लिही तू..

Submitted by पाचपाटील on 11 June, 2020 - 02:22

लिही तू..

एवढे सगळे जण लिहितायत.
आणि तू कशाला लाजतोयस येड्या?
पण तुझ्यापुरतं, तुला आत्ता जे खरं वाटतंय ते लिही.
किंवा तेच लिही.

आत्ता दुनियेबद्दल दाटून दाटून येणारे प्रेमाचे उमाळे जसे फोलकट आहेत तसेच नंतर कधीतरी स्वत:बद्दल चहूबाजूंनी चालून येणार्‍या घृणेच्या लाटाही बोगसच असतील, हे लक्षात घेऊन लिही.

सेक्सबद्दल डायरेक्ट नकोस लिहू.
आदिम भावनांचा शोध घेत असल्याचा आव आणत, आडून आडून, पण नेम धरून त्याच मुद्द्यावर घसरत जाण्याची एक नवीन पद्धत काढलीय आपल्या काही चॅप्टर लोकांनी...
तुझा पण तसलाच काही डाव आहे की काय...?
नाही ना..?

मग एखाद्या रात्री, ढगांच्या गडगडाटासकट आलेला वादळी सेक्स ओसरल्यानंतर, साकळून आलेल्या प्रशांत गहिर्‍या
संपृक्त मूडबद्दल किंवा नंतरच्या मन उडून गेलेल्या टेंपररी
विरक्तीबद्दल लिही.

फक्त 'कशात काही अर्थ नाही' असं वाटायला लागलं की लिहिण्यातही काही अर्थ नाही म्हणून पोस्टपोन नकोस करू...

उलट तोच धागा घट्ट पकडून आणखी खोलवर कुरतडत जाता आलं तर बघ..
जेवढा आत आत जाशील तेवढा सुटा सुटा तरी होत जाशील किंवा एकदाचा काय तो निकाल तरी लागेल.

लिहिताना त्या थोर-थोर, ग्रेट वगैरे लिहिणार्‍या लोकांचा लोड घेऊन लगेच भारावून नकोस जाऊ नेहमीसारखा किंवा
हातपाय गाळूनही बसू नकोस..
जसजसा वाढत जाशील तसं हे ही कचरापट्टी वाटायला लागणार आहे एखाद्या दिवशी.
सो चिल मार..

ते सामाजिक जाणिवा किंवा मानवी नातेसंबंधांचे गूढ पदर वगैरे तर पहिलं बाजूला सारून ठेव.
तुला ते झेपणारं नाही.

आणि तुझी भाषा तथाकथित अशुद्ध असल्याचा खुळा गंड लपवण्यासाठी त्या तथाकथित शुद्ध भाषावाल्यांना ऊठसूठ बोचकारे काढण्यात कशाला ऊर्जा वाया घालवायची उगाच?

तुझी भाषा हजारो पिढ्यांचे गुणधर्म घेऊन खळाळत प्रवाहीत होत, आपोआप विनासायास तुझ्या डीएनएमध्ये उतरलेली आहे आणि त्याचमुळे ती अस्सल चवीची आहे, हे अंतिम सत्य उमजून तुझा तुझा रस्ता सुधार.

आणि शेवटचं म्हणजे अजून किती दिवस-रात्री हे असं
अधांतरी उलटं लटकायचं आहे, हे एकदा नीट बसून कॅलक्युलेट करून ठरवून घे.
(तुझ्याच्यानं होत नसेल तर मला सांग... माझाही सेम प्रॉब्लेम आहे.)

अर्थात ह्याचेही काही फायदे दिसत असतीलच म्हणा तुला...
फांदी घट्ट पकडून सुरक्षित असल्याचं फीलींगही येतं आणि लोक मला उंच उंच उडू देत नाहीत म्हणून, अन्याय झाल्याची बोंबही ठोकता येते अधूनमधून...
पण लाँगटर्मसाठी हे काही बरं नाही.

आता लगेच,
"ह्या अनादि अनंत पसरलेल्या ब्रह्मांडात माझ्यासारख्या क्षुद्र जीवासाठी कसलं आलंय लाँगटर्म आणि कसलं शॉर्टटर्म!!!"
असली बाबागिरी चालू करू नकोस..

झोप त्यापेक्षा.
आणि मला पण झोपू दे.

दुपारची झोप मोडली की वस्सकन अंगावर धावून जायची सवय लागायला लागलीय मलापण इथं राहून राहून..!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लिहा हो बिंधास! Wink Lol

अवांतर : तुमच चिंतन करण्याचा प्रकार आवडला. असेच लिहिते राहा..

छान आहे हे... काही बाबतीत मम !! Lol
मलाही वाटायचे लिहू का नको, आजकाल फेसबुकवर करोडो लोक लिहीतातच की... आपले लिहीणे आवश्यक आहे का ?
पण स्वानंदासाठी लिहिले आणि काही लोकांना आवडल्यावर तर विन-विन परिस्थिती झाली.
तुम्ही पण लिहीत रहा!! Happy

@नौटंकी : धन्यवाद Happy _/\_

@ मी_ अस्मिता<< स्वानंदासाठी लिहिले आणि काही लोकांना आवडल्यावर तर विन-विन परिस्थिती झाली.>> +११. Happy

खरं आणि प्रांजळ पणाने सांगतो, माझ्या आयुष्यातील जी कांहीं उदिष्टे होती त्यातील आपण कांहीतरी लेखन करावे हे उद्दिष्ट कधीच नव्हते. तस बघाल तर मी मराठी साहित्यातील कुठली ही पुस्तके (एक दोन सोडल्यास) वाचलेली. देखील नाहीत . वर्तमान पत्रे मात्र नियमित वाचतो. व्हॉट्स ऍप चालू झाल्यावर सहज गंमत म्हणून कांहीतरी लेखन करायचो व ते लोकांना कधी कधी आवडायचे. मग त्याचा छंदच लागून राहि ला खूप कथा, ग्रामीण कथा लिहल्या, विनोदी लेख लिहलेे. मात्र ते दुसऱ्याला आवडेल याची हमी आपण देऊ शकलो नाही. कधी कधी मीच लीहलेल्या कथा (जून्या आणि नव्या) बाहेर काढतो आणि मनापासून वाचतो. त्यातील विनोदावर कधी कधी जोरात हसतो तर कधी मनात खिन्न होतो. कधितर डोळे पाणावतात देखील. व यातच मला खरा आत्म् आनंद मिळतो, हे सर्व का? तर या लेखातील परिस्थिती मी अनुभवली आहे. यातील सर्व व्यक्ती माझे कोणीतरी सगे सोयरे वाटतात. त्या मुळे मी यांच्यावर जीवापाड प्रेमही करतो. आता दुसऱ्याने आशा प्रकारची परिस्थिती अनुभवली नसेल तर त्याला हे लेखन कदाचीत रुचणार नाही हे मला चांगलेच माहीत आहे.
आता लेखनाची भाषा म्हणाल तर साधी सोपी,ओघवती सगळ्यांना समजणारी ,पण वाचताना समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचा ठाव घेणारी किंवा जादा पल्हाळ न लावता थोडक्यात अशय सांगणारी असली , मग आणि काय हवे. पाटील साहेब आपल्या लेखा मुळे मनातील अनेक गोष्टी बाहेर आल्या. तुमच्या या आत्मचिंतन कराव्या लागणाऱ्या लेखा बद्दल धन्यवाद.

@ Sanjeev Washikar, आवर्जून दिलेल्या एवढ्या सुंदर प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे..! Happy _/\_

खरं सांगतो पाचपाटील, माझा सुद्धा "सेम प्रॉब्लेम" आहे. माझ्या वतीने व्यक्त होत आहात अस वाटलं.
गात्र शहारून निघाली ओ वाचून! बराच वेळ राहील हे माझ्यासोबत.
अतिशयोक्ती वाटेल ही प्रतिक्रिया पण तर खरंय. तुम्ही अप्रतिमच लिहिता! _/\_

@ मंगेश विर्धे<< माझ्या वतीने व्यक्त होत आहात अस वाटलं. गात्र शहारून निघाली ओ वाचून! बराच वेळ राहील हे माझ्यासोबत.अतिशयोक्ती वाटेल ही प्रतिक्रिया>>>

तुम्हाला हे सगळं रिलेट झालं, ह्याचा आनंद आहे.
आणि तुमच्या प्रतिसादात काही अतिशयोक्ती नाही वाटली.
'हे मलाच उद्देशून लिहिलं गेलंय' असं फीलींग देणारी पुस्तकं, लिखाण आवडतं.. पण खूप ट्रायल्स अँड एरर्स झाल्यावर तसलं काही सापडतं... म्हणून म्हटलं की आपल्याला आवडतं तसं काही आपल्यालाच लिहिता येतंय का बघू.. Happy

@किशोर मुंढे, प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy