मन वढाय वढाय (भाग २५)

Submitted by nimita on 14 March, 2020 - 23:03

संध्याकाळी स्नेहा नेहेमीप्रमाणे ठरल्या वेळेला आपला स्टुडिओ बंद करून खाली आली. एका पंचतारांकित हॉटेलची खूप मोठी ऑर्डर मिळाली होती तिला. आणि बडोद्याला जाण्यापूर्वी ती ऑर्डर पूर्ण करायची होती. अजून बरंच काम बाकी होतं. पण तरीही ती नेहेमीच्याच वेळेला काम थांबवून खाली आली होती. रजत ऑफिसच्या कामात बिझी झाल्यापासून त्याचे आई बाबा पण त्याच्या सहवासाला पारखे झालेत हे तिला जाणवत होतं. आणि म्हणूनच रजतची कसर भरून निघावी यासाठी ती जितका शक्य होईल तितका प्रयत्न करत होती. तिच्या सासू सासऱ्यां बरोबर जास्त वेळ घालवत होती. त्यांच्याशी गप्पा मारणं, आपल्या कामाबद्दल त्यांना सांगून त्यावर त्यांचं मत घेणं... ज्या वेळी जसं सुचेल तसं करत होती.आज वंदना दुपारी कामानिमित्त बाहेर जाणार होती. त्यामुळे रजतच्या बाबांसाठी संध्याकाळचा चहा करायला म्हणून स्नेहा स्वैपाकघराच्या दिशेनी निघाली तेवढ्यात वंदनाच चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली."अगं मावशी, तू आलीस पण इतक्यात ? आज तुझी लेडीज क्लब ची मीटिंग होती ना ?" वंदनाच्या हातातून ट्रे घेत स्नेहानी विचारलं. "हो अगं, पण आज नाही गेले मी मीटिंगला. म्हटलं जरा माझ्या सुनेबरोबर थोडा वेळ घालवावा... ते quality time का काय म्हणतात ना - ते! अनायासे मगाशीच तुझे काका पण बाहेर गेलेत मित्रांबरोबर आणि रात्री बाहेर जेवूनच येणार आहेत परत. त्यामुळे निवांतपणे गप्पा मारता येतील आपल्याला." वंदना बाहेरच्या खोलीत सोफ्यावर विसावत म्हणाली. स्नेहा पण तिच्या शेजारी जाऊन बसली. थोडा वेळ दोघींपैकी कोणीच काही बोललं नाही. वंदना शब्दांची जुळवाजुळव करत होती ; तिच्या मनात चालू असलेली वैचारिक चलबिचल तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती स्नेहाला. तिनी विचारलं," एवढा कसला विचार करतीयेस मावशी?"

स्नेहाच्या प्रश्नानी भानावर येत वंदना म्हणाली," स्नेहा, गेल्या काही दिवसांपासून मी बघतीये... रजत घरात पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये. हळूहळू तो त्याच्या कामात गुंतत चाललाय. आणि त्याची ही उणीव भरून काढण्यासाठी तुझी धडपड चालू आहे. त्याच्या बरोबर जास्तीतजास्त वेळ मिळावा म्हणून तू तुझं स्वतःचं रुटीन बदललं आहेस. पण तरीही तुला त्याचा दुरावा जाणवतोय. हे सगळं दिसतंय गं बाळा मला... पण मी काहीच नाही करू शकत याबाबतीत! आणि म्हणूनच मला काळजी वाटतीये."

वंदनाला असं भावुक होताना बघून स्नेहा म्हणाली," अगं मावशी, हे सगळं तात्पुरतं आहे. एकदा का या नव्या पोस्टमधे रजतचा जम बसला ना की मग सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल.. तू नको काळजी करू रजतची..."

स्नेहाला मधेच थांबवत वंदना म्हणाली," पण मी रजतची काळजी करतच नाहीये मुळी ! त्याची काळजी घ्यायला तू समर्थ आहेस हे आलंय माझ्या लक्षात.... मला काळजी वाटतीये ती तुझी !"

स्नेहानी चमकून वंदनाकडे बघितलं. पण ती आपल्याच नादात बोलत होती -" आणि फक्त मलाच नाही तर तुझ्या काकांना सुद्धा असंच वाटतंय. काल तसं त्यांनी बोलूनही दाखवलं मला."

'आपल्या सासऱ्यांना आपली काळजी वाटतीये'- या नुसत्या विचारानीच स्नेहाला खूप समाधान वाटत होतं.

रजतच्या वडिलांची आणि तिची ओळख काही नवी नव्हती. त्यांच्या डोळ्यांसमोर ती लहानाची मोठी झाली होती. लहान असताना त्यांच्याकडून गोष्टी ऐकायला खूप आवडायचं स्नेहाला....भुताच्या, परिराणीच्या, राजकन्येच्या .... कित्ती कित्ती गोष्टी सांगायचे ते तिला- आणि तेदेखील अगदी न कंटाळता ! ती दहावी बारावीत असताना खूप आपुलकीनी चौकशी करायचे तिच्या अभ्यासाची, तिच्या पुढील शिक्षणाबद्दलच्या प्लॅन्सची.

वंदना तर नेहेमी म्हणायची-' आपली मुलीची हौस भागवून घेतायत!'

नीलाला सुरुवातीला उगीच भीती वाटत होती की- रजत आणि स्नेहाच्या लग्नानंतर स्नेहाशी त्यांचं वागणं बदलणार तर नाही ना ? पण नेमकं उलट झालं होतं. आता ते स्नेहाची जास्तच काळजी घेत होते. एकदा नीलानी त्यांना तसं बोलूनही दाखवलं होतं; तेव्हा स्नेहाच्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले होते," मी वेगळं काहीच करत नाहीये. आणि खरं सांगायचं तर हे मी स्नेहा किंवा रजत साठी करतच नाहीये मुळी... मला जरी मुलगी नसली तरी एका मुलीच्या बापाचं मन समजू शकतो मी.. माझ्या या अशा वागण्यामुळे एक बाप रात्री शांतपणे झोपू शकतोय...बस्, और क्या चाहिये?"

त्यांच्या या बोलण्यामुळे, अशा विचारांमुळे स्नेहाच्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला होता.

स्नेहाचं मन जरी मानायला तयार नसलं तरी जेव्हा जेव्हा रजतच्या वडिलांकडून ती स्वतःचं कौतुक ऐकायची तेव्हा तिचा इगो कुठेतरी सुखावला जायचा.इतके दिवस झाले होते तरी अजूनही सलीलच्या वडिलांनी दिलेला नकार ती पचवू शकली नव्हती. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी तो सल तिच्या मनात अजूनही खुपत होता. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तिचे सासरे तिचं कौतुक करायचे तेव्हा प्रत्येक वेळी सलीलच्या वडिलांना खोटं ठरवल्याचं एक अनामिक समाधान मिळायचं तिला !

पण त्याच वेळी -'आपण रजतच्या आणि सलीलच्या वडिलांची तुलना करतोय...आणि हे असं करणं चुकीचं आहे'- याचीही जाणीव होत होती तिला. 'असा विचार करून मी रजतच्या वडिलांचा अपमान तर नाही करत ना?' ही शंकाही वारंवार डोकं वर काढायची. 'काय चूक; काय बरोबर'.... खूप गोंधळून जायची ती कधीकधी!

अशा वेळी तिला प्रश्न पडायचा - 'लग्नाला एक वर्ष होऊन गेलं तरी अजूनही आपल्या मनात सलील आणि त्याच्या घरच्यांबद्दल विचार का बरं येतायत ? म्हणजे मी अजूनही त्याला पूर्णपणे विसरले नाहीये का ?' पण तिला एका गोष्टीबद्दल मात्र खात्री होती- तिच्या मनात सलीलचे विचार जरी येत असले; तरी आता सलील करता मात्र तिच्या मनात अजिबात जागा नव्हती. ती जागा आता फक्त आणि फक्त रजतचीच होती. अशा वेळी स्नेहाला आपल्या आजीचं बोलणं आठवायचं ...आजी म्हणाली होती,"जेव्हा रजत बरोबर च्या नव्या सुखद , अविस्मरणीय अशा आठवणी तुझ्या मनात साठत जातील ना तेव्हा आपोआप या जुन्या आठवणी मनाच्या तळाशी खोल जाऊन पडतील...राहू दे त्यांना तिथेच. In fact , एका दृष्टीनी ते योग्यच ठरेल. कारण सलीलच्या त्या आठवणीच तुला वेळोवेळी रजतच्या प्रेमाची महती पटवून देतील."

स्नेहाची अवस्था 'कळतंय पण वळत नाही' अशी झाली होती. आणि आत्ता वंदनामावशीचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा ती तिच्या विचारांच्या भोवऱ्यात अडकली होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users