डिप्लोमे From युट्यूब युनिव्हर्सिटी

Submitted by विद्या भुतकर on 29 April, 2020 - 22:36

मागच्याच आठवड्यात आमचं पावपुराण ऐकवलं. पण निरनिराळे पदार्थ बनवण्यात फेल होणे सोडून बाकीचीही कामं होतीच की. त्यात सुडोकु शिकणे आणि ते सोडवताना झोप लागल्यावर दोन तासापेक्षा जास्त न झोपणे, कॅरम खेळताना पोरांसमोर शायनींग मारणे, टिव्हीवर एकेका सिरियलीचा फडशा पाडणे अशी महत्वाची कामेही होतीच. पण या सगळ्या गोष्टीही किती करणार ना? त्यातल्या त्यात शनिवार, रविवारी अजूनच बोअर व्हायला होतं.

थोड्या दिवसांपूर्वी एक दिवस स्वनिक म्हणाला,"मला सारखं काहीतरी कानात आहे असं वाटतंय. आणि प्रत्येक वेळी हात लावला की कळतं की माझे केसच आहेत ते."

त्याचे कल्ले ८० च्या दशकातल्या हिरोसारखे झाले होते. मग म्हटलं, चला कात्रीने तेव्हढेच कापून टाकू. मागे एकदा बाबाने घरी केस कापण्याचा प्रकार केला होता, त्याचा त्याने धसका घेतला होता. त्यामुळे मीच ते काम पार पाडलं. पण इतक्यातच थांबलो तर कसं चालेल ना? युट्यूब युनिव्हर्सिटीतून एकेक डिप्लोमे मिळवायचं ठरवलं. रोज नवीन काहीतरी शिकायला हवंच ना? पूर्वी कधीतरी नवऱ्याने घरी आणलेलं केस कापायचं किट होतंच.

स्वनिकला म्हटलं, "चल की तुझे केस कापू घरी. तितकेच दोन तास टाईमपास होईल." नवरा तर काय तयारच होता.

आम्ही दोघेही मागे लागलोय म्हटल्यावर तो बिचारा पळून बेडखाली लपून बसला.

मी जरा प्रेमाने त्याला म्हटलं, "हे बघ किती दिवस दुकानं बंद असतील माहित नाही. परत अजून वाढले तर नीट कापताही येणार नाहीत. त्यापेक्षा आताच करु." शेवटी तो कसाबसा तयार झाला.

मी आणि नवरा लगेच टीव्ही वरच युट्यूब लावून नीट सर्व व्हिडीओ बघायला लागलो. एका क्षणाला नवऱ्याचा जोश इतका अनावर झाला की त्याने व्हिडीओ पूर्ण व्हायच्या आतच बाथरुममध्ये सेटअप लावायला सुरुवात केली. मी मात्र तग धरुन पूर्ण व्हिडीओ पाहिला. आपलं असंच असतं. तोवर नवऱ्याने बाथरुममध्ये पूर्ण सेटअप करुन ठेवला. पोरगं बिचारं घाबरुन स्टुलावर बसलं.

(तर प्रोसेस अशी की प्रत्येक कटरला वेगवेगळे नंबर. जितका छोटा नंबर तितके बारीक केस कापले जाणार. अर्थात हे कदाचित सर्वांना माहित असेल. मला पहिल्यांदाच कळलं.) यामध्ये दोन अप्रोच होते. एक बॉटम -अप म्हणजे, मागचे केस मशीनच्या नंबर १,२,५ ने कापत जायचं, बाजूचे ही त्या त्या लेव्हलच्या नुसार कापायचे आणि वरचे कात्रीने थोडे मोठे ठेवून कापायचे. कानाच्या बाजूचे वगैरे वेगळ्या नंबरच्या मशीनने. दुसरा अप्रोच म्हणजे टॉप-डाऊन. वरुन मोठ्या नंबरचे मशीन फिरवून खाली बारीक करत आणायचं. आणि मग खालचे बारीक करायचे. आम्ही पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये मुळातच अप्रोच वेगवेगळे होते. त्यामुळे बराच वेळ कुठून सुरुवात करायची यावरच वाद झाला.

आता याच्यामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदाच असं मशीन हातात धरत होते त्यामुळे पोराच्या जीवाची काळजी होतीच. म्हणून मी जरा नमतं घेतलं. (नवऱ्याने हे आधी केलेलं पण त्या भयानक कट बद्दल न बोललेलं बरं.) तर शेवटी आम्ही दोघांनी एकेक बाजू निवडली. नवरा मागचे छोटे छोटे करत वरपर्यंत सरकत होता. दुसऱ्या बाजूने मी. पहिल्या पाच मिनिटांतच स्वनिकने विचारलं,"झालं का?". त्याला दटावून गप्प बसवलं.

जिथे दोन नंबरचे केस एकत्र येतात तिथले नीट कसे मिक्स करायचे यावर आमचे थोडे वाद झाले. पण अजून वाद झाले तर अंगावरचे केस घेऊन स्वनिक बाहेर पळून गेला असता. म्हणून जसे जमतील तसे कापले. वरचे केस नीट भांग पाडता येतील असे हवे होते. पण नवरा म्हणाला," हे बघ १६ नंबरने कापून घेऊ आणि मग बघू. ". आता मला काय माहित १६ नंबर काय ते? मी आपला फिरवला. तर हे... भराभर सगळे केस छोटे झाले. आता ते पाहून कळलं की यात कात्रीने कापायला काही राहिलं नाहीये. केस कापले गेल्यावर काय बोलणार? दोन तास मारामाऱ्या करुन शेवटी ठीकठाक केस कापले होते. बाथरुमभर बारीक बारीक पडलेले केस. ते गोळा करुन, सर्व साफ होईपर्यंत पुरे झालं. पोराची अंघोळ झाल्यावर चिडचिड करुन झाली की किती बारीक कापलेत वगैरे. टाईमपास झाला आणि शिवाय अजून दोनेक महिने तरी परत केस वाढणार नव्हते.

पोरावर प्रयोग झाल्यावर मी जरा कॉन्फिडन्ट झाले होते. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात परत बोअर झालं. आणि नवऱ्याचे केस कापू असं ठरवलं. म्हणून परत व्हिडीओ पाहिले. एक दोनदा मी मशीन सुरु केल्यावर नवरा घाबरत होता.

म्हटलं, नक्की काय प्रॉब्लेम आहे?'.

तर म्हणे, ' तू चुकून माझ्या भुवया उडवल्यास तर?'.

मी म्हटलं, 'अरे डोकं कुठे, कपाळ कुठे आणि भुवया कुठे?'.

पण तरी त्याला टेन्शन होतंच. माझ्या ओव्हर कॉन्फिडन्सची त्याला जास्त भीती वाटते. मी उत्साहाच्या भरात पाच नंबरने एका बाजूला खालून केस कापायला सुरुवात करुन कानाच्या वरपर्यंत कापून टाकले आणि एकदम टेन्शन आलं. वर तो पाच नंबर खूपच बारीक वाटत होता. मग परत वादावादी. शेवटी नऊ नंबरने कानापासून वरचे केस कापले. त्यामुळे एका बाजूचे थोडे पाच, बाकी नऊ, मग खाली सात असे करत कापत राहिले. पण तो तेव्हढाच एक बारीक केसांचा पॅच राहिला होता ना? वरचे केस भांग पडल्यावर तो लपतोय ना याची खात्री करुन घेतली आणि मग जरा जिवात जीव आला. पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आहे. उगाच नेमका तेव्हा असे भयानक कापलेले केस बरे दिसले नसते ना? म्हणून इतकी चिंता. पण सुटलो. बऱ्यापैकी चांगला कट झाला होता. तेही रक्त न सांडता वगैरे.

तर असं हे आमचं केशपुराण. माझं एक बरं होतं. भारतातून येतानाच पतंजलीची मेहंदी वगैरे आणलेली असल्याने तशी मी निवांतच होते. काय एकेक गोष्टीचा विचार करायला लागतोय सध्या. नाही का? पण पहिल्या थोड्या दिवसांतच मला कळलं की बाकी काही झालं नाही तरी माझ्या भुवया मात्र लवकरच करिष्मा कपूर आणि मग क्रूरसिंग सारख्या होणार होत्या. मग फोटोंचं काय ना? वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस... आता काय करायचं म्हणून मी घरात सर्वात पहिला तो केस उपटायचा चिमटा शोधून काढला. म्हटलं, फक्त नवीन आलेलेच उपटून काढायचे आहेत ना? सोप्पंय !

मी एक दिवस आरशासमोर उभी राहून एकेक केस उपटायला लागले सुरुवात केली. च्यायला ! पहिल्याच केसाला डोळ्यांत टचकन पाणी आलं. शिवाय कुठला डोळा बंद करुन कुठला उघडायचा हेही पटकन कळत नव्हतं. म्हटलं हे काय खरं नाय. पण हिंमत करुन चार पाच केस काढले. मग ठरवलं रोज इतकंच करायचं. फक्त ४-५ केस. असंही काम काय होतं? एकदा तर एकेक करुन केस काढून माझ्या भुवयांना मधेच टक्कल पडल्याचं स्वप्नही पडलं होतं. तेव्हापासून जरा हाताला आवर घातलाय. बाकी डाव्या डोळ्याला जरा अवघड जातं डाव्या हाताने चिमटा धरुन ओढणे वगैरे. पण जमतंय. सर्वात गंमत म्हणजे, ते उभे राहिलेले, वाढलेले केस कात्रीने कापतात ना, ते आरशात बघून कसं करायचं हे कळत नाही. त्यात डाव्या हाताने कात्री चालतही नाही. आता कधीतरी डाव्या हाताची कात्रीही आणावी म्हणतेय. रोज मी आरशासमोर उभी राहिले की नवरा विचारतो, "झालं का कोरीवकाम?". त्याला काय माहित, आमच्या शाळेच्या मैत्रिणींच्या ग्रुपचॅट वर किती कौतुक झालं माझ्या भुवयांचं? या सगळ्या आयडिया मी त्या मैत्रिणींनाही दिल्या पण त्या काय ऐकत नाय. म्हटलं तुम्हांला तरी सांगाव्यात.

तर हे असं ! पुढच्या दोन महिन्यांत अजून कुठकुठले डिप्लोमे मिळतील सांगेनच तुम्हांला. तुमचेही चालूच असतील की !

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त!

सर्वात गंमत म्हणजे, ते उभे राहिलेले, वाढलेले केस कात्रीने कापतात ना, ते आरशात बघून कसं करायचं हे कळत नाही. >>>> नवर्‍याला सांगणे कापून द्यायला. तो वचपा काढेलच Lol

Great job

मला ते मशीन कसं वापरायंचं ते कधीच समजले नाही. तरीपण मी नवर्याचे तो परदेशी असताना ५-६ महिने वाढलेले केस कापायचा उद्योग केल्याचे स्मरते.
मला माझे केस स्वतः कापण्याचा अनुभव असल्याने मी (over) confident होते. मात्र त्याचे केस अतिशय वाईट कापले गेले पण अति वाढलेल्या केसांपेक्षा माझ्या unprofessional cut नी तो माणूस दिसू लागला हिच आनंदाची गोष्ट होती. त्यानेही सुरूवातीला वाकडे तिकडे केस पाहून कूरकूर केली पण बरेचसे Krone वाचल्यामुले ती कूरकूर विरून गेली.

तुम्ही अगदी YouTubeवर पाहून वगैरे कापलेत ! तुमच्या जिद्द आणि चिकाटीला सलाम.

हायला ! विद्या , एकदम देजावू वाटलं.
रविवारी मी नवर्याचे केस कापले youtube बघत बघत, trimmer नव्हता , कात्रीनेच कापले. नीट कापले.
मंगळवारी त्याने लेकाचे कापले . लेकाने आरशात न बघताच रडून गोंधळ घातला ," मी खूप घाण दिसतोयं "म्हणत.
मी नवर्याला म्हटलं , मी lockdown मध्ये केसपण कापायला शिकले. तू जरा eyebrows करायला शिकला असतास तर माझही काम झालं असतं की

मागच्या weekend ला नवऱ्याने आग्रह केला म्हणून मी त्याचे केस कापले.. त्याचा एवढा विपुल केशसंभार कापताना शेवटी trimmer तुटला.. कात्रीने कापलेत तर ते महा भयानक रित्या कापले गेले.
आणि त्याने side ने zero नंबर ची line घेऊन कट मारायला सांगितलं तर मी आडवा trimmer फिरवला.. कुठून हिला सांगितलं असं झालं त्याला ..
ह्या सगळ्याचा परिणाम असा झालाय की तो ofc च्या con call मध्ये जर video call असेल तर technical issue असं म्हणून सरळ audio कॉल घेतो.

एकीकडे घरचे सगळे video कॉल करून मजा घेत आहेत Biggrin

तर अशा प्रकारे त्यानं पायावर कुऱ्हाड (पक्षी: डोक्यावर trimmer )मारून घेतलं Lol
****किल्ली****
#killicorner

मस्त लेख. नवर्‍यानेही krone वाचवायला trimmer घेतलेले. आता expert झालाय. लॉकडाऊन असो नसो घरीच कट करतो. सुरुवातीला असे किस्से झाले आता चांगला जमतो.

@पाफा :
हम तो बेचारे नादान है, का हे का बदला जी

आज नवरा socity gate पर्यंत cap न घालता जाऊन दुधाची पिशवी घेऊन आला Happy तात्पर्य: केस वाढले असावेत

@किल्ली
Happy आलिया भटासी (सॉरी भोगासी) असावे सादर. या न्यायाने ते जुळवून घेत असावेत.

चार आणे माझे पण :-
आस्मादिकांनी पण अर्धांगाकडून केस कापून घेतलेत. केस थोडे राठ असल्याने सुरवातीला घरातली शिंप्याची कात्री वापरावी लागली. पण नंतर केस बर्यापैकी शेपमधे कापलेत. कारण म्हणे, तिच्या लहानपणी घरासमोर सलून होते, आणि ते लहानपणचे बघितलेले आठवले तसे केले. कमाल आहे. या ठिकाणी स्मरणशक्ती चालली म्हणजे पळालीच.
( कदाचित माहेरची आठवण असेल म्हणून Proud )

छान लेख.
आमच्याकडेही हा केसांचा ट्रीमर आणणं इकडून झालंय.
पण माझ्यावर घोर अविश्वास असल्याने आरश्यात बघून स्वतःच काम करणार आहे ☺️

Thank you all for your comments.
It’s dangerous how I am entering into different territories. God bless all. :))

मीच दोनदा कापले केस नवर्‍याचे. आमच्याकडे तसेही काहीच न्हवते, वस्तरा वगैरे आणि जाग तशी उशीराच आली( नवरोबाला), म्हणाला मिटींग मध्ये बरा आहेस ना? विचारले.
मार्केटात ज्या कंपनीचाच हवा
होता व जसा हवा होता(बहुशिंगी- वायर्लेस, दाढी ट्रीमर कम हैर वगैरे ) काही मिळाला नाही. हुशार लोकांनी आधीच , संपवले घेवून बहुधा. तर सरळ, केस कापायची कैची मिळाली.
कापले केस उत्साहाने, आणि मागचे पाहिल्यावर, लक्षात आले जरा झिगझॅग झालेत( कैचीने कापले तर कसे होतात, भात लावणी उतारावरची तसे मागून दिसत होते). नवर्‍याला मागचे काहीच दिसत न्हवते तर स्वतःची चुकी लपवायला,
‘ मग “कोविड -१९” कट असे कोरु का ? ‘ असे नवर्‍याला विचारल्यावर घाबरूनच ताडकन संशयाने उठला. उरलेले तरी कापू दे , विचित्र दिसेल सांगून, बरेच वाद झाल्यावर पुढचे मीच कापतो ह्या प्रोमिस वर बसला परत.
मग म्हणाला , जावू दे आता करच बारीक सगळे.
असा दोन तासात पार पडला प्रकार.
लगेच त्याने, त्याच्या फॅमिली ग्रूपवर फोटो टाकल, सासरच्या कुसक्या लोकांनी अपेक्षित प्रतिक्रिया दिली Proud
दुसर्‍यांदा, स्वतःच म्हणाला, कर बारीक गरम नाही होत.

खरे तर, झिगझॅग हेअरकट कैची चुकूनच आणली हे त्याला कळलेच नाही. Wink

झंपी Happy

मस्त ! आणि वेलकम बॅक Happy

केसांचा प्रश्न खरेच गंभीर होणार आहे. कारण लॉकडाऊन ऊठल्यावरही लगेच सलूनला पळता येणार नाही. किंबहुना बराच काळ सलून टाळावेच लागणार आहेत. घरी ओळखीचा न्हावी बोलवून त्याला सामान आपण पुरवावे हा ऊत्तम मार्ग आहे. पण तोपर्यंत काय...

माझी तर अशी स्थिती झाली आहे की रोज घरात बायकोचा हेअरबॅण्ड लाऊन फिरतोय. तर कधी मुलगी क्लिप लाऊन माझी हेअरस्टाईल करते. हे कंपलसरी आहे अन्यथा केस दिवसभर डोळ्यांवरच राहतील. आंघोळ करताना तर ओले झाल्याने ज्या केसांच्या दोरया बनतात त्या नाकांवरून, ओठांवरून खाली येत हनुवटीला स्पर्श करू लागल्यात. कपाळावरच्या केसांना खाली ओढले की ईंचभर तुकडा सहज तोंडात जातो. कधी कापायची वेळ येईल तेव्हा छानसे फोटोसेशन करायचा विचार आहे. हा लेख प्रेरणा देईल Happy

छान लेख.

माझे केस पण आता लवकरच हेअर बॅंड लावावा लागेल या स्टेजला आलेले आहेत. १३ फेबला कापले होते. अडीच महिने झाले.

ट्रिमर आहे पण मित्र कम सहकाऱ्याच्या हातात डोकं द्यायची किंवा झिरो कट मारायची हिंमत होत नाही.

“ ज्या केसांच्या दोरया बनतात त्या नाकांवरून, ओठांवरून खाली येत हनुवटीला स्पर्श करू लागल्यात. कपाळावरच्या केसांना खाली ओढले की ईंचभर तुकडा सहज तोंडात जातो. ” :))

हे आमचे हेअरकट. Happy नवरयाचे बारीक केस दुसरया बाजूला लपलेत. Wink
9E68E0B7-2C91-478C-ACEE-AE86E6AB0AC7.jpeg

आमचा उद्या कार्यक्रम आहे, नवरा घाबरूनच आहे पण आता त्याला तसाही माझ्याशिवाय पर्याय नाही. मी पण जरा तुनळीवर बघून ज्ञान वाढवते.

झम्पि,उतारावरची भात लावणी ☺️☺️भयंकर.
विद्या, चांगले कापलेत केस.एकदम गुणी मुलं दिसत आहेत लहान व मोठा बाळ.
एक माणूस फॅशन म्हणून बायकांना gilotin सारख्या पोझिशन मध्ये डोके ठेवायला लावून कुऱ्हाडीने केस कापतो.मस्त बँगज येतात.खरं सांगतेय मी.व्हिडीओ पाहिला होता.
https://youtu.be/F9aGEHWoXcg
इथे केस पेटवून देऊन हेअरकट केलाय.
https://youtu.be/EYO9vAAMdbA

करायला गेले एक आणि झालं एक,
B1DDAF04-B74D-4D1C-BDF6-6788AFD56C61.jpeg

कैचीने केस कापताना काहीच अंदाज येत नाही.
आधी अमिर खान करते असे मी मनात ठरवून होते, मग कोविड -१९ असं डिझाईन करूया असे वाटले मग, सरळ मागे कोण बघतय अशी समजूत काढून निभावलं.
समोरून , दाढीचं रेझर मारून अलमोस्ट टक्कल केलं.
तो म्हणाला, जावू दे गरम होणार नाही.

कोणाला, सी ओ १९ तरी दिसतय का?

IMG_20200510_160318.jpg
हे माझं कवतिक. बिफोर आणि आफ्टर फोटो. ट्रिमर नसल्याने भरतकामाची नवीन कात्री वापरली.

मी एका मित्राला सोबत घेऊन शेवटी रुमवरच केस कापले.

एक दोन छोट्या चुका सोडल्या तर बर्‍यापैकी नीट कापले गेले.

दोन वेळा before after फोटो डकवायचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा आपोआप रोटेट झाला. Sad