डीडीएलजे : भूगोलाचा अभ्यास

Submitted by आशूडी on 22 January, 2020 - 00:47

आमच्या आठवीच्या भूगोलाच्या बाईंनी आम्हाला सांगितले होते की युरोपचा भूगोल शिकायचा असेल तर आधी डीडी एल जे बघा आणि मग हे पुस्तक वाचा. बाईंचं तेव्हा लग्न व्हायचे होते त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आम्हाला वेगळीच चमक तेव्हा दिसली होती त्याला हल्लीच शब्दप्रयोग सापडलाय 'डोळ्यात बदाम टाईप्स'. तर, ते होते कुरूप वेडे सारखे सर्व पुस्तकात एकच आडदांड मोठे भूगोलाचे पुस्तक कायम उपेक्षित असायचेच, त्याला या हुकुमामुळे आणखीच पुष्टी मिळाली. आम्ही आलो बघून डी डी एल जे. आणि आमची निरीक्षणे बाईंना दाखवली. त्यात आम्ही युरोपपेक्षा जास्त पंजाबची माहिती लिहील्याने बाईंच्या डोळ्यातले बदाम जाऊन तिथे पाणी आले. ते आम्हाला आनंदाश्रू वाटले. त्यांनंतर बाईंनी कुठल्याही वर्गाला असा हुकूम केल्याची वार्ता ऐकिवात नाही. आमचीच बॅच लकी म्हणून आयुष्यभर आम्ही कॉलर उडवायला मोकळे. तर ती निरीक्षणे अशी :

१. युरोप फिरायला जायचे असेल तर पासपोर्ट, व्हिसा पेक्षा महत्वाचे बावजी ची परवानगी.
2. बावजींनी परवानगी दिली की रातोरात व्हिसा वगैरे येऊन तिकिटे कन्फर्म होऊन बॅगा भरून आपण निघू शकतो.
3. बावजींनी परवानगी दिली की आपल्याला आई आणि बहीण बॅग भरताना 174 सूचना करू शकत नाहीत. बावजी एकदम पॉवरफुल असतात.
4. आपल्या इथं प्रवासात परक्या माणसाशी बोलू नये असं सगळे सांगतात पण युरोपमध्ये गेलं की चालतं. विशेषतः समवयस्क मुलांशी बोललेलं.
5. युरोपच्या ट्रेनची दारं उघडी करून कुणी पाय बाहेर सोडून बसत नाही. पण दार लावून खाली पेपर न टाकता पाय पसरून बसू शकतो पुस्तक वाचत.
6. युरोपच्या हॉटेल मध्ये जाताना आपल्याला नाच गाणे बजावणे सर्व आले तरच एन्ट्री मिळते.
7. तिथे हिंदी गाणी गायली तरी लोक टाळ्या वाजवतात आणि ठेका धरतात. संगीताला भौगोलिक सीमा नाही (भूगोलाच्या बाईंना दाखवायचे असल्याने भूगोल शब्द आला पाहिजे)
8. गोव्याच्या चर्च मध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचे ते कळत नाही पण युरोपच्या चर्च मध्ये गेल्यावर मेणबत्ती लावून प्रार्थना करायची डोळे मिटून. तिथे mseb नाही त्यामुळे मेणबत्ती उद्योगाला वाईट दिवस आले आहेत म्हणून सरकारने ही योजना राबवली आहे. तेथील महिला बचत गट मेणबत्या बनवत असावेत.
9. ट्रिपमधले फोटो घाईने न बघता कुणाशीही शेअर करू नयेत नंतर जन्माचे वांदे होतात.
10. युरोपात पण आपली गाडी चुकू शकते आणि तसे झाल्यास जवळच एखादा तबेला किंवा गोठा असतो रात्री अंग टाकायला.
11. बावजींनी परवानगी दिली म्हणून लगेच दारू प्यायची हिम्मत करू नये. दरवेळी राज मल्होत्राला हिंदुस्तानी संस्कार आठवतील असे नाही. विदेश जाकर भी अपने संस्कार भूली नहीं असं आलोकनाथने म्हटलं पाहिजे परतल्यावर.
12. पंजाबात शेतातून रेल्वे जाते.
13. पंजाबी कष्टकरी बायकांची दृष्टी इतकी शक्तिशाली आहे की धावत्या रेल्वेत आपला दूरदेशी गेलेला साजन त्या स्कॅन करून शोधू शकतात हातातले काम टाकून.
14. पंजाब अगदी सधन आणि संपन्न प्रदेश आहे. तेथील वयस्कर पुरुष लांब कुर्ता आणि सलवार घालतात आणि तरुण मुले जीन्स आणि टी शर्ट. बायका मुली झगमगीत पंजाबी ड्रेस आणि साड्या. पंजाब मुळे आपल्याकडे पंजाबी ड्रेस प्रसिद्ध झाले आहेत.
15. आधीच सधन संपन्न प्रदेश असल्याने करायला काम नाही त्यामुळे कुणीही कुठल्याही वयात कुणीही कुणावरही टप्पे टाकत बसू शकतं.
16. आधीच सधन संपन्न प्रदेश असल्याने करायला काम नाही त्यामुळे तरुणाई बिघडत चालली आहे. शिकार करणे, दारू पिणे, मुलींना छेडणे आणि मारामाऱ्या करणे यात ही मुले तरबेज आहेत. मुली मात्र अजूनही नम्र आणि आज्ञेत आहेत. स्त्री पुरुष समानता अजून इथे यायची आहे.
17.पंजाबातली घरे धाब्याची असतात. एकमेकांकडे धाब्यावरुन जाणे हा चलनवलनाचा एक नवा मार्ग त्यांनी विकसित केला आहे. त्यामुळे व्यायाम होतो, इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होते.
18. मुबलक साधन सामग्री, शुद्ध हवा, उच्च प्रतीचे अन्नधान्य यामुळे येथील आयुष्यमान वाढले आहे. घरटी एक 90+ म्हातारं माणूस बघायला मिळते. महाराष्ट्रातली अशी माणसं फार बोलत असतात म्हणून त्यांचं कुणी ऐकत नाही पण इथली म्हातारी माणसं कमी बोलतात त्यामुळे जे बोलतात ते ऐकायला सगळे जण जातात. पॉवरफुल बावजीना पण ते कंट्रोल करू शकतात.
19. पंजाबात पांढरी कबुतरे फार असतात. त्यांना दाणे टाकणे हे नित्यकर्म आहे. आपल्याकडे चिमणीला कुणी कुत्रं विचारत नाही. पंजाबात भूतदया फार सोकावलेली दिसते.
20. कुठलीही रेल्वे बावजीना बघून भीत भीत स्टेशन सोडते. त्यामुळे बावजी सोबत असतील तर आपण पळत पळत जवळचे सोडून लांबच्या दारातून पण रेल्वेत चढू शकतो. पंजाबने आपल्या देशाला असे लाखो पॉवरफुल बावजी देऊ दे हीच प्रार्थना.
जयहिंद. जय भारत. जय पंजाब. जय युरोप.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl मस्तच

मस्त.

पंजाबी कष्टकरी बायकांची दृष्टी इतकी शक्तिशाली आहे की धावत्या रेल्वेत आपला दूरदेशी गेलेला साजन त्या स्कॅन करून शोधू शकतात हातातले काम टाकून.>>> हे तर एकदम भारी.

महान !!!!!!!!!!! खरंच खूप छान लिहिलेत. पण ते सगळे सांगतात तसे डिस्क्लेमर टाका - जलपेय पिताना किंवा बाजूला कोणी बसले असताना वाचू नये.

बाय द वे.....आपली सिमरन ही ऑलरेडी युरोपातच राहत असल्याने तिला व्हिसा ची वगैरे गरज भासली नसावी!

डी डी एल जे... डोळ्यात बदाम बदाम बदाम...
शाहरूखचा उल्लेख नाही फारसा.. म्हणूनच बाईंच्या डोळ्यात पाणी पाणी पाणी ... Proud

Lol

सिमरनच्या व्हिजाचा मुद्दा करेक्टे... ती यूकेत राहत असते आणि मेनलँड युरोपात तिला भटकायला जायचं असतं.

हो बरोबर. आठवीत लक्षात आले नसणार की युकेतून युरोपला जायचं म्हणजे व्हिसा पासपोर्टची भानगड नसणार . ते सोडा, हे महत्त्वाचं की बावजी भारतीय वडील असल्याने मुलीला येडे बुद्रुकला जायचे असेल वा युरोप परवानगी घेणे आवश्यक हेच यात अधोरेखित होते.

DDLJ न पाहिलेले लोकदेखील आहेत??? काहीतरी मोठे मिस केले आहे तुम्ही... >>>> हो ना, आमच्या वेळी हे नव्हत. काय तरी बाई आजकालची नवीन पिढी.

DDLJ न पाहिलेले लोकदेखील आहेत??? काहीतरी मोठे मिस केले आहे तुम्ही...
>>>>

+७८६
मी दहावेळा वाचली ती पोस्ट पुन्हा पुन्हा माझी वाचण्यात काही चूक झाली असे समजून..... Sad

लेखातला विनोदाचा भाग सोडला ...तरी वडिलांची परवानगी आवश्यक असणे यात गैर ते काय....?
>>>>>

युकेत राहणारया सज्ञान मुलीला आजूबाजूचे जग बघायची परवानगी लागत असेल तर ही स्त्री व्यक्तीस्वातंत्र्याची गळाचेपी आहे.

याऊलट तो शाहरूखचा बाप बघा... नापास झालेल्या पोराला बोलतो जा बेटा अब मेरे हिस्से की जिंदगी जी ले..

फार ओढून ताणून लिहिलं आहे. डोळ्यांत बदाम न येता झोप आली. यावरून आठवलं, मराठा मंदिरात झोप छान यायची. गार एसी आणि बॅग्रौंडला DDLJ Wink

मी DDLJ पुर्ण पाहिलेला नाही. आणि पाहायची इच्छादेखील नाही.. त्यामुळे काही विनोद डोक्यावरुन गेलेत. Happy

17.पंजाबातली घरे धाब्याची असतात. एकमेकांकडे धाब्यावरुन जाणे हा चलनवलनाचा एक नवा मार्ग त्यांनी विकसित केला आहे. त्यामुळे व्यायाम होतो, इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होते.
18. मुबलक साधन सामग्री, शुद्ध हवा, उच्च प्रतीचे अन्नधान्य यामुळे येथील आयुष्यमान वाढले आहे. घरटी एक 90+ म्हातारं माणूस बघायला मिळते. महाराष्ट्रातली अशी माणसं फार बोलत असतात म्हणून त्यांचं कुणी ऐकत नाही पण इथली म्हातारी माणसं कमी बोलतात त्यामुळे जे बोलतात ते ऐकायला सगळे जण जातात. पॉवरफुल बावजीना पण ते कंट्रोल करू शकतात.
19. पंजाबात पांढरी कबुतरे फार असतात. त्यांना दाणे टाकणे हे नित्यकर्म आहे. आपल्याकडे चिमणीला कुणी कुत्रं विचारत नाही. पंजाबात भूतदया फार सोकावलेली दिसते.
20. कुठलीही रेल्वे बावजीना बघून भीत भीत स्टेशन सोडते. त्यामुळे बावजी सोबत असतील तर आपण पळत पळत जवळचे सोडून लांबच्या दारातून पण रेल्वेत चढू शकतो. पंजाबने आपल्या देशाला असे लाखो पॉवरफुल बावजी देऊ दे हीच प्रार्थना.
जयहिंद. जय भारत. जय पंजाब. जय युरोप.>>>>>> Rofl हाईट आहे.

युकेत राहणारया सज्ञान मुलीला आजूबाजूचे जग बघायची परवानगी लागत असेल तर ही स्त्री व्यक्तीस्वातंत्र्याची गळाचेपी आहे.

याऊलट तो शाहरूखचा बाप बघा... नापास झालेल्या पोराला बोलतो जा बेटा अब मेरे हिस्से की जिंदगी जी ले..>>> अनुच मोदन. मी अनुपम खेरचा तो डायलॉग जवळ जवळ रोजच म्हणते. ते ओ बोबी ओ लोला ओ कोकी ते नाही आले ते ? भा षा शास्त्राच्या अंगाने पण ह्या सिनेमाचा अब्यास केला पाहिजे ताई तुम्ही. तो कबुतरांना आव आव का म्हणतो खाव खाव म्हणायला हवे.

When did UK citizens need visa to visit mainland Europe?? >> Is Simran a UK citizen (and not just a resident)?

Lol हे मजेदार आहे. मात्र मोठा ग्रंथ होईल यावर. युरोपाच्या भूगोलात शिरण्याआधी पहिल्या पाच मिनीटांचा भूगोल पाहू. बावजी आपल्या घरून लंडन मधेच फिरत फिरत दुकानात कसे पोहोचतात हे पाहू व त्यावरून त्यांचे घर नक्की कोठे आहे, दुकान नक्की कोठे आहे व पुणेरी रिक्षावाल्यांना अचंब्यात टाकेल असे बावजींना फिरवून फिरवून नेणारा नकाशा कोणता त्याचा अभ्यास करावा लागेल.

तर बावजी सकाळी सकाळी कबुतरांना दाणे घालत ट्राफलगार स्क्वेअर वर उभे असतात. तेथे त्यांना ती पिवळी फुले, घर आजा परदेसी वगैरे आठवते. मग ते चालू लागतात. तेथून ते लंडन काउण्टी हॉलची बिल्डिंग (ज्यापुढे आता लंडन आय आहे) डावीकडे ठेवून समोर जातात - म्हणजे दक्षिणेकडे वेस्टमिन्स्टर पुलाकडे चालत आहेत. इथपर्यंत ठीक आहे. पण पुढच्याच सीनला बरोब्बर उलट्या दिशेने त्याच पुलावर चढतात. त्यांच्या मागे डावीकडे वेस्टमिन्स्टर ची बिल्डिंग व बिग बेन दिसते. म्हणजे इथे ते दक्षिणेकडून उत्तरेकडे चालत आले. आता ते वेस्टमिन्स्टर पुलावर बिग बेन च्या विरूद्ध दिशेला - पूर्वेला आहेत. पण पुढच्याच सेकंदाला चालत येतात ते बिग बेन कडून पुन्हा आधी जेथे होते तेथे Happy म्हणजे पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेला आले.

मग व्हाइटहॉल सारख्या वाटणार्‍या एका रस्त्यावरून ते जाता बकिंगहॅम पॅलेसला. म्हणजे पुन्हा बिग बेन ला क्रॉस करून पश्चिमेला. तेथे जाताना टेम्सनदी सुद्धा लागते परत.
पण बकिंगहॅम पॅलेस समोर दुकाने उघडण्यास बंदी असावी. त्यामुळे ते पोहोचतात ते ट्राफलगार वगैरेच्या पलीकडे थेट चांगले ३-४ किमी लांब असलेल्या टॉवर ब्रिजवर. मग एका अगम्य बागेतून अस्सल देशी वस्ती टाइप एरियात येउन दुकान उघडतात.

हे म्हणजे बालगंधर्वहून निघून मनपा इमारतीकडून नव्यापुलाकडे जाणारा माणूस मंगला टॉकीजच्या बाजूने पुलावर चढताना दिसावा, आणि पुढच्याच सीन मधे तो शनिवार वाड्याकडून पुन्हा मंगलाच्याच बाजूला येताना दिसावा. तर त्यानंतर तेथून नदीकाठाने(!) थेट मंडई आणि मग तेथून चालत पुणे विद्यापीठ आणि मग स्वारगेटजवळ कोठेतरी दुकान असा एकूण प्रवास.

बावजींना एकतर पूर्वी पुण्यात रिक्षावाल्यांनी खूप फिरवले असावे किंवा त्यांना मुंबईत डाउन-अप करायची सवय असावी.

फा Rofl - काय हा अभ्यास!!!!! बॉलिवूड ह्या विषयावर तुझी भूगोल, भाषाशास्त्र, झालंच तर इंजिनीयरिंग, आर्किटेक्चर वगैरे सर्वांगाने तयारी आहे (संदर्भः नाथा कामताची प्रेम ह्या विषयातली तयारी). Happy Happy

फारेंड.... Happy
काय मस्त अ‍ॅनालॉजी ! मी तसं इमॅजिन करुन पाहिलं!
टॉवर ब्रिज आणि पुणे युनिव्हर्सिटी...तर खूपच मस्त! Biggrin

Pages