मन वढाय वढाय (भाग २४)

Submitted by nimita on 11 March, 2020 - 22:04

गप्पा गोष्टी, चहा कॉफी वगैरे नंतर सगळ्यांची एकत्र जेवणं देखील झाली. स्नेहाच्या घरचे आता परत जायला निघाले. रजत म्हणाला," तुम्ही सगळ्यांनी काय ठरवलंय ते तरी सांगा. येणार आहात ना तुम्ही आमच्याबरोबर बडोद्याला !"

त्यावर काही क्षण विचार करून त्याचे बाबा म्हणाले," सांगतो लवकरच.. आम्हांला थोडा वेळ द्या. इतका मोठा निर्णय आहे; असा तडकाफडकी नाही घेता येणार ना ! सगळ्या दृष्टीनी विचार करून, discuss करून मग सर्वानुमते ठरवू या काय करायचं ते."

त्यानंतरचे काही दिवस गडबडीतच गेले. रजत ऑफिसमधे सगळी प्लॅंनिंग करण्यात बिझी होता. त्याचं ट्रेनिंग, त्यानंतर नवीन जागी फॅक्टरीचा सगळा सेट अप उभारायचा !! कंपनीच्या मॅनेजमेंट नी त्याच्यावर दाखवलेला विश्वास खोटा ठरू नये यासाठी तो दिवस रात्र एक करत होता. रोजच्या मीटिंग्ज आणि डेडलाईन्स मुळे त्याला घरी यायला बराच उशीर होत होता... आणि घरी आल्यानंतर सुद्धा सतत डोक्यात कामाचेच विचार चालू असायचे. जणू काही त्याला कामाची नशा चढली होती. साहजिकच त्याच्याही नकळत त्याचं घरच्यांकडे, स्नेहाकडे थोडं दुर्लक्ष होत होतं. ही वस्तुस्थिती स्नेहालाही दिसत होती; कळत होती. रजतचं हे वागणं जाणीवपूर्वक नाहीये - हेदेखील माहीत होतं तिला. पण तरीही रजतबरोबर दिवसाचे काही क्षण मिळावे म्हणून तिची धडपड सुरू होती.

लग्न झाल्यापासून रोज रात्रीच्या जेवणानंतर ती आणि रजत थोड्या वेळासाठी का होईना पण घराच्या गच्चीत जाऊन बसायचे. रात्रीच्या शांत वातावरणात थंड हवेच्या झुळुका अंगावर घेत दोघं दिवसभरात घडलेल्या घडामोडी एकमेकांबरोबर शेअर करायचे. बागेतल्या रातराणीचा तो धुंद करणारा सुगंध दोघांनाही खूप आवडायचा. स्नेहाच्या स्टुडिओ मधे बसून तिच्या चालू असलेल्या कामाबद्दल जाणून घ्यायला रजत नेहेमीच उत्सुक असायचा. स्नेहा जेव्हा तिच्या वेगवेगळ्या assignments बद्दल भरभरून बोलायची तेव्हा तिच्या डोळ्यांत दिसणारी ती चमक बघून रजतला तिचं खूप कौतुक वाटायचं . स्नेहाला सुद्धा रजतचं अशा प्रकारे तिच्या कामात इंटरेस्ट घेणं खूप आवडायचं. त्यानी दिलेल्या सूचना, तिच्या पेंटिंग्ज बद्दल त्याचं मत - तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तिच्या प्रत्येक कलाकृती वर जोपर्यंत रजतच्या - "मस्त दिसतंय" या शब्दांची मोहर लागत नसे तोपर्यंत स्नेहाच्या दृष्टीनी ती कलाकृती अपूर्ण असायची.

पण गेल्या काही दिवसांपासून यातलं काहीच होत नव्हतं. रजतच्या कामाचा व्याप इतका वाढला होता की त्याला दुसरं काही करण्यासाठी वेळच मिळत नव्हता. आणि त्यालाही हे जाणवत होतं. 'आपण स्नेहाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही' याबद्दल त्याला मनापासून खंत वाटत होती.सुरुवातीला एक दोन वेळा त्यानी स्नेहाला तसं बोलूनही दाखवलं होतं. पण स्नेहानी त्याला समजावत म्हटलं होतं," अरे, वेडा आहेस का तू? माफी काय मागतोयस माझी ? मला माहितीये- सध्या तुझ्यावर कामाचं खूप प्रेशर आहे. मी बघतीये ना रोज! मला दिसतीये तुझी धडपड... असं असताना - 'माझा नवरा मला वेळच देत नाही'- असं म्हणून त्याच्यावर रुसून बसण्याइतकी immature नाहीये मी! सध्या जरी तुझ्याकडे माझ्यासाठी, घरच्यांसाठी वेळ नसला तरी लवकरच पुन्हा सगळं पहिल्यासारखं होईल हे माहितीये मला; तशी खात्रीच आहे म्हण ना ! एकदा का या नव्या पोस्ट मधे तुझं बस्तान बसलं की मग सगळं काही सुरळीत होईल बघ...it's just a matter of few more days..... तू उगीच मनाला लावून घेऊ नकोस."

स्नेहाचा हा समजूतदारपणा बघून रजतला खूप समाधान वाटत होतं; मनात जी अपराधीपणाची बोच जाणवत होती - तिची धार आता थोडी बोथट झाली होती. या बाबतीत आता तो निश्चिन्त झाला.

आता त्यानी त्याचं सगळं लक्ष या नव्या प्रोजेक्ट वर केंद्रित केलं...पण त्यामुळे साहजिकच घरातल्या घडामोडींमधे, कार्यक्रमांमधे त्याचा सहभाग कमी व्हायला लागला.मधूनच कधीतरी त्याला तसं जाणवायचं देखील! पण मग अशावेळी तो स्नेहाचं बोलणं आठवायचा....'एकदा का या पोस्ट मधे बस्तान बसलं की सगळं सुरळीत होईल...Just few more days..' स्नेहाचं ते धीर देणारं हसू आठवायचं त्याला आणि मग तो पुन्हा नव्या जोमानी कामाला लागायचा.

स्नेहा पण तिच्याकडून रजतला सपोर्ट करायचा पूर्ण प्रयत्न करत होती. त्याच्या नव्या दिनचर्येच्या हिशोबानी स्वतःची कामं, स्टुडिओ, स्वतःचा वेळ - सगळं ऍडजस्ट करून घेत होती. रजत घरी असतानाचा पूर्ण वेळ ती फक्त त्याच्यासाठी राखून ठेवत होती. जेणेकरून तिला त्याचा जास्तीतजास्त सहवास मिळेल! आणि हे सगळं अगदी हसतमुख राहून...कुठलीही तक्रार किंवा चिडचिड न करता!!

वंदना हे सगळं बघत होती- तिच्या मुलाचं असं स्वतःला कामात झोकून देणं आणि त्याला आपल्या परीनी साथ देण्यासाठी तिच्या सुनेची चाललेली धडपड...काहीच सुटलं नव्हतं तिच्या नजरेतून...तिला त्या दोघांचाही खूप अभिमान, खूप कौतुक वाटत होतं. स्नेहाचा समजूतदारपणा बघून ती मनोमन सुखावत होती. आता ती तिच्या मुलाच्या बाबतीत निर्धास्त झाली होती....'आपल्या मुलाला संभाळून घेणारी, गरज पडेल तेव्हा त्याला समजून घेणारी आणि त्याचबरोबर त्याला योग्य रित्या समजावणारी जोडीदार मिळाली आहे' - या जाणिवेमुळे आता एका आईचं मन शांत आणि प्रसन्न झालं होतं.

पण तरीही तिच्या मनात एक बेचैनी होती... स्नेहाची जी ओढाताण होत होती ती स्पष्ट दिसत होती वंदनाला ...नुसती शारीरिकच नाही तर मानसिक ओढाताणही तिला ना सांगताच समजत होती. आणि याबद्दल स्नेहा आपणहून काहीच बोलणार नाही- कोणतीही तक्रार करणार नाही हे देखील ती जाणून होती. तिला आता स्नेहाच्या जागी तिची जिवाभावाची सखी - नीला- दिसत होती...."या बाबतीत दोघी मायलेकी अगदी सारख्या आहेत. स्वतःच्या मनाचा थांगपत्ता लागू न देता दुसऱ्याच्या मनाचा विचार करत बसतील, " वंदना स्वतःशीच बोलत होती."पण इतकं चांगलं असूनही उपयोग नाही...जोपर्यंत आपल्या मनात काय चाललंय हे आपण सांगत नाही तोपर्यंत ते समोरच्या व्यक्तीला कसं कळणार?" पण वंदनाला नीलाचा स्वभाव माहित होता.. आणि 'स्नेहा पण अगदी नीलासारखीच आहे' हेही तिच्या लक्षात आलं होतं.

"नीलाशी बोलावं का याबाबतीत?" वंदनाच्या मनात आलं. " पण ते बरोबर नाही. मी तिला वचन दिलंय की आता यापुढे स्नेहाची काळजी नको करू....जर या नवीन घडामोडी मी तिला सांगितल्या तर ती उगीच काळजी करत बसेल. आणि तसंही, आता स्नेहा माझ्या कुटुंबाची सदस्य आहे. ती सतत सुखी समाधानी राहावी याची जबाबदारी आता माझ्यावर आहे.- त्यामुळे जे काही करायचं ते मलाच करायला पाहिजे."

बराच वेळ विचार केल्यानंतर वंदनानी एक निर्णय घेतला. आता ती संध्याकाळी स्नेहा स्टुडिओ मधून परत येण्याची वाट बघायला लागली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast

मला हा भाग जरा बोर झाला, स्नेहा जरा फारच goody two shoes आहे. प्रेमप्रकरण होतं तरी रजत नी लग्नाला होकार दिला म्हणून grateful आहे की काय अशी अचानक भिती वाटून गेली! I hope not.