कथा माझ्या दहा कोटींची!

Submitted by पराग र. लोणकर on 31 March, 2020 - 04:40

दहा वाजताच्या ऑफिसला जाण्यासाठी बरोबर साडेनऊ वाजता आवरून मी वाड्याच्या बाहेर पडणार इतक्यात माझ्या दारासमोर एक आलिशान गाडी थांबल्याचा आवाज आला. आमच्या जवळजवळ पडायला आलेल्या वाड्याला अर्थातच त्या गाडीचे नाविन्य नव्हते. दर आठवड्याला एकदा तरी ती गाडी वाड्याच्या समोर उभी राहून वाड्याला एक प्रकारे शोभाच आणीत असे. नेहमीचेच झाले असले तरी वाड्यातील माझ्यासारखीच लोअर middle-class माणसे प्रत्येक वेळी त्या गाडीकडे कौतुकाने पहात, एखाद्या दिवशी आपणही अशा गाडीतून फिरू अशी स्वप्ने पहात आपापल्या कामास बाहेर पडत असत.

तर अशी ही गाडी दारासमोर उभी राहिली व त्यातून माझा प्रिय मित्र रवी उतरला. त्याच्या येण्याचं मला किंवा आमच्या कुटुंबालाही नाविन्य वाटायचं कारण नव्हतं. नाविन्य इतकंच की शक्यतो माझ्या ऑफिसच्या वेळी न येणारा रव्या आज अगदी माझ्या ऑफिसला जायच्या वेळीच येऊन कडमडला होता.

दाराच्या अगदी जवळ आल्यावर मला आणखी एक नाविन्य सापडलं. रव्या घामाने अगदी डबडबला होता व त्याचा नेहमी प्रफुल्लित दिसणारा चेहरा काळा पडला होता.

आजपर्यंत मी रव्याला कधीच काळजीत पडलेल्या पाहिला नव्हता. खरंतर आई-बापा विना हा पोरका पोर. भाऊ-बहीण कोणी नाही; खरं तर जवळचा असा कोणीच नातेवाईक नाही. हं, मात्र आफ्रिकेत रव्याचा एक काका होता. खरं तर हा काका काळा की गोरा हे रव्यानंही पाहिलेलं नाही; पण तो काका म्हणजे रव्याच्या दृष्टीने सोन्याची खाण होता. आफ्रिकेत काकाचा मोठा व्यवसाय. स्वभावाने थोड्या विक्षिप्त असलेल्या काकानं लग्न केलं नाही की कोणा नातेवाईकांशी संबंध ठेवला नाही. पण का कोण जाणे, आपल्या या भावाच्या मुलाबद्दल म्हणजे रव्याबद्दल त्याला फार आपुलकी. विशेषत: रव्याच्या आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर या काकाने रव्याची जबाबदारी उचलली. नुसती जबाबदारीच नाही, तर आपल्या मागे कोणीच नसल्याने आपल्या साऱ्या प्रॉपर्टीचा वारस रव्यालाच बनवलं. तो नियमित रव्यासाठी भरपूर पैसे पाठवू लागला. त्याच पैशाच्या सहाय्याने रव्या लहानाचा मोठा झाला आणि भरपूर पैशाचा पुरवठा होत असल्यामुळे आलिशान आयुष्य जगू लागला. अशा पैशाच्या मुबलकतेमुळे दुःख हे रव्याच्या पदरी कधी दिसलेच नाही.

असा हा रवी थोड्या थोडक्या नव्हे, भरपूर काळजीत आहे असे त्याच्या चेहऱ्यावर दिसल्यावर मी आश्चर्यचकित झालो.

`काय रे हे?` मी त्याला विचारलं.

`सगळं सांगतो. मला जरा बसू दे. थोडं पाणी दे. आणि हो! आज ऑफिसला जाऊ नकोस.` रवी म्हणाला.

`अरे पण... ऑफिस...`

`प्लीज! माझ्यासाठी.`

मी त्याला पाणी आणून दिलं. त्यानं ते गटागटा पिऊन टाकलं.

`बोल आता.`

`फार मोठा प्रॉब्लेम झालाय.`

`प्रॉब्लेम आणि तुला?`

`तू ऐक रे... काका तिकडे मरायला टेकलाय. तिथल्या डॉक्टरांनी जास्तीत जास्त एक महिन्याची मुदत दिलीये.`

`ऐकून दुःख झालं रवी. पण खरं सांगू, ही तुझ्या दृष्टीने दुःखाची जितकी, तितकीच आनंदाची गोष्ट नाही का? त्याच्या साऱ्या इस्टेटीचा तू एकमेव वारस. इस्टेटही थोडीथोडकी नाही. शंभर एक कोटींची तरी असेलच.`

`प्रॉब्लेम तो नाही रे. काका `भारतात पाऊल टाकणार नाही,` असा त्याचा निश्चय मोडून मरण्यापूर्वी भारतात यायचं म्हणतोय.`

`बरं मग?`

`भारतात येऊन मी उभारलेलं मोठं हॉस्पिटल पाहायचंय, माझी भरपूर चालणारी डॉक्टरी पाहून मगच डोळे मिटायचे म्हणतोय.`

आता माझ्या लक्षात सगळी गोष्ट आली. काकानं रव्याला वारस केलं. त्याला पाहिजे तेवढा पैसा पाठवला. मात्र काकाची एकच अट होती. रव्यानं भरपूर अभ्यास करून डॉक्टर बनायचे. आपण स्वतः मात्र वैयक्तिक कारणास्तव भारतात कधीही पाऊल टाकणार नाही असा आपला निश्चय त्याने रव्याला अनेक पत्रात सांगितला होता. रव्या पहिल्यापासून हुशार मुलात न येणारा. डॉक्टरकीचा अभ्यास थोडाफार करण्याचा त्याने प्रामाणीक प्रयत्न केला होता, पण हे आपलं काम नाही हे त्याच्या लक्षात आलं. काकाच्या विचित्र स्वभावाच्या कहाण्या त्याने पूर्वी ऐकल्या होत्या. आपण डॉक्टर होत नाही हे त्याला कळलं तर ताबडतोब आपली वारस म्हणून केलेली निवड तो रद्द करेल यात रवीला कोणतीच शंका वाटत नव्हती. शेवटी अर्थातच आमच्यासारख्या काही मित्रांची मदत घेऊन त्यानं आपण डॉक्टर झाल्याचे काही खोटे पुरावे, छायाचित्रे इत्यादी काकाला पाठवून कळवले. तिकडे काका खुश व इकडे पुतण्या खुश अशी परिस्थिती कित्येक वर्ष चालली होती. अधून मधून आपले हॉस्पिटल कसे उत्तम चालले आहे, आपले नाव वैद्यकीय क्षेत्रात कसे वाढत आहेत इत्यादी कहाण्या काकापर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष- पुन्हा आमच्यासारख्यांची मदत घेऊन पोहोचतील याची खबरदारी मात्र तो घेत असे.

आता मात्र काका स्वतः यायचे म्हणतोय, हा रव्याच्या दृष्टीने खरंच मोठा प्रॉब्लेम होता.

`मग आता काय करायचं म्हणतोस?` मी रवीला विचारलं.

`मी काय म्हणणार? आता तूच ठरवायचंस. याप्रसंगी इतरांपेक्षा तूच मला मदत करु शकशील याची मला खात्री आहे. ठरव बाबा तूच काहीतरी आणि वाचव मला या संकटातून.` रव्या सरळ माझ्यावर जबाबदारी टाकून बाजूला झाला.

`प्रसंग बाका आहे. विचार करावा लागेल. केव्हा येणार आहेत काका?`

`या आठवड्याभरात येतील. डॉक्टरांनी त्यांना जगण्याचीच एक महिना मुदत दिली आहे. तेव्हा जेवढ्या लवकर येता येईल तेवढे ते बघणारच.`

`काय, झालंय काय त्यांना?`

`त्यांना काय झालंय ते तिथल्या डॉक्टरांनाही नीटसं कळलेलं नाही. मात्र त्यांचे एकेक अवयव काम करणे कमी करत आहेत. प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. आता परमेश्वरी चमत्कारच त्यांना वाचवू शकेल असं तिथले डॉक्टर म्हणतात.`

`रवी, मला असं वाटतंय की एक फार मोठी गेम खेळावी लागणार. पण खर्च मात्र...`

`खर्चाची तू चिंता करू नकोस. पाहिजे तेवढे माग. पण तुझा प्लान तरी काय आहे?`

`हे बघ, तुझा काका जास्तीत जास्त एक महिना जगेल असं डॉक्टरांनी सांगितलं ना, मग जास्तीत जास्त एक महिन्यासाठी आपल्याला तुझं हॉस्पिटल उभं करावं लागेल.`

`हे कसं शक्य आहे?`

`हे बघ करायचं झालं तर सगळं शक्य आहे. हं. असं करता येईल. आपली शाळा आठवते? केवढी मोठी इमारत! सध्या शाळांना सुट्ट्या लागल्यात. शाळेला भरपूर देणगी देण्याची तयारी ठेवली तर एक महिन्यासाठी शाळेचा काही भाग आपल्याला वापरण्यास ते मोठ्या आनंदाने देतील. एकदा तुझा काका शाळेच्या आवारातून त्याच्यासाठीच्या खोलीत गेला की तो बाहेर जाणार तो चार माणसांच्या खांद्यावर. तोपर्यंत त्याच्या खोलीच्या बाहेरून काही खोट्या नर्स व रोगी इत्यादींचा वावर दाखवायचा. काम झालं. तुला एक महिना डॉक्टर म्हणून वावरायला लागेल. आणि बाकी माणसांना आणणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं इत्यादी गोष्टींसाठी एखादा पूर्णवेळ माणूस एक महिन्यासाठी बघ.`

`तुझ्याशिवाय असा माणूस कोण मिळणार मला?`

`छे छे! काहीतरीच काय! हे बघ, एक महिना वगैरे मला रजा मिळणार नाही. हाकलून लावतील ऑफिसातून मला.`

`त्यांनी हाकलून लावण्याआधी तूच ऑफिसला सोडचिठ्ठी दिलीस तर...`

`अरे बाबा, मला बायका-पोरं आहेत. तुझ्यासारखा मला कोणी काकाही नाही. नोकरी सोडण्याची स्वप्नही पाहू शकत नाही मी.`

`हे बघ, माझ्या काकाची निदान शंभर कोटीची तरी प्रॉपर्टी आहे हे तुलाही माहिती आहे. माझ्यापुढे आलेलं संकट सुटलं तर ती संपूर्ण माझी होणार आहे. नाहीतर माझ्यावर अक्षरश: भीक मागायची पाळी येणार आहे. मी तुझ्या पुढे एक प्रपोजलच ठेवतो.`

`कसलं प्रपोजल?`

`या संकटातून तू मला सोडवलंस तर मला मिळणाऱ्या प्रॉपर्टीपैकी दहा टक्के प्रॉपर्टी मी तुला देऊन टाकेन.`

`अरे काय बोलतोस काय तू? हे बघ, अशी थट्टा करू नकोस.`

`ही थट्टा नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी डॉक्टर नाही हे काकांना कळलं तर मी भिकारीच होणार आहे. जर तू मला वाचवलेस तर तुला कोट्याधीश केल्याने माझ्या बापाचं काय जाणार आहे?`

रव्या थट्टा करीत नाही हे आताशा माझ्या लक्षात यायला लागलं होतं. इतक्या वर्षात दिलेले वाचन रव्या कधीही मोडत नाही हे मला माहीत होतं. रव्याच्या काकांची शंभर कोटींची तरी मालमत्ता असणार यात शंकाच नव्हती आणि जर मला त्यातले दहा टक्के म्हणजे दहा कोटी मिळणार असतील तर त्यासाठी थोडे कष्ट करायला काय हरकत आहे? दहा कोटी मिळाले तरी मी नुसता बसणार नाही. काहीतरी छोटासा व्यवसाय सुरु करेन. या सरकारी नोकरीत तेच तेच काम करून खरंच फार कंटाळा आला आहे. अनेकदा अगदी जीव नकोसा होतो. दहा कोटी मिळाले तर आलिशान फ्लॅट घेईन. एखादं दुकान घेईन. दारात गाडी येईल. खरोखरच कधी स्वप्नातही न केलेल्या गोष्टी मी करेन. आणखीन काय काय घेता येईल बरं...?

`अरे पक्या...`

रव्याने स्वप्नात गुंतलेल्या मला जागं केलं. मी भानावर आलो आणि म्हणालो, `ठीक आहे. सर्वकाही माझ्यावर सोपव.`

माझ्या केवळ या दोन वाक्यांनी रव्या निर्धास्त झाला. त्याला माहीत होतं, एखादी जबाबदारी मी अंगावर घेतली की ती पूर्ण करणारच. जबाबदारी अंगावर घेईपर्यंत मी जरा वेळ येतो. पण एकदा घेतली की मग मागे पहात नाही.

अक्षरश: रेकॉर्ड वेळेमध्ये मी सारी तयारी केली. मदतीला रव्याचा मुबलक पैसा असल्यामुळे कामं झटापट झाली. शाळेच्या मंडळाला भेटून मी एका दूरदर्शनच्या मालिकेसाठी शाळेचा काही भाग एका महिन्यासाठी वापरण्यासाठी हवा असल्याची विनंती केली. आम्ही माजी विद्यार्थी होतो. रव्याने यापूर्वीही शाळेला अनेक देणग्या दिल्या होत्या व आताही या महिनाभरासाठीही आकर्षक देणगी त्यांना ऑफर केली. आमची हॉस्पिटलची सोय झाली. नाटकांना, चित्रपटांना कलाकार पुरवणाऱ्या संस्थेकडून शंभरेक माणसे निवडली. काही रोगी म्हणून, काही डॉक्टर, नर्स म्हणून, तर काही रोग्यांचे नातेवाईक म्हणून. जास्तीत जास्त एक महिना काका जगणार असले, तरी कमीत कमी किती ते माहीत नव्हतं. त्यामुळे प्रत्येकास काम किती दिवस लागेल ते सांगता येत नसलं तरी संपूर्ण महिन्याची `नाईट` मिळेल असं सांगितल्यामुळे सर्वजण खुश होते. सर्वांना खुश ठेवण्यासच चांगलं काम त्यांच्याकडून होईल याची मला खात्री होती.

काकांनी काही अवघड प्रश्न विचारून अडचणीत टाकू नये म्हणून रव्याच्या मदतीला नुकताच डॉक्टरी पास झालेला आमचा एक मित्र प्रमोद असिस्टंट डॉक्टर म्हणून नेमला. त्याला सतत रव्याच्या बरोबर राहण्याची सूचना केली.

चौपट मजुरी देऊन दोन दिवसात हॉस्पिटलचे नाव व इतर नावे इत्यादीची पोस्टर्स, बोर्ड बनवून घेतले. काका एकदा आत गेल्यावर खरं तर ते बोर्ड लगेचच काढून टाकायचे होते पण दारातून आत काका येत असतानाच्या अगदी काही क्षणांसाठी ते आवश्यक होतं. काका स्ट्रेचरवर का होईना पण साऱ्या हॉस्पिटलभर फेरफटका मारण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींचीही सोय करायची होती. भरपूर खर्च करून ऑपरेशन थिएटर, रोगी तपासण्याची खोली, स्पेशल-जनरल ward इत्यादी गोष्टीही दिवस-रात्र काम करून दोन दिवसात उभ्या केल्या

मिळणाऱ्या दहा कोटींचे आकर्षण असले, तरी मी करीत असलेले काम शरीराला मानवणारे नव्हते. पाच एक वर्ष सरकारी नोकरीत असल्यामुळे जेवढं काम असायचं तेही बसल्या जागेवरच करायचं असल्यामुळे शारीरिक श्रमाला केव्हाच रामराम दिला गेलेला होता. अशा या शरीराला अचानक जवळ जवळ दिवसातले वीस तास काम देणे किती त्रासदायक ठरते हे हळूहळू मला समजू लागले होते. थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, नंतर काही दिवस पंचतारांकित हॉटेलच्या मऊ मऊ गादीवरच काढूया असा विचार करीत कसाबसा मी माझ्या शरीराची समजूत काढत होतो.

शेवटी तो दिवस उजाडला व काकांचं आमच्या शाळेत; सॉरी हॉस्पिटलमध्ये आगमन झालं. सर्व स्टाफला खिसे भरभरून दिलेले असल्यामुळे काम चोख होत होते. काकाला एअरपोर्टवरून आणण्यासाठी रवी आणि प्रमोद ॲम्बुलन्स घेऊन गेले होते.

शाळेच्या मुख्य दरवाजापाशी काही मंडळींबरोबर मी काकांच्या स्वागताला उभा होतो. काकांची परिस्थिती खरंच फार बिकट होती. बऱ्याच नळ्या त्यांच्या नाकातोंडातून वगैरे लावल्या होत्या. मात्र ते पूर्ण शुद्धीत होते व इकडे तिकडे बऱ्याच कुतूहलाने पहात होते.

मी व रवीने त्यांच्या स्ट्रेचरला हात लावून त्यांना त्यांच्या खास बनवलेल्या खोलीकडे न्यायला सुरुवात केली.

`रवी, माझे आता काहीच दिवस राहिलेत. मला कायम तुझ्या समोर राहुदे. माझी व्यवस्था तुझ्याच पेशंट तपासण्याच्या खोलीत कर. तुझे कौशल्य मला माझ्या डोळ्याने पाहू दे, समाधानाने मरू दे.`

काकांची ही वाक्ये आमच्यासमोर पुढे निर्माण होणाऱ्या संकटांची चाहूल होती. मात्र पर्याय नव्हता. काकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची व्यवस्था पेशंट तपासणीच्या खोलीत केली गेली.

काकांची सारी व्यवस्था करून रवी व प्रमोद `राऊंडला जाऊन येतो,` म्हणून बाहेर आले.

`आता आली का पंचायत? मी काय कोणाला तपासणार आणि काय औषध देणार?` रवी वैतागाने म्हणाला.

`हे बघ, वैतागू नकोस. एवढी काही काळजी करण्यासारखं नाही. आता आपल्याला प्रमोदची मदत होणार आहे. मी बाहेरून एकेकाला एकेक रोग घेऊन व्यवस्थित पढवून आत पाठवीन. हॉस्पिटलचा प्रमुख डॉक्टर असल्यामुळे तू प्रत्येक पेशंटला तपासण्याची गरज नाही. तपासणी प्रमोद करेल. औषधही सांगेल. तुझ्या काकाला औषधांची माहिती आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही; पण प्रमोदला नक्कीच आहे. त्यामुळे तो चुकणार नाही. औषध सांगून तो तुला `ठीक आहे का?` असे विचारेल. तू फक्त `करेक्ट, तेच औषध दे व चार दिवसांनी परत यायला सांग,` यासारखी वाक्यं बदलून बदलून सांग.`

`फर्स्ट क्लास आयडिया!` असे म्हणून रवी व प्रमोद आतमध्ये गेले. मी एकेका ॲक्टरला एक एक रोग सांगून आत गेल्यावर कसे वागायचे इत्यादी सूचना देऊन आत पाठवत होतो. प्रत्येकास योग्य काम केल्यास काही बोनस देण्याचीही घोषणा केली होती. त्यामुळे अनेकांचा अभिनय हा तर अमिताभ बच्चननाही मागे टाकेल इतका जिवंत होता.

असेच दोन तीन आठवडे गेले. दरम्यान मला काडीचीही विश्रांती नव्हती. काही ना काहीतरी काम निघतच होते. दोन-तीन वेळा काकांनी संपूर्ण हॉस्पिटलभर फिरण्याची इच्छा व्यक्त केली, ती पूर्ण करताना मला फारच खबरदारीने रहावे लागत होते. प्रत्येक वॉर्डांमध्ये पडून राहिलेले रोगीरुपी कलाकार नीट अभिनय करावेत, त्यांचे जवळचे नातेवाईक चिंतातुर दिसावेत, यासाठी मलाच माझ्या चेहऱ्यावर प्रत्येक एक्सप्रेशन आणून दाखवावे लागत होते. काकांच्या स्ट्रेचरमागे उभे राहून माझे हे कलाप्रदर्शन चाले. जसे चांगले कलाकार होते, तसेच काही वाईटही कलाकार होते. अशावेळी अशा कलाकारांकडून हवे ते एक्सप्रेशन काढण्यात माझी सर्व शिल्लक शक्ती जात होती.

या सर्व दिवसांमध्ये रव्याच्या काकांची तब्येत हळूहळू जास्तच खालावत चालली होती.

अशीच एक संध्याकाळ. मी व रवी काकांजवळ बसून काही काम करीत होतो. म्हणजे काम करायचे नाटक करीत होतो. अचानक काकांनी बोलायला सुरुवात केली.

`रवी... मला वाटत नाही की मी आता दोन तीन दिवसांपेक्षा जास्त जगेन. आयुष्यभर मी माझ्या नातेवाईकांचा तिरस्कारच केला. तुझे वडील, आई व इतर नातेवाईकांविषयी पूर्वग्रहदूषित असल्यामुळे मी कधीच त्यांना समजून घेतलं नाही. पर्यायाने सगळ्या भारतीयांचाच मी तिरस्कार करू लागलो. भारतात कधीही पाऊल टाकायचं नाही हा मी निश्चय केला. पण आज मला वाटतंय, मी भारतात आलो ते फार चांगलं झालं. तुझी प्रगती पाहून मला खूप आनंद झालाय. तुम्ही सर्वजण एकत्र एक टीम म्हणून हॉस्पिटलचा कारभार फारच चांगला चालवताय. रवी, मी तुला पैसे पाठवत होतो त्याचा तुला गैरवापर करता आला असता. पण तसा तू केला नाहीस. डॉक्टर झालास. मी पाठवत असलेल्या पैशानं एवढं मोठं हॉस्पिटल उभारलंस. हॉस्पिटलचा फक्त व्यवसाय म्हणून वापर न करता गरजूंना मोफत उपचार देतो आहेस. मला तुझा अभिमान आहे. माझा वारस म्हणून मी तुझी केलेली निवड योग्य होती.`

काकांचे डोळे भरून आले होते. मी रवीकडे पाहिलं. त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती. पैशासाठी आम्ही हा खेळ खेळत असलो तरी आम्ही कोणीच मनाने वाईट नव्हतो. आम्ही खरं तर कोणाचंच कसलंही नुकसान करत नव्हतो. रवी अतिशय भावनाशील झाला होता.

`काका... मला तुम्हाला काही सांगायचंय.`

भावनेच्या भरात रवी ह्या साऱ्या नाटकाचा खेळखंडोबा करणार यात शंकाच नव्हती. हा खेळ खलास झाला असता तर रवी तर भिकारी होणारच होता पण नोकरीवर पाणी सोडून दहा कोटींची स्वप्ने पाहणारा मीही साऱ्या कुटुंबासहित रस्त्यावर येणार होतो. आता हा क्षण सोडणं मला शक्यच नव्हतं. मी ताबडतोब रव्याला मागं ओढलं.

`हो रवी, तू जे सांगणार आहेस ते योग्यच आहे. एवढ्या रोग्यांना तू बरं केलंस, आता काकांना बरं करणंही तुझ्याच हातात आहे. ताबडतोब काकांवर तुझे उपचार चालू कर.` मी घाईघाईनं रव्याचं बोलणं थांबवून आपलं बोलणं मध्ये घुसडलं.

आतापर्यंत रविही सावध झाला होता. आपण वाहवत जाऊन एक मोठी चूक करत होतो हे त्याच्या लक्षात आलं.

`होय काका, आजपासून मी तुमच्यावर उपचार करायचे म्हणतोय. आम्हाला तुम्ही अजून बरीच वर्ष हवे आहात.` रवी म्हणाला.

`आज खरंच मला बरं वाटलं बेटा. मी तुझ्याबरोबर राहावं, अजून जगावं ही तुझी इच्छा माझं मन तृप्त करून गेली. पण मी आता फार दिवस काय; फार क्षण जगेन असं मला वाटत नाही. माझी वेळ आली असल्याचं माझ्या लक्षात यायला लागलं आहे. तरी मरण्यापूर्वी तुझ्या हातचं औषध केवळ तुझ्या समाधानासाठी प्यायला माझी काहीच हरकत नाही.`

नेमका प्रमोद काही अतिशय महत्वाच्या कामासाठी एका दिवसासाठी बाहेरगावी गेला होता. मग रव्यानं एक शक्तिवर्धक पावडर पाण्यात मिसळून काकांना औषध म्हणून दिलं. काही क्षणात काका शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अतिव समाधान दिसत होतं. मात्र कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हती. खेळ संपला होता. आमच्या दोघांच्याही लक्षात आलं.

बराच वेळ आम्ही दोघे काहीच बोललो नाही. दोघांच्याही मनात अपराधीपणाची भावना इतकी प्रचंड वाढलेली होती की कोणत्याही भावनेला वाट देणं शक्य नव्हतं. काही वेळाने मात्र रवीचा बांध फुटला. तो ओक्साबोक्शी रडू लागला. रवीच्या डोळ्यात यापूर्वी पाण्याचा एक थेंबही मी कधी पाहिला नव्हता. माझेही डोळे भरून आले. साधारणपणे एक महिन्यापूर्वी केवळ पत्रांच्या व येणाऱ्या पैशांच्या स्वरूपात नाते राहिलेल्या काकांच्या मरणाने रवी अक्षरश: हालला होता.

आपण जे काम करीत होतो ते पूर्ण झालं या विचाराने आत्तापर्यंत तग धरून बसलेलं माझं शरीर आता मला प्रचंड ओझं वाटू लागलं. आता एक क्षणही तिथे बसून राहणं मला शक्य नव्हतं.

`रवी, आता मला घरी गेलंच पाहिजे. जवळपास एक महिना झोप नाही. आता माझ्यात कसलीच ताकद नाही. तूही आता सरळ घरी जा. रात्र पूर्ण होऊ दे. सकाळी सात आठपर्यंत प्रमोद येईल. त्याच्या व इतर पाच-सहा जणांच्या मदतीने पुढचे सोपस्कार पूर्ण कर. पण प्लिज आता मला जाऊ दे.` मी रवीला म्हणालो.

`ठीक आहे.` रवी म्हणाला. `तू खरंच दिवस-रात्र कष्ट केले आहेस. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने धावपळ करावी लागली आहे तुला. तू जा. दोन-तीन दिवस पूर्ण आराम कर. मग मी तुला येऊन भेटेन.`

मी काकांच्या पायाला हात लावण्यासाठी हात पुढे केला, पण लगेच मागे घेतला. काकांना आपण फसवल्याची भावना मनात घर करून बसली होती. मी तसाच घरी परतलो.

रात्रभर तशी झोप लागलीच नाही. सकाळी सकाळी जरा डोळा लागला तेवढ्यात कोणीतरी जोरात दार ठोठावत असल्याचा आवाज आल्याने मला जाग आली. बायकामुलांना महिनाभर गावी पाठवल्यामुळे मी घरी एकटाच होतो. मी दार उघडलं. दारात रवी उभा. घामानं थबथबलेला.

`काय रे?`

``क... क... का... का...`

`काय रे, काय झालं?`

`तू गेल्यावर मीही खोलीला कुलुप लावून घरी गेलो. सकाळी प्रमोदला घेऊन शाळेत गेलो. आपल्या खोलीत गेलो तर काका हलत होते. प्रमोदनं त्यांना तपासलं तर त्यांच्यात कमालीची इम्प्रोवमेंट होती. प्रमोदच्या म्हणण्यानुसार सध्या तरी ते लगेचच जातील असं सांगता येत नाही. आपल्याला अजून हे नाटक काही दिवस तरी चालू ठेवायला लागणार आहे. शिवाय पंधरा वीस दिवसात शाळाही चालू होणार आहे. तेव्हा आता दुसरी जागाही पाहायला हवीय. तेव्हा तू...`

रवी पुढे काय म्हणाला मला आठवत नाही. मला आठवतंय ते त्यानंतर आठवडाभरानी मी शुद्धीवर आल्यानंतरचं. मी आमच्या शाळेच्या; सॉरी हॉस्पिटलच्या एका बेडवर झोपलोय. बाजूला माझी पत्नी चिंतातुर नजरेनं उभी आहे आणि...

बाजूच्या स्टुलावर बसलेले रवीचे काका माझ्या प्रकृतीबद्दल तिला चौकशी करीत आहेत.

***
पूर्वप्रसिद्धी:- मधुश्री दिवाळी अंक-२००१.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मुन्नाभाईच्या संकल्पनेशी व काही प्रसंगांशी असलेल्या किंचितश्या साधर्म्याच्या योगायोगाची मला तेव्हाही गंमत वाटली होती.
(मुन्नाभाई आला २००३च्या अखेरीस. माझी कथा २००१च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्यापूर्वी केव्हातरी मनातून कागदावर उतरली.)