आनंदछंद ऐसा- कविन

Submitted by कविन on 24 February, 2020 - 00:59

चंचल आहे हो पोर. एकात धड मन रमेल तर शप्पथ. तशी हुशार आहे पण सगळी हुशारी अशी एकाच कामात लावेल तर ना चीज होईल. हे एक टोक आणि आमच्या ठकीला ना सगळ्यात इंटरेस्ट आहे. सगळ करुन पहायच असतं हे कौतुक भरलं दुसरं टोक यामधे आमचा पेंडूलम झुलत रहाण्यातच लहानपण गेलं. मोठं होताना यालाच Jack of All & Master of none म्हणतात हे समजलं पण या वाक्यात कौतुक भरलय कि उपहास हे आजतागायत कळलं नाहीये. कदाचित दोन्ही असावं असा अंदाज आहे. तर ते असो यावरुन हे कळलं असेलच कि आस्मादिकांना एकापेक्षा जास्त छंद आहेत.

लहानपणी सगळ्यात आवडती गोष्ट होती पुस्तक वाचन. खा खा सुटल्यासारखी पुस्तक वाचत सुटायचे तेव्हा. त्यापुढे तहान भूक अभ्यास असल्या गौण गोष्टी दिसायच्याही नाहीत. ओरडा बसला घरच्यांचा कि मग रात्री सामसूम झाल्यावर पांघरुणाच्या आत डोकं खुपसून टॉर्चच्या रुमालाने कमी केलेल्या प्रकाशात पुढच वाचन सुरु अशा प्रकारे डोळ्याची उत्तमप्रकारे वाट लावत पुस्तक पूर्ण करणं चालायचं. अजूनही आवडत वाचायला पण आता तहान भूक सोडून एका बैठकीत पुस्तक वाचण दूर पण एकूणच वाचन संख्या कमीच झालेय. वेळेच्या वाटणीत काम कर्तव्य आणि इतर छंद हक्क गाजवायला येऊन बसलेत.

तसं लहानपणीही आईने मला कशाही करता नाही म्हंटल नाही. "नाचाच्या क्लासला जाऊ?" मी चारदा एकच प्रश्न विचारल्यावर चौकशा करुन क्लास लावला गेला. मी २-३ महिने गेले असेन नंतर परिक्षेकरता ब्रेक झाला तो कायमचा. त्यानंतर बऱ्याच फेज आल्या गेल्या. गाणं, पेटी, भरतकाम, विणकाम, कोन पेंटिंग, रांगोळी याचे आले वारे गेले वारे. एक पेंटिंग भिंतीवर सजलं ते अगदी भिंतीला ओल येऊन ती ओल पेंटिंगवर पसरेपर्यंत भिंत अडवून बसलं होतं. एक दोन ड्रेसचे गळे स्वहस्ते भरुन झाले. आमच्या आणि नातेवाईकांच्या दारावर विणकामाची तोरणे, ताटावरचे रुमाल विणलेल्या पर्सच्या भेटी अस सगळं कौतुक सोहळ्यात नहाणं झालं. जेव्हा तळमजल्यावर रहात होतो आणि दारापुढे अंगण होते तेव्हा शेणाने अंगण सारवून मग आमच्या दारापुढे शेजाऱ्यांच्या दारापुढे तासंतास रांगोळी काढण्यात घालवले. आणि एकदिवस कंटाळा येऊन सगळे बासनात गुंडाळून माळ्यावर धाडून दिले.

सूर गळ्यात आणि कानात नाहीत आपल्या आणि नाचाशी आपलं गेल्या जन्मीही सख्य जुळलं नव्हतं तर या जन्मी काय जुळणार? हे कळण्यासाठी का होईना त्या दोन चार महिन्यांच्या क्लासचा उपयोग झाला हाच काय तो फायदा. भरतकाम विणकाम जमतय पण ते हि सो सो त्यात झोकून देऊन प्रयोग करत रहावेत इतकी त्यात आवड नाही हे समजल्यामुळे म्हणा किंवा एकच गोष्ट न कंटाळता करत रहाण्याचा स्वभाव नसल्यामुळे म्हणा पण त्या आवडींच पॅशनमधे रूपांतर झाले नाही. पण अजूनही भावासाठी राखी हॅन्डमेड करण्याच्या माझ्या नियमामुळे वर्षातून एकदा तरी विणकामाची सुयी आणि लोकर बाहेर निघते. अजूनही त्या साखळ्या आणि खांबांमधे थोडाकाळ का होईना रमायला होते.

मग आले लेखन. अचानक कविता व्हायला लागल्या. लिहून बघावे वाटू लागले. इथे मायबोलीवरच धडपडत लिहायची सुरुवात झाली. दरवेळी इथे प्रोत्साहनच मिळत गेले. अगदी अनपॉलिश्ड अशा लिखाणालाही प्रोत्साहन मिळाले, नेमक्या सुचना सल्ले मिळाले आणि लिहीत रहायची आवड फुलत गेली. ट्रेनच्या प्रवासात, गर्दीच्या रेटात मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर नोटपॅड आणि वर्ड ॲपवर खरडण्यात प्रवास एकदम पंख लावून विनातक्रार होऊ लागला.

मधेच छोटे सोपे झेपतील असे ट्रेक करुन पहायचं वेड अंगात शिरलं. आपण जाऊन आलेल्या सोप्या ठिकाणी मुलांनाही नेता येऊ शकेल का या विचाराने उचल खाल्ली. त्याला ट्रेकर मित्रमैत्रिणींची साथ मिळाली आणि काही वर्ष लहान मुलांचे दिवाळी आणि उन्हाळी कॅंप नेऊन पहायच्या इच्छेची पूर्ती झाली. महिलामंडळ स्पेशल ट्रेकच आयोजन करायच्या कामात सहभाग नोंदवता आला. या कामात मी एकटी नव्हते. पण या अनुभवांनी मला खूप काही अमूल्य असे क्षण दिले. आता त्या भरतकाम विणकाम आवडीसारखेच सध्या ट्रेकचे वेडही कुठल्यातरी गुंफेत विश्रांती घेतय.

भरतकाम वगैरे बासनात गुंडाळले असले तरी एक दिवस वेगळ्या प्रकारच्या क्राफ्टने दार उघडून घरात प्रवेश केला. लेकीला एका वाढदिवसाला कुणीतरी क्विलिंग सेट भेट दिला होता. बाईसाहेब काही त्याकडे बघायला उत्सूक नव्हत्या. मग 'यूट्यूब नम:' म्हणत त्या पट्ट्या फुकट जाऊ नयेत म्हणून सुरुवात केली आणि त्यातही इतर काही नाही पण कानातले बनवायला मजा येतेय जाणवलं. ते अख्ख वर्ष क्विलिंग इअररिंग्ज मय होतं. बऱ्याच जणींना भेट द्यायला क्विलिंगचे कानातले केले गेले. अगदी मैत्रिणी म्हणाल्या म्हणून त्याची विक्रीही केली. पण तो व्यवसाय म्हणून गांभिर्याने घ्यावा इतपत पॅशन नव्हती, आवड जरूर होती. त्यानंतर कालाघोडा फेस्टिव्हलमधे फॅब्रिकचे कानातले पाहिले. कसे केले असतील? या विचाराचा भुंगा पाठ सोडेना. तस्सेच सेम यूट्यूबवरही मिळेनात. मग त्या बाईंना वर्कशॉप घेता का? कोणी शिकवत का विचारुन झाले पण त्यांनी तर मला चक्क हुर्र केले. मग 'एकलव्य' हा आपला आदर्श म्हणत एक कानातले विकत घेऊन घरी येऊन त्याच डिसेक्षन करुन शिकले स्वत: आणि मग झपाटल्यासारखी कानातले करत राहिले. भेट दिले, विकले, स्वत:साठी केले. त्याकाळात घरात कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात एखादी कडी एखादा मणी एखादा फॅब्रिक पीस जाऊन पडलेला दिसायचा. केरात रोज काही ना काही यातलं दिसायचं. हे अजूनही सुरु असतं अधूनमधून पण खर सांगायच तर जेव्हा विक्रीच मनावर घेतलं तेव्हा ताण यायला लागला अस लक्षात आलं. मग कमिटमेंट पूर्ण करायला वेळ ताकद खर्च व्हायला लागली आणि त्यातला 'फन फॅक्टर' कमी झाला. त्यामुळे काही दिवस पूर्ण बंद केलं काम आणि विक्री हा फोकस बाद केला. हे केल्यावर लक्षात आलं कि आता परत त्यात मजा येतेय करायला. पण तेच एक काम करत रहायला नाही आवडत आहे.

दरवेळी मनात यायचं कि 'एक ना धड भाराभार चिंध्या' असा का आहे आपला स्वभाव? खरच हुशारी एकात का नाही वापरली जात (फार काही नाहीये पण त्यामुळेच लिमिटेड असलेली हुशारी अशी वाटली जाऊन फार काही उरत नाही प्रत्येकाच्या वाटणीत). एकावेळी एक फार तर दोनच गोष्टी सुरु असतात पण कायमच एकाच गोष्टीत मात्र रमायला होत नाही. सुरवातीला याचं वाईट वाटायचं, अपराधी वाटायचं आणि मग स्वत:ला शाब्दीक मार देत हे बदलायचा प्रयत्न व्हायचा. पण मग लक्षात आलं कि अस केल्याने मी एक सुरु असलेली गोष्टही नीट नाही करु शकत आहे. त्यातली मजा गंमतच हरवतेय.

मग म्हंटल कशाला दुष्टपणा करायचा आपणच आपल्यावर? एकदा ॲक्सेप्टच करुन टाकूयाना आपण jack of all & master of none आहोत हे. अस जेव्हा स्वत:चं स्वत:ला स्विकारल ना तेव्हा जरा काम सोपं झालं. master व्हायचा ताण गेला. जे नाही आहे ते होण्याचा ताण गेला. छंद म्हणाल तर अजूनही वाचन, लेखन, विणकाम भरतकाम क्विलिंग फॅब्रिक ज्युलरी त्या त्या वेळी जे करावसं वाटेल ते सुरु असतं. 'नवीन शिकत रहायची आवड' हाच आपला छंद आहे अस मनाशी मी मान्य करुन टाकलय.

एक गोष्ट करताना दुसऱ्या एखाद्या गोष्टीला स्वल्पविराम लागणं हे स्वाभाविक आहे. जेव्हा फुलस्टॉप लावावासा वाटेल तेव्हा तो हि लागेल. जशा सहज सुरु होतात तशा सहज त्या संपतातही गोष्टी. त्या त्या वेळी ती ती गोष्ट मन लावून पूर्ण होतेय आणि त्याची मजाही टिकून रहातेय हे हि सध्या पुरेसं आहे.

कोणी सांगावं कदाचित पॅशन पॅशन म्हणतात अशी एखादी गोष्ट बंद दारामागे योग्य वेळेची वाट बघत थांबली असेल. ती जेव्हा येईल तेव्हा 'एक ना धड भाराभार चिंध्या फेज' संपूनही जाईल. किंवा अशी काही गोष्ट नसेलच माझ्यासाठी. इतका पुढचा विचार करावाच कशाला पण? माझ्यासाठी आज आत्ता जे आहे ते मी प्रामाणिकपणे जगतेय, त्यातून आनंद मिळतोय. पुरेसं आहे हे देखील. शेवटी छंद म्हणजे काय? तर छंद म्हणजे, तुम्हाला आनंद देत समृद्ध करणारी तुम्हाला श्रीमंत करणारी गोष्ट होय. एखाद्याच आयुष्य भरजरी शेल्याने समृद्ध होतं तर एखाद्याच वेगवेगळे तुकडे जोडून केलेल्या क्विल्टने होतं. माझ्या भाराभार चिंध्यांनी माझ्या आयुष्यात असच एक छान क्विल्ट केलय ज्याची ऊब माझ्यासाठी अनमोल आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय
मी पण एक ना धड भाराभर चिंध्या गटातला.
चिंध्यांची गोधडी ही कल्पना आवडली.

अप्रतिम … शब्द न शब्द रिलेट झाला !!

शेवटी छंद म्हणजे काय? तर छंद म्हणजे, तुम्हाला आनंद देत समृद्ध करणारी तुम्हाला श्रीमंत करणारी गोष्ट होय. एखाद्याच आयुष्य भरजरी शेल्याने समृद्ध होतं तर एखाद्याच वेगवेगळे तुकडे जोडून केलेल्या क्विल्टने होतं. माझ्या भाराभार चिंध्यांनी माझ्या आयुष्यात असच एक छान क्विल्ट केलय ज्याची ऊब माझ्यासाठी अनमोल आहे.

>> अप्रतिम …

खर सांगतो , याच विषयावर काहीतरी लिहायच गेल आठवडाभर मनात होत , पण याच्या जवळपासही मला लिहिता आल नसत , आपल्या भावना शब्दात मांडता येणं हे खरच् एक फार मोठी कला आहे Happy

छान.
छंद सोडायचे नसतात त्यांनी आपल्याला सोडलं तरी. बदलायचे.

पण अशा पध्दतीने का होईना, बरेच काही करता आले, तो आनंद मिळवता आला हे ही कमी नाही ना!
आवडले.

एखाद्याच आयुष्य भरजरी शेल्याने समृद्ध होतं तर एखाद्याच वेगवेगळे तुकडे जोडून केलेल्या क्विल्टने होतं. माझ्या भाराभार चिंध्यांनी माझ्या आयुष्यात असच एक छान क्विल्ट केलय ज्याची ऊब माझ्यासाठी अनमोल आहे.>>>>>> अहा!
किती मस्त लिहिलंय!

छान लिहिलंय.
चिंध्यांची गोधडी ही कल्पना आवडली. >> +१

मस्त लिहिलंस . अगदीच रिलेट झालं
सगळं करून धडपडत करण्याची मजा औरच असते . नवीन शिकायला मिळतं .

रच्याकने तुझी रास मिथुन आहे का Wink

धन्यवाद मंडळी Happy

रच्याकने तुझी रास मिथुन आहे का Wink>> बरोबर ओळखलस Lol

काय मस्त लिहितेस गं. सगळं रिलेट झालं.
मुख्य म्हणजे तुझी विषय मांडण्याची हातोटी खूप छान आहे. लेखातील शाब्दिक कोट्या मस्तच!

ऑलराऊंडर म्हणते मी याला, ग्रेट कवे.

रांगोळ्या त्या आमच्यापुढच्या एरियातल्या घरात का, मुकले ना मी ही कला बघायला. आपण ओळखत नव्हतो ना तेव्हा एकमेकींना.

कविन, छान आहेत छंद.
मला अगदी पटलंच. मी स्वतः ह्याच चिंध्या वर्गातील असल्याने जो न्यूनगंड होता तो तुमचा लेख वाचून कमी झालाय. धन्यवाद.

छान लिहलंय.
सगळ्या छंदचे एकेक सॅम्पल फोटो बघायला आवडले असते.

इथे काही फोटो बघता येतील.

काही गोष्टी शोधून पेटाऱ्यातून बाहेर काढून धूळ झटकून फोटो काढावे लागतील. पण मुळात इतके काही वॉव भारी लई भारी अस क त्यात नाही आहे. (हा विनय नसून रिॲलिटी चेक आहे :D)

ट्रेकचे फोटो/ लिखाण
आवडलेल्या काही पुस्तकांबद्दल परिक्षण आणि लिखाणात केलेली गिरमीट काही प्रमाणात इथे मायबोलीवर माझ्या पाऊलखुणामधे आहेच.

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार Happy प्रोत्साहन मिळण्याबाबत मी कायमच नशीबवान असल्याचे मला जाणवले आहे. त्याकरीता मनापासून धन्यवाद

कवे किती छान लिहिलेस !!! अग याला मराठीत versatility म्हणतात . Wink
शॉर्ट फिल्म बद्दल नाही लिहिलेस ते? ते पण मनापासून केलंस. ऑल राउंडर आहेस.

माझ्या भाराभार चिंध्यांनी माझ्या आयुष्यात असच एक छान क्विल्ट केलय ज्याची ऊब माझ्यासाठी अनमोल आहे. >>> क्या बात!!! मस्त लिहिलंय!

अगं किती मस्त लिहिलं आहेस. मी पण अशीच आहे तुझ्यासारखी त्यामुळेच ठरत नव्हतं काय लिहू छंद या विषयावर? Wink
लिहिण्याची हातोटी छानच आहे तुझी. जे मनात ते कागदावर छान उतरलं आहे.

छान Happy

मस्त. भरपुर गोष्टी केल्या आहेस. पण, मुली एक छंद विसरलीस. Happy आणि त्याचा मात्र कंटाळा येऊ दिला नाहीस याबद्दल आनंद वाटतो. Happy

खूप छान कविन. माझ्याच मनातले वाचत आहे असे वाटले. आणि वरचे प्रतिसाद वाचताना असे बरेच जण आपल्या कैटेगरीतले आहेत हे बघून हायसे वाटले.

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार

सुनिधी, विसरले नाही ग. पण तो छंद नाही ती गरज आहे माझी. जबाबदारी किंवा कर्तव्य म्हणता येईल कदाचित. आणि कुठे एकटी जाऊन काही करतेय वेगळं. तुम्ही सगळे आहातच कि सोबत सतत प्रेरणा देत रहात. मला खात्री आहे मीच नाही तू, प्राची,महेंद्र, मनोज,निखील, अकु प्रत्येकाची भावना हिच आहे Happy

Pages