वर्षाविहार २००८:वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2008 - 23:49

कालचा वर्षाविहार अतिशय उत्साहात आणि जोषात पार पडला.. या वर्षाविहाराचे मुख्य आकर्षण म्हणजे दिवसभर असलेली वर्षाराणीची उपस्थिती.. Happy यावेळी वविकरांना तिने खर्‍या अर्थाने वर्षाविहाराचा आनंद उपभोगु दिला.. दिवसभर पड्णार्‍या पावसात सर्व वविकर भिजुन चिंब झाले आणि त्यांची मने हिरवीगार टवटवीत झाली... बाकी मग वविला असणारा मायबोलीकरांचा नेहमीचा जल्लोष,दंगा हे तर साथीला होतेच... अश्या रितीने मायबोलीचा हा सहावा वर्षाविहार सोहळाही सुफल संपन्न झाला...

    खाली वविकरांनी वविचे वृत्तांत आणि त्यांच्या प्रतिक्रिया द्याव्यात..... ज्यांनी पहिल्यांदा मायबोली वर्षाविहार अनुभवला त्या सर्वांनीही वृतांत आणि विचार नक्की लिहावेत..

    विषय: 
    Group content visibility: 
    Public - accessible to all site users

    वा!! वा!! वा!! ववि एकदम झोकात पार पडला काल... नेहमीप्रमाणेच एकदम धमाल....

      संयोजकांच्या मेहनतीला आणि मायबोलीकरांच्या उत्साहाला पावसाने जोरदार हजेरी लावून साथ दिली..

        या ही वर्षी भरपूर मेहनत घेऊन व.वि. यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल पडद्यावरचे आणि पडद्यामागचे अश्या सर्व संयोजकांचे अभिनंदन व आभार...

            ================
            ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
            रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

              -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

              मंडळी, ववि पार पडलाय तर आता खुमासदार वृत्तांत, फोटो, चित्रे लवकर लवकर येऊ द्या. Happy

              -------------------------------------------
              हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

              कालचा ववि नेहेमीप्रमाणेच उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल पुण्याच्या आणि मुंबईच्या संयोजकांचे खास अभिनंदन आणि आभारही.... Happy
              .
              कालचा ववि खर्‍या अर्थानी हिरवागार होता. हेगडे फार्म हिरवं गार आणि वर्षाराणीच्या सहवासाने आमची सगळ्यांची मनं पण हिरवी गार....
              .
              तू ही तू तू ही तू आतरंगी रे ssssssssssssssssssssssssss Wink
              .
              ~~~~~~~~~
              ~~~~~~~~~
              Happy

              लवकर वृत्तांत येउद्या, आम्ही वाट बघतोय

              वविला फारच धमाल.... संयोजकांचे भर्पूर भर्पूर आभार (आणि दीम्डु, तुला शि.सा.न.)

              अर्भाट,काय रे हे .. एका ओळीत द एंड.. ते काही नाही.. नीट सविस्तर वृत्तांत लिही..

              सर्व वविसंयोजकांचे मनापासून आभार... प्रसंगी आपल्या पदरचे पैसे खर्च करून, शक्यतो कोणाची गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घेत ववि यशस्वीपणे पार पडण्यासाठी ते नेहमीच जी मेहनत घेतात त्याला तोड नाही.
              सांस्कृतिक समितीचेही खास आभार... दिमडू त्वाडा जवाब नही... तुला काल चिक्कार उचक्या लागल्या असतील.
              खरंच कालचा पूर्ण दिवस एकदम छान आणि मजेचा गेला. खुप धम्माल आली. ववि एकदम १००% यशस्वी..
              समग्र वृत्तांत नविन सदस्य आणि नेहमीचे यशस्वी कलाकार लिहितीलच. मी वेळ मिळेल तसा तसं इथे लिहित जाईन.

              मंजु,तुझा पण पहिलाच ववि होता तेव्हा तू पण नविनच वविकर आहेस जरी जुनी मायबोलीकर असलीस तरी.. सो तूसुध्दा पूर्ण वृत्तांत टाक हो Happy

              या वर्षीचा ववि उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार.... खुप धम्माल केली काल....
              टांगारु लोकांना देवाने माफ करावे. त्यानी काय मिस केलय त्यांना माहिती नाहीये.... Happy

              उत्साही असलेल्या सर्व मायबोलिकरांनी केलेला कालचा वर्षाविहार.. पाउस,सभोवतलचे ढगाळलेले डोंगर नि हिरवळीच्या साक्षीने धुमधडाक्यात पार पडला...

              "मी वविकर, वविकर.... वविकर MBचा राजा... " इंद्रा.. मस्त रे.. पुढे ओळखा पाहु लिही.. Proud

              - Yo !

              राम राम मंडळी...
              तर औंदाचा ववि मायबोलीकरांच्या उदंड प्रतिसादाने पार पडला...
              नेहमी कुठल्याही कार्यक्रमाची रुपरेषा कार्यक्रमाच्या आधी देतात पण वविची रुपरेषा आधी देऊन काहीच उपयोग नाही म्हणून मग आत्ता देतो आहे..
              थोडक्यात म्हणजे.. "Minutes of VaVi" म्हणजे जमेल तितक्या मिनिटांची विस्तृत माहिती..
              ह्या वर्षी सुद्धा गेल्यावर्षीप्रमाणेच.. पुणेकरांसाठी जशी सांगितली होती तशीच बस आली होती. आणि आश्चर्य म्हणजे गेल्या वर्षी आलेली बसच ह्याही वर्षी होती.
              ७:००..
              सकाळी बरोबर ७ वाजता बस निघेल असे जाहिर केलेले असूनही बस निघाली ७:१० लाच. अस्मादिक, आमच्या सौ., मिल्या दादा, पूनमवैनी आणि यज्ञेश ह्यांच्या साठीच कार्याध्यक्षांनी बस चालकाला बस चालू करण्यापासून रोखून ठेवले होते हे दिसताक्षणी आम्ही पटकन आपापल्या जागा पकडण्यासाठी बस मध्ये उड्या घेतल्या आणि.. बाप्पांचे नाव घेत 'निघाली.. निघाली वविसाठी वरात'
              ७:२०
              कार्याध्यक्षांनी नेहमी प्रमाणे हजेरी घेतली.. पण काही अतिउत्साही मायबोलीकरांनी त्या हजेरीची पार वाट लावली.. आणि अचानक येवढे कसे काय ड्यु. आयडी आले असा प्रश्न पडला...
              ७:३०
              आणि कार्याध्यक्षांनी सां.स.कडे संयोजनाची सूत्रे सोपवली. मग काय नेहमीचा यशस्वी खेळ चालू झाला गाडीत.. अंताक्षरी.. पण सां.संनी एक अत घातली की हो.. काही झाले तरी मराठीच्या ऐवजी वेगळी गाणी म्हणायचीच नाहीत.. आता आली का पंचाईत.. जरा सगळीकडे नजर टाकली तर जाणवले की अ.आ., दिमडू, फ आणि कृ हे अनंताक्षरी वरचे खंदे वीर गायब आहेत यंदा.. पण त्यांची कमतरता भासू द्यायची नाही असा चंग बांधला होता सगळ्यांनी.. मिल्या दादा, देवा, आरभाट, अभ्या, रुमा, एसएचके आणि स्नेहल एकी कडे आणि श्र माता, मीन्वाज्जी, राज्या, डीगिरिश, चिन्या, मिसेस चिन्या, कार्याध्यक्ष आणि मी दुसर्‍या बाजूला.. आणि बाकीचे सिद्धार्थ, नचि, अमृता१५, रिमझिम, सँडीजी, मॅगी, यश, अतल्या आणि सुश्या हे बघ्याची भूमिका घेण्यासाठी सरसावले
              ८:००
              तेवढ्यात अचानक गाडी कुठेतरी थांबल्याचे जाणवले.. बघतो तर काय गाडीला फार तहान लागली होती हो.. तिच्या पोटात मावेल तेवढे डिझेल प्यायले की तिने.. एक मस्त ढेकर देऊन परत पुढे चालायला लागली मग ती... आणि मायबोलीकर मनातल्या मनात मिल्याच्या ओळी म्हणू लागले.. "हिची चाल धप्प धप्प". त्या बरोबर अंताक्षरी चालूच होती... आणि हो बरोबर तोंडही चालू केलेलेच होते सगळ्यांनी यशच्या टपरी वरचे बटाटा वेफर्स खाऊन
              ८:३०
              आणि.. परत एकदा करकचून ब्रेक दाबलाच चालकानी.. लोणावळा आल्याची जाणीव झाली. चला उतरा सगळे खालती.. कार्याध्यक्षांचा आवाज.. "आता इथे आल्यासरशी आल्याचा चहा घ्या" असा कार्याध्यक्षांनी फतवा काढल्याने सगळे जण भिजत भिजत गाडीतून चहा घ्यायला उतरले.. तेव्हा मुंबई संयोजकांशी संपर्क साधून ते कुठे आहेत याची चौकशी करण्यात आली.. त्यांचा निरोप आला की रिना हिप्पोपोटॅमस शोधायला गेली आहे आणि त्यामुळे तिची वाट बघत ते ऐरोली पाशी थांबले आहेत..
              चहा पिऊन गाडीत जाऊन बसणार तेव्हड्यात एसएचकेनी आग्रह धरला की लोणावळ्यात येऊन चिक्की खायची नाही म्हणजे काय.. मग काय चिक्की खरेदी करुन गाडी पुन्हा एकदा मार्गस्थ झाली...
              ९:००
              "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चिडवा दिसता कसो खंडाळ्याचा घाट" हे गाणे म्हणत म्हणत गाडी घाट उतरत होती.. गाडी घाट उतरून सरळ रस्त्यावर आली तो पर्यंत अंताक्षरी पण सरळ मार्गानी चालूच होती पण तेव्हढ्यात सां.स.च्या ज्येष्ठ सदस्या मिन्वाज्जी ह्यांनी एक नविन खेळ सुचवला.. 'कोण एक म्हणे ती सखू.. ती सकाळी सकाळी भल्या पहाटे पाणी आणायला नदीवर जाते आणी काय म्हणे तर तिला सगळे वविला निघालेले पुणेकर भेटतात.. आणि त्यांना बघून ती काय काय की गाणी म्हणते...'
              १०:००
              ही सखू भेटल्याच्या नादात बस बरोबर चालली आहे की चूक ह्याच्याकडे कार्याध्यक्षांचे दुर्लक्ष झाले.. मग एकच गोंधळ उडला... तेव्हा त्यांनी सगळ्यांना लक्षात आणून दिले की उगाच आरडाओरड करु नका हा प्रकार दर वर्षी कुठल्या तरी गाडीच्या संदर्भात घडतोच.. मग फोनाफोनी चालू.. मुंबईकर तो पर्यंत डॉ. हेगडेंच्या फार्महाऊस वर पोचलेले होते. आणि ह्या फोन बरोबरच अजुन एक फोन आला.. "हॅल्लो मी ठाकरे बोलतोय.. इथे काही मला मुंबईची गाडी दिसत नाही आहे तुम्ही कुठे आहात.." ठाकर बोलतायेत म्हणल्यावर कार्यध्यक्षांची बोबडीच वळाली.. कार्याध्यक्ष आवाक.. आत हे ठाकरे मातोश्री सोडून आयुर लाईफ मध्ये काय करतायेत. मग तेवढ्यात त्यांना आठवले की. मायबोलीवर पण आहेत की ठाकरे.. साजिरा आणि महादेवा.. कार्याध्यक्षांच जीव भांड्यात पाडला आणि गाडी योग्य मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला...
              १०:३०
              अखेर गाडी योग्य मार्गावरुन डॉ. हेगडेंच्या फार्महाऊसच्या दारात उभी ठाकली.. आणि स्वागताला इंद्रा, आनंदसुजू, नील हे हजर होते..
              तिथे पोचल्यावर पण गोंधळ काही संपलेलाच नसतो.. दिलेली खोली किती उंचावर आहे तेच समजत नाही. शेवटी एक मुंबईकर योग्य दिशादर्शकाचे काम करुन पुणेकरांना योग्य ठिकाणी पोचायला मदत केली.. तो मार्ग पकडून वर जायला सुरुवात करेपर्यंत समोरून हास्याचे चित्कार ऐकू आले.. कारण शोधायचा प्रयत्न करायची गरज पडलीच नाही समोर मुंबईहून आलेल्या लेडिज बायकांचा घोळकाच दिसला. आणि दुसरीकडे पोहे आणि उप्पीट दिसले...
              ११:००
              पुणेकर आपापल्या बॅगस् खोलीत ठेउन नाष्ट्याचा आनंद घेण्यासाठी की पोटात उठलेला आगडोंब शांत करण्यासाठी भोजन कक्षात दाखल झाला.. आणि नाष्टा करुन झाल्यावर सां.स.च्या आदेशाने सगळे डॉ. हेगडेंनी उपलब्ध करुन दिलेल्या सभागृहात पोहोचले.
              आणि मग सुरु झाला.. "जोडीने ओळख" नावाचा कार्यक्रम.. एक मुंबईकर आणि एक पुणेकर अशी जोडी शेजारी शेजारी बसवून त्यांची ओळख परेड घेण्याचे काम श्र मातेने केले.. सुरवातीला बच्चे पार्टीची ओळख परेड दिली.. इतके दिवस नचि म्हणून परिचित असलेल्याने अचानक आपले नाव यज्ञेश सांगितले आणि सगळेच बुचकळ्यात पडले. पण तेव्हढ्यात वैनी म्हणजे त्याच्या मातोश्री म्हणाल्या की बरोबर आहे हेच नाव.. आणि ह्या चिरंजीवांनी एक सुप्रसिध्द कविता म्हणून दाखवली.. "ट्विंकल ट्विंकल".. त्या नंतर मीन्वाज्जींच्या सुपुत्रानी "मै हूं डॉन " म्हणत इंट्री घेतली.. नंतर दिपाली फणसळकरांच्या दोन रत्नांनी आपापली ओळख करुन दिली.. त्यांची सुपुत्री कुठले तरी शास्रीय नृत्य शिकत असल्याची जाणिव करुन दिली तर चिरंजीवांनी म्हणजेच अथर्वनी एक पोयेम म्हणून दाखवली.. आणि मग सगळ्यात छोटी मायबोलीकरीण निहिरा.. हिने तिची ओळख करून दिली.. आणि "हस" म्हटल्यावर काय मोहक हसली.. आणि मोठ्या लोकांना हास्यात बुडवून त्यांची ओळख करुन द्यायला मोकळीक दिली..
              मी दोन ठाकरेंच्या मध्ये बसलेलो होतो त्यामुळे ओळख करुन देताना मला फारच भिती वाटत होती.. मी एकदम दोन सेनांच्या मध्ये भरडला जाईन की काय अशी धास्ती वाटली मला.. पण तेवढ्यात अत्यंत हसत खेळत हा "ओळख परेड" चा कार्यक्रम पार पडला..
              ११:३०
              आणि ओळख परेड संपता संपता संयोजकांनी घोषणा केली की आता पुढचे दोन तास मनसोक्तपणे डुंबण्याची परवानगी देण्यात आली आहे.. मग काय सगळे जण तातडीत जलक्रिडेसाठी आवश्यक असलेली वस्त्रे परिधान करण्यासाठी मार्गस्थ झाली. वस्त्रे परिधान करुन सर्वजण जलक्रिडेसाठी तयार करण्यात आलेल्या तरण तलावत उतरण्यास गेले. त्या तरण तलावाच्या बाजुसच एक कृत्रिम अवाढव्य झरा ही तयार करण्यात आला होता. त्या तरण तलावात सगळ्याच मायबोलीकरांनी मनसोक्त जलक्रिडेचा आनंद घेतला... सुरुवातीस जरा पाणी थंड वाटत होते पण एकदा का पाण्यात उतरल्यावर थंडी कुठच्या कुठे पळाल्याने पाण्यात हात पाय मारायला मस्त जोर आला. सुरुवतीला नुसतेच इकडून तिकडे भटकणे चालू होते.. तलावामधे सुद्धा बच्चे कंपनी सगळ्यात जास्त आनंद घेत होती.. निहिरा, नचि, सिद्धार्थ, अथर्व आणि गौरवी ह्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.. गौरवी शिकलेली असल्याने तिने काही लेडीज बायकांना कसे पोहावे ह्याचे प्रात्यक्षिक दिले.
              हे चालू असतानाच जरा दुसरी कडे नजर वळवली तर तिकडे मस्त पैकी पाण्याच्या फवार्‍यात नाचण्याचा कार्यक्रम चालू होता.. आणि ह्यात 'स्पायडर मॅन - योगी' सगळ्यात आघाडीवर होता.. बाकीच्यांचेही जमेल तसे हात पाय हलवणे चालूच होते.. मग अचानक आरभाट आणि कोणाला तरी तिथे फुगडी घालण्याची हु़क्की आली.. पण ती फुगडी साधी फुगडी न रहाता लोळण फुगडी झाली.. नंतर परत एकदा स्नेहल आणि सायलीला पण तसेच करायची लहर आली पण त्यांचा ही प्रयत्न फसलाच.. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" हे नुसते म्हणीतच प्रत्यक्षात मात्र "पुढच्यास ठेच आणि मागच्यास पण ठेचच"..
              आणि बरेच जण नाचत असताना अखेर एक च्या सुमारास घारुआण्णांचे आगमन झाले.. तेव्हा काही जणांनी कृत्रिम अवाढव्य झर्‍याकडे आपला मोर्चा वळवला होत.. त्या झर्‍याचा जोर काही औरच होता.. त्याच्या खाली उभे राहून मस्त पैकी पाठ शेकून घेण्याचे प्रकार ही काही जणांनी केले.. ह्या झर्‍याकडे जाणारी वाट मात्र थोडी वेडीवा़कडीच होती.. आणि त्या सरळ मार्गानी यायचा प्रयत्न करायच्या ऐवजी वा़कड्या वाटेने येताना अभिषेकनी साष्टांग बैठक मारली...
              घारुआण्णा तयार होऊन पाण्यात उतरले आणि मग एकच गलका उडाला.. त्यांनी एक आगळाच खेळ शोधून काढला होता.. ५ रुपयाचे नाणे तलावात टाकायचे आणि माश्यासारखी पाण्यात बुडी मारुन ते शोधून काढायचे.. मग काय एकाच नाण्याच्या पाठीमागे सगळे जण धावायला अर्र धावायला नाही बुड्या मारायला लागले.. तेवढ्यात कोणाच्या तरी डोक्यात पाण्यात दहीहंडी करायची कल्पना सुचली.. सुरवती मी तसा बाजूलाच बसलेलो होतो... पण दोनदा प्रयत्न करुनही हंडी उभी राहिली नाही तेव्हा मीही सगळ्यात खालच्या थराला आधार देण्यासाठी गेलो.. योग्याच्या कारभारीपणामुळे प्रत्येक वेळेस काही तरी होऊन हंडी उभी रहातच नव्हती शेवटी एकदाची तीन थरांची हंडी उभी करण्यात यश आले. ह्यात यशाचा पण मोलाचा वाटा होता हे सांगायला नकोच.. मग परत एकदा अशीच हांडी करुन गोल गोल फिरण्याचाही उद्योग करुन झाला...
              १:४५
              इतक्यात बाहेरुन कोरड्या कपड्यात निल सगळ्यांना 'बाहेर चला, बाहेर चला' असे सांगत आला आणि सगळे जण हळूहळू करुन बाहेर आले आणि थेट कपडे बदलण्यासाठी पळाले. सगळेच जण एकदम तिथे पोहोचल्यामुळे त्या खोलीत प्रचंड गर्दी झाली.. मग काही सुजाण मायबोलीकर तिथे न थांबता सरळ भोजन कक्षात पळाले.. असेही बराच वेळ पाण्यात खेळल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागलेच होते.. मग त्या कावळ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी भोजनाला आरंभ केला..
              ह्या सगळ्यात एक गोंधळ झाला होता. एका खोलीची किल्लीच काही केल्या मिळत नव्हती मग काय पोटातल्या कावळ्यांना तसेच कोकलत ठेऊन किल्ली शोध मोहिम हाती घेण्यात आली.. पण त्याच्यात अपयशच आले पण तेवढ्या देवा आणि मिल्या भोजन संपवून तिथे आल्याने आता हाताची आणि तोंडाची गाठ पडणार ह्याची खात्री झाली आणि जीव भांड्यात पडला..
              भोजनाला पुढील पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.
              मीठ, हिरवी चटणी, कैरीचे लोणचे, पातवड्या, बटाटा भाजी, छोले, पुर्‍या, डाल फ्राय, साधा भात, फ्रूट कस्टर्ड, पापड...
              २:३०
              क्रमशः

              वरील वृत्तांत हा काल्पनिक तसेच प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचा संगम आहे त्यामुळे वाचतना प्रत्येकानी दिव्यांची माळ बरोबर घेऊनच वाचावा ही नम्र विनंती
              ==================
              सुसाट वारा वीज कडकडे

              @ kmayuresh2002,
              आर भाटला आज खूपच महत्वाचं काम असल्यान (अर्भाट>> चा नक्की अर्थ हुडकून काढुन काल उठलेल्या वादळी प्रश्नांची उत्तरं देणे) Happy तो ववी वृत्तांत सविस्तर लिहीलच! पण उद्या!! Biggrin
              अर्भाटा लिहीशील ना रे? तूझ्यावतीन मी तमाम जन्तेला (मायबोलीकर Happy ) तस आश्वासन दिलय!

              हिमस्या, काय रे हे??? ६:३० ला पुण्याहून प्रयाण ठरल होत ना?? बाकी बरोबरच आहे म्हणा, पुणेकर कुठं टाईमावर धावतात (दिवे घ्या!! माझ्या नावातच ते आहेत!)

              नाही म्हणायला आम्हालाही "थोडाच" उशीर झाला होता!! कारण पत्रकार (स्त्रीलिंगी पण पत्रकारच ना??) बाई रीना आदल्या रात्री १:३० पर्यंत कामात बुडल्या होत्या अन् आज (म्हंजी, रैवारी) त्या पाण्यात बुडल्या होत्या... बाकी अख्या मुंबईत पाणी टंचाई असताना नवी मुम्बई : 'ऐरोळी'त पाणी कसे हा एक वेगळा प्रश्न आहे! असो.

              तर मंडळी, सविस्तर वविवि [वि=विशेष] टाईपतो आहेच मी... बाकी पुणेकर, मुंबईकरांनी ह्यात मोलाची भर टाकणे! ही विवि (विशेष विनंती)

              ता.क.
              ए श्रद्धा,[सां.स.] पुढच्या वेळचे/च्या वाक्प्रचार/ म्हणी आपण ह्या वृत्तांतातुन घेउयात का??
              जस की: 'मोलाची भर टाकणे', 'टाईमावर धावणे', 'कामात/पाण्यात बुडणे', 'आश्वासन देणे' बघ सुचना करण हे माझ काम आहे! Happy

              दीपू द ग्रेट
              "वक्त रूकता नहीं कहीं टिककर
              इसकी आदत भी आदमीसी है"

              कुलदिपा,गाडी पहिल्या थांब्यावरून साडेसहाच्या आधीच हलली रे.. यशने त्याचं काम चोख बजावलं होतं तसच त्या थांब्यावर चढणार्‍या लोकांनीही वेळ पाळ्ण्याचं.. उशीर झाला तो दुसर्‍या थांब्याला आणि हिम्या तिथं चढ्ला असल्याने त्याने वृत्तांत तिथुन चालु केलाय...

                हिम्या,सही रे... Happy

                आर्र मया, धन्स रे! काय मग आज किती जणांनी सुटया घेतल्याय?

                दीपू द ग्रेट
                "वक्त रूकता नहीं कहीं टिककर
                इसकी आदत भी आदमीसी है"

                मुंबईची मज्जाच काही वेगळी होती.....

                मला लास्ट मिनिटाला ईंद्राने फोन करुन ववीला येच असा दम भरला.. उद्या ७.३० ला पिक अप आहे म्हणाला.

                मी मग शनिवारीच बॅग बिग भरुन निवांत झोपले सहाचा अलार्म लाऊन...आरामात उठुन चहा घेत केसांना तेल बिल लावतेय तोच ईंद्राचा फोन... माझ्या पोटात खड्डाच पडला, म्हटले मी ६.३० चे ७.३० ऐकले की काय?? वरती विचारतो, तयार आहेस का?? मनात म्हटले कप्पाळ, अजुन दातही घासले नाहीत... पण उगाच तो घाबरायला नको, म्हणुन हो........... असे दिले ठोकुन..

                'आम्ही घाटकोपरला आहोत. लोक चढताहेत गाडीत. मग ऐरोली मार्गे येउ, तुला उरण फाट्याला उचलू.' मनात 'हुश्श्य' करत मी म्हटले 'ठिकाय.'
                मग फटाफट दात, चहा करुन पोहे केले आणि आंघो़ळीला धावले. म्हटले उगाच माझ्यामुळे उशिर नको.......(मला clairvoyence वगैरे कायसेसे म्हणतात ते असते तर बरे झाले असते... आंघोळिला जाण्याऐवजी निवांत झोप काढायला गेले असते).

                तर मग मंडळी, सगळी तयारी करुन, पोह्यांचा समाचार घेऊन (प्रवासाला निघायच्या आधी देवपुजा आणि मग पेटपुजा - हा मातोश्रींचा दंडक), तोपर्यंत इंद्राला दोन्-चार फोन करत, शेवटी त्याच्या तोंडुन आता बस... ऐरोलीला पोचतोय, मग रिना नावाच्या मुलीला दोन मिनिटात उचलले की मग तुझ्याकडेच.... हे वाक्य बाहेर ऐकले. (त्याला तरी काय माहित पुढचे..)

                ऐरोलीवरुन बस ने माझे घर २०-२५ मिनिटात (ट्रॅफिक नसताना). म्हणुन मग मीही निघाले. म्हटले वर्षाविहाराची सुरवात घरुनच करुया. बाहेर मस्त पाउस पडत होता.. मीही रमत गमत निघाले..

                साधारण अर्ध्या तासाने, इंद्राचा फोन. मी माझ्या ठिकाणापासुन अजुन लांब होते.. मनात स्वत:ला शिव्या दिल्या, एवढे रमत गमत कशाला चालायचे???
                इंद्राने सांगितले, रिनाचीच वाट पाहतोय तिला जाम उशिर होतोय... अर्धा तास वाट?? म्हणजे रिना उठायचे विसरली की कुठे आडरानात राहते तिथुन यायला वेळ लागतोय?? ??

                आता हायवेवर जाउन काय थांबणार. मी सरळ वाटेत बसस्टॉप होता तिथे गेले आणि बसले. (नमु मध्ये बसस्टॉपवर बसण्याची पण सोय आहे बरे). १५ मिनिटे बसुन राहीले मग केला परत फोन........ नशिब माझे, रिना मॅम आल्या होत्या... मग जमेल तितके हळू चालत पोचले हायवेला. छानपैकी रस्त्याच्या कडेला उभे राहुन वाट पाहायला लागले.

                गाड्या आणि बाईक वरुन जाणा-या प्रेमळ माणसांनी आपापली वाहने स्लो करुन मी येणार का म्हणुन प्रेमळ चौकश्या करायचा प्रयत्न केला. काहिनी चौकश्या केल्या सुध्धा... पण काय करणार, माबोलीकरांच्या ववीला जायचेच म्हणुन मला त्या सगळ्यांना नम्र नकार द्यावा लागला.

                शेवटी आली एकदाची सचीन ट्रवल्स ची गाडी.. आणि मी चढले एकदाची....

                गाडीत चढल्यावर कळले, रिनाची आई कांद्यावरचे ऑम्लेट बनवत होती आणि इतक्या जणांसाठी बनवायचे म्हणजे अर्थातच वेळ लागणारच ना..... बिचारी रिना काय करणार.. माबोलीकरांना कांद्यावरचे ऑम्लेट खायला मिळावे म्हणुन तिने सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्या.. एवढी घाई झाली तिला की ऑम्लेटबरोबर ब्रेड घ्यायला सुध्धा वेळ झाला नाही...

                साधना

                ______________________________________
                आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
                घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
                उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
                पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

                वा वा मस्त डीटेल मध्ये वृत्तांत येतोय Happy
                मुंबई आणि पुण्या वरून गाडी सुटली. आता पूढे काय बर ? Happy

                मंडळी, जरा कॉलेजात जाउन येतो! रात्री भेटूच Happy

                सुश्या झोप्लास काय रे???????

                दीपू द ग्रेट
                "वक्त रूकता नहीं कहीं टिककर
                इसकी आदत भी आदमीसी है"

                वर्षाविहार: काही ठळक बातम्या (म्हंजे सगळ्याच... )
                .
                माता वविच्या बससाठी पोचल्या वेळेवर
                सकाळी मी जेव्हा सामानासकट वविच्या बसपाशी पोचले तेव्हा किमयाच्या बाजूला असलेल्या चर्चमधून पावणेसातचे ठोके ऐकू आले. माझे मन उल्हसित झाले. माझ्या वक्तशीरपणाला ही आकाशातल्या बापाने दिलेली पावतीच होती.
                मी पोचले तेव्हा रिमझिम आणि अमृता१५ (हे १५ काय ते कळले नाही शेवटपर्यंत. वय तर नव्हते नक्की.) अरभाट, अभिषेक यांना गाडीबाहेर उभे करून संयोजक बसमध्ये गुप्त मीटिंग घेत होते.
                कारण संयोजकांपैकी एक जे टीशर्ट संयोजक होते ते, त्यांच्या सुविद्य पत्नी, नचिकेत असा डुप्लिकेट आयडी असलेल्या मुलासकट (ज्याचा ओरिजिनल आयडी यज्ञेश आहे!) त्याचे आईवडील हे बेपत्ता होते.
                मी बसमध्ये चढताच शांतता पसरली व सर्वांनी हे वृत्त माझ्या कानी घातले. मी मनःचक्षूंनी वेध घेतला तर मला एका चारचाकीत बसून ही सर्व मंडळी येताना दिसली. मी इतर संयोजक मंडळींना शांत केले.
                मीन्वाजी आजोबा व सिध या मुलासकट येऊन पोचल्या.
                सुश्या हा चक्क वेळेआधी हजर होता. ते पाहून आकाशातल्या बापाच्या डोळ्यांतही चार आनंदाश्रू उभे राहिले असतील.
                तेवढ्यात मला अमृता१५ आणि रिमझिम या भक्तांची परीक्षा घेण्याची लहर आली. वविच्या बसमागेच एक अजून बस उभी होती. तीदेखील आपलीच बस असून त्यात सर्व मायबोलीकरणींनी बसायचे आहे, असे मी त्यांना सांगितले. तत्परतेने दोघी तिकडे गेल्या. मातेवर इतका विश्वास दाखवल्याने माझी कृपा आता त्यांना सहजच प्राप्त झाली आहे.
                .
                हजेरीचा मोडला नियम: संयोजकांचे वागणे संशयास्पद

                बस द्रुतगती महामार्गाकडे वेगाने धावत असताना व तिने किमया सोडून अर्धा तास झाला असताना मयुरेश यांनी हजेरी घ्यायला सुरुवात केली. वास्तविक हा सोहळा त्यांनी किमयापाशी बस अचल अवस्थेत असताना पार पाडणे अपेक्षित होते, पण इतक्या उशिराने हजेरी घ्यायचे कारण शेवटपर्यंत कळू शकले नाही. तसेच लोक गूढपणे हजेरी देत होते. एखादा आयडी अख्खा समोर बसलेला असताना, डोळ्यांना दिसत असताना, तो आलेलाच नाही असे खुद्द तो आयडीच बोलल्यावर 'हे ववि एखाद्या गुप्त कटाचा भाग असावा' असे वाटायला लागले.
                .
                मातेच्या भजनांनी झाली अंताक्षरीला सुरुवात

                मा. मीन्वाज्जी यांनी त्यांच्या कर्णमधुर आवाजात गायलेल्या 'चलो, बुलावा आया है' या भजनाने अंताक्षरीला सुरुवात झाली. तो 'बुलावा' शब्द 'पुलावा'शी साधर्म्य राखून असल्याने काही मंडळी अस्वस्थ झाली. काही मंडळींनी इमर्जन्सी एक्झिटजवळच बसणे पसंत केले.
                यानंतर मीन्वाज्जींचा मराठी बाणा जागृत होऊन त्यांनी मराठीखेरीज इतर भाषांतली गाणी म्हणण्यावर बंदी आणली. यामुळेच दीमडू, फ, अरुणआजोबा यांची अनुपस्थिती तेथे विशेष जाणवली.
                तरीही मायबोलीचे नाव राखत समस्त जनतेने मराठी गाणी म्हणण्याचा दणका उडवून दिला.
                (क्रमश:)
                *वृत्तांत सत्य आणि कल्पनेचे मिश्रण आहे. (ही सूचना सर्व निरागस भक्तांसाठी.)
                *दिवे घेऊन वाचणे.
                ~~~~~~~~~~~~~~~~~~~
                'माता' रिटर्न्स.

                हिम्या, साधना, माता... गाडी अग्दी ट्रॅकवर आहे... येऊ दे...
                दिप्या... रात्री जागून लिही तुझा वविवि...
                तो 'बुलावा' शब्द 'पुलावा'शी साधर्म्य राखून Proud

                पनवेलच्या आधी गाडीने पोटभर डिझेल पिऊन घेतले आणि मग निघाली धुमधडाक्यात...
                चारचाकी गाडी धावायला लागल्यावर मग दोस्तलोकांनी अंताक्षरीची गाडी पळवायला सुरु केली... (काहीतरी नविन नाही का जमणार? नेहेमी नेहेमी अंताक्षरीच... (मला अर्थात तेवढेच येते Happy , पण गुणी मंडळींनी काहीतरी नविन शोधा))

                अंताक्षरीत खुपच मजा आली.. रिनाला ब-याच लोकांनी शिव्या दिल्या होत्या त्याचा बदला म्हणुन तिने बाप्ये विरुद्ध बाया पार्टीच्या अंताक्षरीची बहुतेक गाणि स्वतःच गायचा सपाटा लावला. (तरिही मधेमधे मनीला म्याव करायला दिले तिने)..... आनंदचे हाजी हाजी मस्तच होते....

                कर्जतला गाडी वळवल्यावर, पुणे पार्टीची चौकशी केली तर ते अद्याप लोणावळ्यापर्यंतच पोहोचु शकले होते... मग आरामात गाडी घेतली सायडींगला आणि गेलो सगळे टपरीवर चहा ढोसायला.......

                रिना ने कांद्यावरच्या ऑम्लेटचा डब्बा असलेली पिशविही सोबत घेतली. पिशवीतुन डब्बा काढला आणि एक बाटली. बाटलीत कसलेतरी "नारंगी" रंगाचे पेय भरलेले होते. लांबुनच ते पाहुन आनंदसुजु आणि नील धावले.... पण हाय रे दैवा.. कांदाऑम्लेटच्या मसाल्यात रंगलेल्या तेलामुळे बाटली नारंगी झाली होती, पण फक्त बाहेरुनच.. आतमधले पाणी साधेच होते.....आनंदने निराशा लपवत, असु दे असु दे, आम्ही फक्त बुधवारीच रंगीत पाण्याकडे पाहतो वगैरे उद्गार काढले....

                अख्ख्या गाडीत वर्ल्डफेमस झालेले कांद्यावरचे ऑम्लेट झक्कास झाले होते....अगदी बोटे चाटुन पुसुन खाल्ले लोकांनी... (रिना - रेसिपी टाकशील काय आईला विचारुन?). पावाची कमी मेहसुस होत होती म्हणुन मग टपरीवाल्या काकूना एका ऑम्लेटपावाची ऑर्डर दिली......... दोन पाव सगळ्यांनी पोटभरुन खाल्ले.....
                चहा मस्त होता आणि शिवाय भरपुरही..........

                असा सगळा आस्वाद घेत गाडी निघाली पुढे... वाटेत एनडि स्टुडिओ लागला, जोधा अकबरचा सेट लांबुनच पाहिला.
                कर्जत ला पोचलो तर नदी भरुन वाहात होती... नंदिनी फोटो काढायला सरसावली तोवर गाडी पुढे निघुन गेलेली. पण मग फोटो तर हवाच, करणार काय??????? नशिब आले धावुन आणि गाडी रस्ता चुकल्याचे एका सदगृहस्थाने सांगितले...मग काय घेतली गाडी परत मागे, फोटो ही घेतला आणि मग परत मार्गी लागलो.
                वळणावळणाने गाडी शेवटी पोचली हेगडे फार्म ला................. पुणेकरांपुढे बाजी मारुन पोचलो पहिले..........

                साधना
                ______________________________________
                आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
                घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
                उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
                पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

                मयुरेश, तुला घाबरून मी वृ लिहायला घेतला बरं का... नाहीतर पुढ्ल्या वविला माझं येणं कठिण होईल.. Happy
                .
                तर, आनंदने सांगितल्याप्रमाणे सव्वासात ते साडेसातच्या मधे ऐरोलीला पोचायचे होते, त्याप्रमाणे मी सव्वासात वाजून साडेसात मिनिटांनी पोचण्यासाठी मी तयारीत होते, तर साडेसहालाच नीलचा फोन आला, आम्ही निघालोय... तुला घ्यायला येऊ का?
                मी म्हटलं, मी निघतेच आहे १० मिनिटात....घरातून बाहेर पडणार तितक्यात आनंदसुजुचा फोन निघालीस का? की अजून घरातच आहेस? पिक्-अप पॉईंटा पासून २ मिनिटांवर असताना इन्द्राचा फोन कुठेस? ये लवकर..... जल्लां, इतके सगळे फोन माझ्याऐवजी रीनाला केले असते तर पाऊण तास थांबावे लागले नसते. Wink नवर्‍याने बरोब्बर पॉईंटाला सोडले तर आनंदचाच पत्ता नव्हता... इन्द्रा, नील, मैत्री, योगी, अश्विन, आणि काका फणसळकर वाट पाहत उभे होते. आणि बसमध्ये मनी, लाडकी, नंदिनी, दिपाली, गौरवी आणि अथर्व होते. मग १० मिनिटांनी आनंद, कुलदिप, स्वाती आणि किशोर मुंढे एकत्र आले आणि आमची बस सुरु झाली. पुढे ऐरोलीला चेतना आणि रीनाला घ्यायचे होते, तर स्टॉपवर फक्त चेतना उभी.... आणि तीही इन्द्राला दिसली नाही, आम्ही आरडाओरडा केल्यावर मग बस थांबवून, मागे घेऊन चेतनाला बसमध्ये घेतलं.... आणि चेतनाने हळू आवाजात आम्हाला गूड न्युज दिली की रीना मॅडम आंघोळीला गेल्यात आत्ता.. वॉव.
                मग सगळे मेल लोक पाय मोकळे करायला खाली उतरले आणि फिमेल लोक बसमध्ये खादाडी करत बसले. मध्येच मेल लोक त्यावर हात मारून जात होते... लाडकीचे सँडविचेस आम्ही बसमध्ये चढायच्या आधीच संपले होते... चकल्या बघून आनंदला कसली तरी आठवण दाटून येत होती मग ती विसरवण्यासाठी तो फेविकॉलच्या बोर्डखाली जाऊन उभा राहिला... मध्येच मैत्री हातात फुलांचा हार नाचवत आला... पण नंतर कळलं की तो गाडीसाठी होता... रीनाच्या स्वागतासाठी नव्हे. Wink
                शेवटी एकदाचे रीनामॅडमचे आगमन झाले. तिला एका सीटवर बसवून आनंदने जे 'गब्बस!!' म्हणून सुनावले तेव्हापासून बिचारीची बोलतीच बंद झाली. कोणीही तिला 'होठोंसे छूलो तुम' हे गाणं म्हणण्यासाठीही तोंड उघडू दिले नाही. मग पुढे साधनाला घेऊन बस कर्जतकडे मार्गस्थ झाली.
                गाण्यांच्या गदारोळात, आनंद, योगी, मैत्रीच्या गाण्यांच्या विडंबनात कर्जतचा नितीन देसाई स्टुडियो कधी आला कळलंच नाही. तिथे चहापान करून आम्ही रीसॉर्टला जाण्यास निघालो. पाऊस मस्त पडत होता. वातावरण अगदी धुंद झाले होते. ववि मस्त पार पडणार ह्याची खात्री पटली होतीच.
                .
                डॉ. हेगडेंच्या रीसॉर्टला भरपुर गर्दी होती. आम्ही तिथे जाऊन स्थिरस्थावर होतोय तोच पुणेकरही पोचले. इतके दिवस पुणेकरांशी केवळ अक्षरओळख होती, त्या सर्वांनाच प्रत्यक्ष भेटण्याची फारच उत्सुकता लागलेली होती, त्यामुळे त्या सर्वांचे आगमन होताच त्यांच्या आयडीज् चा अंदाज बांधणं सुरु झालं. एक आई आपल्या गोड बाळाला अतीव प्रेमाने विचारत होती, तू पोहे खाणार का उपमा? लवकर सांग.... आवाजाच्या फेकीवरूनच ओळखलं, ही नक्की पूनम असणार.. Wink श्रमातांना सुद्धा मी ओळखल्याने त्या फारच अचंबित झाल्या होत्या... लोक कसे काय आयडीज् ओळखतात असे आश्चर्याने त्या म्हणाल्या देखिल.... पण त्यांनी स्वहस्ते मला त्यांचा एक फोटो पाठवला होता ह्याचा त्यांना विसर पडला असावा बहुधा....
                उपमा, पोहे असा नाश्ता झाल्यावर सगळे वविकर मायबोलीकर एकत्र आले. तत्पुर्वी हिरव्यागार गवतात, रीमझिम पावसात, धुंद वातावरणात योग्याचा उत्स्फुर्त नृत्याविष्कार बघायला मिळाला....
                आयडिज् ची ओळख करून द्यायचा अभिनव कार्यक्रम सां. स. ने शोधून काढला होता. त्याप्रमाणे जोड्या पाडण्यात आल्या. मी अमृता१५ ह्या आयडीची ओळख सर्वांना करून दिली.
                मग श्रमातांनी सर्वांना भिजण्याची अनुमती दिली. तरण तलाव, धबधबा आणि रेन डान्स यांची मजा सर्वांनीच लुटली.
                रेन डान्स मध्ये योगी, रीना, सायली आणि स्नेहल बेफाम नाचत होते. सायलीचे 'नृत्य' हेच कार्यक्षेत्र असल्यामुळे तिचा सहजाविष्कार पहायला मिळाला. फारच सुंदर नाचते ती.. वैयक्तिक गुणदर्शनासाठी वेळ मिळाला असता तर परत एकदा तिच्या नृत्याचा आस्वाद घ्यायला मिळाला असता.
                मनसोक्त भिजून झाल्यावर सर्वांना पोटात कावळे ओरडत असल्याची जाणीव झाली.
                रीसॉर्टला जेवणाची सोय चांगली होती. पण डायनिंग हॉलमध्ये एक गृप आधीच जेवत असल्यामुळे मायबोलीकरांना विखरुन बसावे लागले.
                जेवण झाल्यावर सां. का. ची जागा दुसर्‍या गृपने अडवल्यामुळे सगळ्यांना सुस्तावायला जरा वेळ मिळाला. मग मस्तपैकी जमलेल्या एका मैफिलीत मीनू आणि श्रद्धाने आम्हा सगळ्यांना मुक्तकाव्याचे धडे दिले. भरल्या पोटी सर्वांच्याच कल्पेनेचे घोडे इतके स्वैर वेगात धावले की ज्याचे नाव ते..... मीनूने सुरुवातीला यमक '...व्या' ने जुळवा असं सांगितल्यावर रीनाला पहिलाच शब्द 'शिव्या' आठवला. काय करणार बिचारी.... सकाळपासून तेच खाऊन पोट भरलं होतं ना.... मग 'शिव्या द्याव्या, खाव्या, पचवाव्या......' वगैरे वगैरेवर सर्वांचंच एकमत झालं. जल्लां ह्या सगळ्याच 'काहीच्या काही कविता' लक्षात ठेवून गुलमोहरात लिहिल्या असत्या तर मायबोलीवर तेवढीच साहित्य मूल्याची भर पडली असती... असो, पुढच्या वेळी लक्षात ठेवण्यात येईल. Wink
                मग सुरु झाले सां. स. चे कार्यक्रम... अंताक्षरीला मी, पूनम, स्वाती, चेतना आणि चिन्मय एका गटात होतो. आणि ज्याची अपेक्षाही आम्ही केली नव्हती असं उपविजेतेपद आम्हाला मिळालं.. तेही केवळ स्वाती आणि पूनममुळे... जल्लां ते कधीही न ऐकलेलं अपर्णेच्या तपाचं गाणं ह्या दोघींनी कुठे ऐकलं होतं कोण जाणे... जेत्यांना कप दिले तसे उपविजेत्यांना निदान बश्या तरी द्यायला हव्या होत्या सां. स. ने..... पण असो.
                मग नंतर एक मिनीटाचे खेळ झाले. त्या खेळात मराठी नायकांच्या यादीमध्ये अतुलने 'उषा चव्हाण' यांचे नाव लिहून आमच्या माहितीत मोलाची भर घातली त्याबद्दल त्याचे अनेक आभार Proud
                त्यानंतर झालेल्या म्हणी आणि वाक्प्रचारांचा खेळ चालू असताना इन्द्रा सारखा घड्याळाकडे पहायला लागला. मयुरेशने तातडीने चहापानाची व्यवस्था करायला लावली आणि वविकर त्याचा आस्वाद घेत असताना पूनमने नव्या मायबोलीची उद्दिष्टे आणि त्याची विस्तृत माहिती पुरवली. वेळ संपत आल्याची जाणीव झाल्याने सगळे निघायच्या तयारीला लागले. माझा पहिलाच ववि मी खुपच मस्त एंजॉय केला. ज्यांच्याशी इतके दिवस केवळ अक्षरमैत्री होती त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. परस्परसंबंध अधिकच दृढ झाले.
                .
                आधी कबूल करूनही ह्या वविला न मिळालेल्या गोष्टी : Wink
                १. मीन्वाज्जींचा पुलाव
                २. राज्याचे पेढे
                ३. यशचे लाडू
                ४. स्वातीचे उखाणे (ह्या कार्यक्रमासाठी वेळ मिळाला नाही. नाहीतर नविन लग्न झालेले मायबोलीकर म्हणून स्वाती आणि यशला उखाणे घ्यायला लावायचे होते.)
                .
                परतीच्या वाटेवर घारुअण्णांकडे वडा-पावचा हट्ट करून त्यांना संयोजकगिरी करण्याची संधी दिली. मैत्री, नील, आनंद ह्यांनी 'यदाकदाचित' नाटकाचे संवाद फेकून मस्त मनोरंजन केले. नंदिनीच्या 'ह्यांच्याशी' अनपेक्षित भेट झाली. मनीच्या गोड गळ्याने गायलेली गाणी मनात साठवत वविचा शेवट गोड झाला.
                -----------
                समाप्त
                -----------

                लाडकीचे सँडविचेस ईईईईई त्यापेक्षा चटणी सँडविचेस बरे लागले असते.... यार.. आता त्याला मांसाहार म्हणता येणार नाही हेही खरच. (लाडके दिवे घे.)
                .
                ए साधना इतकी पण शायनिंग नकोय मारायला. कधी नव्हे ते तुम्ही आधी पोचलात.

                ~~~~~~~~~
                ~~~~~~~~~
                Happy

                कधी नव्हे ते तुम्ही आधी पोचलात

                काय? मला तर सगळे म्हटले, मुंबईकरच नेहमी आधी पोचतात म्हणुन.....पुणेकर नेहमी सारखे -------
                ______________________________________
                आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
                घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
                उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
                पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

                e साधना मावळ सृष्टीला काय झाल होत आठवतय का बघा मुंबईकरांना.
                का उगा आपलं उचलली ..................;)
                 
                 
                ==============
                बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
                लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

                या वर्षी माझा पहिलाच ववि. गेली ५-६ वर्षे बाहेर देशी हिंडत होतो. जेव्हा केव्हा भारतात आलो तेव्हा ववि होऊन गेला असायचा. त्यात वृत्तांत वाचून अजूनच चुटपुट लागायची. पण यावर्षी मात्र नक्की केले होते. तर त्या केलेल्या धमालीचा हा वृत्तांत.
                रविवारी सक्काळी सक्काळी ६:३० ला किमयासमोर उभा होतो आणि समोरुन यशने हात केला आणि बस कुठे उभी आहे ते दाखवले. तिथे काही नवीनजुने मायबोलीकर भेटले, ओळखीपाळखी झाल्या. कोरम भरल्यावर निघालो.
                बस निघाल्यावर अशा वेळी निघते तशी शिरगणतीची टूम निघाली. त्यात माझे नाव पहिलेच पुकारले गेले. मी हजेरी दिली. मग पुढे बसलेल्या आणि लाल टॉप घातलेल्या एका बाईंनी सीटवरून अगदी उठून मागे बघून 'कोण तो कोण तो' अशी विचारणा केली. मी परत हात वर केला. मग माझी थोडावेळ उलटतपासणी झाली. त्या तपासणीचा रोख 'माझ्या आयडीचा अर्थ काय ? तो मला नक्की का माहिती नाही ?' यावर होता. तेव्हा उद्याच शब्दार्थ बाफवर मी हे विचारतो असे सांगून मी तात्पुरती सुटका करून घेतली. शिरगणती पुढे सुरु झाली. जुने आयडी सर्व ई-माहिती होते, स्मरणवहीत त्यांच्या नावासमोर आता चेहरेसुद्धा आले. (मला पेचात टाकणार्‍या बाई म्हणजे मीनु ऊर्फ मीन्वाज्जी या आहेत हे कळले.)
                यानंतर सांसने प्रवास ताब्यात घेतला व आम्ही अंताक्षरी खेळायला लागलो. सुरुवातीला 'अन्ताक्षरी' असलेला खेळ थोड्याच वेळात 'भेंड्यां'मध्ये रुपांतरित झाला. मराठी चित्रपटगीते, भावगीते, लावण्या, बालगीते, बडबडगीते, नाट्यगीते, भजन, आरत्या, गझला इतकेच नाही तर स्वरचित विडंबनेसुद्धा असे सर्व प्रकार लोकांनी प्रचंड उत्साहाने म्हटले (अशा उत्साहाच्या भरात 'लवलवती विक्राळा....' वगैरे प्रकार होणे अनिवार्यच !) हे होइस्तोवर चहाची वेळ झाली होती आणि लोणावळाही आले होते. तेव्हा चहासाठी एके ठिकाणी थांबलो. पावसाची झड लागली होती आणि वविला पाऊस दगा देणार नाही असा विश्वास जागा झाला. हे चहापान माझ्यासाठी बरेच प्रबोधन करणारे ठरले. हे जे काय विश्वातील चैतन्य आहे ते एका कांडीत मावू शकते अशी गाढ खात्री असणारी एक जमात असते, त्या जमातीत 'काही' वविकरही आहेत हे उमगले. 'साठा भर्पूर आहे' याची एकवार खातरजमा करण्यात आली. मग 'बुधवार'ची व्युत्पत्ती, तिचा इतिहास व वर्तमान या उपयोगी (माझ्यासाठी) गोष्टी कळल्या आणि परत मार्गस्थ झालो.
                कर्जतपाशी आलो तेव्हा सर्वजण पहाटे चारला पाण्याला निघालेल्या सखुला भेटण्यात आणि ती काय म्हणत आहे हे ऐकण्यात गुंतून गेले होते. साहजिकच, आम्ही रस्ता चुकलो. पण दक्ष संयोजकांमुळे ही चूक वेळीच लक्षात आली आणि शेवटी आम्ही वविच्या ठिकाणी पोहोचलो.
                .
                (पुढील ३ परिच्छेदांपैकी एक परिच्छेद वाचणे पुरेसे आहे. ऐतिहासिकवाल्यांनी पहिला वाचावा, ललितवाल्यांनी दुसरा आणि बोर झालेल्यांनी तिसरा.)
                ठिकाण मोठे चखोट... घाटावरचा दमझडी पाऊस, १०० गजांवरील ढाण्या वाघ दिसो नये ऐसे धुके, चिरेबंदी झाडझाडोरा या सर्वास सह्यपर्वताची मातबर साथ ऐसे. दिवसाउजेडी कोण्ही चालोन येणेची गुस्ताखी करावी तर ते आसमंतास नामंजूर. बहु पसंतीस आले. येथील मुक्कामकारणे बहु समाधान ऐसा विचार.
                .
                आजूबाजूचे हिरवेगार डोंगर कधी दिसत होते तर कधी वर्षेच्या दुधी धुक्याच्या पदराआड लपत होते, जणू एखाद्या खट्याळ मुलाने एक हिरवी खोडी काढून परत आईच्या पदराआड लपावे तसे. तलम गार हवा अंगचटीला येऊन अंगभर गोड शिरशिरी देऊन जात होती आणि पाऊसही कसा तर अंतर्बाह्य चिंब करणारा !
                .
                हवा मस्त होती, लोकेशन सहीच होते.
                .
                तिथे पाहिले तर मुंबईकर आधीच येऊन पोहोचले होते. खोलीत सामान ठेवून, कपडे बदलून, नाश्तापाणी करुन सर्वजण दंगा करायला जय्यत तय्यार. पण त्याआधी अर्थातच ओळखपरेड. स्वतःपेक्षा वेगळ्या शहरात राहणार्‍या व्यक्तीबरोबर प्रत्येकाची जोडी करून देण्यात आली. कल्पना अशी की प्रत्येकाने जोडीदाराची ओळख सर्वांना करून द्यायची. ही कल्पना खरोखर छान !
                अशा प्रकारे ओळखदेख झालेल्या आम्ही सर्वांनी जलतरण तलाव व धबधब्याकडे प्रयाण केले. एव्हाना पाऊस व्यवस्थितच सुरू झाला होता. हळूहळू भीड चेपून एकेकजण पाण्यात उतरत होता. काहीजण धबधब्याखाली उभे राहून भिजत होते. या धबधब्याला असा पर्फेक्ट जोर होता की त्याखाली उभे राहिल्याने पाठीला मसाज केल्याचा अनुभव येत होता. तो अनुभव घेऊन झाला. परत खाली तलावापाशी आलो तर पोहण्याचे उत्स्फूर्त धडे सुरू झाले होते. थोडावेळ डुंबल्यावर लोक 'रेनडांस' ला गेले. तिथे एक जण 'एक सीडी संपली की दुसरी लावणे' अशी कौशल्यपूर्ण डीजेगिरी करत होता. मग गोल आगगाडी करून नाचणे, गणपती डांस, आदिवासी नृत्य (= शेजारी शेजारी असे रांगेत उभे राहून शेजारच्यांच्या खांद्यांवर हात ठेऊन पाय एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे असे सामुहिक नाचणे) वगैरे नेहमीचे नृत्यप्रकार झाले. त्यातील काही गाण्यांवर फुगडी खेळण्याचेही एक-दोन प्रयत्न झाले, पण ती लोळणफुगडी होऊ लागल्याने त्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दगडवाल्या योगेशने रेनडांस रॉकवला. त्याच्या नावात दगड आहे, पण त्याचे अंग वेतासारखे वाकते याला आम्ही सर्वजण पुरावा आहोत.
                .
                अशी मौज केल्यावर/पाहिल्यावर मी परत तलावाकडे वळलो. तर तिथे 'पाण्यात टाकलेले नाणे शोधा' खेळ रंगात आलेला. मी काठापाशी उभा राहून ते बघत असताना एक लांबसर केस असलेले काका माझ्यापाशी आले. त्यांचे ते फक्त काहीच लांब केस बघून 'ती शेंडी आहे की काय' असा विचार मी करतोय तोच त्यांनी माझ्या हातात पाच रुपयाचे नव्या आवृत्तीचे नाणे टेकवले आणि 'हे नाणे फेक पाण्यात, ते लवकर तळाशी जाईल कारण ते हलके आहे' असे मला अतिचशय बुचकळ्यात टाकणारे विधान केले व ते पाण्यात उडी मारते झाले. या वेळी 'हे कोडे डोके चालवा बाफवर टाकून लोकांना विचारात पाडावे, आपण कशाला?' असा चाणाक्ष व तेव्हढाच विचार करुन मी पटकन ते नाणे पाण्यात फेकले. ते नाणे शोधताना झालेल्या बोलण्यावरून ते कोड्यात बोलणारे काका म्हणजे घारुअण्णा होत असे मी समजलो. (चाणाक्ष वाचकांच्या मनात 'ओळखपरेड होताना हा झोपला होता का?' असा प्रश्न उभा राहील, त्याचे निराकरण असे की घारुअण्णा उशीराने तिथे पोहोचले म्हणून त्यांची ओळख झाली/पटली नाही.) थोडा वेळ असे खेळून झाल्यावर तलावातील (पुरुष)लोकांना दहीहंडीचा मनोरा करण्याची इच्छा झाली व ते त्वरित त्या कामाला लागले. त्यात मीही सहभागी झालो. पहिला मजला चढवण्यात आम्हाला यश आलेही होते, पण दुसरा मजला चढवताना मात्र माझ्या खांद्यावरचे कुणाचे(तरी) ओझे न पेलवून मी आणि पर्यायाने आम्ही सर्व खाली कोसळलो. यात एके वेळी हिम्सच्या मनात पहिल्या मजल्यावरचा गोविंदा होण्याची अघोरी इच्छा दाटून आली. त्यासाठी त्याने एकाच्या खांद्यावर चढाईचे अयशस्वी प्रयत्नही केले. तो बहुतेक इंद्रा होता (इथे परत चा.वा.ना तोच प्रश्न पडेल. या वेळी निराकरण असे की मी मुंबईच्या सर्वांना पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे 'आयडी-माणूस' ही जोडी जुळवताना थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे.) नंतर तलावातून बाहेर आल्यावर बहुतेक इंद्रा त्याचा एक खांदा दुखावल्याची तक्रार करत होता. तो काही काळ एका बाजूला झुकून चालत होता असे दिसले.
                हे सर्व होईस्तोवर जेवणाची वेळ झाली होती. तेव्हा लोकांनी क्रीडा आवरत्या घेतल्या आणि काहींचा अपवाद वगळता इतरांनी कोरडे होऊन, कपडे बदलून जेवणास सुरुवात केली. जेवण स्वादिष्ट व रुचकर होते. त्यामुळे मजा आली.
                .
                हे सर्व झाल्यावर आता अर्थातच वेळ होती सां.कार्यक्रमाची. श्रमाता व मीनूने माईक ताब्यात घेतला, नंदिनी स्कोरर झाली. लगेच पाच जणांचे ४ संघ करण्यात आले. आमचा संघ रिमझिम, अमृता१५, बहुतेक गौरवी, मी आणि साजिरा असा होता. पहिली राऊंड भेंड्यांची होती. नंतरची राऊंड होती दिलेले गाणे अभिनयाद्वारे ओळखण्याची. म्हणजे एकाने अभिनय करायचा व त्याच्या संघाने ते गाणे ओळखायचे असे. शेजारची मुंबईची टीम जोरात होती. एकतर ते सर्वजण (या शब्दाला त्या टीममधले काही चौघे आक्षेप घेतील) भलतेच तयारीचे होते आणि त्यात त्यांना काही सोप्या चिठ्ठ्या आल्या. हे म्हणजे पीएच्डीच्या तयारीच्या व क्षमतेच्या माणसाला अचानक इ.५वीचा पेपर यावा तसे झाले. एक राऊंड होती अभिनयाद्वारे चित्रपट ओळखण्याची. त्यात मला 'या सुखांनो या' हे करून दाखवता आले नाही.... त्यानंतरच्या वेळी १५ ने 'एक धागा सुखाचा' हे अतिशय व्यवस्थित करुन दाखवले आणि ते आमच्या गटातील जुनिअर मेंबरने ओळखल्यावर तर 'करता येत नाही आणि सांगताही येत नाही' अशी माझी बिकट अवस्था झाली. घारुअण्णांच्या टीमने 'श्यामची आई' हा चित्रपट ओळखताना 'धाकटे बाळ' असे एक उत्तर दिले... पण अशा उत्तुंग अडचणींनी न डगमगता घारुअण्णांनी कंबर कसली आणि स्वतःच्या टीमला बरोबर उत्तराकडे घेऊन गेले. आणखी एक राऊंड होती कडव्यावरुन गाणे ओळखण्याची. एकंदरीतच ही गाणी, चित्रपट वगैरे फार अवघड होते असे माझे (माझ्याशीच) एकमत झाले. हे सर्व दीम्डुने सुचवलेले आहेत असे कळाले. तेव्हा या काळात दीम्डुला चिकार उचक्या/ठसका लागले असेल तर त्याला काही अंशी तरी मी कारणीभूत आहे हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. स्कोरर नंदिनी माझ्या शेजारी बसली होती. तिला मी काही आडून आडून व काही थेटच सुचवले, पण नि:पक्षपातीपणा, प्रामाणिकपणा असल्या निरर्थक गोष्टींवर तिचा विश्वास असल्याने काही उपयोग झाला नाही. शेवटी, शेजारची टीम जिंकली आणि त्यांना प्रत्येकी एक मग मिळाला (आमची टीम हरण्यात माझा हातभार मोठा आहे हे मात्र विजेते कृतघ्नपणाने विसरले असे मी इथे नोंदवू इच्छितो.)
                .
                मग one minute games झाले. 'एका मिनिटात जास्तीत जास्त मराठी अभिनेत्यांची नावे लिहा' वगैरे... इथे 'उषा चव्हाण : अभिनेता की अभिनेत्री ?' , 'चंद्रकांत व चंद्रकांत गोखले : एक वेगळेपण' असे काही परिसंवाद घेण्याची गरज दिसून आली.
                यानंतर dumb-charades ची राऊंड होती ज्यात म्हणी व वाक्प्रचार ओळखायचे होते. म्हणी व वाक्प्रचार हे जसेच्या तसेच म्हणणे याला फार महत्व आहे. या खेळात ओळखायला सांगितलेल्या म्हण अथवा वाक्प्रचार यांचा त्या त्या गटाला प्रत्यक्ष अनुभव येणे हे बरेच झाले. एका गटाने 'पंचमुखी परमेश्वर' असे उत्तर दिले पण ते सर्वानुमते चूक ठरले आणि त्यांना खरोखरच पाचामुखी परमेश्वर दिसला. 'देव देतं आणि कर्म नेतं' याचाही तत्काळ अनुभव एका गटास आला.
                या दरम्यान एक मोठा व अवजड स्पीकर खाली कोसळला. त्याला मंजुडीने मोठ्या धीराने पाठ व खांदा दिला आणि आपद्प्रसंगी मायबोलीकर मजबूत कण्याचे व घट्ट खांद्याचे असतात हे दाखवून दिले. तिला काही इजा झालेली नाही, हे सर्वात उत्तम.
                असा हा धमाल, रोमांचक व चित्तथरारक सां.कार्यक्रम पार पडल्यावर चहापान झाले. यानंतर ऍडमिनच्या सुचनेनुसार पूनमने 'नवीन मायबोली' या विषयावर थोडे मार्गदर्शन केले. काही मायबोलीकरांना काही तांत्रिक शंका/प्रश्न होते त्यावर चर्चा झाली. तोवर 'निघावे परि कीर्तीरुपे उरावे' ही वेळ झाली होती. सांघिक प्रकाशचित्र होऊन आम्ही आपापल्या बाफला परत निघालो.

                तरीच मला सारख्या सारख्या उचक्या लागत होत्या....... Happy

                  असो. पण तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणेच ववि एन्जॉय केलंत ना? छान ........... Happy
                  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                  आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
                  चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

                  तिला काही इजा झालेली नाही, हे सर्वात उत्तम.

                  जल्लां खरचटण्याला तुमच्यात इजा म्हणत नाहीत होय..... Happy त्या छोट्या सिधला स्पीकरचा स्टँड लागू नये म्हणून मी पाठ आणि खांदा दिला. माझ्या मदतीला तत्परतेने बाकीचे माबोकर धावून आले आणि त्यांनी तो स्पीकर जागेवर नीट उचलून ठेवला.
                  पण सिधची उत्सुकता लय भारी होती.... एक पाय उचलल्यावर उरलेल्या दोन पायांवर स्टँड कसा उभा राहू शकेल ह्याची चाचपणी तो करत होता, आईच्या आणि बाबाच्या ओरडण्याला न जुमानता... Happy

                  अरभाट,मस्त वृत्तांत रे..चला एकाने तरी वृत्तांत पूर्ण केला ...:) बाकीचे बिगी बिगी पूर्ण करा बघु वृत्तांत.... Happy

                  मावळ सॄष्टीच्या वेळी माझा आयडी जन्माला आला नव्हता आणि इतके पाठीमागचे लक्षात ठेवतील ते कसले मुंबईकर्..........

                  दिमडू, काल आपली अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली....

                  ______________________________________
                  आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
                  घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
                  उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
                  पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

                  Pages