्रेड पायजेत कोनते तर ते घ्याचे, थे कोणती हिरवी चटनी भेटते दुसर्‍या दुकानात ते पाह्याची. हे एवळं वजं घेऊन आता ओझरच्या बजारायनी हिंडायचं, आता टाईम काय झाला."

"मग सांगा ना, 'जमणार नाही' म्हणून.... सरळ तोंडावर"

"नाही हो, तो माणुस चांगला आहे हो, चला पाहू आता ओझरले कोणतं दुकान उगळं हाये तर"

"--------"

दोनचार लॉग-कॉल नंतर आम्हाला ते विशिष्ट दुकान सापडले. एकातून ब्रेड, दुसर्‍यातून चटणी, तिसर्‍यातून अजुन काही. असा जामानिमा लोखंडे गोळा करत होता तोवर मी मोबाईलवर खेळून घेतलं. तो परत आला, आम्ही परत निघालो. आता बस अजून पंधरा मिनिटे, बॉक्सपॅकींगमधे. त्यात रीलीफ ऑनलाईनचाच.

यथावकाश पिंपळगावमधे पोचलो, साहेबांच्या बिल्डींगसमोर गाडी लावली. एन्डेवर आत पार्कींगमधे लागली होती. म्हणजे आम्ही आज एन्डेवरने जाणार नाही हे निश्चित झाले. तसा लोखंडेचा चेहरा खुलला.

"म्हणजे आपल्याले सदाशेठच्या स्कॉर्पीओतून जा लागीन वाट्टे, बरं आहे तिच्यामायले. ह्या एन्डेवरचे लाईट बरबर नाहीत, दूरचं दिसत नाही. घाटात चालवायले लय प्रॉब्लेम. आपण तर मस्त बॅकसीटले ताणून देणार बॉ, ते तुम्ही अन् बाकीचे पाहून घ्या कोण कधी चालवीन ते."

स्कॉर्पीओ तिथे नव्हती. अजुन एक वॅगनार होती रमेशभाऊंची. दोन्ही वॅगनार एका महिन्याच्या अंतराने घेतलेल्या त्यामुळे नंबर सोडला तर दोहोंत काही फरक नाही. मी, लोखंडे पहिल्यासारखेच. बाकी रमेशभाऊ, पंढरीनाथ आणी रेडकर दुसर्‍या वॅगनार मधे बसले. आम्हाला पुढे जायला सांगीतले कारण लोडेड वेहिकल होती.

आम्ही निघालो. दहा-बारा किमी पुढे आल्यावर एका ठिकाणी एक वॅगनार पुढे जाऊन हायवेवरून खाली उतरली, ती रमेशभाऊंची वाटल्याने आम्ही तिला फॉलो केले. पण ती भलतीकडेच वळल्याने आमचा वेळ गेला. थोड्यावेळाने आम्ही सदाशेठची स्कॉर्पीओ जिथे होती तिथे पोचलो. लोखंडेचे परत बीअर घेण्याचे चालले होते, मी त्याला नको म्हणत होतो कारण वेळ नव्हता आता. तो म्हणत होता, दहा मिनिटात होऊन जाईल. तेवढ्यात मागून स्कॉर्पीओ आली, रेडकर लोखंडेला झापत होता, “अरे तुम्हाला पुढे जा म्हटलं तरी का थांबून राह्यलाय... तुमच्याकडे लोड आहे, तुमच्यापेक्षा आम्ही फास्ट जाऊ शकतो. तुम्हाला वेळ लागेल."

मला अजूनही कळत नव्हते मी बॉक्सपॅकींगमधून कधी अनबॉक्स होणार आहे. ही रात्र संपायचे नाव घेत नव्हती. अकरा वाजले होते. आम्ही नाशिकपासून फक्त चाळीस किमी दूरपर्यंत पोचलो होतो. लोखंडेची भविष्यवाणी खरी होत होती.

सुरतची सूरत एवढ्यात दिसणार नाही एवढेच आतापावेतो कळले होते.

............................

क्रमशः

(पुर्वप्रकाशित. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. लेखकः संदीप डांगे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मायबोलीकर मंडळींनो!

माझे मायबोलीवर हे पहिलेच पदार्पण. आपण सर्व सदस्य मार्गदर्शन कराल अशी आशा करतो.

धन्यवाद!

डांगे अण्णा...
कथा जबरी वेगवान आहे...
यापूर्वी वाचलेली नव्हती....
आता इथेच फॉलो करतो...
Happy

सर्व प्रतिसाददात्यांना धन्यवाद!

सगळे भाग तयार आहेत. शेवटचा सोडुन! Wink

(एक प्रश्नः मायबोलीवर एकाच लेखकाच्या दोन धाग्यात किती दिवसांचे अंतर (अर्थात अनॉफिशियली) अपेक्षित असते?)

एक प्रश्नः मायबोलीवर एकाच लेखकाच्या दोन धाग्यात किती दिवसांचे अंतर (अर्थात अनॉफिशियली) अपेक्षित असते?
==> ० (शुन्य

नाना,

इथे तिकडच्यासारखी रॅगिंग होत नाही.

अन तुम्ही एकाच दिवसात सगळे भाग टाकून मोकळे झालात तरी तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही, उलट सलग वाचायला मिळालं म्हणून धन्यवाद देतील लोक.

ग्रेट स्टार्ट
मजा आली, पुढच्या अर्ध्या तासात (झोपेची वेळ) होतील तितके भाग वाचणारच

मी सगळे म्हणजे -सहा -- भाग "शोध मायबोलीवर शोधा ( म्हणजे सापडेल ) " जाऊन वाचले. अप्रतिम लिखाणमुळे उत्कंठा वाढत गेली आणि पाच भाग वाचून झाले. सहाव्या भागात मात्र -कॉलेज मध्ये असताना आपण म्हणायचो ते झाले .धोका ! सगळे मिळून हे सुंदर प्रवास वर्णन आहे. अशी लेखकाने माझी टोपी उडवली !

सगळे म्हणजे -सहा -- भाग "शोध मायबोलीवर शोधा ( म्हणजे सापडेल ) " जाऊन वाचले. >> एवढा खटाटोप कशाला करायचा ? सरळ ऑथर प्रोफाइल लिंक (maayboli user number) / created असे टाकले की सगळे लेखन दिसते मग भले तो आयडी जीवात्मा असो की हुतात्मा !

सुरुवात तर मस्त झालीये ... तुम्ही नाशिकचे का हो... सगळ्या जागा एकदम बरोबर सांगितल्या आहेत

अज्ञानी
मी एवढा पण अज्ञानी नाही .
हे पहा मला काय मेसेज मिळाला

" हे पान पहायची परवानगी नाही.
Submitted by webmaster on 18 July, 2010 - 20:15
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही."
माझे काही चुकले असेल तर अवश्य सांगा
आपण सजेस्ट केलेली पद्धत कशी वापरायची ते मला माहित नाही
हा , तेव्हढा मी अज्ञानी आहे हे कबूल .
जाउदे. कुठल्याही मार्गाने जा . परमेश्वर भेटला हे महत्वाचे .
<,<<<मिपावर वाचतोय तुमची मालिका Happy
७वा भाग कधी पोस्टताय

Submitted by संदिप एस on 9 February, 2016 - 09:27>>>
ही बाकी शाल जोडीतून . एकदम पटली. खरच भाग सात असायला पाहिजे कुठतरी

जीवात्मा https://www.maayboli.com/user/74972

लेखन बघायला ह्या प्रोफाइल लींक पुढे /created असे शेपुट लावलं की झालं

हुतात्मा प्रोफाइल साठी -- तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही-- असे दिसले तरी प्रोफाइल लिंक https://www.maayboli.com/user/58420 ह्याच्या पुढे created शेपुट लावून हे असे सोप्पे काम होईल -
https://www.maayboli.com/user/58420/created

काही चुकलं तर क्षमा असावी प्रभू _/\_ Wink

अज्ञानी
तुम्ही कसले क्षमा ,मीच क्षमा
थंक्स फॉर द डोस!!!! औषध कडू असले तरी आनंदाने प्यालो.
माझा "कर्म " योग होता. आपण दाखवलेला ज्ञानयोग आहे.
पुन्हा एकदा आभार !!!!