गोळाबेरीज

Submitted by अमृताक्षर on 30 December, 2019 - 22:42

आज वर्षातला शेवटचा दिवस..
या गोरठलेल्या थंडीत, कडक वाफाळता चहा पीत सगळ्या कडू गोड आठवणींचा पुन्हा एकदा आस्वाद घेत मी बसली होती..
या वर्षातील आठवणींनी, अनुभवांनी आणि 'आपलं माणूस' म्हणता येईल अशा जीवाभावांच्या लोकांनी भरलेली माझी समृध्द ओंजळ न्ह्याहाळत होती..
पाहता पाहता हे ही वर्ष निघून गेलं..प्रत्येकाने आज मनाच्या पटलावर आपल्या वर्षाचा हिशोब मांडलाच असेल..
कुणासाठी यश घेऊन येणार हेच वर्ष कुणाला मात्र अपयश देऊन गेलं असेल..
कुणासाठी प्रत्येक क्षण आनंदाचा तर कुणासाठी दुःख वारेमाप असेल..
कुणाला भेटला साथी आयुष्याचा तर कुणाचे आभाळ हरवले असेल..
मग मी ही आज मांडून पाहिला सरत्या वर्षाचा हिशोब..
किती 'माझं' होत हे वर्ष नक्की गवसत नव्हतच मला..दहावीच्या गणीतासारखं आयुष्याचं गणित पण कच्चच आहे म्हणाव लागेल माझं..पण मोडकितोडकी का होईना केली एकदाची सगळी गोळाबेरीज..
आपण माणसं खूप स्वार्थी असतो..गमावलं किती या पेक्षा आपल्याला मिळालं काय काय हेच अगोदर पाहतो..मग मी ही "आपल्याला मिळालं किती आणि काय?" याची आधी बेरीज करायला घेतली आणि तीनशे पासष्ट दिवसांची ही आठवणींची माळ जपता जपता, माझी सगळी ओंजळच भरून वाहू लागली..या फाटक्या ओंजळीत मी किती बर सामावून घेणार होती..? शेवटी भार वाढत वाढत गेला आणि फाटक्या ओंजळीतील मूल्यवान मोती सांभाळताना भरपूर आठवणींचे मोती आणि सोन्यासारखी आपली माणसं मागे सोडून द्यावी लागली..दुःख अपार झालं पण इलाज नव्हता..हवं ते सगळच साठवत गेलो तर ओझ होत आयुष्याचं..काही गोष्टी सोडून देण्यातच शहाणपण असत..
मग "काय गमावल वा सोडून दिलंय?" हे वजा करून ओंजळीत उरलेली बाकी पाहताना मनाच्या पाखराने भूतकाळाच्या आकाशात झेप घेतली..
आणि....
आज मागे वळून पाहताना जाणवले की आपलं अस्तित्व जपण्यासाठी आपण खरचं किती दूर एकटीनेच चालत आलोय..
स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या या प्रवासात जशी सुख पदरात पडली तशीच अनेक दुःख पण सोबतीला होतीच..कधी निस्वार्थ प्रेमाने माणसं जोडली गेली तर कधी राग अनावर झाला म्हणून तोडली गेली..कधी भरपूर आनंदाने आकाश ठेंगणे झाले तर कधी विनाकारण चिडचिड..कधी मन स्वच्छंदी पाखरू झालं तर कधी "माझ्या स्वप्नांची वाट भरकटून जाईल का?" ही भीतीसुद्धा डोकावून गेली...कधी मी कुणासाठी मधासारखी गोड तर कधी कारल्याहून ही कडू..
या लहरीपणामुळे खूप मने दुखावली गेली माझ्याकडून आणि मी ही दुखावले गेले अनेक वेळा..पण ध्येयवेडा प्रवास मात्र निरंतर चालू राहिला...आणि पुढेही राहीलच..
जशी वाटसरू म्हणून चांगली माणसं भेटली तशीच रस्ता चुकवणारी देखील अनेक भेटली...कुणी रणरणत्या उन्हात सावलीचे आभाळ झालीत आणि कुठे ठेचं लागणारा दगड सुद्धा भेटला...कधी अस व्हायचं की रस्त्यावरील चमकणाऱ्या दगडाचा मोह देखील आवरायचा नाही अन् कधी त्या शिखराला गाठण्यासाठी पायाखाली हिरे सुद्धा बिनदास्त तुडवली गेली..
कधी हसत कधी रडत इथपर्यंतचा टप्पा गाठला..अनेक चांगले क्षण आलेत आणि आयुष्य समृद्ध करून गेलेत जस की आयुष्यातील एका खास दिवशी आलेला माझा निकाल 'तो दिवस' अजूनच खास करून गेला होता किंवा आजीच्या वाढदिवसाला अचानक आदल्या दिवशी घरी जाण्याची मिळालेली संधी..
अशा या प्रवासातील अनेक गोड गुलाबी आठवणी मनाच्या कोपऱ्यात जशा मी कायमच्या जपून ठेवल्यात तशाच त्रासदायक आठवणी सुद्धा आज सांभाळून ठेवते..म्हणजेच त्या आपल्याला परत वाट चुकू देणार नाहीत..
वळणावर भेटलेला प्रत्येक आपला माणूस जसा मी आपला करत गेली तसच स्वाभिमानाला तडा देणारी माणसं आणि त्यांच्यासोबतचे त्रासदायक, दुखी क्षण सुद्धा काळजात कुठेतरी आज जपून ठेवते परत भान विसरून प्रवासाची दिशा बदलू नये याची आठवण रहावी म्हणून...
चांगल्या वाईट अनुभवांची प्रत्येकालाच गावलेली ही मूल्यवान शिदोरी येणाऱ्या वर्षी जगणं अजून सुंदर करून जाईल यात शंकाच नाही..
ज्यांच्यामुळे आयुष्याची एक नवी बाजू जगता आली त्या सगळ्या चांगल्या वाईट (माझ्यासोबत) लोकांची मी खूप आभारी आहे..असच मला "शहाणं" करण्यात तुमचा मोलाचा वाटा कायम असेल ही अपेक्षा..!
ज्यांच्या मनाचा कोपरा माझ्यामुळे दुखरा झाला त्या सगळ्या भल्या लोकांनी मोठ्या मनाने मला माफ करावे ही विनंती..!
ज्यांनी न मागता आयुष्याच्या या खडतर प्रवासात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साथ दिली, माझं प्रत्येक दुःख तीळाइतकं लहान आणि प्रत्येक आनंद हिमालयाइतका उत्तुंग केला त्यांची सोबत आयुष्याच्या शेवटापर्यंत लाभावी ही इच्छा..!
उद्या एक नवीन सोनेरी किरण एक नवी पहाट घेऊन येईल त्याचबरोबर जन्माला येतील हजारो नवीन स्वप्न आणि त्यांचा उमेदीने पाठलाग करणारे हजारो संकल्प..
आव्हाने पेलत शिखर गाठण्यासाठी सज्ज झालेल्या प्रत्येक वाटसरुला सोनपावलांनी येणाऱ्या या नव्या वर्षी स्वप्नपूर्तीचा तो आनंद नक्की गवसावा ही शुभेच्छा...!

३१ डिसेंबर २०१९

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users