मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२०

Submitted by हर्पेन on 17 February, 2020 - 07:06

मैत्री स्वतःशी, मैत्री सर्वांशी.

'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती या करता काम करते. स्वयंसेवी माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता आपले काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे आम्ही आनंदाने करतो.

शक्यतो मैत्रीच्या मेळघाटातील उपक्रमांमधे लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ह्यावर आमचा भर आणि कटाक्ष असतो. त्या करता पुण्या-मुंबईतून सामील होणार्‍या स्वयंसेवकाला (जाणे येणे धरून) साधारणपणे एक आठवडा बाजूला काढावा लागतो. अशा प्रकारे आपण मेळघाटात जावून एखाद्या कार्यक्रमामधे स्वतः सहभागी होऊ शकता. तुम्ही तज्ज्ञ व्यक्ती म्हणून शिबिरामध्ये तुमचे ज्ञान व कौशल्य शिकवू शकता.

तुम्हाला मेळघाटात जाणे शक्य नसेल तर तिथल्या उपक्रमांची पूर्वतयारी करण्यामध्ये पुण्यात मदत करू शकता. उदा. शैक्षणिक साधने बनवणे, तान्ह्या बाळांसाठी कपडे तयार वा गोळा करणे, ते पिशव्यांमध्ये भरणे, औषधे जमा करणे, धान्य/ शिधा गोळा करणे व पाठवण्याची व्यवस्था करणे इ.

गेल्या अनेक वर्षापासून 'मैत्री' आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भाने देखिल सातत्यपुर्ण कामगिरी करते आहे. त्याकरता त्या त्या वेळी प्रत्यक्ष
गरजेच्या ठिकाणी जाण्याबरोबरच तिथे न जाता करण्याजोगी अनेक कामे असतात त्यातही आपण सहभागी होऊ शकता.

पुण्यामध्ये ग. रा. पालकर शाळेत आपण इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी मदत करतो, त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता.

तुमच्या सोसायटीमध्ये 'रद्दी संकलन' सुरु करू शकता.

'मैत्री' साठी निधी जमा करण्याचे काही कार्यक्रम आम्ही करतो, त्यात तुम्ही मदत करू शकता.

विविध कंपन्यामध्ये CSR ला पाठविण्यासाठी मेळघाट विषयीचे प्रस्ताव लिहिणे व त्याचा पाठपुरावा करणे या कामी आम्हाला मदत करू शकता. पुण्यातील ऑफिसमध्ये कार्यालयीन कामात काही वेळेला मदत लागते तेव्हा तुम्ही येऊ शकता.

'मैत्री' बाबत इतर लोकांना सांगून स्वयंसेवक व देणगी मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करू शकता.

अशा खूप काही कल्पना आणि मार्ग आमच्यापाशी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे यापेक्षा कितीतरी अधिक कल्पना असतील. चला तर मग, आपण एकत्र मिळून चांगले काहीतरी घडवूया.

Maitri is registered under the Bombay Public Trusts Act, 1950 on 31st July 1999 (E-2898 / Pune). PAN Number: AAATZ0344C, FCRA Registration Number: 083930473.

Office Address
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Bal Shikshan Mandir,
Mayur Colony,
Kothrud, Pune 411038

Telephone Numbers
Office: 9309930010

Website : http://www.maitripune.net
E-mail: maitri1997@gmail.com

मैत्रीच्या मेळघाट व इतर कामांसाठी तुम्ही यथाशक्ती आर्थिक मदत करू शकता.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२०) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“मैत्री” च्या आणखी एका उपक्रमाची सुरुवात यावर्षीपासून झाली.

कायदा हा आपला मित्र आहे. कायदे आपल्यासाठीच केले आहेत. परंतु त्याबाबतीत आपल्याला फार वरवरचं माहीत असतं. एक नागरिक म्हणून मला कुठले कायदे माहीत हवेत आणि त्याचा उपयोग मी कसा करून घ्यावा ह्यासाठी “मैत्री - कायद्याशी” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

कायदा हा केवळ कुणाची तरी अडवणूक करण्यासाठी नसतो. तर अधिक चांगली व्यवस्था असावी आणि सर्वांना न्याय मिळावा अशी त्यामागची कल्पना असते. परंतु त्याविषयी माहितीच नसते म्हणून गडबड होते. ह्या उपक्रमात आपण ग्राहक संरक्षण कायदा, पर्यावरणाचे विविध कायदे, राज्यघटना, महानगरपालिका कायदे पहाणार आहोत. हक्कांबरोबरच कायदा म्हणून आपली काय जबाबदारी आहे ते पहाणार आहोत.

ह्यातील पहिले पुष्प संजय शिरोडकर यांनी २६ जानेवारी २०२० रोजी इंद्रधनु सभागृह, म्हात्रे पुलाजवळ गुंफून ह्या उपक्रमाची सुरुवात केली. माहितीचा अधिकार हा कायदा काय आहे, एक नागरिक म्हणून मी ह्याचा कसा उपयोग करून घ्यावा ह्या बाबतची चर्चा ह्या ठिकाणी क रण्यात आली. आधी संजय शिरोडकर यांनी अत्यंत मौल्यवान माहिती सांगेतली आणि नंतर सभेला उपस्थित लोकांचे शंका समाधान करण्यात आले.

गेली ६ वर्ष कर्वेनगरमधील ग.रा. पालकर शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वीच्या कमी मार्क असलेल्या मुलांकरता विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय शिकवणं असा उपक्रम “मैत्री” चे स्वयंसेवकांमार्फत सुरु आहे. गेल्या ६ वर्षात मुलांमध्ये निश्चितपणे बदल घडून आलेला दिसत आहे. जी मुलं पेपर सुध्दा लिहू शकत नव्हती ती पेपर लिहायचा प्रयत्न करु लागली आहेत. गणितं सोडवायला लागली आहेत. या विद्यार्थ्यांना, वर्गातील इतर मुलांबरोबर आणणं, त्यांच्या मुलभूत संकल्पना पक्क्या करणं हे उद्दीष्ट आहे.

याच बरोबर यावर्षी पहिल्यांदाच जास्त मार्क मिळवणार्‍या १० मुलांचाही एक वेगळा वर्ग घेण्यात आला. यावर्षी फक्त ५ वीचा वर्ग घेतला. एका गटात वर्गात जास्त मार्क मिळवलेली १० मुलं आणि एका गटात कमी मार्क असलेली १० मुलं असे दोन गट केले आहेत. दोन दिवस एक विषय याप्रमाणे शिकवत आहोत. दोनही वर्ग सोमवार ते शुक्रवार शाळा सुरु व्हायच्या आधी सकाळी ८.०० ते ८.४५ यावेळेत घेतले जातात. यावर्षी एकूण ५ स्वयंसेवकांचा या उपक्रमात सहभाग होता.

आता मार्चमध्ये हे शालेय वर्ष संपेल आणि जून मध्ये पुन्हा सुरुवात होईल. यात कोणाला सहभागी व्हायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे. जास्तीत जास्त स्वयंसेवक सहभागी झाल्यास अधिक वर्ग आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल. जरुर संपर्क साधा “मैत्री” कार्यालय ९३०९९३००१०

आदिवासी नवमातांना बाळंतविड्याची भेट

“मैत्री” २२ वर्षांपासून मेळघाटातील दुर्गम गावात प्रत्यक्ष राहून कोरकू आदिवासीं सोबत प्राथमिक आरोग्य, शिक्षण सुधारणा, शेती सुधारणा अशी कामे करत आहे. स्थानिक आदिवासी युवक-युवती तसेच प्रशिक्षित आरोग्य मैत्रिणी या कामात “मैत्री” सोबत आहेत. १२ गावातील आरोग्य मैत्रिणी आरोग्य शिक्षणाचे काम करत आहेत. गरोदर महिला, नवजात अर्भकांची काळजी त्या घेत्तात. एरवी मेळघाटात आपण कोणत्याही प्रकार च्या वस्तूंचे वाटप करत नसलो तरी गेल्या ६ वर्षापासून प्रत्येक बाळंतिणीला आपण बाळंतविडा देत आहोत. या बाळंतविड्यात आईसाठी एक साडी, बाळासाठी झबले-टोपडं, दुपटं आणि स्वेटर अशा गोष्टींचा समावेश असतो.

आपल्याला ह्या वर्षी पुढील तीन महिन्यात मिळून ६५ बाळंतविडे बनवून पाठवायचे आहेत.

यासाठी आपणांकडून खालील गोष्टी अपेक्षित आहेत:
१. जुन्या परंतू चांगल्या स्थितीतील शक्यतो सुती किंवा सिंथेटिक साड्या.
२. नवजात बाळाला होतील असे वापरलेले पण चांगल्या स्थितीतील कपडे (झबली, टोपडी)
३. बाळासाठी दुपटी आणि स्वेटर

तयार बाळंतविडे मेळघाटात पाठवण्यासाठी प्रत्येक पोत्याचा खर्च साधारणतः रु. २५०/- आहे. हा खर्चही तुम्ही देऊ शकता.

अधिक माहितीसाठी 9309930010 ह्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा “मैत्री”ला मेल maitri1997@gmail.com करावी.

बाळंतविडे पाठवा अथवा न पाठवा. पहिलं आदिवासींचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. शासनही गरोदर आदिवासी महिलांना आहार, औषधे पुरवित असते. मुळात आदिवासी स्त्रिया अतिशय बारीक अंगकाठीच्या असतात. कायदा असला तरी १६, १७ वर्षांच्या मुलींचं लग्न लावून दिलं जातं. लगेच बाळंतपणं सुरू. कमीत कमी तीन मुले तर जास्त पाच-सहा होतात. दोन बाळंतपणातलं अंतर फार कमी असते. आदिवासी लोकांमध्ये मी बरीच वर्षे काम केले आहे म्हणून हे माझं निरीक्षण आहे.
जेव्हा आपल्या दोन पिढ्या होतात तेव्हा यांच्या तीन पिढ्या होतात.

आर्यन वाळुंज, सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मेळघाटात मैत्रीचे काम अनेक स्तरांवर चालू आहे.

आरोग्य मैत्रीणींमार्फत प्रबोधनाचे आणि गावमित्रांना सोबत घेऊन शिक्षणाचे काम चालू आहे. पण ते दीर्घ पल्ल्याचे, पायाभूत प्रकारचे काम आहे. अशा प्रकारच्या कामाची फळे दिसायला वेळ लागतो.

बाळंतविडे पाठवण्यामागे नवजात आदिवासी बाळ-बाळंतिणींना मानवतावादी दृष्टीकोनातून काही मूलभूत गोष्टींबाबत मदत मिळावी हा हेतू आहे. त्याकरता कोणत्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती लागू केल्या जात नाहीत.

आपण कुठल्या भागातल्या आदिवासी लोकांमध्ये काम केले आहे / करत आहात. आपण केलेल्या कामाबद्दल वाचायला आवडेल.

धन्यवाद हर्पेन जी. मी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात बरीच वर्षे नोकरी केली आहे. बाएफ सारख्या संस्था, अनेक एनजीओ यांचं काम जवळून पाहिले आहे.

अनेकांच्या मदतीनं मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अशी कामं एकट्या-दुकट्यानं होत नाहीत. असंख्य (अक्षरशः हजारो) स्वयंसेवकांची मदत मिळाल्यामुळेच हे शक्य झाले. कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळवलं असलं तरी आरोग्याचे इतर प्रश्न आहेतच…

फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांचा एक गट नुकताच मेळघाटात जाऊन आला. तेथे जाऊन त्यांनी दोन दिवसांचा फिजिओथेरपी कॅम्प घेतला. या गटाने चिलाटी येथे, मैत्री सोबत आरोग्य शिक्षणाचे काम करणार्‍या आरोग्य मैत्रिणींचे, प्रशिक्षण शिबीर घेतले. त्यांना प्रथम फिजिओथेरपी म्हणजे काय, का करायची आणि सर्व प्रकारचे प्राथमिक व्यायाम दाखवले, शिकवले आणि करुन घेतले.

दोन ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीरे घेण्यात आली. चिलाटी येथील तपासणी शिबीरात साधारणत: १०० ते १२५ बायका आल्या होत्या. यात विविध गटातील बायकांचा सामावेश होता. तपासणी अंती असे लक्षात आले की बायकांमध्ये थकवा,अतिश्रमामुळे अंगदुखी अशा प्रकारच्या वेदना होत्या. फक्त एकीला गुढग्यांची झीज व त्यामुळे होणारे बदल आढळले. एकताई येथील शिबीरात साधारणपणे ६० ते ७० पेशंट्स होते. या सगळ्यांना कॅल्शिअम च्या गोळ्या आणि रोज करायचे काही महत्वाचे व्यायाम शिकवले.

ह्या गटाच्या नेत्या डॉ. अर्चना फणसळकर या “मैत्री”च्या जुन्या स्वयंसेवक आहेत. त्यांचे आता जवळपास १० वर्षानंतर मेळघाटात जाणे झाले. त्यांनी हातरु PHC ला भेट दिली. त्यांच्याशी गप्पा मारताना तिथल्या बदललेल्या सरकारी (वैद्यकीय) विचारांबद्दल, तत्पर सेवेबद्दल कळलं. तेथे गेल्यावर असे लक्षात आले की तेथे कमालीचा बदल झालाय! तेथील PHC ही चित्रातल्या सारखी झाली आहे. नविन बिल्डिंग, डॉक्टर्स, नर्सेस, Ambulance आणि पेशंट्स सुध्दा होते. हा बदल पाहून समाधान वाटले.

तिथले डॉक्टर त्यांना भेटले जे त्याच भागातले होते. मेळघाटातला स्थानिक माणूस डॉक्टर म्हणून परत मेळघाटातच सेवा द्यायला येतो या पेक्षा काय हवं असेल कोणाला?

पुण्यामध्ये ग. रा. पालकर शाळेत आपण इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी मदत करतो, त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. >> हर्पेन या उपक्रमात आम्ही सहभागी होउ इच्छितो. त्यासाठी काय कराव लागेल ते कृपया कळवा. आमच्या ह्या गणित व विज्ञान शिकवतात. मी मुलांशिवाय कुणाला शिकवल नाही पण शिकवू शकेन. आमच घराण शिक्षकांच आहे.

विक्रमसिंह - तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन

ह्या शैक्षणिक वर्षाचा शेवट जवळ आला असल्याकारणाने तुम्हाला शिकवण्याची सुरुवात पुढच्या शैक्षणिक वर्षापासून करावी लागेल. मी पण या शाळेत शिकवले आहे आणि मी तर माझ्या मुलांनाही कधी शिकवले नव्हते / नाही. त्यामुळे तुम्हाला नक्की जमेल. थोडा अभ्यास आपल्यालाही करायला लागतो पण मजा येते. माझे धावणे चालू झाल्यावर शिकवणे बंद झाले.

वर्ग सोमवार ते शुक्रवार शाळा सुरु व्हायच्या आधी सकाळी ८.०० ते ८.४५ यावेळेत घेतले जातात. काही आठवड्यातून तीन वेळा तर काही दररोज असतात. तुम्ही 9309930010 ह्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधलात तर तुम्हाला मैत्रीच्या समन्वयकाशी बोलून पुढचे ठरवता येईल. किंवा मला फोन केलात तरी चालेल.

मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी आरोग्याचे इतर प्रश्न आहेतच.

नुकतीच एका फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांच्या गटाने भेट दिल्याची माहिती आपण वाचली होती. या आधीही त्वचारोग तज्ञ डॉ. संजीव वैशंपायन तसेच नाक/कान/घसा तज्ञ डॉ. भालेराव यांनी मेळघाटला भेट दिली आहे. मेळघाटात अशा प्रकारची “आरोग्य शिबीर” वरचेवर घेण्याची आवश्यकता आहे. अशी कामं एकट्या-दुकट्यानं होत नाहीत. अर्थात आपल्या सहभागाची नितांत आवश्यकता आहे.

आपण डॉक्टर नसाल तर आपल्या ओळखीत जे डॉक्टर असतील त्यांना ह्याबाबत कळवा. स्वतः डॉक्टर असाल तर कृपया स्वतः जा किंवा डॉक्टरांचा एक चमू तयार करा.

हे शिबीर एखाद्या विषयाला, म्हणजे दंतवैद्यकीय तपासणी, नेत्रतपासणी, रक्तदाब ई. वाहिलेले असेल.
असे लक्षात आले आहे की मेळघाटातील बर्‍याच बायकांना gynaecological प्रॉब्लेम्स आहेत. परंतू योग्य मार्गदर्श न आणि उपचारांचा अभाव आहे. त्यामुळे स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचे एक शिबीर तिकडे होऊ शकले तर खूप मदत होईल.

ह्या करता पुण्या-मुंबईहून जायचे असल्यास साधारणपणे एकूण ५ दिवसांचा वेळ द्यावा लागेल. एक दिवस जायला, एक दिवस यायला. तीन दिवस शिबीर. तर कृपया ही माहिती सर्वदूर पसरवा आणि सुयोग्य व्यक्तींच्या दृष्टीस पडेल असे करा.

मैत्री कार्यशाळा - भूजल व्यवस्थापन कार्यशाळा

जमिनीखाली किती पाणी??
आपण जिथे राहतो तिथला भूजल साठा किती आहे?
त्याचे पुनर्भरण कसे होऊ शकेल?
आपण भूजल वापरत असू तर ते कार्यक्षम पद्धतीने कसं वापरता येईल?
आपल्या परिसरात आपल्याला भूजल व्यवस्थापन करता येईल का?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी “मैत्री”, भूजलावर काम करणारी पुणे-स्थित “अक्वाडाम” या संस्थेच्या मदतीने एक कार्यशाळा आयोजित करत आहे. अक्वाडामचे डॉ. हिमांशु कुलकर्णी या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

दि. १४ मार्च, दुपारी ४ ते सायंकाळी ७
ठिकाण - डेक्कन जिमखाना सोसासटी सभागृह ,
मकरंद भावे पथ, टिळक तलावाजवळ,
कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस
पुणे ४११००४

विचार असा आहे की कार्यशाळेनंतर या विषयावर पुढे काम करायला उत्सूक असलेल्यांचा एक गट आपण बनवणार आहोत. या गटाला नंतरही अक्वाडामचं मार्गदर्शन मिळणार आहे.

तरी इच्छुकांनी मैत्री कार्यालयात अथवा विनिता ताटके ९४२२५ २१७०२ यांच्याशी संपर्क साधावा.

मैत्रीचा 'रद्दीतून-सद्दी' हा उपक्रम.

“मैत्री” हा नागरिकांचा गट, कोणी गृहिणी, विद्यार्थी तर कोणी विविध व्यवसायात असणारी आम्ही मंडळी समाजाशी असलेली आपली बांधिलकी दृढ करण्यासाठी एकत्र आलो. आम्हाला भावणार्‍या प्रश्नांवर आम्ही काम करायचं ठरवलं. १९९७ पासून सातत्यानं आजवर मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि ह्यांवर आपण काम करतो आहोत. आजवर आपला प्रत्येक प्रकल्प लोकांची गरज, आवश्यक ती मदत आणि स्वयंसेवकांची तयारी यांतून उभा राहिला आहे.

“मैत्री” च्या कामात अधिकाधिक लोकांचा हातभार लागावा म्हणून रद्दीतून-सद्दी हा उपक्रम आखला गेला. रद्दीतून-सद्दीची कल्पना एका स्वयंसेवकाचीच. ती अभिनव कल्पना अशी की एखाद्या सामाजिक कामाला हातभार लावण्याची इच्छा खूप आहे पण घराबाहेर पडायला जमत नाहीये किंवा आर्थिक मदत करतानाही जास्त ताण घेणे शक्य नाहीये अशा सगळ्यांना अगदी सहजपणे मैत्रीकरता म्हणून स्वयंसेवक बनता येते.

दर महिन्याला आपापल्या प्रत्येकाच्या घरात असलेली रद्दी एकदा एकत्र जमा करून ती मैत्रीला देऊन तुम्ही मदत करू शकता. सुरुवातीला हा उपक्रम फक्त एकाच घरापुरता मर्यादित असेल तर वर्षभर रद्दी विकून आलेले पैसे साठवून ते मैत्रीला देता येतील. त्यापुढचा टप्पा म्हणजे आपल्या सोसायटीतल्या इतर सभासदांना उद्युक्त करून त्याचे व्याप्ती वाढवणे. अशी एक गठ्ठा रद्दी बांधून तळमजल्यावर आणून ठेवली असता अशी रद्दी स्वयंसेवकांच्या मदतीने घेऊन जाण्याची व्यवस्थादेखिल करता येऊ शकते. सदर रकमेची पावती सोसायटीच्या नावाने दिली जाते

सामाजिक कामासाठी रद्दी देण्याची मदत करणे एवढा साधा उपक्रम मैत्रीने गेली १८ वर्ष पुण्यातून अनेक गृहसंकुलात सुरु केला आहे. ही रद्दी आम्ही विकतो आणि त्यातून आलेले पैसे “मैत्री” च्या विविध उपक्रमांसाठी वापरतो.

नोकरी/व्यवसाय सांभाळून, स्वयंस्फूर्तीने असा पुढाकार तुम्ही घेतलात तर त्यायोगे खूप मोठी मदत मैत्रीला मिळू शकते. त्याकरता तुम्हाला महिन्यातून फक्त एकदा थोडा वेळ काढावा लागेल. असा अनुभव आहे की रद्दी जमा करून बांधून तळमजल्यावर आणण्याच्या कामात बच्चे कंपनी अत्यंत उत्साहाने मदत करते. अशा प्रकारे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी नवीन पिढीला देखिल उपलब्ध करून देता येऊ शकते.

आमचा आग्रह एकच असेल. तुम्ही आमचं काम समजून घ्या आणि मगच तुमची रद्दी आम्हाला द्यायचं कबूल करा.

दि. १४ मार्चची भूजल व्यवस्थापन कार्यशाळा आपण पुढे ढकलत आहोत.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे, म्हणून हा निर्णय आपण घेतला आहे.
ही कार्यशाळा पुढे कधी आणि कुठे घेऊ याबाबतीत नंतर कळवण्यात येईल.

एका ज्येष्ठ स्वयंसेवकाचे मनोगत

मंगळवार असला आणि पुण्यात असलो की सायंकाळी ६:३० वाजता पावलं कमला नेहरू उद्यानाकडे वळतातच वळतात. १९९७ सालापासून एकही मंगळवार असा झाला नाही की "मैत्री" चे "मित्र" भेटले नाहीत. दिवाळी असो, क्रिकेटची मॅच असो, निवडणूक असो की गणपती उत्सव, आम्ही भेटतो म्हणजे भेटतोच.

ह्या उद्यानाच्या हिरवळीवर "मैत्री" नी घेतलेले सर्व उपक्रम जन्माला आले. कित्येक नवे मित्र मिळाले. सामाजिक क्षेत्रातल्या कित्येक धुरीणांशी गप्पा झाल्या. आमची समाजनिरीक्षणं एकमेकांशी बोलता आली. अस्वस्थता व्यक्त करता आली. भांडलो, वाद घातले, नवनव्या कल्पना लढवल्या ह्याही तिथेच, त्या हिरवळीवर..

ह्या बैठकीतल्या कमालीच्या सातत्यामुळे आम्हा सर्वांच्या विचारधारेची नाळही तयार होत गेली. सुनामी असो, मेळघाटातली धडक मोहीम असो, भूज भूकंप असो की कोकणातला पूर. अगदी केरळातील महापूरापासून उत्तराखंडातील भूकंपापर्यंत सगळीकडे सत्वरतेनं कृती करण्याची क्षमता आम्हाला ह्या मंगळवार मिटींगच्या कमालीच्या सातत्यामधून घडवता आली ..

आज ह्या सगळ्या गोष्टी आठवण्याचं कारण म्हणजे कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सरकारनं जे आवाहन केलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आजची मंगळवारची बैठक होणार नाही. वाईट हे वाटतंय की आमचा २२ वर्षांचा नेम आज चुकणार, पण आनंद ह्याचा वाटतोय की एका सामाजिक जबाबदारीच्या कारणानी तो नेम चुकतो आहे..

हे कदाचित एक-दोन किंवा आणखी एखादा मंगळवार राहील, नंतर भेटत राहूच. तुम्हीही या. कुठल्याही चार भिंतीच्या पलीकडे, निसर्गाच्या सानिध्यात, खुल्या वातावरणात, हिरव्या हिरव्या गालीच्यावर, सर्व औपचारिक सोपस्कार टाळून आम्ही तिथे मेळघाटमधील काम, पुण्यातील सामाजिक उपक्रम आणि आसपासचं समाजजीवन ह्याविषयी बोलत असतो.. तुम्हीही या.

मित्रांनो,

करोनानं संपूर्ण जग व्यापून टाकलं आहे. त्याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही.

नैसर्गिक संकटात धावून जाणं ही “मैत्री” ची प्रेरणा आहे. स्वयंस्फूर्त काम करणं हा तिचा “आत्मा” आहे. ह्याच पायावर आपण गेली २२ वर्ष काम करतो आहोत.

आज जे दिसतंय त्याप्रमाणे येत्या काही दिवसात, असं होऊ नये, पण करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसं झाल्यास कामाची खूप गरज लागणार. एक नक्की की हे काम इतकं मोठं आहे की सरकार हीच यंत्रणा महत्वाची आहे पण ह्याचा अर्थ आपण काहीच करायचं नाही किंवा आपण काहीच करू शकत नाही असं नाही. आपण सरकारला, त्यांच्या परवानगीनं, त्यांना मदत करण्याचं काम करू शकतो. उदाहरणार्थ: सरकारी रूग्णालयात त्यांना मदत करणं, विलगीकरणात आवश्यक कामं करणं, समुपदेशन करणं, मास्क्स शिवणं, ते वाटणं, आपल्या परिसरातील गरजूंना डबे देणं किंवा इतर सहाय्य करणं, एकटे रहातात अशांना सोबत करणं वगैरे वगैरे.. अर्थात आत्ता हे फारसं स्पष्ट नाही पण जशी गरज लागेल तसतसं ते स्पष्ट होत जाईल आणि कदाचित शासनही तसं आपल्याला सांगेल. मागच्या सोमवारीच आपण शासनाला “आम्ही मदत करायला तयार आहोत” अशा आशयाचं पत्र दिलं आहे.

आज जरी “काय करायचं?” हे शंभर टक्के स्पष्ट नसलं तरी गरज लागेल तेंव्हा हातपाय मारण्यापेक्षा आपण तयारीत राहू. म्हणून असं काम करू इच्छित आहेत अशा “मित्रांची” नोंदणी करण्याचं काम आपण करतो आहोत. ह्या कामात पुढे मागे सहभागी व्हायची इच्छा असल्यास तुमचं नाव द्या. असा काही अनुभव तुमच्या गाठीशी असल्यास त्याचा तपशील द्या. आपल्याच “मैत्री” परिवारात आजवर ३ हजारांच्या आसपास “मित्र” अशा कामात भाग घेऊन गेले आहेत. त्यांचं तर स्वागत आहेच. ह्याबाबतीत तुमच्या काही कल्पना, सूचना असतील तर त्याही करा. वाट पहातो..

संपर्क करा : ९३०९९३००१० या नंबर वर फक्त whatsapp संदेश (काॅल नाही) किंवा एसएमएस. तुमचं नाव, कामाचा अनुभव असल्यास, काय करू शकाल ते आणि दूरध्वनी क्रमांक अवश्य द्या..

*मैत्री : मैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी*

*मित्रांनो*,

आता २१ दिवसांचा “सरसकट संपूर्ण बंद” आहे. आपलं घर सोडून आपण बाहेर पडू शकत नाही आहोत. मग ह्या परिस्थितीत *आपण काय काय करू शकतो?*

ह्या अगोदरच “मैत्री” तील “मित्र” आणि इतर काही संबंधितांनी काही काही उपक्रम सुरू केले आहेत. त्यांची माहिती इथे देतो.

१) *रक्तदान* : रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्याच्या बातम्या आहेत. ह्यात काहीतरी केलं पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला संतोष पाटील ( ९७६२०८७७९९) अधिक माहिती देऊ शकतील.

२) *समुपदेशन* : काही लोक एकटे आहेत. काहींना एकटं वाटत आहे. कुणी त्यांच्याशी बोलायला नाही. गप्पा मारायला नाही. आपले राजूभाऊ केंद्रे आणि डाॅ. ऋषी आंदळकरांनी ती व्यवस्था केलेली आहे. त्याला त्यांनी नाव दिलं आहे, “मोकळा संवाद”. त्यांचे दूरध्वनी क्रमांक आहेत : डाॅ. ऋषी ९४२३७८८५४१ आणि राजूभाऊ (७०६६१३६६२४).

३) *भाजीपाला* : घरात भाजीपाल्याची कमतरता भासेल. सरकारनं ह्यात अडचण येणार नाही अशी ग्वाही दिली आहे परंतु त्या त्या स्थानिक ठिकाणी काही करता येईल. तसा प्रयत्न कोथरूड (पुणे) मध्ये संदीप भडकमकर ९८९००३३२८५ करत आहेत, बेडेकर गणपतीजवळ आठवडी बाजार भरतो तिथे ही सोय त्यांनी केली आहे. ह्यासाठी लागणारी परवानगी वगैरे ते मिळवणार आहेत.

४) *घरातल्या घरी भाजीपाला पिकवणे* : अशी शक्यता आहे की काही दिवसांनी भाजीपाला कमी पडेल किंवा आपल्यापर्यंत पोचणार नाही.. म्हणून प्रिया भिडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीष जोशी (८८०६३९३९५७) अधिक माहिती देतील. त्यांच्याकडे व्हाॅट्अप तयार आहेत, माहितीबाबतचे.

*आम्ही वेळोवेळी अशा उपक्रमांची माहिती देत राहू* … आपण ह्या अगोदरच राज्य प्रशासनाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सोबत आपण काम करायला तयार असल्याचं पत्र दिलेलं आहेच.

नीट काळजी घ्या. सुरक्षित रहा… शुभेच्छांसह,

*मैत्री* - लढाई करोनाशी स्वयंसेवक नोंदणी (९३०९९३००१० - फक्त एसएमएस किंवा व्हाॅट्सॅप)

हर्पेन, तुमची पोस्ट ढुमढुमढुमाकवर टाकण्याची परवानगी देऊ शकाल काय?

“मैत्री” ची विश्वस्त सभा नुकतीच 'झूम'वर पार पडली. एक नवा आणि वेगळाच अनुभव. अनेक मुद्दे बोलले गेले. त्यातले ठळक मुद्दे.

१. मुख्यमंत्र्यांकडे, तसंच प्रधानमंत्र्यांकडेही “मैत्री”ला संस्था म्हणून मदत करण्याची इच्छा असल्याने नोंदणी केली आहे.

२. मेळघाटमधे कोरोना बाधित रुग्ण सापडला नाहीये. पण मेळघाटाबाहेरून घरी परत आलेल्या एखाद-दुसर्‍याला खबरदारी म्हणून घरातच विलगीकरण करण्यासाठी सांगितलं आहे.

३. सद्यस्थितीमुळे आपापल्या गावापासून दूर अडकून पडलेल्या स्थलांतरित असंघटित कामगार / लहान प्रमाणावर व्यावसायिक यांच्याकरता अन्नधान्य संकलन व वितरण तातडीने करण्याची आवश्यकता आहे. अशा गरजू लोकांपर्यंत आपल्या गावोगावच्या स्वयंसेवकांमार्फत पोहोचणे कसे शक्य होईल याची चाचपणी करायची आहे.

४. कोरोनामुळे असलेली टाळेबंदी संपल्यावर “मैत्री” ला काम करायचं आहे ते पथारीवाले-हातगाडीवाले- भाजी /फळविक्रेते अशा सारख्या लहान उद्योजकांना आर्थिक मदतीची गरज लागू शकेल. त्यासाठी निधीसंकलनाची तयारी करायची आहे.

वरील पोस्ट मधे नमूद केल्यानुसार

मैत्रीतर्फे नुकतीच पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील अकरा लघु व्यावसायिकांना आपले व्यवसाय पुन्हा सुरू करता यावेत ह्याकरता म्हणून भांडवल म्हणून काही आर्थिक मदत देऊ करण्यात आली. ही मदत 'बिनव्याजी कर्ज' स्वरुपात असून कामाच्या गरजेनुसार प्रत्येकी पाच पासून ते पंधरा हजार पर्यंतची रक्कम देऊ करण्यात आली. देऊ केलेली एकूण रक्कम एक लाख दहा हजार इतकी आहे. असे समजते की ह्या वस्तीतील लोकांना कोणतीही बँक कर्जपुरवठा करत नाही त्यामुळे खासगी कर्ज मिळाले / घेतले असता व्याजदर चढा द्यावा लागतो. ज्यांना ही मदत देऊ करण्यात आली त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप, पेस्ट कंट्रोल करणे, बेकरी, मोबाईल दुरुस्ती, छोटे वाणसामानाचे दुकान, भाजीपाला विक्री, गोळ्या बिस्कीटे विक्री दुकान, मासे भाजीपाला विक्री, रिक्षा चालवणे अशा प्रकारचे असून ह्या व्यावसायिकांमधे तीन महिलाही सामील आहेत. ह्या व्यावसायिकांची वार्षीक उलाढाल अंदाजे दोन ते सहा लाख रुपये इतकी आहे.

योजना अशी आहे की हे सगळेजण जास्तीत जास्त म्हणजे वर्षभरात ही रक्कम परत करतील आणि त्यानंतरही ही रक्कम अशाच प्रकारे अजून इतर व्यावसायिकांना दिली जाईल.

ह्या लोकांपर्यंत पोचण्याकरता तसेच योग्य व्यक्तींची निवड करण्याकरता श्री. आनंद जाधव आणि श्री. केशव वाघमारे यांची मोठीच मदत झाली.

अशाप्रकारे लॉकडाऊननंतर इतरही अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरता मदत करण्याचा मैत्रीचा मानस आहे. ह्याकारणाकरता म्हणून मैत्रीला देणगी द्यायची असेल त्यांनी मैत्री कार्यालयाशी जरूर संपर्क साधावा.

ह्या वर्षीची धडक मोहिम

मेळघाटात होणारे बाल मृत्यु आणि कुपोषण ह्याबाबत काम सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन बघू म्हणून केलेल्या मैत्रीच्या पहिल्या धडक मोहिमेला जवळपास वीस वर्षे झाली. त्यानंतर पहिल्यांदाच असे झाले की मैत्रीचे कार्यकर्ते मेळघाटात जाऊ शकले नाहीत.

कोरोना काळात प्रवास आणि वाहतूकीवर निर्बंध असल्यामुळे, यंदा मेळघाटात धडक मोहीम केवळ आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सुरू होती /आहे. मैत्रीचे आरोग्यमित्र आणि मैत्रिणी आपल्या गावात आजारी व्यक्ती, विशेषकरून लहान मुले आणि गरोदर स्त्री यांना वेळेवर औषधे पुरवत आहेत. ज्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करायला पाहीजे अशांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचायला मदत करत आहेत. सुयोग्य सकस आहार आणि वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी याबद्दल पोस्टर्सच्या मदतीने जाणीव निर्माण करण्याचा उपक्रम घेणेे चालू आहे. त्याबरोबर काही त्वचारोग, उदाहरणार्थ खरूज, वगैरे लवकर आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन उपचार चालू आहेत. याकरता लागणारी औषधे मैत्रीने पाठवली आहेत.

फार चांगलं काम करत आहात हर्पेन. अशा उपक्रमांबद्दल माहिती देता त्यामुळे कळतं की एवढे लोक इतरांकरिता सतत राबत आहेत.

सध्या शाळा बंद आहेत. परंतु त्या डिजीटल पध्दतीनं कसंतरी शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्यात खूप अडचणी येत आहेत. कितीतरी मुलां-मुलींकडे घरी फोन किंवा संगणक नाही. काहींकडे ते आहे पण चांगली इंटरनेट व्यवस्था नाही. काहींच्याकडे हे सगळं आहे पण घरी "शिक्षण" घेता येईल असं वातावरण नाही. पुरेशी जागा नाही. काहींकडे पूर्णवेळ वीजपुरवठा नाही. काहींच्या घरी एक मोबाईल आहे पण दोन विद्यार्थी आहेत. अशा कितीतरी अडचणी.

जिथे एकही कोरोना रूग्ण नाही अशा आमच्या मेळघाटात शाळा बंद आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे कोरोना नाही. इंटरनेट नाही. मोबाईल नाही त्यांच्या तरी शाळा सुरू करायला हव्यात की नाही?, पण सरकारचं तिकडे लक्ष नाही.

नुकताच NSSO चा अहवाल आला त्याप्रमाणे देशात दर दहा घरांमागे एक संगणक आहे. दर चार घरांमागे एक घर इंटरनेटनी युक्त आहे. त्यामुळे सर्वांचा विचार करायचा तर डिजीटल शिक्षण हा पर्याय नव्हे.. ह्या कोविड परिस्थितीत काय करता येईल, ज्यांना ह्यात आपलं योगदान द्यायचं आहे अशा स्वयंस्फूर्त मित्रांना काय करता येईल, शाळा आणि पालक ह्यांच्यात एक चांगला दुवा म्हणून काम करता येईल का? अशी परिस्थिती समजा आणखी काही महिने राहिली तर "शिक्षण-मित्र" म्हणून आपल्या काहींना काम करता येईल का? ह्यावर "मैत्री" च्या परवाच्या मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाली.

ह्या क्षेत्रात २०-२२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मधुकर माने ह्या मित्रानी काही निश्चित अशी योजना सादर केली.. "मैत्री" ह्यात काही काम करणार आहे. तुम्हालाही ह्यात सहभागी व्हायचं तर जरूर सहभागी व्हा.. कोरोना असो की डिजीटल विषमता, त्यावर कशी मात करता येईल ह्याचा सर्वांनी मिळून विचार करण्याचं ह्या बैठकीत ठरलं.

तुम्हालाही ह्यात सहभागी व्हायचं तर मैत्री ला : ९३०९९ ३००१० ह्या क्रमांकावर whatsapp करा. फोन करू नका. फक्त नाव कळवा. "मैत्री" संपर्क करेल.

गेल्या साधारणपणे वर्षभरात, मैत्रीच्या पुढाकारामुळे अकोला स्थित पंजाबराव कृषी विद्यापीठ येथील अनेक तज्ञ शास्त्रज्ञ मंडळी मेळघाटला भेटी देऊन गेली. त्यांच्या भेटींदरम्यान त्यांच्याकडून शेतकऱ्यांना अनेक गोष्टींबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळायला लागले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची विचारसरणी बदलण्यास आणि प्रयोगशीलतेकडे वाटचाल करण्यास सुरुवात झाली आहे. मेळघाटातल्या शेतकऱ्यांना सरकारी कर्मचारी किंवा मोठे शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधण्याची भीड वाटत असे ती चेपली जाऊन, त्यांनी, पिकावरील कीड अथवा जनावरांचे आजार यासारख्या अडचणींच्या वेळी परस्पर संवाद साधून आपल्या अडचणींचे निराकरण करून घेण्यात यश मिळवले आहे.

ही तर फक्त सुरुवात आहे. मैत्रीने मेळघाटातल्या शेती संदर्भात सेंद्रीय शेती प्रशिक्षण, शेळीपालन आणि कुक्कुट पालन प्रशिक्षण अशी अनेक प्रकारची कामे हाती घेतली आहेत. सध्या लॉक डाऊन मुळे ती जरा पुढे ढकलली गेली आहेत पण लवकरच ती पुन्हा सुरु होतील अशी आशा आहे.

मैत्री - स्थानिक सक्षमीकरण

मेळघाटातल्या लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून मैत्रीतर्फे कायमच प्रयत्न केले जातात. ह्याचाच भाग म्हणून शासनाच्या अनेक कार्यक्रमांविषयी अथवा योजने विषयीची माहिती पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते.

मैत्रीच्याा पुढाकाराने GSDA (Ground Water Surveys and Development Agency) अर्थात भुजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा यांना हतरु,रुईपटार व एकताई या गटग्राम पंचायतीनी पत्र देऊन आमच्या ग्राम पंचायत मधील सर्व गावांचे सर्व्हेक्षण करुन द्यावे असे पत्र दिले होते. त्या पत्राचा आधार घेऊन भुजल सर्व्हेक्षण विभाग अमरावती यांनी जानेवारी २०२० मध्ये सर्व गावांमध्ये(आपल्य कार्यक्षेत्रातील १५ गावे) जाऊन लोकांसोबत चर्चा करुन १५ गावांचे आपल्या मदतीने सर्व्हेक्षण पुर्ण केले. या मध्ये गावामध्ये जाऊन विहिरी,तलाव,बोअरवेल,नाले अशी शिवार फेरी करुन काही निवडक लोकां सोबत चर्चा केली.

या सर्व्हेक्षणातुन खालील माहिती पुढे आली.
हत्रु भागातील तीन गावांचा अपवाद सोडता सर्व गावे ड्रायझोन मध्ये मोडतात. गावांना परत पाणीदार करायचे असल्यास खालील कामे प्राधान्य क्रमाने करणे आवश्यक आहे. यामध्ये दगडी बांध, सलग समतल चर, शेततळी, विहिर पुनर्भरण, पाझर तलाव, सिमेंट नाला बांध, check Dam, भुमीगत बंधारे आणि नाला खोलीकरण ही कामे रोहयो मधुन करुन घेणे आवश्यक आहे अशी माहीती दिली.

हीच कामे रोहयो मधुन घ्यावीत असा आग्रह आपण धरत आहोत. सध्या लॉकडाऊन मुळे ह्या कामांना उशीर होत असला तरी ह्या बाबत पाठपुरावा करणे चालू आहे.

Pages