कानाला खडा - अंगावर येऊन धडकणारा माणूस

Submitted by Dr Raju Kasambe on 28 January, 2020 - 10:21

अंगावर येऊन धडकणारा माणूस

औरंगाबादला होतो तेव्हाची गोष्ट. १९९५-९६ साल असावे. वैद्यकीय प्रतीनिधी म्हणून नोकरी करीत होतो. सकाळचे काम आटोपून झाल्यावर वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असलेल्या गेस्ट हाऊसवर जाऊन जेवण करायचो आणि मग तेथून पायदळ माझ्या खोलीवर जायचो. सायंकाळी परत कामावर जाऊन रात्री जेवण झाले की परत पायदळ खोलीवर. असा दिनक्रम ठरलेला. रूम पार्टनरची भेट संध्याकाळीच व्हायची.

तर एके दिवशी दुपारचे जेवण आटोपून रमत गमत खोलीकडे जायला निघालो. मी रस्त्याच्या डाव्या बाजूने होतो. समोरून एक माणूस डोक्यावर बांबूची जड टोपली घेऊन झोकांड्या खात येताना दिसला. मी त्याला चुकवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याने मला धडक दिली. त्याच्या डोक्यावरची टोपली धाडकन खाली पडली आणि त्यात असलेल्या काचेच्या वस्तूंचा चुराडा झाल्याचा जोरदार आवाज झाला. मी त्याला ‘दिखता नही क्या? गलत साईडसे क्युं आया?’ असे म्हणत काढता पाय घेतला. अशा वेळेस निसटण्यातच भलाई असते.

माझ्या खोलीच्या जवळपास पोचल्यावर मला धीर आला. मागे वळून बघतो तर तो माणूस पिच्छा पुरवीत माझ्या मागे आलेला दिसला. मीही शर्टाच्या बाह्या खोचून हुज्जत घातली. तर तो म्हणाला

‘तुमने मेरा काच का सामान तोडा. कमसे कम दुकान तक चलके सेठ को बोलो तो. नही तो मै तुमको छोडुंगा नही. मर्डरीच कर डालता!’

मी पण मुजोरी करीत राहिलो आणि शेवटपर्यन्त त्याला भाव टाकला नाही. शेवटी मी भुक्कड असल्याचे अनुमान लाऊन तो निघून गेला. त्या रात्री ‘मर्डर’ होण्याच्या भीतीने मी दुसर्‍या मित्राच्या खोलीवर जाऊन झोपलो. न जानो, मर्डर करायला तो आलाच तर आयतेच हाती लागायला नको म्हणून मी ही काळजी घेतली होती.

सुदैवाने तो काही आला नसावा. लवकरच मी ही घटना विसरलो असतो. पण दहा पंधरा दिवसांनी मी असाच दुपारी जेवण करून परतत होतो. डाव्या बाजुनेच. समोरून एक माणूस डोक्यावर बांबूची जड टोपली घेऊन झोकांड्या खात येताना दिसला. मी त्याला चुकवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याने मला धडक दिली. त्याच्या डोक्यावरची टोपली धाडकन खाली पडली आणि त्यात असलेल्या काचेच्या वस्तूंचा चुराडा झाल्याचा जोरदार आवाज झाला.

सगळं कसं पुन्हा एकदा ‘रिटेक’ केल्यासारखं झालं. पण ह्यावेळेस त्याने माझी कॉलर पकडली आणि माझ्यावर ओरडला,

‘गरीब आदमिका दुकान का माल तोड दिया. अब मालिक को क्या जवाब दूंगा?’

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मी पण ओरडलो

‘मादर..... तू उसी दिन का आदमी है ना? फिरसे मेरेकूच टक्कर मारा? च्यु... समझा क्या तूने मेरेकू’.

आता मात्र त्यानेही मला ओळखले.

‘अरे तू तो वोही आदमी है ना? फूटी कवडी नही दिया’.

बांबूची टोपली उचलत तो माझ्याकडे तुच्छतेने बघत बोलला

‘भाग साले!’.

हे तंतोतंत रिपीट झालेले किस्से मी माझ्या इतर वैद्यकीय प्रतीनिधी मित्रांना संगितले. तेव्हा कळले की हा माणूस अशी धडक मारल्यानंतर ती टोपली उघडून दाखवतो. (त्यात आधीच ठेवलेल्या फुटलेल्या) काचेच्या वस्तूंचे झालेले नुकसान दाखवून भरपाई मागतो. कुणी मानलेच नाही तर विनवणी करून त्याला मुस्लिम शेठ पर्यन्त नेतो. तेथे मात्र आडदांड मुस्लिम तरुणांचे टोळके त्याची

‘गरीबका नुकसान कीया साले. दिखता नही क्या? निकाल पैसे!’

म्हणून लूट करतात असे कळले. तेव्हा पासून कानाला खडा लावला. दूरवर लक्ष ठेवायचे. असे लुटेरे, हिजडे, चुकीच्या दिशेने येणार्‍या गाड्या ई. संकटे रस्त्यावर दबा धरून बसलेली असतात. ती कधीही तुमच्यावर हल्ला करू शकतात. तुम्ही ‘लेफ्ट’ साईडला असलात तरी ‘राईट’ असालच असे नसते !

डॉ. राजू कसंबे

Group content visibility: 
Use group defaults

जिथे जिथे रेल्वे स्टेशन आहेत अशा शहरात असल्या टोळ्या असतात. गुन्हेगारांना स्टेशन आयतं मिळतं हातपाय पसरायला आणि गुन्हा करून दूरची ट्रेन पकडून पसार व्हायला.
असाच काहीसा प्रकार लहान मुलाला दुचाकी पुढे पळण्यास सांगून धडकल्याचं नाटक करून पैसे उकळण्याचा.

अशी नालायक लोक आहेत.
फक्त ह्यांच्या दुप्पट आवाज चढवायचा आणि जे माहीत असतील त्या गुंडाची नाव किंवा पोलिस ची नाव वरचेवर घ्यायची.

दुनियेत पैसे मिळवण्यासाठी माणसं किती हरामखोरी करतात त्याचे अजून एक उदाहरण.

असेच एक उदाहरण- पुणे सोलापूर रस्त्यावर उरुळीच्या पुढे एक गाव होते ( नाव आठवत नाही).
तेथील लोक डांबरट होते. आपल्या कोंबड्या रस्त्यावर सोडायचे आणि कोणाच्या गाडीखाली आली कि लगेच गावकरी जमून कल्लोळ करत गरीबाच्या पोटावर पाय इ.
एकदा आमच्या मित्राचे काका (दत्ताजीराव) दत्ताजी म्हणजे ६ फूट उंच डोळ्याला गॉगल लावलेले उग्र आणि रुंद चेहऱ्याचे तेथील दौंड जवळच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते).
ते आपल्या सहाय्यकांबरोबर मोटारसायकल वर चालले असता एक कोंबडी गाडीखाली आली. लगेच सगळे गावकरी गोळा झाले.
कोंबडी रोज चार अंडी देत होती इ इ.
दत्ताजींनी लगेच कोंबडीची किंमत विचारली. माणसाने १०० रुपये सांगितले दत्ताजींनी १०० ची नोट हातावर टिकवली आणि सहाय्य्कला म्हणाले बाळ्या लाव ती कोंबडी मोटारसायकलच्या मागे.

त्या मालकाने गडबड करायला सुरुवात केली. कारण पैसे घ्यायचे आणि कोंबडी पण खायची हा बेत.

त्या वर दत्ताजींनी आवाज चढवून सांगितले कि कोंबडीची किंमत तू सांगितली ती मी दिली आता कोंबडी माझी आहे. तुम्ही गावकरी लोक चावट आहात. इथला इन्स्पेक्टर माझा धाकटा भाऊ आहे.( ते असत्य होते पण एकंदर दत्ताजींच्या अविर्भाव पाहून कोणाची हिम्मत झाली नाही)

तुम्हा सर्वाना आत मध्ये टाकून आतापर्यंत किती लोकांकडून कोंबड्यांचे पैसे काढले ते सर्व ओकायला लावीन.

यानंतर त्या गावच्या लोकांचा चावट पणा बराच कमी झाला असे ऐकले.