कारल्याची भाजी - थोड्या वेगळ्या पद्धतीने

Submitted by VB on 4 April, 2020 - 06:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कारले - अर्धा किलो
बटाटा - २ मध्यम आकाराचे
ओले खोबरे - मोठ्या नारळाचे किसून
कांदे - ३ किंवा ४
हिरव्या मिरच्या - ३ किंवा ४
कोथिंबीर
लाल तिखट - चवीनुसार
वाटण मसाला - एक मोठा चमचा
तेल - फोडणी करता
मीठ - चवीनुसार
हळद - छोटा चमचा

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम कारली अन बटाटे नीट धुवून चिरून घ्यायचे. नारळ किसून किंवा खवुन घ्यायचा. कांदे, मिरच्या अन कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची.
आता कढई गरम झाल्यावर गॅस ची आच कमी करून कढईत सढळ हाताने तेल घालावे. तेल थोडे तापले की त्यात थोडे जिरे, ओवा, बडीशोप अन हिंग घालायचे. त्यावर ते न हलवता चिरलेला कांदा अन मिरच्या घालायच्या. त्यावरच न हलवता बारीक चिरलेल्या बटाट्यांचा थर करायचा अन त्यावर चिरलेल्या कारल्याचा थर करायचा. मग वाटण मसाला घालून त्यावर थोडा लाल तिखट मसाला , हळद अन मीठ घालायचे. आता त्यावर किसलेल्या ओल्या खोबऱ्याचा थर द्यायचा. थोडी कोथिंबीर घालून नीट झाकून वाफ काढावी.

पहिली वाफ किमान पाच ते सात मिनिटे द्यावी. मग झाकण उघडून नीट हलवुन एकजीव करून परत एक वाफ काढावी. जर नीट शिजले नसेल तर अजून एक वाफ काढावी.

झाले आता लगेचच गरम गरम ताटात वाढून तांदळाच्या भाकरीसोबत खावे.

Screenshot_2020-04-02-21-40-32-896_com.miui_.gallery_0.png

वाढणी/प्रमाण: 
५ ते ६ जणांसाठी
अधिक टिपा: 

* यात हवे असेल तर टोमॅटो पण घालू शकता.
* ही भाजी निव्वळ अप्रतिम लागते चवीला अन कारली बिलकुल कडू लागत नाही.
* तेल अन तिखट घालताना कंजूशी करायची नाही
* पूर्ण वेळ गॅस कमीच ठेवायचा नाहीतर भाजी खालून लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. लेयरिंग करून करायची आयडिया बेस्ट.। माहीतीचा स्त्रोत वाचून लगेच कळलं की अशा अनुभवी शेफकडूनच हे बारकावे कळतात.. Happy
ओवा बडीशेप फोडणीत खूप आवडतात.. बटाटा, खोबरं.. सगळं आवडीच सांगितले आहे तुम्ही.. करून बघेन आता..

मस्त फोटो , वेगळी रेसिपी. कार्ल्याचे पदार्थ घरी सर्वांना आवडतात आणि घरात सर्व सामान आहे . या वीकेंडला करणार.

वेगळीच आहे पाकृ. कारली नक्की कडू लागत नाहीत का अशी केल्यावर? कारण मला कारल्याची कडू भाजी अजिबात आवडत नाही. उगाच रिस्क नको Happy

सर्वांचे आभार

@वावे , अहो आम्ही कारल्याचा रस आवडीने पिणार्यातले आहोत.
पण , बाकीच्या जिन्नसामुळे , कारले इतके कडू नाही लागत. उलट खमंग खरपूस भाजल्याचा गंध येतो त्यामुळे जास्त रुचकर लागतात.

वाटण मसाला म्हणजे काय काय घालून वाटायचा?>>> नेहमीचेच मसाले म्हणजे, जिरे, धणे, तीळ, खसखस, लसूण, आले, कांदा, ओले खोबरे, थोडे सुके खोबरे, कोथिंबीर, काळी मिरी, लवंग, मोठी वेलची, दालचिनी, चक्रफुल, तेजपत्ता, बडीशोप, ओवा, कडीपत्ता.

हिंग, बडीशोप , ओवा अन कडीपत्ता घातला की ऍसिडिटी होत नाही. म्हणून हे आमच्या रोजच्या वाटनात असतेच

नाही, हलके गरम करायचे, ओला मसाला जसे कांदा लसूण आले दोन्ही खोबरे थोड्या तेलावर परतून घ्यायचे

आम्ही आठवड्याचा मसाला एकदाच करून फ्रीजमध्ये ठेवतो

आम्ही कारल्याचा रस आवडीने पिणार्यातले आहोत.>> या वाक्यामुळे मी
कारले इतके कडू नाही लागत या वाक्याचा अर्थ माझ्या दृष्टीने सेफर साईडला राहून घेणार आहे Wink म्हणजे अगदी थोडी, एखाद्या कारल्याची भाजी कधीतरी करून बघणार या पद्धतीने. कारलं आवडत नसलं तरी तो भाजीचा फोटो फारच खमंग खरपूस आहे.

काल संध्याकाळी केली ही भाजी. वाटण मसाला तयार नव्हता आणि करण्याइतका वेळ /उत्साह दोन्ही नव्हते. मग कांदा , खोबरं थोडं जास्त घातले. आणि मालवणी मसाला + गरम मसाला असे मिळून घातले. मस्त झालेली भाजी. हाताशी वेळ जास्त असेल तेंव्हा वाटण मसाला पण घालून करणार एकदा.

ओवा आणि बडीशेपेचा स्वाद मस्त लागला.

याच्यात कारल्याऐवजी दुसरं काय घालता येईल त्याचा विचार करतेय Wink कारली माझ्या घरात फक्त एकच माणूस आवडीने खातं शिवाय आता त्यासाठी लांबच्या गावात जायची इच्छा पण नाही.

काल फोनवर आईला ही रेसिपी सांगितली कारण तिच्याकडे कारली होती. ती करेल असं वाटतं.
फोटोतली भाकरी आत्ता उचलून पोटात घालावीशी वाटते. कधीतरी स्टेप बाय स्टेप भाकरीची रेसिपीही द्या. अर्थात आम्ही पोळी,भाकरी या वर्गात बिगरी नापास असल्याने तरीही जमेल असं नाही Happy

धन्यवाद सर्वांचे☺️

urmilas आणि मेधा, तुम्ही ही भाजी केली अन ती तुम्हाला आवडली हे वाचून बरे वाटले☺️

<<< याच्यात कारल्याऐवजी दुसरं काय घालता येईल त्याचा विचार करतेय >>> वेका, यात वाटण मसाला वगळून अश्या पद्धतीने मेथीची भाजी खूप छान लागते, करून बघा, नक्की आवडेल.

<<< कधीतरी स्टेप बाय स्टेप भाकरीची रेसिपीही द्या>>> नक्की लिहीन कधीतरी,

कारले हि माझी आवडती भाजी. फोटोमधे भाकरी आणि भाजी खुप छान दिसत आहेत. मी आजच रस्सा भाजी केली कारल्याची. पण मला नुसती तेलावर परतलेली थोडी कुरकुरीत झालेली भजी आवडते.