मन वढाय वढाय (भाग ३)

Submitted by nimita on 7 January, 2020 - 21:10

"मॅम, प्लीज मला फाईव्ह स्टार रेटिंग द्या हं.."एअरपोर्ट वर पोचल्यानंतर स्नेहाचं सामान तिला काढून देत तो कॅब ड्रायव्हर म्हणाला. त्याला 'थँक्स' म्हणत, मानेनीच होकार देत स्नेहा एअरपोर्ट च्या एन्ट्री गेट च्या दिशेनी निघाली. मनात एकामागून एक विचारांची, आठवणींची आवर्तनं चालू होती. नेहेमीच्या सवयीमुळे तिनी अगदी यांत्रिकपणे सगळ्या formalities पूर्ण केल्या आणि तिच्या फ्लाईटच्या डिपार्चर गेट जवळच्या एका खुर्चीवर जाऊन बसली. अजून औरंगाबादच्या तिच्या फ्लाईटला अवकाश होता.पण तिचं मन मात्र कधीच पोचलं होतं तिकडे... तिच्याही नकळत ती तिच्या भूतकाळात पोचली होती....

पण तिच्या भूतकाळाचाही अजून एक भूतकाळ होता हे अगदी मोजक्याच लोकांना माहीत होतं. आणि त्या भूतकाळाची सुरुवात झाली होती औरंगाबादच्या तिच्या कॉलेजमधे.....किती मंतरलेले होते ते दिवस ! मित्र मैत्रिणींबरोबर केलेली धमाल, मस्ती, परिक्षेच्यावेळी एकत्र बसून केलेला अभ्यास...अगदी रात्र रात्र जागून पूर्ण केलेली जर्नल्स आणि सबमिशन्स ! सगळंच कसं अगदी इंद्रधनुष्यी रंगांत न्हाऊन निघालेलं !! खूप मस्त ग्रुप होता त्यांचा.. अगदी तिच्यासारख्या अकरावी मधल्या मुलामुलींपासून ते पार शेवटच्या वर्षातल्या सिनियर्स पर्यंत आणि तेही सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् या तिन्ही शाखांमधले ... स्नेहाची आई गमतीनी त्यांच्या या ग्रुपला 'गोपाळकाला' म्हणायची.

हा असा मोठा ग्रुप तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कॉलेज मधला 'हेरिटेज क्लब'.. हा क्लब सुरू करण्यामागे मुख्य हेतू होते- औरंगाबाद आणि जवळपासच्या हेरिटेज साईट्स ना भेटी देणं, त्या जागांबद्दल सविस्तर माहिती मिळवणं आणि जिथे गरज असेल तिथे त्या जागेच्या मेंटेनन्स मधे मदत करणं .. स्नेहाला जेव्हा या ग्रुप बद्दल समजलं तेव्हा तिनी लगेच त्यात आपलं नाव नोंदवलं.खूप आवडायचं तिला ग्रुप मधल्या मित्र मैत्रिणींबरोबर अशी भटकंती करायला. अशाच एका हेरिटेज वॉक मधे तिची आणि सलीलची ओळख झाली होती. दोघांनाही आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या देशाच्या समृद्ध इतिहासाबद्दल खूप अभिमान होता. सलील पण अकरावीतच होता- पण दुसऱ्या डिव्हिजन मधे..थोड्याच दिवसांत त्या दोघांची चांगलीच मैत्री जमली. हळूहळू भेटीगाठी वाढत गेल्या; दोघांना एकमेकांचे स्वभाव,आवडीनिवडी कळायला लागल्या आणि स्नेहाच्या लक्षात आलं की त्या दोघांमधे खूप गोष्टी एकसारख्या होत्या- त्यांचे विचार, त्यांचे आदर्श, त्यांची भविष्याबद्दलची स्वप्नं, आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन.... हे आणि असंच बरंच काही !!

तिच्याही नकळत स्नेहा मनानी सलीलकडे खेचली जाऊ लागली. त्याच्या सहवासात राहणं तिला आवडायला लागलं होतं. सलीलची अवस्थाही काही वेगळी नव्हती. इतर मित्र मैत्रिणींशी तोलून मापून बोलणारा सलील - स्नेहाशी मात्र अगदी भरभरून बोलायचा. आणि स्नेहासुद्धा अगदी जीवाचे कान करून त्याचं सगळं बोलणं ऐकायची.

एकदा दोघं एकत्र अभ्यास करत असताना सलील तिला म्हणाला होता - "मला ना खूप शिकायचं आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. तुला माहितीये स्नेहा ... माझ्या बाबांची एकच इच्छा आहे; इच्छा म्हणण्यापेक्षा ते त्यांचं स्वप्नच आहे म्हण ना ....आणि ते म्हणजे - लोकांनी त्यांना 'सलीलचे बाबा' म्हणून ओळखावं." हे सांगताना त्याच्या डोळ्यांत बाबांबद्दलचं त्याचं प्रेम अगदी स्पष्ट दिसत होतं स्नेहाला! स्वतःशीच बोलत असल्यासारखा तो पुढे म्हणाला,"माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे...माझ्या बाबांचं हे स्वप्न पूर्ण करायचं! बाबा नेहेमी म्हणतात- जे काही करशील त्यात नेहेमी अग्रेसर राहायचा प्रयत्न कर .- मला इंजिनिअर व्हायचंय आणि तेही IIT मधून! त्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी मी तयार आहे." बोलता बोलता मधेच थांबून त्यानी स्नेहाकडे बघितलं ; तिचा हात हातात घेत तो म्हणाला," तुला काय वाटतं ? जमेल ना मला ?" त्याच्या हातावरची पकड घट्ट करत स्नेहा म्हणाली," नक्की जमेल ! माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आणि तुझ्या मेहनतीवर....." स्नेहाचं बोलणं ऐकून सलीलच्या चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास अजूनच वाढला. पण या एका घटनेवरून सलीलच्या आयुष्यातलं त्याच्या वडिलांचं स्थान आणि त्यांचं महत्व स्नेहाच्या लक्षात आलं होतं.

सलीलनी म्हटल्याप्रमाणे त्यानी दोन वर्षं खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला - अगदी दिवसरात्र एक केले...ज्या दिवशी त्याच्या IIT च्या रिझल्ट बद्दल कळणार होतं त्या दिवशी त्याच्याइतकंच स्नेहाला सुद्धा टेन्शन आलं होतं. मनातल्या मनात किती तरी वेळा घृष्णेश्वराला नवस बोलून झाले होते तिचे. त्या दिवशी सकाळपासून ती घरातल्या फोनच्या अवतीभवती घुटमळत होती. शेवटी एकदाचा सलीलचा फोन आला आणि तिला हवे असलेले शब्द तिच्या कानी पडले.." I got selected."

कित्ती कित्ती आनंद झाला होता स्नेहाला! सलील आता त्याच्या ध्येयाच्या अजून जवळ गेला होता... पण तिला अचानक एक गोष्ट लक्षात आली - 'आता लवकरच सलील आपल्याला सोडून लांब जाणार !!!' हळूहळू या विचारानी उचल खाल्ली आणि स्नेहाच्या मनातल्या आनंदाची जागा आता एका अजीबशा उदासीनतेनी घेतली.

पण तिला एक कळत नव्हतं ....'सलील आपल्यापासून लांब जाणार' - या नुसत्या कल्पनेनीच इतकं वाईट का वाटतंय? त्याच्या यशाच्या आनंदापेक्षा त्याच्या विरहाचं दुःख जास्त का होतंय ?' तिच्याही नकळत स्नेहा स्वतःचं भावविश्व पडताळून पहात होती... 'नक्की काय झालंय मला? या अशा मिश्र भावना का दाटल्या आहेत मनात ?असं का वाटतंय की सलील सतत जवळ असावा ? ही नुसती मैत्री नक्कीच नाहीये...त्यापेक्षाही जास्त काहीतरी आहे...पण म्हणजे नक्की काय ?... प्रेम ???? '

या नुसत्या विचारानीच स्नेहा पुरती शहारून गेली. 'हो, हे प्रेमच असेल...असेल नाही- आहेच..' स्नेहानी स्वतःच स्वतःला दुजोरा देत म्हटलं.

पण अचानक मनात एक शंका डोकावली-' सलीलला पण असंच वाटत असेल का माझ्याबद्दल ?देवा, प्लीज, त्याच्या मनात पण माझ्यासाठी हीच फीलिंग्स असू दे !' आणि पुन्हा एकदा घृष्णेश्वर नवसात अडकला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान