राक्षसमंदिर - उपसंहार भाग १

Submitted by अज्ञातवासी on 18 April, 2020 - 13:51

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

संपूर्ण कथा - https://www.maayboli.com/node/74130

एका विशाल नदीच्या काठी, घनदाट अरण्यात तो आश्रम होता. आश्रमाची भूमी विशाल होती. चहूबाजूनी बांबूच्या कामट्यांच कुंपण होतं, व बांबूच्याच कमानीने आत यायचा मार्ग सुशोभित होता. आत येतानाच डाव्या बाजूला काही लहान पर्णकुट्या दिसत होत्या, मात्र माती व शेणाच्या मिश्रणाने त्या लिंपल्यामुळे त्यांना एकप्रकारचा बंदिस्तपणा आला होता. एकूण बारा पर्णकुट्या संपल्यावर त्यांच्या मधोमध एक अतिविशाल पर्णकुटी दिसत होती.
त्या पर्णकुटीची भिंतसुद्धा माती आणि शेणाने बंदिस्त केली होती, पण तिला अनेक खिडक्या होत्या. प्रत्येक खिडकीला झावळ्यांच तावदान होतं. भिंतीवर अनेक चित्रविचित्र आकृत्या रंगवलेल्या होत्या, व तपकिरी मातकट कौलांमुळे त्यांवर वेगळीच संगती निर्माण झाली होती. उजव्या बाजूला एक भव्य गोशाळा होती, व एक मंडपासारखी योजना होती.
एक चुकार घार त्या कुंपणाजवळ आली, आणि अदृश्य संमोहन असल्याप्रमाणे मागे फिरली.
हा देखावा बघून ते दोघे हसले, व त्यांनी कुंपणाच्या आत प्रवेश केला. आज कित्येक वर्षांनी त्यांनी या आवाराच्या आत प्रवेश केला होता.
"यावे, मित्र आणि अमित्र!"
एक खणखणीत आवाज आला.
कालमेध! दैत्यगुरूंचा आवडत शिष्य.
"गुरुजी आपलीच वाट बघत आहेत." त्याने मुख्य पर्णकुटीकडे बोट दाखवला.
दोघेही आत गेले.
शुक्राचार्य ध्यानस्थ बसले होते. दोघांना आत येताना बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली.
दोघांनी त्यांना लवून प्रणाम केला.
"आयुष्यमान भव बाळांनो. तुम्ही परत आलात हे बघून माझं मन हर्षाने भरून येतंय. शेवटी मित्रा, तू ऋषींच्या शापातून मुक्त झालासच."
"हो गुरुजी." मित्र नम्रतेने म्हणाला.
"अमित्रा, तुझ्या मैत्रीचे गुणगान आजपासून राक्षस जातीत कायम गायले जातील. हुशारी, धैर्य व निष्ठा यांचा अतुल संगम म्हणून तू ओळखला जाशील. राक्षमंदिराने तुझं नाव कायमच कोरून ठेवावं, अशीच माझी इच्छा असेल."
अमित्रानेही शुक्राचार्यांना मनःपूर्वक नमस्कार केला.
"जा बाळांनो, सुखाने पाताळात जा. बळीमहाराज तुमची वाट बघतायेत."
ते दोघेही प्रणाम करून निघून गेले.
"गुरुजी, या मित्र आणि अमित्राची कथा अजूनही मला नीट माहिती नाही. आपण सांगण्याची कृपा कराल?" कालमेध म्हणाला.
"कालमेध, हे मित्र आणि अमित्र म्हणजे अतिशय जवळचे मित्र. दोघांमध्ये अतूट सख्य, पण देवतांचे पक्के वैरी सुद्धा!
प्रचंड मोठया तपश्चर्येनंतर या दोघांनी महादेवाला प्रसन्न करून घेतले, आणि इच्छारूपांतरणाचा वर मागितला. या वराद्वारे हे दोघे नाना रूपे घेऊन देवतांना छळू लागले.
अमित्र पुरुष रूप घेण्यास पटाईत होता, तर मित्र स्रीरूप. एकदा अशिरस ऋषी तपश्चर्या करत असताना त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी मित्राने अप्सरा रूप घेतले. अशिरस एकपत्नी म्हणून विख्यात होते. त्यांचा तोच पण मोडण्याची मित्राने शपथ घेतली. पण मित्र त्यांच्या जवळ जाताच, त्यांच्या तेजाने माया भंग पावली. त्यांनी मित्राचा कावा ओळखला व त्याला शाप दिला.
'तू तुझ्या मूळ रुपात येऊन सहस्त्र वर्षापर्यंत गर्भवासी राहशील.'
मित्र गडबडला, व तो माझ्याजवळ आला. मी त्याचे कष्ट कमी करण्यासाठीच त्याला मूर्तीरूप देऊन नऊ महिन्यातून एकदाच गर्भवासी राहशील अशी तजवीज केली, व त्याची स्थापना राक्षसमंदिरात केली."
"पण मल्लापाच का गुरुदेव?"
"अशिरस मुनी हे मल्लापाचे पूर्वज होते. केवळ त्यांच्याच घराण्यातला एक पुरुष मित्राला मुक्तता देऊ शकत होता. अमित्राने मोठ्या चातुर्याने हे कार्य घडवून आणले, त्यानंतर दोघांनी त्यांच्या पृथ्वीतलावरच्या शरीराचा त्याग केला, व ते पाताळात परत आले."
"गुरुजी, अफाट आहे हे सगळं. पण आता राक्षसमंदिराची काय योजना?"
"कालमेध..." शुक्राचार्य उठले, त्यांनी पाण्याचा एक घोट घेतला, व खिडकीजवळ जाऊन उभे राहिले.
"राक्षसभुवन गावातल्या राक्षसमंदिरात देवतानाही प्रवेश नाही. राक्षसांच्या रक्षणाकरताच या मंदिराची उभारणी झाली आहे. इथे मूर्तीही राक्षसाची स्थापन होते, व महाराक्षस म्हणून राक्षस महाराज बळींची पूजा करतात.
या मंदिराच्या कथा नाहीत, तर गाथा आहेत. जे मित्र आणि अमित्राने बघितलं, तो फक्त या मंदिराचा एक सहस्त्रांश भाग आहे. या मंदिराचा निर्माता विश्वकर्मा असून रचनाकार मयासुर आहे. तिथून चौदा स्वर्गापर्यंत आणि सप्तपाताळापर्यंत जाण्याचे मार्ग आहेत. तिथून सुतळ राज्यात जाण्यासाठी असा मार्ग आहे, ज्यायोगे विष्णूलाही न कळता त्या नगरीत जाता येतं. कुठल्याही युगात, कुठल्याही काळात जाण्याचा मार्ग राक्षसमंदिरात आहे.
रक्तासाराने इथेच रक्तोपासना केली.
निशाचर रात्रकने याच मंदिरात देवतांना हरवले. अपराजिता आणि बिर्भवनच्या प्रेमाची शोकांतिका याच मंदिरात झाली. राक्षसमंदिर ही वास्तू नसून, ते राक्षसजातीचं भूत, भविष्य आणि वर्तमान आहे."
कधीही मोजक्या शब्दांशिवाय जास्त न बोलणाऱ्या आपल्या गुरूला भावविभोर होऊन बोलताना बघून कालमेध चकित झाला.
त्याने गुरुजींना प्रणाम केला, व तो तिथून बाहेर पडला!!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मल्लापाच का गुरुदेव?">>>> कालमेधाने हे कसं विचारलं, मल्लप्पा चा तर उल्लेख सुध्दा केला नाही शुक्राचार्यांनी

कारण आतापर्यंत जे घडलं, ते कालमेधला माहिती होतं. म्हणजे मल्लापाला मारलं वगैरे.
त्याआधीच्या घटना त्याला माहिती नव्हत्या.

कारण आतापर्यंत जे घडलं, ते कालमेधला माहिती होतं. म्हणजे मल्लापाला मारलं वगैरे.
त्याआधीच्या घटना त्याला माहिती नव्हत्या.>>>> अच्छा, धन्यवाद

मस्तच चालू आहे....

मस्तच... खिळवून ठेवलंय... पूभाप्र>>>> +1111

बापरे, उत्कंठा वर्धक !! पटापट येऊ द्या पुढचे भाग आणि जरा मोठे टाका .एका दूरच्या नात्यात राक्षसभुवनकर होते ते आठवले . अर्थात तुमचे राक्षसभुवन काल्पनिक असेल... पण खरे अस्तित्वात आहे हं Happy

@मन्या - धन्यवाद! Happy
@द्वादशनगुला - धन्यवाद! Happy
@पाफा - धन्यवाद! Happy
@प्रवीणजी - धन्यवाद Happy
@प्रीतम - धन्यवाद Happy
@च्रप्स - धन्यवाद
@सुखी - धन्यवाद
@आसा - धन्यवाद
@धनुडी - धन्यवाद
@अजय - धन्यवाद
@स्पार्कल - धन्यवाद. उपसंहार हा नेहमी कथेच्या/कादंबरी संपल्यावर येतो. यात कथेचं एक्स्प्लेणेशन किंवा कथेनंतर काय घडलं या गोष्टी येतात.
@नौटंकी - धन्यवाद
@ आदीश्री - धन्यवाद. खरं सांगायला गेलं तर राक्षसभुवन गावात मी बऱ्याचदा गेलोय. पण खूप लहान गाव आहे.

पुढील भाग टाकला आहे.