थरारक : ५

Submitted by सोहनी सोहनी on 15 December, 2019 - 02:50

थरारक : ५

अर्थातच तिथून बाहेर पडणे सहज सोपं नव्हतं. ती मला सहजासहज इथून जाऊ देणार नव्हतीच. आणि उद्या रात्री ती माझा बळी घेणार होती. आजीने हे जेव्हा सांगितलं ना तेव्हा खळखळून रडलो होतो मी त्यांच्या कुशीत.
मरणाची कोणालाही भीती वाटतेच आणि मला जगायचं होतं, नुसतं जगायचं नव्हतं तर मधुबाईसाहेबांना वाचवायचं देखील होतं.

आसावरीला ह्या जागेत मारून जवळ जवळ चार वर्षे होणार होती. उद्याच्या मध्यरात्री ह्याच वाड्यात तिच्या स्वप्नाची, आब्रुची, आयुष्याची उधळण केली गेली होती.
एकाअर्थी तिचं वागणं देखील योग्यच होतं. अश्या नराधमांना, पुरुष म्हणवून घेणाऱ्या जनावरांना अशीच शिक्षा मिळणं योग्य होतं.
मला तिच्या विषयी सहानुभूती वाटत होती. मधू बाईसाहेब काय कि आसावरी काय. कोणासोबतही असं घडणं अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे.
नुसते धूळ खात नाही तर प्रत्येक क्षणाक्षणाला थुंकलं पाहिजे त्या लोकांच्या फोटोंवर.

असावारीने स्वतःचा बदला घेतला होता पण मधू बाईसाहेबांनी काय चूक केली होती ह्यात?? त्यांना कसली शिक्षा मिळतेय? ह्या घरात जन्मल्याची? कि सगळ्यांनी तिच्यावर खूप प्रेम केलं ह्याची? कि एक स्त्री असल्याची?
आसावरी सूडाच्या भावनेने स्वतः मधू बाईसाहेबांवर अत्याचार करत होती ते मात्र खूप चुकीचं होतं.
मी मधू बाईसाहेबांनी हे सगळं सहन करायला सोडून पळून जाणार नव्हतोच मी.

काही करून अप्पांशी संपर्क साधायला हवा होता. पण ते सहज शक्य नव्हतं.
"ती मध्यरात्री मधुचं शरीर सोडून विहिरीवर बसलेली असते. त्याच वेळेत तिला भनक लागायच्या आत तुला वाड्यातून निघून, तिच्या शक्तीच्या कक्षेतून बाहेर निघून अप्पांच्या पर्यंत पोहोचावं लागेल.
त्यांना निरोप पोहोचला कि त्यानंतर तुला इथे परतायची गरज भासणार नाही, पण तिचा सामना करू शकशील का? लहान आहेस रे तू, माझ्या नातवंडांसारखाच. आधीच नाहक तीन बळी गेलेत, तेच ओझं सहन नाही होतं त्यात तुला काही झालं तर ते ओझं कसं पेलणार आम्ही?आणि ती इतक्यात मरूही देणार नाही आम्हाला."
आजींच्या डोळ्यांतले आसवे पाहून माझं मन ढवळून गेलं, आत जीवाला पीळ बसल्यासारखं झालं.
मरण समोर होतं आणि मरण समोर असलं कि म्हणतात ना एखादा जीव अश्यक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. तसंच माझ्या विचारांतून भीती नाहीशी झाली होती, समोर दिसत होते ते फक्त अप्पा, ना त्यांना मी पाहिलं होतं ना त्यांच्या विषयी ऐकलं होतं, पण अप्पांना भेटणं हाच एकच शेवटचा मार्ग होता माझ्याकडे.
सुटकेचा माझ्या, मुक्तीचा असावारीच्या, गोदाआई आजी आणि मधू बाईसाहेबांच्या नवीन आयुष्याचा मार्ग.
कधीच न पाहिलेल्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला होता मी.

मी आजीच्याच खोलीत होतो, मध्यरात्र होण्याची वाट पाहत. माझ्या मनाचे विचार तिच्यापर्यंत पोहोचू नयेत इतकीच भीती मनात पसरली होती.

मध्यरात्र झाली तसा मी निघायला तयार होतो, आजीने निघताना निक्षून सांगितलं कि जोपर्यंत पोहोचत नाहीस थांबायचं नाहीस तू. खूप अडथळे येतील पण थांबायचं नाहीस.
ह्या वाड्यात देवाचं नाम घ्यायला मनाला बळ मिळत नाही, अशक्य आहे इथे नाम घेणं.
जसा बाहेर पडशील अखंड नाम घेत पळत राहा, मुखी नाम असताना ती तुला सहज थांबवू शकणार नाही पण जर का नाम थांबवलंस तर भयानक मृत्यू, फक्त मृत्यू मिळेल.
हि गोष्ट मात्र मी अनुभवून दुर्लक्षित केली होती, ना इथे देवपूजा व्हायची ना नामस्मरण.

मी मनाशी निर्धार केला शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं, असाही मृत्यू तसाही मृत्यू मिळणार होताच. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना मेलो तर समाधानाने मरेन आणि जर अप्पांपर्यंत पाहोचलो तर जितकं जगेन ते समाधानाने जगेन.

मी काहीही आवाज न करता बाहेर पडलो. गोदाआईच्या खोलीतून त्यांच्या हुंदक्यांचे अस्पष्ट आवाज येत होते, पण त्यांना सावरण्याची हि वेळ नव्हती. मी काहीही आवाज न करता वाड्याच्या कुंपणातून बाहेर पडलो.
सर्वत्र अंधाराचं राज्य पसरलं होतं, आभाळात आणि संपूर्ण आसमंतात, तो मिट्ट अंधार माझं मन व्यापू पाहत होतं. भीती मनावर झडप घालायला सज्ज होती पण मी सुसाट धावत सुटलो. देसकर सावकारांनी हद्द आता असावारीच्या शक्तींची हद्द झाली होती.
मला तिच पार करून दुसऱ्या गावाच्या हद्दीत असलेल्या मंदिरात पोहोचायचं होतं. तिथे अप्पा पुजारी होते, आणि मागेच असलेल्या कुटीत ते राहत होते.

मी वाट फुटेल तसा शेतातून, मातीतून त्या अंधारातून पळत होतो, सोबतीला विचित्र आवाज आणि मिट्ट अंधार घेऊन मी जिवाच्या आकांताने धावत होतो.
थोड्याच वेळाने अचानक मागून कुणीतरी उजेड घेऊन येतंय तेही धावत मला जाणवलं, मागे पाहिलं तर गोदाआई कंदील घेऊन धावत, धापा टाकत माझ्या जवळ येत होत्या.

मी काही क्षण थांबलो त्यांच्यासाठी. माझ्याजवळ पोहोचून त्यांनी धापा टाकत सांगितलं कि अप्पा घरी आलेत, आजीने मला तुला बोलवायला पाठवलं आहे, चल.
मी चक्रावून गेलो. कसं शक्य होतं ते. आजी म्हणाल्या प्रमाणे त्यांना निरोप दिल्याशिवाय ते येणार नाहीत, आणि तिच्या शक्तीच्या कक्षेत असल्यामुळे आपल्यासोबत काय होतं आहे ते त्यांना कळणं शक्य नव्हतं.
आणि शक्य होतंच तर मग आधी का नाही आले?

माझ्या मनातील विचारांचे वलय कदाचित गोदाआईंपर्यंत पोहोचले असावेत तश्या त्या जरा रागानेच मला जवळ जवळ खेचण्याचा प्रयत्न करू लागल्या.
पुन्हा किंचित गुरगुर मला जाणवली तसा मी त्यांचा जोरात हात झटकला, त्या कंदिलाच्या उजेडात गोदाआईचा तो चेहरा आणि डोळे पाहून मी विहिरीवर पाहिलेल्या मधू बाईसाहेबांना देखील घाबरलो नव्हतो इतका घाबरलो.
त्या गोदाआई नव्हत्याच. हिंस्र निव्वळ हिंस्र दिसत होत्या त्या.
माझ्यात पळायचे देखील त्राण उरले नव्हते साक्षात मृत्यू समोर होता. मृत्यूला शरण जाण्या व्यतिरिक्त मी त्या क्षणाला काही करू शकणार नव्हतो असं मला वाटलं होतं.

त्या हिंस्र हसत माझ्याकडे तुच्छतेने पाहत होत्या. मी गुढग्यांवर पडून त्यांच्या पायांवर दयेची भीक मागणार तोच मला आजीचं सांगणं आठवलं.
अखंड नामस्मरण. नाम. नवीन नवीन काकांकडे आलो असताना काकांच्या सोबत खूप वेळा शिव मंदिरात गेलो होतो, ते कधीच विसरलो असताना देखील त्या क्षणाला माझ्या तोंडून शिव नाम आलं.
मी तिच्या डोळ्यांत डोळे घालून " ओम नमः शिवाय" चा जाप चालू केला. तशी ती झटका लागल्यागत दूरवर फेकली गेली.
एका मोठया झाडाच्या बुंध्याला आपटून त्याच्यातून एक काळी सावली बाहेर पडून गोदाआईचं शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलं.
ते इतक्या जलद गतीने झालं कि काय झालं हे कळायला आणि स्वीकारायला माझं मन सक्षम नव्हतं.
गोदाआई जागीच गतप्राण झाल्या होत्या.
अचानक बाजूच्या झाडाचा करकर असा आवाज आला, तो माझ्यावर कोसळणार तोच मी शिव नाम घेत पळत सुटलो.

वादळ पेटलं होतं त्या अंधारात, आणि आसावरीदेखील.तिच्या शक्तीला आव्हान मिळालं होतं, मी नकळतपणे डिवचलं होतं तिला. आजूबाजूची झाडं वेडीवाकडी होऊन सळसळत होती. ती सावली माझ्या मागेच असावी. मधेच एखादं झाडं पडत होतं, मी फांद्यांना गुंतून पडत होतो, प्रचंड वादळ पेटलं होतं जे मला पुढे जाण्यापासून रोखत होतं.
पण मी नाही थांबलो ना नाम थांबवलं. छाती फुटायचीच काय ती बाकी होती इतका धावत सुटलो.

समोर मंदिर स्पष्ट दिसत होतं, हा एक शेत पार केला कि मी आप्पापाशी पोहोचणार होतो. दमल्यामुळे श्वास घेता येईनात. शेताच्या बांधावर जोरात कोसळलो. शेवटच्या क्षणाला हरतोय कि काय ह्या विचाराने डोळ्यांतून अक्षरशः अश्रू निघाले.
इतका थकलो होतो कि नाम घ्यायला देखील श्वास नव्हते. समोर पाहिलं तर केशरी सोवळं नेसलेले अप्पा मंदिरातून बाहेर पडत होते आणि मागे गुरगुरणारी ती सावली.
विजेच्या वेगाने तिने माझ्यावर झडप घातली मी शेवटचा श्वास समजून देवाचा धावा न करता अप्पाना आर्त हाक मारली. त्यांची मान माझ्याकडे वळली तसा मी वाऱ्याच्या वेगाने वाड्याच्या दिशेने फरफटत खेचला गेलो. . .

https://www.maayboli.com/node/72700 - थरारक : ४

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान