पुनर्जन्म

Submitted by डॉ.अमित गुंजाळ on 10 January, 2020 - 12:46

"पुनर्जन्म"
गाडी एकदम जोरात अगदी 90 -100 च्या स्पीड ने चालू असताना अचानकच एखादा भलामोठा खड्डा गाडीचालकाला रस्त्यात दिसला तर कसे होत असेल, काय काय विचार त्याच्या डोक्यात येत असतील,त्याचे तोच जाणे ,जगतो का मरतो?गाडी पलटी होते का?आदी आदी,अन त्याच वेळी त्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून कचकन ब्रेक दाबावे अन गाडी पुन्हा रुळावर म्हणजे रस्त्यावर यावी व गाडीने हळू हळू पुन्हा वेग पकडायला सुरुवात करावी.अगदी असेच काहीतरी माझ्या आयुष्यात घडले आहे, मी एक कुटुंबवत्सल साधारण मनुष्य,वय नाबाद चाळीशी कडे वाटचाल करू लागलेले, एकदम मजेत आणि आयुष्यात कशाचीही कमी नसणारा, अगदी आनंदाचा वारू जणू बेभान चौफेर उधळत होता.....पण जसे दुधात मिठाचा खडा पडावा तसे काहीतरी अनपेक्षित घडले,अगदी बरोबर दोन वर्षापूर्वी...
सुखी संसाराची स्वप्न रंगविण्यात मशगुल असलेल्या मला अचानक पायदुखीने त्रस्त केले,ही साधारण पायदुखी नव्हती,मी पार बेजार झालो होतो, व्यवस्थीपणे गोळ्या औषधी घेऊनही आवश्यक तसा फरक नव्हता,दोन तीन डॉक्टर मित्रांशी चर्चा मसलत करून औषधी घेऊनही हवे तसे बरे वाटत नव्हते,मग आवश्यक त्या तपासण्या औरंगाबादला करायचे ठरले,अगदी उच्चतंत्र व गुणवत्तेच्या तपासण्या केल्या.....जे घडायला नको होते अगदी तेच घडले,डॉक्टरनी mri केला मणक्यात गॅप पडल्याचा रिपोर्ट होता पण त्यात गुंतागुंत होती,neurofibroma सारखे ट्युमर पण होते, डॉक्टरांनी operation करण्याचे सुचविले.ते ट्युमर 5-10%कॅन्सर चेही असण्याची शक्यता डॉक्टरनी वर्तविली.आता मनातील सुखाच्या जागेत चिंतेने घर केले ..घरची मंडळी सोडून कोणालाही याची कल्पना दिली नाही,
पत्नीने उत्तम साथ दिली,आधार दिला अर्थात ती स्वतः डॉक्टर असल्याकारणाने तिला तेवढी ज्यास्तिची समज नैसर्गिक रित्या प्राप्त होतीच,त्या आठ दिवसात औरंगाबाद,नगर,पुणे येथील तीन -चार neurosurgeon अथवा spinesurgeon चे opinion घेतले,सर्वांशी चर्चेनंतर फायद्या तोट्याचा सारासार विचार ,माझे वय लक्षात घेऊन तसेच आजाराच्या गुंतागुंतेचा विचार करून दुर्बिणीतून operation न करता ओपन शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.पण हे सर्व घडत असताना नकारात्मक विचार माझ्या डोक्यात घुमायला लागले, मी वाचेल का?नंतर चालू शकेल का,काही कॉम्प्लिकेशन्स तर होणार नाहीत ना.......
मला झोप लागत नव्हती,त्रास ही वाढत चालला होता,आता तर पाय उचलनेही शक्य होत नव्हते,पत्नीशी ही बोलता येत नव्हते ती अजूनच खचली असती,मग पळकुटे पनाचा मार्ग स्वीकारला,
कोणालाच न सांगता झोपेच्या गोळ्यांची साथ घेतली एकेका दिवसात 8-9 गोळ्या खाल्या,तेवढाच आधार..... दरम्यानच्या काळात ही वार्ता जवळपासच्या लोकांपर्यंत पोहचली,काहीनी दिलासा देण्यासाठी भेटी दिल्या,एक दोन जवळचे मित्रगळ्यात पडून रडले सुध्दा ,
कसाबसा operation चा दिन उजाडला,
मोठा भाऊ व पत्नी बरोबर होतेअर्थातच, माझ्या ही मनाची थोडी तयारी झाली होती सकाळीसकाळी म्हणून थोडासा रिलॅक्स होतो, मग operation साठी मला ot मध्ये नेले व एकदाचे Operation उरकले, भुलेतून बाहेर येताना काहीकाळ एकदम ब्लॅंक झालो होतो स्मृतिभ्रंश झाल्यासारखा,पण मनाला गुंगारा देण्याची भुलीची ताकद थोड्याच वेळात संपली ,मग चिंतेचे चक्र पुन्हा सुरूच ,ot च्या बाहेर पडल्यापडल्या मी म्हटलो जागचा हलु शकणार नाही आता ,मग आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका कोण वाटणार?
वरकरणी थोडेसे विनोदी वाटणारे हे वक्तव्य खरे तर माझ्या मनाची त्यावेळेसची स्थिती व्यक्त करण्यास पुरेसे होणार नाही आणि एवढ्याश्या वाक्यात त्याची पूर्ण कल्पना तुम्हाला करवून देने शक्यच नाही,
जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे, उगाचच म्हणत नाहीत,माझे दुःख मीच जाणो........
ईश्वरकृपेने सर्व सुरळीत झाले ,उपचार करणाऱ्या डॉक्टर्सचे योग्य उपचार ,घरच्या मंडळींची ,मित्रपरिवार,इतर नातेवाईक यांची योग्य साथ याचा अचूक संगम जुळून आला अन हळूहळू मी बरा होऊ लागलो, त्रास कमी होऊ लागला,सुरुवातीला काही हालचालींची बंधने होती,झोपून राहावे लागले पाहिले तीन महिने.....
त्या तीन-चार महिन्यात बरेचसे चांगले-वाईट अनुभव येऊन गेले ,एकंदरीत भोवतालच्या परिस्थितीची छानशी टूरच केली मनाने,तालुन सुखावून गेला तो काळ मला.....याच काळाने खरे तर माझ्या लेखणीला ही बळ दिले,नकारात्मक विचार बदलून सकारात्मकते कडे वाटचाल चालू झाली.आता बरा झाल्यावर हे करायचे,ते करायचे आदी.....
"नवीन स्वप्नाना आता पुन्हा पालवी फुटू लागली ,
नव्याकोऱ्या मनात पसरू लागला आशेचा सूर्यप्रकाश ,
जणू नवीन जन्मच झाला होता,
खरच पुनर्जन्मच झाला होता माझा,
पुनर्जन्मच झाला होता माझा".

डॉ. अमित गुंजाळ, गंगापूरकर.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults