कौशी . . .

Submitted by सोहनी सोहनी on 26 December, 2019 - 01:51

कौशी . . .

आभाळात सगळीकडे नुसतं सावट पसरलं होतं आणि माझ्या मनाच्या तळापर्यंत तेच सावट वावरत होतं.
एक चुकार पक्षीदेखील आभाळात भिरकत नव्हता जणू माझ्या भेदरलेल्या मनासारखं ते पक्षीदेखील थरारून घरात लपले असावेत. मी माझ्या गावच्या घरी पायऱ्यांवर बसून आभाळाकडे असहाय्यतेने पाहत होते.
असं का घडू दिलं देवा शंकरा, लहानसं पोर ते आणि इतक्या भयानक वेदना मी मनातल्या मनात आक्रंदत होते आणि अप्पा माझ्या मांडीवर डोकं ठेऊन रडत होते.

-- -- -- -- --

घराला छान असा ओटा असायलाच हवा, त्याच्या पुढे तीन ते चार छान पायऱ्या असायला हव्या त्यावर बसून मस्त आभाळात पाहता यायला हवं हा माझा दोन वर्षापासूनचा हट्ट आज तिसऱ्या वर्षी दिड महिन्यांनी माझ्या आजोबांनी पूर्ण केला होता मी हरकून ते सगळं पाहत राहिले होते. मला अजूनही आठवत आहे घरातले सगळे जण उंबरठ्या आतून माझी गम्मत पाहत बसले होते.
त्या सगळ्या ओळखीच्या चेहऱ्यातून एक अनोळखी छोटासा चेहरा हळूच माझ्या आईच्या पदरामागून डोकावला. मी आश्चर्याने त्या नव्या टवटवीत फुलासारख्या चेहर्याकडे पाहत होती.

मी आईला जोरात ओरडले, तुझ्यामागे कोण आहे ते??
माझ्या आवाजाने कदाचित बावरून ती मागे लपली. आईने तिला प्रेमाने हाताला धरून पुढे आणत ओळख करून दिली.
" कौशि " आपल्या नवीन कामवाली बाईची मुलगी.

अकरा बारा वर्षाची, लाजरी, सावल्या रंगाची, कौशी फ्रॉकच्या मागच्या नाडीचं टोक बोटांत गुंतवत बावरल्यासारखी मान वर खाली करत हसत माझ्याशी नजर मिळवण्याचा प्रयत्न करत होती.
मला तेव्हा ती हवेच्या तालावर डोलणाऱ्या एका अल्लड फुलासारखी वाटली.

मी अक्ख्या घरात एकटीच लहान, लहान तरी मी तेव्हा दहावीत होते. सगळ्यांचं अगदीच लाडकं प्रकरण म्हणजे मी. आमची पहिली कामवाली हे गाव सोडून दुसऱ्या गावी गेली म्हणून आम्हाला नवीन कायमच्या कामवालीची गरज होती.
मावशीनेचं कौशीच्या आईला आमच्याकडे पाठवलं होतं. कौशीची आई म्हणजे चिमा सगळे तिला चिमा साद घालायचे म्हणून मी पण चिमा.
तर चिमा स्वतःच्या हातून स्वतःवर दारिद्र्य ओढवून घेतलेली एक अभागी. मावशीने तिची सगळी माहिती आम्हाला आधीच सांगितली होती.
चिमा म्हणे गावात राहणाऱ्या परप्रांतीय मुलाच्या प्रेमात होती. घरी कळल्यावर तिला खूप मारलं म्हणून ती त्याच्या बरोबर पळून गेली ती पाच वर्षे कोणाला तिचं तोंडदेखील दिसलं नाही आणि आली ती दोन पोर पदरात घेऊन तेही टाहो फोडत. ज्यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं तो चिमाला टाकून कुठेतरी पळून फरार झाला होता. आली तेव्हा आई वडिलांनी दारावरदेखील उभी केली नाही .गाव वाल्यांना तिची दया येऊन तिला कामापुरती पडीक झोपडी राहायला दिली. तेव्हापासून चिमा आणि तिची दोन मुलं कौशी आणि अन्या अशी तिघे राहायची. पडतील ती कष्ट करून ती आपल्या पोरांना वाढवत होती.

मावशीची बरीच ओळख होती चिमाशी, विश्वासाची माणूस म्हणता येईल म्हणून तिच्या भल्यासाठी तिने चिमाला आमच्या घरी पाठवली होती. आमच्या घराच्या मागच्या पडवीत तिच्या राहण्याची सोय करून दिली होती. माझे अप्पा शिक्षक होते त्यामुळे कौशीला आणि अन्याला अप्पानी म्हणजे माझ्या वडिलांनी शाळेत घालून त्यांचं शिक्षण चालू केलं.

मी तेव्हा दहावीत होते, खूप म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो ना दहावीला तसाच काहीतरी अभ्यास मी रोज माझ्या आवडत्या ओट्यावर बसून निरभ्र आकाशाच्या सोबतीने करायचे. आता मला सोबत मिळाली होती एका हसऱ्या कोवळ्या फुलाची कौशीची. हे एक वेगळंच गोड आणि निरागस प्रकरण. नुसती हसतमुख असायची, चिमाच्या मागेमागे कामं करत सगळ्या घरात नाचत फिरायची.

आजोबांची बाहेर निघताना काठी आणि चष्मा शोधून देणे, पूजेच्या वेळेस आजीची चटई, पूजेची फुलं, खडी साखर जागेवर ठेवायची कामं छोटुशी चिमा हौशीने करायला लागली.
तिला कोणाला 'नाही' म्हणता येतंच नसायचं बहुतेक, स्वतःच्या हातातलं अगदी जेवण सोडून देखील ती दुसऱ्याचं काम करायची तेही हौशीने आणि मनापासून. मला तिचा हाच गुण खूप आवडायचा.

घरात माझ्या नंतर लहान बोलून कौशी आणि अन्याचं, अन्या मुलांच्यात असायचा आणि कौशी सतत माझ्या पाठी पाठी. मलाही तिची इतकी सवय लागली होती कि सगळीकडे मलाही तीच लागायची. माझी खोली आवरायला, पुस्तक सांभाळून ठेवायला, नवीन आणलेले कपडे घालून दाखवायला, कशी दिसते हे विचारायला मला कौशीच लागायची.
हल्ली हल्ली तर माझी लांब सडक केसं देखील स्वतःहून ती मस्त चंपी करून द्यायची. निरागस म्हणायची कशी " शोनी ताई कसली लांब केसं आहेत तुझी, जराशी कापून दे ना मला, मी लावीन माझ्या केसात आणि तुझ्या सारखीच लांब वेणी घालून जाईन शाळेत" मी फक्त जोरजोरात हसायचे तिच्या नेहमीच्या वाक्यावर.

आम्ही ना आमच्या शेतात मेथी, कोथिंबीर, पालक, वालाच्या चवळीच्या शेंगा, वांगी तांबाटी असं जमेल तसं लावायचो.
चिमा आणि कौशी ती सगळी भाजी गावात विकायला घेऊन जायच्या. कौशीला शेतातली बरीच कामं यायची. पाला खुडणे, गवत काढणे, तयार झालेली भाजी काढायची व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून ठेवायची, अशी कामं ती आईसोबत करायची.
विकायला नेलेली भाजीचे पैसे ठेवायला ती तिचा खासवाला स्टीलचा कडीवाला डब्बा घेऊन जायची. डब्बा भरला कि तिला कोण आनंद व्हायचा.
नाचायचं घरी यायची आणि सगळे पैसे स्वतः तोडकं मोडकं मोजून आईला द्यायची. त्यातले आई तिला प्रत्येक फेरीला पाच रुपये द्यायची. कामाचे पैसे म्हणून ती ते पैसे घ्यायची बाकी कोणाकडून ती विनाकारण फुकट काहीच घेत नसायची, मी दिलेलं खाऊ पण खूप आग्रहानेच खायची. स्वाभिमानीच होती त्याही वयात ती. असं हे अल्लड फूल माझ्या घरी माझ्यासोबत राहायचं.

मला आठवतं तिच्या वाढदिवसाला मी माझ्या साठवलेल्या पैश्यातून थोडेसे पैसे वापरून तिला एक नवीन चुडीदार ड्रेस घेऊन दिला होता. म्हणून तिने आई भाजीचे देत असलेले पैसे साठवून मला माझ्या वाढदिवसाला तीनशे सदोतीस रुपये एका पाकिटात भेट म्हणून दिले होते.
देताना मान खाली घालूनच माझ्या हातात देत म्हणाली होती " शोना ताई तू घालते तितका भारी ड्रेस नाही घेता आला म्हणून" पुढे काही बोललीच नाही.

पैसे कुठून आणले होते तर गल्ला फोडला होता आणि का तर मी तिला ड्रेस दिला होता म्हणून माझ्या वाढदिवसाला मला ड्रेस आणायला. आणायला पण गेली होती हट्टाने चिमाला घेऊन पण पैसे कमी पडले.

"काय ग इतकी मोठी झालीस तू?? मी कोण बाहेरची आहे का ?? तुझ्या मोठया बहिणीने दिलं असत तर असं परत केलं असतंस?? मी खूप ओरडले होते तिला.
मान खाली घालून उभी राहिली फक्त. आज पासून मी जे देईन ते तुझी मोठी बहीण देते असं समजून हक्काने घ्यायचं आणि हे असले वेडे चाळे पुन्हा करायचे नाहीत." म्हणून बरंच खडसावलं होतं.
आणि दुसऱ्या दिवशी तिचं मन राखण्यासाठी अप्पा मी आणि ती जाऊन माझ्यासाठी नवीन ड्रेस आणि तिला नवीन गल्ला घेऊन आलो होतो. तर हे असलं निरागस वेडं प्रकरण होतं.

एव्हाना मी बारावीला पोहोचले होते आणि कौशी आठवीला, थोडीशी अंगाने पण येत होती. जरा वाढलेलं आणि बदलणारं शरीर त्यामुळे जरा अल्लडपणा कमी केला होता. मी तिला हे असं ते तसं जमेल त्या पद्धतीने सांगायची.

आमच्या गावात देवीचा पालखी सोहळा होता. त्यात आम्ही सगळ्या मुली नववारी नेसून जायचो. ह्या वर्षी माझ्यासोबत कौशीदेखील नववारी लावून आलेली.
एवढीशी पोरगी ती नव्वारीत एवढी गोंडस आणि सुरेख दिसत होती कि माझीच नजर तिला लागेल कि काय वाटून गेलं आणि निघताना आईकडून तिची नजर काढून घेतली होती मी.
पालखी सोहळा झाल्यावर आम्ही दोघी पायरीवर बसलो होतो. मी तर खूप खुश होते पण कौशी खूप गोंधळलेली होती.
म्हणाली ताई तो शेजारचा विक्रम आज पूर्ण पालखी भर माझ्याकडे पाहत होता. शाळेतून येत जात असताना पण नुसता पाहत असतो. मला वेगळंच वाटलं त्याचं तसं पाहणं.
तिच्याकडे त्यावेळेस त्या नजरेने पाहण्यास ती काही इतकी वयात आली नव्हती, त्यामुळे मी हि गोष्ट घरात न सांगता तिला समजावलं.

"हे बघ कौशी आता तू हळू हळू मोठी होतं चाल्लीयेस, त्यामुळे असल्या मुलांकडे लक्ष द्यायचं नाही. कुणी काही बोललं तर सरळ अप्पाना नाव सांगायचं. आणि अजून लहानच आहेस तरी सांगते तुला माहीतच आहे तुझ्या आईची काय परिस्थिती झाली एका चुकीच्या निर्णयामुळे, म्हणून बाई जप स्वतःला, कमीत कमी तू तरी तुझ्या आईसारखं स्वतःच आयुष्य बिघडवू नकोस, काय कळलं ना??
आणि तो विक्रम पुन्हा तसा पाहत बसला किंवा तुला काही बोलला तर अप्पाना सांग सरळ. ते बघतील काय ते"

मी ती गोष्ट अप्पांच्या कानावर घालून ठेवली होती. कारण तो विक्रम माझ्याच वयाचा निव्वळ टवाळ आणि मोकाट मुलगा होता. बापाच्या जीवावर जगणारं प्रकरण. अप्पांनी त्याला नीट समज दिली होती त्या वेळेस.
त्यानंतर ती काही त्याच्या विषयी बोलली नाही, आणि मी बारावीच्या अभ्यासात गुंतून तिला काही विचारलं नाही.
मी बारावी पास झाले, इंजिनीरिंगला शिकू लागले. मला घरातून सकाळी सहाच्या बसला निघावं लागायचं आणि मी परत यायचे तेही संध्याकाळी सात वाजता. प्रवासातच जवळ जवळ चार साडेचार तास जायचे.
आता मला कौशीचा अभ्यास घ्यायला जमत नसायचं. ती करायची स्वतःच फक्त गणिताचा तेवढा क्लास मी घ्यायचे.
मला तिच्या सोबत पहिल्या सारखा वेळही घालवता येत नसायचा त्यात तिला नवीन मैत्रीण जमली होती. आमच्या घरापासून चार घर दूर वाण्याची मुलगी. कौशीच्या वर्गातलीचं.
आता कौशी तिच्याकडे अभ्यासाला जायची, मी विचारलं होतं चार पाच वेळा कि ती इकडे का नाही येत तर म्हणाली होती, आई वडील दुकानात असतात म्हणून घरात आम्ही दोघी अभ्यास करतो.

सगळं सुरळीत चाललं असताना अप्पांच्या कानावर आलं कि कौशी आणि त्या विक्रमचं काहीतरी चालू आहे. अप्पानी सगळ्यांच्या समोर मला तिला विचारायला सांगितलं, तर मान खाली घालून उभी राहिली होती फक्त.
चिमानि सगळ्यांदेखत तिच्या कानाखाली वाजवली. त्या दिवशी आम्ही कधीही पाहिलं नसेल असं रूप पाहिलं कौशीचं.
चिमच्या डोळ्यात डोळे घालून तिचा हात झिडकारत ती म्हणाली कि तुझ्या सारखं दरिद्री आयुष्य जगायचं नाहीये मला म्हणून असं वागले, कळलं तुला?? आणि प्रेम करतो माझ्यावर, लग्न करणार आहे माझ्यासोबत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यासारखं आयुष्यभर खंगायला सोडणार नाही मला, वचन दिलंय त्याने मला.

आई अप्पा मी आणि सगळ्यांसमोर ती कसलीच तमा न बाळगता म्हणत होती. अप्पातर पार चक्रावून गेले होते.
तिला मारण्यात झोडण्यात काही अर्थ नव्हता म्हणून स्वतः आई अप्पांनी तिची समजूत घातली पण ती काहीच बोलली नाही त्यांच्या समोर. चीमाच्या आयुष्याची कशी उधळण झाली तशी तू करू नकोस तुझ्या आयुष्याची, ऐक मोठ्यांचं, मी स्वतः तिला खूप वेळा समजावलं पण ती नुसती रडायची काही बोलत नसायची, मग प्रकरण हाताबाहेर गेलं आहे कळल्यावर अप्पांनी तिचं घरातून बाहेर जाणं बंद केलं.
चिमाला आणि सगळ्यांना ताकीत देऊन ठेवली कौशीने घराबाहेर पाऊल ठेवलं तर त्याचे परिणाम वाईट होतील. अप्पा प्रथमच इतके भडकलेले पहिले होते मी.
अप्पांची त्या विक्रमला चांगलाच दम भरला होता, त्याने गयावया करून अप्पांची माफी मागितली होती.
काही महिन्यांत सगळ्यांनी समजावून रागावून तीने त्याचा विचार सोडून द्यायचं वचन दिलं अप्पाना.

लहानच होती ती, लोकं कसे असतात काही अक्कल नव्हती. हळूहळू स्थिती सुधारते समजून आम्हीही तिला नेहमी सारखं मोकळं वागवू लागलो. तरी अप्पा बरंच लक्ष ठेवायचे तिच्यावर.

परीक्षा बुडायला नको म्हणून अप्पांची तिला पुन्हा शाळेत पाठवलं. दहावीच्या परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी कौशी विक्रम सोबत पळून गेली.
डोक्यावर हात मारायची वेळ आणून ती पळून गेली, इकडे चिमा पार वेडी झाली होती, माझीही काही वेगळी परिस्थिती नव्हती.

वाण्याच्या पोरीबरोबर चिट्टी पाठवली होती ज्यात लिहलं होतं, " मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे, मी आणि विक्रम लग्न करणार आहोत, माझा शोध घेऊ नका, असं केल्यास मी आत्महत्या करेन.
आई अप्पा शोना ताई जमल्यास मला माफ करा पण माझाही आता नाईलाज आहे"

झालं. सगळं संपलं होतं, आम्ही खूप शोधाशोध केली पण सापडले नाही ते दोघे, काही दिवसांनी अप्पांनी रागावून शोध थांबवला.
त्या दिवसांत घरात वेगळ्याच प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं. माझ्यावर पण बरीच बंधन लादली गेली. वेळेची, वागण्याची, बाहेर फिरण्याची, मित्र मैत्रिणींची.
माझी हरकत नव्हती कारण मला अप्पांचा मन माहित होतं, जे कौशी समजू शकली नव्हती.

हळूहळू सगळं प्रकरण धुळीत पडल्यासारखं मनात जुनं जुनं होतं गेलं पण कौशीची कमी सळायचीच. हल्ली तिचा विषय देखील घरात काढला कि अप्पा रागवायचे.
कारण अप्पांची तिला आणि अन्याला स्वतःच्या मुलांप्रमाणे मानलं होतं, जसं मला पाहायचे तसंच ते कौशीला पाहायचे, पण तिला ते प्रेम एकतर कळलं नाही किंवा तिला त्या मोकाट विक्रमच्या फुटकळ प्रेमापुढे अप्पांच्या प्रेमाची किंमत कळली नसेल.
ह्या प्रसंगानंतर अप्पा माझ्यासोबत थोडे कडक आणि सक्तीने वागू लागले होते.
आम्ही जे झालं ते सगळं विसरायचा प्रयत्न करत होतोच तर इतिहासाची पुनरावृत्ती झाली. जे चिमा सोबत झालं होतं तेच, कौशी परत आली होती.

कौशी पळून गेली त्याच्या चौथ्याच महिन्याला कौशी दारासमोर गलितगात्र होऊन पडली होती, मी त्या दिवशी कॉलेजला होते, आईनी सांगितलं वेदनेने अक्षरशः विव्हळत होती. पोट दाबून वेदनेने लोळत होती ओट्यावर. तिची ती परिस्थिती पाहून सगळेच हादरले होते, अनायसे अप्पादेखील घरातच होते.
तिला पाणी पाजून तातडीने दवाखान्यात हलवताना, अप्पांनी तिला उचलून घेतले असताना तिने अप्पांच्या हातात प्राण सोडले. तिच्या पिळवटलेल्या चेहऱ्याकडे पाहून, तिच्या डोळ्यांत असह्य वेदना पाहून माझे अप्पा म्हणे लहान मुलासारखे तिच्या पायांवर रडले.

दवाखान्यातून रिपोर्ट आला आणि कारण कळलं तेव्हा मी कितीतरी वेळ धक्क्यातच होते. पाच महिन्याची गर्भार होती कौशी. बाळ पाडण्यासाठी कसलंतरी औषधं घेतलं होतं तिने. वेदना असह्य होऊन तिचा मृत्यू झाला होता.
माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एवढंसं पोर ते, गर्भवती काय आणि ते बाळ पाडते काय. मला माहित नाही पण खूप भीती वाटली. तिच्या मरणाची, तिच्या वेदनांची, त्या कोवळ्या वयातल्या गर्भारपणीची कि स्वतःचं बाळ मारण्याच्या प्रयत्नांची, पण मी तीन चार दिवस पूर्णपणे धक्क्यातच होते. इतकी कि मला दोन चार वेळा दवाखान्यात दाखवलं गेलं होतं.

पोलीस केस केली, दोन महिन्यांनी विक्रम सापडला, पोलिसांनी खूप मारल्यावर त्यांनी सांगितलं कि जेव्हा पळून गेली तेव्हाच कौशी दोन महिन्यांची गर्भार होती. तिला स्वतःलाच माहित नव्हतं. पुढच्या दोन महिन्यांनी तिच्या पोटात खूप दुखत होतं म्हणून दवाखान्यात दाखवलं तेव्हा कळलं ती चार महिन्याची होती. त्याने तिला बाळ पडायला सांगितलं तिने साफ नकार दिला, वीस पंचवीस दिवस ह्यावर भांडण झाले, शेवटी तिला सोडून देईल हि भीती दाखवून तिला तयार केलं. कसलं तरी गावठी औषध तिला खायला दिलं, पण दोन दिवस तीला खूप जास्त त्रास व्हायला लागला. मेली तर उगीच डोक्याला ब्याद नको म्हणून जबरदस्तीने तिला गावच्या बसला बसवून तो फरार झाला होता"

ह्याच माझ्या आवडत्या पायरीवर अप्पा माझ्या मांडीवर डोकं ठेऊन मूक अश्रू गळत होते, त्यांच्या मनात काय होतं ते शब्दांत सांगण्याची गरज नव्हती आणि मी तिच्या सारखं वागू नये हे देखील त्यांनी शब्दांत सांगायची गरज नव्हती.

आणि मी आजदेखील ह्याच माझ्या आवडत्या ओट्यावर आभाळाकडे पाहत आमचं गणित नक्की कुठे चुकलं ह्याचं विचार करत बसते. . .

( थोडी सत्य थोडी काल्पनिक आईच्या अनुभवी आलेली एक गोष्ट )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो ना, आजकालच्या ह्या सोळा सतरा वर्ष्याच्या मुलांना प्रेम लग्न आयुष्य खूपच शुल्लक गोष्ट वाटते. करताना आणि फसवत असताना कसलाच विचार नाही करत. . .शारीरिक आकर्षणाला कितीतरी जण बळी पडतात . . .

मला वाटतं सध्याच्या काळात मुली बर्याच हुशार झाल्या आहेत. त्यांना निरोधकांबद्दल नको तितकी माहिती असते. कौशी सारखी वेळ बर्याचशा मुली येऊच देत नाहीत.

कौशी सारखी वेळ येऊ देत नाहीत ह्या साठी नको तितकी माहिती आहे ते कुठल्यातरी अँगलने बरेच आहे म्हणा . . .

सुन्न झालो क्षणभर
पण नंतर वाटते योग्यच झाले
चूक केली तर फळे भोगावी लागणारच आणि माणूस अनवधनाने चूकला तर एक्वेळ माफ़ करता येईल, पण कौशिला सर्व परिस्थिती समजावून दिलेली असताना जे तिने केले त्याला चूक नाही तर अपराध म्हणता येईल. त्याची शिक्षा ही होणारच !
१+१=२ असे सरधोपटीकरण ही झाली एक बाजू ...
पण आजच्या मूली निरोधकांच्या साहाय्याने अशी वेळ येऊ देणार नाहीत स्वतावर हे ऐकून अधिकच सुन्न वाटू लागले. जेथे एक गोष्ट मिळवताना दुसरी झाकून ठेवली जाते आणि १-१=१ असे वरकरणी भासवून जे काही गमावले त्याची वाच्यता न करता चुकीचे मार्ग अवलंबले जातायेत. व्यभिचार हां कुठल्याही एंगलने वाईटच Sad त्याचे पुष्टिकरण कुठल्याच मुद्द्याने होऊ शकत नाही. बरेच सुजाण पालक मुलगा मुलगी भेदभाव न मानता दोघांना विकासाच्या समान संधी देत असताना असे भरकटणे म्हणजे स्वताच्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे झाले.

व्यभिचार हां कुठल्याही एंगलने वाईटच>>> व्यभिचार ह्या शब्दाची व्याख्या काय नेमकी? (अजून कथा वाचली नाही, पण प्रतिसाद खटकला.)

अजिंक्यराव पाटील,
एका पुरुषाने धर्मपत्नी व्यतिरिक्त कोणा दुसऱ्या स्त्रीसोबत समागम करण्याला (आणि vice versa) धर्मशास्त्राप्रमाणे व्यभिचार म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे लग्नाआधी घडलेले संबध आणि विबासं हे दोन्ही व्यभिचार झाले जे हल्ली सर्रास घड़तात आणि कोणाला फारसे वावगेही वाटत नाही Sad अनैतिक संबधांना मान्यता देणारा कायदाच अस्तित्वात आल्यावर आता ह्यावर फार बोलण्यात काही हशील नाही
----------------
(कथेतील कौशी लग्नाआधीच प्रेग्नंट होती)

कथेत घडले ते वाईट खरे..

पण यानिमित्ताने एक गोष्ट मात्र चर्चेत यायला हवी. (ऋन्मेषना बोलवा कुणी पुढचं वाचायला)
१. आजकालच्या पिढीला, कालपरवाची पिढी जेवढी उथळ समजते, तेवढी ती आहे का?
२. एखाद्या अनोळखी स्त्रीचा सुडौल बांधा पाहून, पुरुषाच्या भावना चाळविल्या जाणे, (आणि vice versa) हा व्यभिचार ठरू शकतो का?
३. एखादी व्यक्ती पूर्णपणे ताळ्यावर असताना समाजमान्यतेचा विचार न करता अनोळखी/ ओळखीच्या व्यक्तिसोबत सुरक्षित लैंगिक संबंध ठेवू इच्छित असेल, तर तो व्यभिचार म्हणावा की व्यक्तिस्वातंत्र्य?

मुळात आपल्यावर लादल्या गेलेल्या तथाकथित उच्च भारतीय संस्कृतीने पुरुषाचा सन्मान, घराण्याची इज्जत, आईवडिलांचे संस्कार आणि इतर बऱ्याच गोष्टी स्त्रीच्या कासोट्यावर सोपवलेल्या आहेत, यात पुरुष कसाही वागला तरी हरकत नाही, मात्र स्त्रीचे शील म्हणजे काचेचे भांडे, तडा वगैरे फालतू चऱ्हाट..
पुरुषाला का शील असू नये? बदनाम व्हायचं असेल तर ते एकट्या स्रीने का व्हावं? मुलीला तोंड दाखवायला जागा नाही म्हणताना पुरुष तेवढे उजळ माथ्याने फिरू कसे शकतात?

भारतात आजही मुक्त लैंगिक वर्तन नाही. sex, condom, menstruation, sanitary napkin अश्या सोप्या शब्दांचा उच्चार देखील चहाटळ काका-काकवांनी निषिद्ध करून ठेवला आहे. कालपरवा प्राजक्ता कोळीने (mostly sane) भाडीपासोबत केलेला एक व्हिडिओ पाहिला. कंडोम घ्यायला गेलेली मुलगी बघुन एक काका आपल्या पुरोगामी मोडला जातात आणि मुलगी मग सुनावते छान.. एक वाक्य- तुमच्या पिढीने निरोध वापरला असता तर गाडीवर बसलेल्या मुलाला पार्किंगला जागा भेटली असती आणि तोच निरोध घ्यायला दुकानात आला असता!

१. आजकालच्या पिढीला, कालपरवाची पिढी जेवढी उथळ समजते, तेवढी ती आहे का?
२. एखाद्या अनोळखी स्त्रीचा सुडौल बांधा पाहून, पुरुषाच्या भावना चाळविल्या जाणे, (आणि vice versa) हा व्यभिचार ठरू शकतो का?
३. एखादी व्यक्ती पूर्णपणे ताळ्यावर असताना समाजमान्यतेचा विचार न करता अनोळखी/ ओळखीच्या व्यक्तिसोबत सुरक्षित लैंगिक संबंध ठेवू इच्छित असेल, तर तो व्यभिचार म्हणावा की व्यक्तिस्वातंत्र्य?
>>> मला तर नेहमी असे वाटते की स्त्रीनं पुरुषावर बलात्कार केल्याच्या आणि बलात्कार झालेल्या पुरुषानं आत्महत्या केल्याच्या बातम्या याव्यात. असं घडलं तरच स्त्री-पुरुष समानता आली आहे हे मी समजेन.

अरेरे Sad

> एक वाक्य- तुमच्या पिढीने निरोध वापरला असता तर गाडीवर बसलेल्या मुलाला पार्किंगला जागा भेटली असती आणि तोच निरोध घ्यायला दुकानात आला असता! > त्याकाळात बालविवाहदेखील भरपूर होत होते. त्यामुळे वयात आल्यावर समाजमान्य पद्धतीने शारीरिक गरजा भागवता येत होत्या.
आतादेखील ४७% स्त्रियांची लग्न १८ पेक्षा कमी वयातच होतात.

.

सगळ्या प्रतिक्रियांचे स्वागत.

व्याभिचार अर्थातच कुठल्याही बाजूने वाईट असतो.
निरोधांविषयी नको तितकी माहिती असणे हे चांगलं हे तिने जे केलं ते लपवण्यासाठी चांगलं आहे ह्या उद्धेशाने नव्हतं म्हणालो.
कोणाच्याही जीवन मरणा पुढे कोणतीही चुकी बाजूला ठेऊ शकतो आपण, कारण आयुष्य जास्त महत्वाचे.
असं हालहाल होऊन मारण्यापेक्षा ते बेटर असत, इतकंच. .

मुळात आता कोणाला हे नको करू ते नको करू सांगायला जाणं म्हणजे स्वतःचाच अपमान करून घेण्याची बाब झालीये. नाही ऐकत कुणी . . .

कथा लिहावीशी वाटली कारण आई हा प्रसंग सांगताना आवर्जून हेच सांगत होती कि जरी चुकी दोघांची असली तरी भोगावं मुलीलाच लागतं.
आणि कुणी कितीही काही म्हणाल किंवा आपण कितीही मॉडर्न झालो तरीही अश्या कृत्यांची झळ स्त्रीलाच सोसावी लागते.
म्हणून विचार करून वागायला हवं . माझं वैयक्तिक मत . . . .