अंतरंग - भगवद्गीता - भाग ५

Submitted by शीतल उवाच on 20 June, 2020 - 08:41

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय. इतकं पुरे होईल!!”

मागेल ते देण्याची तयारी दाखवणा-या जगजेत्त्या राजाला तो तत्त्वज्ञ नक्की काय सांगतोय….? तेच जे कृष्ण अर्जुनाला सांगतोय.

शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.

कसे आहे आत्म्याचे स्वरूप..

सांख्ययोगाच्या १७ व्या श्लोकापासून पुढे आत्म्याच्या स्वरुपाचे वर्णन श्रीकृष्ण करतो.

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।२।।२०।।

हा (आत्मा) कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन(अनादी) आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।२।।१७।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२।।२२।।
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२।।२३।।

आत्मा हा अविनाशी, शाश्वत, आणि सर्वव्यापी आहे. (श्लोक १७) तो ना जन्म घेतो ना नष्ट होतो. नष्ट होते ते शरीर. आत्मा नष्ट होत नाही, नष्ट करता येत नाही. शरीर नष्ट झाले की आत्मा दुस-या शरीरात प्रवेश करतो. जसे माणूस जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो.(श्लोक २२, २३)

तात्पर्य काय तर अज, नित्य, शाश्वत, पुराण अशा विशेषणांनी युक्त आत्मा देहामध्ये वास करून राहतो. देह, मग तो कोणताही असो जन्म, वाढ, वृद्ध्त्व आणि मृत्यु अशा अवस्थातून जातो. परंतु आत्म्याच्या स्वरूपात असे बदल घडत नाहीत. तुटणे, झिजणे, जळणे, बुडणे अशा अनेक अवस्थातून शरीर जाते याला विकार म्हणतात आत्म्याला विकार नसतात. शरीर एक दिवस नष्टही होते, आत्मा नष्ट होत नाही. तो केवळ दुसरे शरीर धारण करतो.

अशा प्रकारे मायावी सृष्टी आणि अविकारी आत्मा यांचे स्वरूप श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो.

पण मग शोक करायचा नाही हे जरी पटले तरी संहार करण्याच्या पापाचे काय? भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का? असा प्रश्न उरतोच.

श्लोक ३१ ते ३९ पर्यंत श्रीकृष्ण स्वधर्म पालनाचे महत्व सांगतो. धर्माची आणि सत्याची बाजू राखण्यासाठी युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे. त्यासाठी करायला लागणा-या हानीत पाप नसते कारण ते धर्मपालनासाठीच असते. साधे उदाहरण घेउ यात. देशाच्या रक्षणासाठी शत्रुसैन्याशी सीमेवर लढणा-या जवानाला आपण पापी मानत नाही कारण देशाच्या, पर्यायाने समाजाच्या भल्यासाठी केलेले ते कर्तव्यपालन आहे, हत्याकांड नव्हे!

राज्याच्या हव्यासापोटी द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत अधःपतन झालेल्या राजकुळाला आणि हे घडू देणा-या समाजाला पुन्हा योग्य राज्यसंस्था देणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यासाठी युद्ध करणे हे पाप नाही. याउलट सर्व मार्ग संपल्यावरच जे युद्ध उभे राहीले आहे त्यापासून दुर जाणे हे पाप ठरेल. युद्धापासून पळ काढल्याने समाजात अवहेलना होईल आणि समाजामध्ये चुकीचे आदर्श उभे राहतील. समाजाला योग्य दिशा देणारे वर्तन करणे भावी शासकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रसंगी जर युदध करावे लागले तर ते कठोरपणे करणेच योग्य आहे. त्यावेळी क्षत्रियाने सामुहिक हिताऐवजी वैयक्तीक नातीगोती पाहून कमकुवत होणे हे पाप आहे. हे झाले अर्जुनाच्या दुस-या शंकेचे उत्तर.

सृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचे स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म याच्या चर्चेतून श्रीकृष्ण अर्जुनाला हे पटवून देतो की – दुर्योधन, दुःशासन किंवा तो स्वतः या केवळ योग्य किंवा अयोग्य मनोवृत्ती आहेत. समाज कधी योग्य तर कधी अयोग्य मनोवृत्तींकडे झुकत असतो. कधीतरी अयोग्य बलवान असते आणि समाज त्यामागे धावतो. जसे आजही दुर्योधनाच्या मागे ११ अक्षैहीणी सैन्य आहे पुढे जेव्हा अर्जुन, पर्यायाने पांडव विजयी होतील तेव्हा ते योग्य मानून समाज त्याच्या मागे धावेल. जसे सृष्टीतील सुख, दुःख,स्पर्श, रस, गंध आणि शरीरही नाशवंत आहेत तसेच योग्य आणि अयोग्य वृत्तीही नाशवंत आहे. कारण त्या वृत्ती जपणारे माणसाचे मन चंचल असते. आज जे योग्य आणि हवेसे वाटते ते त्याला उद्या अयोग्य आणि नकोसे वाटू शकते. या मनाच्या चंचलतेवर विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण एकदा मन स्थिर झाले की मग ते योग्य तेच पाहते आणि योग्य तेच करते. हे मनाचे स्थैर्य म्हणजे अर्जुनाच्या शंकेचा तिसरा भाग. कारण अर्जुनाचे मन स्थिर झाले की त्याला युद्ध योग्य की अयोग्य तेही कळेल आणि योग्य ते तो ठामपणे करूही शकेल. किंबहुना मन स्थिर झाले की सर्व प्रश्नच सुटतील आणि आत्मसुखही साध्य होईल हेच कृष्णाला पटवून द्यायचे आहे. तुकोबा म्हणतात तसे –

मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धिचे कारण।।

गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संदर्भात एक कथा सांगतात. जंगलातून प्रवास करत असताना ते एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील…”

संन्यस्त आणि गृह्स्थ हे मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन स्थिर असते तो गृहस्थ असूनही संन्यस्त असू शकतो आणि ज्याचे मन स्थिर नाही तो संन्यस्त गृहस्थच राहतो.

स्थितप्रज्ञ……… प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर/ठाम. ज्याची बुद्धी स्थिर असते तो स्थितप्रज्ञ. ज्याच्या विचार आणि कृतीमध्ये द्वैत नसते तो स्थितप्रज्ञ.

दुस-या अध्यायाच्या ५४ व्या श्लोकापासून स्थितप्रज्ञाचे वर्णन येते. मनाची स्थिरता प्राप्त असणारा आणि बुद्धीयोगाने कर्म करणारा स्थितप्रज्ञ असतो कसा? याचे कुतुहल अर्जुनाला असते. तो कृष्णाला विचारतो आणि कृष्ण त्याचे वर्णन करतो

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २।। ५६ ॥

दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.

हे वाचायला जितके सोपे तितकेच आचरणात आणण्यास कठीण आहे. कारण

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२।। ६० ॥

दुःखाच्या प्रसंगी खेद न वाटता राहणे एकवेळ शक्य आहे परंतु सुखाची इच्छा न करणे अवघड नाही का? माणसला दुःख टोचते म्हणून नको असते पण दुःखाबरोबर सुखही क्षणिक आहे म्हणून ते ही टोचावे आणि नको वाटावे अशा मनस्थिती प्राप्त करणे सोपे नाही. कारण अर्थातच बलवान अशी इंद्रिये माणसाच्या मनाला निरनिराळ्या मोहाच्या मार्गाने खेचत असतात.

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥२।। ५८ ॥

कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो.

म्हणूनच सर्वसामन्य माणसाला भूरळ पाडणारे मोह त्याला बाधत नाहीत. त्याचे मन आणि शरीर केवळ एकाच विचारात मग्न होते, ते म्हणजे शाश्वत आनंद जो क्षणिक सुख आणि दुःख यांच्याही पुढील पातळीवर असणारा मोक्ष आहे.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥२।।६४ ॥

परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.

अशा स्थितीला श्रीकृष्ण ब्राह्मी स्थिती म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची स्थिती म्हणतो.

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥२।।७२ ॥

उपसंहार

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेचा अद्धितीय ठेवा आहे कारण गीतेशिवाय इतर कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेख येत नाही.

गीतेच्या अंतरंगात डोकावल्यास असं लक्षात येतं की दुसरा अध्याय हा गीतेचा तत्त्वज्ञानातील पहीला अध्याय आहे आणि गीतेचे संपुर्ण सार सांगणारा अध्याय सुद्धा आहे. अर्जुनापुढे उभ्या असणा-या प्रश्नांचा रोख हा केवळ युदधाकडे नसतो तर अर्थातच शाश्वत आनंदाकडे असतो. या एका अध्यायातून श्रीकृष्ण त्या प्रश्नाचे समाधान उभे करतो.

शाश्वत सुख हवे तर, या सृष्टीत शाश्वत आणि क्षणिक काय आहे ते जाणले पाहीजे. सांख्य मतानुसार दृष्य सृष्टी ही क्षणिक आहे तर आत्मा शाश्वत आहे.

क्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत त्या क्षणिकातून बाहेर येत नाही तो पर्यंत शाश्वत सुख मिळणार नाही. क्षणिकातून बाहेर येणे म्हणजेच क्षणिकात गुंतवणारे सुख आणि दुःख यातून बाहेर येणे.

सुख आणि दुःखातून बाहेर येणे म्हणजेच हर्ष आणि शोक दोन्हीकडे समभावाने पहाणे आणि त्याचा त्याग करणे. समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा.

इंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.

ही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.

ज्याची बुद्धी स्थिर असते तो सुखी होतो कारण ते सुख आपल्यात असते, बाह्य पदार्थात नसते हे त्याला उमगलेले असते. मग त्याच्या कर्माची फळे त्याला बाधत नाहीत. सुख आणि दुःख दोन्ही त्याला उपभोगता येतात आणि त्यांच्या पलिकडेही जाता येते.
जसा भक्त आणि भगवंत एक होतो तसा ब्राह्मी स्थितीत गेलेला व्यक्ती परमानंदी लीन होतो.

असा मनोविजय मिळविणा-याचा आनंद पाडगांवकरांच्या एका कवितेतून तंतोतंत व्यक्त होतो.

आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी ।अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो।।
फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग ।आज अवघे अंतरंग ओसंडले हो।।
मिटूनही डोळे दिसू लागले आकाश ।आज सारा अवकाश देऊळ झाला हो।।
काही न बोलता आता सांगता ये सारे । आतली प्रकाशाची दारे उघडली हो ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच आवडले.
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो......
संसारात दुःखानंतर सुख व सुखानंतर दुःख येतच असते. पण आपण दुःखात असताना सुखाची वाट पहातो आणि सुखात पूर्णपणे विसरून जातो की "हेही दिवस जातीलच" !
सतत होणाऱ्या स्थित्यंतरामुळे हा संसार अनित्य/अशाश्वत आणि म्हणूच मिथ्या / असत्य आहे. ज्याला हे जाणवले तो स्थितप्रज्ञ Happy !
तुम्हाला खूप शुभेच्छा.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो...... >>> पटतंय.. पण असे झाले तर निष्क्रियता नाही येणार का.. किमान अन्याय होत असेल तर राग येऊन त्याचा प्रतिकार झालाच पाहिजे.. गृहस्थ असेल तर कुटुंबीयांसाठी तरी सुखप्राप्ती होईल असे वागणे गरजेचं आहे ना..

खूप छान लेख. असेच लिहीत राहा.
--------------------------------------------
पण असे झाले तर निष्क्रियता नाही येणार का>>>>> चांगला प्रश्न आहे. निष्क्रियता म्हणजे कर्म त्यागण्याकडे कल असणे. परंतु सुख आणि दुःख यांची इच्छा न करणे म्हणजे कर्म त्यागणे नव्हे. तर जे कोणतेही कर्म करू त्याच्या फळाबद्दल चिंता न करणे. थोडक्यात कर्मात आसक्ती न ठेवता आणि गुंतून न राहता कर्म करणे. कर्म, अकर्म, फार्मफल, कर्मसंन्यास ह्याविषयी मार्गदर्शन श्रीकृष्ण गीतेत ३ऱ्या आणि ४ थ्या अध्यायात करतात.

इच्छा न करणे म्हणजे कर्म त्यागणे नव्हे. तर जे कोणतेही कर्म करू त्याच्या फळाबद्दल चिंता न करणे.

>>

अच्छा. पण फळाची अपेक्षाच नसेल तर कर्मावर निश्चितच परिणाम होणार ना. उत्साहच टिकून राहणार नाही.. मला खरंच गीता जाणून घ्यायची आहे म्हणून विचारतेय..

'कर्मण्येव अधिकार: ते' ह्याच्या पुढे 'मा ते संग: अस्तु अकर्मणि' हे देखील (थोडेसे दुर्लक्षित) वचन आहे. 'काहीच न करण्याकडे तुझा कल असता कामा नये' असे कृष्ण खडसावून सांगतो आहे. अर्जुनाला त्याच्या मर्यादांची जाणीवही तो स्पष्ट शब्दांत करून देतो. अर्जुनाचा अधिकार फक्त योग्य कर्म करण्याचा. त्याचे परिणाम कोणते असावेत हे ठरवणे त्याच्या जुरिसडिक्शन मध्ये नाही. कारण कर्म ही एक क्रिया- ऍकशन आहे. त्याच्यावर विश्वातली अनेक बले (फोर्सेस) कार्यरत असतात आणि त्या क्रियेचे बल, दिशा बदलत असतात. केवळ कर्त्याच्या बलामुळे क्रिया घडत नाही किंवा कर्त्याला हवी तशी घडत नाही. सोपे करून सांगायचे तर तुम्ही तुमच्या वाहनातून शंभर किलोमीटरवरच्या एका ठिकाणी निघाला आहात. नियोजन आणि हेतू असा की तुम्ही अमुक वाजता निघणार आणि अमुक वाजता तिथे पोचायचेच. आता ह्या तुमच्या मनसुब्याआड कितीतरी बाह्य गोष्टी येऊ शकतात. पाऊस, वारा, ऍक्सिडंट , वाहतूक खोळंबा, शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे, टोमॅटो, दूध वगैरे फेकून देणे वगैरे. तुम्ही तुमचे वाहन उत्कृष्ट स्थितीत ठेवले आहे त्यावर आणि तुमच्या ड्रायविंग कौशल्यावर भिस्त ठेवून प्रवासाला निघता पण तुमची अपेक्षा पूर्ण होणे हे तुमच्या हातात किंवा अधिकारात नाही. पण मग तुम्ही प्रवास करायचाच नाही का? तर तसे नाही. तुम्ही तुमच्या कुशल आणि स्थिर बुद्धीद्वारे कार्याचे पुनर्नियोजन आणि पर्याय हाताशी ठेवायचे. वाटेत येऊ शकणाऱ्या अडचणींचा अंदाज घ्यायचा, वाया जात असलेला वेळ ऑनलाइन कामासाठी वापरायचा. कदाचित त्याच्यातूनही कार्यसफलतेचे मार्ग सापडतील
वगैरे.

हे म्हणजे समोर पाने पडतील किंवा मिळतील तसे हातातले सिक्वेन्स भराभर बदलून डाव जिंकण्यासारखे आहे. त्यासाठी तुमची ज्ञानेंद्रिये तीक्ष्ण, सावध, धारदार आणि त्याचबरोबर शांत पाहिजेत. मॅन भटकता कामा नये, डावावर लक्ष पाहिजे. ही पंचेंद्रियांची कुशलता आणि स्थिरता कशी मिळवावी, त्यांना कसे अंकित ठेवावे, दिवास्वप्न किंवा मायेपासून दूर कसे राखावे, त्यासाठी सहा विकारांवर ताबा कसा मिळवावा, ही इंद्रियशक्ती लेझर बीमसारखी चॅनेलाईझ आणि भेदक कशी करावी हे सर्व क्रमाक्रमाने गीतेत सांगितले आहे. सामान्य माणसासाठी हे तत्वज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान नसून प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान आहे.

सामान्य माणसासाठी हे तत्वज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान नसून प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान आहे. >> ते तर आहेच

मी नौटंकी यांचे प्रतिसाद आणि त्यांना मिळणारी उत्तरे बारकाईने वाचतोय.
कारण त्या exactly माझ्या मनातल विचारतायेत.
Happy

पण फळाची अपेक्षाच नसेल तर कर्मावर निश्चितच परिणाम होणार ना. उत्साहच टिकून राहणार नाही.. मला खरंच गीता जाणून घ्यायची आहे म्हणून विचारतेय.. >>>>>>>>>> हा विचार आपण करतो कारण कोणतेही कार्य आपण देवाणघेवाणीच्या (अमुक एक गोष्ट केली तर तमुक मिळेल या आशेच्या) स्वरूपातच पाहतो. परंतु कृष्ण आपल्याला कर्म हे देवाणघेवाणीच्या नाही तर कर्तव्याच्या स्वरूपात करावयास सांगतात. कर्तव्य म्हणून केले की उत्साह असल्याचा आणि नसण्याचा प्रश्नच येत नाही.

तसेच कर्म हे कर्तव्य भावनेने केलं की त्याच्या फळाकडे लक्ष जात नाही (यापुढील पायरी म्हणजे कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करणे ज्यात कर्तव्यपलीकडे जाऊन केवळ ईश्वराप्रत प्रेमबुद्धीने करणे पण याचा विचार इथे आत्ता नको) याची दोन कारणे भगवान श्रीकृष्ण देतात पहिले म्हणजे अधिकारक्षेत्र- कर्म करणाऱ्याच्या अधिकारक्षेत्रात फक्त ते कर्म शक्य तेवढे चांगल्या पद्धतीने करणे एवढेच असते. मिळणारे फळ हे त्याच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. जे अधिकारक्षेत्रात येत नाही त्याच्याबद्दल आशा करून उपयोग नाही कारण त्यामुळे मन सतत विचलित राहते. शांतता लाभत नाही. कर्मफल सर्वस्वी कर्त्यावर अवलंबून असेलच असे नाही. अनेकदा इतर अनेक घटक निकालात निर्णायक भूमिका बजावतात (उदा शतक ठोकूनही सामना हरणे, जिंकत आलेला सामना पावसामुळे रद्द होणे इत्यादी) त्यामुळे फलाच्या आशेवर अवलंबून राहू नये.

दुसरे म्हणजे आशेवर अवलंबुन कर्म केल्यास अपेक्षित किंवा अनपेक्षित निकालाद्वारे एकतर आनंद तरी होईल किंवा दुःख तरी. आनंद झाल्यास तो फार काळ टिकेल याची शाश्वती देता येत नाही. झालेला आनंद हळूहळू निवळत जातो आणि आपण एकतर नवीन ध्येयाच्या तगमगीमध्ये हरवून जातो किंवा नेहमीच्या मनाच्या indifferent अवस्थेत पोहोचतो. बऱ्याचदा ध्येयप्राप्तीच्या आनंदापेक्षा ध्येयप्राप्तीसाठीची धडपड तगमग जास्त दुःख देते.
आणि निकाल अनपेक्षित लागला तर दुःख झाल्यास क्रोध, त्यापासून अविचारी वृत्ती, त्यातून बुद्धिभ्रम आणि शेवटी निर्णयक्षमतेचा ऱ्हास होतो.
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति || २-६३||

थोडे अजून खोलात गेल्यास अपुऱ्या इच्छा आणि कर्मफलसहित केलेले कर्म दोन्ही बंधन निर्माण करतात ज्याच्या पूर्ततेसाठी जन्ममरणाच्या फेऱ्यात मनुष्य अडकत राहतो पण ह्यावर पुन्हा कधीतरी.

थोडक्यात काय तर आशेवर अवलंबून केलेले कर्म सरतेशेवटी दुःखच देते म्हणून कर्तव्य बुद्धीने आणि ईश्वराप्रत प्रेमबुद्धीने कर्म करण्याचा सल्ला भगवान कृष्ण देतात.

आता अगदी व्यवहारबुद्धीने थोडी चिरफाड करूया. मी कोण आहे? माझी लायकी (पात्रता) काय? माझ्या मर्यादा काय आहेत? माझे गुणदोष कोणते? माझे (परिस्थितीचे) आकलन किती? मी माझे कर्म कितपत अचूकतेने, कितपत व्यवहारीपणाने (कमीत कमी हानि होईल , कुणाचेही कमीत कमी शत्रुत्व ओढवेल असे पाहून, स्वत:चे, परिवाराचे, निसर्गपरिवाराचे)करतो आहे? मी स्वत:ला अंतर्बाह्य ओळखले आहे का? कितीतरी मोठमोठ्यां लोकांना आतापर्यंत कोsहम हा प्रश्न पडलेला आहे. 'पाहावे आपणासी आपण' असे समर्थ रामदास म्हणतात. त्याचा व्यावहारिक अर्थ हा असा आहे. स्वत:ला जज करू नका, मिस जज अजिबात करू नका. स्वत:ला ओळखा. न्याय निवाडा न करता, आत्मक्लेश किंवा आत्मप्रौढी न करता जसे आहात तसे स्वत:ला स्वीकारा. आणि स्वत:संबंधीचे आपले जज्मेंट हे बहुधा मिस्जजमेंटच ठरते. कारण आपण आपल्याला कसाचा दगड लावत नाही, आपली परीक्षा, कसोटी घेत नाही. याचे अंतिम कारण म्हणजे आपली बुद्धी स्थिर नसते. काम- क्रोध- मोह - मदमत्सराने लडबडलेली असते. त्यापलीकडचे पाहाण्याची क्षमता हरवून बसलेली असते. ही बाह्य आवरणे किंवा लिंपण खरवडून घासून काढले पाहिजे आणि बुद्धी तेज तर्रार केली पाहिजे. तरच आपल्याला सम्यक आकलन होते. सत असत शत्रूमित्र तर तम हे थोडे थोडे उमगू लागते. चुका कमी कमी होऊ लागतात. यशाची टक्केवारी वाढते. हे सोपे आहे आणि नाहीसुद्धा. भगवंतांनी अख्खी गीता त्यासाठी खर्ची घातली आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायात अविकारी, अलिप्त, मायेपासून दूर, असे राहाण्यासंबंधी किंवा ती ओळखण्यासाठी एक तरी श्लोक आहेच आहे. कमलपत्रं इव अंभसि किंवा यथोल्बेन आवृतो गर्भ: वगैरे.
गीतेमध्ये वेदवेदांगांतलेच तत्त्वज्ञान आहे. काही श्लोक जसेच्या तसे आहेत. पण हे सर्व तत्त्वज्ञान सोप्या संस्कृत भाषेत, तत्कालीन प्रचलित अशा भाषेत आहे. दृष्टांत सोपे, नेहमीच्या व्यवहारातले आहेत. असो.

अच्छा. एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या सुखवस्तू गृहिणीला स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे, जिला अजिबात गरज नाही. ते तिच कर्तव्य देखील नाही. तर मग फळाची अपेक्षा नसेल तर ती उगाच का मेहनत करेल? कारण ते तिला कर्तव्य वाटत नाही. ती तिची वैयक्तिक इच्छा आहे.

अजुन एक, एका व्यक्तीला एव्हरेस्ट सर करायचं होते पण आता अचानक त्याने गीतेचा अंगीकार केल्यामुळे त्याची फळाची इच्छा नाहीशी झाली. मग तो पर्वत चढायचा विचार सोडून देणार नाही का?

ज्या गोष्टी कर्तव्यामध्ये येत नाहीत, उदा. छंद, हौसमौज, एखादे अवघड ध्येय(समजा बॉडी बिल्डिंग Happy ) याकडे गीता कसं बघते?

अच्छा. पण फळाची अपेक्षाच नसेल तर कर्मावर निश्चितच परिणाम होणार ना. >> मला वाटतं, फळाची अपेक्षा न करणे आणि फळाची चिंता न करणे ह्या दोन्हीत फरक आहे. 'कर्मणि एव अधिकारः ते' - ह्याचा अर्थ कर्म कोणते/कसे/कधी करावे - ह्यावरच तुझा अधिकार आहे, फळ कधी/कसे/कोणते मिळेल ह्यावर तुझा अधिकार नाही. ह्याचा अर्थ 'फळाची अपेक्षा करू नका' असा चुकीचा लावला जातो.

प्रयत्न सोडू नका असेच गीता सांगते. फक्त योग्य प्रयत्न करा. एवरेस्ट च्या उदाहरणात आपले आरोग्य, वय, सराव, साधनसामुग्री, योग्य काळ, सोबती, आर्थिक बळ, कुटुंबाची जबाबदारी हे सर्व विचारात घेऊन अशा हाय रिस्क ध्येयाकडे वळायचे असते. हा तुमचा छंद आहे. इथे यशाची टक्केवारी ५०% पेक्षाही कमी असते हे तुम्हांला माहीत असते, असायला हवे. मग मी शिखर गाठणारच अशी स्वप्ने का बघावी? जिद्द असावी पण दिवास्वप्ने पाहू नयेत. बरावाईट कोणताही परिणाम समबुद्धीने स्वीकारण्याची मनाची तयारी असावी. त्यासाठी मनाला ट्रेन करावे. अपेक्षा खूप उंचावून शिखरावर नेऊन ठेवल्या की अपयश आल्यावर क्रेस्ट फॉलन वाटून अपेक्षभंगाचे तीव्र दु:ख आणि कदाचित नैराश्यही येणारच. म्हणून गीता म्हणते की सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो, ततो युद्धाय युज्यस्व. 'मला हवे ते, माझ्या मनासारखे मिळणार नसेल तर मी कशाला त्यात पडू' हा माझा मनोव्यापार आहे. काही सक्ती नाही माझ्यावर ते काम करण्याची. फक्त मी दुसरे काही माझ्या क्षमतेजोगे कार्य न शोधता आळसात आणि अकर्मणि अवस्थेत बसून राहाणे गीतेला मुळीच अभिप्रेत नाही. मला कर्म करणे प्राप्त आहे आणि योग्य त्या कर्माची निवड करणे हेही प्राप्त आहे. वर्तमानातील कर्म हे माझे भविष्यासाठी संचित आणि प्राक्तन असणार आहे. तेव्हा ही योग्य निवडीची कुवत/ क्षमता मिळवणे गरजेचे आहे. ती कशी मिळवावी; इथे आली ना हरिदासाची कथा मूळपदावर ! दशेंद्रिये आवरून घ्या, विष्णूचा दुसरा अवतार बनण्याकडे वाटचाल ठेवा, बुद्धी सूक्ष्म, तरल, तीक्ष्ण करा मग आपणासाठी योग्य काय ते आपले आपल्यालाच समजेल.

मानवाला चिरंतनाचा, अज्ञाताचा, सत्यान्वेषणाचा ध्यास असतो. ह्या ध्यासापायी अनेकांनी आपली जन्मभराची पुंजी, आपले आयुष्य पणाला लावले. कुणाकुणाला अनेक प्रयत्नांती एखादे तत्त्व, एखादे सूत्र , एखादी तर्कप्रणाली सापडली. त्यांच्या हयातीत ते यश मानले गेले नसेल , ते अपयशीच गणले गेले असतील पण पुढील काळात अनेकांना ते स्फूर्तिप्रद वाटून त्यावर काम केले गेले असेल , अनेक शोध, सिद्धांत, तंत्त्वप्रणाल्या, तत्त्वज्ञाने त्यातून विकसित झाली असतील. तर यशापयश हे कालसापेक्ष,स्थळसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते. आपण ज्याला यश किंवा अपयश समजतो आहोत ते नक्की तसेच आहे का हेही समजून घ्यावे लागेल. अयशस्वी गणल्या गेलेल्या अनेक वैज्ञानिक प्रयोगांतून अनेक महत्त्वाचे शोध लागले आहेत. एखाद्या पिढ्या न पिढया चाललेल्या य प्रोजेक्ट मधून कालांतराने सुपर कंप्यूटरनिर्माण होतात, पिरॅमिड्स, अजिंठा वेरूळ सारखी महाकार्ये घडतात. त्यात राबणाऱ्या एका पिढीला, एका व्यक्तीला यश मिळाले म्हणावे की अपयश? साफल्य मिळाले की वैफल्य? म्हणजे हे सगळे मानण्यावर, आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. तारतम्यावर अवलंबून असते. त्यातून दु:ख शोधावे की आनंद हेही तसेच अवलंबून. हे तारतम्य कसे जोपासावे हा पुढचा भाग.

अच्छा. या सर्वाचा मला उमगलेला अर्थ असा -

आशा निराशेचा खेळ सतत सुरूच राहणार. कदाचित आवडती गोष्ट लांब लांब पळणार आणि नावडती चिकटून बसणार.. मग शक्यतो काहीच करायची जिद्द, ऊर्मी राहणार नाही. अशा वेळी हाताला काय लागतय, परिणाम काय होईल याची चिंता न करता, त्या त्या प्रसंगानुरूप सारासार विचार करून बुद्धीला पटेल असे कर्म करणे योग्य. तसेच कर्ताभाव ईश्वराच्या चरणी समर्पण करून तो देईल ते कर्मफल आनंदाने स्वीकारावे.

यामुळे होईल काय, कोणताही निर्णय भावनिक न घेता बुद्धीच्या कसोटीवर घेतला जाईल. त्यामुळे चुकांच प्रमाण कमी होईल. तसेच जरी काही मनाविरुद्ध घडलच तरी कर्ता करविता ईश्वर असल्यानं जे झालं ते त्याच्या इच्छेने हे माहीत असेल..

आणि मग हळूहळू वर्तमानात रहायची सवय होईल. तसेच चालू क्षणाचा समरसून आनंद घ्यायची सवय लागेल अर्थात स्थितप्रज्ञ वृत्ती तयार होईल.. असे मला वाटतंय..

काही चुकत असेल तर सांगा..

@नौटंकी, मी अस्मिता - धन्यवाद. निष्क्रियतेबद्दलचा प्रश्न अतिशय सयुक्तिक आहे. त्याबद्दल पुढील लेखात... कर्मयोगात (३रा अध्याय) निष्क्रियता आणि निष्कामता यावर पुरेसे भाष्य केलेले आहेच. त्यामुळे येथे त्याचे उत्तर वेगळे देत नाही.
@हीरा, @ कोहंसोहं – धन्यवाद, तुमची उत्तरे वाचून खुप शिकायला मिळालं. आपण याविषयावर स्वतंत्र लेखच लिहीला पाहीजे.

@शीतल, आपले विवेचन उत्कृष्ट झाले आहे. विशेषत: योग्य्स अयोग्य मनोवृत्ती, स्थिरबुद्धी, मनाचे स्थैर्य आणि चांचल्य, स्थितप्रज्ञ अवस्था ह्यावरचे विवरण आणि उपसंहार अतिशय आवडला.
आपले विवरण प्रगल्भ आहे. माझ्या प्रतिसादांतून आणखी शिकण्यासारखे असे तुम्हाला काय मिळणार! तरीही धन्यवाद. पुढील लेखाची उत्कंठा.