मन वढाय वढाय (भाग ३६)

Submitted by nimita on 16 April, 2020 - 21:46

सलीलच्या घरून परत आल्यापासून स्नेहा आपल्याच तंद्रीत होती. त्या दोघांच्या त्या पाऊण- एक तासाच्या भेटीनंतर स्नेहाच्या भावविश्वात बरीच उलथापालथ झाली होती. सलीलनी खरंच अजून लग्न नाही केलं हे कळल्यावर तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. फेसबुकवरच्या फोटोतली त्याची little angel ही त्याची मुलगी नसून भाची आहे- हे कळल्यानंतर तिला खूपच कानकोंडं झाल्यासारखं वाटत होतं. 'छे, केवळ एका फोटोच्या आधारावर मी स्वतःच सगळं ठरवून टाकलं... सलीलनी न केलेल्या लग्नाबद्दल त्याला बोल लावला... उगीच नको नको ते विचार करून स्वतःला आणि पर्यायानी रजत आणि श्रद्धाला पण त्रास दिला.

पण आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा सलील माझ्या आठवणी जपतोय....त्यानी खरंच अजून लग्न नाही केलं. पण हे कळल्यापासून माझं मन मात्र बेचैन होतंय. त्यानी घेतलेला निर्णय बरोबर आहे का चूक ? मला तरी वाटतंय की त्यानी त्याच्या या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. बोलू का एकदा त्याच्याशी या बाबतीत? पण आता माझा तो हक्क राहिला नाही. त्याचं आयुष्य त्यानी कसं जगायचं हे ठरवणारी मी कोण ? ज्या दिवशी त्यानी माझं प्रेम धुडकावून लावलं त्याच दिवसापासून आमचे मार्ग वेगळे झाले ; आमची आयुष्यं, आमची स्वप्नं वेगळी झाली. मी माझं आयुष्य रजतबरोबर काढायचा निर्णय घेतला....... आणि आता इतक्या वर्षांनंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे... मी आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांपैकी सगळ्यात योग्य निर्णय होता तो ! Getting married to Rajat is the best thing that has ever happened to me. आणि म्हणूनच मला अगदी मनापासून वाटतंय की सलीलनी पण लग्न करावं. जर कधी तसा विषय निघाला तर नक्की सांगीन त्याला.'

पण सलीलनी जरी स्नेहाच्या आठवणींशी, त्याच्या तिच्यावरच्या प्रेमाशी प्रामाणिक राहायचं ठरवलं होतं तरी - स्नेहानी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलं - म्हणून त्यानी तिला बोल लावला नाही. त्याउलट त्यानी खूप आस्थेनी रजतची आणि श्रद्धाची चौकशी केली होती. स्नेहा तिच्या आयुष्यात, तिच्या परिवारात सुखी आणि समाधानी आहे हे बघून त्याच्या मनातली अपराधीपणाची भावना थोडी कमी झाली होती. खरं सांगायचं तर त्यांची ती भेट संपूच नये असं वाटत होतं सलीलला. पण स्नेहाला 'थांबवण्याचा' त्याचा हक्क तो कधीच गमावून बसला होता. त्यातल्या त्यात एका गोष्टीचं समाधान होतं त्याला...स्नेहानी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला होता आणि दोघांनीही यापुढे संपर्कात राहायचं ठरवलं होतं.

सलीलला भेटून स्नेहाला पण एक वेगळंच समाधान मिळालं होतं. त्यानी रजत आणि श्रद्धा बद्दल जी चौकशी केली होती ती वरकरणी नसून अगदी मनापासून होती हे तिला जाणवलं होतं. 'मी त्याच्या प्रेमाला विसरून पुन्हा नव्यानी माझं आयुष्य सुरू केलं हे कळल्यानंतर सुद्धा सलीलला त्यात काही वावगं वाटलं नाही. उलट रजतबरोबर मी सुखी आहे हे ऐकून त्याच्या चेहेऱ्यावर समाधानच दिसलं मला,' या विचारानी स्नेहाला खूप हायसं झालं होतं.

पुढचे काही महिने स्नेहा आणि सलील दोघंही आपापल्या व्यापांत अडकून गेले. सलील त्याच्या नव्या कामाच्या गडबडीत होता आणि स्नेहाची रजत, श्रद्धा, स्टुडिओ आणि घर - अशी नेहेमीची तारेवरची कसरत चालू होती. त्यात भर म्हणून की काय पण आता कामानिमित्त रजतची touring ....खास करून परदेशच्या वाऱ्या....खूपच वाढल्या होत्या. आणि त्यामुळे साहजिकच त्याच्या प्रकृतीची हेळसांड होत होती. पण स्नेहाची ही काळजी तो नेहेमीच हसण्यावारी नेत होता.

रजत बाहेरगावी असताना स्नेहाला खूपच एकटं एकटं वाटायचं. तसं पाहता बडोदा मधे असताना देखील तो सारखा तिच्या बरोबर असायचा असं नव्हतं... आणि जेव्हा घरी असायचा तेव्हाही त्याच्या कामापुढे त्याला दुसरं काही दिसायचं नाही...अगदी स्नेहासुद्धा! पण तरीही निदान तो समोर दिसायचा तरी... काही ना काही कारणांनी त्याच्याशी बोलणं व्हायचं , त्याचा स्पर्श अनुभवता यायचा. पण आता तो नसताना स्नेहा हे सगळं मिस करत होती. सकाळी श्रद्धा तिच्या कॉलेजला गेल्यावर मग दिवसभर स्नेहा एकटीच असायची. स्टुडिओ मधे तरी किती वेळ बसणार ? अधूनमधून तिच्या तिथल्या मित्र मैत्रिणींना भेटून त्यांच्याबरोबर थोडाफार वेळ घालवायाची ती....पण रोज रोज भेटायला त्यांच्याकडे तरी कुठे वेळ होता ! अशा वेळी मग ती आपलं मन फेसबुक आणि व्हॉट्सऍप मधे रमवायची. तिच्या एका अतिउत्साही मैत्रिणीनी त्यांच्या कॉलेजच्या बारावीच्या वर्गातल्या सगळ्यांचे फोन नंबर्स मिळवले होते आणि एक व्हॉट्सऍप ग्रुप सुरू केला होता. त्यात नुकताच सलील पण ऍड झाला होता. त्याशिवाय आता फेसबुकवर पण स्नेहा त्या सगळ्यांशी पुन्हा जोडली गेली होती.

खूप धमाल करायचे सगळे त्या virtual जगात ! एकमेकांची चेष्टा मस्करी, रुसवे फुगवे, गप्पा टप्पा...नुसता गोंधळ चालायचा....जणू काही पुन्हा कॉलेजमधे गेल्यासारखं वाटायचं. आता इतक्या वर्षांनंतर प्रत्येकानीच आपापल्या क्षेत्रात खूप प्रगती केली होती. त्यामुळे सगळ्यांनाच एकमेकांचे अनुभव ऐकायला खूप छान वाटायचं. स्नेहा सुद्धा तिच्या चित्रांबद्दल, नव्या जुन्या assignments बद्दल नेहेमीच त्यांना सांगायची ! Mostly सगळे जण तिच्या कामाची तारीफच करायचे - आणि कधीकधी ती तारीफ तोंडदेखली आहे हेही स्नेहाला जाणवायचं !पण सलील मात्र नेहेमीच त्याचं खरं मत सांगायचा... आणि जर त्याला एखादी गोष्ट पटली नाही तर तेही अगदी परखडपणे, स्पष्ट शब्दांत सांगायचा....पण ग्रुप मधे नाही तर ; तिच्या पर्सनल नंबर वर! आणि त्यामागचं कारण विचारलं तर म्हणायचा-' माझे बाबा नेहेमी म्हणायचे की तारीफ नेहेमी सगळ्यांसमोर करावी पण चुका सांगायच्या असल्या तर त्या मात्र एकांतात सांगाव्या .'

सलील आणि स्नेहाच्या भेटीला आता जवळजवळ पाच सहा महिने उलटून गेले होते. पण व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर मात्र ते रोजच भेटत होते... कधी ग्रुपमधल्या इतर मित्र मैत्रिणींबरोबर कॉलेजच्या जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारताना ; तर कधी एकमेकांच्या पर्सनल नंबर वर आपले विचार share करून ! पण या सगळ्यात दोघांनीही कधी आपली मैत्रीची सीमा ओलांडली नाही. सलीलच्या मनातली स्नेहाची जागा अजूनही अबाधित आहे हे स्नेहालाही माहीत होतं....सलीलनी जरी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवलं नसलं तरी त्यानी उगीच काहीतरी खोटं सांगून ते सत्य लपवायचाही प्रयत्न नव्हता केला.

पण स्नेहाला मात्र तिच्या मनातल्या भावनांमधे इतकी सुस्पष्टता दिसत नव्हती - रजत वर असलेल्या प्रेमाबद्दल अजिबात शंका नव्हती तिच्या मनात; पण सलील बद्दल आता जे काही वाटत होतं ती फक्त निखळ मैत्री होती का त्यांच्या आधीच्या नात्यातलं काही मिसळलं होतं या नव्या मैत्रीच्या नात्यात?

इतकी वर्षं स्नेहाला वाटत होतं की आता रजतच्या प्रेमामुळे सलील आणि त्याच्या आठवणी पुसल्या गेल्या असतील....जरी अगदी पूर्णपणे नाहीशा झाल्या नसल्या तरी निदान अस्पष्ट, धूसर तर झाल्याच असतील. पण तिची आजी म्हणाली होती तशा त्या सगळ्या आठवणी स्नेहाच्या मनात तळाशी जाऊन पडल्या होत्या इतकी वर्षं ! आणि आता गेल्या काही महिन्यांतल्या घडामोडींमुळे पुन्हा त्या सगळ्या आठवणी अधूनमधून तिच्या डोळ्यांसमोर तरळून जात होत्या. पण आता त्यांच्यामुळे तिला मनस्ताप नव्हता होत... कदाचित वयामुळे, अनुभवामुळे आलेली विचारांची परिपक्वता असेल; पण तिला राहून राहून आजीचं बोलणं आठवत होतं...A woman's heart is a deep ocean of secrets !!

पण मग आता स्नेहाच्या मनातल्या या खोल खोल समुद्रात तिच्याही नकळत समुद्रमंथन सुरू झालं होतं का?

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख़र बोलू तर कंटाळा येऊ लागलाय... पण आधिपासुन वाचत आल्याने एकदम सोडवत नाहीये... स्नेहा कड़े सर्व छान असताना कशाला हवेत हे नसते उद्योग...
आता परत लांबड़ लाऊंन शेवटी रजत स्नेहा च एकत्र येतील...

अनिष्का, मी कथेच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ही कथा म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे तिच्या आयुष्यात येणारी वैचारिक वादळं दर्शवणारी आहे. आणि मनावर कोणाचाच कंट्रोल नसतो. Happy

मनिम्याऊ, तुम्हाला कथा आवडली जे वाचून छान वाटलं. अजून नक्की किती भाग होतील हे सांगता येणं अवघड आहे, कारण मी एकीकडे कथा लिहिते आहे (आधीपासून लिहिलेली नाहीये.) पण तरीही पुढच्या काही भागांत संपेल !

सस्मित,
इतक्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद Happy
पण मला घाईघाईत उरकून टाकलेल्या, गुंडाळलेल्या कथा वाचायला आणि लिहायलाही आवडत नाही. कथा वाचत असताना वाचकाच्या मनात एखादा प्रश्न निर्माण झाला आणि जर त्याचं उत्तर त्या कथेतून त्याला मिळालं नाही तर ते त्या लेखकाचं अपयश आहे असं मी मानते. आणि ही तर दीर्घ कथा आहे, त्यामुळे यात थोडक्यात लिहिण्यासारखं काहीच नाहीये.
तरीही, तुमचा हा फीडबॅक मी पुढील लेखनासाठी लक्षात ठेवीन . Happy

निमिता, बर्‍याच वर्षांनी ईथे प्रतिसाद देत आहे. कथा आजच वाचली - सगळे भाग. छान लिहित आहेस, लवकर पुर्ण कर , पण गुंडाळु नकोस. आता पर्यंत इतके बरकावे लिहिले आहेस, तसेच शेवट पण सुंदर कर.

रिमझिम,
तुम्हाला माझी कथा वाचून प्रतिक्रिया लिहायची इच्छा झाली यातच माझ्या कथेचं यश मला दिसलं. खूप खूप धन्यवाद Happy आणि हो, मी ही कथा अजिबात गुंडाळणार नाहीये. कारण ही कथा म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याचा नाही तर मनाचा प्रवास आहे. त्यामुळे त्याचे बारकावे टिपणं हाच माझा मुख्य उद्देश आहे. असंच माझं लिखाण वाचत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. Happy