देवा घरचे झुंबर अमलतास

Submitted by मंगलाताई on 13 June, 2020 - 05:54

देशी फुलझाडांच्या मालिकेतील तिसरे फुल बहावा

27439345336_2968a2aa0c_b.jpg

अमलतास किंवा बहावा काहीही म्हणा तोंडातून शब्द पडतात वाहवा बहावा . काय सौंदर्य वरदान लाभलेले बहाव्याला . पिवळाधम्म एक सारखा फुललेला ,नाजूक पाकळी ,डोळ्यांना सुखावणारा गोड पिवळा रंग पोपटी रंगाची पाने आणि मध्ये झुलणाऱ्या करड्या रंगाच्या शेंगा एवढा मिलाफ क्वचितच इतरत्र पाहायला मिळेल .नवरीला नटवावे आणि हळद ल्यालेल्या अंगाने तिने अकृत्रिम लाजावे तसा दिसतो बहावा. बहावा फुललेला असताना त्याला नववधूच्या हळदीच्या हातांना हिरव्याकंच कंकनाची शोभा किती मोहक असते ना तशी शोभा येते बहाव्याला .हिरव्या पण पोपटी नाजूक पानांमुळे शालीन सौदर्याचा मानकरी आहे बहावा . दांडीवर वर थोडे जास्त आणि खाली कमी कमी होत निमुळते होत गेलेले घोसच्या घोस लटकलेले असतात बहाव्याचे देवाघरी . शेवटच्या टोकावर न उमललेल्या चार पाच कळ्या .नाजूक पाकळी आणि मिटून बसलेली कळीही. विशेष म्हणजे या देठावर एकही पान नाही आणि असंख्य घोस उलटे टांगल्यागत झुलत असतात वार्‍याच्या झुळकीने सोबत जातात इकडून तिकडे . डोळ्यांना अत्यंत सुखद अनुभव येतो बहाव्याच्या दर्शनाने .
बहाव्याचा वृक्ष नको वृक्षापेक्षा झाडच म्हणूया , पण भारतातल्या काही क्षेत्रात महावृक्ष रूपात दिसतो विस्तारलेला भव्य उंच असा . बहावा साधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढतो खोडांची जाडी फार नसते तसा बहावा शिडशिडीत आणि थोडा मनमोकळा वाढतो उनाड मुलासारखा. बहाव्याला तुम्ही जर हिवाळ्यात बघितले तर तुमच्या नजरेतही तो येणार नाही असेल एखादे साधारण झाड असे म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल , पण अंतरीचे सौंदर्य खुलून व्यक्त करण्याचा त्याचा काळ असतो एप्रिल ते मे .सृष्टी कर्त्याने बहाव्याला एक विशेष काम सोपवले आहे ते म्हणजे एप्रिल ते मे पर्यंत खुलायचे बहरायचे सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घ्यायचे . अंगाखांद्यावर फुलपाखरांना कीटकांना ,मुंग्यांना ,मधमाशांना खेळू द्यायचे गोंधळ घालू द्यायचे स्वतः मात्र अगदी शांत बसून बघायचे. हे सगळे झाले की मेघराज येणार असल्याचे संकेत द्यायचे माणसाला. मागाहून मेघराजा येतात वीजांची पिपानी आणि ढगांचा मृदंग घेऊन .बहावा प्रधानाचे काम करतो मेघाच्या आगमनाआधी कारण बहावा फुलल्यानंतर 45 दिवसात पाऊस येतो. आहे की नाही प्रधानाचे काम म्हणूनच याचे नाव 'इंडियन रेड इंडिकेटर 'असे आहे . भारतात बहुतेक सर्वत्र बहावा आढळतो . पिवळाधम्मक बहावा फुलल्यानंतर झाड गोलाकार पिवळ्या उघडलेल्या छत्री सारखा दिसतं . द्राक्षांच्या घोसा सारखे उलटे लटकलेले घोस लटकतात त्यामुळे त्याचे नाव गोल्डन शॉवर ट्री असे पण आहे . हिवाळ्यात पूर्ण पर्णहीन होतो बहावा आणि अति थंडीने गारठला की पिवळी शाल लपेटुन घेतो फुलाफुलांची. ही शाल थेट म्रुगातच काढून फेकतो . बहाव्याची पाने साधारणपणे एकमेकांसमोर असतात देठाला चिकटून ,रंग नाजूक पोपटी असतो . पोपटी पानांआडून खळखळून हास्य करीत पिवळे घोस येतात एकामागून एक.
ते बघून लोकगीततल्या ओळी आठवतात .
बहाव्यासी आलाय बहार ग
पिवळ्या साडीची हिरवी किनार ग
फुलोरा साधारणपणे अर्धा हात लांब असतो . मे च्या शेवटच्या आठवड्यात शेंगा तयार होतात . शेंग हातभर लांबीची असते खुळखुळा वाजवल्यासारखी वाटते . शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात . प्रत्येक कप्प्यात मऊ गरात एक बि दडलेले असते. बहाव्याचे मराठी नाव सोनबहावा ,कर्णिकार असे आहे . संस्कृतमध्ये याला आरग्वध असे संबोधतात तर हिंदीत अमलताश असे ओळखतात .आयुर्वेदात बहावा बराच उपयोगी आहे . शेंगा पाने-फुले सर्व औषधी गुणधर्म युक्त आहे . बहावा काविळी वरचा रामबाण उपाय आहे .याची पाने कफ नष्ट करणारी आहेत आणि फुलं पित्त नष्ट करणारी शेंगा सर्वात जास्त गुणकारी आहेत. पित्तशामक कफशामक, विरेचक आणि वातनाशक . रस्त्याच्या दुतर्फा जर बहावा फुललेला असेल तर क्षणभर गाडी थांबवून फुलांचे घोस आणण्याचा मोह आवरत नाही ,पण फुलं एवढी नाजूक कि खुडल्या बरोबरच गळायला सुरुवात होते फुलांची . बहरलेल्या बहाव्याचे सौंदर्य दीर्घकाळ स्मरणात राहते. बहाव्याची जुने आणि फुलांनी लगडलेले वृक्ष बघायचे असतील तर सेवाग्राम आश्रमात बघावे . हारीने उभ्या अनेक बहाव्याच्या रांगा आहेत . सृष्टीच्या पसाऱ्यात बहावा मात्र आपलं वेगळेपण टिकवून आहे . चाफ्यासारख्या गुच्छ नाही अन् गुल मोहरासारखा ताटवाही नाही तर पिवळे घोस लेऊन बहरतो बहावा. हिरव्याकंच इतर वृक्षांच्या रांगेत एखादा बहावा असेल तर ते सौंदर्य आणखी निराळे भासते आणि जर नुसत्या बहाव्याच्या अनेक रांगा असतिल तर मोहरीच्या फुलांच्या शेता सारखे पिवळे धम्म शेत फुलल्याचा भास होतो . बहावा थायलंड चे के राष्ट्रीय फूल आहे .
भारतीय मूळ असलेले हे झाड आहे पण इतरही बऱ्याच देशात याने प्रवास केला आणि काही देशात मुक्कामही केला.जेव्हा सारा भारत ऊष्णतेने त्राही त्राही झालेला असतो. जेव्हा सर्व वनस्पती कोमेजलेल्या असतात तेव्हा बहावा पिवळा शेला ओढून म्रुत स्रुष्टीला जीवनदान देतो .स्रुष्टीकर्त्याच्या कुंचल्यातून चितारलेले एक ताजे बहारदार चित्र म्हणजे बहावा .

69b2a786c31873e12b1ae9b5a0b621a4.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ मंगलाताई

सुंदर फुलला आहे लेख आणि तुमचा बहावा. मला फार आवडतो. खासा देशी वृक्ष असूनही फारशी लागवड दिसून येत नाही.

मी सहा वर्षांपासून घरी बियांपासून रोपे तयार करतो आहे. सक्सेस रेट खूपच कमी आहे. साधारण १२० बिया पेरल्या तर १० रोपं मिळतात. माझ्याकडे कुंड्यांमध्ये ६ वर्षाची झालेली रोपं कुठलातरी रोग पडून गेली. ज्यांना जमिनीत लावायला दिली त्यांच्याकडे मात्र १२ फूट वाढली आहेत आता Happy

अतिशय छान लेख.
बहुदा रस्त्याच्या कडेला महापालिकेने ह्याची रोपे लावली असतात आणि ती चांगली जोमदार वाढता. ह्याची अजून एक गोष्ट . ह्याच्या शेंगांचा गर गोडसर असतो. रानात माकडे शेंगा खातात. हा गर विरेचक असल्यामुळे विष्ठेतून बिया बाहेर पडतात आणि रुजता.
लागवड करून न लागणारा अजून एक वृक्ष आहे सीतेचा अशोक. फार कमी सक्सेस रेट आहे त्याचा. आणि सर्पगंधा ही पण कितीही वेळा लावली तरी लागत नाही.
लेख खूप छान आहे. वाचून फार छान वाटले.

मस्त लेख आणि फोटो
हे झाड विदेशी आहे असं वाटायचं मला.
असाच एक फिका गुलाबी पण असतो ना?

मंगलाताई ,
वा सुरेख लेख !

नवीन माहिती कळली . बहावा हे केरळ चे राज्य झाड आहे , हे मला एका केरळी मित्राने माझी कथा वाचल्यावर सांगितले .

आपण माझी खालील कथा वाचावी , अशी नम्र विनंती .

तसेच इतरंही वाचकांनी ती वाचावी- ज्यांनी वाचली नाही किंवा ज्यांना पुन्हा वाचायची आहे .

https://www.maayboli.com/node/69497

लेख आवडला.
फोटो पण सुंदर. विनिता यांचा फोटो पण फार सुंदर आहे.

धन्यवाद मैत्रिणींनो...
हे फोटो निगडीतले, भक्तीशक्ती चौकाजवळ असलेल्या उद्यानातले आहेत. आता मेट्रोच्या कामाने हे झाड राहीलेय का ते बघायला हवे.

माझं खूप आवडतं झाड. लहानपणापासून दारात असावं असं वाटतंय. पण रोप मिळत नाहीये. आणि स्वतः कसं रुजवायचं ते माहिती नाही. फांदी जगते का?

@ मी चिन्मयी,

स्वानुभवानी सांगू शकतो - फांदी रुजत नाही. बियांपासून रोपं मिळवण्याचा सक्सेस रेट खूप कमी आहे.

चांगल्या नर्सरीत रोपटे मिळावे, पण 3+ वर्षाचे सशक्त रोपच निवडा. जमिनीत लावल्यास फार काही काळजी घ्यावी लागत नाही, भरभर वाढ होते.

@ मी चिन्मयी,

रत्नागिरीचे माहित नाही पण दापोली कोंकण ऋषीविद्यापिठाच्या नर्सरीत असतील बहाव्याची रोपे विकायला. चौकशी करुन बघा - worth the effort Happy