एकटीच @ North-East India दिवस - १९

Submitted by सुप्रिया राज जोशी on 9 March, 2020 - 03:42

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

24th फेब्रुवारी 2019

ए मावशी,

मला direction चा कसा मुळीच sense नाही त्या विषयी माझ्या गोष्टी चारचौघांना सांगून हसायला, हसवायला तुला मजा येते. आज तुला अजून एक किस्सा देते. कालच संध्याकाळी direction ची एवढी गोची झाल्यावर निदान आज सकाळी थोडी तरी समज यायला हवी ना? तर सकाळी घराबाहेर निघताच पहिलेच जे वळण लागते ते उजवीकडे की डावीकडे, पुन्हा तेच विसरले. बरोबर वळण घेतले तर रस्ता सरळ चर्चकडे नेणार चुकीचे घेतले तर काल ज्या रस्त्यावर भरकटत होते तिथे पोहोचणार. डोक्याला ताण देऊन नीट आठवले आणि जेव्हा खात्री पटली तेव्हाच एका दिशेने वळले. तर काय सांगू? आजही बरोब्बर उलट्याच दिशेने चालत गेले. माझ्या ते लगेच लक्षात आलं कारण त्या रस्याच्या दोन्ही बाजूंनी थडगी होती. म्हणजे काल रात्री अंधारात जे भुतासारखी गोल गोल फिरत राहिले होते ते ग्रेव्हयार्ड मध्ये? नशीब मोबाईल च्या उजेडात मला फक्त पायाखालची वाट जेमतेम दिसत होती. नाहीतर हे दृश्य दिसलं असतं तर भीतीने इथेच अर्धमेली झाले असते.
53685719_10156906439852778_550028106224631808_n.jpg

आज खासी हिल्स सोडून पुढच्या प्रवासाला निघायचे. पण कुठे निघावे? खासी हिल्स मध्य मेघालायत आहेत, पूर्वेला Jaintia Hills आणि पश्चिमेला Garo Hills! नाहीतरी इथे तिथे जाऊन शेवटी निसर्गसौंदर्यातच डुंबायचे, म्हणून मी पूर्वपश्चिम दोन्ही दिशा रद्द करून मध्य मेघालायातच नोहवेत म्हणून कायशा गावी जायचे ठरवले. तसे या गावाची मला विशेष ओढ लागली होती असं नाही पण इथे हाली रहातो. गोहाटीला सब्यसाचीशी ओळख झाली तेव्हा त्याने हालीच्या घरी जरूर रहा, असे सुचवले होते. या गावात राहिले तर भारत-बांगलादेश बोर्डरलाही भेट देता येईल अशीही माहिती मिळाली होती. अतिसाधारण भूप्रदेशाला असाधारण महत्व दिले गेले असेल तर त्यात समस्त देशांच्या इंटरनेशनल बोर्डरस मोडतात. त्यातूनही एखाद्या सीमेचे सिमोलंघन हा फारच वादाचा मुद्दा करून ठेवला असतो तेव्हा सर्वात आधी माणसातली माणूसकी सीमित झालेली दिसत असते. सीमेची समीकरणे सोडवत एकटीच जेव्हा भारत-पाकिस्तान बोर्डर वर महिनाभर फिरलेय तेव्हाच विचार न करता साठी:साठी आखून घेतलेल्या मर्यादेची मर्यादा चांगलीच कळली आहे. कदाचित त्यानंतरच मला बॉर्डर्सलाचे विशेष आकर्षण वाटू लागले.

53050719_10156906439962778_3403722308899045376_n.jpg

प्रार्थना संपली की तसेच पुढे निघावे असे ठरवले म्हणून पाठीवर बॅग टाकूनच चर्चमध्ये प्रार्थनेला निघाले. इथले चर्च गावातील मुख्य रस्त्यालगत आहे. खासी भाषेतील प्रार्थना आणि उपदेश जसे आटोपले तसे मी बाहेर येउन मार्केट ला जायला वहान शोधू लागले. गावापासून मार्केट पर्यंतच्या पहिल्या टप्प्यावर इथे सीटच्या भाड्यावर लोकल ऑटो चालते. कुठच्याही गावाला का कायचे असेना आधी मार्केट पासून शेअर टॅक्सी करून शिलॉंग ला जायचे. नॉर्थ इस्ट च्या seven sisters ला भेट द्यायचे म्हणजे जसे गोहाटी अटळ आहे तसे मेघालयात इकडून तिकडे फिरायचे म्हणजे शिलॉंग ला भोज्जा करावा लागतो. मग शिलॉंगच्या वेगवेगळ्या स्टँड पैकी कुठून नि कशी पुढे जायची सोय होईल हे बरेचदा शिलॉंगच्या लोकल्स ना ही सांगता येत नाही. निदान माझा तरी हाच अनुभव आहे.

इथे सरसकट सारे सांगतच होते की मेघालय मध्ये रविवारी वाहतूक बंद असते. प्रवासाची काहीही सोय होणे कठीण आहे. पण तुझी भाची तुझ्यासारखीच! स्वतः प्रयत्न करून बघितले नाहीत तर मन मानत नाही. रविवारी ऑटो च्या वर्दळीशिवाय रस्ते ओस पडतात तशी गावातील पोरे त्याचा क्रीडांगणासारखा वापर करतात. रविवारचे हे समीकरण लक्षात आले तसे मी मार्केट कडे चारेक किलोमीटर चा रस्ता पायी चालायला सुरुवात केली. मी अगदी पाच मिनिटं चालले असेन, पाठून गाडीचा आवाज आला तसे झटकन मी त्या टुरिस्ट टॅक्सीला हात केला. गाडी थांबली ती संधी साधून मी टुपकन गाडीत चढुनही बसले. ड्रायव्हर त्याच्या friend (प्रेयसीला) भेटायला शिलॉंग ला चालला होता. दिवसाची सुरुवात अशी गुडलक ने झाली की मला खूप मज्जा येते.

map.jpg

शिलॉंग ला पोहोचले, थोडी तसदी घ्यावी लागली, थोडा वेळ गेला पण आज रविवारी सुद्धा पनुरस्ला ला जायला एक शेअर जीप निघत होती, हे नशीब म्हणायचे. एवढे सारे सुरळीत होउन या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर मात्र माझी वाट लागली. माझ्याकडे इंटरनेट नसल्यामुळे पनुरस्लाहून पुढे कुठचा रस्ता घ्यायचा हे नीटसे कळत नव्हते. रविवारची हक्काची विश्रांती सोडून सवारी घ्यायला एकही टॅक्सी तयार होत नव्हती. रस्त्याच्या कडेला उभे राहून बिचाऱ्या चेहऱ्याने, अनेक प्रकाराने खाणाखुणा केल्या तरी इथचे गाडीवान मुळीच दखल घेत नाहीत (किंवा माझा अवतार बघून माझी दखल घेतली नसेल.) पण एरव्ही भारतात इतर ठिकाणी अडचणीत hitchhiking जसे कामाला येते तसे काही मेघालयात होत नाही, असा माझा अनुभव आहे. पहिल्या दोनेक दिवसातच ते लक्षात आले होते तेव्हापासून hitchhiking चा नाद मी मेघालयपुरता सोडून द्यायचा असे ठरवले होते. खूप हात हलवूनही एकही गाडी थांबतच नसेल की आजूबाजूचे बघे आपल्याकडे बघून हसतायत असे उगीच वाटते. मला त्याची खूप लाज वाटते. पण आज मात्र ती लाज बाळगून चालणार नव्हते. ट्रक पासून बाईक पर्यंत साऱ्यांना थांबवायचा प्रयत्न केला असेल. जवळजवळ तासभर उलटला तरी यश येईना. शेवटी एकदाची एक गाडी थांबली. त्या गाडीत एक बांगलादेशी टूरीस्त जोडपे त्यांची भारतातील ट्रीप संपवून परत चालले होते. माझे नोह्वेत चे वळण त्यांच्या परतीच्या वाटेवरच लागत होते. मनात हुश्श म्हटले, गाडीतील जोडप्याला थँक्स म्हटले आणि पुढच्या सीटवर सरसावून बसले. पुढे जे झाले ते अनपेक्षित होते.

बराच रस्ता सरल्यावर एका वळणावर ड्रायव्हरने मला उतरायला सुचवले, तशी मी उतरले. तो स्पॉट बांग्लादेश बॉर्डर च्या जवळ होता. ते वळण नुसतेच अनोळखी नाही पण निर्जनही वाटत होते. नाही म्हणायला बेवड्यांचा एक अड्डा तिथे जमला होता त्यापैकी माझ्याच वयाच्या बाप्याने मम्मी हाक मारली ते ऐकून मला all is well असे वाटले. त्यांना माझी काळजी वाटत होती याचे कारण की Nohwet ला जायचे ते वळण मुळी नव्हतेच. ड्रायव्हर ने गप्पांच्या ओघात चुकून मला पुढे आणून सोडले होते. या जंक्शन वरून पुन्हा एखादी गाडी उलटी जायला मिळेल याची शक्यता फार कमी आहे, असे सर्वांचे म्हणणे पडले. त्यांनी मला बिअर प्यायची का असे विचारले. अर्थातच मी नाही म्हटले. (नाहीतर काय तिथे त्यांच्या सोबत मी पीत बसणार होते? तसे त्यांना वाटले तरी कसे?)

तिथे एक टॅक्सी वाला आला जो मला अक्षरशः विनवत होता की मला सहाशे रुपये दे मी तुला Nohwet ला घेऊन जातो. शेवटी तो फुकट मला नोह्वेटला सोडायला तयार झाला. पण त्या प्रसंगात एकूणच कोणावर विश्वास टाकायचा की नाही याबद्दल माझ्या संवेदना जास्त तीक्ष्ण झाल्या होत्या. त्याला माझ्या सुरक्षेची काळजी लागली होती हे जे तो म्हणत होता ते खरेही असेल कदाचित, पण वेळ चालला होता या कारणाने panic होऊन मला आगीतून फोफाट्यात शिरायचे नव्हते. म्हणून मी तिथेच थांबून राहिले. बराच वेळ सरला असेल. एकेकजण आपापल्या वाटेने निघून गेला. मग या गोष्टीचा खरा हिरो आला. इतका वेळ समोर बसून तो सारे पहात होता. त्याने माझ्याशी बंगाली भाषेत बोलायला सुरुवात केली. मला तो कायकाय बोलतो त्यातील दोनच वाक्ये कळत होती. एकतर तो मला सांगत होता की "तू बांगलादेशी"! तो जितके वेळेला हे बोलला तितक्या वेळेस मी त्याला सांगितले की, "मै मुंबई से आयी हू”. ते मात्र त्याच्या डोचक्यात शिरत नव्हते. दुसरे तो मला सांगत होता की, "चल माझ्या घरी चल". आधी दूर बसला होता, हळूहळू जवळ जवळ सरकू लागला नि घाई घाई करू लागला, "चलो चलो...' मी त्याचा व्हिडिओ घेऊन ठेवला.

53514149_10156906440282778_6419958092896665600_n.jpg

कुणाची मदत मागायला माझ्या फोन ला रेंज नव्हती हे जरी खरे असेल तरी माझ्या रेंज मध्ये तो आला असता तर त्याला मदतीला चार माणसे लागतील अशी लाथ झाडायची तयारी ठेवली होती. दरम्यान एक टँकसी वाला जंक्शन वरून चालला होता त्याला मी थांबवले आणि सारे सांगून पोलीसचा पत्ता विचारला. माझा प्लॅन तिथून तडक पोलीस स्टेशन ला नेऊन तक्रार करायची हाच होता पण त्या टँकसीवाल्याने स्वत: खटपट करून, तिथून थेट Nowhet ला जाणारी एक गाडी मला मिळवून दिली.

मला Nohwet ला Hali च्या घरी जायचे एवढेच माहीत होते. त्या माहितीवर गाडी थेट हालीच्या घरासमोर जाऊन उभी राहिली. योगायोगाने ते कुटुंब त्याच गावाचे रहिवासी होते. या देखण्या गावात शिरल्या शिरल्या माझा शीण निघून गेला होता पण जिथे मुक्काम करायचा ते हालीचे घर बघून तर मला काय करू नि काय नको असे झाले. बर गंमत अशी की जरी हाली त्या वेळेला कामानिमित्त बाहेर गेला होता तरी घराचा दरवाजा सताड उघडा होता आणि घराच्या पायऱ्यावर बसल्या बसल्या इन्टरनेटची थोडीशी रेंज पकडली तसा हालीचा मेसेज टपकला, “मी थोड्या वेळाने येईन. काही खायला सापडले तर खाऊन घे आणि आराम कर.”

53399771_10156906440382778_5122506033926766592_n.jpg

आत्तापर्यंत आयुष्यभरातील सर्व प्रवासात मिळून राहिलेल्या paid home stays पैकी हे घर मला सर्वात आवडले. त्याचे कारण फक्त टुमदार घर एवढे नाही पण त्या घराचे घरपण हे आहे.
हालीच्या बद्दल काय सांगू की त्याने माझी केवढी काळजी घेतली? तो चहा, नाश्ता, जेवण, फळे असे जे काही स्वतः खात असे ते ते सारे ते माझ्याबरोबर वाटूनच खात असे. मी त्याला म्हटले दोन हजारची सुटी रक्कम माझ्याजवळ नाही तर त्याला गैरसमज झाला की दोनहजारशिवाय जास्त रक्कम माझ्याकडे नाही. त्यामुळे तो पैसे घ्यायला ही का कू करायला लागला.

ही पत्र वाचून अनेक जण अशी ट्रिप करायची स्वप्न पहातात पण ते स्वप्न जगायची ओढ नि हिम्मत सर्वांच्यात नसते. पण सोलो ट्रीप चे स्वप्न जो सत्यात उतरवतो तो खूप मोलाचे अनुभव गाठीशी घेउन परत येतो. मला वाटत, माझी पत्र वाचून नुसताच प्रवास नाही पण त्याचे सार ज्यांना जाणता आले त्यांना अशा प्रवासाचे वेध नक्की लागतील.
सांग ना मावशे, तुला तुझ्या पुढच्या ट्रीपला अशी solo भटकंती करायची?

तुझ्यासारखीच तुझी भाची
सुपी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सुरुवातीला कळत नव्हते तुम्हाला सनकी का सणकी म्हणावं का कलंदर म्हणावं. मी आता तूम्ही कलंदरच आहात हेच म्हणतो.
तो प्रसंग वाचताना श्वास रोखून धरला होता, पण सुखरूप पुढे गेल्यावर सुटकेचा निःश्वास टाकला. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. तो झोबीसारखा फोटो ओळखू आला नाही.

बापरे, हिंमतवान आहात, पण असं धाडस रात्री-बेरात्री नका करू. निदान पूर्ण अनोळखी प्रदेशात तरी.

अरे परशुराम दादा, खूप खूप थंक्यू
खर आहे तुझ प्राजक्ता! ती वेळ टाळायलाच हवी. पण तू २७ फेब्रुवारी चे पत्र नक्की वाच.
आणि सर्वच वाचकांसाठी अस सांगायचं आहे की पुढच्या प्रवासात फार आव्हानं पेलावी लागली, माफ करा, ती तुमच्या अपेक्षेच्या चौकटीत बसणार नाहीत कदाचित! पण ही कथा कादंबरी नाही - जे घडले ते लिहावे लागेल. (folded hands' emoji )

सोलो ट्रॅव्हल म्हणजे अगदी काहीच प्रवासाची साधने वापरायची नाहीत, कुठलेच बुकींग आधी करायचे नाही, काहीच प्लॅन करायचा नाही असे असते का? आणि यात काही धोका, अपघात, रस्ता चुकणे, चोरी... काहीही झाले तर?

नाही नाही
सोलो म्हणजे एकट्याने किंवा एकटीने ... एवढेच फक्त!
पण सहसा जो सोलो प्रवास करेल तो लग्झरी साठी नाही करत. हे सारे अलिखित रुल्स आहेत पण बरेचदा तो प्रवास कमीत कमी खर्चात केला जातो. पण त्याचा अर्थ धोके पत्करत प्रवास करायला पाहजे असे मुळीच नाही. बरेचदा मला असा अनुभव आहे की धोके सुद्धा सांगून येत नाहीत वरकरणी धोकादायक प्रवास सहज टळतो आणि सरळ वाटणाऱ्या प्रवासात हे असे उपटसुंभ उपटतात. पण आपल्याला त्यांचा सामना करायची शक्ती अवगत आहे हे तेव्हाच कळते.

अपघात आणि चोरी हे कुठच्याही प्रवासात होऊ शकते. नाही म्हणायला माझ्या सारख्या प्रवाशांकडे सामानाची चोरी होईल असे सामानच नसते. तरीही नोंग्रीहाट मध्ये एक प्रवासी भेटला होता त्याचे सारेच सामान पहिल्याच दिवशी चोरीला गेले होते. अशीही गोष्ट ही ऐकली आहे. सामानात फक्त कपडेच होते.
रस्ता चुकणे वगैरेही फारच क्वचित! कारण अशा प्रवासात लोकल्स फार मदत करत असतात. उलट फमिली ट्रिप्स मध्ये मिळत नाही अशी अशी लोकल माहिती आपल्याला मिळते.
पण असा प्रवास का करायचा? ... ते समजायचे तर त्यासाठी तो करूनच पहावा लागेल.