एकटीच @ North-East India दिवस - २०

Submitted by सुप्रिया राज जोशी on 9 March, 2020 - 09:05

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

53613654_10156911532612778_7358261593550880768_n.jpg

25th फेब्रुवारी 2019

प्रिय विश्वज्योती,

रात्री बॉन फायर ची मज्जा आटपून मी टेंट मध्ये झोपायला आले तर अंधारात हाताला पांघरूण वेगळेच लागले, दचकून मोबाईल च्या उजेडात पाहिले तर कुत्र्याचे पिल्लू माझ्या पांघरुणाच्या उबेत गाढ झोपले होते. त्याला उठवायला जीवावर आले होते पण मी थंडीने कुडकुडत होते. झोप चाळवली तसे ते मुकाट टेंटबाहेर चालते झाले.

पहाटे जाग आली तेव्हा पाच वाजले असतील. बाहेर डोकावून पाहिले तर कोणाचीच जाग नव्हती. कॅम्पिंगला प्रात:र्विधी उरकायला ही घडी उत्तम असते असे पुराणात सांगितले आहे. म्हणून बाहेर पडले तर काय एक चप्पल गायब झाली होती! रात्री काय वादळ वगैरे आले त्याने उडवून नेली का काय? कुडकुडवणाऱ्या थंडीत झटपट माझे सारे आटपून मी पुन्हा पांघरुणात घुसले आणि गाणी गुणगुणत राहिले.

वातावरणात एवढी शांतता होती की किनाऱ्यावरच्या पाण्याच्या तरंगांची स्पंदन मला टेंट मध्ये पडल्या पडल्या स्पष्ट ऐकू येत होती. तुला तुझ्या मित्राने उठवले तसे सर्वात आधी तू काय म्हणालास ते सुद्धा मला ऐकू आले.
... गुडमॉर्निंग - नाही!
... किती वाजले? - नाही!
तू म्हणालास, "मॅम निकल गयी?"

सकाळी तू चित्र काढत किनारयावर बसला होतास तेव्हा मला तुला खूप हेवा वाटला. तुला माझे ही चित्र काढायचे होते पण मला उशीर झाला असता. मग मी निघाले. चप्पल हरवली म्हणून अनवाणीच निघावे लागले. चालता चालता वाळूत माझी हरवलेली दुसरी चप्पल सापडली. कुत्र्यांच्या पिल्लांनी ती खेल खेल में तिचे अपहरण केले होते. मग पुन्हा टेंटजवळ येउन पहिली चप्पल घेउन गेले.
53167502_10156911535282778_6374993964310724608_n.jpg

कालची एवढीच एक संध्याकाळ पुरती आपली ओळख! साडे तीन तासांची सोबत! पण काही काही माणसांची आठवण आपण हृदयात जपून ठेवतो. जशी तू माझी ठेवली असावीस असा अंदाज आहे तसे मी ही तुझी ठेवली आहे. म्हणूनच तुलाच पत्र लिहायचे ठरवले.

पत्राची सुरुवात पत्राच्या तारखेतील म्हणजे कालचा दिवस उगवला तिथपासून करते. Nowhet ला हालीच्या घरी फार मस्त झोप झाली. सकाळी जान्तिया हिल्स मध्ये दावकीला फिरायला जायचा बेत केला. पण त्यासाठी शेअर टॅक्सी मात्र उलटे Panusrla ला जाऊनच घ्यावी लागणार. मी माझे सामान पाठी हालीच्या घरी’ सोडले आणि एका बोचक्यात थोडक्या गरजेच्या गोष्टी घेऊन निघाले. पनुर्सला ला एकोणीस –वीस वर्षांच्या तीन मुली दावकीच्या टॅक्सीसाठी फुलपाखरासारख्या भिरभिरत होत्या. त्या इसरलायल वरून आल्या होत्या आणि रिझर्व्ह टॅक्सी त्यांना 2000 रुपये सांगत होती. पण स्वदेशी स्टाईलने थोडी खटपट केल्यावर मला 50 रुपयात शेअर टॅक्सी मिळाली तसे त्या तिघींनाही तीन सीट्स ची जागा देउन आम्ही चारजण दावकी ला निघालो.

53500024_10156911295362778_3151544794468057088_n.jpg

मला या प्रवाशांचे कौतुक वाटते. आकाराने आणि वजनाने माझ्या बॅगेच्या तीन पट भरेल अशी बॅग पाठीवर उचलून विदेश, प्रदेश भाषा, वय...अशी कुठंचीही बाब अडचण ठरू न देता सहा महिने कधी तर वर्षभर फिरतात. अशा प्रवासात येणाऱ्या अडचणींना अनुभव म्हणून गोळा करतात, त्या त्यांच्या अनुभवांचे गाठोडे तर केवढे भारी असेल?
पनुर्सला सोडले की दुतर्फा केळी-पोफळीची झाडे लागतात, काही पोफळीच्या झाडावर ताडी बनवायला ठेवलेली दिसते. या रस्त्यावरून प्रवास करताना मला जणू गोव्यालाच फिरते आहे असे वाटत होते आणि त्या कल्पनेनेच खूप मज्जा ही येत होती.

दावकीचा नजारा कोणालाही कॅमेरात पकडून घेऊन जावासा वाटेल असा आहे, उमंगोट नदीवर 1932 मध्ये ब्रिटीशांच्या काळात बांधलेल्या suspension bridge च्या टोकावर लिहिले आहे, 'photography strictly prohibited' ते वाचल्यावर मला वाटले आता या पुढे फोटो काढायला मनाई आहे. म्हणून मी मोबाईल बंद करून गुपचूप आत ठेऊन दिला. त्यानंतर जेव्हा माझी ट्यूबलाईट पेटली की ती सूचना फक्त ब्रिजसाठीच होती तोपर्यंत तर आम्ही दावकी मार्केट पर्यंत पोहोचलोही होतो.

समोर दोन पर्याय होते. इथेच रहायचं की पुढे Shnongpdeng ला जायचे. असा काही निर्णय घ्यायच्या आधी निवांत थोडा विचार केला तर फायद्याचे ठरते पण त्या इस्रायली मुलींनी तर गेस्ट हाउस ठरवूनही टाकले. मी मात्र पाच रुपयात एक समोसा मिळत होता त्या दुकानात (इथे टपरीला दुकान म्हणतात) गरमागरम ब्रेकफास्ट करीत अंदाज घेत राहिले. बॅगपॅकिंग करणारयांसाठी ही उपयोगाची टीप आहे. सकाळचा नाश्ता स्वस्तात दहा वीस रुपयात लोकल मार्केट मधल्या एखाद्या टपरीवरच करायचा कारण तिथेच लाख मोलाची माहितीही मिळवता येते.

दुकानातून उठले तेव्हा माझा बेत ठरला होता की Shnongpdeng ला जाऊन कॅम्पिंग करायचे. पण मला शेअर टॅक्सी मिळेना, रिझर्व्ह टॅक्सीचे 600 रुपये पडत होते! घासाघीशीत मी जास्त वेळ दवडला नाही. 300 रुपयात टॅक्सी ठरवली वर इंडिया बांगलादेश बॉर्डरवर फिरवून आणायचे डील पक्के केले.

माझा ड्रायव्हर बावीस वर्षाचा तरुण मुलगा होता. मला तो खूप आवडला कारण मी सांगेन तिथे, मला लागेल तेवढा वेळ तो खुशी खुशी गाडी थांबवायचा. मी जरी अर्धी गाडीच्या बाहेर निघून वारं अंगावर घेत होते त्याला ते ही चालत होते. जास्वंदीचा बहर बघून जेव्हा मी आहा...असे काहीतरी पुटपुटले तर त्याने गाडी रिव्हर्स घेऊन एक फुल तोडून मला दिले. प्रवासात माझे केस टकलावर फाटके टोपले उलटे ठेऊन झोडून काढल्यासारखे दिसतात, त्याच्यात फुल कसे शोभणार? म्हणून बरेचदा मी फुल कानापाठी माळते. माझ्या तशा अवतारालाही तो सुंदर म्हणाला मग मला तो आणखीनच आवडला.

दावकी हे कोळशाच्या खाणी साठी प्रसिद्ध आहे ज्याची निर्यात शेजारच्या बांग्लादेश ला ही होते. त्याच ट्रेड रूट वर जिथे दोन राष्ट्रांचा झिरो पॉईंट आहे तिथून अनेक बांगलादेशी प्रवासी North East India फिरायला येतात. इथे मला जळगाव वरचा एक जवान भेटला. प्रवास करताना दुसऱ्या राज्यात मराठी बोलणार कोणी सापडलं की गंमत वाटते. त्या आर्मीच्या जवानाला किती गप्पा मारू नि किती नको असे झाले होते. तो मला त्याच्यासोबत पार बांगलादेशच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन गेला.

53813336_10156911295982778_1486521260983713792_n.jpg

परतताना एक शाळा दिसली तशी मी पुन्हा तिथे काही वेळ रमले, बॉर्डर वरच्या किंवा दूरस्थ गावातल्या शाळा पहायलचा मला जणू छंदच जडला आहे.

श्नोंगप्डेंगला पोहोचले आणि एका कंपनी बरोबर टेंटचे डील पक्के केले. आजूबाजूला जिथे टेंट ची गर्दी नव्हती साधारण अशा ठिकाणी माझा टेंट उभारायला. लगेच माझे समान तिथेच ठेऊन मी स्नोर्कलिंग करायला निघाले. कॅम्पिंग ग्राउंड पासून बोट मला घेउन निघाली. दुतर्फा पाण्यात आपलेच प्रतीबिंब न्याहाळत बसलेल्या डोंगररांगा आणि समोर या टोकाला त्या टोकाशी जोडणारा नुसता दुरून पाहूनच छातीत धस्स होईल असा सस्पेन्शन ब्रिज! दोन्ही नजरेत मिळूनही जो नजारा मावत नव्हता त्याला चार बाय दोन च्या मोबाईल केमेरात काय पकडू? मनातल्या मनातच ते चित्र मी उतरवत होते.
53671924_10156911307562778_352397196143886336_n.jpg

दुरून हिरवा दिसणाऱ्या उमंगोट नदीचे पाणी इतके नितळ, पारदर्शी आहे की अस वांटत आपली होडी पाण्याच्या प्रवाहातून नाही तर निव्वळ हवेच्या झोतातून पुढे जात आहे. प्रवाहात शेकडो मासे पोहताना दिसतात. पण त्याहूनही मला आवडले असेल तर ते पाण्याखालच्या दगडाचे जग! किती वेगवेगळे आकार, एकापेक्षा एक सुंदर, जणू कोणी शिल्पकाराच्या कलेचे प्रदर्शन पहाते आहे.

53421925_10156911303312778_7570564773339725824_n.jpg

कधी चुकून नाकातोंडात पाणी गेले की panic होऊन बुचुक बुचुक करत मी किनारा गाठायची. मग थोडावेळ दगडावर उताणे झोपायचे, ओल्या अंगाला सूर्यकिरणांची थोडी ऊब मिळाली की मारली परत पाण्यात उडी! स्नोर्क्लिंग चा नाद करत मी तीन एक तास अशी रमले की दुपारी जेवायचे सुध्दा विसरुन गेले. माणसांची मुळीच चाहूल नव्हती, गर्द निसर्गसनिध्यात तो एकांत केवढा सुखावह वाटला.

संध्याकाळचे तीन वाजले, ऊन सरत आले, वारे अंगाला झोंबू लागले तशी मी परत निघाले. टेंटजवळ पोहोचले नि कपडे सुकवायला बसले. उन्हापेक्षा वाराच ते काम करत होता. त्या परिस्थितीत ओल्या कपड्याच्या आतल्या माझे काय झाले असेल त्याची कल्पना कर.

टेंटसमोर बांबूचे मोठाले बेंच मांडले होते त्यावर पांघरून गुंडाळून पडले. डोळ्यांना निळ्या आकाशाच्या पडद्यावर हिरव्या टेकड्या नि त्यांना जोडणारा झुलता पूल एवढेच नेपथ्य दिसत होते. डोळे बंद करून मी ते चित्र मनात ठेवले. मिटल्या डोळ्यांनाही सायंकाळचा प्रहर जाणवत होता. वर्दळ फिकट होतेय, गोंगाट विरळ होतोय, पाण्याच्या लाटा किनाऱ्यावरच्या बोटींवर येऊन आपटतात तो नाद मात्र हळूहळू आसमंत व्यापून टाकत आहे आणि तेवढ्यात गडबड गडबड करत तुम्ही लोक आलात. माझ्या शेजारी तुमचा टेंट उभारायला सुरवात झाली ते बघून मला वैताग आल्यासारखे झाले. बरं, मी सहज फक्त कुठून आलात एवढेच विचारले काय, तर तुझ्या मित्राने बांबूचा एक बेंच ओढत माझ्या थेट समोर आणला आणि गप्पा मारायला त्याने तिथे बस्तान मांडले. एकतर माझा नदीचा व्ह्यू त्याच्यामुळे अडत होता आणि दुसरे तर त्याला वाटलेच कसे की एवढ्या सुंदर दृश्याकडे पाठ करून कोणा तिऱ्हाईताशी टुकार गप्पा मारत बसावे? माझ्या मनात तुमची अशी इमेज झाल्यामुळे तुमच्याबरोबर रुळायला थोडा वेळ गेला, पण जशी ओळख झाली, गप्पा रंगत गेल्या, एकत्र जेवलो, बॉन फायर समोर बसून गाणी, गोष्टी, विनोद सुरू झाले तशी तुमची सोबत मी एन्जोय करू लागले.

तुझ्याबद्दल सांगायचे तर या ट्रिपने मला काही न विसरता येणारे मित्र मैत्रिणी मिळवून दिले, त्यापैकी तू एक आहेस. तू खास माझ्यासाठी असे सांगून जे गाणे गायलास ती आठवण कायम मनात राहील.

53841462_10156912028797778_4126978454899916800_n.jpg

If no-one heeds your call then walk alone
If no-one speaks to you, O unlucky one, If everyone turns away, then with an open heart without hesitation speak your mind alone
If everyone walks away, O unlucky one, if no-one looks back towards the your unpredictable path, then with thorn pricked of the path bloodied feet, walk alone
If no-one heeds your call then walk alone
(कोणी तुझ्या हाकेला उत्तर दिले नाही, तुझ्याशी बोलायला सुद्धा कोणी नाही, अरेरे, सगळ्यांनीच पाठ फिरवली, असू दे. तू आपले मन आपल्या स्वत: कडेच बिनदिक्कत मोकळे कर.
सारेच दूर झाले? अरेरे! या कठीण अशा वाटेवर तुझ्या कडे पहाणारे आता कोणीच नाही का? वाटेवरचे काटे तळपायाला रुतताहेत हे खरे पण?एकट्याने तशातही पुढची वाट चालायची हिम्मत तुला मिळू दे. )

যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে॥
तोबे एकला चलो रे...

माझ्यासाठी काय नि कोणासाठी काय? तेच वास्तव आहे. स्वतःच स्वतःची सर्वात मोठी ताकद, प्रेरणा बनायची आहे आणि एकटेच चालयचे आहे.
कलाकाराच्या अंगगुणाची ओळख जगाला पटली तरच त्याच्या कलेला वाव मिळत असतो. तसेच होऊ दे. तुझ्या कलेतील सादगी लोकांपर्यंत पोहोचू दे. हसत रहा. कायम आनंदी रहा.

मला तर ताई म्हटलं असतस तर जास्त आवडलं असतं पण तू मला मॅम म्हटलस, म्हणून ...
तुझी मॅम

Group content visibility: 
Public - accessible to all site users