निसणीची वाट आणि भैरीचा घाट

Submitted by योगेश आहिरराव on 13 January, 2020 - 01:29

निसणीची वाट आणि भैरीचा घाट

निघायला झालेला उशीर, वाटेत पूर्ण सोबत करणारा धो धो पाऊस, त्यामुळे झालेली रस्त्याची अवस्था या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम वासुंडे गाठायला रात्रीचे दीड वाजले. पाऊस जोरदार असल्याने गावातले लाईट गेलेले, त्या अंधारात राजू दादांचे घर काही माझ्या लक्षात येईना. अनिरुद्ध, अदिती यांना गाडीतच बसवून, छत्री व बॅटरी घेउन मी आणि अजयराव कुणी जागं आहे का ते पाहायला निघालो. चार पाच घर सोडल्यावर एका मोठ्या घरातून आठ दहा माणसांचा ग्रुप बाहेर पडला. भर पावसात रात्रीचं कुठे ? जवळ जाताच काय ते समजून गेलो. सारी मंडळी कार्यक्रम करून रात्री पावसात खेकडे पकडायला रानात निघालेली. त्या पैकी एकाला राजू दादांचे घर विचारलं तर अगदी घरापर्यंत सोबत आला. दार उघडल्यावर राजू दादा म्हणाले, वाट पाहून आत्ताच डोळा लागला तुम्ही आधी नेटवर्क मध्ये असताना फोन केला असता तर खाली चौकात येऊन थांबलो असतो. असो.. पुन्हा गाडीजवळ येत समान घेऊन आल्यावर स्थिरस्थावर होत झोपायला दोन वाजून गेले. सकाळी सहाच्या आधी जाग आली खरी पण कुणाचीच उठायची इच्छा होत नव्हती. रात्रभर पाऊस त्यात सकाळचा गारठा यामुळे तर अंथरुणात पडून रहावेसे वाटत होते. चहा घेऊन साडेसात वाजेच्या सुमारास बाहेर पडलो. रात्रभर चालू असलेली पावसाची रिपरिप थांबलेली. आजचे नियोजन होते, आषाढ सरी अनुभवत निसणीची वाट आणि भैरीचा घाट उर्फ घोडेजीन या दोन वाटांची सफर. अंबा नदीच्या माणगाव खोऱ्यातील कोकणातील भेलीव वासुंडे या भागातून कोर बारसे मावळात पेठ शहापूर आंबवणे या भागात जाण्यासाठी पूर्वापार वापरात असलेल्या या वाटा. दोन्ही वाटांसाठी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला वडाचा माळ हा धनगर पाडा सोयीचा. तिथे गेल्यावर पहिलं ओरिजनल तुकारामाचे घर गाठले. ओरिजनल तुकाराम म्हणजे काय ? ही एक वेगळीच कथा आहे.
'कथा तुकारामाची' https://ahireyogesh.blogspot.com/2018/09/tukaram.html असो..
तुकाराम आणि त्याचा चुलत भाऊ लक्ष्मण दोघेही सोबत यायला तयार झाले. फक्कड चहा घेऊन तुकारामाचे घर सोडले. वडाच्या माळ नंतर समोर हाकेच्या अंतरावर आदिवासी पाडा. आम्ही निसणीच्या वाटेनं चढाई ठरवली असल्याने, तिथे न जाता डावीकडे वळलो. वाटेतला लहानसा ओढा पार करून शेताच्या बांधावरून वाट पुढे सरकू लागली.

बळीराजाची तयारी एकदम जोरात, इथल्याच एका शेतात या भागाचे दोन जुने जाणते दिग्गज "पांडुरंग झोरे" आणि "दत्तू वाघमारे" भेटले. मागच्या वेळेची ओळख होतीच. राम राम शाम शाम करून पुढे निघालो. निसणीची वाट ज्या डोंगर धारेवरून जाते ती दक्षिण उत्तर उतरली आहे त्यामागे सह्याद्रीची मुख्य रांग. लहानशा ओढ्याला डावीकडे ठेवत वाट हिरव्यागार रानात शिरली. पावसामुळे ओले चिंब झालेले जंगल. उन्हाळ्यातील पानगळचं आता मऊ गालीच्यात झालेलं रूपांतर त्यावरून चालताना वेगळीच मजा, त्यात पाण्यात पाय टाकला की बुटातून पच्याक पच्याक आवाज. जोडीला रेनकोट छत्री जरी असले तरी सह्याद्रीतल्या पावसाच्या तडाख्यातून वाचणं शक्य नाहीच.. असा टिपिकल पावसाळी ट्रेक.
r 1.jpg
निसणीची वाट आणि उजवीकडचा घोडेजीनचा डोंगर या मध्ये दरी आहे या दोन्ही मधला मोठा ओढा पार करून निसणीच्या वाटेला लागलो. सुरुवातीची सौम्य चढाई मग वाट एका पदरासारख्या टप्प्यात आली. इथून डावीकडे आडवी जाणारी वाट भेलीवकडे जाते. आम्ही सरळ वर जाणाऱ्या वाटेला लागलो. सुरुवातीची काहीशी अस्पष्ट नंतर नागमोडी वळणं घेत तीव्र चढण. निसणीच्या धारेला लागणार्या या सुरूवातीच्या वाटेला दगडतोडीची वाट म्हणतात असं लक्ष्मण सांगत होता. अर्ध्या तासात धापा टाकत मोकळ्या सपाटीवर आलो.
r2.jpg
एकदम धुंद भन्नाट असा माहौल. खाली दरीत अडकलेले पांढरे ढग, वरून वाऱ्यासोबत येणारे काळे ढग मध्येच हजेरी लावणारी पावसाची सर. हे सारं अनुभुवत तिथेच मोठा ब्रेक घेतला. या नंतरची चढाई थेट निसणीच्या धारेवर घेऊन आली. दोन्ही बाजूला दरी असलेली दहा पंधरा मीटर रुंदीची धार. उजवीकडे भैरीचा घाट घोडेजीनचा डोंगर तर डावीकडे मुख्य रांग त्या माथ्यावरून दरीत झेपावलेले अनेक धबधबे. या भागातील हे सारे मोठ मोठे ओढे नाले पुढे अंबा नदीत भर घालतात. १९८९ साली याच अंबा नदीला आलेल्या पुरात जांभूळपाडाची पार वाताहत झाली होती. आजही आजूबाजूच्या गावातले याबद्दलच्या आठवणी सांगताना भावूक होतात.
r3.jpg
धारेवरची सौम्य चढण, जसं जसे वर जात होतो तसा बराच परिसर नजरेत आला. पावसाने उघडीप दिल्याने मागे पाहिलं तर उत्तरेला खाली मृगगड त्यामागे सह्यमाथ्यावर आय एन एस शिवाजीचा भाग, ईशान्येला लायन्स पॉईंट, पाच लिंगी, मोराडीचा सुळका त्यालगत असणारा पायमोडी घाट हे पाहून गेल्या पंधरवड्यातील करवंदी नाळ आणि पायमोडी घाटाचा ट्रेक आठवला.
https://ahireyogesh.blogspot.com/2019/06/karvandi-paaymodi.html
काही अंतर जाताच ज्यामुळे या वाटेला नाव पडले तो निसणीचा टप्पा. छोटासा रॉकपॅच पार करून निसणी समोर आलो.
r4.jpg
दहा ते पंधरा फुटाचा हा पॅच आधाराला लाकडाची मोळी अडकवून चढाई उतराई साठी सोयीचा केला आहे. खास करून पावसाळ्यात सावधानता हवी. आम्ही सुरुवात करतो तोच पाऊस पुन्हा सुरू झाला. एकेक एक करत सावकाश वर आलो. इथून पुढची चाल बरीचशी सपाट फार चढ नाहीच. डावीकडे माथ्याकडे पाहिलं तर अंदाजे शे दीडशे मीटरचा फरक असावा. पुढची वाट माथ्यालगतच्या दाट रानातून, पावसाच्या थेबांची झाडांच्या पानांवर टपटप जोडीला पक्ष्यांची किलबिल. अदितीने तर काही पक्ष्यांचे कॉल मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतले. सारं वातावरण धुंदमय. ज्या ठिकाणी निसणीची वाट आणि उजवीकडचा भैरीचा घाट असलेला घोडेजीन डोंगर वरच्या पातळीत एकमेकांना जोडतात त्या मोकळ्या मैदानात आलो. इथून पुढे एकच वाट पेठ शहापूरकडे जाते. आमच्याकडे वेळ पुरेसा होता तसेही पेठ शहापूर गेल्याशिवाय घाटवाट पूर्ण झाली नसती. अर्ध्या तासाची चाल कारवीच्या रानातून मोकळ्या पठारावर घेऊन आली. पावसाळ्यात गार वारा आणि धुकं घाटमाथा गाठल्यावर स्वागताला हजर असतात, इथं त्यांच्या जोडीला वेफर्स सिगारेटची पाकिटं आणि दारूच्या बाटल्या. याचा उलगडा पेठ शहापूर मधील बिअर शॉप पाहून झाला. तसेही लोणावळा सहारा रोडवर या दिवसात सगळीकडे हेच चित्र पाहायला मिळते.
r5.jpg
या भागात कुठल्याही टपरीवजा दुकानात जास्त पैसे देऊन हवी ती बाटली मिळते. स्थानिकांना दोष देऊन काही अर्थ नाही, मागणी तसा पुरवठा हे साधं गणित. कोरीगडसाठी येणारी मंडळी त्यांच्या गाड्यांची सशुल्क पार्किंगसाठी लागलेली स्थानिकांची चढाओढ.
पावसाने भिजून ओलेचिंब झालो होतो त्यात भलताच गार वारा सुटलेला. आता इथपर्यंत आलोच आहोत तर गरमगरम चहा घेऊ तेवढंच थोडी तरतरी, चहासाठी चक्क हॉटेल शोधून विनंती करावी लागली. एवढं करूनही एक नंबरचा टुक्कार आणि पांचट चहा घेऊन वेळ वाया गेल्याबद्दल स्वतःला शिव्या घालत माघारी फिरलो. माथ्यावरून पश्चिमेकडे सरकत अर्ध्या तासात, घोडेजीन आणि निसणीच्या वाटेच्या जंक्शनवर आलो. इथून सरळ आम्ही आलो ती निसणीची वाट तर डावीकडे आमची उतराईचा भैरीचा घाट उर्फ घोडेजीन. भैरीच्या वाटेला लागलो, पुढे काही अंतर जाताच अंतर हद्दीच्या खुणा दाखवणारे जुने मैलाचे दगड. कधी काळी खूप राबता असणाऱ्या या दोन्ही वाटा सद्या स्थितीत अगदी सोप्या मुळीच नाहीत. खालून सुरुवात केली तर माथ्यालगत गडबड होणार तर वरून पहिलं तर खाली जिथे उतरायचं आहे ते काहीही दिसत नाही. डोंगर रचना क्लिष्ट आणि भरपूर फेरा घेत जाणारी आडवाट. अर्थात सह्याद्रीत अशा अनेक वाटा आहेत त्यात या दोन्ही वाटांचा नंबर नक्कीच वरच्या स्थानात लागेल. झाडीभरली उताराची वाट वळसा घेत दरीच्या बाजूला घेऊन आली. इथेच डावीकडच्या झाडांपलीकडे कड्यात शेंदूर फासलेले वाघजाईचं ठाणं बाजूला चार पाच जुन्या पायऱ्या. याच्या उजवीकडून वरच्या बाजूला चढाई करत आंबवणेकडे जाता येते अशी माहिती तुकारामाने दिली. घड्याळात पाहिलं तर दोन वाजत आलेले, वाटेतल्या एका ओढ्याजवळ पंगत मांडली. पाऊण तासाचा ब्रेक आणि भरलेलं पोट यामुळे चालणं थोड जड वाटू लागलं. आता आम्ही होतो त्याच्या बरोब्बर समोरच्या बाजूला घोडेजीनचा डोंगर.
r6.jpg
तिथे जाई पर्यंत बराच मोठा वळसा मारावा लागणार. शॉर्टकटच्या नादात लक्ष्मण आणि तुकारामाने भलत्याच काट्याकुट्यात घुसविले. झाडी बाजूला करीत कधी कधी वाकून कधी बसून उतरत. करवंदाच्या काटेरी जाळी मुळे सॅक रेनकोट फाटणार अशी अवस्था. शेवटी पुन्हा माघारी येत मुख्य वाटेला लागलो. वाटेत काही ठिकाणी जनावरांना पायबंद घालण्यासाठी काठ्या लावल्या होत्या. एका टप्प्याची उतराई मग वळसा घेत घोडेजीनच्या डोंगरावर. घोडेजीनचा डोंगर निसणीची धार यासोबत अनेक घळी व डोंगर सोंडा सह्याद्रीच्या मुख्य धारेशी टप्या टप्प्यात जोडल्या गेल्या आहेत. आता, आम्ही ज्या ओढ्याच्या ठिकाणी जेवणाला थांबलो होतो ती जागा आमच्या समोर होती. तसेच पुढे जात एका मैदानावर आलो या ठिकाणी पावसाळी तळं बाजूलाच झुडूपाजवळ एका दगडावर चंद्र आणि सूर्य यांची प्रतिमा कोरलेली.
r7.jpg
या जागेला ‘चांदमाळ’ असे म्हणतात. इथवर या भागातील लोकांची गुर चरायला येतात. पुढे घोडेजीनच्या माथ्यावर जाणाऱ्या वाटेवर आलो भर पावसात जास्त वर न जाता काही अंतर पुढे जात दक्षिणेकडचा फेब्रुवारी महिन्यात केलेल्या काठीच्या घाटाचा ट्रेक https://ahireyogesh.blogspot.com/2019/03/kathi-gavalan.html आणि डाके धनगर पाड्याचा भाग ओळखण्याचा प्रयत्न केला, त्यात डाके धनगर पाड्यात राहणारे गोविंद आखाडे हे तर लक्ष्मणचे मामा. कधी योग जुळून आला तर इथून परस्पर त्या वाटेला जाऊन पहायचं आहे. पुन्हा खाली येत डोंगराचा कडा डावीकडे ठेवत वाटेत अनेक छोटे मोठे ओढे ओलांडत अर्ध्या तासात मोकळवनात.
पाऊस थांबला असल्याने पुन्हा एकवार मृगगड, मोराडी सुळका व उजवीकडे आम्ही चढाई केली ती निसणीची वाट तर अगदी हाकेच्या अंतरावर. याच ठिकाणी कातळात खोदलेले पाण्याचं टाकं.
r8.jpg
तुकाराम आणि अनिरुद्धने त्या वरील वेली आणि झुडप बाहेर काढली. टाक्यात साचलेला गाळ जर साफ केला गेला तर चांगले काम होइल. त्यासाठी हातभार लावायला नक्की आवडेल तुकाराम व लक्ष्मण सोबत चर्चा करत निघालो. मोकळ्या जागेतून वाट पुन्हा पदरातील रानात शिरली. टिपिकल दाट जंगल, उंच उंच रुंद मोठ्या बुंध्याची झाडं जोडीला महाकाय वेली. आता होते ते या वाटेवरची मुख्य आकर्षण असलेलं ‘गोमुख’ आणि इथल्या ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान ‘भैरी देव’. पुरातन दगडी बांधीव असे गोमुख बाजूला जनावरांना पाण्यासाठी पन्हाळ.
r9.jpg
तिथूनच दहा मिनिटांच्या अंतरावर भैरी. दगडी चौथऱ्यावर भल्या मोठ्या दगडावर कोरीव काम करून शेंदूर फासलेले. लाकडी खांब जीर्ण झालेला पत्रा अंगावर घेत कललेले. वाऱ्यामुळे पत्र्यांची तर पावसामुळे लाकडी खांब यांची अवस्था बिकट. हे सारं पाहताना तुकारामाच्या चेहऱ्यावरची घालमेल स्पष्ट जाणवली.
r10.jpg
श्रध्देचा विषय असला तरी ही मुलं या बाबतीत बरीच संवेदनशील. लवकरच एकत्र येऊन देवाचा जीर्णोद्धार ते करणार आहेत. आम्हीही देवाला नमन करून चालू पडलो. काही अंतराने वाट रानातून बाहेर येत टप्पा टप्प्याने उतरू लागली.
r11.jpg
या भागात आता तुरळक झाडी, उतारावर काही ठिकाणी वन विभागाने पाणी अडवणे जिरवणे यासाठी खोदलेले चरे तर काही ठिकाणी दगडांची रचाई. पावणे सहाच्या सुमारास वडाच्या माळावर आलो. तुकारामाच्या घरी बेश्ट चहा झाला, सोबत दिवसभरात काय काय केले त्याच्या गप्पा. निघताना पुन्हा आईचा जेवणासाठी आग्रह, त्यात पाऊस लागला तर ट्रॅफिक मग पुन्हा वेळ जाणार थांबणं परवडणारं नव्हतं. पण मांसाहारी जेवणाचा आग्रह मोडवेना, गपगुमान थोड थोड खाऊन घेतलं. पुन्हा येण्याचा वादा करून निरोप घेतला. पुढच्या अर्ध्या तासात वासुंडेत, राजू दादा बाहेर जाण्याचा तयारीत त्यांच्या घरी सुध्दा जेवणाचा आग्रह शेवटी चहा घेत सामानाची आवरा आवर करुन परतीच्या वाटेला लागलो. जांभूळपाडा परळी खालापूर पर्यंत पावसाची सोबत होतीच. मन मात्र पुन्हा पुन्हा निसणी, वाघजाई, चांदमाळ, गोमुख, भैरी देव, वडाचा माळ या ठिकाणी भिरभिरत होतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख फोटो पहातानाच, पावसातील रानाचा व मातीचा सुगंध येतो, पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो.
वर्णन मस्तच.