निळाई

Submitted by pranavlad on 9 May, 2020 - 03:39

पौर्णिमेला दिसे चंद्र पूर्वेकडे,
अंगणी पुन्हा चांदण्यांचे सडे
ही अशी सांज दारावरी ठेपली,
युगांची प्रतीक्षा आता संपली

आवरावा मनाचा सारा पसारा
वाहावा तुझ्या दिशेनेच वारा
गंध या फुलाचा तुजला मिळावा
मनाचा मनाशीच संवाद व्हावा
तुझी धून, आतुर कानी पडावी
क्षणाचीच या वाट मी पाहिली
ही अशी सांज...

फिरवलेस ना रे मोरपीस तू ही?
शहारल्या बघ पुन्हा तारकाही
तुझे स्मित मंद या नभी उमटले,
नक्षत्र बघ इथे पुन्हा लाजले
बुडाली तव स्वप्नात ही चांदणी,
विसरले भान, मग मंदावली
ही अशी सांज...

जसा सूर्य पश्चिमेकडे मावळे,
आठवे मज रुप ते तुझे सावळे
आलास तू अन् फुले बहरली
गेल्यावरी तू राहिली सावली
किती रंग देहावरी माळले मी,
निळाई परि अंतरी राहिली
ही अशी सांज...

©️ प्रणव

Group content visibility: 
Use group defaults