एक विठ्ठल केवळ

Submitted by पुरंदरे शशांक on 29 March, 2020 - 20:18

श्वासाश्वासावर चाले
पांडुरंग जपमाळ
रोमारोमातूनि स्फुरे
एक विठ्ठल केवळ

गाथा शब्दाशब्दातून
राम कृष्ण हरी सूर
वीणेवर उमटतो
पांडुरंगाचा झंकार

कधी आर्त कधी जाब
कधी गाळी कधी लीन
शब्द होते आवरण
भाव वाही ओथंबून

थांग लागेना भक्तीचा
इंद्रायणी खुळावली
ह्रदयात सांभाळोनी
गाथा शिरी धरीयेली

काही वर्णना होईना
शब्दी बांधू कसा भाव
ठेवी पायापाशी स्वामी
अंतर्यामी हीच हाव

.............................

गाळी ...... शिवी गाळी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थांग लागेना भक्तीचा
इंद्रायणी खुळावली
ह्रदयात सांभाळोनी
गाथा शिरी धरीयेली>>>>> काय सुंदर लिहिलंय काका!!

विठुराया

कर कटीवरी पाय विटेवरी
युगा युगांची ही वहिवाट
हाती टाळ मृदंग वीणा
चंद्रभागे तटी पाहतो वाट

भरजरी वस्त्रे रेशमी शेला
मस्तकी चंदन टिळा
गळयात तुलसी माळा
वांछितो मुखी तुलसीदळा

काजळाहुन काळी काया
अंतरी अपार माया
आतुर झालो मी आता
दर्शन दे विठुराया

राजेंद्र देवी

थांग लागेना भक्तीचा
इंद्रायणी खुळावली
ह्रदयात सांभाळोनी
गाथा शिरी धरीयेली>>>>> अप्रतिम.
पूर्ण रचनाच उत्कट Happy .

वा सुरेख.

राजेंद्र देवी याचीही रचना आवडली. >>> मलाही.