डाॅ.अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक: माझी चित्तरकथा

Submitted by sariva on 28 February, 2020 - 21:50

खरं तर डाॅ.अनिल अवचटांची सर्वच पुस्तकं मला आवडतात.पण अगदी अलिकडे वाचलेल्या त्यांच्या 'माझी चित्तरकथा' बद्दल लिहावं असं वाटलं.त्यांच्या इतर साध्यासुध्या पुस्तकांपेक्षा दिसायला देखणे असलेले,चांगल्या दर्जाच्या गुळगुळीत कागदावर छापलेले व डॉ.अवचटांच्या सुंदर चित्रांनी मुखपृष्ठ,मलपृष्ठ यांसह अंतर्बाह्य नटलेले हे छानसे पुस्तक.चित्तरकथा हे नाव सार्थ करणारे.शब्दांचे काम एक बोलके चित्रच करते असं म्हणतात.मग कथा कसली?तर केवळ स्वतःच्या आनंदासाठी, विरंगुळा म्हणून बालपणापासून ते आता मोठेपणापर्यंत स्वतःला हवी तेव्हा,हवी तशी...त्यांच्या दृष्टीने निरूद्देशपणे त्यांनी चितारलेल्या चित्रांची!पुस्तकांत भरपूर चित्रं तर आहेतच,पण प्रथम पुस्तक चाळतानाच चित्रांच्या बरोबरीने त्यांनी एवढं काय लिहिलं असावं बरं..अशी उत्सुकता मनात निर्माण होते.मग चित्रं पाहता पाहता आपण पुस्तक जसजसं वाचत जातो,तसतसं त्या चित्रांच्या निर्मितीचा प्रवास,त्यामागची मेहनत,त्यांची मनोभूमिका,त्यांची कलेची जाण..अशा अनेक गोष्टी आपल्याला समजतात,त्यांच्यात आपल्याला गुंतवून ठेवतात व त्या चित्रांकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी आपल्याला देतात.चित्रकलेत फारसं गम्य नसलेल्या माझ्यासारखीला मग चित्रं पाहून आधी न जाणवलेल्या गोष्टी जाणवायला लागतात व बऱ्याचदा चकित व्हायला होतं.त्यांची वरकरणी साधी,पण प्रत्यक्ष काढायला अवघड असणारी,सुबक,नीटनेटकी,अत्यल्प साधनांनी चितारलेली ही डौलदार चित्रं,त्यातली विविधता जाणवत राहते व ती पुन्हापुन्हा पहावीशी वाटतात. एरवी चित्रांच्या प्रदर्शन वगैरेत स्वारस्य नसणाऱ्या डाॅ.अवचटांची ही चित्रे आपल्यासमोर आग्रहपूर्वक आणण्याचं श्रेय जातं समकालीन प्रकाशनाचे श्री.सुहास कुलकर्णी यांना.चित्रकलेचं कोणतंही फॉर्मल शिक्षण न घेतलेला माणूस केवढी सुंदर चित्रं काढू शकतं हे लोकांना कळायलाच हवं; या त्यांच्या भावनेतूनच हे पुस्तक मूर्त स्वरूपात आलं.
डॉ.अवचटांच्या दृष्टीने मात्र हे एक प्रदर्शनच.हे पुस्तक विकत घेणारा यातील सर्वच चित्रांचा मालक व आस्वाद घेणारा.यात समीक्षकांच्या समीक्षणामुळे चित्र काढण्याच्या शैलीवर परिणाम होण्याचा धोका नाही ही त्यांच्या मते जमेची बाजू.ही चित्रं बघून वाचकांमधील चित्रं काढण्याची उर्मी जागी होऊन वाचकही चित्रं काढू लागले; तर बहार येईल असं त्यांना वाटतं.
पुस्तकपरिचय करून देताना त्यातील प्रकरणांचा थोडक्यात आढावा घेते. *1)सुरुवातीचं थोडंसं*
या प्रस्तावनात्मक प्रकरणात त्यांचा चित्रकला प्रवास कसा सुरु झाला,कुणाकुणाचं कसं मार्गदर्शन मिळालं,त्यांची चित्रशैली,त्यातली तंत्र कशी बदलत गेली;याबद्दल त्यांच्या सहज,ओघवत्या भाषेत प्रांजळपणे लिहिलं आहे.यातच चित्र,त्यातील सौंदर्य कसं बघायचं, समर्पण भावनेने त्यात कसं रमायचं हे त्यांना शिकवणाऱ्या शरद त्रिभुवन या त्यांच्या मित्राबद्दल लिहिलं आहे.या छंदात रमणं आपली पत्नी डाॅ.सुनंदा हिच्या सहकार्यामुळेच शक्य झालं हे कृतज्ञतापूर्वक लिहिलं आहे.आपल्या कलावंत आईबद्दलही परिचयात्मक छान लिहिलं आहे.
आपल्या चित्रं काढण्याच्या पध्दतीबद्दलही ते इथं लिहितात.जसं की,आपली कागदावरची रेघ ही स्वयंभू असते..म्हणजे तिच्या मर्जीने जाणारी,कुणाला आवडेल/न आवडेल याचा विचार न करणारी अशी.त्यामुळेच खरी,सुंदर चित्रे निर्माण होतात; असे त्यांना वाटते.कुठेही काढता यावीत,अगदी प्रवासातही.. म्हणून पेन,पेन्सिल,तेल खडू अशा साध्या साधनांनी व पाठकोऱ्या जुन्या कार्डांवरच बहुतेक चित्रे काढली.खोडरबरचा वापरही टाळला.एखादी रेष चुकीची आली तर तो आव्हान मानून,त्या रेषेला त्या चित्रात सामावून घेतच बरीच चित्रे काढली,हे विशेष.त्या प्रयोगांतूनच नव्या शैलीची,नवीन पोतांची त्यांची चित्रे जन्माला आली
*2)मानवी आकार आले तसे*
एकमेकांना रेलून बसलेले,दुसऱ्याच्या गळ्यात हात टाकलेले,एकमेकांत जवळीक दाखवणारे,स्त्री-पुरूष असा भेद बहुतेकांत न जाणवणारे आदिम,पूर्ण नैसर्गिक अवस्थेत असलेले मानवी देह या चित्रांत दिसतात.जणू माणसाचे समूहात राहणे इथे दर्शविले आहे.विशेष म्हणजे या चित्रांत डोकी नावालाच.नाकडोळे इ.न काढल्याने त्याच्या हावभावांना महत्त्व न राहता त्यांचं बसणं,एकमेकांवर रेलणं इ.तून जवळिकीचं नातं दर्शवणं महत्त्वाचं.चित्रात मानवनिर्मित कोणतीच गोष्ट नाही.
माणसाला डोकं म्हणजे मेंदू मिळाला,पण त्याचा उपयोग त्यानं केला युद्ध,शोषण अशा गोष्टींसाठी.नाक,डोळे,तोंड,याशिवाय जोडीला इलेक्ट्रॉनिक उपकरणं असली तरी सध्या जवळीक नाही माणसामाणसांत.एकाकीपण आहे.म्हणून मग डोकंच नको किंवा नावापुरतं ठेवू यात.मग होईल ना अशी सलगी?असे काहीसे ही चित्रे काढताना मनात असावे,असे त्यांना वाटते.
काही चित्रांत डोक्याच्या जागी झाडं उगवलेली,तर पायांना मुळं फुटलेली दिसतात!
पुढच्या त्यांच्या काही चित्रांत मग अचानक बासरीवाला,तबलेवाला,ढोलकीवाला हेही आलेले दिसतात.ते मी का येऊ दिले असावेत,असा प्रश्न ते इथे स्वतःलाच विचारतात.
*3) नाजूक रेषेतील मानवी आकार*
या चित्रांचा विषय वरच्यासारखाच एकत्र बसण्याचा,पण या चित्रांत हातात हात घेऊन चालणारे,आनंदाने नाचणारेही.एकजीवत्व अधिक.
शिवाय यातील मानवी आकृत्या शिडशिडीत.कधी तर सूक्ष्म रेघेसारख्या.
*4)युगुल चित्रं*
खूप सुंदर आहेत ही चित्रं.आधीच्या चित्रांत डोकं नावापुरतं काढलं होतं.चेहरा नव्हता.आपल्याला चेहरा काढता येत नाही म्हणून तो काढणं आपण टाळलं का?असं त्यांना वाटू लागलं.
मग त्यांनी केसांच्या जागी पर्णसंभार,ओठांच्या व डोळ्यांच्या जागीही पाने वापरून अर्धोन्मिलित डोळ्यांची प्रेमिका काढली.मग वेलाच्या रूपात प्रियकराचा चेहरा काढला.एक आत्ममग्न,एकमेकांत बुडालेलं युगुल दिसू लागलं. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आला.
मग अन्य युगुल चित्रांत आश्चर्य,राग,व्यथितपणा इ.भावना दाखवणं त्यांना आपोआप जमलं.समाधान झाल्याने मग त्यांनी परत अशी चित्रे काढली नाही!
*5)जाड रेषांचे चेहरे*
जाड मार्कर वापरून काढलेले हे चेहरे विविध भाव व व्यक्तिमत्वे दाखवणारे आहेत.एकाच रेघेत हे चेहरे साकारण्याची करामत त्यांनी कशी साधली;हेही प्रत्येक चित्रवर्णनात सांगितले आहे.ते वाचायचे व चित्र बघायचे.मजा येते सगळे समजून घेताना.
*6)चेहरे,चित्रं की शिल्पं?*
बारीक टोकाच्या काळ्या पेनने काढलेले हे चेहरे जणू शिल्पच वाटतात! यात पेनच्या गोल गोल रेषा काढत शेडिंग केल्याने चित्रात चेहऱ्याच्या स्नायू वगैरेंना उठाव आलाय.नाक मोठं,उठावदार.डोळ्यांच्या जागी काही नाही,पण डोळ्यांच्या खाचाही नाहीत.पण डोळ्यांचा भास मात्र होतो.डोक्यावर केस नाहीत. डोके,कपाळ एक,पण पाच चेहरे,सयामी जुळ्यांसारखी डोके चिकटलेली,पण विरूध्द दिशेला तोंड असलेली माणसं,चेहऱ्यात पोकळी दाखवलेलं चित्रं,चेहऱ्याचं सुट्या भागात रूपांतर करून काढलेलं शिल्पवजा चित्रं अशी विविधता यात आहे.
*7)हत्ती प्रचंड आणि गोंडस*
एका रेषेत संपूर्ण हत्ती काढण्याचा त्यांचा प्रयत्न वर्णिला आहे.सोंड वर करून चालणारे,समोरासमोर उभे असलेले,सोंडेला सोंड लावणारे,कळपातले,डोंगरांतून चालणारे..अशी हत्तींची मन प्रसन्न करणारी विविध रेखाटने आहेत.
यातच गणपतीची सुंदर रेखाटनेही समाविष्ट आहेत.
*8)मोर नाचती रेषेत,रंगात*
इथले मोर आपल्याला जरा वेगळ्या रूपात दिसले,तरी आवडतात.सुरूवातीला त्यांचे काढलेले मोर वास्तववादी होते.पण मग त्यांनी त्याची चोच,मान,तुरा,शरीराचा भाग यात सुटसुटीतपणा आणला आणि सगळं लक्ष त्याच्या पिसाऱ्यावर केंद्रित केलं.पिसारा काढतानाही स्वातंत्र्य घेतलं.म्हणजे मोर पिसारा कधी पानांचा,कधी फुलांचा,तर कधी निष्पर्ण झाडाच्या फांद्यांचाही!
मोर तर रंगीत हवाच,पण असलेले स्केच पेन पुरवून वापरावे लागणार होते,म्हणून मुख्य पानांऐवजी पिसाऱ्याच्या मधल्या मोकळ्या जागांत रंग भरून छानसा परिणाम कसा साधला ते अगदी मोकळेपणाने लिहिलं आहे.ही रेखाटनेही सुंदरच.
*9)गुंतला जीव झाडात!*
ही चित्रे खरंच अगदी अप्रतिम आहेत.श्री.मधुकाका कुलकर्णी यांनी दिलेल्या उरलेल्या उभ्या/आडव्या निमंत्रणपत्रिकांच्या मोकळ्या भागावर काढलेली ही चित्रे कॅनव्हासवरील मोठ्या चित्रांसारखाच परिणाम साधतात,हे विशेष.या त्यांच्या चित्रांना कुमार गंधर्वांनी कशी दाद दिली,तो प्रसंग त्यांनी छान वर्णिला आहे.निसर्गातील विविधता कुतुहलाने न्याहाळणाऱ्या डॉ.अवचटांची बारीकसारिक निरीक्षणे या चित्रांत उतरलेली आपल्याला दिसतात.
डोंगररांगातील अंतर दाखवताना टिंबांचा वापर कसा केला,धुकं दाखवण्यासाठी टिंबांची घनता व विरळता यांचा वापर केला वगैरे छान सांगितलं आहे.पर्णसंभार छोट्या छोट्या गोलांनी दाखवला,तर खोडांवरचं शेडिंग लांब रेषांनी.चित्रात वेगळे पोत जाणवावेत म्हणून त्यांनी वापरलेली तंत्रं इथं दिली आहेत.
ही चित्रं त्यांनी काळ्या स्केच पेनने तर कधी जाड मार्करने काढली.सफरचंद खाताना घडलेल्या एका प्रसंगात मार्करने शेडिंग करण्याची युक्ती त्यांना कशी सापडली,तिचा त्यांनी चित्रात शेडिंगसाठी कसा वापर केला,ते सविस्तर लिहिले आहे.
*10)जादूची पेन्सिल*
0.5 पेन्सिलीने चित्रं काढायला कधी व कशी सुरूवात केली,ती कशी जादुई वाटली हे सांगितले आहे. त्याच्या धरण्याच्या वेगवेगळ्या पध्दती व त्याचे होणारे परिणाम यावर प्रयोग केले.
याने शेडिंग करताना चित्रावर बोट फिरवून इतर सगळे जसं शेडिंग करतात;ती पध्दत न वापरता त्यासाठी तास-तास लागले,तरी हलक्या हलक्या पुसट रेषांचा वापरच त्यांनी शेडिंगसाठी केला हे त्यांचे वैशिष्ट्य.
आकाश,डोंगर,झाडं व पाणी हे चारच विषय आपण नेहमी हाताळले,हे त्यांनी जसं इथे सांगितलं,तसं ओघाओघाने कोणत्याच चित्रावर आपली सही नसते,ही बाब ते सहज सांगून जातात. भव्य,आदिम निसर्ग,त्याचंच सगळं..हा विचार त्यामागे आहे.
*11)स्केचपेनची चित्रं*
संख्येने कमी असली,तरी ही चित्रेही सुंदर,रंगांची त्यांची जाण दर्शविणारी आहेत.
काही चित्रे मोठ्या रंगीत मार्करने गुळगुळीत आर्ट पेपरवर काढली त्यांनी,पण या सर्वात ते फार काळ रमले नाहीत.
*12)नंतर आल्या ऑईल पेस्टल्स*
कुठेही न्यायला आटोपशीर म्हणून हे माध्यम नंतर त्यांनी वापरलं.पण कार्डावर त्याने काढलेल्या चित्रात त्यांचं मन रमेना.
एकदा गुळगुळीत आर्ट कार्डावर हे ऑईल पेस्टल्स वापरून काढलेलं चित्र त्यांना खूप भावलं.त्यावर सारे रंग फ्रेश व एकमेकांत मिसळलेले दिसू लागले.मग वेगवेगळे प्रयोग केल्यावर त्यांना त्यांतून वेगवेगळं टेक्श्चर निर्माण करता येऊ लागलं,मग ते त्यात रमले.
*13)रम्य कोरडे खडू*
हे रंग त्यांनी खूप वेगळ्या प्रकारे वापरले.
बोट त्या रंगीत खडूवर घासून कार्डावर उमटवू व फिरवू लागल्यावर त्यांना जलरंगांसारखा परिणाम दिसला.मग त्या खडूंची पावडर करून किंवा त्यांचे छोटे छोटे तुकडे चित्रात दाबून किंवा चित्रात ते फिरवण्यासारख्या तंत्राचा वापर करून वेगवेगळे परिणाम साधण्यात ते यशस्वी झाले.त्या रंगांची सरमिसळ होऊन झालेल्या रंगछटांचा छान वापर त्यांनी केला.अशा चित्रांत त्यांनी खोडासाठी पेन्सिल हे माध्यमही वापरून छान उठावदार चित्रे काढली.
*14)अखेरचं थोडं*
सुदैवाने त्यांनी त्यांची चित्रं नीट जतन करून ठेवली,म्हणून आपल्याला बघायला मिळत आहेत.
आपल्यासारखा असा नादिष्टपणा प्रत्येकाने केला,तर वखवख,एकाकीपणा किंवा ईर्षा या सगळ्यांवर उत्तर मिळेल,असं त्यांना वाटतं.त्यामुळे आपल्या गरजा मर्यादित ठेवून रोजच्या व्यापातून आपल्या छंदासाठी प्रत्येकाने वेळ काढावा,असं ते सुचवतात.
या चित्रांनी मला काय दिलं?या स्वतःच्याच प्रश्नाचं उत्तर देताना ते लिहितात,"मला चित्रांनी निसर्गातली भव्यता पाहायला शिकवलं,तसंच सूक्ष्मता न्याहाळायलाही.मी माझ्यातल्या अज्ञातालाही बाहेर येऊ दिलं.या अज्ञाताच्या स्पर्शाने ज्ञातामधले दोषही कमी होत गेले.हे चित्र माझं आहे,त्या अमक्यापेक्षा मी सरस काढतो...वगैरे भाग गळून पडला.ते चित्र आहे,आणि ते घडताना मी तिथं होतो,या चित्राला माझा हातभार लागलाय ही किती भाग्याची गोष्ट!
त्यामुळे ती चित्रं माझी आहेतही आणि नाहीतही!"

Group content visibility: 
Use group defaults

सरिवा,
अहो किती सुंदर लिहिलं आहेत!
पुन्हा एकदा वाचलं
पुस्तक खरेदी करणार हे वेगळं सांगत नाही...

खूप छान लिहिलं आहे. त्यांच्या 'छंदांविषयी' पुस्तकात त्यांनी लिहिलेलंच आहे चित्रकलेच्या छंदाबद्दल. पण प्रत्यक्ष चित्रं खूप नाहीयेत त्यात. हे पुस्तक वाचायला आवडेल.

छान लिहिलंय..
आता लेकीसाठी (आणि माझ्यासाठीही) नक्की विकत घेणार.

छान ओळख.
समकालीन प्रकाशनाच्या संपादकांना लिंक पाठवली आहे. Happy