भांडा-भांडी

Submitted by nimita on 14 June, 2020 - 22:42

"Thanks for the lovely dinner ma'm. Good night."

आपल्या कारमधे बसताना पाहुणे म्हणाले. त्यावर "The pleasure was all ours. Thanks for coming." म्हणत घरच्या host आणि hostess नी त्यांना हसत हसत निरोप दिला. पाहुण्यांना 'बाय' म्हणून आत आल्यावर 'hostess' तिच्या नेहेमीच्या कामाला लागली... 'नंतरची आवराआवर' ! स्वैपाकघरात sink शेजारच्या भांड्यांचा ढिगातून तिनी हळुवारपणे काचेचा डिनर सेट आणि ग्लासेस वेगळे केले .... आणि तितक्याच हळुवारपणे, काळजीपूर्वक ती सगळी नाजूक भांडी घासून ओट्यावर नीट रचून ठेवली... 'सकाळपर्यंत छानपैकी वाळलेली असतील सगळी; मग ठेवीन कपाटात,' एकीकडे आपला घाम टिपत होस्टेस विचार करत होती. समोरचा बाकी भांड्याचा तो डोंगर तिनी सिंक मधे ठेवला आणि त्यांच्यावर पाणी घालत म्हणाली," आता उद्या सकाळी लावीन ही सगळी भांडी डिशवॉशर मधे. आज खूपच दमले बाई!"

प्रत्येक पार्टी नंतरचं तिचं हे ठरलेलं काम होतं... सगळा डिनर सेट स्वतःच्या हातांनी धुवून, स्वच्छ करून ठेवायचा. त्यात दुसऱ्या कोणी लुडबुड केलेली तिला अजिबात आवडायची नाही... त्याला कारण ही तसंच होतं.... तो डिनर सेट तिच्या नवऱ्यानी तिला दिला होता- त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून! आणि त्यामुळे खूप स्पेशल होता तो तिच्यासाठी. इतकी वर्षं झाली तरी अजूनही नव्यासारखा दिसायचा....

पुन्हा एकदा त्या नक्षीदार डिनर सेट कडे एक नजर टाकत ती झोपायला गेली.

"गेल्या का ताई? आता रात्रभर असेच पाण्यात डुंबत बसा..." सिंक मधे ठेवलेल्या त्या भांड्यांचा ढिगात अगदी तळाशी अडकलेली एक ताटली म्हणाली. " हो ना, पण त्यात काही नवीन नाहीये. प्रत्येक वेळी असंच करतात ताई. त्या काचेच्या भांड्यांना नेहेमीच स्पेशल वागणूक मिळते " आपल्या कानात अडकलेला एक चमचा सोडवण्याचा प्रयत्न करत मोठी कढई म्हणाली. तिच्या म्हणण्याला दुजोरा देत प्रेशर कुकर फुसफूसला, "मला अजिबात नाही पटत त्यांचा हा असा दुजाभाव ! म्हणजे बघा ना, सकाळपासून आपण सगळ्यांनी राब राब राबायचं... गॅस चे चटके खायचे... झारे, उलथने, चाकू सुऱ्या सगळ्यांचे वार झेलायचे, येणाऱ्या पाहुण्यांसाठी दिवसभर आपण खपायचं आणि ऐनवेळी त्या पाहुण्यांसमोर मिरवणार कोण ?? तो काचेचा डिनर सेट !!! हे म्हणजे अगदी त्या हिंदी सिनेमातल्या सारखं झालं... व्हिलन चा मार खायला डुप्लिकेट आर्टिस्ट आणि हिरॉईन बरोबर बागेत गुलुगुलु बोलायला, प्रेमाची गाणी म्हणायला तो हिरो !!!"

कुकरचं ते म्हणणं सगळ्याच भांड्यांना अगदी मनापासून पटलं. थोड्या फार फरकानी प्रत्येकाच्या मनात हेच विचार येत होते. कुकरला सांत्वना देत कढई म्हणाली, "तरी तुमचं बरं आहे हो कुकरदादा ... तुम्हाला स्वतःचं हँडल आहे ना धरायला आणि उचलायला.... पण आमच्यासारख्यानी काय करायचं हो !! त्या सांडशीचे चिमटे खाऊन खाऊन अगदी व्रण उठले हो अंगावर..जेव्हा सांडशी नसते तेव्हा तर ताई सरळ कानच धरतात हो माझे.... अगदी 'इकडे आड तिकडे विहीर' असं होतं बघा! "त्यावर आपली बाजू मांडत कुकर पुन्हा फुसफूसला ," अगं ,हॅंडल चं काय घेऊन बसलीस? सकाळपासून शिट्ट्या मारून मारून आता माझी हवा टाईट झालीये."

त्या दोघांचं संभाषण चालू असताना मधेच कोपऱ्यातल्या नॉन स्टिक फ्राय पॅन नी आपली व्यथा मांडली ," अहो कढई ताई, तुम्हांला कितीही त्रास सहन करावा लागला तरी तुमचं अस्तित्व तर नाही ना धोक्यात येत ? आमचं मेलं नशीबच फुटकं.... हे नॉन स्टिक कोटिंग जेव्हापासून अंगाला चिकटलंय ना तेव्हापासून सतत जीव मुठीत धरून राहावं लागतंय मला... जर कधी हे कोटिंग निघालं तर मग माझी रवानगी सरळ घराबाहेर होणार !!"

"खरं आहे... जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे !!" फ्राय पॅनच्या शेजारची नॉनस्टिक कढई पुटपुटली." अहो, जेव्हापासून या घरात आलीये तेव्हापासून त्या ताई माझ्यात फक्त गोड पदार्थच बनवतात - बासुंदी, खीर, लाडू, वड्या, हलवा... आणि हो, गुलाबजाम रसगुल्ले वगैरे साठी सुद्धा मीच हवी असते त्यांना! मलाही वाटतं ; कधीतरी मस्त झणझणीत पोहे बनवावे माझ्यात.... नाहीतर लसूण मिरची वगैरे घालून फक्कड असं पिठलं तरी !!! पण छे !! काय तर म्हणे.. फोडणीचा वास लागतो भांड्याला !! म्हणून माझी नेमणूक फक्त गोड पदार्थांसाठीच.....आता लवकरच मला तो मधुमेह का काय असतो ना - तो होईल बहुतेक ... "

सिंक मधल्या भांड्यांचा अगदी सात्विक संताप होत होता. त्यांची ती चिडचिड बघून डिनर सेट मधली एक प्लेट हळूच म्हणाली," मी थोडं बोलू का?" तिची ती मंजुळ किणकिण कानावर पडताच सगळी भांडी एकदम गप्प होऊन तिच्या दिशेनी बघायला लागली. "आम्ही मगाचपासून तुमचं बोलणं ऐकतोय. तुमच्या दृष्टीनी विचार केला तर तुमची चिडचिड होणं अगदी स्वाभाविक आहे; पण तुम्हांला सगळ्यांना आम्हां काचेच्या भांड्यांबद्दल इतका राग का आहे? आमची नक्की काय चूक आहे - ते तरी सांगा आम्हांला."

तिचं ते नाजूक, आर्जवी बोलणं ऐकून सगळी भांडी गप्प झाली. पण तेवढ्यात एक स्टीलचं ताट पुढे होत म्हणालं, " चूक कोणाची आहे हे महत्त्वाचं नाहीये, पण तुम्हांला आमच्यापेक्षा वरचढ मानलं जातं आणि नेहेमी अगदी स्पेशल वागणूक दिली जाते... हे तरी मान्य आहे ना तुम्हांला ?" त्याच्या या वक्तव्यावर क्षणभर ती नाजूक प्लेट पण विचारात पडली. तिला असं गप्प झालेलं बघून तेलाच्या कावळ्याला पण जोर चढला. आपला एक हात कमरेवर ठेवून, ओठांचा चंबू करत तो म्हणाला," मान्य करावंच लागेल ... कारण तेच सत्य आहे.. तुम्हांला सगळ्यांना नेहेमी त्या समोरच्या काचेच्या कपाटात अगदी राजेशाही थाटात ठेवतात त्या ताई... आणि आम्ही सगळे मात्र या ओट्याखालच्या ट्रॉल्यांमध्ये वेडे वाकडे कसेही पडलेले असतो. तुम्ही अगदी ठेवणीतली भांडी ; त्यामुळे पाहुण्यांसमोर नेहेमी तुमचीच हजेरी लागते. तुमचंच गुणगान होतं. येणारे सगळे पाहुणे पण अगदी आवर्जून तुमची तारीफ करतात.आम्हांला पण आवडेल की तुमच्यासारखं लोकांसमोर मिरवायला... पण छे, आम्ही आपले सतत या स्वैपाकघरातच बंदिस्त!" आगीत तेल ओतण्याचं काम अगदी चोख पार पाडलं होतं त्या कावळ्यानी...त्याच्या या बोलण्यावर सगळ्या भांड्यांनी त्याला समर्थन द्यायला सुरुवात केली. 'हो','अगदी बरोबर','खरंच आहे' अशा अनेक प्रतिक्रिया ऐकू यायला लागल्या.

बिचारी नाजुका - ती काचेची प्लेट- त्यांच्यासमोर अगदी एकटी पडली होती. तिला असं असहाय अवस्थेत बघून एक काचेचा डोंगा पुढे सरसावला. आपलं गोल मटोल पोट सांभाळत म्हणाला," तुम्हांला काय माहीत आमचं दुःख , आमची व्यथा? म्हणतात ना- 'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' !! अरे मित्रांनो, आम्हांला कोणालाच नाही आवडत त्या काचेच्या बंद कपाटात दिवसेंदिवस नुसतं पडून राहायला. आम्हांलाही तुमच्यासारखं रोज बाहेर निघावंसं वाटतं, रोज छान स्वच्छ व्हावंसं वाटतं." त्याचं हे बोलणं ऐकून सिंक मधली सगळी भांडी एकदम अवाक झाली. त्यांच्यापैकी कोणी काही बोलणार इतक्यात काचेचा एक सूप बाउल म्हणाला," आम्हांला तर तुमच्यातल्या त्या कॅसेरॉल चा कित्ती हेवा वाटतो. त्या ताई दर दोन दिवसांनी काहीतरी छान छान पदार्थ बनवतात आणि त्या कॅसेरॉल मधे घालून शेजारच्या काकूंकडे पाठवतात. किती छान फिरायला मिळतं त्याला.…. बाहेरचं जग बघायला मिळतं.. नाही तर आम्ही !! जेव्हापासून या घरात आलोय - फक्त कपाट, डायनिंग टेबल आणि ओटा - एवढीच त्रिस्थळी यात्रा चालू आहे आमची !"

आता सिंक मधली सगळी भांडी अगदी लक्ष देऊन त्या काचेच्या भांड्यांचं म्हणणं ऐकायला लागली. ते बघून काचेच्या एका ग्लासला जरा चेव चढला. तो तक्रारीच्या सूरात म्हणाला," आम्हांला पण कधीकधी वाटतं - तुमच्यासारखं ओट्यावरून खाली टणाटण उड्या माराव्या. ताईंच्या हातातून घरंगळत जाऊन मस्त घसरगुंडीचा आनंद लुटावा.... पण हे असे छोटे छोटे आनंद पण नाहीयेत आमच्या नशिबात!"

"हो ना, "आपले अश्रु टिपत rice plate म्हणाली," आम्हांला सुद्धा वाटतं - त्या ताम्हण आणि समई सारखं पितांबरीचा फेस पॅक लावून बसावं ; घासणीनी मस्तपैकी सर्वांगाचं मर्दन करून घ्यावं... Full body massage you know !! आणि मग शेवटी डिश वॉशर मधे jacuzzi आणि sauna bath..... नुसत्या विचारानीच एकदम spa ची feeling येतीये. पण ताई आम्हांला तिकडे जाऊच देत नाहीत.... का तर म्हणे- आमच्या वरचं हे सोनेरी रंगाचं नक्षीकाम खराब होईल."

तिनी असं भावुक होऊन आपलं मन मोकळं केल्यावर सिंक मधल्या भांड्याचे पण डोळे पाणावले. स्वतःला कसंबसं सावरून घेत तांब्या म्हणाला," अहो ताई, तुम्हांला वाटतो तेवढा सुखद अनुभव नसतो हो त्या डिश वॉशर चा ! हां, म्हणजे, त्याच्या आत बसून आल्यावर आम्ही अगदी अंतर्बाह्य स्वच्छ होतो ही गोष्ट खरी आहे.. पण त्यासाठी आम्हांला काय काय सहन करावं लागतं ते आम्हालाच माहित.... इतक्या जोरात पाण्याचे फवारे येत असतात.. कधीकधी तर अगदी नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरतो हो ; आणि त्या साबणामुळे डोळे चुरचुरतात ते वेगळेच! आणि तुम्ही ज्याला sauna bath म्हणताय ना.... अहो, किती चटके बसतात हो त्यामुळे!" आपल्या बोलण्याचा योग्य तो परिणाम होतोय हे लक्षात येताच तो पुढे म्हणाला," मागच्याच आठवड्यात ताईंनी एक प्लास्टिक ची पाण्याची बाटली डिश वॉशर मधे धुवायला ठेवली . बिचारी ती बाटली.... ते गरम वारे सहन करण्याइतकी शक्तीच नव्हती तिच्यात. मोजून चार ठिकाणी वाकडी होऊन बाहेर निघाली... " तांब्यानी प्रतिक्रियेची अपेक्षा करत डिनर सेटच्या दिशेनी पाहिलं... आणि त्याला अपेक्षित असलेला प्रश्न ऐकू आला-" मग , आता कुठे आहे ती बाटली?" त्यावर एक सुस्कारा सोडत तांब्या म्हणाला," आता बाथरूम च्या खिडकीत खोटी प्लॅस्टिकची फुलं घेऊन उभी आहे बिचारी!"

काही क्षण सगळेच त्या चतुर्वक्र बाटलीच्या दुःखात सहभागी झाले. त्या शांततेचा फायदा घेत तांब्याच्या डोक्यावर बसलेलं छोटंसं भांडं चिवचिवलं ," आणि आम्ही काही मुद्दाम नाही उड्या मारत ताईंच्या हातातून... चुकून होतं ते. पण त्यामुळे कधीकधी आमच्या अंगाला पोचे पण येतात. आणि मग ते पोचे काढायला म्हणून ताई आम्हांला दुसऱ्या बाजूनी पण ठोकतात. त्याशिवाय अजून एक गोष्ट आहे जी फक्त आम्हांलाच सहन करायला लागते.... ताईंचं नाव आमच्या अंगावर टॅटू करून घ्यावं लागतं. किती दुखतं त्यावेळी !"

एकमेकांची सुखं दुःखं वाटून घेण्यात सगळी भांडी इतकी गर्क झाली होती की कधी सकाळ झाली ते कोणालाच नाही कळलं. थोड्याच वेळात ताई स्वैपाकघरात आल्या आणि त्यांनी नेहेमीप्रमाणे डिनर सेट कपाटात ठेवून दिला आणि सिंक मधली भांडी डिश वॉशर मधे धुवायला लावली

इतका वेळ 'तू तू मैं मैं' करणारी ती सगळी भांडी आता एकदम गप्प बसून होती ; त्यांच्यातली ती 'भांडा-भांडी' अचानक शांत झाली होती. आता सगळी निमूटपणे ताईंच्या मर्जीप्रमाणे वागत होती. काय करणार...आलिया भोगासी.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Lol

मस्त कल्पना,
ताईंचं नाव आमच्या अंगावर टॅटू करून घ्यावं लागतं. किती दुखतं त्यावेळी !">>>>>> हे खुप आवडले Lol

मस्त!