मन वढाय वढाय (भाग २३)

Submitted by nimita on 8 March, 2020 - 21:40

संध्याकाळी रजत ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला घरातून गप्पांचा, हास्यविनोदांचा गलका अगदी बाहेरपर्यंत ऐकू येत होता. 'आले वाटतं मावशीकडचे सगळे . रजत साहेब, आता प्रश्नांच्या भडिमारासाठी सज्ज व्हा...' एकीकडे आपल्या कुटुंबियांच्या उत्साहानी, प्रेमानी खुश होत रजत स्वतःला उद्देशून म्हणाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यानी बेल वाजवायच्या आधीच त्याच्या आईनी दार उघडलं. इतका वेळ बडबडणारं घर एकदम शांत झालं. सगळ्यांच्या अपेक्षित नजरा आता रजतवर खिळून होत्या. पण रजत मात्र काही न बोलता खोलीत जायला लागला. त्याला मधेच थांबवत वंदना म्हणाली," अरे हे काय? घरी आल्यावर सांगतो म्हणाला होतास ना ?? मग आता सांग ना !" आपल्या आईचा एकंदर आविर्भाव बघून रजतला खूपच गंमत वाटत होती. पण तिचं हे रूप त्यानी आधी पण बघितलं होतं...शाळा कॉलेज मधे असताना दर वर्षी तो जेव्हा परीक्षेचा रिझल्ट बघून घरी यायचा तेव्हा त्याच्या आईची प्रतिक्रिया अगदी अशीच असायची....त्याच्या तोंडून रिझल्ट ऐकण्यासाठी अधीर, उतावीळ! ते सगळं आठवून त्याला एकदम हसू आलं. त्यामुळे तर त्याची आई अजूनच वैतागली.." हे बघा !! आम्हांला सगळ्यांना सकाळपासून सस्पेन्स मधे ठेवून हे नवरा बायको मात्र एन्जॉय करतायत ...."

तिचं बोलणं ऐकून नकळत रजतची नजर स्नेहावर जाऊन खिळली. आपलं हसू लपवत स्नेहा म्हणाली," अरे, सकाळपासून या तिघी माझ्या मागे लागल्या आहेत..आत्तापर्यंत हजारवेळा विचारून झालंय 'good news आहे का ?' म्हणून...लवकर सांगून टाक बाबा सगळ्यांना."

आता जास्त ताणून धरणं योग्य नाही हे रजतच्या लक्षात आलं. आजी शेजारी जाऊन बसत तो म्हणाला," Good news तर आहे- पण तुम्ही विचार करताय ती नाहीये.... म्हणजे सध्या तरी नाहीये.....नाहीये ना गं?" शेवटचं वाक्य म्हणताना त्यानी स्नेहाकडे एक मिश्किल कटाक्ष टाकला. त्याच्या या अशा धिटाईमुळे- आणि तेही सगळ्या मोठ्या लोकांसमोर- स्नेहाची अवस्था खूपच अवघडल्यासारखी झाली. 'कधीही काहीही बोलतो हा,' त्याच्याकडे बघून डोळे मोठे करत स्नेहानी त्याला नजरेनीच दटावलं. स्नेहाची ही अशी प्रतिक्रिया बघून रजतला मात्र खूपच मजा येत होती.

"मला प्रमोशन मिळायची शक्यता आहे. पण त्याआधी....." रजतचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सगळ्यांनी त्याचं अभिनंदन करायला सुरुवात केली. खूप खुश झाले होते सगळे ही बातमी ऐकून. आजीनी तर बसल्या जागीच त्याची दृष्टही काढून टाकली. कसंबसं सगळ्यांना शांत करत रजतनी त्यांना त्या प्रमोशनशी संबंधित बाकी सविस्तर माहिती सांगितली.

त्याला आधी ट्रेनिंग करता काही दिवस परदेशी आणि नंतर काही वर्षं बडोद्याला जावं लागणार आहे , हे ऐकल्यावर काही क्षण सगळेच गप्प झाले. आजीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या... आता लवकरच आपली नात आपल्यापासून लांब जाणार या नुसत्या कल्पनेनीच तिचा जीव अर्धा झाला होता. इतरांची गतही काही फारशी वेगळी नव्हती. अचानक वातावरण गंभीर झाल्याचं बघून रजत गांगरून गेला. त्यानी स्नेहाकडे बघितलं. तिनी त्याला नजरेनीच धीर दिला आणि बोलायला सुरुवात केली,"आणि म्हणून आम्हांला दोघांना असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी पण आमच्याबरोबर बडोद्याला यावं. म्हणजे आपण सगळे असेच एकत्र राहू. कायम एकमेकांच्या डोळ्यांसमोर असल्यामुळे कोणालाच कोणाची काळजी नाही वाटणार. इतकी वर्षं तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, आम्हांला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून अविश्रांत झटलात तुम्ही! पण आता तुमचे आराम करायचे, आयुष्य एन्जॉय करायचे दिवस आहेत. आणि तोच आराम तुम्हांला मिळावा म्हणून आपण एकत्र राहावं , अशी इच्छा आहे आमची. हा आमचा हट्ट नाहीये पण आग्रह मात्र नक्की आहे. पण अर्थातच शेवटी तुम्ही जे काही ठरवाल ते आम्हांला मान्य आहे."

स्नेहानी थोडक्यात पण व्यवस्थितपणे सगळे मुद्दे घरच्यांसमोर मांडले. थोडा वेळ कोणीच काहीच बोलले नाही. खोलीत एक अवघड शांतता पसरली होती. शेवटी स्नेहाच्या आईनी ती कोंडी फोडली. रजत जवळ जात ती म्हणाली," सगळ्यात आधी तुझं अगदी मनापासून अभिनंदन बेटा ! अशीच प्रगती कर आयुष्यात. खूप खूप आनंद झालाय मला आज...नाही; फक्त मलाच नाही तर आम्हांला सगळ्यांनाच खूप आनंद झालाय. We are so proud of you." हे म्हणताना तिनी हळूच डोळ्यांच्या कडा टिपल्याचं स्नेहाच्या लक्षात आलं.थोड्या वेळापूर्वी पर्यंत हसणारं घर एकदम भावुक, गंभीर झालं. ते बघून विषय बदलत स्नेहा म्हणाली," आई, आजकाल तुला तुझ्या जावयापुढे दुसरं कोणीच दिसत नाही हं ....अगदी तुझी पोटची पोर देखील ! तू घरून येताना खीर करून आणली होतीस ना...केव्हापासून वाट बघतीये मी... आत्ता देशील -मग देशील ! पण तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. जावयाचे लाड करून झाले असतील तर जरा मुलीकडे पण बघा....का जाऊ मी माझ्या सासूकडे ?"

स्नेहाची तक्रार ऐकून सगळे हसायला लागले; पण नीला देखील काही कमी नव्हती....शेवटी स्नेहाचीच आई ती ! रजतच्या शेजारी बसत ती स्नेहाला म्हणाली," मग, आहेच माझा जावई लाड करण्यासारखा ! इतकी छान बातमी ..I mean ...'good news' दिलीये त्यानी आम्हांला . तू पण दे 'good news' ; मग तुझेही लाड करीन !!" नीलाच्या या युक्तिवादाला इतरांकडून सुदधा पूर्ण पाठिंबा मिळाला.

आपला विनोद आपल्यावरच उलटला हे बघून चहा करायच्या निमित्तानी स्नेहानी स्वैपाकघरात धूम ठोकली. आता सगळ्यांच्या नजरा आपल्यावर आहेत हे लक्षात येताच रजत पण गोंधळून गेला."स्नेहाला मदत हवी आहे का बघतो .." असं काहीतरी पुटपुटत त्यानीसुद्धा स्वैपाकघर गाठलं. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून स्नेहाला कल्पना आली. उगीचच वैतागल्याचा आव आणत ती म्हणाली," या मोठ्या लोकांना दुसरं काही सुचतच नाही. जेव्हा बघावं तेव्हा 'good news' चा जप सुरू असतो." पण हे म्हणत असताना तिच्या गालांवर पसरलेली लाली बघून रजत उभ्या जागी घायाळ झाला. तिच्या जवळ जाऊन तिच्या कमरेभोवती हात टाकत म्हणाला," आता जर सगळे इतका हट्टच करतायत तर देऊन टाकू या 'good news' ! राणीसरकारांनी फक्त आदेश द्यावा...म्हणजे हा सेवक लगेच कामाला लागेल ."

रजतचा तो स्पर्श आणि त्याचं ते बोलणं ऐकून स्नेहाचं अंगांग बहरून गेलं. त्याच्या बाहुपाशात स्वतःला झोकून द्यायचा मोह अनावर होत होता तिला.. पण तेवढ्यात बाहेरच्या खोलीतून वंदनामावशी ची हाक ऐकू आली आणि तिनी कसंबसं स्वतःला रजतच्या मिठीतून सोडवून घेतलं. "आत्ता कोणी आत आलं असतं तर ? कुठेही काहीही करतोस तू ." रजतला दूर ढकलत ती म्हणाली. तो पुढे काही म्हणणार इतक्यात त्याच्या हातात चहाच्या कप्स चा ट्रे देत स्नेहानी त्याला बाहेरच्या खोलीत पिटाळलं.

पण रजतचं ते बोलणं मात्र तिच्या मनात घोळत राहिलं... तिच्या मनात आता एक इवलंस, नाजूकसं स्वप्न आकार घेऊ लागलं ! त्या नव्या, गोंडस नात्याच्या नुसत्या कल्पनेनीच स्नेहा मनोमन सुखावली होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिता. डोळ्यासमोर प्रसंग घडतोय असं वाटतं .
हिरोईन कथेचे मध्यवर्ती पात्र असल्यामुळे सगळी कामं तिलाच आहेच आणि बाकीचे आजूबाजूला supporting actors Happy
मला एकदम तुलसी आणि 'बा' ची आठवण झाली!