एकटीच @ North-East India दिवस - ११

Submitted by सुप्रिया राज जोशी on 24 February, 2020 - 09:02

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

16 फेब्रुवारी 2017

प्रिय नानी,

तुला पत्र लिहिलं नाही असं कसं होईल? माझे एकेक पत्र तू वाचतेस, पत्रांना उत्तर लिहितेस, हे आहेच. पण माझं माझं आयुष्य मीच मज्जा करत कसं जगायचं ह्याची जाण मला ज्यांच्याकडे बघून झाली, तू त्यातली एक आहेस. ती 'मिली'मधली मिली होती ना, तशीच आमच्या लहानपणी तू आमची नानी होतीस. भुवईच्या कमानीलगत सतरंगी थेंब थेंब ठिपके लावून तू आम्हाला भारी हिरोईन बनवायची, हातावर मेंदीही काढायचीस आणि आमचे नाच गाणी नक्कल असे काही काही कार्यक्रम घ्यायचीस. तू कुठूनशी शोधून काढलेली कोड भाषा तर अज्जून उपयोगाला येते. पण इथे आत्ता तुझी विशेष आठवण आली त्याचे कारण विशेष आहे. ते येईल पुढे. मागचं पत्र जिथे सोडलं तिथून आता सुरवात करते.

मी गोहाटी ला पलटण बाजार ला फेरफटका मारायला म्हणून बस गाडीत बसले. ह्या गाड्या खूप आरामदायी आहेत. आज सकाळी पहिल्यांदा गोहाटीच्या पब्लिक बसमध्ये मी चढले तेव्हा तिचा अवतार बघून उलटी खाली उतरले होते. मला वाटलं चुकून मी long distance सेमी लक्झरी मध्ये चढले. पण माझी बस आणि अंदाज चुकले ते मागाहून कळल. बाकी या बसेसच्या सीटस् वगैरे एकदम फर्स्ट क्लास! 10 रुपयात ही बस कुठे कुठे फिरवते. मला या ISBT बसेस जाम आवडल्या. पण आत्ता तो कंडक्टर पलटण बाजार ओरडला तरी मी तंद्रीतच होते. मला घेऊन बस पुढे गेली तो मात्र वैताग झाला. स्वतः वर चरफडत पुन्हा उलट्या दिशेने पलटण बाजारचे तिकीट काढावे लागले.

गोहाटीचे रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इथेच पलटण बाजार ला आहे. कालचा अनुभव गाठीशी होता तर पुढच्या प्रवासात अपरात्री पोहोचणे सहसा टाळायचे, ही गाठ मनाशी बांधली होती. त्यानुसार प्लानिंग करायला म्हणून निघाले. गोहाटी वरून दुसऱ्या राज्यांत जाणाऱ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट ची माहिती, फोन नंबर्स गोळा केले.
52606136_10156874449482778_7379033580107726848_n.jpg

खूप दिवसांपासून गोड मिठाई खायची इच्छा होत होती. इथे एक चांगलासा दिसणारा मिठाईवाला (म्हणजे ज्याची मिठाई चांगली दिसत होती) सापडला. मग माझी चैन झाली. मी मिठाईच मिठाई खाल्ली. व्होडाफोन च्या गॅलरीत गेले नि नेटवर्क का मिळत नाहीये त्याची माहिती काढली. दोनच तास पायपीट केली असेल, पण तेवढ्याने ही मी दमले. दमले म्हणण्यापेक्षा झोप नाही मिळाली नि पिरिएड्स चा त्रास म्हणून हालत खराब झाली.

इथे सात वाजताच रात्र होऊ घातली. मिठाई नि सामोसे खाऊन पोटही गच्च भरले. मग मी मलाच सांगितले की 'हे तुझे डिनर होते'. आता फक्त झोपायचे काम उरले आहे. तेच डोक्यात घोळत होते का काय, मला बसमध्येच झोप लागली. गणेशगुडीच्या चार स्टॉप पुढे बस पोहोचली तेव्हा खडबडून जाग आली. या बस च्या पायी अजून एकदा वैताग आला पण उपाय काय? त्या बसमधून उतरून, उलट्या दिशेच्या या बसमध्ये बसले. गणेशगुडी पासून कायली पाडाला पोहोचायला पंधरा मिनिट पायी चालावे लागते. लेफ्ट राईट करत घरी पोहोचले तोवर पुन्हा झोप पुन्हा रुसल्यागत झाली. थोडी तिची मननधारणी केल्यावर मात्र अशी येऊन अशी बिलगली की इतक्या दिवसातल्या सर्वात गाढ झोपेनंतर पहाटे एकदम ताजीतवानी होऊन उठले.

इथल्या नीलाचल पर्वतावरच्या कामाक्षी मंदिर हे शक्तीपीठ आहे. कुठलासा कालावधी असतो की सलग तीन दिवस इथे देवी सतीच्या गर्भगृहात जल प्रवाहाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे). या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते आणि इथे देवीच्या योनीची पूजा केली जाते. पण मला अशा रोचक पण बुद्धीला न झेपणाऱ्या गोष्टीत विशेष रस वाटला नाही. कलाक्षेत्र म्युझिअम मात्र पहावे असे वाटले, तशी तिथे निघाले.

पण त्याआधी परमिट ऑफिस ला जाऊन नागालँड, अरुणाचल, मिझोराम या तीन स्टेट्स चे ILP इनर लाईन परमिट घ्यायचे हे ट्रिपल काम पार पाडायचे होते. इथे प्रत्येक स्टेटचे परमिट घ्यावे लागते आणि त्यांची ऑफिसेसही वेगळी वेगळी असतात. या परमिट प्रकाराने तर पार गंगटोक पासूनच माझी सटकली होती तरी नेटाने तीन मिलीमीटर चालून Nagaland Resident Deputy Commissioner च्या ऑफिस ला पोहोचले तर आज शनिवार, ऑफिसला सुट्टी! आता सोमवारीच या म्हणे, जणू दोन दोन दिवस एकाच शहरात बस्तान मांडायला बॅगपॅकर्स कडे वेळच वेळ असतो. रस्त्यावर ताजा उसाचा रस दिसला तसे ग्लास भरून थंड रस पिउन घेतला तेव्हा कुठे डोके जरा थंड झाले.

52585301_10156874449802778_1030685622966157312_n.jpg

गोहाटीचे आसाम स्टेट म्युझिअम वेगळे नि हे कलाक्षेत्र म्युझिअम वेगळे ! दहा रुपयाच्या माझ्या आवडत्या बसने मी म्युझिअम ला गेले, तर काय सांगू? इथे शिरल्या शिरल्या सुंदर फुलांचे ताटवे बघून दिल खुश हो गया | अशा रम्य ठिकाणी मला पायातल्या चपलांचे ओझे वाटते.

52146404_10156874450417778_8337486958485831680_n.jpg

मग मी माझी चप्पल एका झुडूपात लपवून ठेवली आणि अनवाणी निघाले. हे म्युझिअम एक नंबर आहे. असामी कल्चर ची भरपेट मेजवानी. सण, पुराण, पोशाख, हस्तकला, शस्त्रे, घरांची रचना, कला, नृत्य...सारे मांडले आहे. म्युझिअमचे रसग्रहण करतात तो टाइप माझा नाही... पण तीन मजल्यांचं हे म्युझिअम कुणालाही आवडेल असं आहे.

52117918_10156874451532778_3832495237725421568_n_0.jpg

मी बाहेर पडले तेव्हा दुपार टळू लागली होती. बगिच्यात फुले पहात फिरत होते तर मला काय दिसले असेल? ती आपली चार पाकळ्यांची लाल फुले, ज्याच्याशी तू माझी लहानपणापणी ओळख करून दिलीस पण त्यांचे खरे नाव मला अजून माहित नाही. तू त्यांना जंगली फुले असे म्हणतेस. एका कानाची रिंग दोन दिवसांपासून हरवलीच आहे मग एक फुल कानात दागिन्यांसारखे घातले, तू लहानपणी आमच्या कानात घालायचीस अगदी तसेच! तू जसे शिकवलेस अगदी तसेच, एकेक फुल घेऊन त्यातला मध चाखला. अशा वेळी तुझी आठवण झाली नाही असे कसे होईल? म्हणून आताच इथेच बसून तुला पत्र लिहायला घेतले आहे.

आज मयूर इथे गोहाटी ला पोहोचणार. तो त्याची नवीन Audi घेऊन मुंबईवरून आला आहे. त्याच्या बरोबर उद्यापासून चार पाच दिवस माझी जिप्सी स्टाईल सोडून रोड ट्रिप करायची असे ठरले आहे. बोले तो लक्झरी बोलते है ना आपुनभी वोहीच करेंगा।
पत्र कधी पोस्ट करता येईल ते मात्र नाही. माझ्या मोबाईलला बरेच दा नेटवर्क नसते. पण जेव्हा मिळेल तेव्हा उत्तर नक्की नक्की लिही. I love you.

तुझी
सुप्री.

Group content visibility: 
Public - accessible to all site users