जाळं (भाग ४)

Submitted by मोरपिस on 11 June, 2020 - 05:31

जाळं (भाग ३) - https://www.maayboli.com/node/75012

रात्रीचा अंधार सगळीकडे पसरला होता. रिसॉर्टमध्ये पसरलेली शांती अंधाराला अजूनच गूढ बनवत होती. एवढी शांतता होती की प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. त्या जीवघेण्या शांततेत अचानक कोणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. विराज आणि नीरजा हा आवाज ऐकताच दचकून जागे झाले. नंतर दार उघडून ते बाहेरची परिस्थिती पहायला गेले. रिसॉर्टच्या टेरेसवर त्यांना काहीतरी हालचाल जाणवली. ते दोघं त्या हालचालीचा शोध घेऊ लागले,"कोण आहे? कोण आहे टेरेसवर? कोण रडतंय?"
इतक्यात त्यांना लॉबीमधून संतोष, नुपूर आणि रेहान येताना दिसले.
संतोषने पुढे जाऊन विराजला विचारलं,"काय झालं? एवढ्या रात्री कोणाला हाका मारताय?"
रेहानला बघताच विराज म्हणाला,"इथे टेरेसवर येण्याचा दरवाजा नेहमी उघडा असतो का? कुलूप नाही लावत का दरवाजाला? आता टेरेसवर आम्हाला कुणाचीतरी हालचाल जाणवली होती".
"सर! टेरेसच्या दरवाजाला तर नेहमीच कुलूप असतं! आणि तसंही एवढ्या रात्री कोण कशाला टेरेसवर जाईल".
"आता कोण कशाला गेलेलं हे आपल्याला वर जाऊनच समजेल" विराज जिना चढत म्हणाला.
नीरजा आणि नुपूर खालीच थांबल्या. आणि विराजच्या मागे रेहान आणि संतोषही जिना चढू लागले. टेरेसचा दरवाजा उघडाच होता. हे बघून विराज रेहानला म्हणाला,"मग? काय आहे हे? तू तर म्हणत होतास की टेरेसच्या दरवाजाला नेहमी कुलूप असतं".
रेहान घाबर्या आवाजात म्हणाला,"माहीत नाही सर! दरवाजा कसा उघडा राहिला ते! पण खरंच माझ्यावर विश्वास ठेवा! दरवाजाला नेहमी कुलूप लावलेलं असतं".
विराज संतोषला सावध रहायला सांगून स्वतः टेरेसवर जायला निघाला. रेहानसुद्धा त्याच्यापाठोपाठ वर निघाला. टेरेसवर अंधुकसा प्रकाश होता. विराज सावध राहून शोध घेत होता. तेवढ्यात त्याच्या पायाचा धक्का लागून काहीतरी घरंगळत गेलं. विराजने वाकून पाहिलं… ती बियरची बाटली होती. "अरे! ही बियरची बाटली इथे कशी आली? बहुतेक इथे कोणीतरी बियर पीत होतं. पण एवढ्या रात्री बियर प्यायला टेरेसवर कोण कशाला येईल?' विराज पुटपुटला.
रेहान म्हणाला,"सर! असंसुद्धा होऊ शकतं की ही बाटली जुनी असेल आणि आधीपासूनच इथे पडली असेल".
विराज बाटली उचलत म्हणाला,"आतासुद्धा यात थोडीशी बियर शिल्लक आहे. आणि एकदम चिल्ड आहे. याचा अर्थ आहे की ही बाटली जुनी नाही आत्ताचीच आहे".
तेवढ्यात संतोष आला आणि म्हणाला,"कोण होतं टेरेसवर? काही समजलं का? मला वाटतं की आपली चाहूल लागताच ती व्यक्ती पटकन पाईप उतरून खाली बाल्कनीत उडी मारून गेली असेल".
विराज विचार करत म्हणाला,"चला! आत्ताच जाऊन बघूया तिकडे!"
रेहान लगेच पुढे जाऊन म्हणाला,"चला!"
लगेचच ते तिघही टेरेसच्या खाली असलेल्या बाल्कनीत पोहोचले. त्याही रूमचा दरवाजा उघडा होता. हे बघताच विराज तिखट स्वरात म्हणाला,"या रिसॉर्टमध्ये सिक्युरिटी नावाची काही गोष्टच दिसत नाहीये! ना कोणत्या रूमला कुलूप, ना कोणता गार्ड!"
रेहान हळू आवाजात म्हणाला,"पण सर! आजपर्यंत या रिसॉर्टमध्ये कधी कोणती मुंगीही मारली गेली नाही अशाप्रकारे आणि कोणती चोरीदेखील झाली नाही. पण तरीसुद्धा दोन गार्ड ठेवलेत आम्ही रिसॉर्टमध्ये. माहीत नाही कसं पण एक गार्ड काल शिडीवरून उतरताना पडून जखमी झाला आणि दुसरा सध्या आजारी आहे".
विराज कोरड्या आवाजात म्हणाला,"इथली प्रत्येक गोष्ट जगावेगळीच आहे". तो परत बाल्कनीमध्ये तपास करू लागला. अचानक संतोष ओरडला,"हे बघ विराज! इथे काहीतरी आहे". आणि त्याने ती वस्तू विराजच्या हातात दिली. विराज त्या वस्तूकडे लक्षपूर्वक बघत म्हणाला,"ही कोणत्यातरी लेडीज सँडलची हिल आहे. बहुतेक एखाद्या तरुणीने टेरेसवरून बाल्कनीमध्ये उडी मारली असेल. म्हणून सँडलची हिल तुटली असेल".
"पण ही तरुणी आहे तरी कोण जी एवढ्या रात्री बियर पीत होती". संतोष आणि रेहान एकत्र म्हणाले.
"हे तर तपासानंतरच समजेल आपल्याला!" ती हिल स्वतःच्या खिशात ठेवत विराज म्हणाला. संतोष आणि रेहानकडे विराज वळला आणि म्हणाला,"एक गोष्ट मला खूप विचित्र वाटली. या एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये एकही सीसीटीवी कॅमेरा नाही? हल्लीच्या काळात साध्या पानाच्या टपरीवरसुद्धा सीसीटीवी लावलेला असतो!"
रेहान म्हणाला,"हो सर! तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी कित्येक वेळा गौतम सरांना याबाबतीत सांगितलंय पण त्यांचं म्हणणं असं आहे की सीसीटीवीमुळे गेस्टना अनकम्फर्टेबल वाटतं".
विराज रागात बडबडला,"हा गौतम पण ना वेडा आहे. आता या कारणामुळे पोलीस त्याला सतरा प्रश्न विचारतील".
नंतर ते तिघं त्या बाल्कनीतून परत खाली लॉबीत आले. लॉबीमध्ये कुणीही नव्हतं. विराज म्हणाला,"बहुतेक नुपूर आणि नीरजा अपापल्या रूममध्ये गेल्या असतील".
"ओके! मग चला आपण पण झोपायला जाऊया. आता थोड्याच वेळात सकाळ होईल. तेवढा वेळ तरी झोपुया" संतोष म्हणाला.
नंतर तिघही आपापल्या रूमच्या दिशेने गेले. विराजने ती बाटली आणि तुटलेली हिल पोलीसांना देण्यासाठी स्वतःजवळ ठेऊन घेतली होती. जेव्हा तो त्याच्या रूममध्ये पोहोचला तेव्हा नीरजा झोपली होती. विराजसुद्धा दरवाजा बंद करून शांतपणे झोपला. झोपून फक्त दहाच मिनिटं झाली असतील. इतक्यात रूमची डोअरबेल वाजली. "एवढ्या रात्री कुणी वाजवली डोअरबेल!"हा विचार करत विराजने दरवाजा उघडला. बाहेर संतोष उभा होता. विराजला बघताच म्हणाला,"नुपूर या रूममध्ये आलेय का नीरजासोबत?"
विराज आश्चर्य व्यक्त करत म्हणाला,"इथे? नाही रे! इथे फक्त निरजाच झोपलेय. नुपूर तुझ्याच रूममध्ये गेली असणार ना!"
संतोष काळजीच्या स्वरात म्हणाला,"मी माझ्या रुममधूनच येतोय आता! तिथे तर कुणीच नाहीये".
विराजने लगेच निरजाला उठवलं. "नीरजा उठ! प्लिज जागी हो!'
गाढ झोपलेली नीरजा डोळे चोळत म्हणाली,"विराज! मला झोप येतेय. कशाला उठवतोयस मला एवढ्या रात्री?"
विराज म्हणाला,"नुपूर आलेली का तुझ्याबरोबर आपल्या रूममध्ये?"
नीरजा त्याच्याकडे टक लावून पाहत म्हणाली,"आपल्या रूममध्ये कशाला येईल ती? ती तिच्या रूममध्ये झोपली असेल!'
विराज म्हणाला,'ओ गॉड! नुपूर तिच्या रूममध्ये नाहीये नीरजा! संतोष त्यांच्याच बाबतीत चौकशी करायला इथे आलाय. आम्ही टेरेसवर गेल्यानंतर तुम्ही इथेच होतात ना?"
नीरजा म्हणाली,"हो, आम्ही खालीच उभ्या होतो. पण नुपुरला त्या रात्रीच्या शांत वातावरणाची खूप भीती वाटत होती. म्हणून ती म्हणाली की मी माझ्या रूममध्ये जाते. ती गेल्यावर थोड्या वेळाने मीसुद्धा आपल्या रूममध्ये परत आले आणि झोपले".
संतोष रडवेल्या आवाजात म्हणाला,"ओ माय गॉड! नुपूर कुठे गेली असेल विराज!
तिला कुठे शोधू मी आता!"
विराज त्याला धीर देत म्हणाला,"असंसुद्धा असेल की नुपूर विनीत आणि तनिष्काच्या रूममध्ये असेल".
काळजीत पडलेले सर्वजण विनीत आणि तनिष्काच्या रुमबाहेर थांबून डोअरबेल वाजवू लागले. विनीत डोळे चोळत बाहेर आला. "अरे! तुम्ही सगळे इथे? काय झालं?"
संतोष म्हणाला,"यार! नुपूर आलेय का रे तुझ्या रूममध्ये?"
विनीत आश्चर्य व्यक्त करत म्हणाला,"नुपूर! ती कशाला येईल एवढ्या रात्री इथे? काय झालंय नक्की?"
विराज म्हणाला,"नुपूर तिच्या रूममध्ये नाहीये. म्हणून तिला शोधत आम्ही तुझ्याकडे आलो. जरा तनिष्काला विचार ना की तिला काही माहितेय का नुपूरबद्दल".
"ओके" म्हणून विनीत तनिष्काला उठवायला गेला. तनिष्का चादर डोक्यापर्यंत घेऊन झोपली होती. तिला उठवण्यासाठी जेव्हा विनीतने तिच्या डोक्यावरची चादर सरकवली तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण चादरीमध्ये तनिष्का नव्हतीच! फक्त दोन उश्या होत्या तनिष्काच्या जागी! विराज आणि संतोषला ही गोष्ट समजल्यावर दोघांनी हताशपणे उभ्या असलेल्या विनीतला विचारलं,"कुठे आहे तनिष्का! ती रूममध्ये नाही हे तुला समजलं कस नाही?"
विनीत कसातरी अडखळत म्हणाला,"रात्री जेव्हा आम्ही दोघं झोपायला गेलो तेव्हा तनिष्का माझ्या बाजूलाच झोपली होती. मला नाही माहीत ती अशी अचानक कुठे गेली ते!"
विराजला आता काळजी वाटू लागली. "खरंच, ही चिंता करण्यासारखी बाब आहे. आपण आत्ताच्या आता बाहेर जाऊन शोधू या तिला!"
लगेचच सगळेजण नुपूर आणि तनिष्काला रिसॉर्टच्या कानाकोपर्यात शोधू लागले. शोध घेत घेत सगळेजण गौतमच्या रूममध्ये गेले. गौतम बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडला होता. आणि त्याच्या शेजारच्या टेबलावर झोपेच्या गोळ्यांचं रिकामं पाकीट पडलं होतं. गौतमला दोन-तीनदा हाक मारूनसुद्धा तो उठला नाही. विराज म्हणाला,"असं वाटतंय गौतम झोपेच्या गोळ्यांच्या नशेमुळे बेशुद्ध पडलाय". रूममध्ये अजून काही मिळतंय का याचा गौतम तपास करू लागला. तेवढ्यात विराजची नजर कोपऱ्यातल्या सँडल्सवर गेली. त्याने दोन्ही सँडल्स उचलून पहिल्या. त्यातल्या एका सँडलची हिल तुटलेली होती……
"ओ गॉड! बहुतेक याच सँडलची हिल बाल्कनीत मिळाली होती" विराज म्हणाला.
विनीत ओरडला,"ही, ही तर तनिष्काची सँडल आहे!. ती इथे कशी आली?"
विराज विचार करत म्हणाला,"विनीत! मला या सँडलची हिल वरच्या बाल्कनीत मिळाली. तुला नक्की माहितेय का? की ही सँडल तनिष्काचीच आहे ते?"
विनीत घाबर्या आवाजात म्हणाला,'अरे हो! ही सँडल तनिष्काचीच आहे! ती कुठल्या संकटात तर नसेल ना रे?"
विराज धीर देत म्हणाला,"चल! आपण आत्ताच बाहेर जाऊन शोधुया या दोघींना! आता थोड्याच वेळात सकाळ होईल आणि पोलीससुद्धा येतीलच की आपल्या मदतीला".
घाबरलेले सर्वजण नुपूर आणि तनिष्काला हाक मारत विराजच्या मागे चालू लागले. निरजासुद्धा त्यांच्याबरोबर चालत होती. त्यांना शोधत शोधत सगळेजण रिसॉर्टच्या लॉनमध्ये आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सर्वांची नजर नुपूर आणि तनिष्काला शोधत होती. निरजासुद्धा इकडेतिकडे शोधत नजर फिरवत होती. तेवढ्यात अचानक नीरजा मोठ्याने जोरात किंचाळली…… सगळेजण दचकून निरजाच्या दिशेने धावले. नीरजा आवासून स्विमिंग पुलकडे बघत होती. जशी बाकी सगळ्यांची नजर स्विमिंग पुलमध्ये पडली, तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली… स्विमिंग पुलमध्ये एक बॉडी तरंगत होती!! विराजने रेहानला बॉडी बाहेर काढायला सांगितली. रेहानने लगेच ती बॉडी पाण्याबाहेर काढून बाहेर आणली. ती बॉडी दुसरी-तिसरी कुणाची नसून विनीतची पत्नी तनिष्काची होती……!

ओ गॉड! तनिष्का तर स्विमिंगमध्ये तरबेज होती! मग हे असं कसं झालं? आणि ही नुपूर कुठे गेली? आता! आता काय होणार पुढे??……

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults