माझा लाँकडाऊन मधील प्रवास

Submitted by मंगलाताई on 19 May, 2020 - 09:37

मी मार्चमध्ये पुण्यात मुलाकडे सहज गेले आणि तिथेच अडकले लाँकडाऊन मुळे.9 मेला रात्री 9:00 वाजता आम्ही दोघे कारने पुण्याहून निघालो. पूणे शहर ,चाकण, शिरूर, औरंगाबाद, जालना, सिंदखेडराजा, सुलतानपूर, मालेगाव,वाशिम, अमरावती, नागपूर असा प्रवास करत दुसर्या दिवशी साडेअकराच्या सुमारास घरी पोहचलो
ड्रायव्हर गोरोबा टेकाळे (पुणे) अतिशय निष्णात ,गंभीर व्यक्तीमत्व. त्यांच्याशी गप्पा करत आम्ही सुखरुप पोहचलो.
अतिशय शांत, अबोल रस्ते. मानववसाहतीच्या खुणा पुसट झालेले.पण बरेच काही बोलत होते परिस्थिती बद्दल.रस्त्याच्या मौनात खदखद दडली होती मानवी अहंकाराची.कधी दिवस-रात्री चा भेद न समजणारा मानव आज दिवसाही रात्र असल्यासारखा वागतोय. नागमोडी वळणे घेणारा रस्ता म्हंटलं तर निर्जीव...... तरी तो दुःखी होता,दुःखी आहे. उद्दामपणे धडधडत जाणारी वाहनं आठवतात त्याला. करकचून ब्रेक लावलेली, कर्णकर्कश ध्वणी खिंकाळत, उधळलेली, संथपणे चालणारी सर्वच वाहने आठवली. आणि आता एखादे वाहन हळूवारपणे पुढे सरकत जाते आहे. रस्त्याच्या मनाची घालमेल रस्त्यालाच माहिती.
शांत, निद्रिस्त शहरे,अंधारात बुडलेली गावखेडी,ताळेबंद भव्यदिव्य माँल,ओकीबोकी घरं,शटरबंद दुकानं,निर्जन हाँटलं,ढाबे सुस्तावलेले पेट्रोल पंप.जणू काही काळ थांबला आहे.
हे वास्तव असले तरी शांत, सुंदर, स्वच्छ शहरे वेगळेच दिसत होते. प्रदूषण कमतरतेमुळे प्रसन्न वातावरण ,हिरवी, कंच झाडे, मोकळी स्वच्छ हवा,गारवा,मोकळा रस्ता. देशी झाडावर फुललेली फुलं ,पसरलेला सुगंध , मानसांच्या हस्तक्षेपाशिवाय आलेली प्रसन्नता यामुळे एक वेगळाच अनुभव येत होता. मला देऊळ नेहमी माणसांनी गजबजलेली दिसायची .त्यामुळे मला नेहमी वाटायचं की देऊळ त्याच्या मुळं रुपात बघाव शांतपणे, निर्विकारपणे असेच दर्शन झाले मला देवळांचे. नेहमीच्या प्रवासासारखा हा प्रवास नव्हता. उदासीनता, करुणा, आत कशाचेतरी दुःख असलेला हा प्रवास होता.
या निर्जन रस्त्याच्या कडेने काही जण होते.ते आपल्या भारतातलेच होते.म्हंटले तर सारे भारतीय माझे बांधव आणि दुर्लक्ष केले तर पादचारी. या लोकांना आठ दहाच्या घोळक्यात चालतांना बघून ज्या यातना झाल्या त्याला शब्द नाही. दूःख भोगणारा दुःखाचे वर्णन करू शक नाही अन् लेखन करणारा दुःखापासून खूप दूर असतो ही वास्तविकता आहे. थोड्या थोड्या अंतराने हे मजूर खाली बसत उठत, झोपत, दिसेल त्या वाहनांनी गावाकडे निघाले होते. किलोमीटर चे अंतर , राज्याच्या सीमा, सरकणारी शहरं याचा विचार त्यांना नव्हता. फक्त एकच दिशा गावाकडची वाट.
डोक्यावर ओझे, रिकामा खिसा,मनात पोलिसांची दहशत आणि घरी पोहचण्याचे स्वप्न घेऊन निघाला. आपल्या राज्यात वारीचे,कुंभमेळ्याचे ,इतर धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केल्या जाते, तिर्थक्षेत्र भेटींचे नियोजन केले जाते मग आपण या मजुरांसाठी काही करू शकतो का,करू शकलो असतो का? की नुसते मरणानंतरच्या प्रतिक्रिया एवढेच आमचे नाते उरले आहे. मरणोत्तर पाच लाखांची रक्कम खर्च होण्यापेक्षा घरी सोडून देण्यासाठी दोनहजार खर्च केले असते तर ? कधीकधी विचार येतो खरच ही नैसर्गिक आपत्ती आहे का ? आपत्ती नैसर्गिक असली काय अन् मानवनिर्मित असली तरी मरतो गरीबच. तो विकास प्रक्रियेत ला शेवटचा घटक आहे उपभोग घेण्यासाठी आणि पहिला घटक आहे श्रमासाठी.मजूराशिवाय विकास शक्यच नाही. शेतकर्यांच्या आत्महत्या, मजुरांचे स्थलांतरण ,मजूरांची परवड, किड्या- मुंगीसारखे मरण याशिवाय शहरांचा विकास शक्य आहे का ? आणि असा विकास आम्हाला विकसीत भारतीय म्हणवून घेण्यात भूषणावह आहे का ? विकासचा फायदा जर आम्ही घेतोय तर यावर विचार करणे ही फक्त सरकारची जबाबदारी उरते का?
मी एक सामान्य बाई आहे .मी स्वतः कधीही कारने प्रवास करीत नाही. माझ्या गाडीत आणखी तीन लोक बसू शकत होते,पण नाही घेता आले कुणालाही. ड्रायव्हर सुद्धा हळहळत होते, म्हणाले मी सोडून देऊ शकतो मजूरांना पण कायदा?
माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो.खरचं मजुरांचे मागच्या जन्माचे पाप भोगावे लागत आहे का या जन्मी. समजा या जन्माचे असेल तर त्यांना कुठे वेळ मिळाला पाप करायला ? अगदी जन्माला आल्यापासून तर पोट भरणे एवढेच उद्दिष्ट आहे त्यांच्यापुढे .खरचं एवढे काय केले त्यांनी, कशाची शिक्षा भोगताहेत. केवळ निरक्षरतेची एवढी कठोर शिक्षा. त्यांचे हाल बघितले की ते भारतीय आहेत का इतर ग्रहावरचे लोक आहेत असे वाटते.लहान मुलं प्रश्न विचारतात आई ते का मरताहेत काय उत्तर द्यावे आईने.नागरिकशास्त्र विषय बदलावा लागेल का सरकारला. विकास कामे सुरू होतात ती मजूरापासून आणि संपतात ती आमदारांच्या फीत कापण्याने, उद्घाटनाने. बस,रेल्वे,विमान, अँटो,ट्रक तयार करणार्या कारखाण्यात मजूर राबला,त्यानेच तयार केली ती बस . का केली? पायी चालता चालता प्राण सोडता यावा म्हणून .त्यांच्या मरणानंतर त्यांच्या म्रुत्युचा जाब कोणी विचारावा,कुणाकडे विचारावा? न्यायालय आहे का यांच्या साठी .
मेलेला कुशल कामगार मोठी हाणी करून गेला. कौशल्याने काम करणारे कामगार हे बिहारी किंवा यु. पी.वाले नसतात तर आमच्या भारतीयांच्या गरजा पूर्ण करणारे असतात. ते आमच्या घरी कामाला येतांना कधीच विचारत नाही तुम्ही कोण आहात . कामगारांना फक्त काम माहीत आहे. कौशल्य असे पायदळी तुडवले जाईल तर आमचे माँल,इमारती, बागा,रस्ते,मेट्रो, रेल्वे कोण उभारेल हे वैभव. या वेळी मला शहाजहानच्या ताजमहाल बांधून झाल्यावर कत्तल केलेल्या मजूरांची आठवण झाली.
भविष्यात आपल्या सान्निध्यात येणाऱ्या श्रमिकांना ,मजुरांना, कारागिरांना श्रेय द्या. मान द्या, योग्य मोबदला द्या. केलेल्या चुकांची भरपाई करुया. न्याय द्या,वागू द्या त्यांना पण माणसाप्रमाणे. आणि हे आम्हालाच करायचे आहे. मध्यमवर्गीयांना . कारण इतरांना समजण्यासाठी जो भाव असतो तो आहे आमच्या जवळ . हो फक्त आमच्याच जवळ आहे. बाकी हे कामगार शिक्षकांनी केलेल्या जणगणनेपुरते आहेत वहीखात्यावर. रेशन वाटप रांगेत लागणे, मते देण्यासाठी ओळखपत्र गोळा करणे ही यांची अवांतर ऐच्छिक कामे आहेत. मूळ व्यवसाय आहे हाताला काम शोधणे आणि पोटाला भाकर. संपले यांचे विश्व.
स्वातंत्र्याचा यांच्याशी काही संबंध नाही. हे शिकले तरी न शिकल्यासारखे आहेत. नाही शिकले तरी काही बिघडत नाही कारण बिघडण्यासारखे काही उरतच नाही आयुष्यात.
इतके कामगार कामाच्या शोधात येतांना हळूहळू विखुरले आणि जातांना जबरदस्त थप्पड लगावून गेले आमच्या गालावर.
असा प्रवास विसरणे शक्य नाही. त्यांच्याच्याने बोलवत नव्हते, काही सांगता पण येत नव्हते .वैभवशाली ,विकसनशील, अजिंक्य भारताचा नकाशा दिसतोय मजूराच्या डोळ्यात .
हे असे असले तरी अत्यंत आशावादी चित्र गावोगावी दिसले. जी गावे रस्त्यावर आहेत त्या गावातल्या नागरिकांनी पाण्यासाठी माठ भरले, रांजन भरले, सिनटेक्स टाक्या भरल्या. मोठाले पातेले चुलीवर ठेवून अन्न शिजवून जेवू घातले. गावातली तरुण मुलं लागली कामाला. काही शेतात विहिरी दिल्या आंघोळीसाठी. काही शेतकर्यांनी शेताची जागा ,बागा दिल्या झोपण्यासाठी. काहींनी चपला, कपडे, नाश्ता, चहा. देणारा सामान्य माणूस होता. सामान्याचे अंतकरण सामान्य जाणे. म्हणून सामान्यासाठी सामान्यच काम करेल. देश चालवणाऱ्यांच्या यादीत मजूर कधीच नव्हता, राहणार नाही. मतांचा एक समुदाय आहे तो.निश्चितच मुंबईत मतदानाचे ओळखपत्र काढणे बाध्य केले असेल
मजूराला. मतदान प्रक्रियेतला आद्य पण अत्यंत मातीमोल घटक आहे तो.
भारतात श्रमाला वैभवशाली दिवस येतील का. आले तर कसा असेल भारत. आशा करण्यास हरकत नाही. हा भारत मजुरांचा भारत आहे हे कधीतरी वर्तमानपत्राच्या मुखप्रुष्ठावर छापून येईल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तो पायी जाणारा जो दिसला ना तो खरा भारत. तो आहे हे कुणाला ठाऊकच नाही. तो जाणवला जरी तरी भले भले कानाडोळा तरी करतात किंवा फुकटे, चोर, ओझं म्हणून हिणवतात. 'हा भारत मजुरांचा भारत आहे हे कधीतरी वर्तमानपत्राच्या मुखप्रुष्ठावर छापून येईल का?' या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर सगळ्यांना ठाऊक आहे. काही पत्रकार तर खाजगीत सांगत असतात की मजूरंची कोणतीच बातमी कुणी छापू लिहू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. आता ह्यात कितपत खरे किती खोटे हे देखील अनुभवांनी समजण्याजोगे आहेच. तर असो. बाकी लेख पटला, पोहोचला.

तुम्ही स्वतःच्या गाडीने गेला होतात का. ड्राइवर कुठे भेटले की ते तुमचेच ड्राइवर आहेत. स्वतःच्या गाडीने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता येते का. तुम्ही जाऊ शकता तर मजुरांना का नाही सोडू शकत.
मजुरांबद्दल लिहिलंय ते खरं आहे. त्यांना कोणीच वाली नाही.

धन्यवाद चंपा
आम्ही भाड्याने गाडी केली होती, ड्रायव्हर गाडी दोन्ही. आँनलाईन परवानगी घेतली त्यात फक्त दोन लोक बसण्याची परवानगी होती. मला खुप वाटत असुनही मी मदत करू शकले नाही.

धन्यवाद फिल्मी
खरे आहे भारत असा शेतात, गावात मजूरात ,शेतकर्यात आहे.

तुम्हाला वाटणारी तळमळ लेखात व्यक्त झाली आहे.
खरं आहे. आपल्याला शक्य आहे तेवढ्या गोष्टी आपण करूच शकतो आणि करायला हव्यात.

तळमळीने लिहिलेला लेख. मजुरांला कोणीच वाली नाही असं दिसतंय. उत्तरप्रदेश मध्ये जे चाललं आहे ते भीषण आहे.

टीव्ही, नेटवर जे दिसतंय ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं.

फार हतबल, निराश वाटतं. स्वत:चा राग येतो, शरम वाटते.

धन्यवाद सगळ्यांना
माझा उद्देश पोहोचला.एक विचार अनेक चांगल्या विचारांना न्याय देऊ शकतो. आपापल्या स्तरावर आपण मदत करूया.