जेनेरिक औषधे

Submitted by सुबोध खरे on 11 February, 2020 - 23:40

जेनेरिक औषधे -- हा एक अत्यंत विशाल असा महासागर असून यात जितक्या डुबक्या माराल तितकी रत्ने निघतील.

पहिली गोष्ट म्हणजे जेनेरिक औषध म्हणजे काय.
उदा पार्क डेव्हिस या कंपनीने क्लोरोमायसेटीन हे प्रतिजैविक शोधून काढले १९४७. टायफॉईड किंवा विषमज्वर यासाठी रामबाण असलेले हे पहिले औषध. शोध लावणाऱ्या कंपनिला तिच्या शोध लावण्याच्या प्रक्रियेसाठी आलेला खर्च भरून निघण्यासाठी पेटंट दिले जाते. या पेटंट द्वारे १५ वर्षेपर्यंत दुसरा कोणीही ते औषध बनवू/ विकू शकत नाही. ती कंपनी आपली मक्तेदारी वापरून औषध विक्री करू शकेल, ज्याद्वारे ती आपला नफा वसूल करू शकेल आणि पुढच्या अधिक संशीधनाला पैसा उपलब्ध होऊ शकेल हा पेटंट कायद्याचा मूळ हेतू.

हे औषध १९४९ साली भारतात उपलब्ध झाले तेंव्हा एका (२५० मिग्रॅम) कॅप्सूल ची किंमत होती अडीच रुपये. दिवसाला सहा कॅप्सूल द्यायला लागत. म्हणजे रोजचा खर्च १५ रुपये. तेंव्हा सोन्याचा भाव होता ८० रुपये १० ग्रॅमला.

आज क्लोरोमायसेटीनची किंमत आहे तीन रुपये कॅप्सूलला. विचार करा त्या कंपनीने किती नफा केला असेल ते.आमचे वडील सांगतात कि आमच्या आजोबाना आणि आमच्या काकांना टायफॉईड झाला आणि तो उलटला (relapse) त्यामुळे अगोदरच कुळकायद्यात जमीन गेलेली होती वर या उपचारांचा खर्च असल्यामुळे घरातील सर्वच्या सर्व सोने विकायला लागले. आमच्या कुटुंबाची परिस्थिती संपन्नावस्थेतून विपन्नावस्थेत गेली.

पंधरा वर्षांनी जेंव्हा औषध पेटंट मुक्त होते तेंव्हा ते कोणतीही कंपनी बनवू शकते. आणि मग स्पर्धा सुरु होते. मग जो स्वस्तात ते औषध बनवू/ विकू शकतो तो या स्पर्धेत टिकतो. मग चांगल्या कंपन्या ज्यांच्याकडे ते औषध बनवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असते त्या ते औषध बनवण्यास सुरुवात करतात.

अशी औषध बनवण्याची प्रक्रिया झाल्यावर औषधाचा दर्जा कसा असावा याची इत्यंभूत माहिती फार्माकोपिया नावाच्या पुस्तकात दिलेली असते. उदा IP किंवा INDIAN PHARMACOPOEA. हे पुस्तक भारत सरकार प्रसिद्ध करते. किंवा USP ( अमेरिकेचे) किंवा BP (ब्रिटनचे).

प्रत्येक औषधात एका ग्राम मध्ये प्रत्यक्ष औषध कमीतकमी किती टक्के(उदा. ९९. ८७%), क्लोराईड किती(०.००१५%) , सोडियम किती,
(ASH )राख किती इ. स्पष्टपणे दिलेले असते. असे घाऊक औषध विकणाऱ्या कंपन्या आपले औषध कोणत्या मानक पुस्तकाप्रमाणे आहे ते त्यावर लिहितात उदा. PARACETAMOL IP. किंवा IBRUPROFEN USP. (हे थोडेसे EURO ६ किंवा BHARAT ४ सारखेच आहे).

एक लक्षात घ्या सर्वच औषध बनवणाऱ्या कंपन्या ती बाजारात विकतात असे नाही तर घाऊक प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांना विकतात.(आजकाल अशी घाऊक औषधे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वस्तात तयार होतात आणि ती जगभर निर्यात केली जातात.) घाऊक औषध विक्रेते मग ती औषधे मोठ्या कम्पन्याना प्रथम विकतात. कारण त्यांची ऑर्डर मोठी असते पण त्यांचे दर्जाचे निकष काटेकोर असतात. त्यांच्या दर्जात थोडी कमतरता आल्यामुळे नाकारलेली औषधाची बॅच मग ते छोट्या औषध उत्पादकांना विकतात. अर्थात हे फार गंभीर असेलच असे नाही.

असे घाऊक औषध( BULK DRUG) विकत घेऊन चांगल्या कंपन्या आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष चाचणी करून खात्री करून घेतात आणि ते औषध वापरून तुम्हाला मिळणाऱ्या गोळ्या सिरप इ औषधीत रूपांतर करतात. चांगल्या कंपन्या मग अशा औषधांना स्वतःचे एक नाव (ब्रँड नेम) देऊन ते बाजारात उतरवतात. उदा. क्रोसिन. यात पॅरासिटामॉल हे मूळ औषध असते. क्रोसिनच्या गोळीची किंमत साधारण १ रुपयाला एक आहे. त्याच ऐवजी सिप्ला या कंपनीचे PARACIP हे ७० पैशाला मिळते. इतर कोणती कंपनी तेच औषध पॅरासिटॅमॉल म्हणून बाजारात जेनेरिक म्हणून २० पैशात विकते.

जोवर औषधाच्या दर्जाची खात्री देता येते तोवर जेनेरिक औषध देणे हे नक्की चांगले आहे.

काही कंपन्या स्वतः आपले ब्रँड आणि जेनेरिक अशी दोन्ही औषधे बाजारात आणतात. उदा रॉक्सीडं नावाचे प्रतिजैविक (ANTIBIOTIC) अलेम्बिक या कंपनीचे औषध ७२ रुपयाला १० गोळ्या मिळत असे आणि तेच औषध जेनेरीक म्हणून ४० रुपये MRP चे मिळत असे. हे औषध ४० रुपयाला रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध करून द्यावे म्हणून द्यावे आम्ही विकत आणून ठेवले होते. पण रुग्णांना वाटत असे कि यात डॉक्टरांचा फायदा आहे त्यामुळे ते ७२ रुपये देऊन केमिस्ट कडून औषध घेणे पसंत करीत. यामुळे आम्ही नंतर असा रुग्णांचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न सोडून दिला. असो.

या रणधुमाळीत मग हवशे नवशे गवशे सगळेच सामील होतात. मग नकली औषधे निर्माण होतात आणि हातोहात खपवली जातात. सरकारी रुग्णालयात असणारे खरेदी विभागाचे साटेलोटे पासून खाजगी औषध विक्रेत्या बरोबर बनवलेले लागेबांधे. यात म्हणाल तेथे आणि म्हणाल त्या किमतीची औषधे उपलब्ध असतात.

भारतात मिळणारी २५ % औषधे नकली आहेत. म्हणजे चारात एका रुग्णाला मिळणारी औषधे नकली आहेत. हा बाजार २५००० कोटी ( होय पंचवीस हजार कोटी) रुपयांचा आहे. http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...

हि २५ % नकली औषधे सोडून देऊ. बाकी ७५% औषधे नकली नाहीत हे मान्य. परंतु त्या औषधांचा दर्जा जागतिक दर्जाइतका आहे का? हा एक मोठा गहन प्रश्न आहे.
अमेरिकेतील FDA हे अत्यंत कडक असून तेथे नकली औषध बनवणार्यांना आणि विकणार्यांना जबर दंड आणि शिक्षा आहे. त्यामुळे तेथे जेनेरिक औषधे देण्यास डॉक्टरना किंतु येत नाही. आपले FDA काय आणि किती कार्यक्षम आणि प्रामाणिक आहे याबद्दल न बोलणे बरे.

साधे डोकेदुखीवर एस्प्रो (ASPRO) घ्या. हे ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिन असलेले औषध मायक्रोनाईजड कणाचे बनलेले असते. त्यामुळे तो गोळी आपल्या पोटात जाताच ताबडतोब म्हणजे १५ सेकंदात विरघळते. आणि याचा पूर्ण परिणाम १५ मिनिटात होतो. आपण डिस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवली आणि घेतली तरी असाच परिणाम दिसून येतो. याच ऐवजी हॅस्प्रो किंवा तत्सम जेनेरिक औषध असेल त्यात ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिनच असेल पण ते सूक्ष्म कणांचे ना बनवता साधे असेल तर ते पोटात विरघळायाला १५ मिनिटे लागतील. म्हणजे आपल्या डोकेदुखीपासून पूर्ण आराम व्हायला १५ च्या ऐवजी ३० मिनिटे लागतील.

यात मूळ औषध चांगल्या दर्जाचे खरोखर आहे हे गृहीत धरले आहे.

आता आपण मेट्रोनिडॅझॉल हे औषध घेऊ. आमांश किंवा अमिबिक डिसेंट्रीसाठी लागणारे औषध. हे औषध जठराच्या हायड्रोक्लोरिक आम्लात विघटीत पावते आणि शिवाय त्याच्या पदार्थामुळे जठराचा दाह होऊन आम्लपित्त होते. म्हणून ते एका इन्टेरिक कोटेड गोळी मध्ये मिळते. हि गोळी त्याच्या खास आवरणामुळे आम्ल वातावरणात विरघळत नाही तर अल्कलाईन वातावरणातच विरघळते. त्यामुळे औषधाचा परिणाम जठरावर होत नाही किंवा ते विघटन पावत नाही. आता मेट्रोनिडॅझॉलच्या २५० मिग्रॅमच्या जेनेरिक गोळीत तेवढे द्रव्य असेल पण जर ते इन्टेरिक कोटेड नसेलच तर रुग्णाला त्याचा फायदा होणार नाही उलट एखादा अन्य पॅथीवाला तुम्हाला ऍलोपॅथीची औषधे "उष्ण" पडतात म्हणायला मोकळा असतोच.

याशिवाय औषध इंटेरिक कोटेड आहे पण त्याचे कोटिंग व्यवस्थित नसेल तर किंवा कारखान्यापासून रुग्णापर्यंत पोहोचण्यात होणाऱ्या हाताळण्यात जर त्याला भेगा पडल्या किंवा गोळीचा कोपरा तुटला तर या गोळ्यातील मेट्रोनिडॅझॉल बाहेर पडून रुग्णाला उपचार नाहोत अपायच होईल.

या दोन्ही प्रकारांबद्दल डॉक्टरच्या हातात काय आहे? हे जेनेरीक औषध ना त्याने बनवले आहे ना त्याच्याकडे या औषधाचा दर्जा तपासण्याची यंत्रणा. परत रुग्ण बरा नाही झाला तर जबाबदारी डॉक्टरचीच असते. सुरुवात आपले निदान चुकले आहे का या शंकेपासून होते. निदानाबद्दल खात्री झाल्यावर रुग्णाने औषध व्यवस्थित वेळेवर आणि दिलेल्या डोसइतके घेतले आहे का याची शहानिशा होते.( औषध उष्ण पडते म्हणून तीन पैकी दोनच डोस घेणारे रुग्ण भरपूर भेटतात).

आता निदान नक्की आहे आणि रुग्ण सुद्धा विश्वासू आहे आणि त्याने औषध व्यवस्थित घेतले आहे तरी उपचाराचा गुण का येत नाही हे पाहायला गेले तर औषधाच्या दर्जाबाबत शंका येणार.मग अशी परिस्थिती येण्यापेक्षा डॉक्टर सरळ प्रथितयश कंपन्यांची औषधेच लिहून देतात.

याउलट जर तुम्ही उद्या टाटाने औषध कंपनी काढली तर ती औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरला शंका येणार नाही. कारण टाटांचे "नाव" आहे आणि आपल्या नावाला काळिमा लागेल असे ते काहीही करत नाहीत.

हीच खात्री अगरवाल किंवा गोयल फार्मा कंपनी गुडगाव बद्दल देता येईल का?

जर भारतात FDA ने सर्व औषध कंपन्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला आणि जर औषध कंपन्याना उत्पादनाचा परवाना देताना अत्यन्त कडक अशी तपासणी केली त्याचबरोबर नकली औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना सज्जड शिक्षा झाली. असे झाले तर भारतात जेनेरीक औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरना शंका येणार नाही.

अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन अशा प्रत्येक कारखान्यावर कडक नजर ठेवून असते उदा.
http://www.livemint.com/Companies/Z2tnAgoQ6vfRmvimSOdK8L/Ciplas-Indore-f...

आजची परिस्थिती काय आहे. मी जर जेनेरिक औषध म्हणून गंभीर असलेल्या मेनिन्जायटिसच्या रुग्णाला "मेरोपेनेम" लिहून दिले तर बाजारात त्याचे १२८ ब्रँड उपलब्ध आहेत. आणि त्यांची किंमत ९८० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत आहे.
http://www.drugsupdate.com/brand/showavailablebrands/292/2

डॉक्टरने फक्त जेनेरिक औषधाचे नाव लिहून दिले तर आता सर्व निर्णय राह्तो केमिस्टच्या हातात. मग जी कंपनी त्याला सर्वात जास्त कमिशन देईल त्याचेच औषध तो जेनेरिक म्हणून तुम्हाला विकणार. पण त्या कंपनीला हे औषध बनवण्याचा अनुभव त्याचे तंत्रज्ञान किती याचे केमिस्टला काहीच घेणे देणं नाही. यात रुग्ण दगावला तर केमिस्टची जबाबदारी शून्य. मार खाणार तो फक्त डॉक्टर.शिवाय त्याच्या बदनामीमुळे व्यवसायावर होणारा परिणाम वेगळाच.

आज सर्व डॉक्टरना भीती आहे ती हीच कि केमिस्टने दिलेल्या जेनेरिक औषधाच्या दर्जाची खात्री कोण देणार. आजकाल लोकांचा धीर फार लवकर सुटतो आणि एकंदर सरकार आणि माध्यमे यांच्याकडून होणाऱ्या अपप्रचार यामुळे कोणताही डॉक्टर जरासुद्धा धोका पत्करायची तयारी दाखवत नाही.

नकली औषध बनवल्याबद्दल त्या कंपनीच्या संचालकांना आणि ते विकल्याबद्दल केमिस्टला अटक होऊन त्यावर खटला चालून निकाल लागेपर्यंत बहुतेक वेळेस डॉक्टर वानप्रस्थाश्रमात पोचलेला असतो.

आज डॉक्टर कमिशन मिळते म्हणून एखादे महाग औषध लिहून देतो त्यात त्याचा (गैर)फायदा आहे हे नक्की पण शेवटी स्वतःवर जबाबदारी असल्याने तो नकली औषध तरी नक्की देणार नाही. पैशासाठी फार तर नको असलेली व्हिटॅमिन्स, पूरक अन्न किंवा मिनरल्स सारखी भारंभार पण निरुपद्रवी औषधे लिहून देईल.

आम्ही दवाखान्यात रुग्णांना देण्यासाठी जेनेरिक औषधे ठेवली तेंव्हा त्याच्या घाऊक विक्रेत्याला विचारले कि याच्या दर्जाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? त्यावर तो प्रामाणिकपणे म्हणाला कि सर मी तुम्हाला आज फसवले तर उद्या तुम्ही मला दारात उभे करणार नाही.एवढेच नव्हे तर तुम्ही इतर डॉक्टरना सांगाल कि माझी औषधे नकली आहेत. मलाही धंदा करायचा आहे.त्यावर माझेही पोट अवलंबून आहे. तुम्ही निश्चित राहा कि मी तुम्हाला पुरवतो ती औषधे उत्तम दर्जाचीच असतील.

तेंव्हा हा प्रश्न जितका दिसतो तितका सोपा नाही आणि याला फार पैलू आणि फाटे आहेत.

आतापर्यंत जेवढे स्मरणात आहे तेवढे लिहिले आहे. जसे अजून काही आठवेल तसे यात भर घालीन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कॅथरीन एबान ह्या लेखि केने बॉटल ऑफ लाइज नावाचे पुस्तक लिहीले आहे. हे गूग्ल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. भारतीय कंपनी रॅन बॅक्सी ने अमेरिकन एफ डी ए ची प्रमाण पत्रे मिळवून नफा कमविण्यासाठी केलेल्या कट कारस्थानांचे साद्यंत विथ पुरावे वर्णन व क्रोनोलॉजी दिलेली आह. अतिशय उत्तम पुस्तक. भारतीय जुगाड मानसिकता, रेगुलेटरी डेटा, टेस्टिन्ग क्लिनिकल व इतर ट्रायल्स बद्दल कॅजुअल अ‍ॅटिट्युड चे चांगले वर्णन केले आहे. हे पुस्तक वाचल्यावर कोणतीही गोळी सिरप घेण्याआधी धडकी भरते. जेनेरिक्स मध्ये भारतात चालणारे उपद्रवी उद्योग विस्तारून लिहीले आहे. ह्यातील बर्‍याच कंपन्या हैद्राबाद आउट् स्कर्ट्स वर, रंगारेड्डी डिस्ट्रिक्ट ह्या भागात होत्या आहेत. कामानिमित्ताने मी तिथे गेलेली आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना अनेक वेळा धक्के बसले.

अजूनही भारतातील लिस्टेड फार्मा कंपनी सुद्धा एफ डी ए ची नोटिस आली की टेन्शन मध्ये असतात व शेअर्स चे भाव त्या दिवशी कमी होतात.
एफ डी ए इन्स्पेक्टर ला कसे मॅनेज करायचे हे पण पुस्तकात दिले आहे.

रॅनबॅक्सी विरुद्ध एका भारतीय व्हिसल ब्लोअर ने दिलेल्या लढ्याची केस पुस्तकात आहे. एकदम थ्रिलर लेव्हल आहे पुढे रॅनबॅक्सीचे काय झाले आहे ते पेपर मध्ये आहेच.

रॅनबॅक्सीसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापण्याची दुर्बुद्धी सिंग बंधूना का झाली हे खरंच कळत नाही.

त्यांना एका दशकातच अंबानी व्हायचे होते असे वाटते

कारण एके काळी रॅनबॅक्सी हि खरच चांगली आणि दर्जेदार औषधे निर्माण करणारी कंपनी होती.

सुबोध साहेब, हा विषय इथे चर्चेसाठी आणलात त्याबद्दल धन्यवाद. या चर्चेतून दुसरी बाजू समजण्यास मदत होईल.
बर्‍याचदा जनरीक औषधाचे दुकान जेंव्हा जेंव्हा दिसते तेंव्हा तेंव्हा खाजगी कंपन्यांची बरीच महाग मिळणारी औषधे घेण्याऐवजी अधिकृत जनरीक दुकानातून घ्यावे अशी बर्‍याचदा इच्छा होते. पण ही औषधे इतकी स्वस्त आहेत तर त्यांच्या दर्जाची काय खात्री? त्याचा काही गंभीर साईड इफेक्ट तर नसेल ना? इतरत्र न विकली गेलेली आणि कालबाह्य झालेली औषधे तर इथे दिली जात नसतील ना? अशा नाना शंकांनी जनरीक औषधे घेण्याचे धाडस कधी झाले नाही. व्यक्तीगत पातळीवर या शंकांची उत्तरे शोधणे अवघड असल्याने याबाबत एकदोनदा थेट डॉक्टरांनाच विचारले की, तुम्ही ही औषधे देता त्याची जनरीक आवृत्ती घेतली तर चालेल का? यावर डॉक्टरांनी अक्षरशः मौन पाळले. डॉक्टरांना म्हटले तुमच्या खात्रीच्या जनरीक दुकानांची आणि कंपन्यांची नावे सुचवा आम्ही तिथूनच घेऊ. पण ते काहीच बोलले नाहीत. 'हो' ही नाही आणि 'नाही' नाही. खुद्द डॉक्टरांकडून असा उदासीन प्रतिसाद मिळाल्यावर एक सामान्य माणूस म्हणून आमच्यापासून ती जनरीक औषधे नेहमी चार हात दूरच राहिली.
डॉक्टरकडे बोट दाखवायच्या हेतूने हे लिहीत नाही, रुग्णाची बाजू म्हणून याकडे पाहावे. ही कोंडी फुटून खरोखरच चांगला दर्जा राखून असलेल्या जनरीक औषधांचा फायदा सर्वसान्यांना व्हावे असे फार वाटते.

पेटंटेड औषधे मॅनुफॅक्चरैन्ग ला उपलब्ध झाली की पहिल्या सहा महिन्यात इतका नफा कमवता येतो की त्या क्षणाला तुमचे जेनेरिक ड्रग तयार पाहिजे. ह्यासाठी भारतीय कंपन्या युएस एफ्डीए च्या दारात लाइन लाउन खास लाय सन्स मिळावे म्हणून फिल्डिंग लाउन उभ्या असतात. एंटायर
टीम्स आर अलोकेटेड फॉर धिस. ह्या टायमिन्ग सा ठी ड्रग तयार हवे पण त्यासाठी बॅक प्रोसेस मध्ये मॅनुफॅक चरिन्ग लाइन, सर्व प्रोसेस, टेस्टेड ड्रग तया र हवे. पण हे कराय ला शॉर्ट कट नाही. पण कंपन्या शॉर्ट कट घेतात.

प्रिस्क्रि प्टेड ब्रांडे ड औषधांवरून एकदम पैसे वाचवायला जेनेरिक्स वर शिफ्ट झालेल्या अमेरि क न पेशंट ला बरेच साइड इफेक्ट आलेले आहेत.
डॉक्युमेंटेड केसेस आहेत. तसे सुद्धा गरीब देशांत ही जेनेरिक्स पण लोकांना मिळत नाहीत तिथे तर काहीही कमी टेस्टेड अन टेस्टेड ड्रग चालते
तिथे पहिले डिरेक्ट विकून बघतात.

भारतीय मानसिकतेत डाटा ला रिस्पेक्ट नाही. प्रोसेस ला मान नाही. झट की पट पैसे कमवून घ्यायचे हेच ध्येय असते. पण एफ डी ए सिस्टिम्स फायनली कॅच अप करतात.

@ गजानन
वर म्हटल्याप्रमाणे
"मेरोपेनेम" लिहून दिले तर बाजारात त्याचे १२८ ब्रँड उपलब्ध आहेत. आणि त्यांची किंमत ९८० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत आहे.
आता फक्त एकाच औषधाचे इतके ब्रॅण्ड्स उपलब्ध असतील तर डॉक्टर कसे आणि कुठच्या कंपनीचे जेनेरिक औषध तुम्हाला घेण्यास सुचवणार?
त्यातून एखादा ब्रँड त्यांनी सुचवला आणि तो महाग असेल तर रुग्ण बाहेर जाऊन बोलतात कि यात डॉक्टरांचा काही तरी फायदा असणारच.

अशा अपकीर्तीपेक्षा डॉक्टर मौन बाळगणे पसंत करतात.

मुदलात एखाद्या औषधाची तपासणी करण्यासाठी आपल्या आपल्याकडे प्रयोगशाळाच इतक्या कमी आहेत कि औषधाच्या गुणवत्तेबद्दल खात्री देणे कठीण आहे.
सरकारची या दृष्टीने कार्यवाही चालू आहे त्यात औषधावर एक कोड छापणे आवश्यक केले आहे हा कोड आपण सरकारच्या नंबरवर एस एम एस पाठवून त्याची खात्री करू शकता. The Drug Technical Advisory Board (DTAB) has come up with a technological solution to check the authenticity of medicines. For this, consumers can SMS the unique “Authentication code” to 9901099010 to receive an authentication message from the pharmaceutical manufacturer.

https://www.thebetterindia.com/141615/medicines-fake-govt-check/

आपण औषधे अस्सल आहेत का यासाठी काही गोष्टी पण कराव्यात त्या याप्रमाणे

https://www.thebetterindia.com/166715/uttar-pradesh-fake-medicine-check-...

जर आपला केमिस्ट खात्रीचा असेल तर आपल्याला नकली औषधे तो सहजासहजी विकणार नाही. बरयाच वेळेस माणसे दुसरा केमिस्ट स्वस्त देतो म्हणून औषधे त्याच्याकडून घेतात. ( अर्थात दुसरा केमिस्ट चोरच असतो असे म्हणणे पण चूक ठरेल)

भारतीय मानसिकतेत डाटा ला रिस्पेक्ट नाही. प्रोसेस ला मान नाही. झट की पट पैसे कमवून घ्यायचे हेच ध्येय असते. >>
अमा, हे फार जनरलाइझ करणे चूक आहे. मी स्वतः याक्षेत्रात काम करत असल्याने कॉम्पायन्स साठी किती मेहनत घेतली जाते हे मला माहित आहे. येत्या १० वर्षात आपल्या कंपन्या न चुकता जागतीक स्तरावरील अपेक्षित असलेले गुणवत्तेतील सातत्य राखू शकतील याची मला खात्री आहे.
शिवाय एफडीएचा बडगा एक व्यापारी हत्यार म्हणूनही वापरला जातो हे सत्य आहे. आपल्याच कंपन्या अमेरिकेत पॅकेजिंग करून भारतात बनवलेले प्रॉडक्ट जेंवा अमेरिकेत विकतात त्यांना कमी त्रास होतो हे सत्य आहे.

अमेरिकन वा परदेशी कंपन्या सुद्धा मालप्रॅक्टिसेस मधे अजिबात मागे नसतात . जॉन्सन अँड जॉन्सन हे त्याचे उदाहरण. एफडिएचे नियम अमेरिकन कंपन्यातील चुका सुधारण्यासाठीच बनवण्यात आले होते.
वोक्स वॅगन हे ऑटोमधील उदाहरण. एरीन ब्रोकोविच आपल्या सगळ्यांना माहित आहेच. अशी प्रत्येक क्षेत्रातील कित्येक उदाहरणे आहेत.

सुबोधजी - छान लेख.

खूप छान लेख . बरेच डॉ. जेनेरिक घेऊ का म्हणल्यावर मौन का बाळगतात ते लेख वाचून समजले.

माहितीपूर्ण लेख.
किडनी, हार्ट, कॅन्सर इ. मोठ्या आजाराबाबत त्यांची औषधे आणि जेनेरिक औषधे यांच्या किमती, त्यातील फरक याशिवाय भारतीय औषधे आणि विदेशी औषधे व त्यातील तफावत याबद्दल काही सांगू शकाल का?

मस्त लेख आणी सोपे करुन सांगीतल्याबद्दल धन्यवाद. नागपूरला असे जेनेरीक औषधांचे मेडीकल आहे. मला वाटते एका डॉक्टरांनीच ते गरीब रुग्णांना फायदा व्हावा याकरता सुरु केलेय. नागपूरवासी सांगु शकतील नाव वगैरे.

जिनेरिक जिनेरिक ओरडा करणाऱ्या लोकांना हे सर्व माहिती असते तरीही शहाणपणाचा आव आणून इतर रुग्णांची अवस्था "आपल्याला डॉक्टर फसवत नाही ना?" अशी करतात. भिववून टाकतात.
याबद्दलच इथे कुठेतरी एक प्रतिसाद रुग्णाच्या दृष्टिकोनातून लिहिला होता. जर का तुम्हाला वाटतय की जिनेरिक औषध प्रिस्क्रिप्शन मध्ये न दिल्याने आपला खर्च वाढतोय तर यातून मार्ग तुम्हीच काढा. अधुन मधून केमिस्टाकडून जिनेरिक आणा आणि पन्नास टक्के खर्च वाचवा. पण संपूर्णपणे टोकाचा निर्णय कुणाच्यातरी सांगण्यावरून घेण्यात धोके असतात. ते कसे हे लेखात खरेसाहेबांनी सांगितले आहेच.
थोडक्यात कुणी जिनेरिकची महती सांगेल तर तर "होय तेच करतो" सांगून वाद टाळणे उत्तम. आपला सददसद्विवेक विपरणे गरजेचे.
छान लेख.

@ अ मा

आपला प्रतिसाद बराचसा एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे.

प्रिस्क्रिप्टेड ब्रांडे ड औषधांवरून एकदम पैसे वाचवायला जेनेरिक्स वर शिफ्ट झालेल्या अमेरि क न पेशंट ला बरेच साइड इफेक्ट आलेले आहेत.
डॉक्युमेंटेड केसेस आहेत.

अशा केसेस फार तर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतील.

जेनेरिक्स मुळे साईड इफेक्टस यायचा काही तरी सबळ कारण असायलाच पाहिजे. कारण जर अमेरिकन एफ डी ए ने त्या औषधाला परवानगी दिली असेल तर त्याची उत्पादन सुविधेचे सर्वेक्षण केल्याशिवाय अशी परवानगी देतच नाहीत. जेनेरिक्स मध्ये औषधाचे प्रमाण कमी असेल तर इफेक्ट कमी येईल किंवा येणार नाही. आणि जर प्रमाण जास्त असेल तरच साईड इफेक्ट येतील.

असे सरसकट आपले म्हणणे आपला पूर्वग्रह दाखवत आहे.

तसे सुद्धा गरीब देशांत ही जेनेरिक्स पण लोकांना मिळत नाहीत तिथे तर काहीही कमी टेस्टेड अन टेस्टेड ड्रग चालते
तिथे पहिले डिरेक्ट विकून बघतात.

भारतात फार मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधे उत्पादन होते याचे कारण भारतात २००५ पूर्वी प्रॉडक्ट पेटंट नव्हते तर प्रोसेस पेटंट होते. म्हणजे औषध कोणते याचे पेटंट नव्हे तर औषध कसे बनवले या पद्धतीचे पेटंट होते. याविरुद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर गटबाजी(lobbying) करून शेवटी जागतिक बाजारपेठेत भारताला प्रॉडक्ट पेटंट लागू करण्यास भाग पाडले.

त्या अगोदर डॉ अंजी रेड्डी ( डॉ रेड्डी लॅब वाले) यांनी सध्या सोप्या पद्धती वापरून औषधे तयार केली होती. उदा. बूट्स या कंपनीने आयब्युप्रोफेन हे औषध शोधले होते त्याची उत्पादनपद्धती किचकट होती. डॉ अंजी रेड्डी यांनी पेट्रोलियम उत्पादन प्रोपियोनीक आम्ल पासून ब्रुफेन बनवायला सुरुवात केली हे औषध बूट्सच्या केवळ ५ टक्के किमतीत बनत असे. बूट्स ने त्यांना धमकी दिली कि आम्ही तुम्हाला बाजारातून हाकलून देऊ. परंतु असे व्हायच्या ऐवजी बूट्स ने पुढच्या वर्षीपासून ब्रुफेन डॉ रेड्डी या कंपनीकडून बनवून घेण्यास सुरुवात केली.कारण त्यांची उत्पादन पद्धती फारच खर्चिक होती. अशीच स्थिती ग्लॅक्सो च्या ranitidine या औषधाची होती.

भारतात बुद्धिमत्तेची अजिबात कमतरता नाही.त्यातून दर्जेदार औषधे बनवणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आहेत ज्या मध्ये जागतिक दर्जाचे उत्पादन अत्यंत कमी दरात सहज होऊ शकते. पण यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफेखोरीला फार मोठ्या प्रमाणावर अटकाव होतो.

भारतीय मानसिकतेत डाटा ला रिस्पेक्ट नाही. प्रोसेस ला मान नाही. झट की पट पैसे कमवून घ्यायचे हेच ध्येय असते. पण एफ डी ए सिस्टिम्स फायनली कॅच अप करतात.

एफ डी ए ची प्रणाली किती सच्ची आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांना कसे वळवून घेतात आणि आपल्या विरोधात असणाऱ्या कंपन्यांच्या कारखान्यांवर सर्वेक्षणात मर्यादा आणतात हे त्यात काम करणाऱ्या लोकांना बरोबर माहिती आहे

एखाद्या औषधाची अमेरिकेत कमतरता निर्माण झाली कि एफ डी ए आपल्या काटेकोर धोरणांना कशी मुरड घालते हे जगजाहीर आहे.

he storm exacerbated or precipitated shortages of critical drugs made there, including IV fluids already in limited supply since 2014. In response, the FDA has permitted the otherwise unlawful importation of unapproved IV fluids from Ireland, Australia, Mexico, Canada and Germany, consistent with its 2013 policy for dealing with drug shortages.

https://thehill.com/opinion/healthcare/362618-solve-us-drug-shortages-wi...

असाच अपवाद मागच्या वर्षी भारतातून आयात करण्यात येणाऱ्या क्लोरोक्वीन बद्दल केला गेला होता.

मुळात अमेरिकेत नफेखोरी हि किती प्रचंड प्रमाणात आहे याचे आपल्याला उदाहरण हवे असेल तर डाराप्रिम या औषधाचे उदाहरण देतो आहे.

या औषधाच्या चार गोळ्यांची किंमत १३.५० डॉलर्स होती.ते बनवणारी कंपनी अमेरिकेत एकच होती. हि कंपनी एका खाजगी गुंतवणूक दाराने विकत घेतली आणि एका रात्रीत या औषधाची किंमत ७५० डॉलर्स केली.
याबद्दल फार मोठ्या प्रमाणावर वादंग झाला. त्या गुंतवणूकदाराला "पूर्वी केलेल्या" घोटाळ्याबद्दल सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली परंतु आजही या औषधाची किंमत ७५० डॉलर्सच आहे.

कारण औषधाची किंमत कितीही ठेवणे हे अमेरिकेत कायदेशीर आहे.

भारतात GSK (glaxo smithkline) या बहुराष्ट्रीय कंपनीच्या याच औषधाच्या( क्रोयडॉक्सिन) चार गोळ्यांची आजची किंमत तीन रुपये नव्वद पैसे आहे( रुपये तीन आणि पैसे नव्वद फक्त) कुठे रुपये ३. ९० आणि कुठे रुपये त्रेपन्न हजार पाचशे( डॉलर च्या आजच्या बाजारभावाप्रमाणे)

Drug Goes From $13.50 a Tablet to $750, Overnight
https://www.nytimes.com/2015/09/21/business/a-huge-overnight-increase-in...
https://ethicsunwrapped.utexas.edu/wp-content/uploads/2018/07/Daraprim-P...

बापरे.
खरंच खूप माहिती मिळत आहे डॉक्टर तुमच्याकडून. अतिसमृद्ध व संपन्न देशात सगळे आलबेल असते असा गैरसमज दूर होत आहे.

आपल्याकडे पैसे असतील तर भारतासारखी वैद्यकीय सुविधा फारच कमी देशात उपलब्ध आहे असे मला खेदाने म्हणावे लागते आहे.

इंग्लंड मध्ये जर आपल्याला कर्करोग आहे अशी शंका असेल तर कर्करोग तज्ज्ञाला भेटण्यास आपल्याला एक महिना पर्यंत लागू शकतो.

In November, 14,634 people did not see a specialist cancer consultant within 14 days,

Another 2,884 people could not start their treatment inside 62 days, and a further 894 did not begin their treatment within 31 days, despite family doctors classifying both groups as urgent cases.

While 113,935 patients had to wait longer than 14 days in 2017-18, even more – 124,133 – missed out that target between April to November 2018.

https://www.theguardian.com/society/2019/jan/10/nhs-england-misses-multi...

Record 20,000 patients a month are suffering delays in seeing a consultant or starting therapies

छान लिहिलंय. बहुतेक या विषयावर जुना धागा आहे एक. आमिर खानने सुद्दा एक एपिसोड केला होता (नांव विसरलो). हेल्थ केअर हा खुप गुंतागुंतीचा विषय असल्याने भरपुर लोकसंख्या असलेल्या कुठल्याहि देशांमधली सिस्टम पर्फेक्ट नाहि, आणि होणारहि नाहि...

बिगर आरक्षणाचं डॉक्टर होणं एवढं सोपं नाही. खूप फी भरावी लागते शिवाय मेरीट असूनही मेडीकलला अॅडमिशन मिळण्याची शाश्वती नाही. कमी फी घेणाऱ्या डॉक्टर ला पेशंटच टाळतात.‌ हॉस्पिटल उभारणं, उपकरणे विकत घेणं खूप जिकिरीचे काम आहे. शिवाय डॉक्टरांच्या चूकीला माफी नसते.

त्यामुळे डॉ लोक जास्त परिणामकारक, नावाजलेल्या कंपन्यांची थोडी महाग का होईना औषधं प्रिस्क्राइब करतात हे मावैम.

खूप सुंदर लेख . आमच्या एरियात आहे जेनेरिक औषधांचा केमिस्ट पण अजून जाऊन घेतली नाहीत . कुठले औषध ( औषधाचे नाव ) कुठल्या रोगावर याची जरा बेसिक यादी दिलीत तर बर होईल . आपण जसे सर्दी /खोकला /तापावर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय केमिस्ट कडून गोळ्या घेऊन येतो तस आणता येईल ना ?

Pages