पुढे चालण्याचा इशारा मिळाला

Submitted by द्वैत on 7 May, 2020 - 14:40

बुडालो जरी मी किनारा मिळाला
मला वादळांचा सहारा मिळाला

जिथे थांबली वाट अंधारलेली
तिथे चांदण्यांचा पहारा मिळाला

जरासा कुठे मी विझू लागल्यावर
नवा पेटलेला निखारा मिळाला

कधी ना मिळाले नखाएवढे ही
कधी मग सुखाचा ढिगारा मिळाला

किती भाग्यशाली म्हणू मी स्वतःला
तुझ्या काळजाचा निवारा मिळाला

पुरे द्वैत आता इथे थांबणे हे
पुढे चालण्याचा इशारा मिळाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
>>>>>>जिथे थांबली वाट अंधारलेली
तिथे चांदण्यांचा पहारा मिळाला>>>> वाह!