एकटीच @ North-East India दिवस २९

Submitted by सुप्रिया राज जोशी on 26 May, 2020 - 07:04

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

७ मार्च | दिवस ३०
प्रिय राज,

सारी वळणं संपून गेली. आसाम च्या खुल्या मैदानातून ताशी 50 किलोमीटरच्या भरधाव वेगाने मी आपल्या घराच्या दिशेने प्रवास करत आहे. हिरव्या शेतांमध्ये चमकणारे चंदेरी जलाशय डोळ्याला सुंदर दिसतायत पण तिथे आता नजर जात नाही. उद्या संध्याकाळी या वेळेस मी एअरपोर्ट ला जायला निघाले असेन. मग तर काय, या धावणाऱ्या ट्रेन च्या दहा पटीच्या वेगाने उडत मी आपल्या घरी येईन. त्याहून जास्त वेगाने मनात विचारांची खळबळ चालू आहे.

या प्रवासात मला कोणी कधीच रोखलं नाही; टोकलं नाही. मी सुद्धा नाही. क्षण क्षण - कधी सुखावह – कधी भयावह होता. पण जे क्षणभंगुर होते, त्याच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवणार? म्हणून तसेच चालवून घेतले. मनाने असा पवित्र घेतला असेल तर केवढे समाधान अनुभवता येते; ते अनुभवले. आपल्या सर्वात जवळच्या माणसांच्या सानिध्यातच आशा-अपेक्षा-आकांक्षा यांचे नाजूक धागे मनाभोवती वीण घालायला सुरवात करतात. आणि सुखदु:खाची झालर असलेले आयुष्याचे जाळे कधी तयार होते हे कळतच नाही. नकळतच आपण त्यात पूर्णपणे अडकून गेलेलो असतो. त्याचेच नाव संसार ठेवले असावे.

काल आईला फोन केला तेव्हा आईने सांगितले की, मी संसारात पडले; म्हणून मला परत घरी येणे भाग आहे. संसार हा जन्माबरोबर लागू होत नसतो. तो जाणतेपणी घेतलेला निर्णय असतो. जबाबदारी असते. ज्या आडनावाशी आजन्म बांधली गेले त्याच आपल्या संसाराचा धागा मला परत घरी ओढून नेत आहे.

पण या बंधना पलीकडेही तुझे अस्तित्व आहे. किंवा आपल्या नात्याचा धागा रेशमाचा असावा. नाहीतर प्रत्येक वळणावर तुझी इतकी तरल आठवण आली नसती. मावळणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तीव्र झाली नसती. गंगटोक, गोहाटी, माजोली, काझीरंगा, माफ्लोंग, नोव्हेत, शिलॉंग पडेंग, लोन्ग्वा, डोंग... मला विचारशील तर गेला महिनाभर मी ह्या गावांचे निव्वळ स्वप्न पहात भटकले. यापैकी एकेका गावाला तुझ्याबरोबर येउन पुन्हा भेटायचं, ही स्वप्नपूर्ती आहे. “मै अगले साल राज के साथ वापस आउंगी|” असं मी इथे एकेकाला प्रोमीस करून आले आहे. कशी गमंत आहे, स्वप्न जरी मला पडलं असलं तरी त्याला साकार करायचं म्हणजे तुझी साथ लागतेच.

तरीही तुला आजवर एकही पत्र लिहिले नाही. कदाचित मोबाईलच्या अल्फान्युमरिक की-पॅड वर एक बोट फिरवत हृदयाची भाषा व्यक्त करता येणार नाही. किंवा तुझ्याशी जे हितगुज करायचे ते दुसऱ्या कोणी वाचून चालणार नाही हे कारण असेल. पण आजचे पत्र तुला लिहावे असे वाटले. दिवस नुकता उजाडतोय तेव्हढयात हे काय, लिहायलाही घेतले आहे. मग झोप येत नाहीये तर इथे ट्रेन मध्ये दुसरे करू तरी काय? आणि नाहीतरी आजचा दिवस संपेपर्यंत थांबून पत्रासाठी काही खास तपशील सापडतील असे वाटत नाही. मन उंडारत असलं तरच आजूबाजूचे तपशील गोळा करायचा नाद लागतो. नॉर्थ इस्ट च्या प्रवासातून माझं मनही आता निवृत्त झालचं, मला अस वाटलं तो माझा भ्रम होता. कारण आताच एक घटना अशी घडली की ...

पहाटेचे साडे पाच होउन गेले असतील. ट्रेन ने कुठचे स्टेशन सोडले म्हणून वाकून पाहिले तर धक्काच बसला. न्यू तिनसुकिया हून गोहाटी ला जाता जाता वाकडी वाट करून माझी ट्रेन दिमापुरला काय म्हणून आली? इथे इन्ट्रास्टेट ट्रॅव्हल करताना मधेच आसाम ला भोजा करून जावे लागायचे तेव्हाही मला असेच आश्चर्य वाटायचे. दिमापुर स्टेशन वर ट्रेन थांबली तसे पाय मोकळे करायला माझे मन खाली उतरले. ट्रेन निघाली तरी दिसले नाही म्हणजे बहुदा त्याची गाडी चुकली असावी. आता या मनाला शोधून परत आणायचे हे मोठ्या जिकरीचे काम आहे. त्याच्या कलाकलाने घेत, दिमापुर पासून पुढच्या ट्रीपमधल्या एकेक आठवणी गोळा करत करत त्याला वाटेवर आणावे लागेल. त्याच आठवणीचा गुडबाय सिरीज मधला शेवटचा व्हिडीओ या पत्राबरोबर जोडायचा.

तुला गुडबाय करून घरातून निघत होते खालच्या रस्त्यापर्यंत मला निरोप द्यायला प्रशांतने तुला बळेबळेच ओढून आणलं. माझा जो प्रवास तुला मान्य नाही त्याच्या वाटेवर मला तेवढीही सोबत द्यायला तुझ्या किती जीवावर आलं होतं. आज या प्रवासाचा शेवटचा निरोप घेउन, तुझ्याकडे परत येताना, खरतर माझ्याही जीवावरच आलं आहे. पण मला कोणीही बळेबळे ओढून ह्या वाटेवर परत आणलं नाही. सारे घडत गेले. मी मार्गी लागत गेले. कसे ते या पत्रमालिकेत लिहिले आहेच, जे वगळले आहे त्याचे ओझेही मला बाळगायचे नाही.

आजचा सूर्य उगवला. आता एक दिवस राहला आणि एक पत्र राहिले. माझ्या स्वप्नातून आपल्या सत्यात परत यायच्या आधी उद्याच्या पत्रात उरले सुरले सारे उपडी करून, रित्या मनाने घरी येईन.

फक्त तुझीच.

अरुणाचल प्रदेश आणि फायनल गुडबाय > https://youtu.be/bLa1Q_2Hujw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात गुडबाय मेघालय ह्या व्हिडीओ ची लिंक टाकायची आहे. ती एखाद्या दिवसात टाकेनच. शेवटचा व्हिडीओ माझ्या खूप जास्त जवळचा आहे म्हणून तो आधी पूर्ण केला. शेवटचे पत्र राहिले आहे. ते साऱ्या पत्रांमधील न लागलेल्या संदर्भांचे उत्तर आहे असे म्हटले तरी चालेल.

तुम्ही सारे लेख वाचले, माझ्या काळजीपोटी सल्ले दिले, कधी धपाटे सुद्धा मिळाले (ओणव उभं केलं नाही तेवढच नशीब), त्याबद्दल धन्यवाद.

thanks shubhadap
आज प्रतिसाद दिला मला बर वाटलं. सिरीज संपता संपता ओळख झालो.

लेखमाला संपत्ये हे नाही आवडलं तरी गोड मानून घेतोय.
अजून अशा अनेकानेक सोलो ट्रिप घडाव्या आणि ह्या लेखमालेमुळे प्रोत्साहित होऊन सोलो ट्रीपला जाणारे तयार व्हावे ही सदिच्छा.

मी तुमची सगळी पत्रे वाचत असताना मन नॉर्थ ईस्ट ला निघून जायचं त्यामुळे प्रतिसाद द्यायचा राहून गेला..पण आता ही लेखमाला संपणार आहे तर वाईट वाटतंय..मी पण नॉर्थ ईस्ट ला एक ट्रीप संपून घरी वापस जातेय अस वाटतंय ..

हर्पेन ... जवळजवळ प्रत्येक पत्रावर प्रतिक्रिया देउन मला प्रोत्साहन दिले ... खूप धन्यवाद
अमृताक्षर ... माझ्याबरोबर प्रवास करत होती म्हणून धन्यवाद (म्हणजे वाचल्याबद्दल) आणि खरच आज ओळख होतेय तर खूप चांगल वाटतय

या लेखमालेच्या सुरुवातीस बराच गदारोळ झालेला होता. अनेक लोक (मी धरुन) फार जजमेंटल झालेली होती. नंतर मग एक लाट आली ती त्या वाचकांची ज्यांच्या मते - असे जजमेंटल होणे चूकीचे आहे. जगा आणि जगू द्या.
मला नक्कीच ' दर वेळी न्यायसिंहासनावर बसू नये' हे शिकायला मिळाले. स्वतःचा आश्वस्त परीघ (कंफर्ट झोन) विचारातही मला सोडता येत नव्हता. अजुनही तो सोडता येतोय असे नव्हे , अजुनही तुमचे धाडस मला पचते आहे असे नव्हे पण आता निदान जज करुन, आपण चूकीचे करत होतो, हे कळलेले आहे.
मी पूर्ण मालिका वाचलेली नाही. पण एक मात्र आहे तुमच्या जागी कोणी वेस्टर्न (पाश्चिमात्य) तरुणी असती तर मनात कौतुकच दाटले असते. किती स्वतंत्र वृत्तीच्या, मनस्वी असतात नाही तिकडच्या स्त्रिया .... वगैरे वगैरे.
तुमची मात्र सतत काळजी वाटत राहीली होती. Sad आणि हे असे का तेही माहीत नाही.
असो.
सर्वांना प्रतिसादकांना तुम्ही नेहमी पोचपावती देत आलेल्या आहेत, हा गुण देखील अजुन एक कौतुकास्पद गुण आहे. Happy गुड लक टु यु.

मला अशा प्रकारचा प्रवास कधी जमेल, करावासा वाटेल, असं आत्तातरी वाटत नाहीये. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे कल्पना जरी मांडली तरी वडील अंगठे धरुन उभं करतील!
पण तुम्ही हा अतरंगी पण सप्तरंगी प्रवास केलात, त्याची मजा घेतलीत आणि नीटपणे परत आलात ह्याचा आनंद झाला.
असेच नवनवे अनुभव घ्या आणि इथे लिहीत रहा. शुभेच्छा

सामो आणि अनया , खर म्हणजे वाचून डोळ्यात पाणी आले. एकत्र उद्याच्या पत्राची डागडुजी चालू होती आणि तेव्हाच या प्रतिक्रिया वाचल्या.
धन्यवाद

या प्रवासाने जितके शिकवले आहे क्वचितच कुठे शिकले. तशा प्रवासला न जाताच त्याचे आकलन होणे कठीण आहेच ना? म्हणून लोकांना काळजी वाटते. माझे अनुभव त्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे वाटतात. पण मी कुठच्या तरी पत्रात म्हटले आहे असे वाटते (नक्की आठवत नाही) की जेव्हा अत्यंत कठीण परिस्थितीत एका क्षणात सारे बदलून मार्ग निघतो तेव्हा ती किमया असते पण अशी उलथापालथ जेवढ्या वेळा होते तेवढे १ आपल्या हातात काहीही नाही २ त्या अद्भूतते मध्ये आपल्याला सांभाळायची शक्ती आहे... यावरचा विश्वास वाढत जातो. शिवाय विशेषत: हा प्रवास सुरु केला तेव्हाच भीती मरून गेली होती, ते तसे का झाले हे उद्याच्या पत्रात येईलच. उद्याचे पत्र खूप पर्सनल आहे पण सर्वांबरोबर शेअर करायचा कोन्फिडन्स तुमच्याकडून मिळाला. आता ते वगळून टाकणे अर्धवट वाटते आहे.

उद्या अजून थोडा उलगडा होईलच पण जमलेच तर, पुन्हा एकदा पहिले डायरी ला लिहिलेले पत्र वाचा. जुने संदर्भ नव्याने कळतील.
पूर्वी डान्स करायचे तेव्हा शिकवले होते, प्रेक्षक मायबाप असतात. वाचकांना धन्यवाद व्यक्त करताना तसेच वाटत आहे.

पत्रात पत्र लिहून झाले.
with love
supriya

मी कधीच प्रतिक्रिया दिली नाही पण मालिका वाचली. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात वयाने पण तुमचा stamina मानसिक व शारीरिक दोन्ही प्रकारचा बघून थक्क झाले.
रस्ता विसरण्यासाठी सेम पिंच. मला वाटायचे मीच एक बेक्कार आहे Lol
माझ्या मुलाने मागच्या आठवड्यात एका अंतराळवीराला प्रश्न विचारला How spending time in space has changed your outlook towards life?
हाच तुम्हालाही विचारते. समारोपाचा एक लेख लिहू शकता का त्यात लिहा हे ! मला तितकी काळजी नाही वाटली तुमची , समहाऊ तुमच्या तारतम्याने सुखरूप रहाल वाटले होते तसेच झाले. Happy
तुम्हाला खूप खूप सदिच्छा. पुढच्या वेळी tag along म्हणून मला न्या, रस्ता विसरणारच पण एकापेक्षा दोघी बर्या Wink !
काळजी घ्या.
धन्यवाद

मला अशा प्रकारचं लिखाण वाचलेलं पटकन विसरायलाही होतं. त्यामुळे कदाचीत सगळं परत वाचावं लागेल. पण साधारण लक्षात असायचं वाचता वाचता. मी गेले दोन महिने कामाच्या (आणि इतरही काही) दडपणाच्या काळात वाचलेलं तुमचं लिखाण मला माझं दडपण कमी होण्यासाठी मदत करत गेलं. मी माझ्या पाचेक मिनिटांच्या ब्रेकसाठी असे वाचन करते. पुन्हा कामात फोकस व्हायला मदत होते. काही वेळा बरेच दिवसांची गॅप घेऊन वाचन केलं मग मला वाटतं माझ्या मैत्रीणीची फार आठवण झाली तेव्हा रिप्लायही केला होता. तुम्ही लगेच त्याला उत्तर दिल्यामुळे आवडलं. मग माझी प्रतिक्रिया उडवली नाही Happy असो. काय लिहिणार होते देव जाणे. पण तुमची सिरिज छान सुरु आहे. काही लोकांनी नाकं मुरडली तरी तुम्ही मात्र लिहित राहिलात हे अतिशय आवडलं आहे. Happy

एकही व्हिडिओ पाहाणं झालं नाही. केव्हातरी पाहीन.

रात्र थोडी सोंगं फार दिवस असले की अशी प्रवासवर्णनं वाचावीत. आपल्या अवतीभवतीची सोंगं फिकी वाटू लागतात. Wink
पुन्हा असा कुठला प्रवास केलात किंवा आधी केला असलात तरी लिहा. Happy

How spending time in space has changed your outlook towards life? >> interesting
पाच मिनिटांच्या ब्रेकसाठी ... +१ नवीन आयडिया
एकापेक्षा दोघी रस्ता चुकल्यावर हव्या हे ही आवडले
आज वाचकांची नव्याने ओळख होतेय अस वाटतय
खूप थॅन्क्स अनया, वेका
७ मिनिटे काढून जमला तर शेवटचा व्हिडीओ बघ. तो माझ्या सर्वात जास्त जवळचा आहे म्हणून मी सर्वांना सांगते. Happy

वाचले सगळे भाग.

मध्ये बर्‍यापैकी मो ठाखंड पडला ( दोन खंड पडले ?) त्यामुळे जरा लिंक तुटल्यासारखं वाटलं.
एका भागात ऐन रात्री भर रस्त्यात उतरणं , पुन्हा पुन्हा वाट चुकणं यामुळे पुनरावृत्तीचा कंटाळा आला. पण ते तुमचे अनुभव होते. तुमच्यासाठी प्रत्येक अनुभव नवा आणि सारखाच असणार.
तुमच्यामध्ये काही चाइल्डलाइक क्वालिटीज आहेत आणि त्या तुम्ही दडपून , दडवून ठेवत नाही, असं विशेषतः व्हिडियोज पाहताना जाणवलं.

तुम्ही जे जे केलं य त्यातलं काहीही मी करण्याची शक्यता शून्य असल्याने माझ्यासाठी हा प्रवास अद्भुत असाच होता.

पुन्हा कधीतरी सगळे भाग सलग वाचून पाहेन.

बरोबर आहे भरत, दोन खंड ... पत्र तयार असली तरी व्हिदिओ टाकायची वेळ आली की अडायचं. ते एडीट करायचे बाकी होते.
२३फेब्रुवारी बद्द्ल असेल तर तो दिवस ही थोडा कंटाळवाणा होता.... perfect observation
childlike ... no comments Proud

ही प्रतिक्रिया वाचून मी विचार करते आहे, जर पुस्तक लिहिले तर ते वाचकांना आवडले पाहिजे, मग त्यांना कंटाळा येउ नये असे काय काय बदल करावे लागतील? पुस्तकाचे ठरवलेच तर त्यावेळेस हे पत्र पुन्हा ठरवलेच तर हे पत्र वाचून नक्की बदल करेन. पुन्हा सिरीज वाचाल्या जमलीच तर अजून सजेशन आले तरी खूप उपयोग होईल. इथे किंवा मला वयक्तिक लिहून पाठवल्या तरी चालेल.
आभार.

प्रतिक्रीया देण्याआधी उद्याच्या लेखापर्यंत थांबावं का असा विचार करत होतो पण त्यात बरेच वैयक्तिक तपशील येणार आहेत असां लिहिलत त्यामुळे त्यावर कमेंट न करता आजच लिहितो.
मी आत्तापर्यंतचे सगळे भाग वाचले आणि प्रवासवर्णन म्हणून हे लेखन मला आवडलं नाही. लिखाण, शैली, प्रवासवर्णन लिहीण्यासाठी घेतलेला पत्राचा फॉर्मट हे सगळं छान आहे पण मला हा प्रवास 'खरा' वाटला नाही.
तुम्ही खोटं बोलत किंवा लिहित आहात असं मी म्हणत नाहीये पण 'प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा उत्कट' की काय म्हणतात तसं प्रत्यक्ष अनुभवांपेक्षा लेखन जास्त मसालेदार असं काहीसं वाटलं. (सुर्योदय झाल्यावर सामान सोडून पळत सुटणं, नादात अंधार झाल्यावर रस्ते चुकणं वगैरे )
बरं नसताना जनरल बोगीतून प्रवास करणं हे उगाच वाचकांनी "उगी उगी" करावं म्हणून लिहिल्यासारखं वाटलं.
तंबूतून बाहेरचं दृष्य पाहून आवाक झालेले वगैरे फोटो "रिक्रिएट" केल्याचं नंतर लिहिलच आहे. त्यामुळे एकंदरीत फिक्शन म्हणून बघितल्यास लिखाण आवडलं.
शिवाय सुरूवातीला तुम्ही लिहिलं होतत की पत्र आधीच लिहिलेली होती, इथे न बदल करता जशीच्या तशी देणार आहात. आता म्हणताय पुढच्या पत्रांची जुळवाजुळव सुरू होती वगैरे. नक्की कधी केलं आहे लिखाण ? (की माझ्या समजण्यात काही गोंधळ होतो आहे)?

शिवाय 'एकल प्रवास' किंवा बॅकपॅकींगच्या नावाखाली का ही ही खपवल्यासारखं वाटलं. (उदा. आंघोळीच्या टॉवेलचा आकार आणि वजन नको म्हणून हातरुमाल वापरला वगैरे! )

तुलनाच करायची झाली तर मिसळपाव वरचा एकजण देशोदेशी एकटा फिरत असतो. अगदी अफगाणिस्तानही जाऊन आला आहे. त्याच्या प्रवासवर्णनांमध्ये एकंदरीत एकल प्रवासाबद्दल कुठेही उच्चासनी भावना दिसत नाही. इथे मायबोलीवर साधना, रैना, अनया ह्यांनी त्यांच्या ट्रेक्सची प्रवासवर्णनं लिहिली आहेत, ते ही अतिशय प्रांजळ आणि मुख्य म्हणजे "प्रामाणिक" लिखाण आहे आणि त्यामुळे खूप आवडलं होतं.

जाताजाता, अनयाने कुठल्यातरी एका भागावर "अंगठे धरून उभं करणे" ह्याबद्दल लिहिलं होतं, त्यावरून प्रत्येक एकाआडएक भागांच्या प्रतिक्रीयांमध्ये विनोद करणं हे तिला नसेल =झालं कदाचित पण मलाच जरासं इरीटेट झालं.

असो, पुस्तक छापणार असाल, तर त्या करता खूप शुभेच्छा.

वाईट मत असेल तरीही प्रामाणिक प्रतिक्रिया द्यायची अशा कमी मिळतात
साधना,रैना, अनया या सजेशन बद्दल ही धन्यवाद ... नक्की वाचेन. आधीच म्हटल्याप्रमाणे अशा आणखी प्रतिक्रिया पुस्तकासाठी खरच उपयोगाला येतील.

ताबू फोटो >> खरय. फोटो हवे तसे काढायच्या वेळा अनेक वेळा आल्या, हातात कमेरा होता म्हणून त्यात गंमत वाटायची.
प्रतिमा उत्कट >> असेल ... कारण प्रवासापेक्षा माझ्याबद्दल जास्त लिहील गेल आहे. प्रवासवर्णन नक्कीच असे नसते
प्रवास खरा वाटला नाही >> म्हणजे वाचकांना तो वाटणार नाही. हाताबाहेरचा .. कल्पनेपलीकडचा वाटेल. पुस्त्काआधी त्याचा विचार करावा लागेल.
ओणवे उभे करायचे >> एरव्ही मी अनया असते तर मला ओणव उभ करायचा विनोद वाचून गंमत वाटली असती. सुप्रिया म्हणून मला तो विनोद आवडला. म्हणून परत परत वापरला असेल. काहीना पर्सनल रेफेरंस ची मजा आवडणार नाही असही असू शकत - आताच जाणवल - आपण खूप वेळेस "व्यक्ती तितक्या प्रकृती" हे विसरून जातो - पुढच्या वेळी असे कॉमेंट करताना नक्की विचार करेन.
फिक्शन म्हणून बघितल्यास लिखाण आवडलं>> पण ते फिक्शन नव्हत Sad
आंघोळीच्या टॉवेलचा आकार आणि वजन नको म्हणून हातरुमाल वापरला वगैरे! >> अरे हसू - वैतागू नका पण खरच टोवेल च खूप ओझ वाटत मला. मी नाही नेत. पाठीवर सामान मलाच उचलाव लागत ते ही झेपायला हव. थंड पाण्याची कधी कधी वाईट किक असते - पण त्याच्यामुळे मूळ प्रवास अडत नाही म्हणून चालते.
मसालेदार wrt सुर्योदय झाल्यावर सामान सोडून पळत सुटणं, नादात अंधार झाल्यावर रस्ते चुकणं ... अगदी खर आहे तेच लिहील आहे.
मागे मी एक सोलो ट्रीप LOC वर १ महिना फिरून केली होती... कधी कधी अशा forward post ला गेले जिथे कोणीही civilian अजून गेलेला नाही. जिथे जायचे तिथे खूप पैसे असून उपयोग नव्हता. फक्त माणुसकी वर सगळा भार आहे हे कळले तसे तीच पडताळण्यासाठी ५००० रुपये जवळ ठेवले होते. २७ दिवसानंतर परत आले तेव्हा जवळ २२०० रुपये शिल्लक होते. माणूसकी किती पडताळली असेल त्याचे मोजमाप नाही. मला ISI चा एजंट समजून आर्मी ने पकडून नेले होते, आणि काय काय ...
पण त्या सामान रस्त्यावर पडलेल्यांचा व्हिदिओ टाकेनच उद्यापरवा... जरी विचित्र आहे तरी खरे आहे पण ते पुस्तकाच्या वाचकांना मी खोटे लिहिले असेच वाटले तर? तिथे तर फोटो व्हिदिओ देता येणार नाहीत. विचार करेन.पब्लिश करायचं तर कस कराव लागेल?

सुरूवातीला तुम्ही लिहिलं होतत की पत्र आधीच लिहिलेली होती, इथे न बदल करता जशीच्या तशी देणार आहात.>>
हो. ती पत्र त्या त्या प्रवासाच्या दिवशीच ऑनलाईन पाठवली आहेत माझ्या फेसबुक वर Happy
पण शेवटची चार पत्र पाठवली नव्हती. टाईप केली तरी नेट नव्हत अरुणाचल ला आणि खूप पर्सनल होत गेली होती. सासू, नवरा आणि शेवटचे माझ्या वडिलांना. पाठवावे असे वाटले नाही.
पण शेवटच्या पत्राची डागडूजी करतच आहे. करतच आहे.... अर्धवट सोडू नये असेही वाटते म्हणून टाकायचे. नाहीतर ते डायरी सारखे पान इथे टाकायला खूप जीवावर येते आहे. पण पुस्तकाच्या दृष्टीने त्याचा काय परिणाम होईल त्यासाठी पराग मला खरच उद्या सांगितले तर मदत होईल.
बर नसताना बोगीतून, उच्चासनी भावना >> उद्याच्या पत्राची लिंक त्या सुरवातीच्य पत्रांना आहेच पण उद्यापर्यंत प्रतिक्रिया लिहायची थांबली नाही ते thoughtful...त्यामागची सदभावना पोहोचली. पण प्लीज प्रामाणिक टीका जमेल तेवढी सांग. खूप धागे मिळाले ...पुस्तक पब्लिश करायच्या आधी विचार करायला.
खूप खूप धन्यवाद

Parag plus 100. Man you nailed it. This whole journey had put a lot of strain on the other kind people in this region.

Parag plus 100.>> हो. माझ्यासाठी कटू औषधासारखे आहे Sad आहे पण उपयोगी आहे
खरच +१००

सुप्रियाताई, ही पूर्ण सिरीज एका अलिबाबाच्या गुहेसारखी वाटली! दरवेळी तुमच्या पोतडीतून काय निघेल याची उत्सुकता होतीच. तुमचा पत्ररूपाने लिहायचा form वेगळा आहे व आवडलाही. काळजी मात्र वाटलीच. आणि आता हायसंही वाटलं. तुमच्या माणसं जोडण्याचं कसबेचा हेवा वाटला. तितकाच हेवा रस्ते शोधण्याचाही!
तुमचे पुस्तक लवकरच प्रकाशित होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत!

चिन्नू ताई म्हटल की नात जोडलं जात ... मग आपण होउन वेगळ्याने माणसं काय जोडायची?
प्रतिक्रिया, शुभेच्छा बद्दल खूप थंक्स.

सुप्रिया, बहुतेक सगळे भाग वाचले काही आवडले काही आवडले नाही. मी पण केंद्राच्या कामाने पूर्वांचलमध्ये बरीच फिरलीये त्यामुळे बरीच उत्सुकता असायची वाचताना.... धाडसाचं कौतुक वाटलं तरी त्याचबरोबर काळजीही वाटत होती. ... सुखरूप परत आली... हायसं वाटलं ...
पुस्तक लवकरच प्रकाशित होवो!

मंजुताई, नॉर्थ इस्ट मध्ये फिरली आहे म्हणजे उत्सुकता काय असेल कळली. मी ही इतरांच्या तिथल्या प्रवासाच्या गोष्टी ऐकायला उत्सुक असते.
पुस्तकाबद्दल माझा निर्णय पक्का नव्हता तेवढ्या शुभेच्छा मिळत आहेत. आपल्याला ज्यातून काहीच मिळणार नसते तरी कोणाला काही चांगले मिळते ते मिळावे ही भावना असते. खूप खूप धन्यवाद

मी तुमची संपूर्ण सिरीज वाचली , काही आवडली, काही नाही, कधी कधी तर असे वाटले की किती फेकतेय ही बाई, पण तरी वाचून प्रतिसाद देणे टाळले, पण इकडचे प्रतिसाद त्यांना तुम्ही दिलेली उत्तरे अन महत्वाचे म्हणजे तुमचे शेवटचे पत्र वाचून म्हटले की मी ही लिहितेच माझे मत.
मुद्दाम ह्या धाग्यावर लिहितेय कारण तिकडे सगळे गोड गोड गोड बोलताना माझा तिरकस प्रतिसाद नको.

मला कधी कधी वाटत होते की तुमच्या बऱ्याचश्या पत्रातील प्रसंग वा अनुभव कदाचित मनाचे असतील पण भरत यांनी या धाग्यावर लिहिले की एका पत्रात काही बाबी त्यांना आवडल्या नाही तर यावर तुम्ही जे लिहिले ते पटले नाही, कारण जर अनुभव खरे आहेत तर त्यात बदल का करावा? अन जर बदल केले तर तसे लिहा तरी की काही प्रसंग काल्पनिक आहेत

<<<ही प्रतिक्रिया वाचून मी विचार करते आहे, जर पुस्तक लिहिले तर ते वाचकांना आवडले पाहिजे, मग त्यांना कंटाळा येउ नये असे काय काय बदल करावे लागतील? पुस्तकाचे ठरवलेच तर त्यावेळेस हे पत्र पुन्हा ठरवलेच तर हे पत्र वाचून नक्की बदल करेन. >>>

अन हे वाचून किमान माझी खात्री पटली की जरी सगळे नसले तरी खूप सारे प्रसंग नक्कीच स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वा लोकांकडून स्तुती ऐकण्यासाठी लिहिले असावेत.
या धाग्यावर अजूनही काही लोकांनी नकारात्मक प्रतिसाद लिहिलेत म्हणून कदाचित तुम्ही तुमच्या शेवटच्या पत्रात तो आयुष्य संपवायचा प्रसंग लिहिला की काय असे वाटले जेणेकरून इकडे जे निगेटिव्ह बोलले ते जाऊन तुम्हाला सहानुभूती मिळेल, अन असेच काहीतरी तिकडे झाले देखील.

असो,

मला जे लिहायचे ते कदाचित नीट शब्दांत मांडता आले नाहीये, पण कृपया गैरसमज नको, ही फक्त माझी मते आहेत, ती मांडली कारण जर खरेच तुम्ही असे काही केले असेल तर ती वाचकांची फसवणूक आहे अर्थात हे ही माझे वैयक्तीक मत☺️

सर्वापेक्षा वेगळा प्रतिसाद द्यायचा म्हणजे सर्वांनाच नाही जमत
आणि सिरीज वाचली हे सुद्धधा चागले आहे.
धन्यवाद

खरे सांगू का फोटो ज मध्ये ती समथिंग इज नॉट राइट फीलिन्ग लगेच दिसून येते आहे डोळ्यांमध्ये. आत्महत्या करायचा विचार करत असताना तुम्हाला काउन्सेलिंग ची व औषधे, मेडिकल अटेन्शनची गरज असताना तुमच्या केअर गिव्हरनी असे एकट्याने बाहेर कसे पाठवले? अनोळखी ठिकाणी जीव दिल्यास इतर साध्या सुध्या व अनभिज्ञ लोकांना हे कसे हँडल करावे कळत नाही. म्हणजे इथे मेट्रोत सुद्धा लोक गडबडतात ते पहाडी खेडवळ लोक त्यांनी तुम्हाला काही इजा झाल्यास कसे हँडल केले असते असा एक मच्युअर अ‍ॅडल्ट सारखा विचार आला होता का ट्रिप प्लॅन करताना? साहस वगैरे अतिशय मान्य आहे तुमचा वैयक्तिक चॉइस पण ह्याला एक मेडिकल इमर्जन्सी, पब्लिक इमर्जन्सीची पण बाजू आहे. ती कृपया लक्षात घ्या. परत अशी मनःस्थिती झाल्यास कृपया अन प्लँ न्ड परक्या जागी न जाता ओळखीच्या जागी व ओळखीच्या माणसांना तुमच शोध घेता येइल व उपाय योजना करता येइल अश्या ठिकाणी राहा. सर्व सोडून निघून जावे असे वाटायचे प्रसंग जीव्नात येतात.
तुम्हा ला तुमचा बॅलन्स सापडो हीच सदिच्छा.

थॅन्क्स अमा
१ कोणाला क्लिनिकल डिप्रेशन येणे,
२ प्रोफेशनल हेल्प घेणे,
३ प्रोफेशनल हेल्प मिळणे
४ सुयसायडचा विचार येणे,
५ टेन्न्डन्सी असणे,
६ प्रयत्न करणे
हे सर्व वेगवेगळे वर्ग झाले.
There are various factors contributing to the cause and the effect of each of them. Moreover each case is different and even the same environment or ecosystem does not produce the same results.
माझ्या वर्गासाठी माझ्या केस मध्ये घ्या प्रवासाने एखाद्या औषधापेक्षा मोठे काम केले आहे. याचा अर्थ मेडिकल हेल्प घ्यायची नाही असा मुळीच नाही आणि पण त्याने प्रोब्लेम्स कायमचा संपून जाईल, हे ही जरुरी नाही.

आपली सपोर्ट सिस्टम असते त्याने मात्र वरच्या सर्व वर्गात फरक पडतच असतो. त्यात कुटुंब, मित्रमंडळी, ऑफिस, शेजारी, सोशल मिडिया, डॉक्टर्स आणि गव्हर्मेंट यंत्रणा आलीच पण त्यापलीकडे मला तर युनिव्हर्स चे ब्लेसिंग मिळाले असा माझ्यापुरता निष्कर्ष मी काढलेला आहे. औषधाने जे समूळ निघून गेले नसते ते मूलगामी सकारात्नमक बदल माझ्यात झाले. त्यामुळे हा अनुभव हे माझे दुर्भाग्य नाही तर मी भाग्य समजते.
जर मच्युअर अ‍ॅडल्ट सारखा विचार कोणी करू शकत असेल तर ती category वर उल्लेख केलेल्या सहा वर्गात मोडणारच नाही.
किंवा उलट सांगायचे तर जेव्हा कोणाच्या वाट्याला वरील सहा वर्गातील एक अनुभव येत असतो तेव्हा तो mature adult सारखा विचार करायच्या परीस्थितीत नसतो. शेवटी तू लिहिलेला सल्तुला खूप मोलाचा आहे खरतर पण दुर्दैवाने ज्या माणसाने तो पाळायला हवा त्याला तेव्हा तो पाळयला जमत नाही. जेव्हा कोणाच्या आतून चांगली किंवा वाईट प्रेरणा येते तेव्हा ती सर्व थीओरि -नोलेज्च्या वरचढ असते. मला ती प्रेरणा मिळाली हेच नेमके माझे भाग्य आहे.

पण एवढे मोलाचे अनुभव मिळाल्यानंतर आता मच्युअर अ‍ॅडल्ट सारखा हा विचार आता केला नाही तर मात्र ते अयोग्य आहे, असे वाटते. खर सांगू मला शेवटच्या पत्रात खूप मैत्री, सदिच्छा मिळाल्या, पण आता माझ्याकडे भरभरून आहे. इतके की मी या वर्गापेक्षा वेगळ्या सातव्या वर्गात मोडत आहे. माझ्याजवळचे इतराना द्यायचे थोडेफार काम मी करू शकले तर या अनुभावामागे युनीव्हर्स चा माझ्या एकटीच्या आयुष्याहून फार मोठी योजना असावी असे मला वाटेल. त्यासाठी प्रार्थना करा. माझ्या परीने या क्षेत्रात मी काम सुरु सुद्धा केले आहे. ज्यांना जेव्हा अशा life altering सपोर्टची गरज आहे त्यांना ते वेळीच मिळावा एवढी इच्छा आहे.

अमा खूप आभारी आहे, मनातील सारे प्रश्न प्रामाणिकपणे विचारल्याबद्दल.tc

<१ कोणाला क्लिनिकल डिप्रेशन येणे,
२ प्रोफेशनल हेल्प घेणे,
३ प्रोफेशनल हेल्प मिळणे
४ सुयसायडचा विचार येणे,
५ टेन्न्डन्सी असणे,
६ प्रयत्न करणे
हे सर्व वेगवेगळे वर्ग झाले.> हे आणि पुढचं सगळं तुम्ही खूप नेमकेपणाने सांगितलं आहे.

आत्महत्या करा यचा विचार येणे आणि ती करायचा प्रयत्न करणे यांत खूप फरक आहे. कधीतरी आहे ते सगळं सोडून , काही काळासाठी का होईना , दूर पळून जाणं हा उपाय ठरू शकतो .

एखादी व्यक्ती आपलं आयुष्य कसं जगते त्यावर कमेंट करायचा अधिकार आपल्याला नाही (आणि आपण आपलं आयुष्य कसं जगतो त्यावर कमेंट करायचा अधिकार कुणालाही, किमान कुणा त्रयस्थाला तरी नक्कीच नाही) हा धडा मी शिकल्याला फार काळ गेलेला नाही, त्यामुळे तो ताजा आहे.

तुमची ही लेखमाला ढोबळ अर्थाने प्रवासवर्णन नाही, प्रवासवर्णनाच्या साच्यात बसवून तिची तुलना करणं अप्रस्तुत वाटतं.

छान लेखमाला. खूप आवडली.

एक अवांतर प्रश्न : होम स्कूलिंगच्या सुप्रिया जोशी तुम्हीच का? असाल तर प्लिज त्यावर एक लेखमाला नक्की लिहा.