पोह्याचे कटलेट

Submitted by प्राचीन on 23 April, 2020 - 08:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य - जाडे पोहे ३ वाट्या, उकडलेले बटाटे २, आलेलसूण पेस्ट आवडीनुसार, तिखटमीठ आवडीनुसार, (१ बीट किसून +मटार १ वाटी+ फरसबी शेंगा ४-५ चिरून +भोपळी मिरची १ चिरून) हे कंसातले जिन्नस वाफवून, कोथिंबीर आवडीने (किंवा आवडीनुसार) घालता येईल तितकी, पावभाजी मसाला किंवा धणे जिरे पावडर वा गरम मसाला २ चमचे, तीन टोस्टस् चा चुरा /तांदळाचं पीठ तीन - चार चमचे, तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती - जाडे पोहे दहा मिनिटे भिजवून मग निथळत ठेवावे. तोवर बटाटे उकडून व वरीलप्रमाणे भाज्या वाफवून घ्याव्यात. मग बटाटे वगळता सगळ्या भाज्यांमधील पाणी पिळून लगे हाथ वा मूँह पिऊनही घ्यावं. सूपसारखं लागतं आणि पुढे कटलेट्स तयार करण्यासाठी तरतरीही येते. भाज्या व बटाटे एका भांड्यात वा तसराळ्यात एकत्र मळून घ्यावे. भिजवलेले पोहे त्यात घालून तिखटमीठ, कोथिंबीर, आलेलसूण पेस्ट व मसाला घालून मळून घ्यावे. अर्थात हलक्या हाताने.
छान एकजीव करून मग मर्जीप्रमाणे आकार देऊन टोस्टच्या चुऱ्यात लोळवावे (ओः घोळवावे). तवा गरम करून त्यावर कटलेट च्या मिश्रणाचे तयार आकार ठेवून मग तेलाचा शिडकावा झाला की कटलेट्स मंद आचेवर एका बाजूने खमंग भाजून घ्यावी. मग उलटवून दुसर्‍या बाजूनेही तेलाच्या थेंबांत न्हाऊ घालावीत. मंद आचेवर दहा मिनिटांत तयार होतात.
वरील प्रमाणात मध्यम आकाराची साधारण वीस - बावीस कटलेट्स झाली.
जोडीला टोमॅटो सॉस किंवा अगदीच उत्साहात असाल तर पुदिना चटणी मस्त लागते.
महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी तेल लागलं. अर्थात मी डीप फ्राय केले नव्हते.

20200416_101423_copy_600x800_1.jpgCutlet 1.jpg

अधिक टिपा: 

अंदरकी बात - घरात थोड्या भाज्या उरलेल्या होत्या. पण पुलावाकरिता जास्त होत्या नि कुर्मा करून बीट खपलं नसतं. शिवाय मध्यंतरी आम्हाला बिस्किटे मिळत नव्हती त्यामुळे टोस्ट आणलेले. मग बिस्किटे मिळाली नि शेवटचे चार टोस्ट उपेक्षित राहिले. तेही उपयोगात आणता आले. तर एकंदरीत बनवाबनवी प्रकार घडला खरा. पण चविष्ट झाला...बऱ्याच चटपटीत पदार्थांत बटाटा वापरावा लागतोच. त्यामुळे बटाटाविरहित असा हा पर्याय चांगला वाटला. मी बटाटे वापरले कारण अगदीच तेवढा कणखरपणा नाही जमला. परंतु भावजयीने बटाटा न वापरता केले व ते चविष्ट झाले असा अभिप्राय चक्क तिच्या सासूबाईंनी दिलाय.

माहितीचा स्रोत: 
स्त्रोत व प्रेरणा - माझी भावजय.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults