मन वढाय वढाय (भाग ४७)

Submitted by nimita on 6 May, 2020 - 21:33

स्नेहानी पर्समधून फोन काढून बघितलं... रजतचे तीन चार 'missed calls' ... एरवी फक्त कामापुरताच फोन करणारा आणि तेव्हाही अगदी मोजकंच बोलणारा रजत.... आज असं काय बोलायचं असेल त्याला माझ्याशी? मी उद्या घरी परत जातेच आहे ; पण हे माहीत असताना सुद्धा आज रात्री इतके कॉल्स ?? त्या पार्टीच्या गोंधळात मला अजिबात ऐकूच नाही आली फोनची रिंग.... आता स्नेहाला पण काळजी वाटायला लागली... तिच्या डोळ्यांत अश्रू गोळा व्हायला लागले....पण पुढच्याच क्षणी तिनी स्वतःला समजावलं -' तसंच काही असतं तर त्यानी मावशीला सांगितलंच असतं की!' तेवढ्यात तिला रजतचा एक मेसेजही दिसला... तिनी घाईघाईत मेसेज वाचायला घेतला.... मेसेज वाचून तर तिच्या डोळ्यांतले अश्रू अलगद तिच्या गालांवर ओघळले... मेसेज होताच तसा....रजतनी लिहिलं होतं..'Nothing important. फक्त तुझा आवाज ऐकायला फोन केला होता. Missing you a lot. '

रजतनी हा असा मेसेज पाठवला ? या शब्दांत?? तिला बडोद्याहून निघायच्या आदल्या रात्रीचा तो इमोशनल रजत आठवला. मगाचचं वंदनामावशीचं बोलणं आठवलं आणि तिची चिंता अजूनच वाढली.' खरंच रजतची तब्येत ठीक नसेल का ? काय होतंय त्याला? फोन करू का त्याला आत्ता? नको, इतका उशीर झालाय; झोपला असेल तो ऑलरेडी. पण जर तो माझ्या फोनची वाट बघत असेल तर ? काय करू? ' स्नेहा पुरती गोंधळून गेली होती. ...' आत्ता त्याला voice message पाठवते ; जर त्यानी उत्तर दिलं तर लगेच फोन करते.' स्नेहाला हा विचार पटला. तिनी मेसेज पाठवला - 'Miss you ...love you even more...See you tomorrow..' तिनी मेसेज पाठवून बराच वेळ झाला तरी रजतनी तो बघितला नाही- त्यावरून स्नेहानी अंदाज बांधला की तो झोपला असेल. पण तरीही एकदा खात्री करून घेण्यासाठी तिनी श्रद्धाला विचारायचं ठरवलं. श्रद्धा अजून ऑनलाइन दिसत होती. स्नेहानी तिला मेसेज पाठवला...' बाबा जागे आहेत का बघून सांग प्लीज... त्यांची तब्येत ठीक आहे ना?' श्रद्धाचं उत्तर येईपर्यंत स्नेहाच्या जीवाची घालमेल चालू होती. पाच मिनिटांनंतर श्रध्दानी मेसेज पाठवला....' बघून आले. झोपलेत बाबा. And don't worry. He is ok. आज तर आम्ही दोघांनी मिळून पास्ता बनवला होता...' श्रध्दाचा मेसेज वाचून स्नेहाच्या जीवात जीव आला. आणि तिनी रजतला फोन करायचा विचार रद्द केला. पण त्या स्थितीतही तिच्या मनात एक मजेशीर विचार आला -' अरे वा, मुलीबरोबर अगदी पास्ता वगैरे...आणि बायकोनी साधा एक कप चहा मागितला तर लगेच काम आठवतं...भेटले की विचारते त्याला !' त्यावर रजतची काय प्रतिक्रिया होईल या विचारानीच स्नेहाला हसू आलं. आता कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो आणि कधी एकदा रजतला समोर बघते- असं झालं होतं स्नेहाला! तिची नजर खोलीत सगळीकडे फिरत होती. तिच्या आणि रजतच्या सहजीवनाची सुरुवात याच खोलीत झाली होती. त्या नव्या नवलाईच्या काळात त्या दोघांनी मिळून किती स्वप्नं बघितली होती -त्यांच्या भविष्याची, सुखी संसाराची ! या खोलीतली प्रत्येक वस्तू त्या स्वप्नांची साक्षीदार होती.

त्यांच्या लग्नानंतर जेव्हा ते दोघं पहिल्यांदा या खोलीचा एकांत अनुभवत होते तेव्हा रजतनी स्नेहाचा हात हातात घेऊन तिला एक वचन दिलं होतं... आज इतक्या वर्षांनंतरही तो प्रसंग आणि रजतचं तेव्हाचं बोलणं अगदी जसंच्या तसं आठवत होतं तिला...रजत म्हणाला होता," स्नेहा, आज मी तुला एक वचन देतो...तुझ्या यापुढील आयुष्यात तुला मी कधीच कुठलीही कमतरता भासू देणार नाही... माझ्या मुळे कधीही तुझ्या डोळ्यांत दुःखाचे अश्रू येणार नाहीत याची मी पूर्ण काळजी घेईन. You will always find me by your side...पण जर चुकून कधी माझ्यामुळे तुला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर मला समजून घेशील ? आणि प्लीज मला माफ करशील ?"

त्या नुसत्या आठवणीनीच स्नेहाचा ऊर भरून आला. 'रजतनी त्या दिवशी मला दिलेलं वचन आजपर्यंत पाळलं आहे....अगदी शब्दशः ! आणि त्या बदल्यात त्याची फक्त एकच अपेक्षा होती....मी त्याला समजून घ्यावं ! पण मी मात्र माझ्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा मधे इतकी गुंतून पडले की त्याचं इतकं साधं मागणं सुद्धा पूर्ण करायला जमलं नाही मला ! खरंच, आज मी स्वतःच स्वतःला परकी वाटायला लागली आहे.

विचार करता करता अचानक तिच्या मनात काय आलं कोण जाणे पण ती पटकन उठून खोलीबाहेर आली आणि वंदनामावशी च्या खोलीपाशी गेली. खोलीच्या बंद दाराबाहेर उभी राहून तिनी हळूच दबक्या आवाजात मावशीला हाक मारली, दारावर हलकेच एक थाप दिली. पुढच्या काही क्षणांतच खोलीचं दार उघडलं आणि वंदना बाहेर आली. स्नेहाला असं दारापाशी बघून एक क्षण तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिनी घाबरतच विचारलं," काय गं बाळा ? काय झालं? सगळं ठीक आहे ना? रजतचा ...." तिला मधेच थांबवत स्नेहा म्हणाली," हो, हो .. सगळं काही ठीक आहे. रजत पण ठीक आहे. मला तुमच्या दोघांशी - rather तुमच्या चौघांशीही urgently काहीतरी बोलायचं आहे म्हणून आले." त्या दोघींची कुजबुज ऐकून आतून रजतच्या बाबांनी विचारलं," वंदना, काय झालं गं?" त्यांचा आवाज ऐकून स्नेहा म्हणाली,"काका जागेच आहेत अजून ?" त्यावर उगीचच हसायचा प्रयत्न करत वंदना म्हणाली,"हो अगं, रजतशी बोलणं झाल्यापासून तेही थोडे बेचैनच आहेत. तू आत ये आणि सांग बघू काय ते." स्नेहा मावशीबरोबर खोलीत गेली. तोपर्यंत रजतचे बाबा पण उठून बसले होते. त्या दोघांच्या प्रश्नार्थक नजरा आता स्नेहावर खिळल्या होत्या. स्नेहा म्हणाली," माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली आहे. मी उद्या बडोद्याला जाते आहे ना ; पण मी एकटीच न जाता जर माझ्याबरोबर तुम्ही दोघं आणि आई बाबा असे सगळेच जण आलात तर? तुम्हांला सगळ्यांना बघून रजत किती खुश होईल ? किती मस्त सरप्राईज असेल हे त्याच्यासाठी !!!" हे सांगत असताना स्नेहाच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली होती. तिचं बोलणं ऐकून काही क्षण त्या दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. थोडं सरसावून बसत स्नेहा म्हणाली," म्हणजे बघा ना... माझी flight उद्या दुपारची आहे; मी घरी पोचेपर्यंत रात्र होईलच. मग आपण सगळे जर उद्या सकाळी लवकर निघून by road गेलो तर ? संध्याकाळ पर्यंत पोचू सुद्धा बडोद्याला ! किती मोठ्ठं आणि मस्त सरप्राईज असेल हे रजत साठी... आणि श्रद्धा साठी सुद्धा! आपला मुद्दा अजून पटवून देण्यासाठी ती पुढे म्हणाली," नाहीतरी तुम्ही पुढच्या काही दिवसांत येणारच होतात ना तिकडे? मग उद्या आपण सगळे एकत्रच जाऊ या की !"

तिची ही कल्पना रजतच्या आई बाबांनाही पटली असावी; कारण तिच्या डोळ्यांतली ती चमक आता हळूहळू त्या दोघांच्या डोळ्यांतही दिसायला लागली होती.

"कशी वाटली कल्पना? थांबा , मी आई बाबांना पण उठवून सांगते," स्नेहा खोलीच्या बाहेर जात म्हणाली. पण तेवढ्यात तिचे आई बाबा च खोलीत आले. "इतक्या रात्री कसली चर्चा चालली आहे गं? सगळं ठीक आहे ना?" तिच्या बाबांनी काळजीच्या सूरात विचारलं. रात्रीच्या त्या शांत वातावरणात स्नेहाचा आवाज त्यांना गेस्ट रूम मधे पण ऐकू आला होता. वंदनानी त्या दोघांना स्नेहाचा दुसऱ्या दिवसाचा प्लॅन समजावून सांगितला. थोडा वेळ त्या विषयावर सगळ्यांची चर्चा झाली आणि शेवटी तो विचार अंमलात आणायचं ठरलं. इतक्या अचानक ठरलेल्या या प्लॅन मुळे सगळ्यांचीच थोडी धावपळ उडली होती. बरोबर न्यायच्या कपड्यांचं पॅकिंग, घरातली आवरसावर, प्रवासातल्या खाण्या पिण्याची थोडीफार जमवाजमव.... बरीच कामं होती. इतका लांबचा प्रवास... स्नेहाच्या बाबांनी त्यांच्या ड्रायव्हरला - संतोषला- फोन लावला आणि त्यांच्या या बडोदा ट्रिप बद्दल सगळी कल्पना दिली. संतोष म्हणजे त्यांच्या अगदी विश्वासातला ! बऱ्याच वर्षांपासून होता त्यांच्याकडे ; त्यामुळे अगदी घरच्या एखाद्या सदस्यासारखा होता तो ! रात्री अपरात्री सुद्धा सेवेला तत्परतेनी हजर असायचा !! संतोषमुळे एक मोठी काळजी मिटली होती. बाकी सगळ्या तयारीची जबाबदारी वंदना आणि नीलानी घेतली. त्या दोघींच्या अंगात तर जणूकाही दहा हत्तींचं बळ एकवटलं होतं. त्यांना दोघींना लवकर झोपायला सांगून स्नेहा आपल्या खोलीत जायला निघाली. तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले," अगं, पण उद्या तुला सगळ्यांबरोबर ब्रेकफास्ट साठी जायचं होतं ना?" त्यावर हसत स्नेहा म्हणाली, " आता मला त्या ब्रेकफास्ट मीटिंग मधे अजिबात इंटरेस्ट नाही राहिला बाबा...मी उद्या सकाळी तसं कळवीन ग्रुप वर.."

स्नेहा झोपायला म्हणून खोलीत गेली खरी, पण मनात विचार आणि डोळ्यांत उद्याची स्वप्नं... अशा अवस्थेत झोप तरी कशी लागणार ? 'उद्या जेव्हा रजत सगळ्यांना एकत्र बघेल तेव्हा त्याला किती आनंद होईल !' तिच्या या एका कल्पनेनी घरातल्या सगळ्यांच्या चेहेऱ्यांवर हसू खुलणार होतं. पण स्नेहाला मात्र त्या खुशी बरोबरच अजून एक समाधान मिळणार होतं.... तिच्या हातून घडलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त केल्याचं समाधान ! हो, तिच्या हातून अजाणतेपणी रजतवर अन्याय झाला होता. तिच्या मनातल्या विचारांनी रजतशी प्रतारणा केली होती....आणि याच पापाचं प्रायश्चित्त करायचं होतं तिला... स्नेहाच्या डोळ्यांसमोर रजतचा समाधानी, हसरा चेहेरा आला आणि तिच्याही चेहेऱ्यावर नकळत हसू उमटलं. रजतचा तो हसरा चेहेरा नजरेत साठवतच ती झोपेच्या अधीन झाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्या एका हास्यासाठी, किती पटकन विचार करून , प्लॅनिंग करून तयारी करते यार ती... पण बिचारा सलील, तो अजून तिथेच, तिच्यातच अडकून पडलाय!!!
छान झालाय हा भाग.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!

पण बिचारा सलील, तो अजून तिथेच, तिच्यातच अडकून पडलाय!!!
छान झालाय हा भाग.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 May, 2020 -
+1
नाण्याची दूसरी बाजू पण असतेच ना. सलीलच्या नजरेतून ही कथा कशी असेल? मलातर असं वाटतं की सलीलच जास्त अडकलेला आहे स्नेहामधे. स्नेहा कधीच move on झालेली.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत