जब I met मी :-2

Submitted by Cuty on 11 January, 2020 - 06:45

मी लहान होते तेव्हाची गोष्ट. पाचसहा वर्षांची असेन. आम्ही एका ओळखीच्या काकूकडे गेलो होतो. आई सांगत होती, "आमची दिदी किनई खूप शहाणी आहे. कुठेही गेलो तरी आईजवळ एकाच जागी गप्प मांडी घालून बसते. कसला गडबडगोंधळ नाही." मी वर पाहिले, आई माझ्याकडे एकटक पाहत होती. मी कसंनुसं हसले आणि मांडी सावरून बसले. बाहेर हाॅलमध्ये दादू काकूच्या मुलांसोबत नुसता धुडगूस घालत होता. त्यांची खेळणी कशीही फेकत होता. मी त्याला बोलणार होते नीट खेळायला, पण आई रागावली असती, म्हणून गप्प बसले. आई हसत म्हणाली, "फारच द्वाड झालाय! मला तर बाई आवरतच नाही." आता काकू कसंनुसं हसल्या. जाताना काकूंनी मला चाॅकलेट दिलं, ते दादूनं लगेच हिसकावून घेतलं. "हे बघा असं आहे! पण दिदीला ना चाॅकलेट आवडतच नाही." आई पुन्हा माझ्याकडे मघासारखीच पाहत होती. मी समजल्यासारखी हसले अन गप्प बसले. कारण मला माहित होते, दादू छोटा आहे त्यामुळे त्याला अजून कळत नाही. मी दादूची मोठी बहिण आहे आणि खूप शहाणी आहे असे आईबाबा नेहमी म्हणत.
मग नेहमीच असे व्हायला लागले. माझ्या सर्व वस्तू, खेळणी, खाऊ तोच घेई. पण मी काही बोलत नसे. कारण दादू लहान होता. मलाही खूप आवडायचा. आईबाबाही म्हणत, " दिदीचा भारीच जीव आहे हं दादूवर!"
काही दिवसांनी दादूही शाळेत जाऊ लागला. मग काय ! माझी पुस्तके सोडली तर इतर सर्व साहित्य , कंपासपेटी,पट्टी, पेन, रंगीत खडू, रबर, सॅक इ. हे त्याचेच असे. आणि त्याचे जुने मला मिळे. मी कधी काही बोलले तर बाबा मलाच रागावत, "वेड्यासारखे करू नको. त्याने नविन घेतले म्हणून तुला दुसरे आणायचे.मग जुने काय फेकून द्यायचे? " पण माझी नविन वस्तू मला परत कधीच मिळत नसे. खरेतर बाबा नेहमीच सर्व वस्तूंचा एकच नविन सेट आणत जो दादू घेई . पण मी गप्प बसत असे.
आता मी आठवीत होते. मला पहिल्या सत्रात सत्त्याऐंशी टक्के गुण मिळून वर्गात पहिला नंबर आला होता. दादूचे मात्र अभ्यासात लक्ष नव्हते. त्याला पंचावन्न टक्के मिळून इंग्रजीत तो काठावर पास झाला होता. आईबाबा त्याला शिकवणी लावणार होते. एक दिवस बाबांचे मित्र घरी आले होते. त्यांनी मला बोलविले, "काय बाळ ! कसा चाललाय अभ्यास?" मी खूश होऊन त्याना मार्क्स सांगणार इतक्यात, बाबा झटक्याने बोलले, "आधी पोहे घेऊन ये आत जाऊन लवकर!" माझा चेहरा खर्रकन उतरला. मी आत गेले, तसे बाबांचे बोलणे कानावर पडले, "दिदी होय ! ती होणार की बॅरिस्टर आता !" पाठोपाठ दोघांचे जोरजोरात हसणे. भयंकर अपमानित वाटले मला. हेच का आपले बाबा? त्यानंतर तासभर बाबा दादूचा अभ्यास,शिकवणी ,त्याने पुढे कोणता कोर्स करायचा इ. बाबत बोलत होते. पण माझे कशातच लक्ष नव्हते. दिवसभर मला काहीच सुचत नव्हते. काहीतरी चुकतेय, पण काय हे समजत नव्हते.
आता मी दहावीत होते आणि दादू आठवीत. दादूला अजूनही शिकवणी सुरू होती पण त्याची प्रगती यथातथाच होती. मला पहिल्यापासूनच कधी शिकवणी लावली नव्हती. मी कधी 'गाईड' ही वापरले नव्हते. कधीकधी अवघड प्रश्न समोर आले की मला 'अपेक्षित' किंवा' गाईड' हाताशी असेल तर बरे होईल,त्याने वेळ वाचेल, असे वाटे. पण "तुला आयत्या उत्तराची सवय होईल. त्यापेक्षा शिक्षकांना जाऊन विचार.वेळ गेला तरी चालेल." बाबा म्हणाले.
मला दहावीत अठ्ठ्याऐंशी टक्के मिळाले. निकालाच्या दिवशी शाळेत सर्व शिक्षकांनी बाबांचे अभिनंदन केले. "कन्या हुशार आहे. आता अकरावीला कोणती साईड घेणार, मॅथ्स कि बायो?" बाबा यावर स्पष्ट न बोलता, " हा:हा: बघू " किंवा " नंतर विचार करू " असे मोघम उत्तर द्यायला लागले. अन इकडे माझ्या डोक्यात लख्खकन बल्ब पेटला ! आजपर्यंत घरात कुणीही, आपण पुढे काय करायचे ,याबद्दल बोललेच नाही ! आजही मी गप्प बसले.
अॅडमिशनचा दिवस उजाडला ! मी बाबांबरोबर काॅलेजच्या ऑफिसमध्ये गेले.फाॅर्म घेताना बाबांना तिथल्या मॅडमनी विचारले, "हं कोणत्या साईडला हवय अॅडमिशन?" बाबा हसून बोलले, "आर्ट्सला ! हो ना गं दिदी ?" मी वर पाहिलं, बाबा एकटक माझ्याकडे पाहत होते. लहानपणी आई पहायची अगदी तस्सेच ! मी झटक्यात मॅडमकडे पाहत म्हणाले, "नाही मॅडम ! मला डाॅक्टर व्हायचंय. मला सायन्सलाच अॅडमिशन हवंय !" मॅडमनी एकदम चमकून माझ्याकडे पाहिलं अन गोड हसल्या. त्यांनी दिलेला फाॅर्म घेऊन मी परत बाबांकडे पाहिलं, बाबा कसंनुसं हसत होते. काहीतरी गमावल्यासारखं. अन मला आठवत होते, ते सारे क्षण जे मी आजपर्यंत माझ्या 'शहाणपणाने' गमावले होते ! आज मी माझ्या 'द्वाडपणावर' खूश होते. एका गोष्टीची जाणीव ठेऊन, ' पुढची लढाई सोपी नाही ! '
=========================================
डिस्क्लेमर :- 'जब I met मी ' लिहिताना लक्षात आले, या विषयाची व्याप्ती मोठी आहे. लोकांना परिस्थिती अनुकूल नसताना जो संघर्ष करावा लागतो, तो सर्वांना सहज कळतो. त्यामुळे कधीकधी समाजाची किंवा ईतर लोकांची मदतही मिळते. मात्र सर्व परिस्थिती अनुकूल असताना आपल्याच लोकांनी केलेले स्वार्थी कटकारस्थान किंवा डावपेच किंवा छुपा दबाव या गोष्टी सहज बाहेरील लोकांना दिसूनही येत नाहीत. मग मदत मिळणे दूरंच. अशावेळी आपणच धडाडीने यावर मात करावी लागते. अशा वेगवेगळ्या वयोगटातील, सामाजीक,आर्थिक परिस्थितीतील स्त्रिया यांच्या समस्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ही कथामालिका सुरू करीत आहे. मला जमले तर पुरूषांच्याही संघर्षकथा माझ्या आकलनशक्तीप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करेन. यापूर्वीचा भाग 'जब I met मी' या नावाने प्रकाशित केला आहे याची नोंद घ्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. स्त्री कैक पिढ्या घुसमटीचं जीवन जगली. आता ती बऱ्यापैकी स्वतंत्र झाली आहे. पण काही स्रीया स्वैराचार करताना दिसतात हे ठीक नाही.
लेख आवडला.

छान आहे..
सिक्रेट सुपर्रस्टार आठवला..
आमीरखां आणि ती गाणारी पोरगी.. त्या शेवटाला जसे वाटले तसेच ईथेही वाटले

मात्र आता काही घरात तरी परिस्थिती बदलत आहे. आमच्याकडेही अशीच ताई अन छोट्या भावाची जोडी आहे. पण चित्र उलटे आहे. मुलीचे लाड केलेस, तिला हवे ते करू दिलेस, पोराबाबत मात्र तसे करत नाहीस म्हणून् फुकट ओरडा पडतो.

खूप ह्रदयस्पर्शी.... लहानपणापासून समजूतदारपणा मनावर बिंबवलेल्या मुलांना खूप तडजोड करावी लागते मनाविरुद्ध.

@ऋन्मेष, धन्यवाद. चपखल उदा. दिलेत. कथेतील मुलगी आणि सिक्रेट सुपरस्टार मधील मुलगी दोघी एकाच वयाच्या आहेत. पंधरासोळा वर्षाच्या वयात भावनांचे चढउतार खूप तीव्र असतात. पण मनाचा कौल मानून एका क्षणात घेतलेले हे निर्णय कधीकधी चक्क अचूक ठरतात.
@आदू,धन्यवाद. आईवडिलांचे हे 'अपराधी वाटणे' आयुष्यभर संपत नाही मुलांसाठी कितीही झिजले तरी. यासाठी मुले वाढत असताना फक्त समाधानाने पहायचे अन नवे अनुभव गाठीशी बांधत रहायचे. (काल निम्मे प्रतिसाद टायपून झाल्यावर नेटची रेंज गेली. सकाळी पाहते तो मला आलेला एक प्रतिसाद निम्मा झालेला. हसरी बाहुली)

धन्यवाद , माऊमैया ! घरातील सर्वात मोठ्या अपत्याच्या बाबतीत बहुदा असे होते. त्यातही ती मुलगी असेल तर शक्यता जास्तच वाढते.

>>>>>>>>पंधरासोळा वर्षाच्या वयात भावनांचे चढउतार खूप तीव्र असतात. >>>>> सत्य.
कथेत लिहीले आहे तसे होते.

X man धन्यवाद! या कथामालिकेतील प्रत्येक कथा वेगळी असणार आहे. डिस्क्लेमरमध्ये सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या वयोगटातील, सामाजीक,आर्थिक गटातील स्त्रीपुरूषांच्या कथा असतील. याच कथेच्या पुढील भागाबद्दल आपण उत्सुकता दाखवलीत. कथा आपल्याला आवडली याबद्दल पुन्हा आभार! मात्र कथेचे कथाबीज पाहता याच कथेवर एक कादंबरीदेखील होऊ शकेल. सध्या फक्त आटोपशीर , छोट्या कथाच लिहीत आहे.

अस खूप जणांच्या बाबतीत घडत. माझ्या लहानपणी मी आणि भाऊ आमच्या दोघांच्या बाबतीत असचं घडायचं. मी कायम माघार घेत रहायची आणि अन्याय सहन करायची.

धन्यवाद jayshreeताई. भाऊ बहिणीतला भेदभाव ही ईतकी comman गोष्ट आहे की या गोष्टी कितीही टोकाला गेल्या तरी बर्याचदा त्यात कुणाला अन्याय दिसतच नाही.

>>मी वर पाहिले, आई माझ्याकडे एकटक पाहत होती.

subtle but powerful tactic. मला लेख तर आवडला आहेच, पण आपल्याच लहान मुलीचं असं manipulation करण्याची पद्धतसुद्धा बारकाव्याने लिहिलीय ते खूप आवडलं.

ही लेखमाला पुढे वाचत रहायला नक्की आवडेल. असे आपल्याच माणसांशी करावे लागणारे छुपे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतातच. जेव्हा जवळच्या वाटणार्‍या माणसांच्या मनात आपल्याबद्दल खोलवर रुतलेली द्वेषभावना आहे हे वीज चमकावी तसं अचानक स्वच्छपणे समोर येतं तेव्हाही असाच एक संघर्ष सुरू होतो. पण ह्या सगळ्यात लेखमालेचं शीर्षक फार महत्त्वाचं आहेच, पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की अश्या (आपलं अहित चिंतणार्‍या) आपल्याच माणसांपासून चार हात लांब राहण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची तयारीसुद्धा ठेवावी.

धन्यवाद, Bagz .चांगला प्रतिसाद. आपल्याच लोकांशी संघर्ष करताना प्रसंगी निष्ठूर होण्याची तयारी असावी लागते.

लेख आवडला.
>>आपल्याच लहान मुलीचं असं manipulation करण्याची पद्धतसुद्धा बारकाव्याने लिहिलीय ते खूप आवडलं.>> +१

आवडलं लेखन
कधी कधी आपलाच विचार चुकीचा आहे असं समजून गप्प बसणारे पण बरेच जण असतात आणि नंतर त्याबद्दल बोलायला जावं तर अगं लहानपणी किती समजूतदार होतीस आता काय झालं असं म्हणून पुन्हा गप्प बसवलं जात

मुलाला मुलीपेक्षा झुकतं माप दिलेले पाहून संताप होतो. बऱ्याच वेळेस आमच्या घरी सुद्धा असे होत असे. मी किंवा माझी पत्नी कधीच नाही पण कोणी तरी नातेवाईक किंवा मित्र माझ्या मुलीला तू ताई ना? असे म्हणून माझ्या मुलाची काळजी घेण्यास सांगत.
कारण आमचा लहान मुलगा इकडे तिकडे गेला की मी (किंवा पत्नी) उठून त्याला जवळ आणत असू.

मी एक दोन नातेवाईकांना स्पष्टपणे सांगितले की धाकट्या भावाची काळजी ही तिची जबाबदारी नसून आमच्या दोघांची आहे. तेंव्हा तिला तसे सांगायची गरज नाही. यावर लोकांना फार आश्चर्य वाटत असे.

कारण 5-6 वर्षाच्या मुलीने 4 वर्षाच्या धाकट्या भावाकडे लक्ष देणे किंवा त्याची काळजी घेणे आणि आपण गप्पा मारत बसणें यात त्यांना काही वावगे वाटत नसे. यात बऱ्याच स्त्रिया सुद्धा असत.

5-6 वर्षाची मुलगी ही पण लहान बालिकाच असते हे एक तर डोक्यात नसते आणि मुलगी पेक्षा मुलगा श्रेष्ठ हे त्यांच्या डोक्यात घट्ट बसलेले असते.

बऱ्याच वेळेस दोन भावंडात लहान असेल त्याला झुकते माप दिले जाते आणि त्यातून मोठ्या भावंडाला आपल्यावर सतत अन्याय होतो ही भावना येते.
माझा मुलगा रडतो आहे म्हणून मुलीच्या हातातले खेळणे काढून मी कधीही दिले नाही. त्याला शांत करणे किंवा त्याचे लक्ष वळवणे ही माझी जबाबदारी आहे. त्याच्या मोठ्या बहिणीवर मग ती फक्त 2 वर्षांनी मोठी असेल तरी अन्याय होता काम नये हे लोकांना सांगून समजतच नाही.
धाकट्या मुलाचे खेळणे मोडले फुगा फुटला तर तो रडतो म्हणून मोठ्या मुलाला त्याचे खेळणे किंवा फुगा द्यायला सांगणे हा शद्ध निर्दयीपणा आहे.

सुबोधजी धन्यवाद. कधी कधी घरातील नातेवाईक किंवा जेष्ठ मंडळी मोठ्या भावंडावर धाकट्याची जबाबदारी फक्त यासाठी देतात की, आईवडिल घरातील इतर कामासाठी रिकामे रहावेत. अशी बरीच उदा. बघितली आहेत.