जेनेरिक औषधे

Submitted by सुबोध खरे on 11 February, 2020 - 23:40

जेनेरिक औषधे -- हा एक अत्यंत विशाल असा महासागर असून यात जितक्या डुबक्या माराल तितकी रत्ने निघतील.

पहिली गोष्ट म्हणजे जेनेरिक औषध म्हणजे काय.
उदा पार्क डेव्हिस या कंपनीने क्लोरोमायसेटीन हे प्रतिजैविक शोधून काढले १९४७. टायफॉईड किंवा विषमज्वर यासाठी रामबाण असलेले हे पहिले औषध. शोध लावणाऱ्या कंपनिला तिच्या शोध लावण्याच्या प्रक्रियेसाठी आलेला खर्च भरून निघण्यासाठी पेटंट दिले जाते. या पेटंट द्वारे १५ वर्षेपर्यंत दुसरा कोणीही ते औषध बनवू/ विकू शकत नाही. ती कंपनी आपली मक्तेदारी वापरून औषध विक्री करू शकेल, ज्याद्वारे ती आपला नफा वसूल करू शकेल आणि पुढच्या अधिक संशीधनाला पैसा उपलब्ध होऊ शकेल हा पेटंट कायद्याचा मूळ हेतू.

हे औषध १९४९ साली भारतात उपलब्ध झाले तेंव्हा एका (२५० मिग्रॅम) कॅप्सूल ची किंमत होती अडीच रुपये. दिवसाला सहा कॅप्सूल द्यायला लागत. म्हणजे रोजचा खर्च १५ रुपये. तेंव्हा सोन्याचा भाव होता ८० रुपये १० ग्रॅमला.

आज क्लोरोमायसेटीनची किंमत आहे तीन रुपये कॅप्सूलला. विचार करा त्या कंपनीने किती नफा केला असेल ते.आमचे वडील सांगतात कि आमच्या आजोबाना आणि आमच्या काकांना टायफॉईड झाला आणि तो उलटला (relapse) त्यामुळे अगोदरच कुळकायद्यात जमीन गेलेली होती वर या उपचारांचा खर्च असल्यामुळे घरातील सर्वच्या सर्व सोने विकायला लागले. आमच्या कुटुंबाची परिस्थिती संपन्नावस्थेतून विपन्नावस्थेत गेली.

पंधरा वर्षांनी जेंव्हा औषध पेटंट मुक्त होते तेंव्हा ते कोणतीही कंपनी बनवू शकते. आणि मग स्पर्धा सुरु होते. मग जो स्वस्तात ते औषध बनवू/ विकू शकतो तो या स्पर्धेत टिकतो. मग चांगल्या कंपन्या ज्यांच्याकडे ते औषध बनवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असते त्या ते औषध बनवण्यास सुरुवात करतात.

अशी औषध बनवण्याची प्रक्रिया झाल्यावर औषधाचा दर्जा कसा असावा याची इत्यंभूत माहिती फार्माकोपिया नावाच्या पुस्तकात दिलेली असते. उदा IP किंवा INDIAN PHARMACOPOEA. हे पुस्तक भारत सरकार प्रसिद्ध करते. किंवा USP ( अमेरिकेचे) किंवा BP (ब्रिटनचे).

प्रत्येक औषधात एका ग्राम मध्ये प्रत्यक्ष औषध कमीतकमी किती टक्के(उदा. ९९. ८७%), क्लोराईड किती(०.००१५%) , सोडियम किती,
(ASH )राख किती इ. स्पष्टपणे दिलेले असते. असे घाऊक औषध विकणाऱ्या कंपन्या आपले औषध कोणत्या मानक पुस्तकाप्रमाणे आहे ते त्यावर लिहितात उदा. PARACETAMOL IP. किंवा IBRUPROFEN USP. (हे थोडेसे EURO ६ किंवा BHARAT ४ सारखेच आहे).

एक लक्षात घ्या सर्वच औषध बनवणाऱ्या कंपन्या ती बाजारात विकतात असे नाही तर घाऊक प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांना विकतात.(आजकाल अशी घाऊक औषधे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वस्तात तयार होतात आणि ती जगभर निर्यात केली जातात.) घाऊक औषध विक्रेते मग ती औषधे मोठ्या कम्पन्याना प्रथम विकतात. कारण त्यांची ऑर्डर मोठी असते पण त्यांचे दर्जाचे निकष काटेकोर असतात. त्यांच्या दर्जात थोडी कमतरता आल्यामुळे नाकारलेली औषधाची बॅच मग ते छोट्या औषध उत्पादकांना विकतात. अर्थात हे फार गंभीर असेलच असे नाही.

असे घाऊक औषध( BULK DRUG) विकत घेऊन चांगल्या कंपन्या आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष चाचणी करून खात्री करून घेतात आणि ते औषध वापरून तुम्हाला मिळणाऱ्या गोळ्या सिरप इ औषधीत रूपांतर करतात. चांगल्या कंपन्या मग अशा औषधांना स्वतःचे एक नाव (ब्रँड नेम) देऊन ते बाजारात उतरवतात. उदा. क्रोसिन. यात पॅरासिटामॉल हे मूळ औषध असते. क्रोसिनच्या गोळीची किंमत साधारण १ रुपयाला एक आहे. त्याच ऐवजी सिप्ला या कंपनीचे PARACIP हे ७० पैशाला मिळते. इतर कोणती कंपनी तेच औषध पॅरासिटॅमॉल म्हणून बाजारात जेनेरिक म्हणून २० पैशात विकते.

जोवर औषधाच्या दर्जाची खात्री देता येते तोवर जेनेरिक औषध देणे हे नक्की चांगले आहे.

काही कंपन्या स्वतः आपले ब्रँड आणि जेनेरिक अशी दोन्ही औषधे बाजारात आणतात. उदा रॉक्सीडं नावाचे प्रतिजैविक (ANTIBIOTIC) अलेम्बिक या कंपनीचे औषध ७२ रुपयाला १० गोळ्या मिळत असे आणि तेच औषध जेनेरीक म्हणून ४० रुपये MRP चे मिळत असे. हे औषध ४० रुपयाला रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध करून द्यावे म्हणून द्यावे आम्ही विकत आणून ठेवले होते. पण रुग्णांना वाटत असे कि यात डॉक्टरांचा फायदा आहे त्यामुळे ते ७२ रुपये देऊन केमिस्ट कडून औषध घेणे पसंत करीत. यामुळे आम्ही नंतर असा रुग्णांचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न सोडून दिला. असो.

या रणधुमाळीत मग हवशे नवशे गवशे सगळेच सामील होतात. मग नकली औषधे निर्माण होतात आणि हातोहात खपवली जातात. सरकारी रुग्णालयात असणारे खरेदी विभागाचे साटेलोटे पासून खाजगी औषध विक्रेत्या बरोबर बनवलेले लागेबांधे. यात म्हणाल तेथे आणि म्हणाल त्या किमतीची औषधे उपलब्ध असतात.

भारतात मिळणारी २५ % औषधे नकली आहेत. म्हणजे चारात एका रुग्णाला मिळणारी औषधे नकली आहेत. हा बाजार २५००० कोटी ( होय पंचवीस हजार कोटी) रुपयांचा आहे. http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...

हि २५ % नकली औषधे सोडून देऊ. बाकी ७५% औषधे नकली नाहीत हे मान्य. परंतु त्या औषधांचा दर्जा जागतिक दर्जाइतका आहे का? हा एक मोठा गहन प्रश्न आहे.
अमेरिकेतील FDA हे अत्यंत कडक असून तेथे नकली औषध बनवणार्यांना आणि विकणार्यांना जबर दंड आणि शिक्षा आहे. त्यामुळे तेथे जेनेरिक औषधे देण्यास डॉक्टरना किंतु येत नाही. आपले FDA काय आणि किती कार्यक्षम आणि प्रामाणिक आहे याबद्दल न बोलणे बरे.

साधे डोकेदुखीवर एस्प्रो (ASPRO) घ्या. हे ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिन असलेले औषध मायक्रोनाईजड कणाचे बनलेले असते. त्यामुळे तो गोळी आपल्या पोटात जाताच ताबडतोब म्हणजे १५ सेकंदात विरघळते. आणि याचा पूर्ण परिणाम १५ मिनिटात होतो. आपण डिस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवली आणि घेतली तरी असाच परिणाम दिसून येतो. याच ऐवजी हॅस्प्रो किंवा तत्सम जेनेरिक औषध असेल त्यात ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिनच असेल पण ते सूक्ष्म कणांचे ना बनवता साधे असेल तर ते पोटात विरघळायाला १५ मिनिटे लागतील. म्हणजे आपल्या डोकेदुखीपासून पूर्ण आराम व्हायला १५ च्या ऐवजी ३० मिनिटे लागतील.

यात मूळ औषध चांगल्या दर्जाचे खरोखर आहे हे गृहीत धरले आहे.

आता आपण मेट्रोनिडॅझॉल हे औषध घेऊ. आमांश किंवा अमिबिक डिसेंट्रीसाठी लागणारे औषध. हे औषध जठराच्या हायड्रोक्लोरिक आम्लात विघटीत पावते आणि शिवाय त्याच्या पदार्थामुळे जठराचा दाह होऊन आम्लपित्त होते. म्हणून ते एका इन्टेरिक कोटेड गोळी मध्ये मिळते. हि गोळी त्याच्या खास आवरणामुळे आम्ल वातावरणात विरघळत नाही तर अल्कलाईन वातावरणातच विरघळते. त्यामुळे औषधाचा परिणाम जठरावर होत नाही किंवा ते विघटन पावत नाही. आता मेट्रोनिडॅझॉलच्या २५० मिग्रॅमच्या जेनेरिक गोळीत तेवढे द्रव्य असेल पण जर ते इन्टेरिक कोटेड नसेलच तर रुग्णाला त्याचा फायदा होणार नाही उलट एखादा अन्य पॅथीवाला तुम्हाला ऍलोपॅथीची औषधे "उष्ण" पडतात म्हणायला मोकळा असतोच.

याशिवाय औषध इंटेरिक कोटेड आहे पण त्याचे कोटिंग व्यवस्थित नसेल तर किंवा कारखान्यापासून रुग्णापर्यंत पोहोचण्यात होणाऱ्या हाताळण्यात जर त्याला भेगा पडल्या किंवा गोळीचा कोपरा तुटला तर या गोळ्यातील मेट्रोनिडॅझॉल बाहेर पडून रुग्णाला उपचार नाहोत अपायच होईल.

या दोन्ही प्रकारांबद्दल डॉक्टरच्या हातात काय आहे? हे जेनेरीक औषध ना त्याने बनवले आहे ना त्याच्याकडे या औषधाचा दर्जा तपासण्याची यंत्रणा. परत रुग्ण बरा नाही झाला तर जबाबदारी डॉक्टरचीच असते. सुरुवात आपले निदान चुकले आहे का या शंकेपासून होते. निदानाबद्दल खात्री झाल्यावर रुग्णाने औषध व्यवस्थित वेळेवर आणि दिलेल्या डोसइतके घेतले आहे का याची शहानिशा होते.( औषध उष्ण पडते म्हणून तीन पैकी दोनच डोस घेणारे रुग्ण भरपूर भेटतात).

आता निदान नक्की आहे आणि रुग्ण सुद्धा विश्वासू आहे आणि त्याने औषध व्यवस्थित घेतले आहे तरी उपचाराचा गुण का येत नाही हे पाहायला गेले तर औषधाच्या दर्जाबाबत शंका येणार.मग अशी परिस्थिती येण्यापेक्षा डॉक्टर सरळ प्रथितयश कंपन्यांची औषधेच लिहून देतात.

याउलट जर तुम्ही उद्या टाटाने औषध कंपनी काढली तर ती औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरला शंका येणार नाही. कारण टाटांचे "नाव" आहे आणि आपल्या नावाला काळिमा लागेल असे ते काहीही करत नाहीत.

हीच खात्री अगरवाल किंवा गोयल फार्मा कंपनी गुडगाव बद्दल देता येईल का?

जर भारतात FDA ने सर्व औषध कंपन्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला आणि जर औषध कंपन्याना उत्पादनाचा परवाना देताना अत्यन्त कडक अशी तपासणी केली त्याचबरोबर नकली औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना सज्जड शिक्षा झाली. असे झाले तर भारतात जेनेरीक औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरना शंका येणार नाही.

अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन अशा प्रत्येक कारखान्यावर कडक नजर ठेवून असते उदा.
http://www.livemint.com/Companies/Z2tnAgoQ6vfRmvimSOdK8L/Ciplas-Indore-f...

आजची परिस्थिती काय आहे. मी जर जेनेरिक औषध म्हणून गंभीर असलेल्या मेनिन्जायटिसच्या रुग्णाला "मेरोपेनेम" लिहून दिले तर बाजारात त्याचे १२८ ब्रँड उपलब्ध आहेत. आणि त्यांची किंमत ९८० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत आहे.
http://www.drugsupdate.com/brand/showavailablebrands/292/2

डॉक्टरने फक्त जेनेरिक औषधाचे नाव लिहून दिले तर आता सर्व निर्णय राह्तो केमिस्टच्या हातात. मग जी कंपनी त्याला सर्वात जास्त कमिशन देईल त्याचेच औषध तो जेनेरिक म्हणून तुम्हाला विकणार. पण त्या कंपनीला हे औषध बनवण्याचा अनुभव त्याचे तंत्रज्ञान किती याचे केमिस्टला काहीच घेणे देणं नाही. यात रुग्ण दगावला तर केमिस्टची जबाबदारी शून्य. मार खाणार तो फक्त डॉक्टर.शिवाय त्याच्या बदनामीमुळे व्यवसायावर होणारा परिणाम वेगळाच.

आज सर्व डॉक्टरना भीती आहे ती हीच कि केमिस्टने दिलेल्या जेनेरिक औषधाच्या दर्जाची खात्री कोण देणार. आजकाल लोकांचा धीर फार लवकर सुटतो आणि एकंदर सरकार आणि माध्यमे यांच्याकडून होणाऱ्या अपप्रचार यामुळे कोणताही डॉक्टर जरासुद्धा धोका पत्करायची तयारी दाखवत नाही.

नकली औषध बनवल्याबद्दल त्या कंपनीच्या संचालकांना आणि ते विकल्याबद्दल केमिस्टला अटक होऊन त्यावर खटला चालून निकाल लागेपर्यंत बहुतेक वेळेस डॉक्टर वानप्रस्थाश्रमात पोचलेला असतो.

आज डॉक्टर कमिशन मिळते म्हणून एखादे महाग औषध लिहून देतो त्यात त्याचा (गैर)फायदा आहे हे नक्की पण शेवटी स्वतःवर जबाबदारी असल्याने तो नकली औषध तरी नक्की देणार नाही. पैशासाठी फार तर नको असलेली व्हिटॅमिन्स, पूरक अन्न किंवा मिनरल्स सारखी भारंभार पण निरुपद्रवी औषधे लिहून देईल.

आम्ही दवाखान्यात रुग्णांना देण्यासाठी जेनेरिक औषधे ठेवली तेंव्हा त्याच्या घाऊक विक्रेत्याला विचारले कि याच्या दर्जाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? त्यावर तो प्रामाणिकपणे म्हणाला कि सर मी तुम्हाला आज फसवले तर उद्या तुम्ही मला दारात उभे करणार नाही.एवढेच नव्हे तर तुम्ही इतर डॉक्टरना सांगाल कि माझी औषधे नकली आहेत. मलाही धंदा करायचा आहे.त्यावर माझेही पोट अवलंबून आहे. तुम्ही निश्चित राहा कि मी तुम्हाला पुरवतो ती औषधे उत्तम दर्जाचीच असतील.

तेंव्हा हा प्रश्न जितका दिसतो तितका सोपा नाही आणि याला फार पैलू आणि फाटे आहेत.

आतापर्यंत जेवढे स्मरणात आहे तेवढे लिहिले आहे. जसे अजून काही आठवेल तसे यात भर घालीन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुजा,

क्वचित इबुप्रोफेन, किंवा परासीटमोल घ्या ओव्हर द काउंटर. बाकी कुठलंच घेऊ नका Happy

वाटल्यास, हळद + मध डेली घेत जा, भरपूर फरक पडेल (ह्यावर माझा विश्वास नव्हता आधी, पण ह्या हिवाळ्यात चांगला निभाव आला Lol सॉरी पॅथीची घुसखोरी केली Wink )

कमी फी घेणाऱ्या डॉक्टर ला पेशंटच टाळतात.‌

@आर्यन वाळुंज

हि वस्तुस्थिती नाही

आपल्याकडे फुकट ते पौष्टिक आणि स्वस्त ते मस्त हा मूलमंत्र आहे.

त्यामुळे एखादा डॉक्टर चार पैसे कमी घेत असेल तर त्याच्याकडे जायची प्रवृत्ती जास्त आहे. यातून डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा अनुचित स्पर्धा निर्माण होते. त्यातून २० आणि २५ रुपये घेणाऱ्या डॉक्टरांची हे डॉकटर पैशाकडे पाहत नाहीत अशी "ख्याती" होते.

या मनोवृत्तीतूनच पुण्यातील एका सुपर स्पेशालिस्टने तुम्हाला जितकी फी वाजवी वाटेल तितकीच द्या अशी सवंग लोकप्रिय पाटी लावली होती आणि ती व्हॉट्स ऍप्प वर फार लोकप्रिय सुद्धा झाली होती.

गुजराती जैन मारवाडी आणि सिंधी हे लोक हमखास डॉक्टरकडे सवलत मागतात. कारण वैद्यकीय उपचारावरील खर्च हा फुकटचा खर्च आहे अशीच त्या समाजांची धारणा आहे.

कालच एक सधन गुजराती माणूस "कुछ तो कन्सेशन करके दिजिये" म्हणून सांगत होता.

तेंव्हा असे सरसकटीकरण करणे शक्य नाही.

शिवाय वैद्यकीय शिक्षणासाठी किती खर्च येतो त्याचा आणि डॉक्टर किती पैसे कमावतो/ कमावू शकतो याचा तसा संबंध नाही

असो, हा धाग्याचा मूळ विषय नाही

अवांतर : फुकटे लोक सरकारी डॉक्टरांच्या मानगुटीवर बसतात. बळंच कफ सिरप, गोळ्या, टॉनिकचे औषधं दमदाटी करून मागतात. खेड्यापाड्यातील टोळभैरव पीएचसी मधील डॉक्टरांवर फार लक्ष ठेवून असतात.

"The Drug Technical Advisory Board (DTAB) has come up with a technological solution to check the authenticity of medicines. For this, consumers can SMS the unique “Authentication code” to 9901099010 to receive an authentication message from the pharmaceutical manufacturer. "
Submitted by सुबोध खरे on 12 February, 2020 - 12:10
--------------------------------------------------------------------------------------------------------
"येत्या १० वर्षात आपल्या कंपन्या न चुकता जागतीक स्तरावरील अपेक्षित असलेले गुणवत्तेतील सातत्य राखू शकतील याची मला खात्री आहे."
Submitted by विक्रमसिंह on 12 February, 2020 - 12:37
--------------------------------------------------------------------------------------------------------
हे निश्चितच चांगले आहे.

फार छान लिहिला आहे हा लेख. इतके विस्तृत आणि मुद्देसूद मराठीत मी प्रथमच वाचले.
कारण हि केस मी फार जवळून आणि फार रस घेऊन पाहत होतो. याला "पेटंट एव्हर ग्रीनिंग" म्हणतात
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जगभरातील गरीब रुग्णांसाठी घालून दिलेला एक उच्च कोटींचा वस्तुपाठ आहे. न्यायमूर्ती आफताब आलं आणि न्या रंजना देसाई यांनी अगदी मुळापासून केस ऐकून त्याचा सविस्तर कारणांसकट निवाडा दिलेला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ब्राझील फिलीपाईन्स सारख्या देशात सुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफेखोरीला आला घालण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. https://www.businesstoday.in/magazine/focus/sc-decision-on-glivec-sets-t...

बायर या कंपनीच्या नेक्सावार या औषधांबद्दल पण अशीच केस होऊन भारतीय सर्वोच्च न्यायालयाने गरिबांसाठी सोराफेनीब हे हिपॅटायटीस सी या काविळीवरचे औषध स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे. या केसच्या वेळेस बायर या कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने या औषधाच्या संशीधन आणि उत्पादन यासाठी किती खर्च येतो हे विचारले असताना त्या कंपनीने काही शेवटपर्यंत त्याचे उत्तर दिले नाही. याला "कम्पलसरी लायसेंन्सिंग" म्हणतात

https://economictimes.indiatimes.com/industry/healthcare/biotech/pharmac...

अशीच केस
https://economictimes.indiatimes.com/industry/healthcare/biotech/pharmac...

उत्तम लेख!
प्रतिसादातील दुवे देखील माहितीपूर्ण!

बायर या कंपनीच्या नेक्सावार या औषधांबद्दल पण अशीच केस होऊन भारतीय सर्वोच्च न्यायालयाने गरिबांसाठी सोराफेनीब हे हिपॅटायटीस सी या काविळीवरचे औषध स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे.

एक चूक दुरुस्ती नेक्सावार यात सोराफेनीब हे औषध असते जे मूत्रपिंड आणि यकृताच्या कर्करोगावर उपयुक्त आहे.

मूत्रपिंड कर्करोगाच्या संपूर्ण उपचारासाठी बायर च्या नेक्सावार ची किमंत ७० लाख रुपये होते तर भारतीय औषधामुळे हीच किंमत २ लाखाच्या आत येते.

सोफुसब्यूव्हीर हे औषध हिपॅटायटीस सी या प्रकारच्या काविळी साठी उपयुक्त आहे. त्याच्या पेटंट बद्दलहि असाच वादंग झाला होता.

https://www.downtoearth.org.in/news/india-denies-gilead-patent-for-hepat...

हिपॅटायटीस सी या प्रकारच्या काविळीच्या संपूर्ण उपचाराची किंमत गिलिड कंपनीच्या औषधासाठी पन्नास लाखाच्या आसपास जाते तर भारतीय औषधाने हि किंमत एक लाख दहा हजार इतकी कमी येऊ शकते

https://timesofindia.indiatimes.com/india/Hepatitis-C-drug-in-India-to-c...

सोराफेनीब आणि सोफुसब्यूव्हीर यात माझी सरमिसळ झाली.

चुकी बद्दल क्षमस्व __/\__

होय

या फरकामुळे काय होतं ते लक्षात घ्या.

हिपॅटायटीस सी साठी १६८ दिवस म्हणजे २४ आठवड्याचे एकंदर उपचार लागतात. गिलिडचे औषध घेतल्यास रोजच्या गोळीची किंमत ३५ हजार रुपये( महिन्याचा खर्च ८ लाखाच्या आसपास) होत असे. त्यामुळे असा उपचार करणे सामान्य माणसे सोडाच उच्च मध्यमवर्गास परवडत नसे.

यामुळे बरेच रुग्ण केमिस्ट कडून औषध न घेताच परत जात असत या नि कुठे तरी झाडपाल्याचा उपचार कोणीतरी कावीळ उतरवून देणारा वैदू इ च्या मागे जात आणि काही वर्षांनी यकृत खराब होऊन मृत्युमुखी पडत .

आता एक महिन्याच्या उपचाराचा खर्च १५ हजार आहे नि हा उपचार ६ महिन्यात पूर्ण होतो यामुळे अक्षरश: चतुर्थ श्रेणी कर्मचारी, रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर यांनाही हा खर्च परवडतो.

खरे डॉक्टर,
नफेखोरी सगळीकडे आहे. माझ्या मित्राला Lichen Planus हा auto immune विकार आहे. त्याच्यासाठी लागणारे औषध Clobetasol Propionate परदेशात 132 डॉलर (₹ 9,300) किमतीचे आहे, जे भारतात फक्त ₹ 88 किमतीचे आहे. आपले सरकार नक्कीच प्रयत्न करते, जे दिसून येत नाहीत.

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसादांसाठी खूप आभारी आहे.

मुद्दा नफा मिळवण्यात काही चूक आहे असे नव्हे तर मक्तेदारी निर्माण करून अचाट आणि अफाट नफा कमावण्याबद्दल आहे.

नेक्सावार या औषधाच्या निर्मितीचा खर्च किती हे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार विचारूनहि बायर या कंपनीने त्याबद्दल मौन बाळगले मग खटला हरला तरी चालेल अशी स्थिती आहे.

ऍप्पलचा आय फोन १ लाखाला विकला जातो ज्याची उत्पादन किंमत १६-१८ हजार आहे.

डी बेअर्स या कंपनीने हिऱ्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून किंमत अफाट ठेवली आहे.
https://www.gemsociety.org/article/are-diamonds-really-rare/
हिऱ्याबद्दल हिरे अत्यंत दुर्मिळ आहेत अत्यंत महाग आणि कालातीत(FOR EVER) आहेत असे चित्र निर्माण केले गेलेले आहे
परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे जिज्ञासूंनी खालील दुवा उघडून पहावा.
https://www.forbes.com/sites/trevornace/2018/05/30/de-beers-gives-in-and...
https://www.gemsociety.org/article/are-diamonds-really-rare/

अशा अनेक कंपन्या अफाट नफा कमावतात परंतु या कंपन्यांची उत्पादने विकत घेतली नाही तर काही कुणाचा जीव जात नाही किंवा त्या व्यक्तीचे अपरिमित नुकसान होत नाही( उलट विकत घेतले तर जास्त नुकसान होते)

कंपन्या संशोधन करण्याचा खरंच वसूल व्हावा म्हणून त्यांना २० वर्षे साठी पेटंट दिले जाते. पण पेटंट संपल्यावर त्यात काहीतरी गडबड करून उदा. इमॅटिनीब या औषधाचे केवळ मिसायलेट हे क्षार तयार करून त्याचे दुसऱ्यांदा पेटंट घेऊन अफाट नफा चालू ठेवण्याचा( evergreening) नोव्हार्टीस कंपनीचा हा प्रयत्न हरामखोरीचा होता.

या कंपन्या सरकारांना धमकावण्याचा प्रयत्न करतात कि तुमची धोरणे अशीच राहिली तर आम्ही नवीन औषधे तुमच्या देशात आणणारच नाही.
एक तर आपले सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय त्याला बधले नाही हि एक कौतुकाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट तबहुराष्ट्रीय कंपन्यांना माहिती आहे कि एखादे औषध त्यांनी भारतीय बाजारात आणलेच नाही तरी भारतात रसायन आणि औषध उद्योग इतका प्रगत आहे कि त्या औषधाची नक्कल करून ते भारतात उत्पादन सहज चालू करू शकतील आणि निर्यातही करू शकतील. यामुळे ते असा उपाय करत नाहीत तर आपापल्या देशातील सरकारवर दबाव आणून भारताला आपला कायदा बदलण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात त्याच बरोबर भारतीय नोकरशाहीतील माणसांना लाच देऊन प्रकरण आपल्या फायद्याचे कसे होईल हे पाहत असतात.

दुर्दैवाने आजही भारतात दिली जाणारी पेटंट मध्ये ७२ % पेटंट हि जुन्याच भांड्याला नवीन कल्हई लावून बाजारात आणल्याचा प्रकार आहे.
यासाठी नागरिक आणि स्वयंसेवी संस्था याना सतत जागरूक राहणे आवश्यक आहे.
It has been seen in a recent study titled 'Pharmaceutical Patent Grants in India' that the Indian Patent Office has allowed nearly 72% for secondary patents in the pharmaceutical field which could have been checked under Section 3(d) of the Act.

https://www.mondaq.com/india/Intellectual-Property/758788/India39s-Tryst...

डॉक्टर
खूप उपयोगी माहिती देताय
डायमंड माईन मधले गुन्हे आणि महाग कार्बन फुटप्रिंट यामुळे डी बिअर्स मधल्या माजी एम्प्लॉयी ने लॅब क्रिएटेड डायमंड बनवलाय.आपल्या धाकट्या सुनबाई मेगन मर्केल याचे दागिने घालतात.सध्या बराच महाग आहे कारण याला लागणारी कृत्रिम उष्णता प्रयोगशाळेत तयार करायला प्रचंड खर्च आहे.
असाच किमतीचा फरक सॅनपोएटिन आणि रेलीपोएटिन मध्ये असल्याचं आठवतं.

मी तर म्हणतो जी महागडी औषध आहेत त्यांचा chemical formula शोधून त्याचा गृह उद्योग निर्माण करावा.
Paitant कायदा विक्री ल बंदी परवानगी देत नसेल स्वतः साठी घरी बनवायला बंदी नसणार.

मी तर म्हणतो जी महागडी औषध आहेत त्यांचा chemical formula शोधून त्याचा गृह उद्योग निर्माण करावा.
Paitant कायदा विक्री ल बंदी परवानगी देत नसेल स्वतः साठी घरी बनवायला बंदी नसणार.
>>

कैलासजीवनचा असतो तसा?

बहुसंख्य औषधांचे केमिकल फॉर्म्युला माहिती असतात. ते कसे तयार करायचे याची प्रक्रिया सुद्धा सहज मिळू शकते. पण 25 मिली ग्रॅम औषध घ्यायचे कसे? जर रक्तदाबाची गोळी तयार करताना त्यात 25 ऐवजी 50 मिग्रॅ झालं तर रुग्णाला श्वास लागायचा.
हे काही घरगुती पुरणपोळी किंवा चुलीवरच्या मटणासारखे नाही. त्यातून औषध रोजच्या रोज तयार करणार का? नाही तर ते महिना दोन महिने टिकेल असे बनवायला हवे ना?
B Pharm हा अभ्यासक्रम 4 वर्षाचा उगाच नाहीये. त्या नंतर M Pharm ani PhD (tech) असतंय. त्यानंतर पण अनेक वर्षे अभ्यास लागतो.
डॉ अंजी रेड्डी हे pharmaceutical chemistry मध्ये PhD होते आणि अनेक वर्षांची तपश्चर्या होती
येरागबाळ्याचे काम नव्हे ते

Dr. काय अप्रतिम लेख लिहिलात.
मला पण आवडला.
विशेषतः शेवटचे वरील वाक्य. औषध म्हणजे स्वयंपाक नव्हे. मी ह्या विषयावर एक लेख मला लिहू इच्छिते.
Know your drugs and know your pharmacy and pharmacist.
मला ऑनलाईन लिखाणाची सवय नाहीये मी तुम्हाला वैयक्तिक मेसेज करीन.
त्या लेख मालेत बहुतेक सर्वांच्या मनातील भ्रम निघून जातील.
मी स्वतः pharmacy मधील professor ahe.वाचकांना जर अजून जाणून घ्यायचे असेल तर Dr. मंजिरी घरत ह्यांचे लेख वाचा.
प्रॉब्लेम हा आहे की आम्ही लिहितो research paper आणि ते सामान्य जनतेला मिळत नसतात.ते आमच्याच वर्तुळात राहतात.
Thanks a lot

बरं मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करते.
मी जमेल तितके सोप्या भाषेत लिहीन पण काही इंग्रजी शब्द तसेच लिहीन ज्यांना काही पर्यायी शब्द नाहीये.
इथे चर्चा आहे ती जेनरिक ड्रग्स ची त्यामुळे त्याच्याशी सुसंगतच लिहीत आहे.
आधी औषध ज्याला आम्ही ड्रग म्हणतो ते काय हे पाहू.
ड्रग, हे ड्रग and cosmetic act मध्ये दिले आहे त्यानुसार २ basic गोष्टी आहेत.
१ जे परिणाम करते म्हणजे active pharmaceutical ingredients. (API)
जसे की paracetamol, ibuprofen salbutamol.
२ जे ह्या ला dosage form बनवण्या साठी वापरतात. म्हणजे excipients
Excipients म्हणजे की जसे syrup साठी साखर, पाणी, रंग, चव, आणि त्यात टाकले जाणारे stabilizer preservatives
औषधे निरनिराळ्या प्रकारची असतात, गोळ्या, syrup, injectables, capsules.
ह्या शिवाय अजूनही आधुनिक प्रकार आहेत.
हा सगळ्याच विषयाचा आवाका इतका आहे की ते सगळेच मी लगेच सांगू शकत नाही. आणि रोज नवीन नवीन शोध लागतात आणि नवीन तंत्रज्ञान येते.
ही औषधे शोधणे, बनवणे, स्टोअर करणे, घाऊक व किरकोळ विक्री ह्यासाठी निरनिराळे liscence व परवानग्या लागतात आणि त्या मिळवण्यासाठी आधी त्या विषयातील सखोल शिक्षण आणि अनुभव लागतो.
औषधांचे काही अजून प्रकार. खरे डॉक्टरनी २ प्रकार आधीच सांगितले आहेत. जेनरिक आणि पेटंट. आणि त्याचे विश्लेषण पण सुरेख केलेय.
एक प्रकार जो तितकाच महत्वाचा आणि कधीच चर्चिला जात नाही तो म्हणजे ब्रँडेड.
भारतात मूळ स्पर्धा आहे ती generic आणि ब्रँडेड ची.
मुळात patented formulation khup कमी आहेत (निदान भारतात तरी). खरी किमतीची मेख आहे ती ब्रँडेड आणि generic madhye
उदाहरण घ्या. Zerodol-P हा Ipca कंपनी च registered trade mark Cha brand आहे. ह्यात आहे aceclofenac आणि paracetamol as API. हा झाला brand.
Same composition same formula generic मध्ये पण आहे त्याला कुठलाही registered name नाही.
किमतीतील फरक मात्र जाणवेल इतका आहे.
असे का...
कारण ब्रँड doc prescription मध्ये लिहितात त्याचे व्यवस्थित ब्रॅण्डिंग केले जाते. आणि हो भरपूर कट ही असतो.
Generic che तसे नाही. त्याच टॅबलेट त्याच पंच वर बनवून हि त्याची ब्रॅण्डिंग company करीत नाही आणि generic ह्या नावाने विकते. इथे केवळ नफा आणि उत्पादन खर्च असतो म्हणून generic स्वस्त मिळते.
कट मिळत नाही. MR लोकांची आणि पर्यायाने मार्केटिंग वाल्यांची नोकरी जाईल म्हणून बऱ्याच वेळा generic खराब, खोटे असला प्रचार होतो.
प्रत्यक्षात भारताची फार्मा industry ही generic manufacturing वर उभी आहे. भारत बेस्ट quality drugs बनवतो ती ही स्वस्त. इथून साऱ्या जगात ही औषधे generic म्हणूनच जातात. तिथे doc केवळ api prescription madhye लिहीतात. म्हणून ब्रँड्स आणि generic ha फरक भारतातच दिसतो.
अजून खूप खूप खूप आहे.
संगण्या सारखे मी आता इथेच थांबते.
धन्यवाद

@ रोहिणी
आपण या विषयावर विस्तृत लिहू शकाल यात शंकाच नाही परंतु हा विषय एका लेखात संपणे शक्यच नाही तेंव्हा आपण याचे काही भाग करून लेख मालिका लिहिली तर वाचकांना आपल्या शंकांचे निरसन करणे जास्त सोपे जाईल.
आपल्या लेखमालेची वाट पाहत आहोत

Pages