©राक्षसमंदिर - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 13 April, 2020 - 03:27

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

मनोगत -
राक्षसमंदिर ही दीर्घकथा पूर्ण करून वाचकांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. या कथेचा शेवट पहिला शब्द लिहिण्याआधी माझ्या डोक्यात होता, जे सहसा होत नाही. जी ए कुलकर्णी आणि नारायण धारप यांच्या साहित्यवाचनामुळे ही कथा माझ्या मनातल्या विचारानुसार मांडता आली, व वातावरणनिर्मिती करता आली. मात्र ही संपूर्ण स्वतंत्र कथा असून, यात कुठलाही भाग कॉपी केला गेलेला नाही.
अजून एक, ही कथा लिहिताना माझ्या अर्धवट सोडलेल्या कथांचाही प्रत्येक भागात उल्लेख झाला, आणि मी तो मनापासून एन्जॉयही केला. यामुळे आपणा सर्वांना माझ्या कथा वाचण्याची किती उत्सुकता आहे, हे नव्याने कळलं. या अपूर्ण कथांसाठी मी वाचकांची माफी मागतो, व भविष्यात त्याही कथा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
ही कथा पूर्ण झाली असली, तरी जर वाचकांना ही कथा समजली नाही, तर तिचा उपसंहार लिहीन. पण ही कथा समजण्यास काहीही अडचण येणार नाही अशी आशा बाळगतो!
धन्यवाद!
अज्ञातवासी!!

||प्रारंभ||

रटरटत्या उन्हात मल्लापाची भट्टी अजूनच रसरसली होती. कोळशाना वारा घालण्याचं काम अम्मा करत होती.
"अम्मा, पाणी मिळेल काय?"
अम्माने वर बघितले. आडव्या गंधाच्या रेषा ओढलेल्या, काळाकुट्ट चेहरा तिच्या समोर उभा होता.
"हं." अम्मा हुंकारली, आणि आत गेली.
त्या माणसाने तिथेच ठाण मांडलं आणि त्याच्या जवळची पोतडी उघडली. पोतडीतून त्याने एक डबी काढली. तिच्यातून चिमूटभर तंबाखू घेऊन त्यात चुना मिसळला. ती तंबाखू हातावर खसाखसा मळली. तेवढ्यात त्याचं मल्लापाकडे लक्ष गेलं.
"घेणार काय?"
मल्लापाने हातानेच नकार दिला.
अम्माने तांब्याभर पाणी आणलं... त्याने ओशाळून तंबाखू बाजूला पोतडीवर ओतली. आणि तांब्या हातात घेऊन आधी खसाखसा चूळ भरली, मग घोटभर पाणी घेऊन पुन्हा तंबाखू हातात घेतली.
"राक्षसमंदिराकडे जावायाचे होते," तो बार भरता भरता म्हणाला.
"ये राक्षसा..." अम्माचे डोळे विस्फारले, तिने घाईघाईने तांब्या हिसकावला, बाहेर जाऊन थुंकली, तो तांब्या तसाच भट्टीच्या कोळशावर फेकला, आणि काहीतरी पुटपुटू लागली.
"उठ आणि चालायला लाग!" मल्लापा शांतपणे म्हणाला.
तो वाटसरू जागचा हालला नाही, उलट जरा जास्तच रेलून बसला.
"मल्लापा, हाकलून लाव त्याला," अम्मा ओरडली.
"अम्मा, लक्ष्मीपुत्राला हाकलून लावतायेत तुम्ही थोडा विचार तर करा." त्याने अम्माच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं.
अम्मा जागीच थबकली. मल्लापाचेही डोळे लकाकले.
"तू आणि लक्ष्मीपुत्र? " अम्मा विषण्ण हसली
"अम्मा माझ्या रूपावर जातात आणि लोक फसतात. थांबा तुम्हाला गमजा दाखवतो."
त्याने त्याची पोतडी उघडली, त्यातून एक लहानशी पेटी बाहेर काढली, आणि तिच्यातून एक छोटीशी चकाकणारी गोळी काढली.
"हे घ्या, तुमच्या पाण्याचा मोबदला. पण हे क्षय आहे. जे मी तुम्हाला देणार होतो ते अक्षय, अविनाशी होतं."
त्याने ती गोळी तिथेच ठेवली, व तो जायला निघाला.
तेवढ्यात मल्लापाने त्याला अडवले.
"कुठे निघालास? तुला काय हवंय ते तर सांग. आणि राक्षसमंदिराची अपकीर्ती तुला माहिती नाही?"
अम्माचा चेहरा भीतीने काळवंडला.
"अपकीर्ती नव्हे, तर दंतकथा. या दंतकथा पसरवल्या जातात त्या त्या जागेला अबाधित ठेवण्यासाठी."
"अरे मूर्ख, दंतकथा नाही. जो राक्षसमंदिरात जाईल, त्याच्या घरादाराची राखरांगोळी होईल, असा शाप आहे. तिथे सोन्याच्या राशी असतील, पण तिथे जाऊन आल्यावर माणूस भ्रमिष्ट होऊन मरतो हे तुला कुणी सांगितलं नाही?"
"तुम्ही बघितलय कुणाला, जाऊन येताना?" तो हसला.
अम्माकडे याचं उत्तर नव्हतं.
"दंतकथा, अम्मा दंतकथा!" आता माझं ऐका.
वाटसरुने सांगायला सुरुवात केली.
"माझं नाव अधीरराज. तुम्ही काटीपूर गाव ऐकलं असेलच."
"हो, खोबऱ्यासाठी त्या गावात जातात." मल्लापा म्हणाला.
"तिथले जमीनदार अरण्यवदन यांचा मी सगळ्यात लहान नातू. गेल्याच वर्षी ते वयाच्या एकशे सहाव्या वर्षी वारले. ते गेल्यानंतर माझ्याकडे अमाप संपत्ती आली. मात्र त्यांनी जाताना माझ्या कानात काहीतरी मोठे रहस्य सांगितले. जे रहस्य मलाही तर सुरुवातीला खोटे वाटले, पण शेवटी मला त्याचा अर्थ उमजला. "
"तू हे सगळं आम्हाला का सांगतोय?"
"सांगतो, मल्लराजा, सांगतो. कथा अथवा घटना पूर्ण ऐकल्याशिवाय प्रश्न विचारू नये असं शास्त्रवचन आहे."
"आजोबांनी मला सांगितल्याप्रमाणे, मी आमच्या देवखोलीत गेलो. तिथून देवतांच्या मुर्त्या बाजूला करून मी त्याखाली असलेलं फडताळ उघडलं, आणि त्यात ही पोतडी सापडली."
"मग..." मल्लापाने विचारलं आणि जीभ चावली.
अधीरराज हसला.
"त्यात एक छोटीशी पोथी होती. मी पोथी अधीरतेने वाचायला सुरुवात केली.
अनेक वर्षांपूर्वी माझे आजोबा हे गाव, म्हणजेच राक्षसभुवन येथे आले. तेव्हा त्यांचं वय बरच झालं होतं. इथे येऊन ते सर्वप्रथम तुमच्या वडिलांना भेटले. रात्री अम्मानी त्यांना ज्वारीच्या भाकऱ्या आणि सुरणाची भाजी खाऊ घातली होती."
"नराधम, निघ इथून." अम्मा त्याच्या अंगावर धावली.
"अम्मा, मला मारावयचा तुम्हास पूर्ण अधिकार आहे. पण लक्षात घ्या, ती घटना घडली तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता."
मल्लापा चकित होऊन त्याच्याकडे बघू लागला.
अधीरराजाने सुरुवात केली.
------
"तर अम्मा, तुम्हास आठवत असेल, त्या रात्री आमचे आजोबा तुमच्या घरी आले होते. तेव्हा आपण गरोदर होतात. तुमचे पती त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या अधीरतेने सामोरे गेले. तुम्हालाही त्या पुरुषाचं तेज बघून अतिशय प्रसन्न वाटलं होतं."
"हो आठवतंय." अम्मा खाली मान घालून म्हणाली.
"तर तो पुरुष काय म्हणाला हे आठवत असेलच."
अम्माच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना जाणवल्या.
"मल्लापा, या राक्षसाला हाकलून लाव इथून, तुझ्या अम्माचा जीव जाईन रे."
अम्माच्या चेहऱ्यावर आसवे जमा झाली आणि बघता बघता ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली.
"अम्मा रडू नको. ये पोतडीवाल्या, तू चालायला लाग."
"मल्लराज, अविचार करू नका."
"ही तप्त सळई तुझ्या जिभेवर ठेवण्याआधी, चालता हो."
"मल्लराज, क्रोधमय वाणीतून अलक्ष्मीची लक्षणे दिसतात. ठीक आहे, मी जातोय, पण मला भेटायला यावयाचे असेल तर गावाच्या खालच्या डोंबाच्या वस्तीत मी आज रात्री भेटेन. यानंतर आपली पुन्हा भेट होणे नाही."
अधीरराजाने आपली पोतडी उचलली, आणि तो चालता झाला.
मल्लापाने अम्माला शांत केले. अम्मा हळूहळू शांत झाली.
मल्लापाने यंत्रवतपणे कामे आवरली, संध्याकाळ झाली. त्याने भट्टी थंड केली, व पडवीत येऊन विसावला.
अम्मा त्याच्याजवळ आली. "काही खायला आणू?"
मल्लापाने यंत्रवतपणे 'नाही' अशी मान हलवली.
"मल्लापा," अम्मा कठोरपणे म्हणाली. "तो अधीरराज कोण कुठला, आणि तू त्याच्या भाकडकथेवर विश्वास ठेवतो?"
"अम्मा ती भाकडकथा नव्हती, आणि हे तुलाही माहितीये. पण मी तुला विचारणार नाही." मल्लपा शांतपणे म्हणाला.
"हो, हो, नव्हती." अम्माचा इतक्या वेळ आवरून ठेवलेला बांध फुटला.
मल्लापाने तिला पुन्हा शांत केलं. बऱ्याच वेळ ती मुसमुसत होती.
...आणि एके क्षणी ती शून्यवत होऊन बोलू लागली.
"त्या रात्री तो म्हातारा आला होता. अतिशय तेजस्वी, प्रभावी. त्याला बघताच तुझ्या बापाने त्याला वंदन केलं, आणि आदराने एका चौरंगावर बसवलं.
मला उठवत नव्हतं, पण त्या म्हाताऱ्याच्या तेजापुढे मी नतमस्तक झाले, आणि मी त्याच्यासमोर गेले.
त्याने मला आशीर्वाद दिला, आणि हे सोन्याचं भलंमोठं ओमपान तुझ्यासाठी दिलं."
अम्माने त्याच्या छातीकडे बोट केला.
"रात्रभर तुझे वडील आणि तो म्हातारा, दोघेही काहीतरी खलबत करत होते. मला झोप अनावर झाली, आणि मी झोपले. सकाळी उठून बघते तर दोघांचा पत्ता नव्हता. होती फक्त एक चिट्ठी. त्यात लिहिलं होतं."
'लक्ष्मी, आपलं आयुष्य गरिबीत गेलं, पण आपल्या होणाऱ्या बाळासाठी मला फक्त गर्भश्रीमंती पाहिजे आहे. त्यामुळे मी राक्षसमंदिरात जात आहे. परत येताना अक्षय, अविनाशी सोन्याचा मार्ग घेऊन येईल, जो आपल्याला गर्भश्रीमंत बनवेन.'
मी ते वाचून सुन्न झाले. अनेक दिवस लोटले, महिने लोटले, वर्ष लोटलीत, पण तुझा बाप परत आला नाही.
"अप्पा माझी शपथ घे, त्या मार्गाला जाणार नाही. घे माझी शपथ."
"अम्मा, शांत हो. मी कधीही त्या मार्गाला जाणार नाही."
अम्मा डोळे पुसून आत गेली. मल्लापा ओट्यावर येऊन बसला.
'अक्षय सोनं, गर्भश्रीमंती.
दिवसरात्र भट्टीच्या तापात पोळण, विस्तवाशी खेळणं आणि हातोडा चालवणं.
एक मार्ग, अक्षय श्रीमंतीचा!
संगीताचा बाप तालेवार स्थळे शोधतोय, जर आपल्याला सोनं मिळालं तर?
संगी काय, जमीनदार राघवेन्द्रची ब्रह्मपुत्रासुद्धा आपल्या जवळ असेन.'
मल्लापाच्या डोक्यात अक्षय सोन्याचा, गर्भश्रीमंतीचाच विचार होता.
तो रात्री लवकर झोपला. ते बघून अम्माही निवांत झोपली.
थोड्या वेळाने अम्माच्या घोरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
मल्लापा उठला, आणि डोंबांच्या वस्तीकडे निघाला.
डोंबांची वस्ती गावाच्या बाहेर होती, तिथेच वाटसरूसाठी एक धर्मशाळा बांधलेली होती. तसं बघायला गेलं तर वस्ती फारशी मोठी नव्हती पण त्यामानाने धर्मशाळा फार मोठी होती.
मल्लापा झपाझप पावले टाकत धर्मशाळेत पोहोचला. अधीरराज इथेच उतरला असणार याची त्याला जाणीव होती.
मात्र आज धर्मशाळेत चिटपाखरूही दिसत नव्हतं, फक्त एका खोलीत मिणमिणता प्रकाश दिसत होता.
मल्लापा त्या खोलीकडे निघाला. खोलीचं दार अर्धवट लोटलेलं होतं. त्यामधून मधली अधिरराजाची आकृती स्पष्ट दिसत होती.
"यावे मल्लराज..."
मल्लापा चमकला, व ओशाळल्यागत पुढे झाला.
"अक्षय सोन्याने तुम्हाला इथे आणलं तर." अधीरराज हसला. त्याच्या काळ्याकुट्ट चेहऱ्यावर शुभ्र दंतपंक्ती चमकल्या.
"मला काय करावं लागेल?" मल्लापाने विचारले.
"धीर धरा मल्लराज, धीर हा पुरुषाचा सर्वात मोठा गुण आहे, तर चंचलता स्त्रीचा."
मल्लप्पा वरमला.
"एक कथा सांगतो, ती ऐका, म्हणजे तुमच्या शंकांचं समाधान होईल."
मल्लप्पाने मान हलवली. अधीरराजाने कथा सांगण्यास सुरुवात केली.
"सत्ययुगात मित्र आणि अमित्र नावाचे दोन राक्षस होते. दोघांची मैत्री इतकी अतूट होती, की देवतानाही अचंबा वाटे. मित्र हा दागदागिने बनवण्यात कुशल होता. इतका की देवतांनी सोनं, चांदी व जडजवाहिर यांच्या मनोवांछित कामनेचा वर त्याला दिला, व एक गोल हंडा दिला. हा हंडा कायम भरलेला असे व या वरामुळे मित्राला दागिन्यांसाठी लागणाऱ्या धातूची, जवाहिरांची ददात नसे.
अमित्र हा शस्त्र निर्माण करण्यात पटाईत होता. त्याचा शस्त्रनिर्मितीत हात कुणीही धरु शकत नसे.
देवतांनी मित्राला वर दिला होताच. पण मित्राने अमित्रालाही काहीतरी वर देण्याची मागणी केली. देवतांनी संतोषाने ती मागणी मान्य केली, व अमित्रास वर मागण्यास सांगितले.
"देवा, आमच्या दोघांची जोडी कायम सोबत राहू दे!" अमित्राने वर मागितला.
तथास्तु, म्हणून देव अंतर्धान पावले.
... आणि त्याक्षणी मित्राचं एका सुंदर स्त्रीत रूपांतर झालं.
मित्र आणि अमित्र दोघेही चकित झाले. हे असं कसं झालं म्हणून त्यांनी शुक्राचार्यकडे धाव घेतली.
"बाळांनो, कायम सोबत जोडीने तर फक्त पती पत्नी राहतात. तुमचा वर तुम्हाला मिळाला आहेच. मित्रात स्त्रीत्व जास्त असल्यामुळे त्याचं स्त्रीत रूपांतर झालं. आता तुम्ही सुखाने संसार करा."
दोघांनी गुरूचा आदेश मानला, व ते सुखाने संसारात रममाण झाले.
------
अधीरराज क्षणभर थांबला. त्याने घोटभर पाणी घेतलं.
"मित्राचं स्त्रीमध्ये रूपांतर होऊन झालं. दोघेही सदैव सोबत असत. दोघांना एकमेकांशिवाय क्षणभरही करमेना. त्याचवेळी चाणाक्ष मित्राने आपल्या हंड्यावर इतर राक्षसांची नजर आहे हे ओळखलं आणि तो हंडा कुशलतेने आपल्या गर्भाशयात लपवला.
दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी मित्र असाच एका देवतेचे दागिने घेऊन जात असतांना त्याला इतर राक्षसांनी घेरले, व पुरुषत्व सोडल्याबद्दल त्याची यथेच्छ टिंगल व निर्भत्सना केली. यामुळे मित्र दुखावला. तो तसाच दागिने घेऊन देवतेकडे गेला. त्या देवतेने दागिन्यांची प्रचंड स्तुती केली. मात्र मित्राचे स्तुतीकडे लक्ष नव्हते. न राहवून देवतेने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. मित्राने त्याची आपबीती सांगितली."
"मित्रा, जर तुझ्या दुःखाचे हे कारण असेल, तर याक्षणी मी तुला पुरुष करायला तयार आहे." देवतेने सांगितले.
मित्राने आनंदाने सहमती दिली, आणि त्याक्षणी त्याचे पुनःश्च पुरुषात रूपांतर झाले.
मित्र आनंदात घरी आला. मित्राला मूळ रुपात बघून अमित्राला आश्चर्याचा धक्का बसला, आणि प्रचंड दुःख झाले. आपल्या वरदानाची मित्राने अशी हेटाळणा केल्याबद्दल तो रागावून अज्ञातवासात निघून गेला.
मित्राने अमित्राला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण अमित्राचा थांगपत्ता लागला नाही. अशातच मित्राला काही शारीरिक बदल जाणवू लागले. त्याकडे त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण काही दिवसांनी त्याच्या पोटात दुखू लागले, त्याच्या पोटात काही हालचाली जाणवू लागल्या. त्याने कुशल वैद्यांना दाखविले, आणि कारण ऐकताच मित्राला आश्चर्याचा धक्का बसला.
मित्राला स्त्रीरुपात असताना अमित्राकडून दिवस गेले होते...
आपल्या अविचाराने केलेल्या कृतीचं हे फळ मिळेल याचा मित्राने कधीही विचार केला नव्हता. मित्राने देवतांकडे धाव घेतली. देवतांनी एकदा अव्हेरलेलं वरदान पुन्हा द्यायला स्पष्ट नकार दिला. त्याने वैद्यांकडे धाव घेतली, वैद्यानाही मार्ग समजेना. मित्र कासावीस झाला. शेवटी त्याने दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे धाव घेतली.
"मित्रा, तू तुझ्या प्राणप्रिय सख्याशी प्रतारणा केलीस. ती करताना अविचाराने तू स्वतःवर हे संकट ओढवून घेतलेस. तू स्त्री असताना केलेल्या कर्माचा तुला विसर पडला. तो हंडा तू गर्भाशयात लपवला होतास, त्यामुळे देवतांच वरदान म्हणून तो हंडा गर्भाशयासहित सुरक्षित राहिला. आणि त्यातच ते अजन्मलेलं बालक वाढतंय."
"हे देवतांच वरदान आहे. शाप नव्हे. पण मी तुला शाप देऊ शकतो, ज्यायोगे तो तुझ्या कार्यात सिद्ध होईल."
"हे मित्रा, मी दैत्यगुरु शुक्राचार्य तुला शाप देतो की, हा गर्भ तू गर्भाशयात लपवलेल्या अक्षय्य हंड्यात कायम वाढत जाऊन तुला नऊ महिन्यातून एकदा प्रचंड गर्भकळा सहन कराव्या लागतील, आणि त्यानंतर तू पुन्हा मूर्ती होऊन पडशील. आजपर्यंत तू दागिने बनवताना लोहाला तुच्छ समजत राहिलास, पण कलियुगात तुझा सखा अमित्र लोहराच्याच रूपाने येऊन तुझी या वेदनेतून मुक्तता करेन व तो अक्षय हंडा त्याच्याकडे ठेवून घेईल. त्यानंतर तू पाताळात परत येशील."
त्यानंतर शुक्राचार्यानी राक्षसमंदिरात मित्राला स्थान दिले, व त्याभोवती मोहिनीअस्त्राची योजना केली. त्यामुळे लोक राक्षसमंदिरात गेल्यावर भ्रमिष्ट होतात."
अधीरराज बोलायचा थांबला.
"मल्लराज, तुम्ही प्रश्न विचारू शकतात."
"म्हणजे मी? अमित्र?... "मल्लापाने उत्सुकतेने विचारले.
"हो मल्लराज. थांबा, तुम्हास काही दाखवतो."
अधीरराजाने पोतडीतून एक जुनाट ग्रंथ बाहेर काढला. त्याने काही पाने चाळली. आणि एका पानावर येऊन तो थांबला.
"हे बघा मल्लराज."
मल्लापा उत्सुकतेने त्या ग्रंथाकडे बघू लागला.
त्या पानावर एका सुंदर स्त्रीच व एका पुरुषाचं चित्र होतं...
...पण तो पुरुष हुबेहुब मल्लपा सारखा दिसत होता.
"मल्लराज, पुराव्याशिवाय तर पिताही पुत्राला आपला मानायला तयार होत नाही. म्हणून ही पोतडी घेऊन फिरतोय. अनेक पुरावे आहेत यात. प्रत्येक गोष्ट चाळून बघा. आजची पूर्ण रात्र फक्त तुम्हाला अभ्यासासाठी आहे. उद्याची रात्र मात्र आपणासाठी अतिशय महत्वपूर्ण असेल."
दर नऊ महिन्यांनी रात्री राक्षसमंदिरातून विचित्र आवाज का येतात, याचा आज मल्लपाला अर्थ कळाला...
अधीरराजाने पोतडी मल्लापाजवळ सरकवली, व तो डोळे मिटून पडला.
मल्लापाने ती पोतडी उघडली. अनेक जुने ग्रंथ, ताम्रपट वगैरे या गोष्टीनी ती पोतडी गच्च भरली होती.
मल्लपाला त्यात शब्दही कळत नव्हता, पण चित्ररूपाने बऱ्याच गोष्टी कळल्या.
तो शेवटच्या पुस्तकाकडे वळला, एक पुरुष लोखंडी सुरीने एका राक्षसाच पोट फाडून तिथून एक हंडा बाहेर काढत होता...
...तो पुरुष हुबेहूब मल्लापासारखा दिसत होता...
रात्र मध्यावर आली तसा मल्लापा उठला. अधीरराजाला उठवावे की नाही, या संभ्रमात तो पडला.
"मल्लराज, परक्या गावात श्वाननिद्रा हा चतुर पुरुषाचा गुण असतो. उद्या एक अतिशय धारदार सूरी व तेल तयार ठेवा. आज ज्या वेळेस आलात. त्याच वेळेस या."
...आणि अधिरराज ताडकन उठला. त्याने मल्लपाच्या डोळ्यात डोळे घालून बघितले.
"मित्राच्या गर्भातूनच तुमच्या श्रीमंतीचा उदय होईल मल्लराज, हीच ती गर्भश्रीमंती!!!!"
------
मल्लापा तंद्रीतच घरी आला. त्याच्या डोळ्यासमोर ती चित्रे आणि अधीरराजाने सांगितलेली कथा तरळत होती.
अम्माला झोपलेली बघून त्याला हायसे वाटले. तोसुद्धा अंथरुणावर पडला, आणि झोपी गेला.
दिवस चांगलाच वर आला, तेव्हा मल्लप्पाला जाग आली. अम्मा स्वयंपाकघरात काहीतरी करत होती.
तो अम्माजवळ गेला.
अम्मा अतिशय आनंदात होती.
"मल्लापा, बरं झालं माझं ऐकलस बाबा. तुला बघून किती आनंद होतोय सांगू. तुझा बाप असाच रात्री म्हाताऱ्याबरोबर गेला, आणि परत आला नाही. जा, आवर पटकन. भरपूर कामे आहेत."
मल्लापा निमूटपणे स्नानाला गेला.
त्यानंतर थोडंस खाऊन तो कामाला लागला. सर्वात आधी तर त्याने एक अतिशय उच्च प्रतीचा सरळ खाणीतून आणलेला लोखंडाचा तुकडा घेतला. त्यानंतर त्या तापवून हातोडीने घाव घालत तो हवा तसा आकार देऊ लागला.
"मल्लपा, अरे विळे बनवायचं सोडून हे काय बनवत बसला आहेस? उद्या बाजारात जायचं आहे ना?"
मल्लपा हसला. आज रात्रीनंतर त्याला पुन्हा कधीही बाजारात जायची गरज नव्हती.
"अम्मा, कोतवालाने त्वरेने एक मोठा सुरा बनवण्यास सांगितले आहे. जर कसूर झाली, तर दंड होईल असं म्हणाला. जर कोतवाल खुश झाला, तर सर्व विळे विकून जेवढी रक्कम मिळणार नाही, तेवढी एक सुराच देऊन जाईल. उद्या सकाळीच हा सुरा त्याला पोहोचता करायचाय."
"मग बनव. कोतवालाची कामगिरी म्हणजे भाग्यच." अम्मा अभिमानाने म्हणाली.
मल्लापा हसला, आणि घाव घालू लागला.
संध्याकाळी मल्लापाने काम थांबवलं.
त्याच्यासमोर एक धारदार सुरा पडला होता..
एक हात लांब सुरा, त्याला पाव हात लांब मूठ. मुठीवर अनेक आकृत्या कोरलेल्या. एक बोट रुंद दुधारी पात लखलखत होतं!
त्याने अंगठा हळुवार पात्याच्या धारेवर अलगद टेकवला, आणि वर उचलला.
...मात्र त्यानेही रक्ताची धार लागली..
आपलंच रक्त बघून मल्लापा खुशीने हसला!
रात्री जेवणे झाली. उद्या सकाळी लवकर कोतवालाकडे निघायचं म्हणून मल्लापा लवकर झोपला. मल्लापाचं बोट कापलं, म्हणून अम्मा कळवळली, पण इतका धारदार सुरा बघून तिला अभिमानही वाटला. कोतवालाकडून घसघशीत रक्कम मिळणार म्हणून ती खुश झाली, आणि समाधानाने झोपली.
अम्मा झोपल्याची चाहूल लागताच मल्लापा उठला, आणि धर्मशाळेकडे चालू लागला.
आजही धर्मशाळेत फक्त एका खोलीतला दिवा तेवत होता. मल्लापा त्या खोलीच्या रोखाने गेला.
अधिरराजाच्या काळ्याकुट्ट चेहऱ्यावर आज निळा फेटा अतिशय विनोदी दृश्य निर्माण करत होता. ते बघून मल्लापालाही हसू आवरले नाही.
"मल्लराज, फेट्याला हसताय ना. लक्ष्मीच्या स्वागताला भुंड्या डोक्याने जाऊ नये, असं शास्त्रवचन आहे."
आता मात्र मल्लराजाला स्वतःचीच शरम वाटली.
"उदास होऊ नका मल्लराज, शूरांची वीरता हाच त्यांचा शिरपेच आणि बुद्धिवानांची विद्वता हाच त्यांचा फेटा असतो, असंही वचन आहे. माझ्यासारख्या अभाग्याकडे दोन्ही नसल्याने नाईलाजाने फेटा बांधावा लागला." अधिरराज हसून म्हणाला.
मल्लापाही हसला.
"चलायचं?" म्हणून अधिरराजाने खोलीला टांगलेली एक छोटी पिशवी घेतली, व तो चालू लागला.
मल्लापाही त्याच्या पाठोपाठ निघाला.
अतिशय अंधारी रात्र होती, पण अधिराजाच्या हातातल्या मशालीमुळे रस्ता उजळून निघाला होता.
"तर मल्लराज, हा सुरा बघून तुम्ही बलवान असूनही कलाकार आहात याची खात्री पटते." अधीरराज चालता चालता म्हणाला.
"अधीरराज, पण मला हंडा मिळवून देण्यात तुमचा काय फायदा"? मल्लापाने विचारले.
"मल्लराज, भटका कुत्रा असेल, तर शिळ्या भाकरीच्या तुकड्याची ददात असते, मात्र तोच राजाचा लाडका कुत्रा असेल, तर दास्या त्याच्या दिमतीला असतात. हंडा मिळाला, तर तुम्ही तर राजाच्याही पुढे जाल. पण या कामातला तुमचा एक सहकारी म्हणून तुम्ही मला सदैव आपला मित्र मानाल, याविषयी माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही."
"नक्कीच अधिरराज." मल्लापा हसून म्हणाला.
"अजून एक मल्लराज, आणि तितकंच महत्वाचं आहे. इथून आता दोन मैलावर राक्षसमंदिर आहे, मात्र मोहिनीअस्त्राचा प्रभाव मंदिर नजरेस पडलं, तरी सुरू होऊ शकतो. म्हणून ही विभूती कपाळाला लावा."
अधिराराजाने पिशवीतून हळुवार थोडी विभूती काढली, व मल्लापाला लावली, आणि स्वतःही लावली.
"यामुळे मोहिनीअस्त्र आपल्यावर प्रभाव पाडू शकणार नाही. परंतु या विभूतीचाही प्रभाव थोडावेळच टिकतो. ही विभूती स्मरणअस्त्राने मंत्रित आहे. तेवढ्या वेळात आपलं काम होईल की नाही, याविषयी माझ्या मनात शंका होती, पण सुऱ्याची धार व तुमचा धीर बघता आता यत्किंचितही ती शंका मनात राहिली नाही."
मल्लापाचा उर अभिमानाने भरून आला.
"मल्लराज. अनेक वर्षांपूर्वी माझे आजोबा हेच कार्य सिद्धीस नेण्यासाठी आले होते. आपल्या वडिलांच्या आणि आपल्या चेहऱ्यात साम्य असल्याने चित्रातील व्यक्ती हीच, या गैरसमजातून त्यांच्याकडून प्रमाद घडला. मात्र आज सगळ्या चुकांच परिमार्जन होऊन नव्या आयुष्याची पहाट होईल."
अधिरराज भावविवश होऊन बोलत होता.
"नक्कीच." मल्लापा पुटपुटला.
ते दोघेही बरच अंतर चालल्यावर अधीरराजाने मल्लापाला थांबवले...
रात्रीच्या अंधारातही तो विशाल संगमरवरी घुमट चमकत होता. त्याच्या खाली एक विशाल चौकोनी संगमरवरी बांधकामात छत चमकत होतं. छताला आधार देण्यासाठी बारा खांब होते, व प्रत्येक खांबावर सुरेख कोरीवकाम होतं. छताच्या चारपट आकाराच्या जोत्यावर ते मंदिर बांधलं होतं. वर जायला संगमरवरी पायऱ्या होत्या.
"मल्लराज, हेच ते राक्षसमंदिर, ज्यात आजपर्यंत फक्त एकदा दोघाजणांनी प्रवेश केला होता. त्याव्यतिरिक्त इथे देवतानाही प्रवेश नाही." अधिरराज अभिमानाने म्हणाला.
"मल्लापा भारावून मंदिराकडे बघत राहिला."
आणि ते दोघेही मंदिराच्या दिशेने निघाले.
------
राक्षसमंदिराच्या आजूबाजूने पडक्या भिंतीच कुंपण एकेकाळी त्या मंदिराच्या भव्यतेची साक्ष देत होत्या. त्या कुंपणाच्या मधोमध आत जायला जागा होती.
दोघांनी आत प्रवेश केला.
तेवढ्यात सळसळत एक नाग त्यांच्यासमोर आला, व त्याने मल्लापावर झेप घेतली, मात्र अधिरराजाने तो नाग पकडला.
मल्लापा जागच्या जागी थिजून राहिला.
"मल्लराज, हे राक्षसमंदिर म्हणजे एका मायेने बनवलेल्या वास्तूचा उत्तम नमुना. मोहिनीअस्त्र विफल गेलं तरीही ठिकठिकाणी अशा योजना असतीलच."
एव्हाना त्या नागाने अधीराजाला विळखा घालायला सुरुवात केली, व तो त्याला चावण्याचा प्रयत्न करू लागला.
अधिरराजाने त्याचा तोंडात एक बोट दिले. तो नाग कडकडून अधिरराजाला चावला.
मात्र अधीरराज निश्चल होता.
मल्लपाच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्य पसरले.
"घाबरू नका मल्लराज. हा नाग निसर्गतः इथे निर्माण झालेला नाही, तो एका योजनेचा भाग म्हणून इथे निर्माण केलेला आहे. या सृष्टीत प्रत्येक जीविताच्या निर्माणाचा अधिकार ब्रह्मदेवाला आहे. त्याव्यतिरिक्त कुणी काही जीवित निर्माण करत असेल, तर तो फक्त आभास म्हणायचा."
अधिरराजाने त्याच्या तोंडातून बोट काढला. त्याच्या तोंडाच्या बाजूची वेटोळी आपल्या हाताभोवती बनवली. त्या नागाच्या शेपटीने आधीच त्याच्या दुसऱ्या हाताला विळखा घातला होता...
...आणि जोर लावून एखादा दोरा तोडावा तसाच त्याने नाग मधोमध तोडला...
मल्लापा पूर्णपणे भांबावून गेला. ते दृश्य बघून त्याची भीतीने गाळण उडाली.
...मात्र पुढच्याच क्षणी त्या नागाची राख झाली...
"मल्लराज, हे राक्षसमंदिर एका महान निर्मात्याने एका महान वस्तूच्या रक्षणासाठी बनवलंय, त्यामुळे इथे जे काही बघायला मिळेल, ते अपूर्व असेल."
दोघेही मंदिराच्या पायऱ्याजवळ आले. मल्लापाने पायरीवर पहिलं पाऊल ठेवलं, आणि दुसऱ्या पायरीवर दुसरं पाऊल ठेवलं पण त्याला पहिलं पाऊल उचलतात येईना...
"मल्लराज थांबा." अधिरराजाने आवाज दिला. त्याने एक विभूती काढून चहुबाजूला फेकली.
"विमुक्तास्त्र मल्लराज, चला."
मल्लापा पायऱ्या चढू लागला, व ते मंदिराच्या द्वारासमोर पोहोचले.
तिथे तीन दारे होती. प्रत्येक द्वारावर वेगवेगळी चिन्हे होती.
एका दारावर अतिशय विक्राळ असा राक्षस चितारला होता. दुसऱ्या दारावर विष्णूची प्रतिमा चितारली होती. तिसऱ्या दारावर एका सुंदर गर्भवती स्त्रीचं चित्र होतं.
"मल्लराज, काय निवडाल? काय तर्क चालतो."
मल्लापाने विचार केला, आणि म्हणाला.
"तिसरा दरवाजा."
"का मल्लराज?"
"कारण हे राक्षसमंदिर असलं, तरीही इथला राक्षस बाकीच्या राक्षसासारखा नाही. किंबहुना त्याला इतर राक्षसानी फसवल्यामुळे तो या कचाट्यात फसला, त्यामुळे पहिला दरवाजा नाही.
या मंदिराची उत्पत्ती शुक्राचार्यनी केली, ते विष्णूला मंदिराच्या मार्गावर स्थान देणं शक्य नाही, म्हणून दुसरा दरवाजाही नाही.
प्रत्येक मानवाला आपल्या गतकाळातील चांगल्या आठवणी सतावत असतात. त्यामुळे तो चित्ररूपाने त्यांना साठवून ठेवतो. हीच आठवण मित्राने कायम आपल्या मार्गावर कोरली असेल."
"जबरदस्त मल्लराज! तुमची बुद्धिमत्ता खरंच अगाध आहे, पण..."
अधिरराज पुढे झाला. त्याने विष्णूचे चित्र असलेला दरवाजा उघडला. त्याचबरोबर आजूबाजूच्या दोन्ही दरवाजांसमोर ज्वाळा उठल्या, व ते दरवाजे जळून खाक झाले.
"ज्या राक्षसांनी मित्राचा घात केला, त्यांच्या आकृतीला मित्र कधीही त्याच्या मंदिरात स्थान देणं शक्य नाही, हे तुम्ही बरोबर ओळखलंत."
"मात्र माणूस कटू आठवणी फक्त टाळायचं बघतो. स्त्रीरुपात असणारा गर्भ आज मित्राला छळतोय, हीच त्याची सगळ्यात कटू आठवण आहे, आणि या आठवणीला तो कदापि मंदिरात स्थान देणार नाही."
"मल्लराज, कधीकधी ज्ञानापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवावा लागतो. आणि सत्य हेच आहे की बळीमहाराजांपासून विष्णू प्रत्येक राक्षसमंदिराचा द्वारपाल म्हणून उभा आहे." अधिरराज हसत म्हणाला.
मल्लराज पूर्णपणे ओशाळला.
दोघांनीही आत प्रवेश केला. आत विशाल गर्भगृह होतं, आणि त्या गर्भगृहाच्या टोकाला एक भव्य द्वार होतं.
"माझ्या मते आता आपली परीक्षा संपली असेल अधिरराज."
"मल्लराज, शूर पुरुष जसं युद्ध संपलं तरी आपली शस्त्रे पाजून ठेवतात, तसं आपणही जागृत राहणं उत्तम."
"आता हेच बघा, या मंदिराची उत्तम रचना बघा. आपण सरळ त्या टोकाला जाऊन ते द्वार उघडू शकतो, पण ते इतकं सहजशक्य असेल?
आता आपल्या पायाखाली बघा, या आकृत्या अनेक राक्षसांच्या आहेत. त्या आकृत्या अशा एकसंध दगडात घडवलेल्या असल्या तरी अनेक आकृत्या घडवून कुशलतेने एकसंध वाटतील अशा जोडलेल्या आहेत.
यात एका बाजूला राक्षसांची चित्रे असून, दुसऱ्या बाजूला देवतांची चित्रे आहेत. आता आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय मल्लराज."
अधिरराज मल्लापाकडे वळला.
"तुम्ही देवमार्गाने जाणं पसंत कराल की राक्षसमार्गाने?"
------
मल्लापा डोकं धरून बसला होता.
"मल्लराज हे उत्तर पुढच्या काही क्षणात अपेक्षित आहे, नाहीतर मोहिनीअस्त्राचा प्रभाव सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला आपलं काम संपवता येणार नाही."
"पण अधीरराज इथे माझी मती कुंठित झालीये. आजपर्यंत मी फक्त देवतांना पूजनीय मानलं, म्हणून मी सरळ देवतांची निवड केली असती, परंतु माझं पूर्वायुष्य मी राक्षस म्हणून घालवलय, त्यामुळे आता मी राक्षसमार्ग म्हणून निवडावा का?"
"मल्लराज, निवड तुम्हांस करावयाची आहे. पण लक्षात घ्या, चुकीची निवड आपणा दोघांस मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकते."
मल्लापाने क्षणभर विचार केला, आणि त्याने राक्षसमार्गावर पाऊल ठेवलं.
क्षणार्धात देवमार्गावरील सर्व आकृत्या गळून तिथे एक खोल विवर दिसू लागलं.
"अद्वितीय मल्लराज, अद्वितीय. बरोबर मार्ग निवडलात." अधीरराजानेही राक्षसमार्गावर पाऊल ठेवलं.
"अधिरराज, आता मी तुम्हाला काहीतरी सांगतो. लक्षपूर्वक ऐका."
मल्लापा कसल्यातरी खोल विचारात गढला.
"मानवी आयुष्य नियतीनेच निर्धारित केलेलं असतं, आणि प्रारब्ध कधी चुकत नसतं. माझ्या जन्माच्या रात्रीच माझा बाप या राक्षसमंदिरातल्या द्रव्याच्या लोभापायी कायमचा दूर हिरावला, ती आमची नियतीच.
आपण आमच्याजवळ आलात, आपणांस या जागेच्या रहस्याचा शोध लागला, ही आपली नियतीच, आणि मी इथे आलो, हीसुद्धा नियतीच."
"मानव, देव किंवा राक्षस, त्यांची नियती कुणीही बदलू शकत नाही. महाप्रतापी बळीराजाला एक बटु पाताळात धाडू शकतो किंवा या जगात माझ्या परवानगीशिवाय एक पान हलू शकत नाही म्हणणाऱ्या श्रीकृष्णाला एक साधा पारधी मृत्यू देऊ शकतो."
"अधिरराज, माझ्या नियतीत जे लिहिलंय तेच होईल, तेच घडेल. मग मी मार्ग कुठलाही निवडला असता तरी चाललं असतं. माझी ओळख आजपर्यंत एक मानव म्हणून होती. मी कुणाच्या खिजगणतीतही नव्हतो, पण जेव्हा तुम्ही मला माझी राक्षस म्हणून ओळख करून दिलीत, तेव्हाच मला माझी नियती कळली. माझा पुनर्जन्म झाला, पण पूर्ण राक्षस होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता होती, एक म्हणजे माझ्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणं, त्यासाठी मी त्यांनी दाखवलेला मार्ग निवडला. आणि..."
मल्लापा बोलायचा थांबला.
"दुसरी गोष्ट कोणती मल्ल..." अधिरराजाचे बोलणं संपतं न संपतं तोवर त्याच्या गळ्यावर सुरा अतिशय वेगाने चालला. त्याच्या गळ्यातून रक्ताच्या सहस्त्र धारा लागल्या, आणि तो जागीच गतप्राण झाला...
"दुसरी गोष्ट म्हणजे राक्षसी कर्म अधिरराज. तुझ्या या मानवी रक्ताने आज या माझ्या पूर्वजांनी अंघोळ केली, त्यांना आज शांती लाभली असेल."
"बुद्धिवान माणसाची सोबत कायम उत्तम, परंतु त्या बुद्धिवान माणसाला आपले सर्व भेद माहिती असतील, तर तो सगळ्यात मोठा धोका संभावू शकतो. या राक्षसमंदिरातील सर्व भेद तुला माहिती होते अधिरराज, त्यायोगे तू शेवटच्या क्षणी मलाही रस्त्यातून बाजूला करू शकला असतास."
"मी योग्य मार्ग निवडला अधिरराज, आणि त्यानंतर माझी नियती मला कळली, आणि या मार्गावर चालणं तुझी नियती नाही."
मल्लापा हळूहळू पावले टाकत दरवाजाकडे जाऊ लागला.
'आह!!!!'
दरवाज्याच्या आतून कानठळ्या बसवणारा आवाज आला.
'नियती आणि आज काळसुद्धा!!!' मल्लापा स्वतःशीच हसला.
तो दरवाजाजवळ पोहोचला, जोर लावून त्याने दरवाजा उघडला...
...समोरच एक अतिशय विशाल मूर्ती होती. मूर्तीच्या शरीराच्या तुलनेत मुख अतिशय मोठं होतं. त्या मुखाचा आकार रांजणसारखा होता व लालभडक डोळ्यांच्या पापण्या व जाडजाड लोंबलेले ओठ त्या मूर्तीच्या विद्रुपपणात अजून भर घालत होते. मूर्तीची छाती अतिशय अरुंद होती व खाली ओघाळलेली होती. खांदे मात्र वे उचललेले होते. खांद्यापासून कोपरापर्यंत हात रुंद असून लांब होते, मात्र तिथून पंजापर्यंत हात कृश व थोटके होते. पंजा मात्र भलामोठा होता.
तशीच तऱ्हा पायाचीही होती. मांडीपासून गुडघ्यापर्यंत पाय लांब व रुंद होते, मात्र तिथून घोट्यापर्यंत पाय अतिशय कृश व अरुंद होते, आणि पुन्हा पावले भलीमोठी होतं होती.
मात्र मूर्तीचा सर्वात विचित्र अवयव होता, तो म्हणजे पोट...
लोंबलेल्या छातीपासून सुरू झालेल पोट मांड्यांच्याही खाली येऊन संपत होतं, आणि आता ते मधून कुणीतरी धडका मारत असल्यासारखं खालीवर होत होतं. तो मधला गोल मध्येच इकडेतिकडे घरंगळे, जे मूर्तीच्या भेसूरपणात अजून भर घालत होतं.
'आह!!!!'
पुन्हा मूर्तीच्या आतून आवाज आला. मात्र हा आवाज मागच्यापेक्षा दसपटीने मोठा आणि अतिशय पुरुषी व भसाडा होता.
मल्लाप्पा हे दृश्य बघून हादरलाच. त्याची क्षणभर चलबिचल झाली.
'...मोहिनीअस्त्र पुन्हा प्रभाव टाकू शकत, हे अधिराजाचे शब्द त्याला आठवले...'
त्याने सुरा काढला, व तो मूर्तीच्या दिशेने पावले टाकू लागला.
'मल्लराज, अक्षय सोनं, गर्भश्रीमंती!'
'संगी, ब्रह्मपुत्रा. अम्मा'
'नियती, राक्षस.'
मूर्तीच्या पोटाची हालचाल वाढली होती.
मल्लापा मूर्तीच्या अतिशय जवळ पोहोचला. जवळ पोहोचल्यावर त्याला मूर्तीचा बीभत्सपणा अजून जाणवला.
...सर्व धैर्य एकवटून त्याने मूर्तीच्या ओटीपोटावर सुरा फिरवला...
...त्याक्षणी मूर्तीच्या पोटातून रक्ताचा सडा पडला, व एक भलामोठा काळा मांसल गोळा बाहेर पडला...
तो गोळा वरखाली होत होता...
मल्लापा भांबावला...
'हंडा, हंडा कुठेय?'
मल्लप्पा बिथरला. त्याच्या डोळ्यासमोर अक्षय सोन्याचा हंडा तराळत होता.
भान हरपून तो त्या गोळ्यावर सुरा चालवू लागला. त्याने त्या गोळ्याचे अनेक तुकडे केले.
'हंडा कुठेय?'
तो ओरडला, त्याने डोके गच्च आवळून धरले.
'मल्लापा!!!!!'
मागून धीरगंभीर आवाज आला.
मल्लापा जागच्या जागी स्तब्ध झाला. त्याच्या अंगातून भीतीची एक लहर दौडत गेली.
'मी... मी अमित्र...' मल्लापाच्या तोंडून शब्द फुटले.
'अमित्र...' एका खोल विहिरीतून रुदन करताना यावा तसा आवाज आला.
मल्लापाला एक मोठी सावली त्याच्या दिशेने येताना दिसली.
...आणि पुढच्याच क्षणी मल्लापाच शीर धडापासून वेगळं झालं...
त्या मूर्तीचा हळूहळू आकार बदलला, व एका पुरुषदेहात त्याचं रूपांतर झालं. त्याने पोट चापपून बघितलं. आता त्या पोटात त्याला काहीही जाणवत नव्हतं.
तो विद्युतवेगाने अधीरराजाकडे धावला.
अधिरराजाचं मृत कलेवर जमिनीवर पडलेलं होतं.
"अमित्रा..." म्हणून त्याने हंबरडा फोडला!
...आणि पुढच्याच क्षणी त्याने पोटात सुरा खूपसुन घेतला.
त्या रात्री राक्षसमंदिरात तीन कलेवरे पडली होती.
एक माणसाचं...
...व दोन राक्षसांची!!!!

||समाप्त||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त !!! _/\_
आज पुर्ण वाचली.. एकदम कडक!!!

वेगवान कथानक !

तरी जर वाचकांना ही कथा समजली नाही, तर तिचा उपसंहार लिहीन.
>>>>> आमच्यासारख्यांसाठी लिहाल काय ?

मस्त! आवडली!
केवळ मोहामुळे माणसाचाही कसा राक्षस होऊ शकतो - हा आस्पेक्ट फारच आवडला!

अधीरराज चे आजोबा वगैरे काही नव्हते.. तो स्वतःच आला होता आणि मल्लापा च्या वडिलांबरोबर आणि दरवाज्यापर्यंत येऊन मल्लप्प चे वडील भसम झाला होते.. त्यामुळे मल्लापा ला तो एक स्टेप पुढे घेऊन गेला मात्र राक्षसमार्ग कि देवतमार्ग हे त्यालाही माहित नव्हते.. बरोबर??? मल्लप्पा म्हणजे बळीचा बकरा होता... like a tester??

@नानबा - धन्यवाद
@आदीश्री - धन्यवाद
@योगी - धन्यवाद.

उपसंहाराचा पहिला भाग टाकला आहे.