जब I met मी :-4

Submitted by Cuty on 14 March, 2020 - 08:05

रविवार सुट्टीचा दिवस! हा एकच दिवस मिळायचा जरा आराम करायला. निदान दुपारी जरा वेळ निवांत लवंडता यायचं बेडवर. मी अशीच आतल्या खोलीत पडले होते. जरा डोळा लागतो तोच भर दुपारी कुणाचातरी कोंबडा आरवला. झालं झोपेचं खोबरं ! डोळे चोळते तोच बाहेर अंगणात समोरच्या काकूंचा आवाज आला आईशी बोलताना, ' मग शेवट काय ठरलं, जमतंय का?'
' पोरगीच नालायक!! स्वतःला काय अप्सरा समजते कुणास ठाऊक? कितीही चांगला मुलगा असला तरी, अस्सा नको न तस्सा नको! एवढा शिकलेला पाहिजे न तेवढाच पगार पाहिजे अन शहरातलाच पाहिजे. चांगली चांगली पोरं हातची घालवून मिळूदे शेवट गाळ! आम्हीतरी काय करणार मग. आम्हाला काय साधं टेन्शन आहे का या पोरीचं. सांगा बरं? '
मी मुळापासून हादरले !!
आई आपल्याबद्दल बोलतेय का हे? आणि काय बोलतेय हे? आजपर्यंत आपल्याला एकदेखील स्थळ आलं नाही लग्नासाठी. मग आपण नकार द्यायचा तर प्रश्नच नाही! नाही म्हणायला परवा आत्या विचारत होती, 'तुझ्या अपेक्षा तरी काय आहेत ते सांग.' तेव्हा मी इतकंच बोलले, 'निदान माझ्याइतका शिकलेला हवा. आणि नोकरी करणारा. पगारही बर्यापैकी असला तर माझी अजून फार काही अपेक्षा नाही.' बस्स!!
आणि आई हे असं का बोलली? भलं मोठं प्रश्नचिन्ह मी मनातच ठेवलं. आणि झोपेचं सोंग घेऊन पडून राहिले.
दुसर्या दिवशी नेहमीची माझी शाळेची नोकरी वगैरे रूटीन सुरूच ठेवले. पण लक्ष लागत नव्हते कशात. काहीतरी गडबड नक्की आहे, हे मनाने हेरले होते.
दुपारची सुट्टी झाली आणि मी लॅबमध्ये एकटीच असताना एक सिनिअर शिक्षक मला भेटायला आले. मला म्हणाले, 'अगं मी जो मुलगा तुझ्यासाठी तुझ्या वडिलांना सुचवला होता, तो खरंच खूप चांगला आहे. तुझ्यापेक्षा शिकलेला, बराच पगार आहे. दिसायलाही तुला शोभेल असाच. शिवाय माझ्या पाहण्यातला आहे. त्याच्या घरचे लोकही चांगले आहेत. तू न पाहताच त्याला नकार का बरं दिलास? अजून विचार कर. एकदा त्याला आणि त्याच्या घरच्यांना भेट. मग हवा तो निर्णय घे. बरं आता चलतो मी. ऊद्या तुझ्या बाबांशी परत बोलतो. '
मी निशब्द!
मला एकावर एक हादरे बसत होते. मी स्वतःला सावरले. अन काय होतेय हे पहायचे ठरवले. एक एक करत पंधरा दिवस गेले. पुढे काहीच नाही. घरात माझ्या लग्नाचा विषयच नव्हता. कुणीही मला काहीही विचारले नाही.
दिवस जात होते. घरात मी माझ्या पगारातून बर्याच ' गरजेच्या' वस्तू घेत होते. चांगला टिव्ही, सर्वांना चांगले मोबाईल, भाऊ ईंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता त्यामुळे त्याला चांगला कंप्यूटर, शिवाय त्याचा शिक्षणाचा खर्च मीच करत होते. धाकटा भाऊही बारावीला होता. त्यालाही पुढे ईंजिनिअरिंगच करायचे होते.
अधूनमधून ओळखीचे लोक माझ्या लग्नाची चौकशी करायचे. बाबा वरवर हसत उडवून लावायचे.' काय करायचं? 'खूप' शिकलेली, 'खूप' पगारवाली, शहरातली मुलं आम्हीतरी कुठून आणायची.?' असे म्हणत समोरच्याला कळेल असे माझ्याकडे तिरके पाहत. जसे काय मीच खूप अपेक्षा सांगितल्या आहेत. आता माझ्याही लक्षात यायला लागला होता हा कावा. पण मी तरी काय करू शकत होते.
एक एक करत चार वर्षे गेली. माझे वय सत्तावीस पुर्ण झाले. दरम्यान भाऊ ईंजिनीअर झाला होता पण त्याला पगार जास्त नव्हता. धाकटा ईंजिनिअरींगच्या तिसर्या वर्षाला होता. अलिकडे बरीच ओळखीची मंडळी माझ्या लग्नाची चौकशी करायची. मी हसून विषय टाळायचे. शाळेत येताजाता काही जण चक्क एखादे स्थळ मलाच सुचवायचे. आणि 'चागले स्थळ आहे,बघ विचार करून. तुझ्या बाबांशी बोलतो.' म्हणायचे. पुढे त्याचे काहीच व्हायचे नाही. अठ्ठावीसावे लागले तरी घरात माझ्या लग्नाचा विषय नव्हता. माझ्या लक्षात आले होते, दोन्ही भाऊ चांगला पगार घेऊन सेटल होईपर्यंत आईबाबा माझे लग्नच करणार नव्हते. पण तोपर्यंत वय वाढणार आणि याचाच बाऊ करून मग मिळेल त्या मुलाशी आपले लग्न लावून खर्च वाचवणार. कारण गेली चार वर्षे आपल्या फार काही अपेक्षा नसताना आईबाबा चारचौघात धडधडीत खोटे बोलतायत, तेही आपल्यासमोरच. हे लोक अजून वेगळे काय करणार? पण माझे हात घरातल्यांनीच बांधल्यासारखे झाले होते. खरं तर माझे राहणीमानही खूप साधेच होते. तसं पाहता उणीव काढण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळे लोकांनाही वाटू लागले की हीच फार अपेक्षा बाळगत असेल, म्हणून अजून कोठे जमलं नाही. आईबाबाही या विचारालाच खतपाणी देत होते. पण मी शांत रहायचं ठरवलं होतं. लोक कधीकधी 'बाबांच्या सांगण्यावरून' मला घरी येऊन समजावायचेही. बाबा समोरच बसून ऐकायचे. मग मीही काहीच बोलायचे नाही. जर काही बोलले तर उलटा कांगावा होणार हे माहीत होते. तोंड दाबून बुक्क्यांचा मारच सुरू होता.
एक दिवस अचानक मी दुपारच्या सुट्टीत घरी असताना माझा चुलतभाऊ आला. माझ्या चुलत्यांनी माझ्या चुलतबहीणीबरोबर माझाही बायोडेटा जवळच्या मॅरेजब्युरोमध्ये कधीतरी दिला होता. त्यावर त्यांनी स्वतःचाच अॅड्रेस आणि नंबर दिला होता. त्यावर आम्हा दोघींसाठी स्थळे आली होती. चुलतभावाने मुलाच्या माहितीचा कागद माझ्याच हातात दिला. मुलगा खरंच चांगला होता. संध्याकाळी माझे चुलते,
इतर नातेवाईक दोन्ही स्थळांबाबत बोलण्यासाठी अचानक आमच्याच घरी आले. थोड्यावेळाने कुणीतरी मला बैठकीच्या खोलीत बोलावले. ते मला स्थळाबद्दलच विचारणार याचा अंदाज मला आला. मी बाहेर जाते तोच वडिल लगेच बोलले, 'तिचा काय विचार आहे, तिच्याशी बोलून नंतर सांगतो. हा:हा: या काय आजकालच्या मुली. यांच्या मनात काय चाललेलं असतं, आपल्याला लगेच कळंत नाही.' बाबा माझ्याकडे रोखून बघत होते.
मी लगेच म्हणाले,' बाबा मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी कधीच लग्न करणार नाही. पण काका स्थळाबाबत विचारत आहेत तर सांगते, माझी काहीच हरकत नाही.मला स्थळ पसंत आहे.'
सगळेजण बाबांच्या तोंडाकडे पाहू लागले.बाबांच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलू लागले. आधी त्यांचा चेहरा रागाने लाल झाला, तर सगळे पाहतायत म्हटल्यावर दुसर्याच क्षणी काळाठिक्कर पडला!
" हा:हा: तुला पसंत आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. " , बाबा कसनुसं म्हणाले.
मी तितक्याच शांतपणे सर्वांना चहा आणण्यासाठी आत गेले. माझा प्रश्न मी मिटवला होता!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy छान मालिका. ही नायिका मला आवडते. घरच्यांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, पण सर्व नात्यांना बघण्यात एक ऑब्जेक्टीव्हीटी आहे. नातेसंबंधात असे खोटेपणाचे अनुभव आले की चीड येते, निराशा येते. त्यावर मात करून ती प्रेमाने मोजक्या शब्दात मत देते, सलोखा टिकवते.

लवकर पण मिटवता आला असता प्रश्न! कथा नायिका फार जुन्या जमान्यातील असली पाहिजे. हल्ली ची नायिका अगोदर शरिराच्या गरजेकडे लक्ष देईल, भले लग्न नाही करणार.

कमावत्या मुलीचे लग्न झाले तर *आपले* कसे होणार असा विचार करणारे आईबाप श्री पु ल देशपांडे यांनी लिहिले आहेत तसेच श्रीमती विभावरी शिरूरकर यांनी 1930-35 मध्ये लिहिलेली एक कथा आठवली " बाबांचा संसार माझा कसा होणार"

आपल्या वासनेतून निर्माण झालेले प्रश्न आपल्याच अपत्याच्या गळ्यात बांधणारे असे हरामखोर बाप अजूनही दिसतात.

आपले लेख फार छान आणि वास्तववादी आहेत.
पु ले शु

धन्यवाद सुबोधजी, एस, जाई.
पुर्वीपेक्षा आजच्या काळात मुली मोठ्या प्रमाणात शिकत आहेत, नोकरी करत आहेत पर्यायाने पैसाही भरपूर कमावत आहेत. त्यामुळे आजच्या काळातच हे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अर्थात मुली कितीही शिकल्या , कमावत्या झाल्या तरी त्यांना आपली जबाबदारी मानणारे पालक जास्त आहेत ही समाधानाची बाब!

अशी बरीच उदा. प्रत्यक्ष पाहिलीत मी. >> हो असतील बरीच. पण किती वेदनादायक ना! त्या मुलांना कसे वाटत असेल / काय वाटत असेल अशा आईबापा विषयी! Sad

अशांना आईबाप म्हणूच नये खरंतर. बाहेरचा शत्रू परवडला, तो जे काही नुकसान करतो ते रागाने.पण असले आईबाप अतिशय शांतपणे पण तितक्याच निर्दयपणे आणि क्रूरपणे मुलांच्या आयुष्याचे खेळणे करू पाहतात.त्यामुळे जरी मुले यावर मात करून आयुष्यात पुन्हा यशस्वीपणे उभी राहिली तरी मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याची जखम आयुष्यभर राहते. अशा मुलांना आईवडिल असूनही पोरक्यासारखेच वाटते.