सोनं - गुंतवणूक कि व्यर्थ खर्च?

Submitted by खग्या on 25 June, 2018 - 11:08

नुकतंच माझं लग्न झालं. लग्नात आई, बाबा, सासू - सासरे, बायको सगळ्यांनी मागे लागून खूप सोनं खरेदी केली. मी विरोध करायचा प्रयत्न केला तेव्हा स्त्री वर्गाने आमची हौस आहे, हे सगळं एकदाच हो, परत परत करणार आहेस का असे घासून गुळगुळीत झालेले डायलॉग ऐकवले. आणि पुरुष वर्गाने सोन म्हणजे कशी चांगली गुंतवणूक आहे. आमच्या लग्नाच्या वेळी सोन्याचा भाव अमुक होता आणि आता इतका आहे वगैरे गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न केला. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कोणालाही देता आलं नाही. मी विचारलं, सोन्याचा भाव वाढला म्हणून तुम्ही सोन विकलंत का? किंबहुना सोनं विकून टाकायचं हि कल्पना तरी तुम्हाला पटते का?

सोन विकत घेण्यावर माझे आक्षेप असे:

१) सोन विकत घ्यायला प्रचंड प्रमाणात पैसे लागतात, आणि मग ते सांभाळायला बँकेत लॉकर मध्ये ठेवायचं, म्हणजे आयुष्यभर लॉकर चे पैसे भरत बसावं लागतं.
२) सोन्याचे सगळे दागिने आपण बँकेतून घरी आणून वापरतो वर्षातले १५-२० दिवस आणि लग्न कार्य वगैरे धरून जास्तीत जास्त एक महिना. तेवढ्या हौसेसाठी लाखो रुपये खर्च करावा का?
३) दागिन्यांची फॅशन सतत बदलत असते. म्हणून वारंवार रोजच्या वापरासाठी बायका नवीन खोटे दागिने घेतच असतात. शिवाय वर्षाकाठी एखाद्या वेळी हा दागिना मोडून नवीन फॅशन चा दागिना करू हे असतंच.
४) अगदी भयंकर वाईट वेळ आल्याशिवाय आपण दागिने विकत नाही. आणि नोकरदार माणसांनी महिन्याकाठी ३०% बचत करण्याची शिस्त पाळली तर भयंकर वाईट वेळ येण्याची शक्यता फारच कमी उरते. ज्येष्ठांचे आजारपण, क्वचित घडणारा अपघात वगैरे साठी जीवन विमा असतोच. शिवाय mutual फंडात केलेली गुंतवणूक लवकर हाताशी येऊ शकते.

मग सोन्यात लाखो रुपये घालून सांभाळत बसण्या पेक्षा लागतील तेव्हा नवीन फॅशन चे नवीन खोटे दागिने घालून मिरवावं आणि फॅशन संपली कि ते दागिने टाकून पुन्हा नवीन खोटे दागिने नव्या फॅशन चे आणावे असं करणं जास्त संयुक्तिक नाही का?

जे पैसे सोन्यात खर्च करायचे ते योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी गुंतवावे आणि चांगला फायदा कमवावा, किंवा घर घेण्यात खर्च करावे आणि आणि दार महिन्याचा घर भाड्यावर होणारा खर्च वाचवावा अथवा बँकेला व्याज देण्यात फुकट जाणारे पैसे वाचवावे. अगदीच हौस असेल तर एखादी अंगठी किंवा छोटं मंगळसूत्र वगैरे खऱ्या सोन्यात घडवून रोज वापरावं (जो दागिना आपण रोज वापरणार नाही तो कधीही खऱ्या सोन्यात घडवू नये. )

या वर माबो करांची मते जाणून घ्यायला आवडेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक गंमत सांगतो.

१९९८-९९ ला मी पहिली मारूती डीएक्स, एसी, अन मेटॅलिक हेन्ना कलर अशी घेतली. किम्मत काहीतरी २ लाख ८६ हजार वगैरे होती, (नक्की आठवत नाही. अन गणित कच्चं आहे) अन त्या मारूतीचे ५ वर्षे कर्ज (मला वाटते) १८%ने भरून, टॅक्स फिक्स धरून एकंदर सुमारे ३.६० ला पडली होती.

त्याकाळी १० ग्रॅम सोन्याचा भाव होता फक्त रुपये ४,२००रुपये. अर्थात ४२० रुपये १ ग्रॅम.
अर्थात, ३ लाख ६० हजारात, ८५७ ग्रॅम सोने मिळाले असते.

आज सोन्याचा भाव आहे, ३१,६७०, अर्थात ३,१६७ रुपये १ ग्रॅम.
अर्थात, ८५७ ग्रॅम सोन्याला २७ लाख, १४ हजार, ५७१ रुपये मिळतील.

एवढ्यात २-३ लाख घातले, तर एक ऑडी किंवा १ बीएचके फ्लॅट मुंबईच्या पेरिफेरीत मिळून जातो.

पुढे ती गाडी कर्ज फिटल्याबरोबर विकली तेव्हा सव्वा लाख मिळाले होते, ते सीड मनी म्हणून वापरले अन इंडिका घेतली होती. पुढचे कर्ज तयार.

अर्थात,

बघा बुवा. मलाही असेच वाटत असे, अन अजूनही वाटते, की जमीनीतून खणून काढलेले सोने केवळ माझे आहे असे म्हणण्यापुरते पैसे फेकून, आपण ते परत जमीनीतच (लॉकरमधे) गाडून ठेवत असतो. त्यापेक्षा मस्तपैकी गाड्या उडवाव्या अन चैन करावी..

**

दुसरा पर्स्पेक्टिव्ह.

सोने ही बायकांची हक्काची ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट अन सिक्युरिटी असते. जिवापाड जपतात. जपू देत. बरी इन्वेस्टमेंट असते. ऐन वेळी मात्र विकायला/तारण ठेवायला तयार व्हायला हव्यात. नाहीतर धंदा टाकणे, घरबांधणी इ. मोठ्या खर्चाच्या वेळीही काही बायका खर्च करायला नाही म्हणतात. ते वाईट.

@ क्रॅप्स,

बिस्किटे अन कॅडबर्‍या घ्यायचे दिवस गेले. सोने घेताना किमान वळे घडवून घ्यावे. पुढे मुलाबाळांना देताना अ‍ॅन्सेस्ट्रल गोल्ड दागिन्यांच्या स्वरूपातच द्यावे. कच्चे अनघड सोने विकणे आजकाल फारच महाग झाले आहे. शिवाय पक्की पावती नसेल, तर कॉइन्/बिस्किट्/कॅडबरी इ. घरात ठेवणेही महाग आहे. रेड झाली तर त्रास होईल.

रच्याकने, वीट सुमारे २७ पाउंड = १२.४ किलो ची असते. = त्रेचाळीस कोटी, एकोणतीस लाख, एक्याण्णव हजार, एक्काहत्तर रुपये. पैसे बावन्न फक्त.

संसारामध्ये सर्वच काही पैश्या मध्ये नाही मोजता येत .. उद्या म्हणाल बायको न केलेली बरी.. घरामध्ये आपण दिवसभर नसतो मग तुम्ही असा विचार करणार कि या पेक्ष्या हॉटेल ला जाऊन राहू फ्लॅट च्या व्याजात तर आरामात राहता येईल .. नवीन संसार आहे मस्त पैकी मजा करा आणि आयुष्याचा आनंद घ्या .....प्रत्येक खर्चाचा हिशोब नका करत बसू ... आणि नवीन संसारात तर मुळीच नको ... आणि हो तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या शूभेच्या ...

रच्याकने, वीट सुमारे २७ पाउंड = १२.४ किलो ची असते. = त्रेचाळीस कोटी, एकोणतीस लाख, एक्याण्णव हजार, एक्काहत्तर रुपये. पैसे बावन्न फक्त.
>> लेखक बोस्टन मध्ये आहेत. त्यांच्यासाठी ही रक्कम जास्त नसावी म्हणून सुचवलं होते.

संसारामध्ये सर्वच काही पैश्या मध्ये नाही मोजता येत .. उद्या म्हणाल बायको न केलेली बरी.. घरामध्ये आपण दिवसभर नसतो मग तुम्ही असा विचार करणार कि या पेक्ष्या हॉटेल ला जाऊन राहू फ्लॅट च्या व्याजात तर आरामात राहता येईल .. नवीन संसार आहे मस्त पैकी मजा करा आणि आयुष्याचा आनंद घ्या .....प्रत्येक खर्चाचा हिशोब नका करत बसू ... आणि नवीन संसारात तर मुळीच नको ... आणि हो तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या शूभेच्या ...

>>>>> हे पटले.

लग्न नवीन आहे तसंच गुंतवणूक सुद्धा नवीन आहे आणि सगळे मोठे लोकं असंच सांगत होते कि सोन्यात पैसे घातले म्हणजे गुंतवणूक होते म्हणून शंका निर्माण झाली. आणि समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून इथे विचारली.

अहो, लग्न समारंभात सोनं खरेदि करण्याचा मूळ उद्देश हौस हा असतो; गुंतवणुक हा त्याचा बायप्रॉडक्ट. सोनं हे गुंतवणुकिच्या दृष्टिकोनातुन बघायचं झालं तर एक वेहिकल आहे, पण ते मोठ्ठ्या डायवर्सीफाय्ड गुंतवणुकदारांकरता, आपल्यासारख्या सामान्य माणसांकरता नाहि...

तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा!

धागाकर्ते, तुमचे मूळ मत बरोबर आहे. ते इथल्य चर्चा वाचून बदलू नका.

सोन्यात गुंतवणूक जराशी धोकादायक आहे कारण आता इथून किमान पंधरा वर्षे सोन्याच्या भावात विशेष वाढ होणार नाही. जी काही अ‍ॅक्सिडेंटल वाढ होते ती अनमानधपक्याने होते. मागच्या शंभर वर्षाचा इतिहास बघा सोन्याचा भाव दोलायमान राहिला आहे. २००८ च्या सुमारास आलेल्या सबप्राइम क्रायसिसने सोन्यातली गुंतवणूक वाढवली म्हणून सोने झटकन दुपटी-तिपटीने चौपटीने वधारले पण गेल्या पाच वर्षांपासून तसे भाव स्थिर आहेत. तसाच दुसरा मेजर धक्का बसल्याशिवाय सोन्यात वाढ होणार नाही. ज्यांनी तीन चार वर्षांआधी सोने घेतले त्यांचा लॉस झालेला आहे.

हौस म्हणून सोने घेणे हा समजून उमजून केलेला मूर्खपणा आहे. सोन्याचे दागिने घेतल्याक्षणी, पेढीतून बाहेर पडल्यापडल्या वीस टक्के लॉस होतो. दहा टक्के मजुरी आणि दहा टक्के भेसळ. एकदा केलेला दागिना मोडत नाहीत किंव भर घालून नविन घेतात, डेड इन्वेस्टमेंट. गरजेच्या वेळी देण्याची इच्छा होत नाही, दिली तरी मन अडकून राहिलेले असते. ते जास्त वाईट.

भारतीयांनी सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास सोडणे म्हणजे एकप्रकारची देशभक्तीच आहे.

त्याकाळी १० ग्रॅम सोन्याचा भाव होता फक्त रुपये ४,२००रुपये. अर्थात ४२० रुपये १ ग्रॅम.
अर्थात, ३ लाख ६० हजारात, ८५७ ग्रॅम सोने मिळाले असते.

८५७ ग्रॅम नाही. ८५.७ ग्रॅम्स.

सोन्याला गुंतवणूक समजा. लक्झरी आयटम समजा. त्याप्रमाणातच त्यावर खर्च करा.

त्रिशंकू, ग्राम ४२० रुपये असेल तर ३.६० लाखात ८५७ ग्रामच येतील हो.

खग्या यांचे म्हणणे पटले !
हन्ड्रेड परसेंट!
पण हे आपल्या पारंपारीक समाजाला कधी पटेल तो खरा 'सोन्याचा' दिवस! Happy

२०११ मध्ये सोन्याचा भाव २६४०० होता
आज ४०६०० आहे.
म्हणजेच नऊ वर्षात हा फक्त दीड पट वाढला आहे.
म्हणजेच दर वर्षी हा दर ४.८ % येतो.

हे सुद्धा गेले दोन महिने इराण अमेरिका यात युद्ध भडकण्याची स्थिती असल्याने दर वाढला आहे.

अन्यथा मागच्या वर्षी पर्यंत हा दर ४.१ % इतकाच होता.

तेंव्हा आपल्या हौसेपुरते सोने घ्यावे कारण हौसेला मोल नाही

पण त्यापेक्षा अतिरिक्त पैसे गुंतवणूक आहे म्हणून सोन्यात गुंतवले हि स्वतःची फसवणूक करणे आहे.

बाकी पैसे सरळ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत टाकावे. येथे आपल्याला ८ टक्के करमुक्त व्याज मिळते. शिवाय मुदलातून करात ३० % पर्यंत वजावट मिळते.

हि भारतात सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते (सोन्यापेक्षासुद्धा जास्त सुरक्षित) आणि आपण अफरा तफर केली तरी या गुंतवणुकीला सरकार हात लावू शकत नाही

यापेक्षा ज्यांना धोका घेण्याची तयारी आहे त्यांना शेअर बाजार म्युच्युअल फंड इ अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

नसती हौस आहे, प्रचंड महागडी, फुकाची श्रीमंती दर्शवण्याची. म्हणजे अगदी तसेच दिसणारे नकली दागिनेही चालत नाहीत.

सोन्याचे सगळे दागिने आपण बँकेतून घरी आणून वापरतो वर्षातले १५-२० दिवस आणि लग्न कार्य वगैरे धरून जास्तीत जास्त एक महिना.>>>>>> अगदी अगदी!
फक्त आता लॉकरमधे असलेले सोने काढताही येत नाही.सोन्याला आपल्याकडे एक भावनात्मक मूल्य आहे हे खरे.हल्लीच मलादेखील सोने विकावे असा किडा चावतोय खरा!
काहीवेळा अशा येतात की सोने विकून पैसे उभे केले जाऊ शकतात.माझ्या कलीगच्या सासर्‍यांच्या अर्जंट ऑपरेशनच्यावेळी तिने आपले,सासूचे दगिने विकले होते. ३ दिवस बँक्स बंद होत्या.त्यामुळे एफ.डी असून फायदा नव्हता. अशी काहीच उदाहरणे आहेत्,बाकी लॉकरची धन आहे.

माझ्या कलीगच्या सासर्‍यांच्या अर्जंट ऑपरेशनच्यावेळी तिने आपले,सासूचे दगिने विकले होते. ३ दिवस बँक्स बंद होत्या.

अशा यावेळेस क्रेडिट कार्ड कामास येतात.

आमच्या आईच्या कर्करोगाच्या शल्यक्रियेच्या वेळेस आम्ही बरेच पैसे क्रेडिट कार्डवर भरले होते.

नसती हौस आहे, प्रचंड महागडी, फुकाची श्रीमंती दर्शवण्याची.

अंगावर असलेले सोने हे स्त्रीला एक मानसिक आधार देत असतात विशेषतः कनिष्ठ वर्गात कारण नडीअडचणीला त्यांना कोणीही पैसे उधार देत नाही.

किती मध्यमवर्गीय माणसे वर्षानुवर्षे घरात काम करत असलेल्या आपल्या मोलकरणीला पाच आकड्यात (१००००) पैसे उधार देतात?

अशा वेळेस २४ ते ३६ % व्याजाने का होईना मारवाडी सोने तारण ठेवून त्यांना कर्ज देतात.

अशीच स्थिती कनिष्ठ मध्यम वर्गाची असते ज्यांना काही वेळेस दागिने गहाण ठेवून पटकन पैसे उभे करता येतात.

बाकी उच्च मध्यम वर्गाकडे बायकोची "हौस करण्यासाठी" अतिरिक्त पैसा असतो.

तेंव्हा थोडे फार सोने बायकोच्या हौसेसाठी घ्या.

पाच वर्षांनी मोटार बदलण्यापेक्षा सोने घ्या.

मोटारीची किंमत कधीहि वाढणार नाही आणि सोन्याची किंमत ( बहुतांशी) कधीही कमी होणार नाही.

सोने खरेदि करणारांचे दोन प्रकार असु शकतात. एक सामान्य माणुस अाणि दुसरा उद्दोगधंदा करणारा. सामान्य माणसानि अापले सर्व खर्च भागवुन सोन्यामध्ये गुंतवणुक करणे सुरक्षित वाट ते, नाहितर अाज अापण पहातो की कुठेहि
गुंतवणुक सुरक्षित राहिलि नाहि. दुसर्‍य प्रकारांमध्ये सोन्याचि गुंतवणुक त्यांच्यासाठि नेहमि चांगलि राहु शकते. धंद्दासाठी भांडवल अाणि सामाजिक प्रतिष्टंा.