अंतरंग – भगवद्गीता – भाग ३

Submitted by शीतल उवाच on 15 June, 2020 - 12:29

दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग!

दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.

अर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.

विवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.

विवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..

महाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती? प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..

सुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती? जास्तीत जास्त संहार..

एक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना? या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्जुनविषादातून प्रकट होतो.

युद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.

केवळ शक्तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाचे होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….

हे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पीढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.

दृष्टीकोन.. जिज्ञासा….

युद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहील्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.

जिज्ञासा…. ज्ञानलालसा….

महाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता!!!

उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.

आणि हो अर्जुनविषादच नसता तर कृष्णाने गीता सांगीतली असती का? आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का?!!!!

त्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.

काय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…

Group content visibility: 
Use group defaults

अर्जुनविषादाचा या बाजूने मी कधी विचारच केला नव्हता. गीता आणि अर्जुन म्हटलं की पटकन ‘सीदन्ती मम गात्राणि’ आठवतं. आणि रणांगणावर नातेवाईकांना पाहून हातपाय गाळणारा अशी थोडी निगेटीव प्रतिमा निर्माण होते. (त्याच्या शौर्याबद्दल शंका नसली तरी) पण तुम्ही जी बाजू उलगडून दाखवली आहेत त्यामुळे नक्कीच डोळे उघडले.

@MazeMan अर्जुनविषादच नव्हे तर संपुर्ण गीतेबाबत हे नेहेमीच घडतं. गीता आयुष्य सर्वार्थाने जगण्याचा मार्ग दाखवते. प्रत्येक अध्याय हा अनेक अर्थानी वैशिष्टपूर्ण आहे. त्याचे अनेक आयाम नीट तपासले जात नाहीत ना त्यावर भाष्य केले जाते. तसे करण्याचा प्रयत्न करतोय. व्यवस्थापन (काम आणि आयुष्याचं), उत्साह/स्फुर्ती (Motivation), आनंद (Happiness) असे असंख्य विषय आहेत गीता केवळ संस्कारवर्ग, संध्याकाळची शुभंकरोती आणि देहावसान इतकीच मर्यादित राहू नये म्हणून ही धडपड Happy

गीता केवळ संस्कारवर्ग, संध्याकाळची शुभंकरोती आणि देहावसान इतकीच मर्यादित राहू नये >> Happy